पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड

Submitted by मार्गी on 25 July, 2018 - 07:14

भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना

२८ नोव्हेंबर २०१७ ची थंड सकाळा! पिथौरागढ़ला पोहचल्यावर पहिलं काम म्हणजे ज्याच्याशी बोलणं झालंय, त्याच्याकडून सायकल घेणं हे आहे. हिमालयामध्ये फक्त सहा- सात दिवस जातानाही सायकल चालवण्याची इच्छा आहे. त्यामुळे पिथौरागढ़ला पोहचल्या पोहचल्या मला सायकल मिळेल, ह्यासाठी बराच प्रयत्न केला. इंटरनेटवर उत्तराखंडच्या सायकलिस्ट ग्रूप्ससोबत संपर्क केला, पिथौरागढ़ व जवळच्या परिसरातील सायकलिस्ट ग्रूप्ससोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण कोणाशीच थेट संपर्क झाला नाही. काही जण सायकल देतात, पण सायकलिंग पॅकेज म्हणून; कोणाला अशी काही दिवसांसाठी देत नाहीत. मग पिथौरागढ़मधले ओळखीचे लोक व त्यांचे व्हॉटसएप ग्रूप ह्यावर मॅसेज केला. तेव्हा कुठे एका व्यक्तीने म्हंटलं की, त्याच्याकडे असलेली साधी सायकल तो मला देईल. आता त्याचीच वाट बघतो आहे. ठरल्याप्रमाणे बस स्टँडवर गेल्यावर त्याला कॉल केला. पण लागला नाही. खूप वेळाने फोन लागला, तेव्हा म्हणाला की तो दुसरीकडे कुठे तरी आहे. खूप उशीरा मग कळालं की, तो फार लांब आहे. त्यामुळे सायकल काही मिळाली नाही. आत्तापर्यंत मनात इच्छा होती की, इथे सायकल चालवेन, मनात त्याची योजना चालू होती. एकदम मनाचा तो प्रवाह तुटला! एक प्रकारे निराशच वाटलं. हे माहितीच होतं की, पहाड़ी लोक अगदी प्रॉम्प्ट नसतात. पण तरी थोडा वेळ दु:ख झालं. नंतर मात्र जाणवलं की अरे बघ! हिमालयात येऊनही तू कसा रडतोस की सायकल मिळाली नाही! हिमालय तर मिळतोय ना, हिमालयाचा सत्संग तर मिळतोय ना, त्यापुढे सायकलीची काय गोष्ट! मग सर्वांसोबत पुढे निघालो. पिथौरागढ़च्या पुढे धारचुला रस्त्यावर वीस किलोमीटरवर सत्गड किंवा सद्गड गाव आहे. इथे पहिला मुक्काम असेल.


पिथौरागढ़ला आधीही आलो आहे. त्या आठवणी जाग्या झाल्या. टनकपूरच्या पुढे आल्यावरच बीआरओचे फलक, त्यांचं काम दिसत होतं. नंतर तर आर्मी आणि भारत तिबेटियन बॉर्डर पुलीस हेही दिसतात. त्याच्याशिवाय अर्थातच दिसतात दूरवर पसरलेले पर्वत, हिरवागार निसर्ग, जंगल, देवदार वृक्ष आणि दूरून साज देणारे हिमाच्छादित शिखर! त्याबरोबर एक अतिशय मृदु थंडी आणि शीतलता! पिथौरागढ़वरून बसने पुढे निघालो. बसमध्ये मस्त गर्दी आहे. तरीही चांगलीच थंडी जाणवते आहे. इथे आल्यापासून गावामध्ये व बसमध्ये असा एकही जण दिसत नाहीय ज्याने स्वेटर घातलं नाहीय! पिथौरागढ़ची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे १६०० मीटर आहे. इथे रस्ता थोडा वर चढतो, परत खाली येतो. वीस किलोमीटर अंतरामध्ये अनेकदा रस्ता चढतो व उतरतो. जेव्हा रस्ता थोड्या उंचीवर जातो, तेव्हा दूरवर ॐ पर्वत आणि अन्य शिखर दिसतात! हिवाळ्यात आल्याचा हा एक फायदा की आकाश निरभ्र असतं‌व विजिबिलिटी खूप दूरवर असते. त्यामुळे २००- ३०० किलोमीटर दूर असलेले शिखरही उंचावरून बघता येतात! एक प्रगाढ शांतता आणि आल्हाददायक अनुभव होतो आहे! पण त्याबरोबरच दो दिवसांचा प्रवास आणि नंतरचा सहा- सात तासांचा पहाडी घाटाचा प्रवास ह्यामुळे शरीर थकलंही आहे. आणि आता कळतंय की, भले फक्त वीस किलोमीटर असेल, पण काही जागी असलेल्या तीव्र चढामुळे हे अंतर साध्या सायकलीवर जमलंच नसतं. कदाचित सर्व चढ पायी पायीच चढावे लागले असते. असो!

प्रवासामुळे सोबतच्या सर्वांचीच अवस्था बरी नाही आहे. माझ्या छोट्या अदूलाही प्रवासाचा थोडा त्रास झाला. आता सर्वांना आराम हवा आहे. सद्गड गाव रस्त्यापासून सुरू होतं‌ व डोंगरावर चढत जातं. उत्तराखण्डमध्ये त्याला तल्ला (तळ भाग)‌ व मल्ला (माळ्याचा भाग) म्हणतात! आम्हांला थांबायचं आहे ते घर रस्त्यावरून काही अंतर आत डोंगरात आहे. काही लोक रिसीव्ह करायला खालीही आले आहेत. सगळ्यांशी गप्पा सुरू झाल्या. इथून घरी जाणं, हाही एक वॉर्म अप ट्रेक आहे. दगडी पायवाटेने हळु हळु वर चढत जायचं. जसे जसे वर चालत गेलो, तसे आजूबाजूचे डोंगर आणखी‌ दिसायला लागले! हिमालय की गोद में! हिमालयाच्या शब्दश: कुशीत असलेल्या गावातल्या घरी जाऊन मस्त आराम केला. दुपारीही चांगली थंडी वाजते आहे!

मनात आता योजना सुरू आहे की, कुठे कुठे जाता येऊ शकेल. हातात जेमतेम चार- पाच दिवस आहेत. कारण एका लग्न कार्यक्रमात जायचं आहे. त्याशिवाय कौटुंबिक गाठी- भेटी सुद्धा आहेत. एकदा वाटलं की, मुन्सयारीला जाऊन यावं. पण कळालं की, एका दिवसात जाऊन येता येणार नाही. शिवाय हा प्रवास माझा नेहमीचा सोलो ट्रेक नसून सगळ्यांसोबत कौटुंबिक सहल आहे. त्यामुळे मला किती वेळ मिळतो बघावा लागेल. माझ्या तीन वर्षाच्या अदूसोबत छोटे अनेक ट्रेक केले आहेत. आता तिच्यासोबत हिमालयाचा आनंद घ्यायचा आहे. इथली थंडी व हिमालयाच्या वातावरणात तिचे गाल इथल्या पहाडी मुलांसारखे लवकरच लाल होतील, ह्याची मी वाट बघतोय! तिच्यासोबत डोंगरातून येणा-या पाण्याजवळ गेलो. इथे पिण्याचं पाणी डोंगरातूनच येतं. दुपारी चांगला आराम केला. तसं तर ह्या दिवसांमध्ये हिमालयात दुपारच नसते. सकाळ होते, थंडी जातच नाही आणि एकदम साडेपाचनंतर रात्र होते. सूर्य चार वाजताच डोंगराच्या मागे निघून गेला.


अदू!

हिमालयातल्या ह्या छोट्या गावात येणं अनेक दृष्टीने विशेष आहे. एक तर इथे मोबाईल नेटवर्क अगदी थोडं येतं. त्यामुळे आपले रोजचे मोबाईल व इंटरनेटसोबतचे व्यवहार बंदच होऊन जातात. सगळीकडे एक प्रसन्न सन्नाटा बरसत असतो! नवीन लोक, जुन्या ओळखीच्यांशी नवीन भेटी, गप्पा आणि निसर्गाचा सत्संग! सोबतीला पहाडी कुत्रे व पहाडी वृक्ष! हे सद्गड गांव जंगलाच्या जवळच आहे. इथे रात्री अनेक वन्य प्राणी येतात आणि डोंगरातल्या शेतीची नासाडी करतात. इथे सगळे जण भावकीतलेच आहेत. आता अनेक कुटुंबे किंवा कुटुंबातले अनेक जण पिथौरागढ़ किंवा बाहेर दिल्ली- मुंबईला राहायला गेले आहेत. त्यामुळे काही घरं बंद असतात. तरीही इथे शहराचा प्रभाव मोठा आहे. मुलं इंग्लिश मीडियमच्या शाळेत स्कूल बसने जातात. अनेक लोक शहरासारखे जॉब्ज करतात. शेतीही करतात, पण कुटुंबातले सगळे जण शेती करत नाहीत. गप्पामंमध्येच दिवस निघून गेला. आता एक मोठी झोप हवी आहे. आणि इथे झोपही खूप सहज व लवकर येते. संध्याकाळी सात वाजेपर्यंत गाढ झोप आली.

पुढचा भाग- पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

त्याच्याशिवाय अर्थातच दिसतात दूरवर पसरलेले पर्वत, हिरवागार निसर्ग, जंगल, देवदार वृक्ष आणि दूरून साज देणारे हिमाच्छादित शिखर! त्याबरोबर एक अतिशय मृदु थंडी आणि शीतलता!>>>> वाह!