हर तरफ अब यही अफसाने है…

Submitted by अतुल ठाकुर on 18 July, 2018 - 21:34

actor-raaj-kumar.jpg

आमच्याकडे काव्यशास्त्रात शृंगाराबद्दल खुप काही बोललं गेलंय. विरहातदेखील शृंगार शोधणार्‍या प्राचीन विद्वानांची कमाल वाटते. त्यातला एक प्रकार आहे अभिलाषाजनित विप्रलंभ शृंगार. यात नायकाला नायिकेची अभिलाषा असते. मात्र ती त्याला अजूनही प्राप्त झालेली नसते. तिचे वर्णन करण्यात त्याला अपार आनंद होत असतो. या विप्रलंभ शृंगाराचे चपखल उदाहरण म्हणजे चेतन आनंदच्या “हिन्दुस्तान की कसम” मधील मदन मोहन, कैफी आझमी आणि मन्नाडे यांचे “हर तरफ अब यही अफसाने है” हे गीत. आधी ही तीन नावंच गाण्याचा दर्जा किती उच्च असेल हे सांगून जातात.

मला अनेकदा नवल वाटतं की एखादा संगीतकार हे कसे काय ठरवत असेल की कुठल्या गाण्याला कुठल्या गायकाचा आवाज योग्य आहे ते. कुठेतरी असं वाचल्याचं आठवतंय की सरळ साध्या शिपाईगड्यासाठी मदनमोहनने तितकाच सरळसोट असा मन्नाडेचा आवाज पसंत केला. याला मास्टरस्ट्रोक म्हणावे लागेल. खरी परीस्थिती देव जाणे पण या गाण्यात मन्नाडेचा आवाज अगदी फिट्ट बसलाय हे नक्की. मन्नादांनी “हम तेरी आंखोंके दिवाने है” मध्ये “दिवाने” वर मस्त करामत केली आहे. शिवाय त्यांनी “जिसकी किस्मतमें ये पैमाने है” म्हणताना किस्मत मधील “कि” चा केलेला उच्चार खास ऐकण्याजोगा. गाण्याच्या सुरुवातीचं मन्नादांचं हमिंगही कानाला गोड वाटतं.

मदनमोहनच्या सुरेल चालींव्यतिरिक्त त्याच्या गाण्याचे ऑर्केस्ट्रेशन म्हणजे मला नेहेमी कुणीतरी सर्व आवडते पदार्थ घालून समोर शिगिशीग भरलेले ताट आणावे असे वाटते. दोन कडव्यांतील मधल्या संगीताचाही मनमूराद आस्वाद घ्यावा.

कैफी आझमींचे शब्द म्हणजे प्रेमाची जादू काय असते तेच सांगून जातात. “कितनी सच्चई है इन आंखोंमे, खोटे सिक्के भी खरे हो जाये, तू कभी प्यारसे देखे जो उधर, सुखे जंगल भी हरे हो जाये”..या अतर्क्य वाटणार्‍या गोष्टी प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकरालाच अगदी खर्‍या वाटत असणार.

चेतन आनंदला गाणे पिक्चराईझ करताना धुक्याचे आकर्षण वाटत असावे. त्याच्या “हसते जख्म” मध्ये त्याने रफीच्या “तुम जो मिल गये हो” मध्येही ही किमया केली आहे. धुक्याच्या पातळ पडद्याआड दिसणारी प्रिया राजवंश येथेही आहे. एका ठिकाणी राजकुमार समोरुन येत असतो. स्क्रिनवर फारशी पार्श्वभूमी न दाखवता फक्त त्यालाच दाखवले आहे आणि अचानक कॅमेरा मागे घेऊन राजकुमारच्या मागची लांब जाणारी वाट दाखवली आहे. त्या वाटेकडे हात दाखवून राजकुमार “रास्ते प्यारके अनजाने है ” ही ओळ म्हणातो…ही कॅमेराचे करामत मस्तच.

आणि खुद्द जानीसाहेबांबद्दल काय बोलणार? दोन्ही हातांचा अभिनयासाठी वापर करत त्याने जणु गाण्याचा स्वतःच आनंद घेत ते पडद्यावर सादर केले आहे असे वाटते.

आधीच तो सैनिकी पोशाख आणि त्यात हे राजबिंडे व्यक्तीमत्व. पुढे त्याच्या आवाजाची थट्टेवजा नक्कल होऊ लागली आणि त्याचे लार्जर दॅन लाईफ चित्रपट येऊ लागले. त्याबद्दल नको बोलूयात. पण “उजाला”चा राजकुमार, “पैगाम”चा राजकुमार, “वक्त” चा राजकुमार हा एक जबरदस्त माणुस होता हे नाकारता येणार नाही. त्याच्या व्यक्तीमत्वाइतकेच त्याचे ते उजवा खांदा किंचित झुकवून चालणे अतिशय देखणे. चेतन आनंदने हुशारीने त्याच्या त्या खास स्टाईलचा गाण्यात वापर करून घेतला आहे. या गाण्यात त्याला मुद्दाम पायर्‍या चढायला आणि उतरायला लावले आहे असे मला वाटते. ते पाहताना खुप छान वाटते. गाणे त्यामुळेही श्रीमंत झाले आहे.

अतुल ठाकुर

हे गाणे येथे पाहायला मिळेल.
https://www.youtube.com/watch?v=RGxl_wjzuEg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अतुल!
काय आनंद झाला म्हणून सांगू शीर्षक पाहून! माझे अत्यंत आवडते गीत आहे हे. चित्रीकरणसुद्धा गाण्याच्या तरलतेला अनुसरून आहे. इतके सुंदर गीत - पण फारसे कुणाला माहीत नसते आणि रेडिओ कार्यक्रमांमध्येही क्वचितच वाजवले जाते असा माझातरी अनुभव आहे. रिपीट मोडवर जी गाणी ऐकते त्यात याचा नंबर पहिल्या पाचात असतो Happy

ऐकलेलं नाही.....पण राजकुमार अत्यंत आवडीचा आहे Happy

त्याला प्रिया राजवंश सारखी सोबत कोर्टींग करायला लावणं हा त्याच्यावर खरोखर अन्याय आहे!!
चेहेरा हा हावभाव दाखविण्या साठी असतो हेच तिच्या गावी नव्हते.

छान समालोचन.

नितांत सुंदर गाणे ! मन्ना डे माझा अतिशय आवडता नि त्याचे हे गाणे त्याच्या शब्दांवर घेतलेल्या किंचितशा स्ट्रेसमूळे विशेषच आवडते. त्याच्याशिवाय कोणाची कल्पना करवत नाही गाण्यात.

मस्त लेख
तुमच्यामुळे जुन्या गाण्यांची नवी ओळख होतेय

गाणं सुंदर आहेच हो पण त्या राजकुमारला( हगवण लागल्यासारखे भाव/ न झालेल्या सारखे) इतक्या भावूक गाण्यात पाहणे हि शिक्षा आहे.
खरेतर, ह्या गाण्यात असलेले सर्व कलाकार इतकं मठठ भाव दाखवतात की बस..
आणि मला सिनेमॅटोग्राफी जराही बरोबर वाटली नाही. गाणं उदास असतं तर ठिक हितं.

राजकुमार - दिलदार आणि अत्यंत सॉर्टेड आउट माणूस ज्याने फेक फिल्मी जीवनाला स्वतः च्या जीवनात शिरु दिले नाही.
पण अभिनेता म्हणून माझ्या दृष्टी ने खूप च विक! मोठा स्टार, नो डाउट, पण विक अभिनेता!

गाणे नि:संशय सुंदर आहे.