प्राजक्त आला फुलून....
आमच्या अंगणामध्ये लावलेलं पहिलं रोप म्हणजे प्राजक्ताच. अल्पायुष्य लाभलेलं हे फुल रात्रीच उमलते हे मला आमच्या अंगणातील पहिलं फुल उमलल्यावर कळलं.सकाळी उठल्यावर प्राजक्ताच्या झाडाकडे लक्ष गेलं तर ते इवलंस,सुकुमार फुल अंगावर दवबिंदू घेऊन झाडाखाली पहुडले होत.पुन्हा सुख म्हणजे काय च उत्तर मिळणारा तो क्षण.
ते झाड लावल्यापासून जिवो जीवस्य जीवनं च्या चक्रासाठी तीन वेळा बळी पडलं.मात्र वारंवार जोमाने फुलून येत होत.जेंव्हा पहिल्या वेळी त्याची पाने फुटताना ती चिमुकली चिमुकली होती चांगलं दोन ते तीन फूट वाढलं असेल शेजाऱ्यांच्या शेळीने त्याचा फडशा पाडला एक छोटीशी साल गेलेली पांढरी काटकी उरली त्या पर्णपिसाऱ्याच्या जागी.आता कुठलं जगतंय म्हंटल तर ते पुन्हा बहरत गेलं.आता त्याची पाने थोडी आकाराने मोठी उमलून आली होती आणि वर वाढण्यापेक्षा जमिनीवर बहरत यायचा आता प्राजक्ताचा संकल्प होता ते जणू हे सुचवत होत की पुन्हा काही संकट आले तर आधाराला जमिनीलगत फांद्या हव्यातच.आता मीही आणि घरातील सर्वजण प्राजक्ताला व इतर झाडांना डोळ्यात तेल घालून जपू लागलो.झालं पुन्हा शेळ्यांनी डाव साधत जीवापाड जपलेल्या झाडांना खाऊन टाकलं.येता जाता आता प्राजक्त एवढा मोठा झाला असता,फुलांच्या सड्याने अंगण भरून गेलं असत म्हणत होणारी हळहळ मात्र वाढली.
एकूण तीन वेळा शेळ्यांच्या भक्ष्यस्थानी पडलेला हा प्राजक्त प्रत्येकवेळी नव्या जोमाने बहरुन आला आणि हार नाही मानायची पुन्हा आणि पुन्हा नव्याने बहरत जायचं हा धडा देऊन गेला .
त्याचा पर्णभार जमिनीवर पसरत असताना फुलांनी ओढ लावल्यावर मम्मी म्हणाली सुद्धा कि झाडाचे कलम करूयात म्हणजे ते उंच वाढेल आणि त्याला फुल येतील.मी मात्र त्याच्या फुलण्या आणि उमलण्याला आपला हस्तक्षेप नकोच असं मम्मीला बजावलं.त्याच्या मनाला येईल तसा तो बहरत जाऊदे आणि फुलही त्याला हवी तेंव्हा येऊदे असं म्हणाले.आज प्राजक्ताच पाहिलं फुल त्याच्या झाडाखाली विसावले होत हे बघून वाटलं प्राजक्ताची ही इवलीशी फुलही किती स्वाभिमानी आहेत एका रात्रीत उमलून येतात आणि सकाळी स्वतःच झाडाखाली अलगद गळून विसावतात.आपल्या पोषणाचा भार आईवर नकोच असाच विचार करीत असावीत बहुदा.इतर फुल झाडावर सुकली तरी त्या देठाला धरून रहातात. पण प्राजक्त मात्र Home seek नसतोच इवलस हे फुल आपल्याला स्वावलंबी जगण्यातील मर्म शिकवून जात.
या फुलाबरोबर सेल्फी काढताना मम्मी म्हणाली सुद्धा कि कृष्णाची बायको सत्यभामा कृष्णाने रुक्मिणीला दिलेलं ते प्राजक्ताच झाड हटून आपल्या अंगणात लावते आणि ते झाड उंच वाढत आणि रुक्मिणीच्या दारात फुलांचा वर्षाव करीत रहात. सवती मत्सरीत बिचाऱ्या प्राजक्ताच हाल होत.असं हे दैवी पहिलं वहिलं प्राजक्ताच फुल आज माझ्या अंगणात फुलून आलं आहे.आणि इवलस हे फुल मला आभाळभर आनंद देऊन ....आनंद गगनात मावेना मावेना या गाण्याची प्रचिती देतंय....
©राजश्री जाधव-पाटील
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
मस्तच, खूप छान लिहिलंय
मस्तच, खूप छान लिहिलंय
धन्यवाद VB आणि देवकी
धन्यवाद VB आणि देवकी