एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १३: समारोप

Submitted by मार्गी on 30 June, 2018 - 08:35

भाग १३: समारोप

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ५: अंबड- औरंगाबाद
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ६: देवगिरी किल्ला आणि औरंगाबादमध्ये योग चर्चा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना - सिंदखेडराजा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेडराजा- मेहकर
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १०: मेहकर- मंठा
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ११: मंठा- मानवत
एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १२: मानवत- परभणी

योग सायकल प्रवास २१ मे ला पूर्ण झाला. अकरा दिवसांमध्ये सुमारे ५९५ किलोमीटर सायकल चालवली‌ व अकरा ठिकाणच्या योग साधकांसोबत भेट झाली. माझ्यासाठी हा अतिशय विलक्षण आणि मोठा अनुभव होता. ह्या प्रवासाबद्दल संक्षेपात काही‌ गोष्टी बोलेन. सुरुवातीला प्रवास पूर्ण झाल्यावर परभणीच्या निरामय टीमसोबत व योग साधकांसोबत झालेल्या चर्चेविषयी बोलतो. निरामय टीमला मी प्रवासातील प्रत्येक दिवसाचे अनुभव सांगितले. प्रत्येक ठिकाणी मला भेटलेल्या योग साधकांविषयी माझी निरीक्षणं सांगितली. अर्थात् फक्त एक दिवस भेटून खूप काही जाणून घेता येत नसतं. पण तरी माझा सामाजिक संस्थांच्या क्षेत्रात अनुभव असल्यामुळे अनेक गोष्टी मला प्रत्येक ठिकाणी बघता आल्या. प्रत्येक ठिकाणचे साधक आणि टीम किंवा टिमचा अभाव हेही बघता आलं. हे निरीक्षण फक्त माझी एक प्रतिक्रिया म्हणून बघावं व एक ठाम मत म्हणून बघू नये, असंही म्हणालो. प्रत्येक ठिकाणी रोज अनेक लोक भेटत गेले. लोकांनी मला अनेक गोष्टीही सांगितल्या. पण ते जे सांगतात, ते खरंच आहे का, हेही मला बघायचं होतं. जसं चर्चांमध्ये अनेकदा लोक म्हणायचे की आम्ही इतका सातत्याने व खोलवर योग करतो. जेव्हा कोणी असं सांगायचं, तेव्हा मी त्याचं शरीर बघायचो. आपलं मन खोटं बोलू शकतं, पण शरीर कधी खोटं बोलत नाही. अनेक ठिकाणी‌ अशा बोलण्याला शरीराकडून दुजोरा मिळायचा नाही. तेव्हा मी समजून घ्यायचो की, जेव्हा अनेक लोक ऐकायला उपस्थित असतात, तेव्हा काही लोक असं बोलतात जे ते अन्यथा बोलले नसते. असो. त्यामुळे मी माझा प्रवास व सर्व अनुभवांविषयी माझ्या प्रतिक्रिया निरामय टीमला सांगितल्या. प्रत्येक ठिकाणचं काम, तिथल्या कार्यकर्त्यांची दृष्टी, त्यांच्या कार्याची खोली ह्याविषयी माझं जे थोडं निरीक्षण झालं होतं, ते सांगितलं. आणि मी हेसुद्धा सांगितलं की, मी ह्या प्रवासात काय काय केलं आणि काय काय करू शकलो नाही. म्हणजे चर्चेचं संचालन करणे किंवा तसं संभाषण करणे हे माझं कौशल्य नाही. त्याची कमतरता एक- दोन ठिकाणी जाणवली. कुठे कुठे थकल्यामुळेही माझा सहभाग थोडा कमी पडला. हेही निरामय टीमला सांगितलं.


प्रवासाची जी उद्दिष्टं होती, ती काही प्रमाणात पूर्ण होताना नक्की दिसली. म्हणजे योग कार्याला समोर आणणे, लोकांपर्यंत नेणे, जे लोक चांगलं काम करत आहेत, त्यांची माहिती एकत्र करणे; साधकांसोबत संवाद करणे आदि. योग- प्रसारही झाला थोडा. पण त्याशिवाय ह्या प्रवासाचा एक खूप वेगळा उपयोग हा झाला की, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींमध्ये योग करणारे साधक ह्या चर्चेच्या निमित्ताने संपर्कात आले आणि तिथल्या टिम्सना आणखी बळ मिळालं. कारण अनेक ठिकाणी असेही साधक चर्चेमध्ये आले ज्यातले अनेक जण एकमेकांना पहिल्यांदाच भेटत होते. आणि साधकांचं काम जाणून घेण्यामध्ये मी जो रस घेतला, त्यांना जे ऐकलं, त्यामुळे त्यांनाही प्रेरणा मिळाली व एक प्रकारचा पॉझिटिव्ह स्ट्रोक मिळाला. जालनाच्या कार्यक्रमात अनेक साधकांनी स्वत:हून म्हंटलं की, ते पुढेही योग करत राहतील व योग प्रसारही करतील. हा ह्या प्रवासाचा एक लाभ झाला. दुसरी गोष्ट म्हणजे हे एक प्रकारे बी पेरण्यासारखं काम होतं. जागोजागी बी पेरले गेले; मातीमध्ये टाकले गेले. अर्थातच आहे की, प्रत्येक ठिकाणी त्याचे परिणाम येतीलच असं नाहीय. ते स्वाभाविकसुद्धा आहे. पण काही जागी नक्की येऊ शकतात. जसं मी आज योग करतोय किंवा सायकल चालवतोय, तेही कोणापासून तरी प्रेरणा घेऊनच ना. असाच कोणी तरी माझ्यासाठी निमित्त ठरला; माध्यम ठरला ज्यामुळे मी ह्या मार्गावर आलो. तसे काही थोडे लोक असणार ज्यांना प्रेरणा मिळेल.

एक गोष्ट म्हणजे मी ह्या पूर्ण प्रवासात कोणालाही सायकल चालवा असं बोललो नाही. पण प्रत्येक ठिकाणी‌ लोक सायकल चालवताना दिसले. आता हे सांगणं कठीण आहे की, ह्यापैकी किती लोक खरोखर सायकल चालवतात किंवा पुढेही चालवत राहतील. उत्साहाच्या भरात लोक अनेक गोष्टी म्हणतात- मीसुद्धा आजपासून चालवीन. पण ते खरंच तसं करतील- खरंच तसा योग करतील; योग प्रसार करतील हे तेच ठरवू शकतात. मी फक्त त्यांनी हा विचार करावा, ह्यासाठी एक निमित्त किंवा एक माध्यम बनलो. माझ्याविषयी अनेक गैरसमजही झाले जसं लोक मला योग गुरू व योग शिक्षकही म्हणाले. मी फक्त योग विद्यार्थी आहे. त्यापलीकडे कोणी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी जो प्रवास केला, तो होत गेला. त्यातही माझं असं काहीच नाही. म्हणजे सायकल चालवण्याची प्रेरणाही कोणाकडून तरी मिळाली. सायकल चांगली कशी चालवावी, हेसुद्धा कोणी तरी शिकवलं. आणि ह्या सायकल प्रवासातलं अमृत- ज्यामुळे ही सायकल चालू शकली- ते एनर्जाल तेही बाहेरूनच मिळालं! त्यामुळे त्यात माझं असं काहीच नाही. मी फक्त एक निमित्त व माध्यम बनलो. असो.

पण सायकल एक माध्यम म्हणून किती सक्षम आहे, हे नक्की बघता आलं. जर हाच विषय मी एखाद्या चारचाकीने प्रवास करून हाती घेतला असता तर बराच कमी प्रतिसाद मिळाला असता. सायकलीचा संबंध भावनेशी पोहचतो. बुद्धी किंवा विचार हे तर आपल्या व्यक्तिमत्वातलं बाहेरचं आवरण आहे, पण भावना किंवा भाव अधिक खोलवर असतात. सायकल असल्यामुळे लोकांपर्यंत तो भाव पोहचला. आणि मेंदूपर्यंत विचार पोहचण्याच्या ऐवजी हृदयापर्यंत हा भाव पोहचला आणि लोक येत गेले, भेटत राहिले आणि जोडले जात राहिले. अनेक ठिकाणी तर मोठ्या पोस्टवर काम करणारे डॉक्टर आणि अन्य लोकही मला भेटत राहिले, चर्चेत येत राहिले किंवा माझं स्वागत करत राहिले. म्हणून सायकलचं माध्यम म्हणून तर हा प्रवास सफल ठरलाच.
निरामय संस्थेच्या दृष्टीने बघायचं तर त्यांच्या साधकांनी शिकवलेल्या साधकांचं काम ह्यामध्ये मुख्यत: बघायचं होतं. परभणीच्या बाहेर निरामयशी जोडलेलं किंवा निरामयपासून पुढे विस्तार झालेलं काम बघण्यात आलं. अनेक ठिकाणी निरामय टीमचे डॉ. रामपूरकर सर, प्रकाश बुजुर्गे जी, डॉ. धीरज देशपांडे ह्यांची नावं तिथल्या तिथल्या आधकांनी अतिशय कृतज्ञता भावाने घेतली. निरामय टिमचाही खूप उल्लेख होत राहिला. ह्या प्रवासासंदर्भातली दुसरी गोष्टम् हणजे पूर्वी मी अनेक संस्था बघितल्या आहेत; त्यांचं काम बघितलं आहे. असं काम कसं पुढे वाढवलं जातं, ह्याचा थोडा अनुभव माझ्याकडे आहे. तोही मी निरामय टीमसोबत शेअर करू शकल्प्. त्यांचं काम आणखी पुढे कसं नेता येईल व आज उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान आणि साधनांचा वापर कसा केला जाऊ शकतो, ह्याविषयी मी त्यांना सांगितलं. प्रवासाच्या योजनेपासूनच एक प्रकारे माझे इनपुटस निरामय टिमला मिळत गेले. योग प्रसार व संस्थेच्या कार्याचा प्रसार ह्याबद्दल विस्ताराने बोलणं झालं.

शेवटी परभणीतल्या योग साधकांसोबत भेट झाली. डॉ. राहुल झांबड ह्यांच्या घरी हा कार्यक्रम झाला. इथे अनेक वर्षांपासून योग केंद्र चालवणारे अनेक बुजुर्ग साधक भेटले. सगळ्या ठिकाणी झाली तशीच चर्चा इथेही झाली. परभणीमध्ये विशेष गोष्ट अशी आहे की, इथे अनेक पद्धतीने योग करणारे अनेक साधक व त्यांची वेगवेगळी सेंटर्स आहेत. पण जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सगळे एकत्र येतात व मिळून तो आयोजित करतात. त्यांच्यात चांगला संवाद आहे; चांगला संपर्कसुद्धा आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे माझ्या निरीक्षणामध्ये ही गोष्टसुद्धा मी अनेक ठिकाणी बघितली की, आज योगाचे खूप जास्त प्रकार उपलब्ध आहेत. योग म्हंटलं तर लोक कन्फ्युज होतात- म्हणतात कोणाचा योग करू? रामदेव बाबांचा, सहज योग करू की अष्टांग योग करू? वैद्यकशास्त्रामध्ये जसे आज सुपर स्पेशालिटीज आहेत, तशा ह्या सुद्धा सुपर स्पेशालिटीज आहेत. आणि ब-याच प्रमाणात तर सुपरफिशिअल स्पेशालिटीजसुद्धा आहेत! पण आता त्यांना टाळताही येणार नाही. आज असंख्य मार्गांनी ज्ञानाचं भांडार आपल्यापर्यंत येत आहे. त्यात अनेक चुकीचे शॉर्टकटसही आहेत. पण अशा परिस्थितीत सामान्य साधक संभ्रमित होऊ नये, म्हणून वेगवेगळ्या प्रकारे योग करणा-यांमध्ये संपर्क व संवाद असणं फार गरजेचं आहे. विविध पद्धतींनी योग करणं चुकीचं असू शकत नाही, कारण त्यामुळे साधकांची समज वाढायला मदत होते. पण त्यासाठी सर्व साधकांचं एकमेकांशी जोडलेलं असणं फार गरजेचं आहे.

तेव्हा ह्या काही प्रकारे ही मोहीम सार्थक राहिली; अनेक जणांसाठी उपयोगी ठरली. व्यक्तिगत पातळीवर तर माझ्यासाठी हा अतिशय मोठा अनुभव राहिला. अनेक साधकांसोबत मैत्री झाली, अनेकांशी जोडता आलं. सायकल चालवण्यासंदर्भात सांगायचं तर पहिले दोन दिवस कठिण गेले, पण अशा स्थितीत सायकल चालवता येणं, हा खूप मोठा अनुभव होता. सगळ्यांकडून खूप प्रेरणा मिळाली. माझ्यासाठी तर हा प्रवास आणि त्यातला प्रत्येक क्षण अविस्मरणीय आहे व परत परत आठवत राहील... सर्वांना धन्यवाद देऊन, सर्वांना व सायकलीलाही नमन करून आता इथे थांबतो. खूप खूप धन्यवाद!

आपली इच्छा असेल तर आपणही ह्या कामात सहभागी होऊ शकता. अनेक प्रकारे सहभाग घेऊ शकता. जर आपण मध्य महाराष्ट्रात ह्या भागात राहात असाल तर हे काम बघू शकता; त्यांना भेटून प्रोत्साहन देऊ शकता. आपण जर दूर राहात असाल, तरी आपण निरामय संस्थेची वेबसाईट बघू शकता; वेबसाईटवरील ॐ ध्वनी आपल्या ध्यानासाठी उपयोगी असेल. वेबसाईटवर दिलेले अनेक लेख आपण वाचू शकता. किंवा आपल्याला हा विचार पटत असेल तर आपण योगाभ्यास करू शकता; कोणताही शारीरिक व्यायाम सुरू करू शकता आणि जर योग करत असाल तर त्यात आणखी पुढे जाऊ शकता; इतरांना योगाबद्दल सांगू शकता; आपल्या भागात काम करणा-या योग संस्थेविषयी‌ इतरांना माहिती देऊ शकता; त्यांच्या कामात सहभाग घेऊ शकता.

निरामय संस्थेला कोणत्याही प्रकारे आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. पण जर आपल्याला संस्थेला काही मदत करायची असेल व काही 'योग दान' द्यायचं असेल, तर आपण संस्थेद्वारे प्रकाशित ३५ पेक्षा जास्त पुस्तकांपैकी काही पुस्तकं किंवा पुस्तकांचे सेटस विकत घेऊ शकता. किंवा कोणाला भेट म्हणून ते देऊ शकता. निरामय द्वारे प्रकाशित पुस्तकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक योग परंपरांचे अध्ययन करून आणि प्रत्येकातील सार काढून ही पुस्तकं बनवली गेली आहेत. आपण संस्थेच्या वेबसाईटवरून ती पुस्तके विकत घेऊ शकता. निरामय संस्थेची वेबसाईट- ही आहे. त्याशिवाय इतरही पद्धतीने आपण ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. ही पोस्ट शेअर करू शकता. निरामयच्या साईटवरील लेख वाचू शकता. ह्या कामाबद्दल काही सूचना असतील तर देऊ शकता. धन्यवाद!

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप वेगळ्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या सायकलवर वेगळ्या विषयासाठी हि मोहीम झाली.
ह्यात किती अंतर किती वेळात पूर्ण केले ह्याला महत्व नव्हते तर किती लोकांसोबत तुम्ही इंटरऍक्ट करता हे महत्वाचे होते. योग आणि प्रचार-प्रसार व्हावा ह्यासाठी तुम्ही जी मोहीम केली ती विशेष आहे.

तुम्हाला पुढच्या मोहिमेसाठी शुभेच्छा!

फारच सुंदर लेखमाला. इतका खडतर प्रवास सायकल वर पूर्ण केल्याबद्दल तुमचे अभिनंदन. आणि या निमीत्ताने माहिती नसलेल्या प्रदेशाची सुद्धा आम्हाला ओळख झाली.

अशाच मोहीमा सुरू ठेवा आणि आम्हाला कळवत रहा ! Happy