अव्यक्त इच्छा

Submitted by माझी अबोली on 1 July, 2018 - 03:59

ती ८५ च्या आसपास. गुडघे थकलेले, थरथरणारे हात, हलणारे दात, ऐकू न येणारे कान व अंधुक होत चाललेली नजर. त्यात भरीस भर म्हणून BP, Diabetes ने ग्रासलेले. पण उत्साह असा की लहानग्याला पण लाजवेल. कोणताही सणसमारंभ असो, लग्नकार्य असो, बाळंतपण असो वा संकट असो; सतत न डगमगता, जिद्दीने सर्वकाही सुखरूप पार पडणारी ती, आज मला वेगळीच भासत होती. तिच्या स्वभावाला न साजेशी - शांत, नाही..... अबोल !

तिला इतकी शांत, अबोल कधीच पहिले नव्हते. मी आठवू लागले. तिच्याबद्द्लच्या किती तरी आठवणी, प्रसंग डोळ्यासमोरून जाऊ लागले. लहान वयातच मातृछत्र हरपल्यामुळे लहान भावंडाची ताई, त्यांची आई झाली. स्वतःच्या लग्नानंतरही संसार व माहेर याच्यात समतोल ठेवणारी, लहान भावंडाची ताई आता लहान दीर व नंदांचीही आई झाली. अशात सासरे कडक शिस्तीचे. सर्वकाही सोवळ्यात. नवरा शांत व अध्यात्मिक. कधी घरी तर कधी मंदिरात. एकटीने शेत सांभाळून घर सांभाळले. सर्व तारेवरची कसरत. पोटाला कधी घास मिळे, कधी नाही. पण आईविना असणाऱ्या दोन्हीकडील मुलांची लग्न, बाळंतपणे हौसेने पार पाडली. स्वतःची मुले झाल्यावरही ! पण कधी डगमगली नाही.

नवरा अचानक गेल्यावर सर्वांना वाटले आता ती कोलमडेल, खचेल, कारण सौभाग्य म्हणचे सर्वस्व होतं तीचं. कपाळावर भलं मोठं कुंकू हा तिचा अभिमान. सवाष्ण असणे म्हणचे भाग्याचे. पण क्षणात सर्वकाही संपलेले होते. आता तिचे सावरणे कठीण. पण मुलांचे रडके चेहरे पाहून तिने कंबर कसली. नेटाने सर्वकाही पुन्हा उभारले. मुलांची शिक्षणे आणि लग्नंही केली. मुली चांगल्या घरात नांदू लागल्या, मुलेही उच्च पदावर होती. सूना-नातवंडांनी घर भरून गेले. मुलांनी नवी घरं बांधली पण तिने मात्र तिचे जुने घर मोडू दिले नाही. मुलांनीही आईची इच्छा म्हणून ते तसेच ठेवले. सगळीकडे आनंदीआनंद होता. तशातच तिने गावाची निवडणूक जिकूंन सरपंच पद भूषवले. वयाच्या ज्या टप्यात लोक आराम करायचा विचार करतात, त्या वयात तिने गावाची जबाबदारी स्वीकारली . तिची धडाडी, वृत्ती सर्वांनाच महित होती त्यामुळे तिला कोणी अडविले नाही. गावातील शाळा, मंदिरे,बागा व्यवस्थित केली. जेष्ठासाठी वाचनालय,भजनी मंडळे,विरंगुळा केंद्र सुरु केली. अशा एक ना अनेक गोष्टींमुळे ती दुसऱ्यांदाही बिनविरोध सरपंच झाली.

पुढे वयाचा विचार करता तिच्या मुलांनी तिला समाजकार्यातून निवृत्ती घ्यायला लावली. मग दिवस - रात व्रतवैकल्ये, उपासतापास, कुठे पोथीपुराणे वाचन असे तिचे काहिबाही चालू असे. कधी मंदिरात भजन असे तर कुठे प्रवचन असे. कधी अमरनाथ तर कधी काशी. अनेक यात्रा झाल्या, फिरणे झाले. आता अवयव बोलू लागले होते, तरी उत्साह कमी झालेला नव्हता. अशातच एके दिवशी भजनाला जाताना ती गाडीवरून पडली व हातातील ताकद गेली. अंगठयाने काही पकडता येईना. तिला बघायला गेल्यावर, जरा थकलेली वाटली पण बोलणे मात्र तसेच प्रेरणादायी. तशातच पुढे नातवाचे लग्न होते. तिला सर्वकाही तिच्या हाताने करायचे होते. काय तिची गडबड नि काय तो उत्साह. काय करू अन काय नाही असे तिला झाले होते. पण ऐन हळदीच्या वेळी कशाततरी पाय अडकून पडली व तेव्हापासून चालण्यावरचा ताबा सुटला. पायातपाय अडकून पडू लागली, नी काठी हाती आली. तिच्या चालण्याफ़िरण्यावर बंधने आली. तिची मदत करायाला गेली कि उलटच होऊ लागले. कुठे पाणी सांड, कुठे दुध पाणी. कधी हातातून ताट निसटे तर कधी तूप लवंडे. कधी कधी तर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना तोल जाई तर कधी अंगणातील तुळशीपाशी घसरून पडे.

आज तिच्या त्याच नातवाच्या मुलाचे बारसे होते. ती आता पणजी झाली होती आणि तिच्यावर फुले उधंळणार होती. पण ती अगदीच गप्पगप्प ! मला राहवेना. मी विचारले असता कोणी सांगितले, "वयामुळे असेल ". कोणी म्हणाले, "तिची छोटी बहीण वारली मध्यतंरी". तर कोणी म्हणाले , " बरं वाटत नाही. जेवण जात नाहीये " वगैरे वगैरे . पण मला काही तरी वेगळाच जाणवत होते. शेवटी कार्यक्रम उरकल्यावर मी तिला गाठले. पंगती उठत होत्या, कुठे आहेराची देवाणघेवाण चालू होती. त्यामुळे मला तिच्याशी निवांत बोलण्याची संधी मिळाली. तिला तिचे आवडते विषय काढून बोलते केले. तिला विचारले, "तू तर आता पणजी झाली, पाहुण्यांनी नवी कोरी भारीतली साडी केली आता तुझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असतील ना? ". ती म्हणाली, "नाही". मला जरा नवलच वाटले पण तरी म्हणाले, "आता काय परतवंडाला खेळावयाचे, नाहुमाखू घालायचे असेल ना?". ती शांत म्हणाली, "नाही. मला आता त्यात रस नाही". मग मी जरा त्रासनेच विचारले , "मग कोणती इच्छा अपूर्ण आहे तुझी? तुझी मुले तर जे म्हणशील ते आणून देतील, तुला मग .... ?". ती निर्वीकार चेहऱ्याने म्हणाली ,"ते मला नाही आणून देऊ शकत". शेवटी वैतागून मी विचारले, "असे काय पाहिजे आहे तुला?". ती म्हणाली , "मरण" !

आता मी थंड पडले होते. तरी मी धाडस करून विचारले ,"अगं लोक जगण्यासाठी धडपडता आणि तू मरण मागतोस. तुला कशाची कमी आहे गं? मुले,सुना, तुझ्या शब्दाबाहेर नाहीत. पैसाअडका भरपूर, समाजात मोठा मानसन्मान, सर्व सुख दारी असताना तूला मरण कशाला हवे आहे? तू केलेल्या सर्व कष्टांचे सोने झाले आहे आता तू फक्त सुख उपभोग ना? मरणाची भाषा कशाला?". आणि मला रडू कोसळले. ती मायेने कुरवाळत म्हणली, "तुमचे हे अति प्रेमच मला नको आहे. सर्वांना मी हवी आहे. का? तर घरात कोणी तरी मोठे माणूस हवे, माझा सल्ला हवा असतो. पण मी काही देव नाही एका ठिकाणी बसून राहिला. मलाही चालू फिरू वाटते पण शरीर साथ देत नाही. कुणाला मदत करायला गेले कि कामच जास्तीचे होते. स्वतःची कामे ही दुसऱ्यांच्या मदतीने करावी लागतात तेव्हा जगण्याची लाज वाटते. आणि आता जगायचे तरी कशासाठी, कोणाचे माझ्यावाचून अडत नाही उलट माझ्यामुळे सगळ्यांचे अडते. तू म्हणतेस तशी सगळी सुख उपभोगली. मुले चांगली निघाली. त्यांनी घराण्याचे नांव उंचावले. मला कशाची ही कमी पडू देत नाहीत. म्हणून मी फक्त कोपऱ्यात बसून हे सगळे बघायचे या अश्या नव्या कोऱ्या साडया घालून ? नको वाटते हे लाजिरवाणे, दुबळे, असह्य जीवन!"

मला काय बोलावे हेच समजेना मी फक्त ऐकत होते आणि ती भडभडून बोलत होती, "हातातले अवसान गेले नि हातातली कमी ही गेली, जिथे लोकांची मदत करायची तिथे लोक आता माझी मदत घेत नाहीत. चालता नीट येत नाही म्हणून कुठे जाता येईना. ऐकायाला येत नाही म्हणून लोकांनी बोलने सोडून दिले. ज्या घरामध्ये भिंगरी सारखी फिरत होते तिथे एका खोलीत पडून राहावे लागते. माझ्याशी लोक बोलण्यासाठी वेळ काढून येत तिथे आज कोणीतरी बोलेल या आशेवरती बसून राहावे लागते. आत्महत्या मला पसंत नाही कारण मी मोडेन पण वाकणार नाही अशी. आणि खाणंपिणं सोडल तर मुले saline लावून जागवतात. का हा जगविण्याचा अट्टहास? का नाही कोणी हा विचार करत की जगण्यालाही मर्यादा असते. जिथे राज्य केले तिथे खितपत पडणे नकोसे होते. सिंह हा राजा म्हणून जगतो आणि राजा म्हणून मारतो ...कुत्र्या सारखे जगणे नको वाटते त्याला. मरण येण्यासाठी ही भाग्य लागते.....आणि मी त्यासाठी ही कमनशिबी". असे म्हणून ती रडू लागली.

मी निशब्द झाले. काय बोलावे हे समजेना. फक्त विचार आला, खरंच इच्छामरण असावे का?.......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आवडलं .

Back to top