मला महिन्याच्या शेवटच्या सोमवारी-मंगळवारी घरी बसने जमत नाही. मी नकाशावर माझ्या घराचा केंद्रबिंदू धरुन १०० किलोमिटर त्रिज्येचे एक वर्तुळ आखून घेतले आहे. रविवारी रात्री झोपताना तासभर या वर्तुळात डोके घालून बसले की काही न काही सापडतेच. गेले दहा वर्षे मी हेच करतो आहे पण अजुन काही पुर्ण वर्तुळ भटकुन पुर्ण झाले नाही. पण कधी कधी अगोदर पाहीलेलेच परत परत पहावे वाटते. अशा वेळी माझी पावले (चाके म्हणूयात) हमखास वळतात अशी तिन ठिकाणे. पुण्याजवळ असलेले रामदरा, यवत जवळ असलेले भुलेश्वर आणि सिन्नर जवळचे गोंदेश्वर.
यावेळेस भुलेश्वरला जायचे ठरवले. भुलेश्वरला जाताना रमाबाईंची छत्री, थेऊर हे बोनस असतात. भुलेश्वरला जाताना सोमवार शक्यतो टाळतो. त्यामुळे मंगळवारी निघालो. नियमाप्रमाणे डाएट खुंटीला टांगुन ठेवले आणि तिखट पुऱ्या, पिठलं-भात, दही, बाकरवडी, पक्ष्यांसाठी दोन-तिन किलो वेगवेगळे धान्य, पाण्याच्या बाटल्यांचा क्रेट, कॅमेरे गाडीत टाकले आणि निघालो. प्रवास साधारण दिड तासाचा. तरीही शक्यतो मी सहा-साडे सहाला निघतो. तुम्ही जर खादाडीत रस असणारे असाल तर डबा वगैरे घ्यायची आवश्यकता नाही. सोलापुर हायवेला छान जेवण देणारे धाबे आहेतच. कामतांच्या विठ्ठलचे हॉटेलही आहेच. पण दर्जा मात्र पुर्वीचा राहीला नाही. पण स्वच्छ टॉयलेट, हवेशीर बैठकव्यवस्था असल्याने श्रमपरीहारासाठी १५-२० मिनिटे थांबायला जागा ऊत्तम. कामतपासून पुढे काही किलोमिटर गेले की ऊजव्या हाताला भुलेश्वरसाठी रस्ता वळतो. पुणे-सोलापुर हायवेपासून आत साधारण ११ किमी तर पुण्यापासून भुलेश्वर साधारण ४५ किलोमिटर आहे.
हे मंदिर छोट्या टेकडीवर असुन गाडी अगदी वरपर्यंत जाते. तुम्ही जर पहिल्यांदाच हे मंदिर पहात असाल तर प्रथमदर्शनीच जाणवते की मंदिराचे बांधकाम बरेचसे इस्लामीक पद्धतीचे आहे. दुरुन एखाद्या मश्जीदप्रमाणे दिसते. कारण नेहमीचेच. मुस्लीम आक्रमकांपासून बचाव. मंदिर म्हटले की कळस हवाच, पण या मंदिराचे कळस हे ‘कळस’ कमी आणि ‘गुंबद’ जास्त वाटतात. या गुंबदांच्या आजुबाजूला मिनारही आहेत. मंदिराचे बांधकाम तेराव्या शतकातले आहे. काही कथांनुसार हे मंदिर पांडवांनी बांधले आहे. कृष्णदेवराय या यादव राजाने याचा जिर्णोद्धार केला होता. आजुबाजूला चुना दगड असला तरी मंदिराचे बांधकाम हे काळ्या बेसॉल्ट दगडाचे आहे. खरं तर हा एक किल्ला आहे. १६३० च्या आसपास मुरार जगदेव यांनी पुण्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला. याला मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला असही म्हटले जाते. हिंदु मंदिरांप्रमाणे याही मंदिराच्या अनेक पौराणीक कथा आहेत. भगवान शंकराबरोबर लग्न करण्यासाठी पार्वतीने शंकरासाठी येथेच नृत्य केले होते. ईथे तुम्हाला स्रीरुपातील गणपतीही दिसेल. या गणपतीला ‘लंबोदरी’ किंवा ‘गणेश्वरी’ देखील म्हणतात. तुम्ही जर गर्भागृहात गेलात आणि तिथे असलेल्या एका छोट्या पोकळीत पेढ्याचा प्रसाद ठेवला तर काही वेळाने तो नाहीसा होतो म्हणतात. मी काही कधी अनुभव घेतला नाही. या मंदिराला ऐतिहासीक महत्व असुनही येथे एकही गाईड मात्र नाही. मंदिरात तुम्हाला हॅंडीकॅम न्यायला परवानगी नाही पण कॅमेरा मात्र नेऊ शकता. (हॅंडीकॅम पेक्षा कॅमेऱ्याने ऊत्तम व्हिडिओ घेता येतात हा माझा अनुभव.)
मंदिरात प्रवेश केल्यावर मात्र मन एकदम शांत होतं. बेसॉल्ट दगडांमुळे असेल पण ईथली हवा ईतकी अल्हाददायक आणि मन प्रसन्न करणारी आहे की क्षणभरात तुमचा थकवा कुठल्या कुठे पळून जातोच पण मनावर आलेला रोजच्या जगण्याचा ताण निमिषात दुर होतो. तुम्ही प्रवेशद्वारातुन आत गेल्यापासुन गर्भागृहात जाईपर्यंत मन एका वेगळ्याच शांततेने भरुन गेलेले असते. सोमवार किंवा ईतर महत्वाचे दिवस टाळून जर तुम्ही गेला तर ईथली निरव शांतता आणि त्यामुळे मनाला मिळालेली ऊर्जा ही नंतर कितीतरी दिवस तुम्हाला तरतरीत ठेवते. दर्शन घेतल्यानंतर जेंव्हा तुम्ही गर्भागृहाला प्रदिक्षणा घालता तेंव्हा मात्र तुम्ही चकीत होवून जाता. मी एकदा काय कैकदा हे मंदिर पाहीले आहे. आणि प्रत्येक वेळा भान विसरुन गेलो आहे. इथल्या भिंतींवरील कोरीव काम, मुर्त्या, शिल्पे पहाताना अचंबित व्हायला होते. या सगळ्याबरोबर माझा पुलंचा “आणि तो मुसलमान फुल्या फुल्या फुल्या” म्हणनार ‘हरितात्या’ देखील होतोच होतो. दरवेळी होतो. ईतक्या सुंदर शिल्पांवर हातोडा ऊचलताना काहीच कसे वाटले नसेल? ही भंगलेली शिल्पे सुद्धा जर ईतकी सुंदर असतील, आनंद देणारी असतील तर मुळ स्वरुपात असताना त्यांचे सौंदर्य कसे असेल? हात, पाय, शिर फोडताना आपण काहीतरी लाजीरवाने करतोय असं वाटलं नसेल? असो.
मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या थोड्याफार जंगलात मी पक्ष्यांसाठी आणलेले धान्य विखरतो. भुक लागायला सुरवात झालेली असते. त्यामुळे सर्व शिल्पांना ‘परत येईन’ सांगुन गाडी ‘रामदऱ्याकडे’ वळवतो. माझ्याबरोबर रामालाही तिकडे भुक लागलेली असते. त्यामुळे राघवाला नैवेद्य दाखवून जेवायची घाई होते आणि गाडीची गतिही वाढते आपसुक.
तुम्ही जर पुर्ण दिवस भटकंतीसाठी काढणार असाल आणि व्यवस्थित वेळेचे नियोजन केले तर तुम्हाला भुलेश्वर, रामदरा, थेऊर अगदी आरामात करता येईल. पक्षीप्रेमी असाल तर तुमच्यासाठी येथे पर्वणीच आहे. ईथे अनेक पक्षी स्थलांतरासाठी येतात. ऊत्तम फोटो मिळण्याची खात्रीच असते. फक्त तुमची यायची वेळ योग्य हवी.
प्रचि-१
प्रचि-२
प्रचि-३
प्रचि-४
प्रचि-५
प्रचि-६
प्रचि-७
प्रचि-८
प्रचि-९
प्रचि-१०
सुरेख!
सुरेख!
मी पहिले आहे हे मंदिर. मंदिर
मी पहिले आहे हे मंदिर. मंदिर आणि आसपासचा परिसर खूप छान आहे. बाहेरून मंदिराचे सौंदर्य लक्षात येत नाही पण आता गेलो कि मन एकदम सुखावते ...
आतील रचना खूप छान आहेत परंतु मूर्तींची मात्र फार भयानक पद्धतीने विटंबना केलेली आहे ...
माहिती, प्रचि फारच छान..
माहिती, प्रचि फारच छान..
फोटो छान आहेत.
फोटो छान आहेत.
मंदिराला आता जो पांढरा रंग / चुना लावायचा कार्यक्रम चालू आहे तो अजिबात पटलेला नाही.
विठ्ठल कामतांनी जिथे तिथे फ्रँचायझी दिल्याने दर्जा एकसारखा जाणवत नाही त्यामुळे तिथे जाणे टाळतो. महामार्गावरील यवत इथले कांचन हॉटेल बेस्ट. एकदा जरुर ट्राय करा.
धन्यवाद बिपीन!
धन्यवाद बिपीन!
नको ते भडक कलर देणे, अनावश्यक बांधकाम करणे हे फक्त भुलेश्वरलाच नाही तर अनेक ठिकाणी केले गेले आहे. कामतांचे म्हणाल तर मी आवर्जुन थांबतो. जेवण नाष्टा यासाठी नाही तर टॉयलेटस् अत्यंत स्वच्छ असतात, भरपुर जागा असते. त्या मुळे एक कॉफी घेऊन छान दहा-पंधरा मिनिटांची विश्रांती घेता येते मस्त.
कामतला नक्की माहीत आहेत का
कामतला नक्की माहीत आहेत का त्याने किती होटेले चालवायला घेतलीत? पुन्हा त्याच्या भावाच्या वाटनीत काही गेलेली आहेत ते वेगळेच... दर्जा अॅवरेज...
छान माहिती व फोटोपण मस्त
छान माहिती व फोटोपण मस्त टिपलेत.
हे सुधा पहा
https://www.maayboli.com/node/41444
तुमचे सगळे लेख सुंदर असतात.
डबल पोस्ट
तुमचे सगळे लेख सुंदर असतात.
तुमचे सगळे लेख सुंदर असतात.
हेवा वाटायला लागलाय तुमचा. किती वेगवेगळ्या गोष्टिंमध्ये रस आहे तुम्हाला. तुम्ही स्वत: तर त्यांचा आनंद उपभोगताच पण आम्हालाही त्यात सामील करून घेता.
@ferfatka सुरेख फोटो आहेत
@ferfatka सुरेख फोटो आहेत तुमचे. लिखाणही आवडले.
@किट्टु२१
@किट्टु२१
लेख आवडल्याचे आवर्जून सांगीतल्याबद्दल धन्यवाद.
बाकी सर्वांचेच प्रतिसादाबद्दल आभार!
प्रकाशचित्रे खूप सुंदर आहेत .
प्रकाशचित्रे खूप सुंदर आहेत . माहितीही छानच . भुलेश्वर जवळ माळशिरस गाव आहे . गावात यादव आडनावाचे बरेच लोक आहेत . बहुदा जीर्णोद्धार केलेल्या यादव राजाचे वंशज असावेत . मी ५-६ वर्षाचा होतो तेव्हा पाहिले हे मंदिर . घुरकट आठवणी स्पष्ट झाल्या .
धन्यवाद दत्तात्रय साळुंके!
धन्यवाद दत्तात्रय साळुंके!