फुलांचा फोटो
.....
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते. गेली कित्येक वर्षे तो व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून काम करत होता. बरीच वर्षे जाहिरात क्षेत्रात काढल्यावर, तो आपल्या या पाचगणीच्या वडिलार्जित घरी परतला होता. फोटो काढणे हा त्याचा श्वास होता. रक्तात होतं. मागील काही वर्षापासून त्याने नव्या तरुणाईला फोटोग्राफी शिकवण्यासाठी, एक दिवस ते एक आठवड्यापर्यंत अशा वेगवेगळ्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली होती. तो शिकवत होता, स्वतः वेगळ्या अर्थाने समृद्ध होत होता. त्याच्या भटक्या, कलंदर मनाला outdoor म्हणजे नितांत सुंदर वाटे. ‘फोटो काढता येणार नाही, अशी फ्रेम अजून जगात तयार झाली नाही, फक्त त्यासाठी नजर पाहिजे,’ हे त्याचं लाडकं मत. बाहेर बघता बघता, त्याला स्वतःच्या या लाडक्या मताची परत आठवण आली, ‘काही लाडकी मतं, लाडक्या माणसामुळे बदलू शकतात...’ त्याला काही आठवले, आणि डोळ्यात किंचित हसू उमटले....
‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ तो परत स्वतःशीच म्हणाला.... आणि बाहेर पाहू लागला.
..........
किती वर्षे उलटली या गोष्टीला? काळाने शिळ्या होणाऱ्यातली ही गोष्ट नव्हे. हिरवेगार गवत मऊ मऊ असायचे. आल्प्सच्या दऱ्याखोऱ्यातून रांगत येणारे ऊन कोवळे कोवळे असायचे. सोनेरी स्वच्छ उन्हात दिवसच्या दिवस भटकत जायचो. मार्था म्हणायची, ‘अरे, कॅमेरा इतका घट्ट धरू नये हातात. स्थिर असणे आणि घट्ट धरून ठेवणे यांचा काही संबंध नाही.’
हिरव्यागार गवतावरची इवली इवली फुलं, मार्था हसायची तर तिच्या डोळ्यांत डुलायची. म्हणायची, ‘आल्प्सची purity क्लिक व्हायला, आधी नजर नितळ व्हायला पाहिजे. लेन्स तंत्र आहे, नजर जान आहे.’
हॉलस्टेटच्या नितळ सरोवराचे मौन तिच्या दिवसभराच्या बडबडण्यात किणकिणायचे. म्हणायची, ‘मन, तुझ्या देशात सगळेच रंग जरा जास्त भडक असतात, नाही?’ तिच्या गर्द निळ्या डोळ्यात उतरत मी केवळ होय म्हणायचो. तिला आनंद व्हायचा. केवळ फोटो पाहून भारत ओळखू पाहणाऱ्या त्या गोऱ्या मुलीला मी दुसरं काय सांगणार?
का कोण जाणे, माझे लक्ष युरोपातील निसर्गापेक्षा तिथल्या माणसांकडे, सुंदर आखीव, सुबक इमारतींकडे आणि पुतळ्यांकडे जास्त जाई... निसर्ग सगळीकडे सारखाच असतो, अशी त्यावेळी माझी अडाणी समजूत होती.
चालता चालता मार्था मध्येच थांबे, दूर आल्प्सच्या एखाद्या सुळक्याकडे नजर टाकी, म्हणे, ‘मन, हा माझा आल्प्स आणि तुझा हिमालय same same but different different आहेत. तुला हे same काय, different काय, कळू लागेल तेव्हा, तुझे फोटो बघ कसले भारी येतील!’ मी नेहमीप्रमाणे केवळ हसायचो.
म्हणायची, ‘सारखं या यंत्राशी खेळू नये.’ ज्या बास्केटमध्ये खायला घेऊन यायची, त्यातच मग ड्रोइंगचे कागद, पेन्सिली, रंग, ब्रश, लाकडी pads घेऊन यायची. म्हणायची, ‘आज नो कॅमेरा, आज चित्रं काढू...’ एखादे सरोवर, किवा नदीकाठ बघून तिथे आमचा औट घटकेचा संसार मांडायचो. तिचे सगळे टापटीपीत चाललेले असे. ती pad ला नीट कागद लावे, रंग, ब्रश, पेन्सिली सगळे ओळीने मांडून ठेवी. म्हणे, ‘इथं सगळं आहे, पाहिजे ते घे!’ तिचा उत्साह आणि निरागसपणा पाहून माझे मन तिच्या भोवती पक्ष्यासारखे भिरभिरत जाई.
डोळ्यांना सुख देईल, अशी एक निसर्गाची फ्रेम तिच्या नजरेत आली कि मग तिची तंद्री लागे. तिच्या त्या सगळ्या मोहक हालचाली पाहण्यात माझे कागद बराच वेळ कोरे रहात. ती जेव्हा, चित्र काढण्यात मग्न होई, तेव्हा आता आपण आपले चित्र काढावे, हे मला कळे.
.......
हॉर्नच्या आवाजाने तो एकदम भानावर आला. जराशा अंतरावर बस थांबली होती. ‘These young photographers…’ स्वतः शीच म्हणत त्याने कॉफीचा मग हातात घेतला. त्याची नजर तिचा शोध घेऊ लागली. नेहमी प्रमाणे ती सगळ्यात मागे. शेवटी. Sack ची एक वादी गुडघ्यापर्यंत लोंबकळणारी, क्लचरमध्ये न बसणारे, तोंडावर, मानेभोवती अस्ताव्यस्त उडणारे केस. फेंगाडे पाय टाकीत, एका हातात कॅमेरा छातीशी धरून ती येत होती.... तिचा हा अवतार पाहून तो जरा वैतागलाच, ‘How clumsy! Be a little bit smart, lady!’ तो स्वतःशीच म्हणाला. गेल्या दोनतीन दिवसात त्याने या मुलीला पाहिले होते. बाकीच्या सगळ्या टीप top तरुणाई मध्ये तीच एक वेंधळी दिसे. नाव भूमी.... पहिल्याच दिवशी त्याने तिचे क्लिक्स पहायला घेतले आणि पहात राहिला. अप्रतिम फ्रेम्स. तांत्रिक सफाई बऱ्यापैकी होती. जे कॅमेऱ्यात पकडले होते, त्यात जान होती. जिवंतपणा होता. तिचे angles सहसा बरोबर असत. कुठल्याही फोटोत मी आता जगावेगळ काही कैद करून दाखवणार आहे, असा आव नव्हता, कि जो बाकीच्या सगळ्या फोटोग्राफर्स मध्ये सहसा असतो. रंगसंगती डोळ्यांचे सांत्वन करणारी होती.....
एका फोटोपाशी तो थांबला, बराच वेळ पहात राहिला. गुलाबाच्या फुलाचा फोटो होता. कुठल्या तरी बागेत आलेलं फूल असावं. दोन गर्द रंगाच्या कलमांचं..... फूल उन्हाने थकले होते, किंचित झुकले होते....
‘हिला सांगितलं पाहिजे, हिला नक्की कळेल. आजपर्यंत आपण हे कुणाला सांगितले नाही... पण हिला सांगू... ही मुलगी समंजस आहे,’ तो स्वतःशीच म्हणाला.
......
परवा दिवशी भारतात परत निघणार होतो. मार्थाबरोबर दुपारी कॅमेरा घेऊन बाहेर पडलो. भटक भटक भटकलो. ना ती बोलत होती, ना मी हसत होतो! सगळे कसे अबोल अबोल झाले होते! शेवटी एक भला मोठा, विस्तीर्ण पार्क लागला. उंच उंच झाडी. नजर पोहोचेल तिथपर्यंत लांबच लांब मऊ मऊ गवताचे हिरवेगार गालिचे. युरोपच तो... नाना तऱ्हेची नखरेल फुले! माझे मन कुठेच लागत नव्हते. ती तिच्या कॅमेऱ्याची लेन्स पुसत एका झाडाच्या बुंध्याशी बसली होती. मी तिच्याकडे पाहिले. किती तन्मयतेने ती तिचं काम करत होती! मी मग जरा दूर गेलो, तर तिथे आख्खे गुलाबाचे रान दिसले. मला भारताची आठवण आली. मी फोटो काढायला सुरुवात केली. युरोपातले ऊन असून असून किती कठोर असायचे! पण तेवढ्यानेही त्यातली काही फुले थकून गेली होती, त्यांनी किंचित माना झुकवल्या होत्या. मी फोटो काढले. मार्थाजवळ जाऊन बसलो, मी काढलेले फोटो ती पहात होती. बराच वेळ झाला तरी, ती काही बोलेना, कि मान वर करून बघेना. माझे मन भरून आले. मी हळूच म्हणालो, ‘मार्था डियर .....’ मग, तिने एक झुकल्या फुलाचा फोटो माझ्यासमोर धरला, म्हणाली, ‘थकल्या, झुकल्या फुलांचे फोटो काढू नयेत.’ तिचा आवाज कंप पावत होता. मी तिच्या हातांवर हात ठेवला.... तो मांसल, उष्ण स्पर्श कायमचा या तळहातावर कोरला गेला.
निघायच्या दिवशी विमानतळावर निरोप द्यायला आली. मी सहज कॅमेरा बाहेर काढला, तिचा एक फोटो घ्यायचा होता. निघताना. शेवटचा. परत आयुष्यात भेटेल, न भेटेल असे हे साजिरे सौख्य कायमचे कॅमेऱ्यात कैद करायचे होते. मी तिच्याजवळ गेलो, गालाला गाल लावले, म्हणालो, ‘तुझा एक फोटो काढू दे!’ माझी बाही लहान मुलीसारखी धरत म्हणाली, ‘थकल्या,झुकल्या फुलांचे फोटो काढू नयेत.’ माझे अवसान गळाले. कॅमेरा फट्कन बाजूला ठेवला, आणि तिला मिठीत घेतले. फुलांचे अडसर किती जीवघेणे असतात! जीव जात नाही, अन रहातही नाही.
......
दिवसभर सगळे भटक भटकले. हळूहळू ग्रुप पडले. फोटो काढता काढता ग्रुपमधले सगळे एकेकटे होत गेले. सगळे इकडे तिकडे पांगत गेले. प्रत्येकाचे जग निराळे होत गेले. मनोहरच्या काही ठराविक जागा होत्या, तिथे तो थांबे. तो सगळा परिसर त्याने शेकडोवेळा वेगवेगळ्या मौसमात आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता. एरवी तो शांतपणे डोळे मिटून बसला असता. पण आज त्याला तिला ती गोष्ट सांगायची होती, म्हणून जरा तिच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने तिच्या मागोमाग चालला होता. ती कधीचीच एकटी पडली होती. ती कुणाच्या ग्रुपमध्ये तशी नव्हतीच. दुपार होत आली, तसा तो जरा रेंगाळला. त्याने आडोशाला उभे राहून तिच्याकडे टक लावून पाहिले. ती एका झाडाच्या बुंध्याशी बसून बाकीच्या लेन्स पुसत होती. किती मनापासून तिचं ते काम चाललं होतं! तो हळूहळू तिच्या जवळ गेला. त्याला पाहून ती हसली. तो ही हसला. झाडाच्या सावलीत बसत म्हणाला, ‘तुझे आधीचे क्लिक्स आणखी एकदा पाहू!’
‘कशाला?’ तिने खटयाळपणे विचारले. मनोहर मात्र आश्चर्याने सर्द. जिला आपण इतकी वेंधळी, गबाळी, अबोल समजत होतो, ती कशाला परत फोटो पहायचेत असं बिनधास्त हसून विचारतेय! पण त्याला हे आवडले. तो हसून म्हणाला, ‘बघू, मला काय कळतंय का तुझ्या फोटोमधलं!’
तिने कॅमेरा त्याच्या हातात दिला. तो क्लिक क्लिक करत त्या गुलाबाच्या फोटोपाशी गेला.... उन्हाने थकलेले, किंचित झुकलेले.... तिला म्हणाला, ‘हा फोटो बघ!’
ती जागेवरून न उठता दुरूनच म्हणाली, ‘गुलाबाचा ना!’
त्याला परत आश्चर्य वाटले, ‘तुला कसं काय माहित, मी कोणत्या फोटो विषयी बोलतोय ते!’
‘पहिल्या दिवशी तुम्ही त्या फोटोकडे फार वेळ बघत होतात, म्हणून अंदाज केला. विशेष काही नाही.’
‘तू फोटो छानच काढतेस. एवढंच सांगायचं होतं कि.......’
‘थकल्या, झुकल्या फुलांचे फोटो काढू नयेत!’
त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. ‘तू.... तू.... तुला कसं काय माहित हे? हे तुला कुणी सांगितलं ?’
‘माझा दादा जर्मनीतल्या विद्यापीठात संस्कृत शिकतोय. त्याने मागच्या उन्हाळ्यात मित्रांबरोबर ऑस्ट्रियात फोटोग्राफिचा छोटासा कोर्स केला होता हौस म्हणून. तिथल्या tutor ने हे त्याला आवर्जून सांगितलेय. त्याच्या मनात ते वाक्य कायम. सुट्टीत आल्यावर त्याने मला मुद्दाम हा फोटो दिला, आणि कशाचे फोटो काढू नयेत, ते सांगितले. हा फोटो पण तिथल्याच एका बागेतला आहे. त्यानेच काढलेला.’
‘ओह....’ मनोहर एवढेच कसंबसं म्हणाला.
........
पुढचे बरेच दिवस ना त्याने कुठला कॅमेरा हातात घेतला, ना कुठे कुणाच्या निरोपाला उत्तर दिले, ना त्याच्या त्या नेचर क्लबमध्ये गेला!
सकाळ संध्याकाळ त्या टेबल land वर एकटा फिरून यायचा. मनात हजार विचार येत.
‘भूमीला विचारून, तिथून तिच्या भावामार्फत ती tutor गाठणे काहीच अवघड नाही. आजच्या या नेटच्या जमान्यात तर नाहीच नाही. ती मार्थाच असणार. फोटोग्राफीच्या तंत्रात असला हळवा धडा देणारी तीच! इतक्या वर्षांनीही ती असाच विचार करते!!? असणार, आपण नाही का इतक्या वर्षांनंतरही तिचे ते वाक्य अजून प्रमाण मानून चालत! थकल्या, झुकल्याच काय पण कुठल्याच फुलांचे फोटो आपण त्यानंतर आजही काढले नाहीत. फुले झाडावेलींवर बघतो. कुठेतरी मनाच्या आरपार कोपऱ्यातली मार्था हसते. मी ही भुलतो, क्षणभर हसतो, आणि कॅमेऱ्याचा फोकस बदलतो. आज तिची भेट झालीच.... तर, तर काय होईल?... नको, आता ते फुलांचे जीवघेणे अडसर पार करायची शक्ती राहिली नाही....! मार्था, तुझे बरोबर आहे, अशा थकल्या, झुकल्या आयुष्याचेही नव्याने फोटो काढू नयेत.’
त्या दिवसांत मनोहर थकून फार लवकर झोपी जाई.
@शिवकन्या शशी
खूप सुंदर लिहीलंय..
खूप सुंदर लिहीलंय..
खूप सुरेख लिहिलेय।
खूप सुरेख लिहिलेय।
छान लिहीले आहे, खूप आवडले..
छान लिहीले आहे, खूप आवडले..
सुरेख!
सुरेख!
खुप छान लिहिलंय.
खुप छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
सुंदर लेखन. थोडेसे संदिग्ध
सुंदर लेखन. थोडेसे संदिग्ध वाटले तरीही उत्तम, प्रवाही, तरल शैली!
सुंदर लिहिलंय..
सुंदर लिहिलंय..
सुरेख लिहिले आहे!!
सुरेख लिहिले आहे!!
सुरेख लिहिले आहे!! +१११११११११
सुरेख लिहिले आहे!! +१११११११११
छानच.
छानच.
लेखनात परफेक्ट फ्रेम कॅच
लेखनात परफेक्ट फ्रेम कॅच केलीत. आशयघन लेख. पुलेशु.
मस्त लेखनशैली ,आवडल पुलेशु
मस्त लेखनशैली ,आवडल पुलेशु
छान लिहिली आहे. एक गोष्ट
छान लिहिली आहे. एक गोष्ट खटकली. तो फोटो तिच्या दादाने काढला होता तर तिच्या कॅमेर्यात कसा ? जर कॅमेरा दोघे वापरत असतील तर तिने दादाने काढलेले फोटो स्वतःचे क्लिक्स म्हणून का दाखवले.
जर्मनीतल्या विद्यापीठात संस्कृत शिकतोय >>> संस्कृत शिकायला विद्यार्थी जर्मनीत जातात हे माहित नव्हतं.
लेखनशैली मस्त आहे.
चैत्रगंधा.... मुद्दा बरोबर.
चैत्रगंधा.... मुद्दा बरोबर. कॅमेर्यातील फोटो कॅमेऱ्यात थेट पाठवायची सोय अजून झालेली नाही.
असेल तर मला माहित नाही. या गोष्टीचे पुनर्लेखन करताना या गोष्टीचा विचार केला जाईल. म्हणजे शंकेला जागा राहणार नाही.
होय, आपले अनेक विद्यार्थी तिथे संस्कृत शिकायला जातात.
उत्तम वाचन. अभिनंदन. प्रांजळ मत, धन्यवाद.
सुरेख लिहीले आहे, खूप आवडले..
सुरेख लिहीले आहे, खूप आवडले..
सुरेख लिहिलेय
सुरेख लिहिलेय
आवडली.
आवडली.