आंब्याची सांदणं

Submitted by मनीमोहोर on 2 May, 2018 - 09:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मे महिना आला की मन कोकणात धाव घेतं. सारख्या तिकडच्या आठवणी यायला लागतात.. कामांची धांदल, पाव्हणे, त्यांच्यासाठी म्हणून मुद्दाम केलेले आंब्या फणसाचे वेगवेगळे पदार्थ... कोकणची खासियत असणारा असाच एक पदार्थ म्हणजे सांदण. ह्याला गोड इडली म्हणून ह्याच डीमोशन नका करू. कारण सांदण म्हटलं की मनात उठणारे तरंग, त्या भोवती असणाऱ्या मधुर आठवणी, त्या शब्दालाच असलेलं वलय, लगेच खाण्याची होणारी तीव्र इच्छा हे सगळं आमरसाची गोड इडली म्हणून नाही होणार. एकदा आमच्या ऑफिस मधल्या एका सहकाऱ्याच्या पत्नीने चैत्र महिन्यात चांगला मोठा डबा भरून आंब्याची डाळ पाठवली होती. खाल्ली सगळ्यानी मिटक्या मारत पण नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी तिची “ दाल की चटनी ” करून पार चटणी करून टाकली होती . तसंच हे जरी इडली सारख दिसत असलं तरी ह्याला म्हणायचं सांदणच.

पूर्वीच्या काळी असे पदार्थ करण खरंच खूप जिकिरीचं होतं. सगळी काम सांभाळून एवढया माणसांसाठी काही करायचा घाट घालणं कष्टाचंच असे. तेव्हा गोडधोड सटीसामाशीच मिळे खायला त्यामुळे त्याच अप्रूप ही होत आणि लोक खात ही भरपूर असत त्यामुळे करावं ही खूप लागत असे.

आमच्या कडेही सांदणाची तयारी दोन तीन दिवस सुरू होते. ह्यासाठी लागणाऱ्या तांदळाच्या कण्या पूर्वी जातिणीवर घरीच काढत असू आम्ही . आता घरगुती चक्कीवर काढतो. मग चांगला रसाळ फणस तयार आहे का याची चाचपणी होते आणि सगळं जुळून आलं की मग एके दिवशी सांदणांचा बेत फिक्स केला जातो. आमच्या कडे फणसाची आणि आंब्याची अशी दोन्ही सांदण करतात गावाला. ह्या साठी लागणारा फणसाचा रस त्यात गुठळी चालत नाही म्हणून चाळणीने चाळून घ्यावा लागतो. त्यासाठी मोठया मोठया बांबूच्या चाळण्या ही आहेत आमच्याकडे. एकदा सांदण वाफवायला मोदकपात्रात ठेवली की त्याचा एक विशिष्ट सुगंध अख्ख्या घरभर दरवळतो आणि त्या वासाने भूक चांगलीच खवळते.

ह्या वर्षी मी गावाला नाही जाऊ शकलेय मे महिन्यात . पण कोकणातल्या मे महिन्यातल्या आठवणी मनात भरून राहिल्या आहेत. त्यामुळे आज इथेच सांदण केली. अर्थात तिकडे सगळ्यांबरोबर करण्याची आणि खाण्याची मजा औरच पण त्यातल्या त्यात दुधाची तहान ताकावर ... इथे फणसाची सांदण करणं अशक्य आहे कारण बरक्या फणसाचा रस काढणं शक्यच नाही. म्हणून फक्त आंब्याचीच केली. चला आता कृती कडे वळू या.

साहित्य

एक वाटी इडली रवा ( मिक्सर मध्ये थोडा बारीक करून आणि कोरडाच थोडा भाजून घेणे )
दीड वाटी आंब्याचा रस मिक्सरमध्ये एकजीव करणे( गुठळ्या नकोत )
अर्धी वाटी दूध
गरजे प्रमाणे साखर,
एक चमचा तूप
अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर, किंचित मीठ .

क्रमवार पाककृती: 

इडली रवा, आंब्याचा रस, दूध, साखर मीठ आणि तूप सगळं एकत्र करून आणि जरुरी प्रमाणे पाणी घालून इडली सारखं सरसरीत भिजवून एक तासभर ठेवून द्यावे म्हणजे रवा चांगला भिजतो. नंतर पीठ घट्ट वाटले तर त्यात थोडं दूध घालावं. बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने मिक्स करावे आणि इडली पात्रात हे मिश्रण घालून इडली सारखं १२ ते १५ मिनिटं वाफवून घ्यावे. पाच मिनटांनी बाहेर काढून थोडं थंड झालं की साच्यातून सांदण काढावीत आणि गट्टम करावीत.
हा फोटो
IMG_20180502_104846901~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3 ते 4
अधिक टिपा: 

खाताना दूध ( नारळाचे असेल तर धावेल) किंवा तूप जे आवडते त्या बरोबर खावे.

आंब्याचं लोणचं मात्र पाहिजेच बरोबर.

उरली तर दुसऱ्या दिवशी ही छानच लागतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई विद्यापीठात 6/०५ आणि 7/05 रोजी वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आणि खाद्यपदार्थ यावर इतिहास आणि समाजशास्त्राच्या दृष्टीने एक व्याख्यानसत्र आयोजित केले गेले. त्यात 'कोंकणी मुस्लिमांची खाद्यसंस्कृती' यावर बोलताना मोहसीना मुकादम यांनी सांदणाविषयी एक विशेष बात सांगितली. एखादा खासा पाहुणा किंवा जावई प्रथमच घरी यायचा असेल तर त्याला ही सांदणे खायला घालतातच शिवाय निघताना निगुतीने बुट्टी भरून सोबत देतात. मोहसीनाबाईंनी सांगितले की सांदण म्हणजे सांधण. जोडणारे, सांधणारे. नवे संबंध घट्ट जुळावेत म्हणून नव्या जावयाला सांदणे देतात. आपल्याकडेसुद्धा आखाडपाटी, श्रावणपाटीमध्ये ही सांदणे असत.

ममो,थोडसं दूध घातले आणि सान्नं केली.साखर बरीच कमी पडली. >> मी वर लिहीलय बघ .चांगली शिऱ्यासारखी गोड च चांगली लागतात.

किती ही सोपी वाटली कृती तरी पहिल्या वेळी करताना काही तरी बिघडतंच खूप वेळा. आता तुला अंदाज आलाय ना तर लगेचच रिपीट कर रेसिपी . मस्त होतील.

कोकणी भाषा गोडच आहे त्यामुळे सान्न हा शब्द गोडच वाटतोय . पण हिराने लिहिलेली माहिती आणि त्यामागचा अर्थ वाचून सांदणं हा ही आवडलाय. आणि सांदणाच्या आठवणी तर सर्वात गोड.

ढोकळ्यात घालतात तसा पाक करुन सांदणांवर घातला.आता छान लागत आहेत. >
> भारीच आयडीया . सॉलिड च

एरवी सुद्धा असा पाक करून घालायला हरकत नाही त्यामुळे सांदणं मस्त मॉईस्ट होतील. फोटो तरी दाखव इथे.

एरवी सुद्धा असा पाक करून घालायला हरकत नाही त्यामुळे सांदणं मस्त मॉईस्ट होतील. फोटो तरी दाखव इथे.>>>>>> नाही ग ममो.पाकाची आयडिया फसलेला पदार्थ खपविण्यासाठी होती.पाक वरून घातल्यावर सांदणं आधी खाल्ली गेली,नंतर तुझी पोस्ट पाहिली.

हेमा ताई, तुमच्या पा. कृ खुपच आवडतात.. Happy
काल केलेली आंब्याची सांदंणं... घरी सगळ्यांना खुप आवडली..
पा़. कृ साठी आभार.

सायु, मस्तच दिसतायत सांदणं. घरी पण आवडली सगळयांना खूप छान वाटतंय.

मंजू, थोडं अधिक दूध घालून बघ, छान होतील.

शेवटी काल.केली ही सांदणं.
कुकरच्या डब्यात घालून शिटी काढून ढोकळ्यासारखी वाफवली.
कालच्यापेक्षा आज जास्त छान लागलं..
मस्त रेसिपी.

>>>>>देवीका , मिक्सर मध्ये फिरवून ही होतो रस हे नव्हतं माहीत.<<<<
नाही, मिक्सर मध्ये उष्णता निर्माण होवून कडू होतील गरे.>>>>>>>> नाही होत. कालच आईकडे विचारलं असता ती म्हणाली की काप्या फणसाचे गरे मिक्सरमधून काढायची आणि त्याचे सांदणं करायची.

ममो, मी अगदी नावापुरतं दूध घातलं .बाकी रवा पायरी आंब्याच्या रसात फुलला.त्यामुळे रंग मस्त आला होता.आता करणार आहे, त्यात गूळ घालून पहाणार. कारण मला गुळाचा गोडवा आवडतो.

भरत, केलीत ही सांदण आणि आवडली ही... खूप छान वाटतय. कष्टाचं चीज झालं आवडली म्हणून.

कालच आईकडे विचारलं असता ती म्हणाली की काप्या फणसाचे गरे मिक्सरमधून काढायची आणि त्याचे सांदणं करायची. >> देवकी , मस्त आयडीया. आता फणसाच ही करून बघते.

पायरीचा रस पात्तळ असतो म्हणून दूध न घालता चाललं . रस किती घट्ट आहे त्यानुसार च दूध घालावं लागत.

मागच्या आठवड्यात सान्नं केली होती.पण ती न उकडता पॅनवर खाली वर तवा ठेऊन केली.थोडक्यात सान्नं न म्हणता त्याला आंब्याचे धोंडस/ केक म्हणता येईल.चव अफलातून होती.उकडण्याऐवजी भाजल्यामुळे असेल.तसेच रसात फक्त गूळ,वे.पा. घालून त्यात तांदळाचा तुपात भाजलेला रवा, भिजवला होता.एकदाचा रस संपला.

आमच्या कडे करतात सान्ना. पण आंबेमोहोर तांदळाचा रवा, नारळाचा रस, अहाहा!!! धन्यवाद मनीमोहर. मस्त आठवणी जागवल्या.

देवकी, काप्या फणसापेक्षा रसाळ फणसाच्या करायच्या. हमखास गेरेंटेड.>>> नक्कीच.पण ज्यावेळी रसाळ फणस नसेल त्यावेळी आईने काप्या फणसाचे केले होते.मला हे प्रकार फारसे त्यावेळी आवडले नव्हतेच.आता लेकाला आवडतात म्हणून करते.

नमस्कार ममो ताई,
स्वादिष्ट रेसिपी आणि लेख.
ह्या रेसिपीत इडली रव्याच्या ऐवजी भगर घातली तर चालेल का? मिक्सर मधुन बारीक करून घ्यावी असा वाटतं आहे.
मागे एकदा रवा केक केला होता पण तो प्रयोग फसला होता. माकाचू माहिती नाही.
अनायसा चतुर्थी येते आहे. उपासाची सांदण करून बघायचा विचार आहे.
मला सांगाल का प्लिज.
ह्या आणि अश्या अनेक रेसिपीज शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

होय , मस्त होतील उपासाची सांदण. थोड साध्या दुधा ऐवजी नारळाचं दूध घाल असं सुचवेन, moist kreemi व्हायला मदत होईल.
केलीस तर इथे ही सांग म्हंजे सगळ्यांना च कळेल.
कोणाला आणखी काही सुचत असेल उपासाच्या सांदणा साठी तर त्यांनी ही इथे लिहा प्लीज .

https://youtu.be/iAJalRpxmBo?feature=shared

आभा, ही उपासाच्या फणसाच्या सांदणाची रेसिपी लिंक मिळाली आहे, बघ उपयोग होतोय का आंब्याची उपासाची करण्यासाठी.

सांदणाचे माहित नाही पण आई भगरीची खांडवी (मराठीतली) करायची. Texture मस्त असायचे पण तिला तांदळाच्या रव्याची चव नाही यायची

मस्त झाली होती सांदण. पहिल्या वेळेला बेकिंग सोडा घालायची विसरले पण चव टेक्सचर छान होतं.
धन्यवाद ममोताई

IMG_2042.jpeg

व्वा अप्रतिमच दिसतायत... रंग ही सुंदर आलाय. एक्झॅक्ट
कृती थोडक्यात लिही ना इथे किंवा वेगळा धागा काढून म्हंजे करायची असतील तर माप मिळेल नीट.
एक उपासाचा नवीन पदार्थ मिळाला आंब्याच्या दिवसात करायला.

Pages