आंब्याची सांदणं

Submitted by मनीमोहोर on 2 May, 2018 - 09:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मे महिना आला की मन कोकणात धाव घेतं. सारख्या तिकडच्या आठवणी यायला लागतात.. कामांची धांदल, पाव्हणे, त्यांच्यासाठी म्हणून मुद्दाम केलेले आंब्या फणसाचे वेगवेगळे पदार्थ... कोकणची खासियत असणारा असाच एक पदार्थ म्हणजे सांदण. ह्याला गोड इडली म्हणून ह्याच डीमोशन नका करू. कारण सांदण म्हटलं की मनात उठणारे तरंग, त्या भोवती असणाऱ्या मधुर आठवणी, त्या शब्दालाच असलेलं वलय, लगेच खाण्याची होणारी तीव्र इच्छा हे सगळं आमरसाची गोड इडली म्हणून नाही होणार. एकदा आमच्या ऑफिस मधल्या एका सहकाऱ्याच्या पत्नीने चैत्र महिन्यात चांगला मोठा डबा भरून आंब्याची डाळ पाठवली होती. खाल्ली सगळ्यानी मिटक्या मारत पण नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी तिची “ दाल की चटनी ” करून पार चटणी करून टाकली होती . तसंच हे जरी इडली सारख दिसत असलं तरी ह्याला म्हणायचं सांदणच.

पूर्वीच्या काळी असे पदार्थ करण खरंच खूप जिकिरीचं होतं. सगळी काम सांभाळून एवढया माणसांसाठी काही करायचा घाट घालणं कष्टाचंच असे. तेव्हा गोडधोड सटीसामाशीच मिळे खायला त्यामुळे त्याच अप्रूप ही होत आणि लोक खात ही भरपूर असत त्यामुळे करावं ही खूप लागत असे.

आमच्या कडेही सांदणाची तयारी दोन तीन दिवस सुरू होते. ह्यासाठी लागणाऱ्या तांदळाच्या कण्या पूर्वी जातिणीवर घरीच काढत असू आम्ही . आता घरगुती चक्कीवर काढतो. मग चांगला रसाळ फणस तयार आहे का याची चाचपणी होते आणि सगळं जुळून आलं की मग एके दिवशी सांदणांचा बेत फिक्स केला जातो. आमच्या कडे फणसाची आणि आंब्याची अशी दोन्ही सांदण करतात गावाला. ह्या साठी लागणारा फणसाचा रस त्यात गुठळी चालत नाही म्हणून चाळणीने चाळून घ्यावा लागतो. त्यासाठी मोठया मोठया बांबूच्या चाळण्या ही आहेत आमच्याकडे. एकदा सांदण वाफवायला मोदकपात्रात ठेवली की त्याचा एक विशिष्ट सुगंध अख्ख्या घरभर दरवळतो आणि त्या वासाने भूक चांगलीच खवळते.

ह्या वर्षी मी गावाला नाही जाऊ शकलेय मे महिन्यात . पण कोकणातल्या मे महिन्यातल्या आठवणी मनात भरून राहिल्या आहेत. त्यामुळे आज इथेच सांदण केली. अर्थात तिकडे सगळ्यांबरोबर करण्याची आणि खाण्याची मजा औरच पण त्यातल्या त्यात दुधाची तहान ताकावर ... इथे फणसाची सांदण करणं अशक्य आहे कारण बरक्या फणसाचा रस काढणं शक्यच नाही. म्हणून फक्त आंब्याचीच केली. चला आता कृती कडे वळू या.

साहित्य

एक वाटी इडली रवा ( मिक्सर मध्ये थोडा बारीक करून आणि कोरडाच थोडा भाजून घेणे )
दीड वाटी आंब्याचा रस मिक्सरमध्ये एकजीव करणे( गुठळ्या नकोत )
अर्धी वाटी दूध
गरजे प्रमाणे साखर,
एक चमचा तूप
अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर, किंचित मीठ .

क्रमवार पाककृती: 

इडली रवा, आंब्याचा रस, दूध, साखर मीठ आणि तूप सगळं एकत्र करून आणि जरुरी प्रमाणे पाणी घालून इडली सारखं सरसरीत भिजवून एक तासभर ठेवून द्यावे म्हणजे रवा चांगला भिजतो. नंतर पीठ घट्ट वाटले तर त्यात थोडं दूध घालावं. बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने मिक्स करावे आणि इडली पात्रात हे मिश्रण घालून इडली सारखं १२ ते १५ मिनिटं वाफवून घ्यावे. पाच मिनटांनी बाहेर काढून थोडं थंड झालं की साच्यातून सांदण काढावीत आणि गट्टम करावीत.
हा फोटो
IMG_20180502_104846901~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3 ते 4
अधिक टिपा: 

खाताना दूध ( नारळाचे असेल तर धावेल) किंवा तूप जे आवडते त्या बरोबर खावे.

आंब्याचं लोणचं मात्र पाहिजेच बरोबर.

उरली तर दुसऱ्या दिवशी ही छानच लागतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! फोटो सुरेख! 'जातिणी'म्हणजे छोट जात का? त्याचा आणि 'मोठया बांबूच्या चाळण्या' याचाही फोटो टाका ना .
देवीका, मस्त!

सांदणा सारखे गोड प्रतिसाद आणि आठवणी.

साक्षी , मस्त टीप. आता इथे ही करता येतील फणसाची सांदणं .. मुंबईला पण कशी करायची फणसाची सांदणं ह्याच्या मस्त टिप्स मिळत आहेत.

देवीका , अंजू किती गोड आठवणी.

देवीका , मिक्सर मध्ये फिरवून ही होतो रस हे नव्हतं माहीत.

जातीण म्हणजे छोटं जातं. बांबू ची चाळणी म्हणजे बांबूच्या पट्ट्या क्रिस क्रॉस मध्ये सैलसर गुंफून मध्ये छोटी छोटी भोकं ठेवतात आणि त्याच बांबूच्या पट्ट्या वाळून / दुमडून चाळणीचा वरचा भाग ( जो आपण हातात घेऊन चाळतो ) तयार करतात. मस्तच दिसतात त्या चाळण्या.
फोटो मात्र एकाचा ही नाहीये.

साधा रवा नको . इडली रवा हीच adjustment आहे . खर म्हणजे तांदुळाच्या कण्याचं वापरतात सांदणासाठी. पण इथे शहरात त्या करणं कठीण म्हणून इडली रवा घेतलाय.

स्वाती ना दु घालून केलेली साधारण खांडवी सारखी लागतात का ?>>
नाही. खांडवीसारखी नाही लागत. एक मस्त फ्रेश चव असते नारळाच्या दुधाची आणि छान हलकी होतात. . शिळासप्तमीच्या नैवेद्याला केली जायची पूर्वी.

मला फणस किंवा आंबा कुठलच सांदणं फारस आवडत नाही पण हा कातील फोटो बघुन आवड बदलेल असं वाटतय.

देविका तुमचं बरोबर, रोवळीत धुवून मग रवा काढत असेल आजी. खूप आठवत नाहीये, आजी जाऊन पण अनेक वर्ष झाली. पण मला अजून ही तशीच्या तशी रोवळीत तांदूळ धुणारी आजी समोर दिसते. ते त्यावेळेचं मातीचं घर, ती आजी. सांदणं मला तिथे पोचवतात. थँक यु हेमाताई.

सगळयांचे प्रतिसादासाठी खूप खूप आभार.

नाही. खांडवीसारखी नाही लागत. एक मस्त फ्रेश चव असते नारळाच्या दुधाची आणि छान हलकी होतात. . शिळासप्तमीच्या नैवेद्याला केली जायची पूर्वी. >> मस्त रेसिपी.

सांदणं खाताना त्याच्या सगळ्या आठवणी मनात गोळा होतात आणि मग ती आणखी गोड लागतात.

मस्त रेसिपी.
ह्या मे मधे नक्की प्रयत्न करणार!

नवरा गावी जाऊन आला. फणस सांदणे आलंय बरोबर. आंबे यंदा उशिरा आमचे. पहिला मोहर गळून गेला. नंतर दीर पाठवणार आहेत त्यामुळे आंबे नाही आले.

फोटो मस्त! Happy
पण पारंपारीक पद्धतीत बेकींग सोडा असतो का? मला कुठल्याही भारतीय पारंपारीक पदार्थात बेकींग सोडा बघितला की उगीचंच टोचतं Wink

पारंपारीक कृतीत बेंकिंग सोडा/बेकींग पावडर नाहीच घालत, आमच्याकडे तरी नाही घालत. तांदूळाचा रवा हा भिजवलेल्या तांदूळाचा असल्याने व्यव्स्थित आंबते पीठ.
मी भारताबाहेर आहे तरी नाही घालत.
हि मी लिहिलेली कृती,
https://www.maayboli.com/node/54115

>>>यात नारळ पण घालतात ना?<<
हो खोवलेला ओलं खोबरं घालतात.

>>>>>देवीका , मिक्सर मध्ये फिरवून ही होतो रस हे नव्हतं माहीत.<<<<
नाही, मिक्सर मध्ये उष्णता निर्माण होवून कडू होतील गरे.
हँड ब्लेंडर ने पल्प करायचा.

व्वा! काय सुंदर दिसतायत. Happy
आम्ही कोकणात असताना, फणसाचीच करायचो. काय सुगंध दरवळायचा. गेल्याच आठवड्यात बहिणीकडे फणसाची खाल्ली. आता आंब्याची़ करून बघेन. Happy

मस्त. दिसायलाही छान आहेत. बाकी ते सांदणं, सांजणं त्यातलं काही कळत नाही. पुढचा पदार्थ चविष्ट आणि जीभेचे चोचले पुर्ण करणारा असला तर आंम्हाला काहीही चालतं. अर्थातच हा पदार्थ मी ट्राय करेन असा होत नाही.
कारण सध्या तरी आंम्ही अंडर ट्रेनी आहोत. असे नवनवे पदार्थ आंम्हाला जरी करायला आवडत असले तरी समोरच्यांना ते इतके भयानक का वाटतात कुणास ठाऊक! कालच मी मस्तपैकी फ्लॉवर फ्राईज बनवले, अंड्यात टाकून. तर सगळ्यांनी कपाळालाच हात लावून घेतले! Uhoh

मस्त प्रतिसाद सगळयांचे . करायला तसं इडली रव्यामुळे सोपं झालंय हे आता. तेव्हा आंबे आहेत तोवर करून बघा आणि कोकणातल्या रम्य आठवणी तोंडी लावायला घेऊन enjoy करा. फोटो मात्र दाखवा इथे.

नाही, मिक्सर मध्ये उष्णता निर्माण होवून कडू होतील गरे.
हँड ब्लेंडर ने पल्प करायचा. >> ओके देवकी. *
* चुकून देवकी लिहीलय ते देवीका हवं आहे.

कॅन्ड आमरसाचे करता येतील का ? तसे असेल तर मी धाडस करेन.>> vijaykulkarni , हो नक्की आणि छानच होतील. करा बिनधास्त धाडस. डब्यातला रसाची किंवा आटवलेला रस मिळतो त्याची ही होतील. फक्त इडली रवा घ्या साधा रवा नको.

थोडं तरी दूध घाल कारण रस घट्ट असतो तेवढयात तो रवा भिजणार नाही . साधरण इडली च्या पीठा इतकी consistency पाहिजे त्याची

Pages