आंब्याची सांदणं

Submitted by मनीमोहोर on 2 May, 2018 - 09:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मे महिना आला की मन कोकणात धाव घेतं. सारख्या तिकडच्या आठवणी यायला लागतात.. कामांची धांदल, पाव्हणे, त्यांच्यासाठी म्हणून मुद्दाम केलेले आंब्या फणसाचे वेगवेगळे पदार्थ... कोकणची खासियत असणारा असाच एक पदार्थ म्हणजे सांदण. ह्याला गोड इडली म्हणून ह्याच डीमोशन नका करू. कारण सांदण म्हटलं की मनात उठणारे तरंग, त्या भोवती असणाऱ्या मधुर आठवणी, त्या शब्दालाच असलेलं वलय, लगेच खाण्याची होणारी तीव्र इच्छा हे सगळं आमरसाची गोड इडली म्हणून नाही होणार. एकदा आमच्या ऑफिस मधल्या एका सहकाऱ्याच्या पत्नीने चैत्र महिन्यात चांगला मोठा डबा भरून आंब्याची डाळ पाठवली होती. खाल्ली सगळ्यानी मिटक्या मारत पण नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी तिची “ दाल की चटनी ” करून पार चटणी करून टाकली होती . तसंच हे जरी इडली सारख दिसत असलं तरी ह्याला म्हणायचं सांदणच.

पूर्वीच्या काळी असे पदार्थ करण खरंच खूप जिकिरीचं होतं. सगळी काम सांभाळून एवढया माणसांसाठी काही करायचा घाट घालणं कष्टाचंच असे. तेव्हा गोडधोड सटीसामाशीच मिळे खायला त्यामुळे त्याच अप्रूप ही होत आणि लोक खात ही भरपूर असत त्यामुळे करावं ही खूप लागत असे.

आमच्या कडेही सांदणाची तयारी दोन तीन दिवस सुरू होते. ह्यासाठी लागणाऱ्या तांदळाच्या कण्या पूर्वी जातिणीवर घरीच काढत असू आम्ही . आता घरगुती चक्कीवर काढतो. मग चांगला रसाळ फणस तयार आहे का याची चाचपणी होते आणि सगळं जुळून आलं की मग एके दिवशी सांदणांचा बेत फिक्स केला जातो. आमच्या कडे फणसाची आणि आंब्याची अशी दोन्ही सांदण करतात गावाला. ह्या साठी लागणारा फणसाचा रस त्यात गुठळी चालत नाही म्हणून चाळणीने चाळून घ्यावा लागतो. त्यासाठी मोठया मोठया बांबूच्या चाळण्या ही आहेत आमच्याकडे. एकदा सांदण वाफवायला मोदकपात्रात ठेवली की त्याचा एक विशिष्ट सुगंध अख्ख्या घरभर दरवळतो आणि त्या वासाने भूक चांगलीच खवळते.

ह्या वर्षी मी गावाला नाही जाऊ शकलेय मे महिन्यात . पण कोकणातल्या मे महिन्यातल्या आठवणी मनात भरून राहिल्या आहेत. त्यामुळे आज इथेच सांदण केली. अर्थात तिकडे सगळ्यांबरोबर करण्याची आणि खाण्याची मजा औरच पण त्यातल्या त्यात दुधाची तहान ताकावर ... इथे फणसाची सांदण करणं अशक्य आहे कारण बरक्या फणसाचा रस काढणं शक्यच नाही. म्हणून फक्त आंब्याचीच केली. चला आता कृती कडे वळू या.

साहित्य

एक वाटी इडली रवा ( मिक्सर मध्ये थोडा बारीक करून आणि कोरडाच थोडा भाजून घेणे )
दीड वाटी आंब्याचा रस मिक्सरमध्ये एकजीव करणे( गुठळ्या नकोत )
अर्धी वाटी दूध
गरजे प्रमाणे साखर,
एक चमचा तूप
अर्धा लहान चमचा बेकिंग पावडर, किंचित मीठ .

क्रमवार पाककृती: 

इडली रवा, आंब्याचा रस, दूध, साखर मीठ आणि तूप सगळं एकत्र करून आणि जरुरी प्रमाणे पाणी घालून इडली सारखं सरसरीत भिजवून एक तासभर ठेवून द्यावे म्हणजे रवा चांगला भिजतो. नंतर पीठ घट्ट वाटले तर त्यात थोडं दूध घालावं. बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने मिक्स करावे आणि इडली पात्रात हे मिश्रण घालून इडली सारखं १२ ते १५ मिनिटं वाफवून घ्यावे. पाच मिनटांनी बाहेर काढून थोडं थंड झालं की साच्यातून सांदण काढावीत आणि गट्टम करावीत.
हा फोटो
IMG_20180502_104846901~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3 ते 4
अधिक टिपा: 

खाताना दूध ( नारळाचे असेल तर धावेल) किंवा तूप जे आवडते त्या बरोबर खावे.

आंब्याचं लोणचं मात्र पाहिजेच बरोबर.

उरली तर दुसऱ्या दिवशी ही छानच लागतात.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांदण म्हंटल की मनात उठणारे तरंग, ह्या शब्दभोवती असणाऱ्या आठवणी , ह>>>>>> +१.
सांदणं..... याचा उच्चारही सान्नां / सांदणां होत जातो.

किती सुरेख दिसतेय रंगसंगती! सुरेख पिवळं-केशरी सांदण आणि शुभ्र दूध मध्ये. लगेच खावंसं वाटतंय. Happy

याची चव नक्की कशी असते? गोडूस/जरा अगोड (अर्थात आंब्यांच्या स्वादासहीत/ फणसाच्या स्वादासहीत) इडलीटाईप्स का चांगलं दणदणीत गोड असतं हे? आणि नादूमध्ये काही घातलेलं नाहीय म्हणून प्रश्न.
कधीही खाल्लेलं नाहीय हे ही एक आहेच Sad

थँक्स देवकी, मंजू, योकु ..

योकु , याची चव चांगली गोड असते. शिऱ्या सारखी. अगोड चांगली नाही लागत चवीला.
ना दु खाताना घ्यायचे आहे. कृती मध्ये साधं दूधच वापरायचं आहे. फोटोत आहे ते साधं दूधच आहे योकु. नारळाचा रस नाही काढला मी आज. पण ना. रस खूप चव खुलावतो।

फारच सुंदर दिसत आहेत. हा अगदी नविन पदार्थ आहे माझ्यासाठी. कधीच खाल्लेला नाही. इथे टाकल्याबद्दल धन्यु Happy

ममो, फोटो सुपरकातिल आहे! उचलून खायला घ्यावीत असं वाटतंय!

पण आम्ही सांजण म्हणतो. Happy
फणसाची सांजणं मला अतिप्रिय आहेत. आंब्याची क्वचितच केली होती, पण तीपण आवडली होती. फणसाची सांजणं असली की मी किती जेवतेय याकडे लक्ष नाही देत. आई अजूनही घरच्या कण्या वापरूनच करते त्यामुळे ती खास चव आवडतेच. त्यामुळे सांजणांबरोबर आंब्याचं लोणचं आणि दूध-तूप घेऊन दिवसभर चरऽत बसायचं. भात, भाजी, पोळी वगैरे मंडळी दुय्यम असतात त्या दिवशी. Happy

काय देखणी दिसतायंत सांदणं !!! नारळाच्या दुधाबरोबर खायची म्हणजे तर आहाहा... नक्की करणार.
गेल्यावर्षी आम्ही कोकणात गेलो तर वीकडेला गेल्यामुळे त्या छोट्या रिसॉर्टमध्ये आम्ही दोनच फॅमिलीज होतो. मग त्यांनी ब्रेकफास्टला मुद्दाम सांदणं, केळ्याचे आप्पे वगैरे करुन खिलवले होते. आंबा-फणसाचा सीझन नव्हता तेव्हा. त्यांनी गुळाची सांदणं केली होती वरुन बदाम-काप पेरुन.

सुरेख दिसतायत ! कधिच खाल्ली नाहियेत , पारपारिकरित्या इडली पात्रात न करता केळिच्या/हळदिच्या पानात वाफवतात ना!

हि मी केलेली फणसाची सांदणं/ सान्ना( कोंकणी उच्चार)

A0E1B3D6-BE79-425C-A89C-C6E54543B4A9.jpeg

छान !!! फोटो आहाहा !!!

आमच्याकडे नारळाच्या दुधातली सांदणं देखील करतात. आंबे फणसाचा सिझन नसतो तेव्हा ना. दु. घालून करतात. आंबेमोहर तांदळाचा रवा, केशर, वेलची आणि नारळाचे दुध. बेकिंग पावडर नाही घालत.

वाह!! मस्त दिसतायत आणि खूप छान आठवणी जाग्या झाल्या. आमहीपण गावाला गेल्यावर केली जायचीच. केली पाहिजेत पुन्हा.

सगळ्यांना खूप खुप धन्यवाद.
प्रज्ञा, आज माझं पण असंच झालं ... भात पोळी भाजी दुय्यम.
काही जण सांजण म्हणतात ऐकलं आहे.
अगो, गूळ घालून आंब्याची कधो केली नाहीयेत करायला हवीत खमंग लागतील छान.
प्राजक्ता आम्ही मोदकपात्रात वाट्या ठेवून वाफवतो वर केळीच पान ठेवतो. फणसाची कधी कधी फणसाच्या पानाच्या द्रोणात वाफवतो . त्याना पानाचा मस्त वास येतो आणि ती अधिक कालपर्यंत चांगली राहतात.
कय सुंदर रंग आला आहे ईडलीला >> अदिती दिसली इडली सारखी तरी इडली नाही म्हणायचं ☺
देवीका , मस्तच दिसतायत.
स्वाती ना दु घालून केलेली साधारण खांडवी सारखी लागतात का ?
ज्यांनी आधी केली नाहीयेत त्यानी करून बघा आणि फोटो डकवा इथे.
सांदणाच्या निमित्ताने आठवणींना उजाळा मिळाला .. आणखी काय हवे ?

वाह सुंदर लेख आणि फोटो दोन्ही.

देविकाचा फोटो पण भारी.

मला सांदणं म्हटलं की गावची आजी आधी आठवते, बाबांची आई. रोवळी घेऊन तांदुळाच्या बारीक कण्या (बहुतेक तांदूळ रवा) धुणारी मग फणस किंवा आंबा सांदणं करणारी. ढोकळ्याच्या थाळ्या काढतात तसं करायची आजी, केळीच्या पानात बहुतेक. अर्थात मी गोड खात नाही फार आणि मला हे आवडत नाही कुठलंच पण करतानाचा दरवळ आवडतो. जसं पातोळे आवडत नाहीत पण तो सुवास, दरवळ आवडतो. अर्थात आजीचा मायेचा हातही होता त्यात म्हणून तिच्या समाधानासाठी थोडं खायचे मी.

मागच्यावर्षी गावाहून आंब्याची आलेली पण इडली साच्यात केलेली. सध्या नवरा गावी गेलाय.

पण हा पदार्थ म्हटला की मला माझी आज्जीच आठवते, एकहाती सर्व करणारी आपल्या नातवांसाठी. कारण बरेचदा आम्ही मुलंच जायचो गावी.

मनीमोहोर,
मस्त!

धातुच्या चाळणीवर गरे ठेऊन घोटून बरक्याचा रस काढता येतो. सासुबाई असाच काढतात दर वर्षी!

~साक्षी

>>>>मला सांदणं म्हटलं की गावची आजी आधी आठवते, बाबांची आई. रोवळी घेऊन तांदुळाच्या बारीक कण्या (बहुतेक तांदूळ रवा) धुणारी मग फणस किंवा आंबा सांदणं करणारी<<<

>>>>एकहाती सर्व करणारी आपल्या नातवांसाठी. >>>>ढोकळ्याच्या थाळ्या काढतात तसं करायची आजी, <<<<<

अगदी अगदी.

अंजू,
तुमची आठवण वाचून अगदी अगदी हेच वाटलं. एकदमच सारखी आठवण आहे. माझी आजी (आईची आई) आदल्या रात्री भिजवलेले तांदूळ असेच दुसर्‍या दिवशी दुपारी रोवळ्यात काढून दुपारी ठेवायची, मग थोड्याच वेळात जात्यावर रवा काढायाची. रात्री एकटीने फणस ( पिकलेला बरका असल्याने पटकन हातानेच ) हाताने फोडून बांबूच्या चाळणीत गरे फेटायची. आम्ही एकडची तिकडची धरून, आळीतले नातेवाईकांची मुलं धरून तीस एक असायचो.

तीन तीन फणस फोडून, रात्री उशीरापर्यंत गरे फेटताना गाणी म्हणायची. आम्ही असेच आजूबाजूला सतरंजी टाकून गाणी एकत झोपायचो.
दोन तीन किलो तरी असेल तांदूळाचा रवा. तो रवा छान खमंग असा घरच्या तूपात परतायची. त्यात ती ओले खोबरे, केसर, वेलची , काजू टाकायची. कधी कधी नारळाचे दूधही घालायची गर खूपच घट्ट असेल तर. गोड आठवणी आहेत.,दुसर्‍या दिवशी सकाळी हळदीच्या पानातच वाफवायची. खाताना मात्र नारळचेच दूध घ्यायचो. मस्त न्याहरी असायच्दे दुसर्‍या दिवशी सकाळी.
आब्यंची सान्ना फक्त गणपतेतच प्रसादाला. आंब्याचा मावा नारळाच्या दूधात ओला करून, बाकी सेम . पण फणसाचा मौसम असतना आम्ही आम्ब्याचा क्वचितच करायचो.
खूप मेहनत असल्याने सगळीच नाही करत हा पदार्थ.

>>>धातुच्या चाळणीवर गरे ठेऊन घोटून बरक्याचा रस काढता येतो. सासुबाई असाच काढतात दर वर्षी!<<<

मी सरळ ब्लेंडर वापरते आणि डीप फ्रीझ करते फणसाचा गर , मग अगदी नोव्हेंबर मध्ये सुद्धा सांदणं. Happy

Pages