अन्या - २१

Submitted by बेफ़िकीर on 13 September, 2014 - 06:32

आश्रमाबाहेर फुटपाथवर काहीतरी किरकोळ वाद झाला. आश्रमातील सेवकवर्ग पहिल्यांदा तो वाद पाहून हासत होता आणि नंतर एकाने वैतागून त्या तीन चार बायकांना झापले तसा वाद थांबला. तीन फुलवाल्या एका मुलीशी भांडत होत्या. ती आज सकाळी येऊन कोणालाही न विचारता तेथे फुले विकायला बसली म्हणून! तो वाद चांगला अर्धा तास वाढत वाढत गेला. बायकांचे ठसकेबाज सातारी बोलणे आणि उडालेला भडका पाहून रस्त्यावर थोडे पब्लिक थांबले होते आणि आश्रमाचा स्टाफही मजा घेत होता. पण ते प्रकरण आश्रमाकडेच न्यायनिवाड्याला यायची परिस्थिती येणार असे वाटल्यावर मामा नावाच्या एका सेवकाने खर्जातला आवाज काढला आणि 'बसूनदेत त्या प्वरीला हितं, तुमच्या बाचा फुटपाथ न्हाय' असा दम भरला तेव्हा वाद मिटला. त्याने एकदम त्या तीन जुन्या फुलवाल्यांना झापण्यामागे त्या नव्या फुलवाल्या पोरीने टाकलेला एक जहरी कटाक्ष होता हे त्याच्याशिवाय आणि त्या पोरीशिवाय कोणालाही समजले नाही.

अश्या रीतीने सोपान उदयची युगी आश्रमाच्या दारातच फुले विकायला बसू लागली. तेथून तिला आश्रमाचा बराचसा भाग दिसू शकत होता आणि काय काय चाललेले आहे ते नीट समजणारही होते.

तिच्या मनात काळजी होती आशाताईंची! कालच आशाताई आश्रमात गेलेल्या होत्या आणि अजून परतच आलेल्या नव्हत्या. त्यांचे नक्की काय झाले हेच तिला समजत नव्हते. आशाताईंना अंजना समजून आश्रमात आणणारी पूजा उपलेंचवार तर कालच गावी परत गेलेली होती. मग आशाताई इतका वेळ आत कश्या आणि त्यांना काही दगाफटका तर झालेला नसेल ना ह्या काळजीने युगी सारखी आश्रमाच्या दारातून आत पाहात होती. तिचे ते पाहणे आपल्यासाठीच आहे असे वाटून तो मामाही जरा तिथेच रेंगाळला होता. त्याचे ते हेतूपुरस्पर रेंगाळणे युगिला शुभचिन्ह वाटले होते कारण त्याला घोळात घेतला तर आश्रमात बिनदिक्कतपणे जाता येणार होते.

ऊन चढले आणि फुटपाथवर बसणे अवघड होऊ लागले तशी युगि चुळबुळू लागली आणि तेव्हा तिच्या लक्षात आले की ह्या तीन फुलवाल्या आणि आपण ह्यांच्यात काय फरक आहे. त्या तिघी तिथेच उगवल्या असल्यासारख्या भक्कमपणे बसलेल्या होत्या. ढिम्म हालत नव्हत्या. युगिला संकटाची जाणीव झाली. रोज असे उन्हात बसून राहायचे असेल तर आपले अवघड आहे हे तिला कळाले. तिने मुद्दाम तिच्याकडच्या फुलांचा भाव जरा वरचढ ठेवला होता. त्यामुळे त्या तिघीही जरा खुष होत्या. दुपारपर्यंत मग त्या तिच्याशी बोलूही लागल्या. पण तिला अजून कोणी फुलांचा भाव कमी कर असे मात्र सांगितलेले नव्हते. मामा मात्र सकाळपासून दारात पन्नास चकरा मारून गेला होता. दोन तीन वेळा युगिला सल्लेही देऊन गेला होता की किती वाजता जास्त भक्त येतात, कोणकोणती फुले आणायची वगैरे!

एकुण आश्रमाच्या सावलीत प्रत्येकाचे आपापले धंदे चालू आहेत हे युगिच्या लक्षात आलेले होते. पोट भरण्याचा एक उत्तम मार्ग अनेकांना मिळालेला आहे हे तिला दिसले. शिक्षणाची गरजच नाही. कोणी बाबांचा प्रमुख भक्त, कोणी त्यांना आंघोळ घालणारा, कोणी पाय चेपणारा, कोणी आश्रमाचा प्रमुख, कोणी गोदामाचा प्रमुख, कोणी खजिनदार, कोणी भक्तांच्या व्यवस्थेचा प्रमुख तर कोणी स्वच्छता बघणारा! कोणी फुले विकतोय, कोणी फोटो विकतोय, कोणी नारळ विकतोय तर कोणी भीक मागतोय! माणसांची तर सततच वर्दळ होती. नाही म्हंटले तरी दुपारी चार वाजेपर्यंत युगिला दिडशे रुपयापर्यंत सुटले होते आणि सकाळी स्वतःच फुलासारखी दिसत असणारी युगि आता घामेजून गलितगात्र झाली होती. पण अजूनही आशाताईंचे ओझरतेही दर्शन नव्हते. बरं विचारणे तर शक्यच नव्हते त्याबाबत कोणाला!

फुलांचा स्टॉल चक्क रात्री नऊपर्यंत चालू शकतो हे युगिला माहीतच नव्हते. तिची फुलेच संपत आली. एकदा माल संपल्यावर तिथे नुसते कसे बसणार म्हणून तिने धावत जाऊन दुसरीकडून बरीच फुले आणली आणि पुन्हा स्टॉलवर ठेवली. ह्या गडबडीत अर्धा तास गेला. नेमक्या ह्याच काळात आशाताई बाहेर पडलेल्या असल्या तर काही समजणार नाही असे वाटून युगि निराश झाली. सोपान उदयच्या मालुसरेंनी ह्या भंडाफोड उपक्रमासाठी संस्थेच्या पैशांबरोबरच एका कंपनीकडूनही फंडिंग घेतलेले होते. कोणत्याही परिस्थितीत ही मिशन यशस्वी करणारच होते ते! त्या पैशांमधून त्यांनी आशा आणि युगि तसेच इतर काहीजणांच्या सातार्‍यातील वास्तव्याची व्यवस्था केलेली होती. आजचा पहिलाच दिवस होता युगिचा येथील! त्यामुळेच तिची प्रचंड इच्छा होती की निदान रात्र व्हायच्या आत आशाताई बाहेर पडाव्यात आणि आपण शेजारशेजारच्या खोल्यांमध्ये का होईना पण सोबतीने असावे. पण आशाताई बाहेर यायची चिन्हेच नव्हती. अचानक सात सव्वा सातला गर्दीचा ओघ प्रचंड वाढला. ह्या गर्दीत आशाताई सटकल्या तर समजणारही नाही असे वाटून फुले विकण्यावरील लक्ष कमी करून युगि सतत आतल्या बाजूला पाहू लागली. गर्दीत ते कोणाला जाणवलेही नाही, पण तीन फुलवाल्या आक्रोश करून फुले विकत आहेत आणि एक लहानशी फुलवाली मुलगी अबोल उभी आहे ह्याकडे बाहेरून मात्र कोणाचेतरी लक्ष होते. ती व्यक्ती बरीच दूरवर बिडी फुंकत निवांत उभी होती. आठ वाजता आरती सुरू झाली आणि बाहेरून आत जाणारी गर्दी मंदावली. कारण सगळ्यांनि आरतीचे टायमिंगच पाळलेले दिसत होते. आता सगळी गर्दी आत तुडुंब होऊन बाहेरपर्यंत आली होती. आरतीनंतर रांगेने भक्तगण आत जाऊन दत्ताच्या मूर्तीला फुले, नारळ वाहणार होते आणि मग जित्याजागत्या तिन्मूर्ती दत्ताच्या पायावर कोसळून आणि नाक घासून बाहेर येणार होते. प्रत्यक्ष दत्ताच्या मूर्तीला नव्हता इतका भाव त्या तिन्मुर्ती दत्ताच्या अवताराला होता. युगिला हे सगळे भेसूर, फसवे आणि चिंताजनक वाटू लागले. सोपान उदयच्या संस्कारांनी बनलेल्या तिच्या मनाचा बहुतेक भाग जरी आशाताईंच्या विचारांनी व्यापलेला असला तरी एका कोपर्‍यात सूक्ष्मपणे हा विचार चालूच होता की जग किती मूर्खासारखे वागत आहे. ह्या आश्रमावर उधळला जात असलेला पैसा सत्कारणी लावला तर अनेक गोरगरीब सुखी होतील. शेवटी एकदाची आरती संपली आणि रांगबिंग सगळी नाटके त्यागून नुसती झुंबड उडाली. युगिला आश्चर्य वाटत होते की तिचा पहिलाच दिवस असूनही तिला येथे दिवसभरात सव्वा तीनशे रुपये सुटलेले होते. एक प्रकारे हा व्यवसायही बराच आहे असेही तिच्या मनात चक्क येऊन गेले. शेजारच्या अडाणी फूलवाल्या आता थकून भागून काहीबाही वैतागून बडबडत होत्या आणि आवराआवर करत होत्या. त्यातलीच एक युगिला म्हणाली.

"यं प्वरी, चल संप्ला दिस आच्चा! उद्या लय घाई करू नकू! अमावास्याय! बिचारी ज्यावल्यालीबी नाय!"

अचानक तिच्याबद्दल तिघींना कणव वाटू लागल्यामुळे युगि हादरली. हे तिने अपेक्षितच केलेले नव्हते. आता युगि कुठली, कोण, राहते कुठे, घरी कोण कोण हे प्रश्न सुरू झाले. युगिने तुफान वेगाने चंबूगबाळे आवरले आणि तोंदाला येतील ती उत्तरे देत तिथून काढता पाय घेतला. आश्रमापासून शंभरएक मीटरवर जाऊन तिने एकदा शेवटचे वळून पाहिले. आशाताईंचा काहीही मागमूस नव्हता. निराश होऊन युगि मागे वळली आणि कोणालातरी तिचा धक्का लागला. अतिशय नैसर्गीकपणे तिच्या तोंडून तो उद्गार बाहेर पडला......

"सो सॉरी"

आणि तिने कचकन् स्वतःची जीभ चावली आणि ती सुसाट चालत सुटली. एका फुलवालीच्या पोषाखाला ते 'सो सॉरी' अजिबातच शोभलेले नव्हते. अननुभवी युगिला कामगिरीवर पाठवण्याचा मालुसरेंना पश्चात्ताप होणार अशी चिन्हे दिसू लागली होती. आणि त्यातच तेही घडले. ज्या इसमाला ती सॉरी म्हणाली होती तो चिप्पाड दाढीवाला चाळिशीच मनुष्य अंतर राखून पण वेगाने युगिचा पाठलाग करू लागला. शेवटी त्याचेही बरोबर होते. दिवसभर तो तिच्यावर ह्याचसाठी लक्ष ठेवून होता की तिचे राहण्याचे ठिकाण आणि इतर माहिती कळावी!

=====================

सुकन्या, नाईक आणि तावडे पाटील अनुक्रमे वीर, सातारा आणि तालुक्याच्या आपापल्या घरात निवांत बसलेले होते. अडीच महिन्यांनी गतवैभव प्राप्त होणार ह्यात शंका नव्हती. एकदा अन्याची पालखी तालुक्यात पोचून सभा झाली की घोषणा जाहीर करायचा अवकाश, अन्याची सातार्‍यातून तालुक्याला कायमचीच बदली होणार हे त्यांना माहीत होते. प्रत्येकाचा हेतू निराळा होता पण सर्वाधिक लाभ तालुक्याच्या तावडे पाटलाचाच होणार होता. पण सातार्‍यातील आपला प्रतिस्पर्धी बागवान ह्याचा तोटा व्हावा म्हणून नाईकांना तावडे पाटलाचा फायदा होणे मान्य होते.

सुकन्याला अन्याचा सूड घ्यायचा होता. त्याने आपल्या वडिलांना मारवले ह्याचा सूड तर घ्यायचाच होता, पण त्याला हवे तितके वैभव मिळवून दिल्यावर त्याने अचानक पार्टीच बदलली ह्या विश्वासघाताचा सूड घ्यायचा होता. त्यामुळे ती अधीरपणे दत्तजयंतीची वाट पाहू लागली होती. वीरची सम्राज्ञी ती तशीही होती, पण अधिक मोठी सत्ताधीश होण्याची स्वप्ने बघत होती.

तिकडे तावडे पाटील मिश्यांवर पालथी मूठ फिरवत पत्ते कुटत बसला होता. सावज लवकरच हातात येणार हे माहीत असल्यामुळे त्याचे तर सगळे तेवरच बदललेले होते. आता सत्ता, लौकीक, पैसा हे सगळेच खोर्‍याने येणार ह्यात शंका नव्हती. हळूहळू त्यातून नाईकाला आणि सुकन्याला बाजूला करायचाही त्याचा गुप्त निर्णय होता. आपला मुलगा जरा मोठा असता तर सुकन्याला सूनच करून घेतली असती असेही त्याच्या मनात येत होते. त्यायोगे दोन्ही गावांवर त्याची सत्ता आली असती. पण ते होणे नव्हते. तरी अन्या परत आला की त्याला अडकवायचा हे ठरलेले असल्यामुळे पत्त्यांचा एकही डाव न लागताही हुकुमी एक्काच हातात असल्यासारखा तावडे पाटील हासत होता.

सातार्‍यात नाईक मात्र डोके धरून बसलेला होता. एक तर नाकावर टिच्चून जिंकून आलेला बागवान नावाचा क्षुद्र इसम निव्वळ अन्याच्या ताकदीवर जिंकलेला होता आणि इतकेच नव्हे तर खुद्द नाईकांच्याच पैशांनी जिंकलेला होता. सातार्‍याच्या मतदारांचेच खून करावेत असे नाईकांना केव्हाचेच वाटत होते. त्यातच आता बागवानाची जिरवायची म्हणून सातार्‍यातून अन्याला तालुक्यात हालवायचा हेही त्यांना नीट सोसत नव्हते. ठीक आहे बागवानाची जिरेल, पण आपलं काय? उद्या त्या तावडे पाटलाच्या जरबेने अन्याने अध्यात्मिक हुकूम काढला की सातार्‍याच्या नाईकांना भक्तांनी तालुक्यात पाय ठेवू देऊ नये तर दाद कशी आणि कोणाकडे मागायची? आणि त्यात ती सुकन्या चिमूरडी! ती उगाचच मधेमधे करत आहे. पण काही का असेनात, काहीतर बदल घडत आहे, घडणार आहे इतकेच तूर्त त्यातल्यात्यात बरे आहे असे नाईक मनाशी म्हणत होता. अलीकडे पिणे वाढलेच होते जरा! एकदा अन्या तालुक्याला स्थलांतरीत झाला की आपले नियंत्रण गेलेच. नाईक मनाशी ठरवत होता की अन्याचे स्थलांतर होण्यापूर्वीच तालुक्यात आपण स्वतःसाठी एक मोठे घर बांधून महिन्यातून आठ आठ दिवस तिकडे राहायला लागायचे. निदान गावकर्‍यांना सवय तरी व्हायला हवी आपली! तावडे पाटील आपल्या तिकडे राहण्यावर तर काहीच बोलू शकणार नाही. नाईकांनी मनाशी ठाम निर्णय घेतला आणि ढगे नावाच्या सहाय्यकाला हाक मारली. ढगेला पुढच्या सूचना दिल्या आणि पुन्हा ग्लास भरून तोंडाला लावला तेव्हा नाईकाला ग्लासमध्ये दारूच्या जागी बागवानचे रक्त दिसत होते.

===============================

डोंगराचे स्वरूप रात्री इतके भीषण असते ह्याची रतनला कल्पना होती, पण भामाबाईला हे माहीतच नव्हते. त्यामुळे भामाबाई बावरून शेकोटीभोवती नुसती बसली होती.

इग्याने नेहमीच्या क्लृप्त्या करून गावातून आणलेल्या दोन कोंबड्या एका वेगळ्या आगीवर पवार भाजत होता. घमघमाट सुटलेला होता. देशी दारूने सगळेच तर्र झालेले होते. एक रतन सोडली तर! रतनच्या डोक्यात विचारांचे काहूर माजलेले होते. एडामट्टी मणीला दिवस असताना तिचे आश्रमातून निघून जाणे, अन्याने अनवधानाने स्वतःच्याच आईला जिवे मारून तो खून पचवणे आणि त्यानंतर आपण आश्रम सोडून ह्या मूर्खांमध्ये येऊन ह्या अवस्थेत राहायला सुरुवात करणे हे तिला सगळेच चुकीचे वाटत होते. आजच पहिलाच दिवस होता आश्रमाबाहेरचा! त्यामुळे प्रत्येक पावलापावलाला गैरसोय वाकुल्या दाखवत होती. अन्याचे पाय धरून पुन्हा आश्रमात प्रवेश मिळवावा असे संध्याकाळीच वाटू लागले होते. त्यातच ह्या चौघांनी, म्हणजे लाहिरी, इग्या, पवार आणि भामाबाईने एक भीषण निर्णय घेतलेला पाहून रतन खरे तर हादरलेली होती. दत्तजयंतीच्या दिवशी भाविकांच्य प्रसादात विष कालवून अनेक निष्पापांचा बळी जाऊ द्यायचा आणि त्या माध्यमातून अन्याला बदनाम करून त्याची कारकीर्द संपुष्टात आणायची हे रतन क्रूरपणाचे वाटणे साहजिक होते. आजवर तिने अन्याच्या नादाला लागून हजार कुकर्मे केली असली तरी देवीपद मिळाल्यामुळे व ते टिकवावे लागत असल्यामुळे जी सत्कृत्ये करावी लागलेली होती त्यांचा शुभपरिणामही विचारांवर झालेलाच होता. नाही म्हंटले तरी रोजचा संतवचनांच भडिमार, दत्ताचा जयघोष आणि भजन कीर्तने ह्यामुळे कानाला असले काहीतरी भयानक ऐकायची सवयच राहिलेली नव्हती. पण ह्या ग्रूपमधून बाहेर पडायचे म्हंटले तरी आता रात्री काहीच करणे शक्य नव्हते. हा निराळा डोंगर होता. वीर गावच किंवा तालुक्याचा नव्हता. तिला येथील काहीच माहीत नव्हते. दरी कुठे आहे आणि बिबटे, साप असे काही आहे की नाही ह्याबाबत ती अनभिज्ञ होती. त्यात पुन्हा हे चौघे होते तर ती एकटी!

परिणामतः ती अबोल होत चालली होती. सगळ्यांकडे आळीपाळीने टुकूटुकू बघत होती इतकेच! सगळेच नशेत असल्यामुळे रतनदेवीन पडलेला सूक्ष्म फरक कोणाला जाणवलेलाच नव्हता. जो तो अन्याला आईबहिणीवरून शिव्या देत होता. जगातील प्रत्येक जनावराचा अन्याच्या आईशी शारीरिक संबंध जोडण्यात धन्यता मानत होता. ह्यात भामाबाई तर सगळ्यांत पुढे होती.

हे चौघे आत्ता आश्रमात जाऊन उभे राहिले आणि अन्याने ह्यांना अद्दल घडवायचे ठरवले तर ह्यांची नामोनिशाणीही मिळनार नाही हे रतनला ठाऊक होते. पण आता तिने घेतलेला निर्णत तातडीने बदलता येणार नव्हता, सकाळपर्यंत थांबायलाच लागणार होते.

यथावकाश कोंबड्या पोटात गेल्या आणि ढेकरांच्या रुपाने पावत्या बाहेर आल्या तसे मग डोळे गपागपा मिटू लागले सगळ्यांचे! भामाबाईच्य तोंडातून अभद्र शिव्यांचा पट्टा सुरूच होता. इग्या आणि पवार लालभडक डोळे रोखून रतनकडे पाहात होते. त्यांना आठवत होती पहिली रात्र जेव्हा रतनची प्राप्ती दोघांनाही सहज झाली असती. पण ऐनवेळी वयाने लहान असलेल्या अन्याने तिला स्वतःच्या खोलीत नेलेले होते अणि त्याचे देवत्व मान्य केल्यामुळेच स्वतःची प्रगती होत असल्याचे मान्य असल्यामुळे ह्या दोघांना अन्याचा विरोध करताच आलेला नव्हता. अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेपासून रतन हे एक पुरे न झालेले स्वप्न दोघांच्याही मनात रुतलेले होते. ते आज सत्यात उतरण्याची संपूर्ण चिन्हे त्यांना दिसत होती.

हळूहळू संवाद कमी झाले. शांतता गडद होऊ लागली. भामाबाईचा भसाडा आवाज आता पुटपुटण्याच्या पातळीला आला. आणि रतनला इग्या आणि पवारच्या शेकोटीमुळे अधिकच लालभडक दिसणार्‍या डोळ्यांमधील वासना स्पष्ट जाणवली. शहारून रतनने पदर लपेटून घेतला. इग्या अचानक तिच्या बाजूला थोडासा सरकला तशी ती लाहिरीच्या बाजूला सरकली. लाहिरीचे बाकी कुठेच लक्ष नसले तरी रतनकडे लक्ष होते. त्याने अगदी हक्काने रतनच्या पाठीवरून आपला उजवा हात घेऊन तिच्या खांद्यावर भक्कमपणे ठेवला. रतनला लाहिरीचाही स्पर्श नकोसा होता, पण तिला इतके माहीत होते की ह्या तीनही पुरुषांमध्ये सर्वात कमी धोकादायक लाहिरीच आहे. त्यामुळे ती हबकून नुसतीच बसून राहिली.

लाहिरीच्या त्या हात ठेवण्यामुळे पवार आणि इग्या खरे तर संतापलेले होते. आपला संताप पवार व्यक्त करणार त्या आधीच लाहिरी सगळ्यांना उद्देशून म्हणाला......

"इस पेडके नीचे तुम तीनो सो जाओ! हम जा रहे है उपरवाले पेडके पास! बाकीकी बाते सुबहा होगी"

एक तर त्या लाहिरीला कोणी नेता मानलेले नव्हते. दुसरे म्हणजे तो रतन हा जणू त्याचा जन्मसिद्ध हक्क असल्याच्या थाटातच हुकूम सोडत होता. ते सहन न होऊन पवार घुसमटून बोलला......

"लाहिरी...... मलाबी मौका हवाच आजला"

"काहेका मौका?"

"इसके उपर चढनेका"

ती भाषा ऐकून एरवी 'देवी' ठरलेल्या रतनने कुर्‍हाडीने मुंडके धडावेगळे केले असते पवारचे! पण आत्ता? आत्ता तिला काहीही करणे शक्य नव्हते. आता लाहिरी रतनकडे पाहू लागला आणि त्याने अचानक तिला जवळ ओढले आणि सर्वांदेखत तिचा ओठ चावला. ते दृष्य पाहून भामाबाई खदाखदा हासली आणि म्हणाली......

"चढो चढो, माझ्यासंग क्वोन निजनार्‍हे?"

तिच्याकडे कोणी लक्षच दिले नाही. तेवढ्यात इग्याने पवारची री ओढली......

"हा लाहिरी... आमाला मौका हवाच... लय वरीस हिचं गुबगुबीत अंग बघून कस्ससं व्हत व्हतं"

सहा लालभडक डोळे रतनवर रोखले गेलेले होते. रतनच्या शरीराचे पाणी पाणी व्हायची वेळ आली होती. पवार म्हणाला......

"आन् त्ये वर्चं झाडबिड काय न्हाय! हित्तंच लागायचं श्येकोटीच्या पर्काशात! दिसाया नको व्हय उघडी कशी दिसते त्ये?"

आता लाहिरी खदखदून हासला आणि म्हणाला......

"लेकिन सबसे पहले हम"

कोणालाच पटले नव्हते ते, लाहिरी आणि भामाबाई सोडून! पण तरी इग्या म्हणाला......

"हून जावद्या मंग"

जेमतेम रतनला आडवी पाडून लाहिरीने तिची साडी ओरबाडली तोवरच त्या ज्वाळांमध्ये रतनचे ते अर्धवट उघडे शरीर पाहून इग्या आणि पवार ह्या गिधाडांनी लाहिरीच्या तंगड्या धरून त्याला मागे खेचला आणि घिसाडघाई करून एकदाचा पवार रतनच्या शरीरावर व्यापला. दारूच्या नशेत असल्यामुळे लाहिरी फारसा प्रतिकार करू शकला नाहीच पण त्यातच त्याला आडवा करून भामाबाई त्याच्यावर झेपावली.

नंगानाच सुरू झाला.

अवलिया बाबांच्या भक्तगणांना विष चारून मारण्यासाठी आणि बाबांची कारकीर्द संपवण्यासाठी एकत्र आलेले पाच कुत्रे आत्ता एकमेकांचे लचके तोडत होते. अजिबात आवाज न करता! आणि त्याचवेळी......

==================

त्याचवेळी सातार्‍याच्या त्या अंधार्‍या खोलीत भीतीमुळे अजिबात डोळ्याला डोळा लागू शकत नसलेली युगि रात्रीच्या भर थंडीत घामाने थबथबली होती. कारण...... सगळे सातारा शहर झोपल्याला खूप वेळ होऊन गेल्यानंतर तिच्या त्या खोलीच्या दाराची कडी बाहेरून वाजली होती......

आत्ता दार उघडण्याची हिम्मत तर सोडाच, तसा विचार करण्याचीही शक्ती उरलेली नव्हती युगिमध्ये! सेकंदभर तिला वाटून गेले की आशाताई आल्या असाव्यात! पण त्या असत्या तर 'किती वाजले - साडे नऊ' हा प्रश्नोत्तरांचा कोड उच्चारलाच गेला असता. ज्या अर्थी बाहेरून 'किती वाजले' असा प्रश्न ऐकू येत नव्हता त्या अर्थी त्या आशाताई असण्याची शक्यताच नव्हती. आणि त्यांच्याशिवाय ह्या सातार्‍यात युगि फक्त सहा सात जणांनाच ओळखत होती. तीन फुलवाल्या, आश्रमातला मामा आणि ह्या खोलीच्या मालकांच्या कुटुंबातील तीन सदस्य! बास! त्यापैकी कोणी येथे येणेच शक्य नव्हते आत्ता!

आपण सोपान उदयमध्ये कामाला आहोत, मालुसरेंचे आपल्याला पाठबळ आहे हे सगळे विसरून युगि नुसतीच उठून थिजून बसली. अजूनही हलक्या हाताने विशिष्ट पद्धतीने कडी वाजतच होती. युगिने रिस्टवॉचची रेडियमची डायल पाहिली! सव्वा दोन! ही काय वेळ झाली? सव्वा दोन वाजता आपल्या दाराची कडी वाजवणार्‍या व्यक्तीच उद्देश कधीतरी चांगला असू शकेल का?

एक खोली सोडून तिसरी खोली आशाताईंची होती. त्या आत्ता त्या खोलीत नाही आहेत हे युगिला केव्हापासूनच माहीत होते. किंबहुना त्या आश्रमातून आलेल्याच नाही आहेत हाच तर तिचा प्रॉब्लेम होता. पण एक वेळ त्या आल्या नसल्या तर ती इतके तरी समजू शकत होती की त्या समर्थ आहेत आणि काहीतरी घडत असेल म्हणूनच थांबल्या असतील. पण आत्ता नेमके आपल्या खोलीचे दार कोण वाजवत आहे हे काही तिला समजू शकत नव्हते. दार उघडले की आपण संपलो असे तिचे अंतर्मन तिला ठणकावून सांगत होते. दोघींच्या दोन खोल्यांमधल्या खोलीत कोणीच राहात नव्हते, पण ह्या दोघींची एकमेकींशी ओळख आहे असा सुतरामही संशय कोणाला येऊ नये म्हणून वेगवेगळ्या खोल्या भाड्याने घेतल्या गेलेल्या होत्या.

अचानक तिच्या मनात आले की एखादवेळेस तो मामा असावा. लाळ गळेपर्यंत आपल्याकडे पाहात होता. तसे वाटल्यावर तर गळूनच गेले तिचे हातपाय!

त्यातच दारावरची थडथड वाढली. आवाज किंचित जोरात येऊ लागले. अचानक एखाद्या वेड्या माणसाने निरर्थक उच्चार करावेत असा एक मानवी उच्चारही अस्पष्टपणे येऊ लागला. जागच्याजागीच युगि अंग इतके चोरून बसली की ह्यापेक्षा अधिक घाबरून बसणेही तिला शक्य नव्हते. मग तिला आठवले की आपल्याला रात्री झोपताना जवळ एक लोखंडी गज ठेवून झोपायची सूचना वारंवार करण्यात आलेली होती. आपण ती स्मरणात ठेवली नाही ह्याचा तिला अतिशय राग आल्यामुळे ती आता मूकपणे रडूच लागली. काही वेळाने तो आवाज आणि दारावरच्या थपडांमधील वेळाचे अंतर वाढू लागले. बहुधा बाहेरच्या व्यक्तीचे अधिक काही करण्याचे शाडस नसावे. आपण दार उघडले तरच तो माणूस काही करू धजेल अन्यथा नाही असे युगिच्या मनात आले. बर्‍याच वेळाने मात्र शांतता पसरली. पण जाणार्‍या पावलांचे आवाज स्पष्टपणे न आल्याने युगिने अज्जिबात धाडस केले नाही जागेवरून हालण्याचे.

कितीतरी वेळ! कितीतरी वेळ ती तशीच बसून होती. कुठून कुठून कोंबडी आरवण्याचे आणि इतर काही आवाज सुरू झाले तशी ती किंचित हालली. घड्याळात पाहिले तर पावणे सहा! आणखी वीस मिनिटे तशीच बसून राहिली प्रकाश थोडा वाढावा म्हणून! नंतर मग हातात एक जाडजूड टॉर्च सुरक्षिततेसाठी धरत तिने कडीचा अजिबात आवाज न करता हळूहळू दार किलकिले केले......

...... कोणीही नव्हते..... जो कोण होता तो रात्रीच परत गेलेला होता....... आपण सुरक्षित आहोत ही भावना मनावर व्यापताच दीर्घ श्वास घेऊन युगिने धाडकन आपटून दार बंद केले आणि दारालाच पाठ टेकून जमीनीवर आदळून बसून राहिली.......

कोणत्याही परिस्थितीत ह्या तीन खोल्यांमध्ये आणखी कोणीतरी आल्याशिवाय आपण एकटीने राहायचे नाही हा निर्णय तिने घेतला आणि सहज तिचे लक्ष फरशीकडे गेले....... ही तिची ओढणी नव्हती... तिने आकाशी ओढनी घेतली होती.... हा पांढरा कपडा होता...

सर्रकन काटा आल्यासारखी बाजूला होऊन युगि उभी राहिली तेव्हा तिला दिसले की तो कपड्याचा तुकडा बाहेरून आत आलेला आहे...... तिने वायूवेगाने दार उघडले आणि मगाशी खाली बघायचेच राहिले होते हे लक्षात येऊन तिने खाली बघितले तर......

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

आशाताईंचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता......

===========================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोका बोका बोका बोका बोका बोका बोका बोका बोका बोका बोका बोका बोका बोका

Submitted by च्रप्स on 23 December, 2014 - 00:25

@ च्रप्स, हे 'बोका' काय ए? Uhoh

मर गये हम खुली रही आंखे वो तेरे इंतेझार की हद थी...

Submitted by abhijat on 29 July, 2015 - 13:56

कोण्या मायबोलिकराना ही कथा पुर्ण करायची असेल तर पुर्ण करावी Happy

बेफ़िकीर को क्या फिकीर Happy

Befikeer ko kya fikeer as nka mhanu (niluda ) hum ne logose bhi suna aour kitabome bhi padha hain ke shahajhan ne tajmahal banane walo ke hat kat diye the taki duniya me dusara tajmahal na bane -

Pages