पाकशास्त्र, पाककला आणि गुलाबजाम.

Submitted by सई केसकर on 20 February, 2018 - 01:39

सुगरणींची (सुगरणांची ) आणि एकूणच पाककौशल्याची दोन टोकं असतात. एका टोकावर स्वयंपाक ही एक कला आहे असे मानणारे लोक असतात आणि दुसऱ्या टोकावर स्वयंपाक हे एक शास्त्र आहे असे मानणारे लोक असतात. या दोन टोकांच्या मध्ये झोके घेणारे माझ्यासारखे बरेच असतात. स्वयंपाक ही एक कला आहे मानणारे लोक मला लहानपणीच खूप भेटले. पण ते सगळे अगदी निरागस होते.
"वैनी, भाजी कशी केली?" या प्रश्नाला फक्त हाताचा आधार घेऊन उत्तर देणाऱ्या बायका मी बघितल्या आहेत.
"एवढं एवढं आलं" (स्वतःच्या तर्जनीची दोन पेरं दाखवत)
"एवढ्या एवढ्या लसणीच्या कुड्या" (त्याच हाताच्या बोटांचा चिऊच्या चोचीसारखा चंबू करत)
"एवढं एवढं तिखट" (त्याच हाताची चार बोटं चिकटवून दुसऱ्या पेरांवर अंगठा टेकवत, आणि मनगटाला भरतनाट्यम शैलीत एक मुरका देत)
"एवढासा गूळ" (मागल्या मुद्रेतील अंगठा पहिल्या पेरावर सरकवत)
"पाच सहा टप्पोरी वांगी" (यातील "टप्पोरी" वर जरा जास्त भर देऊन)
"चार बोट तेल"
अशी एकहस्त पाककृती ऐकून तोंडाला इतकं पाणी सुटायचं की कृती गेली उडत, आधी जेवायला वाढा अशा वाक्यानी त्या कृतीची (आणि माझ्या उत्साहाची) सांगता व्हायची.

पुण्यात मात्र काही खडूस सुगरणी भेटल्या ज्या मुद्दाम दुष्टपणे कृती सांगायच्या नाहीत.
हे चिरोटे कसे केले? या प्रश्नाला अगदी गालाला खळी बिळी पडून, "अगं काही विशेष नाही त्यात" असे म्हणण्यात यायचे.
आणि पुढे सगळ्या जिन्नसांच्या आधी "थोडं" हे एकच प्रमाण लावून कृती सांगण्यात यायची.
"पण न तळता हे असे कसे झाले? तुम्ही बेक केले का?" या प्रश्नावर, "अरे हो की! तळायचे हे सांगायला विसरूनच गेले!" असं अगदी सहज उत्तर यायचं.

काही काही मात्र अगदी दिलसे धांदरट सुद्धा भेटल्या. एखादी चिमणी झाडावर बसून खायला किडे, आणि तिला खाणारी मांजर या दोन्हीचा सारखा अंदाज घेताना जशी वागेल ताशा या कृती सांगायच्या.
"साधारण एवढा एवढा मैदा घे" (हाताचा द्रोण करून)
"बरं"
"किंवा दीड वाटी घेतलास तरी चालेल, कारण आपण एक पूर्ण वाटी तूप घेणार आहोत"
"बरं"
"पण तू मैद्याप्रमाणे तूपही कमी करू शकतेस म्हणजे. कसंही. आणि हो. गरम तुपाचं मोहन पण आहे. त्यासाठी साधारण एवढं तूप" (परत हाताचा छोटा द्रोण करून"
"बरं"
"पण साखर किती घालणारेस त्यावर पण अवलंबून आहे. तुला गोडाचे आवडतात का माध्यम गोड?"
"ताई मी जाते. वाटेत चितळे लागेल. तिथून विकतच घेते"

ताया आणि आज्यांकडून स्वयंपाक शिकत असतानाच माझ्या आयुष्यात रुचिरा आलं. आणि ओगले आजींनी माझ्या बऱ्याच शंकांचे निरसन केले. त्यातही एकदा मठ्ठ्याच्या कृतीत "ताकाला आलं लावा" या वाक्यानी माझ्या डोळ्यासमोर, मी निव्हियाच्या डबीतून आल्याचे वाटण ताकाच्या गोऱ्या गोऱ्या गालांना लावते आहे असे दृश्य आले.

माझा पीएचडी सुपरवायझर म्हणायचा, "प्रयोगाची कृती अशी लिहावी जशी चांगली पाककृती".
यात जिन्नसांची (केमिकल) ची यादी कृतीत सगळ्यात आधी काय लागणार आहे पासून सगळ्यात शेवटी काय लागणार आहे अशी असावी. आणि प्रत्येक जिन्नसांपुढे कंसात त्याचे एकाच प्रकारे माप असावे. म्हणजे वाचणाऱ्याला त्या वस्तू तशा क्रमवार लावून ठेवल्या की पाककृती (प्रयोग) करताना पाठोपाठ घेता येतील. हे त्याचे वाक्य ऐकल्यावर मी प्रयोगांकडेच नव्हे तर पाककृतींकडे सुद्धा नव्याने बघू लागले. आणि हाच अभ्यास करता करता मी दुसऱ्या टोकाला कधी पोचले माझे मलाच कळले नाही.

सुरुवातीला बेकिंग, कलेच्या टोकावर राहून करायचा प्रयत्न केला. इंटरनेटवर घाईघाईत वाचलेल्या पाककृतीचे, मनातल्या मनात आत्मविश्वासाने अघळपघळ मराठीकरण केल्यामुळे मी बरेच लादे कचऱ्यात फेकून दिले. मग लक्षात आले की अंडी कशी फेटली यानेही या पदार्थांमध्ये फरक पडतो. हळू हळू स्वयंपाकाचे शास्त्र शिकायला सुरुवात केली. गरीब विद्यार्थिनी दशेत असताना पाश्चात्य पाककलेत वापरण्यात येणारी भारी भारी उपकरणे नव्हती. पण ओट्यावर कोपऱ्यात जिन्नस मोजायचा एक गोंडस वजनकाटा मात्र आवर्जून घेतला. आणि त्यातही अमेरिकेतील पाककृती स्वतःचा वेगळा मोजमापाचा झेंडा घेऊन आल्या, म्हणून कप, औन्स वगैरे मापं वजनाच्या मापात लिहून ठेवली. पण एकदा एका फ्रेंच पुस्तकात कुठल्याश्या द्रवपदार्थाचं माप डेसीलिटर मध्ये दिलेलं पाहिलं आणि कपाळावरची शीरच तडकली.

फ्रेंच पदार्थ करून बघताना जो काही आनंद मिळायचा (पदार्थ बिघडला तरी) तो अनुभवून आपण नक्कीच कलेमधल्या आणि गणितामधल्या एका उंबरठ्यावर उभे आहोत असे वाटायचे. साखरेला आणि अंड्याला कुठल्या कुठल्या रूपात बघता येईल याचे उत्तम उदाहरण फ्रेंच पाककलेमध्ये मिळते. कधी साखर मुरवून, कधी नुसती भुरभुरून, कधी त्याचे फक्कडसे आयसिंग बनवून, तर कधी थेट साखर जाळून. रसायनशास्त्र कमी पडेल इतके साखरेचे अलोट्रोप फ्रेंच पाकशास्त्रात बघायला मिळतात. तसेच तापमानात बदल करून, एकाच पदार्थाची केलेली वेगवेगळी रूपं सुद्धा बघायला मिळाली. कधी थंडगार चॉकलेट मूस, तर कधी गरम गरम हॉट चॉकोलेट.

फ्रेंच लोक व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोस्कोप घेऊन स्वयंपाक करतात असा निष्कर्ष मी काढणार इतक्यात माझ्या आयुष्यात एलोडी नावाची एक फ्रेंच मुलगी आली. अमेरिकेत असताना एकदा थँक्सगिव्हिंगला आम्ही दोघीच शहरात उरलो होतो. बाकीचे सगळे मित्र मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा तिनी फारच सुंदर स्ट्रॉबेरी टार्ट बनवून आणला होता. त्याची कृती विचारली असता तिनी आधी, "सोप्पीये" असे उद्गार काढले. आणि पुढे म्हणाली, "थोडा मैदा, थोडं बटर, थोडं अंडं कालवायचं. मग ते "फतफत" करून एका फॉईलवर थापायचं. त्यात स्ट्रॉबेरी आणि साखर ओतायची. आणि ते ओव्हनमध्ये टाकायचं. नंतर क्रीम घालून खायचं."
तिचे हे वर्णन ऐकून फ्रेंच पाककृतींची पुस्तके लिहिणाऱ्यांना फ्रेंच रेव्होल्यूशन झाल्याचे कळले नाही की काय असा मला संशय आला. नंतर तिनी एका बैठकीत तो अक्खा टार्ट संपवून, फ्रेंच बायकांच्या खाण्यापिण्याच्या सवयीबद्दलचा माझा भ्रम सुद्धा तोडून टाकला.

"पाक" शब्दापुढे कला कधी लावायचे आणि शास्त्र कधी याचा आता थोडा थोडा अंदाज येऊ लागला आहे.
गोळीबंद "पाक" करायचे शास्त्र आहे. तसंच खुसखुशीत पाय क्रस्ट तयार करणे पण शास्त्रातच मोडते. चकली, स्वयंपाक हे शास्त्र आहे हे पटवून द्यायचे उत्तम उदाहरण आहे. पाकसिद्धीचे प्रॅक्टिकल असते तर चकली चांगली चाचणी ठरली असती. चकली चुकली, डिग्री हुकली. कारण चकली इतक्या प्रकारे चुकू शकते की प्रत्येक वेळी चकली करताना मी मास्टरशेफच्या फायनल मध्ये घड्याळ लावून भाग घेते आहे असे मला वाटते.
मऊ मऊ, लुसुशीत घडीच्या पोळ्या मात्र कला क्षेत्रात जातात. तसेच नाजूक पाऱ्या असलेले मोदकही. मटणाचा रस्सा नाक लाल होईल इतका झणझणीत, पण तरीही परत परत घ्यावासा वाटेल असा करणे ही कला आहे. पण पाकातले रव्याचे लाडू वळणे हे कला आणि शास्त्र दोन्हीमध्ये मोडते. तसेच यीस्ट वापरून बनवायचे सगळे गोड पदार्थही दोन्हीकडे बसतात. केळफुलाची/फणसाची भाजी ही मात्र नुसती हमाली आहे. ती दुसऱ्यांनी आयती आणून दिली तरच तिला कला वगैरे म्हणता येईल.
----------------------------------------------------

हे सगळे विचार मनात ताजे करणारा सिनेमा म्हणजे गुलाबजाम.
एखादं हॉटेल काढायचं म्हणजे मोजमाप करून स्वयंपाक आला पाहिजे. पण चांगला स्वयंपाक, नुसतं मोजमाप करता येणाऱ्यांना येईलच असे नाही. खाऊ घालणारी व्यक्ती प्रत्येक पदार्थावर तिची/त्याची स्वाक्षरी करत असते. आणि कुणी त्या चवीला असं मोजमापात करकचून बांधू शकत नाही.
कधी कधी, आपण आपल्या कामातून आपलं अस्तित्व शोधत असतो. जे आपल्या आजूबाजूला आपल्याला मिळत नाही, ते स्थैर्य, शांतता आपण जे काही करत असतो त्यातून मिळत असते. राधा आगरकरला (सोनाली कुलकर्णी) ती स्वयंपाकातून मिळते. पण मग तिला आदित्यसारखा (सिद्धार्थ चांदेकर) सवंगडी मिळतो आणि दोघांच्या आयुष्यातल्या बऱ्याच सैरभैर गोष्टी मार्गी लागतात. त्यांचं हे एकमेकांच्या आधाराने (पण एकमेकांमध्ये गुंतून न जाता) मार्गी होणं अतिशय सुंदर मांडलं गेलं आहे.

खादाडी आणि स्वयंपाक आवडणाऱ्यांनी, आवर्जून पाहावा असा हा सिनेमा आहे. सोनाली कुलकर्णी आणि सचिन कुंडलकर, दोघांचीही आजपर्यंतची सगळ्यात सुंदर कलाकृती. ज्यांना मध्यंतरी कुंडलकरांचा राग आला होता, त्यांनी तो (थोडावेळ) बाजूला ठेवून पाहण्यासारखा नक्कीच म्हणता येईल.
-----------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख मस्त!
जाहीरातींत मोहोरी कशी उठून दिसते/ पदार्थ फारच फोटोजेनीक असतात तर, ही फूड फोटोग्राफी.
आपल्या त्या ह्यांचा यावरचा लेख आठवतोय वाचलेला... हा तो लेख - फूड स्टायलिंग आणि भूषण

>> केळफुलाची/फणसाची भाजी ही मात्र नुसती हमाली आहे.
हाए कंबख़्त, तूने की ही नहीं! निषेध!

आमच्या येथे कॅन मध्ये फणस मिळत नाही. Sad
नंतर तुमची रेसिपी वाचली. Wink
एकदोनदा मी फणसाच्या भाजीत असिस्टंटगिरी केली आहे. पण फारच व्याप असतो राव!
चिकट ओटा, चिकट हात सगळं साफ करा.

>>उत्तम लेख.. पण अजून दोन कॅटेगिरिज राहिल्या असे वाटते.

राहिल्या असणारच. तुम्ही वाढवा इथे. Happy
अजून एक कॅटेगिरी आहे ती म्हणजे "फ्रीझ" करून ठेवणाऱ्या.
काही काही घरांमध्ये अतिशय नीटनेटक्या पद्धतीने विविध पदार्थ किंवा त्यांचे इंटरमीजिएट्स फ्रीझ करून ठेवतात.
आणि स्वयंपाकाचा काहीच भाग आयत्यावेळी करतात. तसे करायला प्रचंड प्लॅनिंग लागते आणि तसे जमणाऱ्या स्त्री/पुरुषांबद्दल मला अमाप कौतुक आहे.

@योकु

लेखाच्या लिंकबद्दल आभार. मी हा लेख वाचला नव्हता.

फक्त शेवटच्या सीन मधला गुलाबजाम खव्याचा आहे. वजन आणि टेक्चर वरून लगेच कळत. रच्याकने, कागदी विमान कोणालाच खटकल नाही. सी जी त उलट झालय. पण सोकुल आणि सिद्धार्थ बेस्ट..... पिक्चर छान आहे.

रामेन गर्ल अतिशय वेगळा चित्रपट आहे. या दोन्हीत एकच साम्य आहे, गुरूकडे पदार्थ शिकायला गेल्यावर गुरूने लगेच न शिकवणे>>>>
चिनुक्स..
बरं.. असेलही..

सकुंनी लोकसत्ता मधुन केलेल्या मनोरंजनाचं अजीर्ण झाल्यामुळे हा चित्रपट बघायची हिंमत होत नाहीये.. वर जे साम्य लिहीलयस त्यावरूनच आणि बाकी पाककला यावरून वाटलं मला.. Happy

आज मी दुसर्‍यांदा 'गुलाबजाम' बघून आले. काही सीन्समध्ये थोड्या एडिटिंगमधल्या चुका लक्षात आल्या आज पण त्याकडे अगदीच दुर्लक्ष करु शकते. कथा, पटकथा, संवाद, कॅमेरा आणि सगळ्यांचे काम... प्रेमात पडले मी ह्या चित्रपटाच्या Happy ( सोनाली कुलकर्णीचे सर्वोत्तम काम वाटले मला. काय nuances पकडले आहेत तिने ह्या व्यक्तिरेखेचे ! एकरुप झालीय ती राधेशी. जराही इकडेतिकडे झालं असतं तर रेसिपी बिघडली असती.
Soulful फिल्म !

सायली, नको चुकवू हा चित्रपट खरंच...

एखादा सिनेमा दुसर्‍या सिनेमाची कॉपी आहे हे न बघता कसं कळतं?
चिनूक्स, लगेच गैरसमज दूर करण्यासाठी धन्यवाद! मला फार वाईट वाटलं असतं जर गुजा कोणत्याही सिनेमाची कॉपी आहे असं कळलं असतं तर!
अगो, मलाही दुसर्‍यांदा पहायचा आहे हा सिनेमा!

मी ही पाहिला आज दुपारी इथे शो होता.
मला आवडला. गुलाबजाम हा पदार्थ स्पेसिफिकली इतका देखणा नाही दिसला माझ्यामते तो प्रथम त्या डब्यातालेला खातो तेव्हा आणि नंतरही.
मला आता काय एकेक पदार्थ खावेसे वाटायला लागले आहेत.
मला सो कु चे घर दाखवले आहे ते पण फार आवडले. त्यातल्या त्या दोन्ही विजोड खुर्च्या विषेशतः. तश्शाच दोन्ही खुर्च्या माझ्या आत्याकडे होत्या.
हे अगदीच आवांतर.
त्या मोलकरणीचे काम छान झाले आहे पण तिचा कपडेपट मात्र विचित्र वाटतो. फॅन्सी नौवार साडी नेसलेली दाखवलेली आहे खरी पण त्यात काहितरी खटकत होतं. असो.. तेवढं चालतं.

लेख आणि प्रतिसाद दोन्ही :O=

फक्त
आणि तो शिकल्यावाचून अडत काहीच नाही. सुखी असतात लोकं. इतरेजन चवींची गुलामगिरी पत्करतात आणि सोपं आयुष्य अवघड करुन घेतात. >> हे एक तेवढं चांगलंय!

ज्यांना मध्यंतरी कुंडलकरांचा राग आला होता, त्यांनी तो (थोडावेळ) बाजूला ठेवून पाहण्यासारखा नक्कीच म्हणता येईल. >> कुंडलकर त्या एका लेखापुरताच फार्फार आवडलेला....

असो....

===

ऐसीअक्षरे वरचा एक प्रतिसाद

तुम्हाला मोठ्या पडद्यावर फूड पाॅर्न पाहायला आवडतं? - मग गुलाबजाम नक्की पाहा.
सिद्धार्थ चांदेकर म्हणजे अगदी खवा आहे असं तुम्हाला वाटतं? - मग गुलाबजाम नक्की पाहा.
तुम्हाला सोनाली कुलकर्णी चांगली अभिनेत्री वाटते?- मग गुलाबजाम नक्की पाहा.
तुम्हाला ममवचे फर्स्ट वर्ल्ड प्राॅब्लेम्स फील-गुड गोडीत सुटलेले पाहायला आवडतात? - मग गुलाबजाम नक्की पाहा.
- चिंतातुर जंतू

शूम्पी +१

पिक्चर बराचसा आवडला. थीम आवडलीच आणि सोनाली कुलकर्णी चा पर्फॉर्मन्स जबरदस्त एकदम.

बाकी लूज एण्ड्स बरेच आहेत किंवा मग कुंडलकर स्पेशल अट्टाहास छाप ही जिकडे तिकडे दिसते. सगळ्यात पहिल्यांदा त्या सिद्धार्थ चांदेकर चे सस्पेन्डर्स बघून कल्पना आली पुढे कुठे कुठे आर्टवर्क दिसू शकेल त्याची. फा ची आठवण झाली सस्पेन्डर्स बघून (तो तशी वेषभूशा करतो असं नाही ; त्याने ह्याआधी त्याची विशेष टिका टिप्पणी लिहीली होती सस्पेन्डर्स वर म्हणून).

पिक्चर बराचसा आवडला.>>> +१
दोघांचेही पर्फोर्मन्सेस मस्त आहेत.एक वेगळा सिनेमा म्हणून पहायला हरकत नाही.

आदित्य ज्यावेळी टिफिन उघडतो,त्यावेळी डब्यातली मिरच्यांची भाजी बघून तोंडात पाणी आले होते.पदार्थांचे पोत, नजरेला तृप्त करून गेले.खरंच आहे पदार्थ आधी डोळ्यांनी खाल्ला जतो,मग जिभेने!

आदित्य ज्यावेळी टिफिन उघडतो,त्यावेळी डब्यातली मिरच्यांची भाजी बघून तोंडात पाणी आले होते. >>> पडवळाची पीठ पेरुन भाजी आहे ना ती ? Happy

नाही भोपळी मिरची,पीठ पेरून! >>> असेल मग Happy सुरुवातीच्या क्रेडिट्समध्ये चंद्राकृती चिरलेल्या पडवळाच्या भाजीची रेसिपी दिसते ( ती रेसिपी पीठ पेरुन भाजीची नसावी ) म्हणून की काय पण त्या डब्यातली भाजी चंद्राकृती चिरलेले पडवळच वाटले एकदम.

सई, तुझा हा लेख परवा ऑस्ट्रेलियातील एका फेसबुक पेजवर कोणीतरी शेयर केला होता. नशीब तुझं नांव होतं. तिथे या लेखाची लिंक डकवून आले. ज्यांनी हा लेख तिथे टाकला होता त्यांना म्हणे तो व्हाट्सअप्प वर आला होता.... लोक व्यवस्थित लिंकसह का शेयर नाहीत?

सिनेमा निवांतपणे ऑनलाईन उपलब्ध झाला की बघणार!

सुंदर लेख !

गुलाबजाम बघितला आहे

कुंडलकरांना सूर सापडलाय आता तो तसाच राहू दे

छान लेख.

काल बघितला..आवडला. सो कु ने मस्त काम केलय.

मस्त जमलाय लेख, अगदी सिनेमासारखाच!
एखादा सिनेमा दुसर्‍या सिनेमाची कॉपी आहे हे न बघता कसं कळतं?>>> काही विशिष्ट शहरातील विशिष्ट ठिकाणी शिक्षण झाले असेल तर असे लगेच कळू लागते.

>>>सई, तुझा हा लेख परवा ऑस्ट्रेलियातील एका फेसबुक पेजवर कोणीतरी शेयर केला होता. नशीब तुझं नांव होतं. तिथे या लेखाची लिंक डकवून आले. ज्यांनी हा लेख तिथे टाकला होता त्यांना म्हणे तो व्हाट्सअप्प वर आला होता.... लोक व्यवस्थित लिंकसह का शेयर नाहीत?

हो मलाही व्हॉट्सऍपवर शेयर झालाय असं सांगितलं काही जणांनी.
काहीच करू शकत नाही पण आपण. फॉरवर्ड करणे खूप सोपे असते. Sad

लिंक दिल्याबद्दल आभार.

मलाही ती पीठ पेरून केलेली भोपळी मिरची वाटली होती.
पडवळ एवढं हिरवं गार कुठे दिसतं?

सई तु छान लिहीलयस हे सांगायचं राहिलं..:)

एखादा सिनेमा दुसर्‍या सिनेमाची कॉपी आहे हे न बघता कसं कळतं?>>>

काॅपी नाही.. त्यावरून काढलाय असं मी म्हणाले..

आणि दुसरा चित्रपट न बघता हे म्हणणं चुकीचं असेलही..

पण भविष्यात कधी the ramen girl बघितलास तर गुलाबजामचा युट्युबवर उपलब्ध असलेला ट्रेलर नक्की बघ..

शिकणा-या व्यक्तीचं दुस-या देशातून येणं, खाद्यपदार्थ च (इतर कुठली कला नाही) शिकवण्याची विनंती करणं ..
इथे सोकुची खानावळ तिथे त्याचं घराखाली छोटं रेस्टॅरंट , शिकवणा-याचं तुसडेपणानं वागणं, आणि तरीही शिकणा-याचं टिकून राहणं.. आधी भांडी घासायला लावणं, डिक्शनरी/पुस्तक फेकून देणं, हळूहळू शिकवलं जाणं,

पदार्थांशी भावना व्यक्त करणं.. आणि शेवटी त्यायोगे आयुष्यातल्या काही गोष्टी मार्गी लागणं..

ह्या सगळ्या गोष्टी (treatment च्या थोड्याफार फरकाने पण) इतक्या सारख्या आहेत की मला ट्रेलर पाहून the ramen girl च वाटला..

ट्रेलर पाहूनच जनरली आपण चित्रपटाच्या जातकुळीचे आराखडे बांधत असतो..
कदाचित ट्रेलर वरून बांधलेला माझा अंदाज चुकला..
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते..

मला तो आदित्य डबा खाताना त्याच्या लहानपणींच्या आठवणींचा छोटासा क्विक मॉन्टाज दाखवला आहे ते (ट्रेलरमध्ये) पाहून रॅटाटूईची आठवण झाली होती. कॉपी नाही, इन्स्पिरेशन म्हणू.

पाहिला. बाकी काही नाही तर फूड च्या प्रेझेन्टेशन बद्दल जे ऐकले वाचले होते त्याने अपेक्षा वाढल्या होत्या.
त्याबद्दलच लिहिते.
* सुरुवातीला आदित्य राधा चा डबा खातो तो डबा किती अनअपेटायजिंग दिसलाय! सिमला मिर्ची भाजी कच्ची वाटते. शेवग्याची आमटी बिनातेलाची वाटते, खानावळ छाप!
* घडीच्या माऊस्सूत पोळ्या गार असल्यातरी तोडताना सॉफ्ट दिसतात. सुजाता आटा किंवा तत्सम जाहिरातीत दिसतात तशा.यातल्या पोळ्या तशा नाही दिसत, आख्ख्या सिनेमात ३-४ वेळा पोळ्या दाखवल्यात एकदाही सुरेख पोळ्या नाही दाखवता आलेल्या.
* मोदक!! दोन वेळा मोदक दाखवलेत पण दोन्ही वेळा नापास! एकदाही कळीदार सुंदर मोदक का नाही जमले? हह चे मोदक बघा म्हणावे. यातले मोदक म्हणजे मोमो वाटतात.
* सोकु सुरुवातीला म्हणते उगीच कांदा लसणाचा मारा करून भाजीची चव घालवू नये. स्वतः मात्र एकदाभेंडिइच्या भाजी वर उगीच बचक भर ओले खोबरे घालताना दाखवली आहे. भेंडीच्या भाजीवर ओले खोबरे हेही जरा मिसमॅच वाटले मला. खिरीत की बासुंदीवर पण असाच वरून बचक भर सुका मेवा! ट्रॅडिशनल स्वैपाकात असं गार्निशिंग सहसा नसतं.
* गुजा तळायला केवढी ती कढई आणि बादलीभर तेल!! शिवाय वर कुणीतरी म्हटलेय तसे गुजा चे टेक्सचर खटकलेच. शूम्पीने लिहिल्यासारखेच वाटले. खव्याच्या गुजाचे टेक्स्चर असे स्पाँजी नसते!!आणि गुजा आणि सुरळीच्या वड्यापण एकसारख्या आकाराच्या, सुबक का नाही दिसत ? ( सुरळीच्या वड्या गरवी गुजरात किंवा तत्सम जाहिरातीत काय कातिल दिसतात!!)
* नंतर आदित्य च्या रेस्टॉ मधे वरण, भात आणि भाताच्या मुदीवर डेकोरेशन ला हिरवी मिर्ची? नोs!! चुकीचे गार्निशिंग आहे की Happy पिठले भात असता तर ठीक होतं!
* अनुभवी नजरेला जामच खटकलेले- आदित्य दोन हातानी कणिक मळताना दाखवलाय. सुरुवातीला तरी ते ठीक समजू पण शेवटी इतका तयार शेफ झाला तरी पुन्हा गुजा चे पिठ दोन हाताने मळतो. नाअह! हे अनुभवी शेफ कधीही करणार नाही!
कदाचित काही जणांना ही टू मच चिकित्सा वाटेल पण फूड बद्दलच सिनेमा आहे म्हटल्यावर या बारीक डीटेल्स कडे लक्ष जाणारच!! Happy
बाकी पात्रांमधे तो आदित्या ची गफ्रे आणि सोकुचा मित्र हे अगदीच वरवरचे आणि विअर्ड कॅरेक्टर्स वाटले. दिसणे, वागणे, सगळेच. तो मित्र असा दुसर्‍याच भेटीत असा एकदम खेटायला जवळ काय जातो सोकु च्या ? आधी ओळख असली म्हणुन काय झालं? दॅट वॉज क्रीपी.
कपडे पण काहीतरी विचित्रच फॅशन चे आहेत. त्याचेही आणि आदित्य चे पण. बायदवे सस्पेन्डर्स आणि बेल्ट हे एकाच वेळी लावतात ? (आमच्या सोबत काल एबाबा ही होते त्यांनी पॉइन्ट आउट केले काल Happy ) ही काहीतरी कुम्डलकरी खासियत असावी असे कन्क्लुजन काढले मग Proud ( त्या राजवाडे मधे पण तो काका आणि एक दोन मुलांच्या कपड्यांची फॅशन काहीतरी अशीच विअर्ड होती)सोकु चे कपडे बर्‍यापैकी वास्तव वाटतात पण मोलकरणीचे एकदम क्लीशेड फॅन्सी. तसंच लोकांकडे पार्टीच्या ऑर्डर्स ना हे दोघे जातात तेव्हा रस्त्याने पण एप्रन घालून जातात ते फनी वाटले. Happy

मैत्रेयी +१

फूड डिझायनिंग आणि प्रेझेन्टेशनबद्दल जे वाचलं होतं त्याचा फुगा बिनकळ्यांच्या मोदकांनी, भाताच्या चौकोनी ढिगार्‍याने, कच्चट पीठ पेरलेल्या भाजीने, आणि पाट्यावर 'लाटलेल्या' (हो, वरवंटा ज्या प्रकारे पाट्यावर फिरवला आहे त्याला 'वाटणं' म्हणत नाहीत!) मिरच्या कोथिंबिरीने फोडला.

बाकी कॅरेक्टर्स, त्यांचे प्रॉब्लेम्स हे 'स्किन डीप'च ठेवायचे आणि 'अगंबाई, इतकं सोप्पं तर होतं सगळं!' अशा नोटवर सुटलेले दाखवायचे असा काही अलिखित नियम आहे का मराठी सिनेजगतात?

सोनाली कुलकर्णीचा अभिनय तुकड्यातुकड्यांत चांगला झाला आहे, पण तिची व्यक्तिरेखा नीट उभी राहात नाही. दोष तिचा नसावा.

एकूण सिनेमा हाफ-बेक्ड असेल अशी शंका होती आणि कुंडलकरांनी निराश केलं नाही असं म्हणेन. Proud

मला आवडले प्रेझेंटेड पदार्थ !!वरण भातावर हिरवी मिरची हे डेकोरेशन बरीच हॉटेल्स करतात.
भेंडीवर खोबरं पाहून मलाही उडाल्या सारखं झालं.पण असेल बुवा पध्द्त.
बाकी पोळ्या प्रत्यक्ष करताना फक्त तोच दाखवलाय.ती त्याला पोळ्यांबद्दल म्हणते पण ना, फुलके नको पोळ्या कर म्हणून.लंडन ला राहणारा बॅचलर म्हणून त्याने फार ग्रेट पोळ्या न करणं नॅचरल आहे.पोट भरीचा स्वयंपाक तो त्याच्या रूम मेट्स पेक्षा चांगला करतो.व्हेज पेक्षा नॉन व्हेज चांगलं बनवतो.
मला स्वतःला सर्वात जास्त खटकले ते त्याने सस्पेंडर्स आणि नंतर प्लेन नवे कोरे फुल फॉर्मल शर्टस घालून स्वयंपाक शिकायला जाणं. एन आर आय हे त्याशिवाय पण कळलेलं होतंच की.
सोकु चे काम आणि डायलॉग यासाठी त्या हिरोला 100 सस्पेंडर्स माफ आहेत.त्याचंही काम गोड आहे.
सोकु चं गोष्टी स्पष्ट सांगणं आवडलं.एका दीर्घ काळ कोमात असलेल्या, नंतर एकटं राहून साध्या साध्या गोष्टी शिकाव्या लागलेल्या, त्यात फसवणूक झालेल्या पात्राने सेल्फ एस्टीम कायम ठेवणं खूप महत्त्वाचं आणि टचिंग वाटलं.
प्रिया बापट नसती तरी चालली असती.गफ्रे ला जास्त टाईम देऊन तिचे अजून पैलू दाखवता आले असते.सोकु चा मित्र फार क्रिपी.सुरुवातीला तिच्याकडे बघतो कसा, नंतर कॉमा वगैरे हिस्टरी माहीत असतानाही आधी नीट ओळख न देता डायरेक्ट जवळ काय येतो.सोकु ने त्यालाही मस्त हँडल केलाय.
(ट्रेलर्स अजिबात आवडले नाहीत.उगीच मिसगाईड करायचा प्रयत्न केलाय.ट्रेलर म्हणजे कपड्याच्या दुकानाचा विंडो डिस्प्ले.आपल्या दुकानातले काही बेस्ट पिसेस तिथे हवे.हे ट्रेलर मध्ये मिसिंग आहे. )

Pages