खव्याचे खमंग तळलेले गोळे आणि साखरेचा पाक हे दोन्ही जेंव्हा एकमेकात मुरतात तेंव्हा जो पदार्थ बनतो त्याला गुलाबजाम म्हणतात इतकेच आजपर्यंत मला माहीत होते. आणि त्या मर्यादित ज्ञानामुळे गुलाबजाम हा शब्द माझ्या शब्दकोशात अगदी तळागाळाला होता. (तो थुलथुलीत, पाकात लडबडलेला, जिभेवर फक्त मिष्ट गोड या एकाच चवीची अनुभूती देणारा पदार्थ मला बिलकुल आवडत नाही. असोच!) पण सचीन कुंडलकरचा गुलाबजाम हा चित्रपट पाहिल्यापासून मात्र त्या शब्दाचा माझ्या शब्दकोशातला फाँट साफ बदलून गेलाय - ठळक आणि अधोरेखीत (आपल्या मराठीत सांगायचे झाले तर बोल्ड आणि अंडरलाईन्ड) ! सिनेमा खूप म्हणजे खूपच सुंदर आहे आणि तुम्ही जर खवय्या असाल तर सोने पे चिरोटा. म्हणजे तुम्हाला सिनेमातल्या प्रत्येक तलम तरीही कुरकुरीत (आपल्या मराठीत silky soft yet crispy) पापुद्र्याचा, त्यात घोळलेल्या साखरेचा आस्वाद घेऊ शकाल. (काय म्हणता चिरोटा ही फक्त आणि फक्त गोडच असतो? ) नमनाला घडाभर पाक ओतला, आता सिनेमाकडे वळूया.
सिनेमात एक नायक असतो आणि एक नायिका असते. त्यांच्या वाटेत अनेक खाचखळगे असतात पण ते पार करून ते त्यांच्या प्रेमात यशस्वी होतात. ही भारतीय सिनेमाने घडवलेली भारतीय प्रेक्षकाची मानसिकता. दिग्दर्शकाला काही संदेश वगैरे द्यायचा असला तरी तो या धोपटमार्गावरच दिला जातो बहुतेक वेळा. जे काही मोजके यशस्वी अपवाद आहेत त्यात नायक आणि नायिका यांच्यातले नातेच रंगवलेले नसते फारसे. संपूर्ण सिनेमा नायक आणि नायिका यांच्यातल्या नात्यावर असूनही त्याची प्रेमकथा न करणारा सिनेमा अजूनही भारतात विरळाच आहे. गुलाबजामम्ध्ये तर ती वाट प्रेमकथेच्या इतकी जवळ गेलीये की एक क्षण असा येतो की तो आणि ती एकत्र आले तर सुखांत आणि नाही आले तर दु:खांत असे समीकरण मनात तयार होऊ लागते. पण कुंडलकर त्याची प्रेमकथा होऊ देत नाहीत आणि शेवटही सुखांत करतात. ही जी काही किमया आहे ती योग्य पाक जमण्याइतकीच अवघड आहे आणि ती परफेक्ट जमली आहे.
आपण जेव्हा गुलाबजाम बघतो तेंव्हा तो खव्याचा गोळाच नजरेत भरतो, त्याचेच पारडे जड वाटते - साखरेच्या पाकाकडे लक्षच जात नाही फारसे. पण गुलाबजाम फस्त केल्यावर जिभेवर उरते ती गोड चव त्या पाकाची असते. नात्याचेही अगदी तसेच असते. जेंव्हा देवाण-घेवाण होते तेंव्हाच नाते उमलते आणि ते उमलणे खूप सुंदर असते. सिनेमा सुरू होतो तेंव्हा नायक (आदित्य) अस्सल मराठी शाकाहारी स्वैंपाक शिकायच्या वेडाने झपाटलेला आहे. त्याला यु.के.मध्ये मराठमोळे रेस्टराँ सुरू करायचे असते. कर्मधर्मसंयोगाने त्याला नायिका (राधा) भेटते एका गुलाबजाममधून. तिचा विक्षीप्तपणा सांभाळत, तिच्या नकदुर्या काढत तो त्याच्या मोहीमेत फत्ते होतो. पण मग वेळ येते युकेला परतायची. शेवट काय होतो ते मात्र सिनेमातच पहावे.
आदित्यचे वेड, लोक उडवत असलेली खिल्ली आणि तरीही ते वेड कायम असणे, त्या वेडापायी होणारा प्रचंड मनस्ताप (इतका की वयाच्या २७ वर्षीच झोपेची गोळी घ्यावी लागणे), नोकरी गेल्यावर त्याचे हतबल होणे आणि मग त्यालाच संधी मानून मनापासून उमलून येणे, राधाच्या विक्षिप्तपणाचे कारण कळल्यावर हमसाहमशी रडणे (हे रडणे जराही हम्टी शर्मासारखे अती वाटत नाही), राधाची वाटणारी काळजी हे सगळे सिद्धार्थने इतके मस्त उभे केले आहे. अग्नीहोत्र मालिकेनंतर त्याचा अभिनय पहिल्यांदीच इतका जमून आलाय.
सोनाली मला खूप आवडत नाही. पण या सिनेमात मात्र तिने कमाल केलीये. राधाचा अलिप्तपणा 'कोरडा' न वाटणे ही तारेवरची कसरत होती. ते जमले नसते तर राधा उभीच राहू शकली नसती. आणि सोनालीने राधा अप्रतीम सादर केली आहे.
कामवाली, पोपट, राधाचा मित्र यांच्या केशर-वेलचीने गुलाबजामची खुमारी अजूनच वाढवली आहे. तेंव्हा गुलाबजाम खा अथवा खाऊ नका पण हा गुलाबजाम बघा मात्र नक्की!
सिनेमा खूप म्हणजे खूपच सुंदर
सिनेमा खूप म्हणजे खूपच सुंदर आहे आणि तुम्ही जर खवय्या असाल तर सोने पे चिरोटा.
+१
छान चित्रपट आहे.
मला एकच वाटत अशा मराठमोळ्या
मला एकच वाटत अशा मराठमोळ्या सैपाकावर आधारित चित्रपटाचे नाव गुलाबजाम का जो एक अमराठी गोड पदार्थ आहे ?
मस्त परीक्षण
मस्त परीक्षण
हा माझ्या गर्लफ्रेंडला बघायचा आहे. ईथे अश्याच गोड गोड जामुन प्रतिक्रिया आल्या तर नक्की जाणार.. सिद्धार्थ चांदेकर आवडतो. त्याची ओवर एक्टींगही सुसह्य असते हा त्याचा प्लस पॉईंट.. ट्रेलरवरून तो परफेक्ट कास्ट वाटत आहे.
सोनाली बाबत ईतरांचे माहीत नाही. मला चांगली वाटते. या टाईपमध्ये मोडते.
मनीमोहोर, कथेला नाव समर्पक
मनीमोहोर, कथेला नाव समर्पक असावे कदाचित...
बाकी गुलाबजाम हा अमराठी पदार्थ आहे हे आजच्या किती मराठी मुलांना माहीत असेल याची मला शंकाच आहे.
कारण मला स्वत:लाच आज समजले
आवडला. पण रेणुकाची बहिण नाहि
आवडला. पण रेणुकाची बहिण नाहि पटलि
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
या सिनेमाचं सगळीकडे कौतुक वाचायला मिळतंय.
हा सिनेमा "चिनी कम" चं
हा सिनेमा "चीनी कम" चं फ्लिप्ड वर्जन आहे काय?
अतीशय आवडला सिनेमा
अतीशय आवडला सिनेमा
परीक्षण आवडले.
परीक्षण आवडले.
राज, नाही.. चीनी कम नाहीये.
छान कथा आहे आणि पडद्यावर उत्तम प्रकारे सादर केली आहे! मला खूप आवडला!
मानिमोहर.. गुलाबजाम ला मराठीत
मानिमोहर.. गुलाबजाम ला मराठीत काय म्हणतात?
छान परीक्षण!
छान परीक्षण!
माधव, सिध्दार्थ करता सिनेमा
माधव, सिध्दार्थ करता सिनेमा बघायची इच्छा आहेच पण तुम्ही लिहील्या मुळे ती अधिक वाढली आहे.
बघणार आहे अर्थात न्यू जर्सी
बघणार आहे अर्थात न्यू जर्सी मधे आला तर :(... . ट्रेलर आवडला होता. प्रेडिक्टेबल आहे तसा. पण कुंडल्करांचे सादरीकरण आवडते त्यामुळे पाहणार.

का कोण जाणे पण मला सिद्धार्थ चांदेकर आणि सागरिका घाडगे मधे मला खुप साम्य वाटतं...
गुलाबजाम हा नॉन मराठी पदार्थ आहे?
सचिन कुंडलकरचा पिक्चर
सचिन कुंडलकरचा पिक्चर म्हटल्यावर पहिली काट मारली होती, सायली राजाध्यक्ष यांच्या ब्लॉगवर सचिन कुंडलकरने ‘गुलाबजाम’ हे नाव त्यातील नाद आवडतो म्हणून दिलंय हे वाचून दुसरी काट मारली होती. पण परिक्षण वाचून बघावा अशी एक किंचीत उत्सुकता वाटतेय. न्यूजर्सीत आला तर मे बी बघू नाहीतर ऑनलाईन येईपर्यंत वाट बघावी लागेल.
छान लिहिलय. बघायला जमतो का
छान लिहिलय. बघायला जमतो का बघतो.
बेकरीत आला आहे/ येणारे. जर्सीला ही असेलच.
>>गुलाबजाम ला मराठीत काय
>>गुलाबजाम ला मराठीत काय म्हणतात?<<
बहुतेक मेटफोरीकली वापरला असावा; कुठल्या संदर्भात ते सिनेमा पाहिल्यावरंच कळेल...
छान लिहीले आहे! बघायचा आहेच.
छान लिहीले आहे! बघायचा आहेच.
या मुलाखतीत सिनेमाचं नाव
या मुलाखतीत सिनेमाचं नाव गुलाबजाम का आहे हे सांगितलं आहे. एकूण गप्पा पण छान आहेत!
https://youtu.be/PUgFZ5XeuJU
छान लिहीले आहे.. आवडलं
छान लिहीले आहे.. आवडलं
गुलाबजाम हा नॉन मराठी पदार्थ
गुलाबजाम हा नॉन मराठी पदार्थ आहे? >> हा भारतीय पदार्थ आहे. मराठी पण भारतात येत असतिल. चिनुक्सला फायनल विचारले पाहिजे. नाहीतर हा मध्य पुर्वेतला निघायचा
छान लिहिलय.
छान लिहिलय.
हो गुलाबजाम मूळ पर्शियन
मस्त परीक्षण!!
हो गुलाबजाम मूळ पर्शियन पदार्थ आहे
गेल्या वर्षी लोकसत्ता व्हिवा मध्ये बऱ्याच पदार्थांची माहिती,त्यांचे मूळ कूळ याविषयी चे एक सादर चालू होते( लिंक मिळाली तर देते )तिथे वाचले होते
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/khauchya-shodhkatha-news/history-of-different-f...
हिच ती लिन्क खाऊच्या शोधकथा
महाराष्ट्रीयन पदार्थांची
डबल पोस्ट
महाराष्ट्रीयन पदार्थांची
महाराष्ट्रीयन पदार्थांची महती सांगणारा गुलाबजाम हा सिनेमा . पण गुलाबजाम हा पदार्थ महाराष्ट्रीयन नक्कीच नाही म्हणून हे नाव खटकतय मला . चिरोटे नाव जास्त शोभलं असतं माझ्यामते.
दुसरी न आवडलेली गोष्ट म्हणजे सारखं मराठी सैपाक मराठी सैपाक अस म्हटलं आहे ह्यात सगळ्यांनी. खरं तर महाराष्ट्रीयन सैपाक हा शब्द जास्त योग्य आहे. आपण केरळी जेवण जेवलो असं म्हणतो की मल्याळी जेवण जेवलो असं म्हणतो , तसच आहे हे. मराठी ही भाषा आहे महाराष्ट्राची. जास्त महत्वाचं नाहीये हे तरी सारखं ऐकताना खटकत होतं हे नक्की.
रच्याकने, मी आज पाहिला सिनेमा . फार नाही आवडला , भारावून वैगेरे तर अजिबातच गेले नाही . कदाचित रिव्ह्यू वाचून गेल्या मुळे माझ्या अपेक्षा जास्त उंचावल्या असाव्यात
सैपाक असं म्हणणंच मुळात
सैपाक असं म्हणणंच मुळात चुकीचं नाही का? स्वैपाक (स्वयंपाकचा अपभ्रंश?) असा शब्द बरोबर ना?
मराठी स्वैपाक म्हणत नाहीत हे
मराठी स्वैपाक म्हणत नाहीत हे खरं पण ते खटकलं नाही सिनेमात. किंबहुना तुम्ही लिहील्यावर लक्षात आलं की असं म्हटलंय बहुतेक सिनेमात!
छान लिहिलं आहे. आवडले परीक्षण
छान लिहिलं आहे. आवडले परीक्षण
चित्रपट अतिशय आवडलाय.
जिज्ञासा, लिंकबद्दल धन्यवाद. 'गुलाबजाम' शीर्षक देण्यामागचा विचार एकदमच पटला. नुसता नाद आवडला म्हणून नाव ठेवलं हे मला खरं वाटलं नव्हतंच वाचल्यावर.
मला सिनेमात एक गोष्ट जी सगळ्यात खटकली ती म्हणजे आदित्यला राधा जी भांडी घासायला देते ती सगळी स्वच्छ, लखलखीत ! फ्रेम सुंदर दिसणार नाही म्हणून असं केलं की काय ?! पण सुंदर दिसतील अशा पद्धतीने खरकटी भांडी दाखवता आलीच असती की
अजूनही एक गोष्ट जरा खटकली पण त्याबद्दल लिहिलं तर उगीच तपशील फोडले जातील ( जी त्यांनी ट्रेलर, मुलाखती ह्यात यशस्वीपणे दाखवायचं टाळलंय ) म्हणून नाही लिहित....
छान लिहिलंय .
छान लिहिलंय .
सुंदर खरकटी भांडी ?
न्यूजर्सीत आला तर मे बी बघू
न्यूजर्सीत आला तर मे बी बघू नाहीतर ऑनलाईन येईपर्यंत वाट बघावी लागेल.>>न्युजर्सीत मराठी सिनेमे का येत नाहीत? ह्याचं कारण कुणाला माहिती आहे का? अलीकडे अनेक मराठी सिनेमे बे एरियात दाखवतात (थिएटरमध्ये). मग न्युजर्सीत का नाही? पुरेसा प्रेक्षक नाही हे कारण तितकस पटत नाही.
Pages