कालवं

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 February, 2018 - 01:45

समुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे. ह्या कालवांपासून विविध जेवणातील रुचकर पदार्थ बनवता येतात.

कालवं कवचातून आख्खी बाहेर काढण्याचीही एक कलाच आहे. कोयता, खरळ सारखे टोकदार हत्यार घेऊन त्याच्या टोकाने ते कवच पूर्ण निघेल असे बाजूने टोचून कवच काढून आख्खा कालव काढला जातो. समुद्राच्या जवळपासचे काही स्थानिक गावकरी आपल्या रोजी रोटी किंवा जेवणासाठी हत्यार घेऊन ठक ठक आवाज करत कालवं काढताना दिसतात. त्यांच्यासाठी बिनाभांडवल पण जोखीम आणि मेहनतीचा हा उद्योग आहे. भरती ओहोटीचे तर ही कालवे काढताना भान ठेवावेच लागते पण त्या बरोबर कालवाचे आवरण काढल्याने कवचे इतकी धारदार होतात की तिथे चुकून जरी पाय पडला तरी पाय रक्तबंबाळ होतो. चांगली बुटे व चप्पल घालूनच ही कालवे काढावी लागतात. त्यात कुठे चिकट झाले असेल तर पाय घसरण्याची शक्यता म्हणून पावलेही जपूनच टाकावी लागतात.

कालवाचे गोळे काढले की ते समुद्राचेच स्वच्छ भरलेल्या तांब्या किंवा एखाद्या खोल भांड्यात ठेवतात. मग हे त्या स्थानिक कष्ट्कर्‍यांचे एका वेळचे जेवण होते किंवा बाजारात विकून थोडी कमाई होते. कालवे बाजारात किंवा घरोघरी फिरून तांब्यावर विकली जातात. एक तांब्या ५० किंवा अजून वेगवेगळे दराने विकली जातात.
काही ठिकाणी कालवांच्या कवचांचे पुंजकेच बाजारात आणतात आणि गिर्‍हाईकांना त्यांच्यासमोर ताजी कालवे काढून देतात. कालवांमधेही छोटी-मोठी आकाराची कालवे असतात. ह्या कालवांचा ह्या कष्टाळू लोकांसाठी पोटापाण्याचा आधारच म्हणायला हरकत नाही.

कालवे ताजी असताना थोडीशी हिरवट असतात तर शिळी होत गेली की जास्त पांढरी पडतात शिवाय पाणी भरून फुगीर बनतात. अशी फुगीर कालवे शिजवली की ती आकसतात व चवीला कमी पडतात. ताजी कालवे कडक-मांसल व चविष्ट लागतात.

कालवे कच्चीही खातात. विदेशात चांगल्या हॉटेल्स मध्ये बर्फात ठेवून कच्च्या कालवांची कवचासकट डिश ठेवलेली असते तसेच इतर प्रकारेही वेगवेगळ्या विदेशी डिशेश बनवल्या जातात. आपल्याइथे कांद्यावर, कांद्याशिवायही कालवांचे सुके, कालवांच्या वड्या, रस्सा असे प्रकार बनविले जातात. कालवांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

कालवं शिजवण्यापूर्वी ती काळजीपूर्वक साफ करावी लागतात. कारण कवचातून काढताना थोडे कवच कालवाला लागलेले असते ते काढावे लागते नाहीतर दाताखाली ही कवचे येतात. एका ताटात ही कालवे घेऊन एक एक कालवाचे कवच चाचपून काढून टाकायचे असते. कालवे आकाराने मोठी असली तर पदार्थ बनवताना ती कापावी लागतात. कवच काढल्यावर कालवे धुऊन घेतात. आता आपण कालवांपासून तयार होणारे काही पदार्थ पाहूया.
मोठी कालवे

कालवांचे सुके
साहित्य : कालव १ ते दोन वाटे, १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळ्या ठेचून, हिंग, हळद, मसाला १ ते २ चमचे, चवीपुरते मीठ, १ टोमॅटो किंवा ३-४ कोकम, थोडी कोथिंबीर चिरून, तेल.

कृती:कढईत तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. त्यावर हिंग, हळद,रोजच्या वापरातला लाल मसाला घालून कालव घालावी वाफेवर थोडावेळ शिजू द्यावी. पाणी घालू नका कारण कालवांना पाणी सुटत. ५ ते ७ मिनिटांनी त्यात चिरलेला टोमॅटो किंवा कोकम घालावा व मीठ घालावे. जरा परतून कोथिंबीर घालावी थोडावेळ वाफेवर ठेवून गॅस बंद करावा. ही कालवे भाकरी बरोबर अजून चविष्ट लागतात.

कालवांच्या वड्या
साहित्य
कालव १ वाटा,१ कांदा बारीक चिरून, बेसन १ छोटी वाट,, २ चमचे तांदळाचे पीठ, आल लसूण पेस्ट १ चमचा
थोडा गरम मसाला, रोजच्या वापरातला लाल मसाला किंवा लाल तिखट १ चमचा किंवा आपल्या तिखटाच्या गरजेनुसार, हिंग, हळद, थोडी कोथिंबीर चिरून,चवीपुरते मीठ, तेल.

कृती :
कालवांच्या वड्यांचे दिलेले वरील तेल सोडून सर्व साहित्य कालवांसकट एकत्र करा थालीपिठाप्रमाणे घट्ट पीठ मळा जर कालव टाकून पातळ होत असेल तर त्यात अजून बेसन घाला. आणि चांगलं मळून छोट्या छोट्या वड्या तव्यावर तेल टाकून शॅलोफ्राय करा. ह्या वड्या रुचकर लागतात व साइड डिश म्हणून छान पर्याय असतो.

तळलेली कालवे
साहित्य :
कालव १ वाटा, ८-१० लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग, १ चमचा हळद, २ चमचे रोजच्या वापरातला लाल मसाला, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मिठ, २-३ कोकम, तेल.
कृती :
तेल गरम करून त्यावर लसूण परतवावा. त्यावर हिंग, हळद घालून परतवून लगेच कालवे घालावी मग मसाला टाकावा म्हणजे मसाला करपत नाही. मधून मधुन ढवळावीत. नंतर मिठ, कोथिंबीर आणि कोकम घालून एक वाफ आणावी आणि गॅस बंद करावा.

हे लेखन ऑगस्ट २०१७ च्या माहेर अन्नपूर्णा अंकात प्रकाशीत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणात बिचवर बरीच माणस कोयता आणि भांडं घेवुन फिरत असतात. शिंपले ठोकुन त्यातुन फ्लेश काढताना पाहिलं होतं, पण त्याची रेसिपी आजच कळाली. हे खाउन पहायला हरकत नाही.

शिंपले तोडुन काढल्यावर दगड असले धारदार आणि टोकेरी होतात कि त्यावरुन अनवाणी दुरच, पण मऊ चप्पल घालुन चालणं पण अशक्य.

ओह, असं आहे काय? मी काय पाहिलं कोणास ठाऊक. पण नंतर कालवं खायचं कायमचं सुटलंच.

मयुरेश, मनिमाऊ, स्वप्ना धन्यवाद.

चप्पल असले तरी हलकेच पाय टाकावे लागतात.

Pages