समुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे. ह्या कालवांपासून विविध जेवणातील रुचकर पदार्थ बनवता येतात.
कालवं कवचातून आख्खी बाहेर काढण्याचीही एक कलाच आहे. कोयता, खरळ सारखे टोकदार हत्यार घेऊन त्याच्या टोकाने ते कवच पूर्ण निघेल असे बाजूने टोचून कवच काढून आख्खा कालव काढला जातो. समुद्राच्या जवळपासचे काही स्थानिक गावकरी आपल्या रोजी रोटी किंवा जेवणासाठी हत्यार घेऊन ठक ठक आवाज करत कालवं काढताना दिसतात. त्यांच्यासाठी बिनाभांडवल पण जोखीम आणि मेहनतीचा हा उद्योग आहे. भरती ओहोटीचे तर ही कालवे काढताना भान ठेवावेच लागते पण त्या बरोबर कालवाचे आवरण काढल्याने कवचे इतकी धारदार होतात की तिथे चुकून जरी पाय पडला तरी पाय रक्तबंबाळ होतो. चांगली बुटे व चप्पल घालूनच ही कालवे काढावी लागतात. त्यात कुठे चिकट झाले असेल तर पाय घसरण्याची शक्यता म्हणून पावलेही जपूनच टाकावी लागतात.
कालवाचे गोळे काढले की ते समुद्राचेच स्वच्छ भरलेल्या तांब्या किंवा एखाद्या खोल भांड्यात ठेवतात. मग हे त्या स्थानिक कष्ट्कर्यांचे एका वेळचे जेवण होते किंवा बाजारात विकून थोडी कमाई होते. कालवे बाजारात किंवा घरोघरी फिरून तांब्यावर विकली जातात. एक तांब्या ५० किंवा अजून वेगवेगळे दराने विकली जातात.
काही ठिकाणी कालवांच्या कवचांचे पुंजकेच बाजारात आणतात आणि गिर्हाईकांना त्यांच्यासमोर ताजी कालवे काढून देतात. कालवांमधेही छोटी-मोठी आकाराची कालवे असतात. ह्या कालवांचा ह्या कष्टाळू लोकांसाठी पोटापाण्याचा आधारच म्हणायला हरकत नाही.
कालवे ताजी असताना थोडीशी हिरवट असतात तर शिळी होत गेली की जास्त पांढरी पडतात शिवाय पाणी भरून फुगीर बनतात. अशी फुगीर कालवे शिजवली की ती आकसतात व चवीला कमी पडतात. ताजी कालवे कडक-मांसल व चविष्ट लागतात.
कालवे कच्चीही खातात. विदेशात चांगल्या हॉटेल्स मध्ये बर्फात ठेवून कच्च्या कालवांची कवचासकट डिश ठेवलेली असते तसेच इतर प्रकारेही वेगवेगळ्या विदेशी डिशेश बनवल्या जातात. आपल्याइथे कांद्यावर, कांद्याशिवायही कालवांचे सुके, कालवांच्या वड्या, रस्सा असे प्रकार बनविले जातात. कालवांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
कालवं शिजवण्यापूर्वी ती काळजीपूर्वक साफ करावी लागतात. कारण कवचातून काढताना थोडे कवच कालवाला लागलेले असते ते काढावे लागते नाहीतर दाताखाली ही कवचे येतात. एका ताटात ही कालवे घेऊन एक एक कालवाचे कवच चाचपून काढून टाकायचे असते. कालवे आकाराने मोठी असली तर पदार्थ बनवताना ती कापावी लागतात. कवच काढल्यावर कालवे धुऊन घेतात. आता आपण कालवांपासून तयार होणारे काही पदार्थ पाहूया.
मोठी कालवे
कालवांचे सुके
साहित्य : कालव १ ते दोन वाटे, १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळ्या ठेचून, हिंग, हळद, मसाला १ ते २ चमचे, चवीपुरते मीठ, १ टोमॅटो किंवा ३-४ कोकम, थोडी कोथिंबीर चिरून, तेल.
कृती:कढईत तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. त्यावर हिंग, हळद,रोजच्या वापरातला लाल मसाला घालून कालव घालावी वाफेवर थोडावेळ शिजू द्यावी. पाणी घालू नका कारण कालवांना पाणी सुटत. ५ ते ७ मिनिटांनी त्यात चिरलेला टोमॅटो किंवा कोकम घालावा व मीठ घालावे. जरा परतून कोथिंबीर घालावी थोडावेळ वाफेवर ठेवून गॅस बंद करावा. ही कालवे भाकरी बरोबर अजून चविष्ट लागतात.
कालवांच्या वड्या
साहित्य
कालव १ वाटा,१ कांदा बारीक चिरून, बेसन १ छोटी वाट,, २ चमचे तांदळाचे पीठ, आल लसूण पेस्ट १ चमचा
थोडा गरम मसाला, रोजच्या वापरातला लाल मसाला किंवा लाल तिखट १ चमचा किंवा आपल्या तिखटाच्या गरजेनुसार, हिंग, हळद, थोडी कोथिंबीर चिरून,चवीपुरते मीठ, तेल.
कृती :
कालवांच्या वड्यांचे दिलेले वरील तेल सोडून सर्व साहित्य कालवांसकट एकत्र करा थालीपिठाप्रमाणे घट्ट पीठ मळा जर कालव टाकून पातळ होत असेल तर त्यात अजून बेसन घाला. आणि चांगलं मळून छोट्या छोट्या वड्या तव्यावर तेल टाकून शॅलोफ्राय करा. ह्या वड्या रुचकर लागतात व साइड डिश म्हणून छान पर्याय असतो.
तळलेली कालवे
साहित्य :
कालव १ वाटा, ८-१० लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग, १ चमचा हळद, २ चमचे रोजच्या वापरातला लाल मसाला, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मिठ, २-३ कोकम, तेल.
कृती :
तेल गरम करून त्यावर लसूण परतवावा. त्यावर हिंग, हळद घालून परतवून लगेच कालवे घालावी मग मसाला टाकावा म्हणजे मसाला करपत नाही. मधून मधुन ढवळावीत. नंतर मिठ, कोथिंबीर आणि कोकम घालून एक वाफ आणावी आणि गॅस बंद करावा.
हे लेखन ऑगस्ट २०१७ च्या माहेर अन्नपूर्णा अंकात प्रकाशीत.
का ग असा त्रास देतेस?
का ग असा त्रास देतेस?
तरी मी हल्ली माशांच्या
तरी मी हल्ली माशांच्या रेसिपीज लिहीत नाही.
(No subject)
तरी मी हल्ली माशांच्या
तरी मी हल्ली माशांच्या रेसिपीज लिहीत नाही.
>>>>> अग लिहित जा की मग.सध्या नविन काय करते आहेस कळु दे की आम्हांला.
छान लिहीलयं. फोटोंमुळे माहिती
छान लिहीलयं. फोटोंमुळे माहिती रंगतदार झालीय. हा प्रकार नवराच खातो, लेकीला आवडले नाही. ती सुरमई-पापलेटवर डोळा ठेऊन असते. पण ते ही जास्त खात नाही.
जागु जागु अगं कित्ती दिवसांनी
जागु जागु अगं कित्ती दिवसांनी माशांवरचा लेख आला तुझा आणि पुन्हा जुन्या माबोवर आल्याप्रमाणे वाटलं.
हे कालवं काढणं जिकिरिचं काम दिसतंय एकदम.
पण हे माश्याच्या प्रकारात मोडते का?
मला आकार वगैरे खूप अपिलिंग नाही वाटला, त्यामुळे कधी चव वगैरे घेईन असं वाटत नाही. चव कशी असते याची? मासा असा रबरी नाही लागत बघ, चिकन लागते, तर नक्की कसा?
वा! मस्तच.
वा! मस्तच.
माझा काही अजुन मुहुर्त लागलेला नाही कालवं बनवण्याचा.
अंकु, दक्षिणा मलाही जुने दिवस
अंकु, दक्षिणा मलाही जुने दिवस आठवले. खुप छान वाटल तुमचा प्रतिसाद वाचूनही. आता परत सुरुवात करेन. धन्यवाद.
कालवे मऊ असतात खाण्यासाठी. तुला बहुतेक नाही आवडणार.
रश्मी धन्यवाद.
का ग असा त्रास देतेस?+११११११
का ग असा त्रास देतेस?+११११११
खुप दिवसांनी आली रेसिपी.
यावरुन मायबोलीकर साती चा जुना
यावरुन मायबोलीकर साती चा जुना लेख आठवला आंब्या आणि कालवं नावाचा.
आणी मिस्टर बिन चा हॉटेल वाला एपिसोड आठवला ज्यात तो खराब झालेली कालवं खातो बकाबका.
तुम्ही प्लिज असं लेखन लिहीत
तुम्ही प्लिज असं लेखन लिहीत राहा. नवीन माहिती मिळते अन न केलेले पदार्थ करण्याची इच्छा होते.
छान लेख.. हे वेगळं सांगायला नकोच.
कालवं म्हणजेच ऑयस्टर्स का?
कालवं म्हणजेच ऑयस्टर्स का? जबरदस्त लागतो तो प्रकार चवीला. पण कच्चाच चांगला लागतो. मी शिजवलेले (वाफवलेले, तळलेले) ऑयस्टर्स खाल्ले आहेत. पण खारवलेल्या, बर्फात ठेवलेल्या कच्च्या ऑयस्टर्स ची सर नाही कशाला.
जागूतै, माशांच्या रेसिपीज न लिहीणं हा तुमच्यासाठी फाऊल आहे. वाजपेयींसारखं 'यह, अच्छी बात नही हैं'.
येतेच आता तुझ्याकडे, कालवे
येतेच आता तुझ्याकडे, कालवे घेऊन, शिजवून ठेव
मस्तच!
मस्तच!
रेसीपीचा पण फोटो टाक ना..
मी लिहीलेल्या माशांच्या
किट्टु, अनु धन्यवाद.
मी लिहीलेल्या माशांच्या मालिकेत आहेत कालवं. त्यात फोटोही आहे.
साधना कधी येतेस? घेउन ठेवते.
जागूतै, माशांच्या रेसिपीज न लिहीणं हा तुमच्यासाठी फाऊल आहे. वाजपेयींसारखं 'यह, अच्छी बात नही हैं'.
मयुरी, फेरफटका - नोंद घेतली आहे. आता सुक्या माशांच्याही रेसिपीज टाकणार आहे.
जागु जागु अगं कित्ती दिवसांनी
जागु जागु अगं कित्ती दिवसांनी माशांवरचा लेख आला तुझा Happy आणि पुन्हा जुन्या माबोवर आल्याप्रमाणे वाटलं.>> +१ दक्षे
मलापन हा प्रकार खायचा म्हणजे तुझ्याच घरची वाट धरावी लागेल जागू..
इधर तो मिलनेसे रहा आणि तसपन ऑथेंटीक चव बघायची तर उरणवारी करणे आले..
मस्त लिहिलयस.. माहितीपूर्ण आणि तोंपासु
टिना, साधना कालव गटग.
टिना, साधना कालव गटग.
जागु मला एकदा तुझ्याकडे
जागु मला एकदा तुझ्याकडे यायचं आहे गं.
भले मासे नको खाऊ घालूस. पण मला तुला भेटायचं आहे.
कधी काळी मी खूप आवडीने हे
कधी काळी मी खूप आवडीने हे खायचे. पण मग एकदा अलिबाग का असंच कुठेतरी बीचवर गेलो होतो आणि किनार्यावर वाळूतून त्यांना तुरुतुरु चालताना पाहिलं. (कालवंच असावीत ती. पण मला माश्यांतलं पापलेट सोडून फारसं काही कळत नाही) ते पाहून मात्र पुन्हा कधी खायची इच्छा झाली नाही.
टिना, साधना कालव गटग.>>
टिना, साधना कालव गटग.>> टेम्प्टिंग ऑफर आहे हं..
कधी काळी मी खूप आवडीने हे
कधी काळी मी खूप आवडीने हे खायचे. पण मग एकदा अलिबाग का असंच कुठेतरी बीचवर गेलो होतो आणि किनार्यावर वाळूतून त्यांना तुरुतुरु चालताना पाहिलं. (कालवंच असावीत ती>>>>>>>>>> अगं स्वप्ना, ती कालवं कशी असतील? कालवं चालूच शकणार नाहीत की. ती तुरुतुरु चालणारी खेकड्यांची पिल्ले असतील. अगदी गव्हाच्या दाण्या एवढी पण असतात ती पिल्ले. एकदा नवर्याने घरी करायला तिसर्या ( की शिंपले ?) आणल्या तर त्यातुन ही बारीक पिल्ले बाहेर पडली तेव्हा ती पिल्ले कुठेतरी पाण्यात सोडुन या म्हणून मी नवर्याचा जीव खाल्ला होता, पण नवरा म्हणाला अशी बाहेर ती जगणार नाहीत. मग नाईलाजाने ती पिल्ले पिशवीत घालुन बाहेर टाकली.
अलीबागला, नागाव बीचवर वाळुत अशी छोटी पिल्ले पळतांना बघीतली होती.
दक्षू ये धावत उरणला.
दक्षू ये धावत उरणला.
स्वप्ना कालवे चालत, पळत नाहीत. ती कवचात असतात. कदाचीत तू खुबड्या, पालक, चिंबोरे, शंख ह्यापैकी काहीतरी पाहील असशील.
रश्मी खुब्यामध्ये असतात खेकड्यांची पिले. शिंपले म्हणजेच खुबे.
जागु दि मी पण gtg ला पण आम्ही
जागु दि मी पण gtg ला पण आम्ही आल्यावर कालव साफ करायला हेल्प करू कारण ते कंटाळवाणं काम आहे...गप्पा मारत इतक्या लोकांसाठी इतके कालवे साफ होऊन जातील.. मी जातेय अलिबाग ला शनिवारी तिकडे सांगून ठेवणारे आज च मामा ला कालवे आणायला
अनु हो ग जास्त कालवं साफ
अनु हो ग जास्त कालवं साफ करायचा खरच कंटाळा येतो. आपला कालवं गटग जोरात.
आपला कालवं गटग जोरात.>>>>>
आपला कालवं गटग जोरात.>>>>> मलापण्घ्या.मी पण कालव साफ करायला मदत करेन.
मी खात नाही पण मला पण घ्या.
मी खात नाही पण मला पण घ्या.
जागु बेबे अने मला तुम्हाला भेटायचं आहे
लहानपणी रत्नागिरीजवळ माझ्या
लहानपणी रत्नागिरीजवळ माझ्या आजोळी पातेर्यात (वाळलेल्या पालापाचोळ्यात) भाजलेली कालवं खाल्ली होती. खुपच रुचकर लागत होती.
खाजण जवळच असल्याने आजी नाहीतर मावश्या वरच्यावर तांब्याभर कालवं बोचुन आणायची. न्याहारीला कालवं, भाकरी असा बेत असायचा.
माझी आतेबहीणसुध्दा हौस म्हणून जुहु, खारच्या किनार्यावर कालवं गोळा करायला जायची.
वा गमभन कधीतरी भाजण्याचा
वा गमभन कधीतरी भाजण्याचा प्रयोग पण करून बघेन.
जागू, मी पण येउ का?
जागू, मी पण येउ का?
मी कालवं साफ करायला आणि खायला
मी कालवं साफ करायला आणि खायला पण मदत करेन.
Pages