पुण्यात रहाणाऱ्याला डेक्कन जिमखान्यावरचे ‘ग्रीटवेल’ दुकान माहित असणारच. हे पुण्यातले पहिले वहिले फक्त ग्रीटिंग कार्ड्स आणि गिफ्ट आर्टिकल्स विकणारे दुकान! १९७८ मध्ये श्री. दिलीप जाधव आणि त्यांचे जेष्ठ बंधू श्री. नंदकुमार जाधव यांनी ग्रीटवेल सुरु केले. गेली एकोणचाळीस वर्षे या व्यवसायात असणाऱ्या जाधव सरांनी मराठी ग्रीटींग्स बाजारात रुजवण्याकरता अथक प्रयत्न केले आहेत. या विषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पा ......
तुम्ही मराठी ग्रीटिंग कार्ड्सकडे कसे वळलात?
सुरवातीचे १०-१५ वर्ष आम्ही दुकानात फक्त इंग्रजी ग्रीटिंग कार्ड्स विकत होतो. परंतु मनात मराठी भाषेचे प्रेम स्वस्थ बसू देत नव्हते. पेशव्यांच्या पुण्यनगरीमध्ये मराठी ग्रीटिंग कार्ड्स नसावीत याची आम्हाला नेहमीच खंत होती. त्या दृष्टीने आम्ही अनेक छोटे मोठे प्रयत्न करत होतो. वेळोवेळी ग्रीटिंग कार्ड्स बनवणाऱ्या कंपन्यांशी मराठी कार्ड्स बनवण्याकरता चर्चा करत होतो, परंतु व्यासायिकदृष्ट्या ते फायदेशीर ठरेल की नाही याबाबत शंका असल्याने कोणीही मराठी कार्ड्सची निर्मिती करायला तयार नव्हते. उत्तर सापडत नव्हते, पण काही ना काही प्रयत्न आम्ही चालू ठेवले. एक प्रयत्न म्हणून आम्ही पुण्यातील मराठी प्राध्यापकांकडून वेगवेगळ्या विषयावर मजकूर लिहून घेतले. त्या सर्वांनी उत्स्फुर्तपणे मजकूर दिला. आमच्याकडे फुलांची, निसर्गचित्रांची कोरी कार्ड्स असायची, त्यावर आम्ही या मजकुराचे प्रिंटींग केलं आणि वेगवेगळ्या प्रकाराची ग्रीटिंग कार्ड्स बनवून विकली. परंतु हा एक छोटा प्रमाणावरचा प्रयत्न ठरला. इंग्रजी कार्डाप्रमाणे सुबक ऑफसेट प्रिंटींग करून व्यावसायिक स्वरुपात मराठी कार्ड्स बाजारात यायला हवीत अशी आमची नेहमीच इच्छा होती.
रोटरॅक्ट क्लबने एक मराठी ग्रीटिंग कॉम्पिटीशन भरवली होती. त्या स्पर्धेशी तुमचा संबंध कसा आला? मराठी ग्रीटींग्सवर त्याचा काय परिणाम झाला?
१९९२ साली शिवाजीनगरच्या रोटरॅक्ट क्लबने त्यांच्या मराठी ग्रीटींग्स स्पर्धेविषयी सांगितले. या स्पर्धेत ते समाजातून वेगवेगळ्या विषयावर, सर्व वयोगटातून ग्रीटींग्स मागवणार होते, विजेत्यांना बक्षिसे देणार होते आणि त्या सर्व ग्रीटींग्सचे पुण्यात प्रदर्शन भरवणार होते. हा तर आमच्याच जिव्हाळ्याचा विषय होता. आम्ही या स्पर्धेला आर्थिक मदत करायचे ठरवले. आमच्या जोडीला या स्पर्धेकरता ‘नंदादीप कार्ड्स’चे श्री. सदानंद महाजन सह-प्रयोजक होते. या स्पर्धेकरता रोटरॅक्टने संपूर्ण पुण्यात प्रचंड प्रमाणात जाहिरात करायचे ठरवले होते. रोटरॅक्ट आणि आम्ही मिळून केलेल्या जाहिरातींमुळे स्पर्धेची बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली. स्पर्धेला पुण्यातून आणि बाहेर गावाहून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमुळे मराठी ग्रीटिंग ही संकल्पना जनमानसात खोलवर रुजली गेली आणि खूप मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली.
या स्पर्धेनंतर मराठी ग्रीटींग्स बाजारात आली कशी? तुम्ही त्याकरता काय पाऊले उचललीत?
रोटरॅक्टची स्पर्धा संपल्यानंतर आम्ही लोकाकडून वेगवेगळ्या विषयावरचे मजकूर आणि चित्रे मागवायला सुरवात केली. पुणे म्हणजे अस्सल मराठीप्रेमी समाज. सर्व वयोगटातल्या लोकांनी ही मराठी ग्रीटींग्सची कल्पना उचलून धरली. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नवनवीन कलावंत, लेखक, चित्रकार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि कल्पक मजकूर आणि साजेशी चित्र आम्हाला दिली. ही मराठी ग्रीटींग्स छापून आणण्याकरता आम्ही मुंबईच्या किरणभाई पोरवाल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी होकार दिला आणि MARS या नावाने मराठी ग्रीटिंग कार्ड्स आम्ही बाजारात आणली. आम्ही त्या ग्रीटींग्सकरता लोकांना मानधन तर दिलेच, शिवाय आम्ही त्यांचे नावदेखील त्या त्या ग्रीटिंगच्यामागे छापून आणू लागलो. आम्ही अश्या प्रकारे असंख्य विषयावरची ग्रीटींग्स तयार केली आणि बाजारात आणली. हळू हळू मराठी ग्रीटींग्स बाजारात स्थिरावू लागली. आम्ही ती संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा वितरित करायला सुरुवात केली. आमचे मित्र पुण्यातील नंदादीप कार्ड्सचे श्री. सदानंद महाजन यांनी देखील ‘संवाद’ या नावाने मराठी ग्रीटिंग कार्ड्स बाजारात आणली आणि त्यानाही मराठी रसिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला.
तुमच्या या मोहिमेला लोकांचा सहभाग कसा होता?
ग्राहकच आमचे मार्गदर्शक होते. काही लोकं मजकूर किंवा चित्र जरी देत नसले तरी लोकं स्वतःहून सल्ले देत होते, नवनवीन कल्पना सुचवत होते. याचे एक उदाहरण. एकदा कोणीतरी सुचवले की जुळ्या मुलांकरता ग्रीटिंग असायला हवे. एक ओळखीचे स्नेही परदेशात चालले होते, त्यांना विनंती केली की तिकडे जुळ्या मुलांकरता एखादे ग्रीटिंग मिळत असेल तर घेवून या. ते एक इंग्रजी ग्रीटिंग घेवून आले, आम्ही त्याचे मराठीकरण करून घेतले आणि बाजारात जुळ्या मुलांकरता ग्रीटिंग उपलब्ध करून दिले.
मराठी ग्रीटींग्स तयार करताना आपल्या संस्कृतीशी मिळता जुळता एक बदल केला. तो म्हणजे इंग्लिश मध्ये ‘तू’ आणि ‘तुम्ही’ या दोन्हीला ‘यू’ वापरला जातो. परंतु मराठी मध्ये जेष्ठ लोकांना ‘आपण’ असे संबोधतो. मराठीमध्ये ग्रीटिंग आणताना अश्या अनेक बारीक गोष्टींकडे आम्ही लक्ष दिले. व्यवसायातल्या अनुभवाच्या जोरावर आम्ही लोकांच्या आवडीची, मराठी मनाला, संस्कृतीला जपतील अशी कार्ड्स काढत होतो.
तुमच्या मते मराठी ग्रीटींग्सची निर्मिती मोठ्या प्रमाणावर कशी सुरु झाली?
आमचा व्यवसाय वितरकांचा. पण मराठीच्या प्रेमाखातर आम्ही पोरवाल यांच्याबरोबर कार्ड निर्मिती करत होतो. मात्र आमचे ध्येय अजून मोठे होते. आम्हाला मराठी ग्रीटींग्सना अजून मोठे मार्केट मिळवून द्यायचे होते. ARCHIES ची भारतभर दुकाने होती. शिवाय ते स्वतः ग्रीटिंग कार्डस बनवत असत. म्हणून आम्ही एक दिवस सरळ ARCHIES चे अनिल मुलचंदानी यांना भेटायला दिल्लीला गेलो. त्यांना तेव्हा मराठी मार्केटची काहीही कल्पना नव्हती. परंतु आमच्या शब्दाला मान देवून त्यांनी सुरुवातीला “प्रत्येक प्रकारची ५००० कार्ड्स काढू आणि त्याच्या प्रतिसादावर पुढचे ठरवू” असे म्हणत एकदम मोठी उडी घेतली. आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर कार्ड निर्मिती करावी का याबद्दल साशंक होतो, कारण जर तितकी कार्ड्स खपली नसती तर खूप मोठा मार्ग कायमचा बंद होणार होता. परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्ड्स काढण्यावर भर दिला. सुरुवातीला फक्त दिल्लीत त्यांच्या दुकानात कार्ड्स ठेवायचे ठरले. आता दिल्लीत त्या मानाने मराठी वर्ग कमी. आम्ही सचिंत झालो. परंतु थोड्याच कालावधीत प्रतिसाद वाढू लागला. मराठी प्रेमी लोकांचा प्रतिसाद पाहून त्यांनी या मराठी ग्रीटींग्सच्या मार्केट मध्ये उतरण्याचे ठरवले. ARCHIES सारखी कंपनी आज मराठी ग्रीटिंग कार्ड्स निर्मितीमध्ये अग्रेसर आहेत. आज बाजारात ५ मराठी ग्रीटींग्सपैकी ४ ग्रीटींग्स त्यांची असतात.
सध्या तुम्हाला मराठी ग्रीटींग्सला लोकांचा प्रतिसाद कसा काय मिळतो ? काळानुसार त्या कसे कसे आणि काय काय बदल होत गेले?
मराठी ग्रीटींग्सना आज ही भरपूर मागणी आहे. आपल्या मातृभाषेतून ग्रीटिंग मिळाल्याचा आनंद लोकांच्या चेहेऱ्यावर दिसतो. ते पाहणे खूप उत्साह वाढवणारे असते. आजही सर्व वयोगटातले लोकं मराठी ग्रीटिंग घ्यायला येतात.
गेल्या 25 वर्षात ग्रीटिंग कार्ड्स मध्ये खूप बदल होत गेले. आमचे जे एके काळाचे स्वप्न होते की इंग्रजीच्या तोडीस तोड ग्रीटींग्स मिळायला हवीत ते कधीच पूर्ण झाले आहे. गेली 25 वर्ष वेगवेगळ्या आकाराची, सुंदर डिझाईनची, वेगवेगळ्या प्रसंगांची, वेगवेगळ्या नात्यांचा उद्देशून असलेली अनेक ग्रीटींग्स बाजारात येत राहिली. आज बाजारात ५० रुपयांपासून २५०० रुपयांपर्यंतची कार्डे आहेत. आज प्रत्येक ग्रीटिंग मिळणाऱ्या दुकानात मराठी ग्रीटिंग कार्ड मिळतेच मिळते
इंटरनेटचा वाढता वापर आणि मराठी वाचकांची रोडावलेली संख्या यामुळे मराठी ग्रीटींग्सच्या खपामध्ये परिणाम जाणवतो का?
१० ते २० % कार्ड्सचा खप कमी झाला असला तरी आजही मराठी ग्रीटींग्सना बाजारात चांगली मागणी आहे. इंटरनेट आणि मोबाईलचे मेसेज डिलीट होतात, परंतु ग्रीटिंग आयुष्यभर जपता येते, यामुळे अजूनही लोकं मराठी ग्रीटींग्स घेतात. शिवाय मराठी मानसिकता आणि मराठी संस्कृतीशी मिळत्या जुळत्या नेमक्या भावना मराठी कार्ड्स मधून मांडल्या जात असल्याने लोकं आवर्जून मराठी कार्ड्स घेतात. मराठी ग्रीटिंग देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला नेहमीच खूप आनंद मिळतो.मराठी भाषा प्रेमी आजही आहेत आणि उद्याही ते असणार आहेत.आणि म्हणूनच मराठी ग्रीटींग्स आजही आहेत आणि उद्याही असणार आहेत याची आम्हाला खात्री आहे.
*************************************************************************************************************************************
मराठी ग्रीटींग्स बाजारात येण्याकरता श्री. दिलीप जाधव सर वर्षानुवर्ष प्रयत्नशील राहिले. आणि त्यांचे ARCHIES च्या मालकांशी बोलून त्यांना मराठी ग्रीटींग्स बनवण्यास उद्युक्त करणे हे मराठी ग्रीटींग्स मोठ्या प्रमाणावर बाजारात येण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे पाऊल ठरले. आज श्री. जाधव सरांनी मराठी ग्रीटींग्सला मराठी समाजात मानाचे स्थान मिळवून दिलेले आहे. आपल्या सगळ्या मराठी माणसांच्या चेहेऱ्यावर आनंद आणि अभिमान झळकवणाऱ्या श्री. जाधव सरांना शतश: प्रणाम.
संदर्भ: मराठी शुभेच्छापत्र स्पर्धा
आपल्या मातृभाषेतून ग्रीटिंग
आपल्या मातृभाषेतून ग्रीटिंग मिळाल्याचा आनंद लोकांच्या चेहेऱ्यावर दिसतो. >> +७८६ हे होतेच.
चांगली माहिती
चांगली माहिती
आवडल्या गप्पा
आवडल्या गप्पा
खरंच, वाटतं तितकं सोपं नाहीये
खरंच, वाटतं तितकं सोपं नाहीये, खूप मेहनत घेतली आहे त्यांनी! तेही अंधारात उडी घेऊन...
खूप छान मुलाखत.
खूप छान मुलाखत.
जाधव बंधू व महाजन या तिघांचे खूप खूप आभार आणि त्यांचे स्वप्न साकार झाल्याबद्दल अभिनंदन .
Hats off to them!
सगळा उपक्रम आणि गप्पा आवडल्या
सगळा उपक्रम आणि गप्पा आवडल्या.
सुरेख मुलाखत !
सुरेख मुलाखत !
पावला पावलांवर मराठीस अडचणी येत असताना मराठी शुभेच्छापत्रे कुणी रुजवली व व त्याचे कमर्शियलाझेशन कसे केले गेले या बद्दल खुप उत्सुकता होती ! स्टॅण्डवर मराठी शुभेच्छापत्रे पाहणे हा सुखदायक अनुभव आहे !
मा. दिलीप जाधव व टीमला शतशः प्रणाम !