१३ डिसेंबरच्या रात्री १० पासुन १४ डिसेंबरच्या पहाटे ३ वाजेपर्यंत, उल्कावर्षाव होणार आणि जगभरातील कोणत्याही स्थानावरुन तो दिसणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले होते. डिसेंबर मध्ये होणारा हा उल्कावर्षाव तसा नवीन नाही. दरवर्षी याच तारखांना हा उल्कावर्षाव होत असतो. ताशी किमान १०० ते १२० उल्कापात होताना दिसण्याचा अंदाज असतोच. यावर्षी देखील असाच अंदाज होता. यापेक्षा अधिकवेगळेपण यावर्षीच्या उल्का वर्षवाचे होते ते म्हणजे आकाशात चंद्राचा अभाव. चंद्रप्रकाशाचा अभाव म्हणजे तारांगण पाहण्याची सुवर्णसंधीच. आणि त्यातच उल्कावर्षाव म्हणजे ही तर दुधात साखर.
दिवस सुटीचा नव्हता. दिवसभर ऑफीसमध्ये काम करायचे होते. अनेक जणांचे फोन देखील मला आले हे जाणुन घेण्यासाठी की निसर्गशाळेचा काही विशेष प्रोग्राम आहे का या उल्का वर्षावाच्या निमित्ताने. १३ डिसेंबर व १४ डिसेंबर दोन्ही कामाचे दिवस असल्याने, आपण या वर्षी असा विशेष कार्यक्रम आयोजित केला नव्हता.
Camping near Pune - Geminid Meteor Shower
Camping near Pune
संध्याकाळी ऑफीस चे काम उरकुन, हा उल्का वर्षाव पाहण्यासाठी जाण्याचे ठरले. आशिष जोशी सोबत मी आणि आमच्या ब-याच नंतर उद्योजक अजित नाईक आणि पुण्यातील नामवंत डॉ. सुविद्य देखील येणार होते. यावेळी आम्हाला कसलीच घाई नव्हती. पर्यटकांच्या व्यवस्थेची चिंता नव्हती. वेळेचे कसलेही बंधन नव्हते. प्रवास सुरु झाला. घाई असते तेव्हा पुणे बेंगलोर हाय वे पकडुन आम्ही सरळ सरळ कॅम्पसाईट वर पोहोचतो. यावेळी आम्ही वाकड्या वाटेने गेलो. कसलीच घाई नसल्याचे आशिष ला देखील माहीत होते. स्टीयरींग त्याच्या हातात होते. सिंहगड रोड ला, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरी आधी चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. अंदाजे, साडे आठ वाजले असतील त्या वेळी. शास्त्रज्ञांनी दिलेल्या अनुमानानुसार उल्कावर्षाव सुरु होण्यासाठी अजुन बराच अवधी होता. तरीही सहजच, चहा पित असताना, एकदा आकाशाकडे पाहीले. म्हंटल पहाव तरी किती तारे दिसताहेत? पण एक ही तारा दिसला नाही. मी सगळी कडे, आठही दिशांना नीट पाहीले. मला आधी वाटले की, अद्यापही शहरी दिव्यांचा प्रभाव डोळ्यांवर असेल, म्हणुन मी, चष्मा काढुन, एक टक माझी नजर आकाशा कडे स्थिर केली. माझी नजर आता थोडी स्थिरावली होती. डोक्याच्या वर, थोडं पुर्वेला मला एक अंधुक चांदणी हलकेच चमकताना दिसली. आणखी थोड्या वेळाने, मला हे देखील समजले की हा रोहीत (रोहीणी) तारा आहे, यास पाश्चात्य, आधुनिक खगोलींनी अल्डेबरान असे नाव दिले आहे. रोहीणी नक्षत्रामधील. तस पाहता, हा अतिशय प्रकाशमान असा तारा आहे. इतका की त्याच्या तेजामुळेच आपल्याकडी प्राचीन खगोल शास्त्रींनी त्याला रोहीत असे नाव दिले. रोहीत होणे म्हणजे क्रुध्द होऊन लाल होणे. तो इतका तेजस्वी आणि सुस्पष्ट आहे की त्याची लालसर प्रभा देखील आपण नुसत्या डोळ्यांनी पाहु शकतो. पण आज तिथे, नुसताच एक लुकलुकणारा, छोटासा टिंब दिसत होता.
चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. हळु हळु रस्त्याच्या आजुबाजुने असलेल्या इमारती आणि त्यांतील लाईट्स आदींची गर्दी कमी होऊ लागली. तसेच रस्त्यावरील वाहनांची रहदारी देखील कमी होऊ लागली. सिंहगड रस्ता सोडुन आम्ही डावीकडे वळलो. इथुन पुढच्या वीसएक किमीमीटरच्या प्रवासात, मला एक साक्षात्कार झाला. मघाशीच म्हंटल्याप्रमाणे, आशिषला देखील समजले होते की कसलीच घाई नाहीये आज. त्यामुळे त्याच्या गाडी चालवण्यामध्ये ती नसलेली घाई दिसत होती. त्याला रस्ता माहीत नव्हता. कुठे वळण आहे, किंवा वळण आहे की नाही, की रस्ता सरळ आहे, काही म्हणजे काही त्याला माहीत नव्हते. रस्त्तावरची इतर वाहनांची वर्दळ आता संपली होती. समोर अंधाराला दोन तुकड्यांमध्ये कापणारा, आमच्या गाडीचा हेडलाईटचा प्रकाश होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुंना, गुडघाभर वाढलेले, सुकलेले गवत दिसत होते. आमची गाडी इतकी सावकाश जात होती की, त्या गवताच्या शेंड्यावरील, गवताचे बीज सुध्दा डोलताना दिसत होते. गाडीच्या प्रकाशाच्या रेषेत असणा-या झुडपे, आणि आणि सागाच्या झाडांचे कमी अधिक जाडीचे बुंधे. मध्येच एक ससा गाडीला आडवा आला. गाडीच्या प्रकाशाने त्याचे डोळे दिपले, त्याला समजेना काय करावे ते. हेडलाईट कडे एकटक काही क्षण तो पाहत राहीला. तो थांबलेला होता, स्तब्ध होता. आता गाडी सुध्दा थांबली. दोघेही स्तब्ध. आशिष ने हेडलाईट बंद केली. नव्हे गाडीच बंद केली. गाडी बंद केल्यावर समोर दिसणारा रस्ता, गवत, झाड झुड्प आणि तो ससा सगळच नाहीस झाल. अंधारात सगळकाही गडप झाल. जणु अंधाराने त्या सर्वांना गिळुन टाकले. एक अनामिक शांतता तिथे आधीपासुनच होती. सगळे काही मस्त मजेत चाललेले होते. आमच्या गाडीच्या येण्याने ह्या शांततेचा भंग झाला होता हे मला समजले होते एव्हाना. आता त्या अंधाराला डोळे सरावत होते. समोरच्या डोंगराची कड आता दिसु लागली होती. आणि त्या डोंगराच्या वर आकाशात मला एक तारा दिसला. अत्यंत प्रकाशमान, नीट निरखुन पाहील्यास त्यात अनेक रंगाच्या छटा देखील दिसतात. हा अगस्ती असावा बहुतेक. गाडीमध्येच बसुन असल्यामुळे नीटसे समजत नव्हते. आम्ही दोघेही गाडीतुन खाली उतरलो. आणि आश्चर्यकारक रित्या आम्ही स्वतःस, विराट अशा तारांगणा खाली असल्याचे अनुभवले. सिंहगडाच्या वर, आकाशात आग्नेय दिशेला, साधारण ४०-४५ अंश कोनात, मृग नक्षत्र अगदी स्पष्ट दिसले.आणि त्याच्याही वर, मघाशी कसाबसा दिसणारा रोहीणी , अतिशय तेजस्वी, चकाकत होता. सिंहगड रोडवर, साधारण एक तासापुर्वी, अजिबात न दिसणारा हा तारा आणि हे तारांगण आता कसे काय स्पष्ट दिसु लागले?
४-५ मिनिटे, आम्ही तिथेच घालवली. पुन्हा त्या अंधाराला आम्ही विचलीत करणार होतो. पुन्हा गाडीच्या आवाजाने, इथल्या शांततेच्या आणि सौहार्दाचा (हार्मनी) आम्ही भंग करणार होतो. हे करणे आता सक्तीचेच होते. गाडीची घरघर पुन्हा सुर झाली. थंड वारा दोन्ही खिडक्यांतुन गाडीत घुसत होता. आशिष मस्तवाल पणे गाडी चालवत होता. इतका मस्तवाल की, गाडी तो चालवतच नव्हता. गाडीच्या ॲक्सेलेटर वरील पाय त्याने कधीच काढला होता. गाडी स्वतच चालत होती. वेग अंदाजे, ४-५ किमी प्रति तास असा असावा. पाबे खिंडीतुन किंवा सिंहगडावरुन जर कुणी पाहत असेल तर त्यांना एक प्रकाशाचा ठिपका दिसला असता. आणि आणखी नीट पाहीले तर समजले असते की हा ठिपका हळुवार पणे सरकतोय देखील. रस्ता, त्यामधील वळणे, घाट, तीव्र चढ, याविषयी आशिष ला काहीच माहीत नव्हते. मला रस्त्याचे प्रत्येक वळण, प्रत्येक खड्डा अगदी स्पष्ट माहीत आहे. मला ह्या रस्त्याचे पुर्ण ज्ञान आहे. मला हे देखील माहीत आहे की हा रस्ता माझ्या माहीतीतील सर्वात अनइंजिनीयर्ड रोड आहे. हा रस्ता बनवते वेळी बहुधा कसल्याच नियमांचा विचार केलेला नसेल. अतिशय तीव्र चढ आणि उतार, तो ही वळणाशिवाय. मला ह्या रस्त्याविषयी असलेल्या या सर्व ज्ञानामुळेच मी मात्र आशिषप्रमाणे प्रवासाचा अनुभव घेण्यात कमी पडत होतो. मला गंतव्य माहीत होते, आशिष ला ते माहीत नव्हते. मला धोके माहीत होते, आशिष ला ते माहीत नव्हते. त्यामुळे जितका आनंद तो ह्या प्रवासाचा घेत होता तितका मी घेऊ शकत नव्हतो. कित्येकदा आपल्या आयुष्यात देखील आपण, काय मिळवायचय, कुठे जायचय, कोणत ध्येय गाठायचय, ह्या नादात आपण जीवन प्रवासाची मजा घ्यायचे विसरुन जात असतो. आणि जर आपण काही काळ हे ध्येय वगैरे विसरु शकलो तर, प्रवासाची मजा घेता येईल यात संशय नाही. नेमका हाच साक्षात्कार मला ह्या प्रवासात झाला.
तीव्र अशा चढावर गाडी, पहील्या गीयर मध्ये, आपोआपच वर वर चढत होती. शुन्य ॲक्सेलीरेट असताना. सगळाच्या सगळा पाबे घाट आमची गाडी असाच चढली. खिंडीत पोहोचुन, आणखी एक ब्रेक आम्ही घेतला. गाडीचे लाईट्स बंद करुन पुन्हा रस्त्यावर आलो. समोर, तोरणा आणि राजगडाच्या पर्वत रांगांची कड(आऊटलाईन) दिसत होती. आणि आकाशात मूग नक्षत्र आणखी थोडे वर सरकले होते. त्यातील, रेड जायंट देखील स्पष्ट दिसत होता. मृगनक्षत्राच्या खाली थोडे डावीकडे पुनर्वसु देखील आता स्पष्ट दिसु लागले होते. अजुनही गुंजवणी नदीच्या खो-यात, नदीच्या काठावरील अनेक गावे, त्यातील स्ट्रीट लाईटस मुळे, तिथे आहेत असे समजत होते. आमच्या मागे म्हणजे ईशान्येला, क्षितिजा ला लागुन, पुणे शहरातील प्रकाश प्रदुषणाचा थर अगदी पुनर्वसु च्या उंचीपर्यंत दिसत होता. विकास, प्रगती, सुरक्षेच्या च्या नावाखाली आपण म्हणजे मनुष्याने या भुमातेच्या वातावरणात वायु प्रदुषणासोबतच प्रकाशप्रदुषण देखील मर्यादेच्या बाहेर केले आहे. व लख लख चंदेरी प्रकाश माणसाला इतका सवयीचा झाला आहे की, त्यास हे प्रदुषण आहे असे मुळी वाटतच नाही. इतके आपण निसर्गापासुन तुटले आहोत. गुंजवणीच्या नदीच्या सुपीक खो-यात पुंजक्या पुंजक्याने असलेल्या गावातील ह्या लाईट्स, देखील कमी प्रमाणात का होईना प्रकाश प्रदुषण करतातच. इतक्यात मला आकाशात अगदी माथ्यावर एकापाठोपाठ एक अशा तीन उल्का पडताना दिसल्या. आकाशातील महान अशा एका लाईव्ह कन्सर्ट ला सुरुवात झालेली होती. आता वेध लागले होते कॅम्पसाईट वर पोहोचायचे. कारण तिथल्या इतका अंधार अजुन कुठेच नाही हे मला माहीत होत.
पाबे खिंडीतुन पुढे तीव्र उताराने, मंद गती पुन्हा आमचा प्रवास सुरु झाला. वेल्ह्यात पोहोचुन आम्ही जेवण केले. प्रकाश प्रदुषण मागे टाकत आम्ही भट्टी वागद-याच्या मार्गे कॅम्पसाईटवर पोहोचलो. कॅम्पसाईट पासली गावात आहे. पासली गावठाणाच्या पुढे गेल्यावर उजवी कडे नदीला लागुनच साडेतीन एकरामध्ये आमची कॅम्पसाईट आहे. गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश जसा संपला, तसा मला हवाहवासा काळोख क्षणार्धात दाटुन आला. सर्वत्र काळोख. जवळच्या टॉर्चचा उपयोग करावास वाटतच नव्हता.पण चटई बाहेर काढेपर्यंत तरी टॉर्च वापरावी लागणारच होती. चटई अंथरुन आम्ही दोघे ही पाठ टेकवुन जमीनीवर आडवे झालो. आणि सुरु झाला तो अनुपम्य सोहळा. एव्हाना साडे अकरा वाजले होते. थोड्याच वेळात अजित आणि सुविद्य देखील साईटवर पोहोचते झाले. चौघांनी सर्वप्रथम तंबु ठोकले. शेकोटी पेटवायची इच्छा झालीच होती, कारण थंडी जबरदस्त होती. पण शेकोटीच्या प्रकाशाने देखील आमच्या उल्का वर्षावाच्या त्या सोहळ्याला नजर लागु नये म्हणुन आम्ही शेकोटीचा प्रोग्राम थोडा पुढे ढकलला.
पुन्हा एकदा आम्ही चौघे ही चटयांवर आडवे पडुन, आकाश न्याहाळत पडलो. संपुर्ण आकाश, म्हणजे अर्धगोल आता आमच्या दृष्टीक्षेपात होता. उत्तरेला, शर्मिष्टा नक्षत्र अगदी ध्रुव ता-याच्या माथ्यावर होते. सप्तर्षी अद्याप उगवायचे होते. अश्विनी हळु हळु मावळतीला, म्हणजे उत्तर-पश्चिम दिशेला सरकत होते. त्यापाठोपाठ भरणी, कृत्त्तिका, रोहीणी, मृग,पुनर्वसु, मघा स्पष्ट दिसत होते. तारे पडण्याचा वेग वाढत होता. सुरुवातीस, एक तारा पडताना दिसला की आमच्या पैकी प्रत्येक जण “अरे तो बघ तिकडे पडला”, पुढच्या सेकंदाला दुसरा कुणी तरी दुसरीकडेचे बोट करुन पुन्हा तेच बोलायचा. असा साधारण पणे एखादा तास झाला असेल. आणि अचानक मला फायरबॉल दिसला. फायरबॉल म्हणजे आकारमानाने जरा मोठी उल्का, की जी पृथ्वीच्या वातावरणात खुप आत पर्यंत घुसते व खाली पडताना, वातावरणाशी घर्षणाने जळते. व जळताना विविध रंगांच्या छटा त्या उल्केभोवती दिसतात. मुख्यत्वेकरुन निळ्या रंगांच्या ज्वाला सदृष्य आवरणामध्ये हे फायरबॉल्स दिसतात. मला जेव्हा फायरबॉल दिसला तेव्हा मी त्या दिशेला बोट करुन इतरांना दाखवायचा प्रयत्न केला, पण तसा मी दाखवेपर्यंत क्वचितच तो इतर कुणाला दिसला असेल. थोड्या वेळाने सर्वांनी फायरबॉल्स पडताना पाहीले. सुरुवातीस एक एक उल्का पडताना पाहुन आम्ही एकमेकांना दखवण्याचा प्रयत्न करीत होतो. नंतर नंतर उल्का, फायरबॉल्स इतके पडताना दिसत की आता आम्ही एक अवाक्षर ही न बोलता तब्बल तीन तास, पहाटे तीन वाजे पर्यंत तसेच आकाशाकडे पाहत राहिलो. उल्का पात सतत होत होत. कधी पुर्वेकडुन, कधी पश्चिमेकडुन, कधी डावीकडुन तर कधी उजवीकडुन. कधी अगदी आमच्या डोळ्यासमोर, मध्य आकाशातुन. एखाद दोन उल्का पडताना पाहे पर्यंत, दुसरीकडे आणखी उल्का वर्षाव होत होता. साफ काळोख, शुन्य प्रकाश प्रदुषण आणि शुन्य वायु प्रदुषण यामुळे नितळ स्वच्छ नजारा आकाशाचा आमच्या पुढे होता. द ग्रेट स्काय शो एव्हर.
आकाशामध्ये नजर स्थिर होतच नव्हती. अगदी झालीच, तर आणखी विलक्षण दृश्य दिसे. ते म्हणजे भव्य, अत्यंत खोल, अंतहीन असे अंतरीक्ष. त्या अंतरीक्षामध्ये असंख्य तारे, तारकासमुह दिसले. मी देखील एरवी कॅम्पींगला पर्यटक असताना, एवढा निवांत कधीच नसतो. नेहमी आलेल्या पाहुण्यांना निसर्गाचा, पर्यटनाचा उत्तम अनुभव कसा देता येईल याच धावपळीमध्ये असल्याने, मुद्दामहुन आकाशाकडे पाहत बसण्याचे येवढ्यात तरी झालेले नव्हते. अत्यंत धुसर असे दिसणारे, मघा नक्षत्र देखील आम्ही स्पष्ट पाहु शकत होतो. आकाशाच्या एका भागात दिसणारे काही तारे आपल्याला दिसताना कमी अधिक प्रमाणात प्रकाशमान असतात. परंतु त्यांचे पृथ्वीपासुन चे अंतर देखील कमी जास्त असु शकते, याचा अनुभव, नुसत्या डोळ्यांना त्या रात्री आला. आता पहाटेचे दोन वाजले होते. उत्तरेला शर्मिष्टाचा सर्वात खालचा तारा, क्षितिजाला टेकला. शर्मिष्टाच्या समोर, त्याच पातळीवर, क्षितिजाच्या थोडे वर ध्रुव तारा दिसत होता आणि, त्याच्या उजवीकडे सप्तर्षीचा उगम आता झालेला होता. एकाच वेळी शर्मिष्टा आणि सप्तर्षी आकाशात पुर्ण पाहता येणे हा देखील एक नयमरम्य सोहळाच होता. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहीणी, मृगनक्षत्र इत्यादी आता उलटे दिसायला लागले होते. मावळताना ही सर्व नक्षत्रे, उलटी दिसतात. तर पुर्वेकडे विंचु डोके वर काढु लागला होता.पहाटेचे तीन वाजुन गेले होते.
उल्का वर्षाव अजुन ही सुरुच होता. दुस-या दिवशी ऑफीसची कामे असल्याने थोडा वेळ तरी आराम करणे गरजेचे होते. आकाश , आकाशातील तारे तारकासमुह हे खुप अफाट आहे. हे आकाश असे पाहिल्याने आपणास आपल्या असण्याचा अहंकार राहणार नाही. या विराट अशा ब्रम्हांडाच्या पसा-यात आपले अस्तित्व ते काय? अगदी क्षुल्लक, नगण्य, कःपदार्थ ! ब्रम्हांडाच्या ह्या योजनेमध्ये माझी, मी हेमंत ववले या नावाने जी ओळख आहे, त्या माझी नक्की काय भुमिका असेल? माझ्या असण्याने किंवा नसण्याने खरच का ह्या अफाट, भव्य अशा योजनेमध्ये काही फरक पडत असेल? माणसाने निर्माण केलेल्या परीभाषेच्या पलीकडे, शब्दांच्या कह्यात न येणारे, आपल्या संवेदनांच्या क्षेत्रात न येणा-या, सतत गतिमान असणा-या ह्या ब्रम्हांडाकडे पाहुन असंख्य प्रश्न निर्माण होतात. कुतुहल जागे होते. एक अनामिक शांतता अनुभावस येते. एक हवीहवीशी वाटणारी अगतिकता अनुभवास येते. या अंतहीन अशा भव्य ब्रम्हांडाची महानता अनुभवास येते तसेच माझ्या “मी” ची क्षुद्रता देखील अनुभवास येते.
असे वेगवेगळे अनुभव, भाव भावना मनात साठवत, दिसणारे तारांगण डोळ्यात साठवत आम्ही पहाटे झोपण्यासाठी टेंट मध्ये गेलो.
हेमंत ववले
निसर्गशाळा, पुणे
अप्रतिम अनुभव आणि वर्णन
अप्रतिम अनुभव आणि वर्णन दे़हिल
वाचताना आधी वाटत होते फोटो
वाचताना आधी वाटत होते फोटो हवे होते. पण नाही टाकलेत हे फार बरे केलेत. उल्कावर्षाव झालाय लिहण्यात. चित्रे उभी राहत होती एकेक. अफलातून!
विलक्षण अनुभव!
विलक्षण अनुभव!
विलक्षण लेखण मी वाचाताना अगदी
विलक्षण लेखन मी वाचाताना अगदी तुमच्या सोबत गाडीत होतो असे जाणवले.. जणू मी देखील तिथे चटईवर पाठ टेकून पडलो आणि उल्का वर्षाव अनुभवला!
सुंदर अनुभवाचे तितकेच सुरेख,
सुंदर अनुभवाचे तितकेच सुरेख, चित्रदर्शी वर्णन!
वा, सुंदर अनुभव! हेवा वाटला
वा, सुंदर अनुभव! हेवा वाटला अगदी तुमचा.
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
फार छान.
फार छान.
ढगाळ वातावरणामुळे आमच्याकडे काही पाहता आले नाही. शिवाय आधी पहाटे चारची वेळ दिली, त्यातही बराच फरक पडल्याचे नंतर कळले.
याचे व्हिडीओ चित्रीकरण करता
याचे व्हिडीओ चित्रीकरण करता आले असते तर फार सुंदर दिसले असते
आहाहा! वर्णन एवढं छान तर
आहाहा! वर्णन एवढं छान तर प्रत्यक्षात बघायचा अनुभव कसा असेल...
अप्रतिम अनुभव !!!
अप्रतिम अनुभव !!!
आणि अशी पटापट नक्षत्रं ओळखता येणं म्हणजे ग्रेट. हे तारकापुंज अख्खेच्या अख्खे त्यांच्या सदस्य ताऱ्यांची रांगोळी काय माहित किती वर्षे जशीच्या तशी सांभाळून आहेत!!! जरा म्हणून फिस्कटत नाही! म्हणून तर पिढ्यानपिढ्या त्यांना ओळखू शकतायत.
तुमचा अनुभव वाचताना राम गणेश गडकरींची खालील रचना आठवत राहिली ....
नाचत ना गगनात नाथा
तारांची बरसात नाथा
आणिक होती माणिक मोती
वरतुनी राजस रात नाथा
नाव उलटली नाव हरपली
चंदेरी दरियात नाथा
तीही वरची देवाघरची
दौलत लोक पाहात नाथा
मस्त अनुभव, मस्त लेख !
मस्त अनुभव, मस्त लेख !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याचे व्हिडिओशूट नाही का करता येत.. आयुष्यात कधीच पाहिले नाही हे.. फक्त पिक्चरमध्येच टूटता तारा, मांग लो आंख बंद कर के जो मांगना है
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
प्रदिपके आणि ऋन्मेष - याचे व्होडीयो शुटींग जरा जास्तच अवघड काम आहे. त्यासाठी खुपच उच्च दर्जाचे आणि उच्च तंत्राची साधन आवश्यक असतात. फोटो काढता येतात. पण फोटो काढणे देखील जिकीरीचे काम आहे.