'शहाणं ग लेकरू , माझं वेल्हाळ पाखरूं'
असं म्हणणारी आजी आता राहीली नाही
आणि ते शब्द सुध्दा परत काही कानावर
पडले नाही....
आईची नोकरी आणि बाबांची फिरती
कौतुकाच्या बोलांना कशी येणार भरती ?
आजीच असायची घरी , मला धरायची उरी
आणि म्हणायची ... 'शहाणं ग लेकरू , माझं वेल्हाळ पाखरूं'
खुप करायची लाड , खाऊचं द्यायची घबाड
किताही घाला दंगा , तिचा माझ्या भोवतीच पिंगा
माझ्या सगळ्या चुका माफ , वरती कौतुकाची थाप ...
काय तर 'शहाणं ग लेकरू , माझं वेल्हाळ पाखरूं'
आजीकडे होती कुठली तरी जादु,
बरोब्बर मनातलं ओळखुन म्हणायची ,
भोवरा शोधतोयस ना दादु ? ....
ओठी हासु फुलायचं , तस्सच धावत आजीला बिलगुन जायच.... आजी गोंजारत म्हणायची
'शहाणं ग लेकरू , माझं वेल्हाळ पाखरूं'
आजीचा तो थरथरता , पण मायेचा हात
डोक्यावरून फिरताच , राजाचं बनायचो घरात
तीच आयुष्य म्हणजे मीच होतो असं काहीस म्हणायची...
कधीतरी आजोबांच्या फोटोपुढे रडायची....
रडता रडता स्वत:शीच बोलायची...
' मला केलत म्हातारी, स्वत: होऊन आलात मुल
तुमच्या नातु रूपाची ,मला पाडलीत भुल....
तुम्ही असेच नाचवायचात , माझ्यातच आईला शोधायचात..... '
आजी मग भानावर यायची... डोळे टिपून मला जवळ घ्यायची आणि लाड करत म्हणायची
'शहाणं ग लेकरू , माझं वेल्हाळ पाखरूं'
......'शहाणं ग लेकरू , माझं वेल्हाळ पाखरूं'
वा, काय उत्तम लिहिलंय!
वा, काय उत्तम लिहिलंय! सहजसुंदर सोपी भाषा. शेवटच्या कडव्यात तर काटा आला अंगावर.
आजीची आठवण करून दिलीत.
मस्त आहे.
मस्त आहे.
मधु-रजनी , गबाळ्या धन्यवाद
मधु-रजनी , गबाळ्या धन्यवाद !