दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-३ (अंतिम)

Submitted by अनया on 7 December, 2017 - 16:59

कुरुंगनी ते सेंट्रल स्टेशन

दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-१ https://www.maayboli.com/node/64142
दक्षिणेतल्या डोंगरवाटा (कोडाईकॅनाल - मुन्नार ट्रेक) भाग-२ https://www.maayboli.com/node/64671

ट्रेकला यायचं ठरवणं, तयारी ह्या सगळ्यातून पार पडत इथे आलो. ही आत्ता तर सुरवात झाली, असं म्हणता म्हणता अर्धा ट्रेक संपला सुद्धा. आता फक्त आज आणि उद्या. मग परत जीप, बस ट्रेन आणि घरी परत.

आजचा दिवस सगळ्यात कठीण आहे, असं सगळे सांगत होते. त्यामुळे थोडी काळजी वाटत होतीच. त्यात पावसाची लक्षणं दिसत होती. सॅकमधलं सामान प्लास्टिक पिशव्यांमध्ये असल्याने ते भिजायची भीती नव्हती. सर्व मंडळींनी रेनकोट चढवले. रेनकोट घालून चालताना खूप घाम येतो. पावसापासून बचाव करावा, तर घामेघूम होऊन भिजायला होतच.

नारळी-पोफळीच्या बागा बघत सगळे चालत होते. थोड्याच वेळात जंगलात शिरलो. आता जरा कठीण चढ सुरू झाला. श्वासाचा वेग वाढला आणि चालायचा कमी झाला. तरुण आणि तडफदार मंडळी आम्हाला न थांबता चालत राहा, असे सल्ले न कंटाळता देत होती. ह्या सगळ्यांना सात वेळा पळत पळत डोंगर चढायला लावला पाहिजे, मग कळेल; असे दुष्ट विचार मनात येत होते. पण बोलणं शक्य नसल्यामुळे मुगासारखे हे विचार गिळून टाकले.

20161220073130_IMG_1961.JPG

सगळ्या जलद गाड्यांना पुढे जाऊ दिल्यानंतर आमच्या धीम्या गाड्या हळूहळू सरकायला लागल्या. एकेका पावलाने प्रगती चलू होती. वेग कमी असल्याने आसपास बघायला भरपूर वेळ मिळत होता. तामिळनाडू, केरळ ह्या दक्षिणेकडच्या राज्यांवर वर्षाराणीचा वरदहस्त आहे. मोसमी पाऊस इथे वर्षातून दोन वेळा येतो. त्यामुळे जिथे पाहू, तिथे हिरव्या रंगाच्या निरनिराळ्या छटा दिसत होत्या. आपल्याला 'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा' ची सवय. इथे हा हिरवा रंग बघून डोळे तृप्त होत होते.

20161220103834_IMG_1976.JPGgreen hills.JPG

आज पावसाचा रंग असल्याने तर खालपर्यंत उतरत येणारे ढग, धुक्याचीही मेजवानी होती. प्रश्न फक्त एकच होता, तो म्हणजे चढाचा रस्ता. बराच वेळ असं चालल्यावर जेवायची जागा आली. एका प्रचंड मोठ्या वटवृक्षाच्या आडोशाने सगळे जेवायला बसले. 'अरेवा, आज तुमच्याकडेही बटाटा भाजी का? आमच्याकडेही तीच आहे!' इत्यादी प्रत्येक ट्रेकमध्ये होणारे विनोद इथेही झालेच. जेवण झाल्यावर परत पाऊस पडायला लागला. त्यामुळे सगळे पुन्हा रेनकोट चढवून चालायला सज्ज झाले.

आता परत चढाचाच रस्ता होता. पण सकाळचा खूपच सोपा वाटेल, असा भयंकर होता. अगदी खडा चढ होता. हात, पाय, आजूबाजूची झाडं-झुडपं, काठी, सहप्रवाशांची मदत इतकी सगळी आयुधं वापरून हळूहळू पुढे जाऊ लागलो. इथे एक वेगळंच आश्चर्य आमची वाट बघत होतं. ह्या संपूर्ण डोंगरावर जंगली गवती चहा होता. त्याचा वास वातावरणात भरून राहिला होता. प्रत्येक श्वासाला त्या वासाने मजा येत होती.

सव्वा तास आम्ही त्या भयानक चढ असलेल्या रस्त्याने चढत होतो. धाप लागत होती. पाठीवरच ओझं जड होऊन खांद्यांना काचांत होतं. पावसाने घसरड्या झालेल्या रस्त्यावरून पाय घसरून आपण दरीत पडलो तर? अशी भीतीही वाटत होती. काही जागा तर इतक्या अवघड होत्या, की गाईड दादांना आधी आमच्या सॅक आणि नंतर आम्ही, अश्या फेऱ्या करून मुद्देमाल जागेवर पोचवावा लागला.

IMG-20161224-WA0018.jpg

हा भयानक चढाचा रस्ता संपल्यावरही पुढे चालणं शिल्लक होतं. पण आधीच्या मानाने सोपा रस्ता होता. गवती चहा, पाऊस, जंगली झाडे आणि फुले ह्याच्या मिश्रणाने तयार झालेला वास गुंगी आणत होता. तासभर चालल्यावर कॉफीच्या बागा दिसायला लागल्या. चाणाक्षपणे आम्ही गाव / वस्ती / कँप जवळ आल्याचे ओळखले.

20161221113858_IMG_2053 (1).JPG

पाऊस आणि घामाच्या धारांनी चिंब भिजायला झालं होतं. थंडी वाजत होती. कोरडे कपडे चढवल्यावर जीवात जीव आला. कँपलीडर सरांनी चहा तयारच ठेवला होता. स्वर्गातून डायरेक्ट पृथ्वीवर आलेले अमृत प्यायला मिळाल्यावर होईल, अशा आनंदाने सगळे चहा पीत होते. मी चहा पीत नसल्याने मी कॉफीच्या झाडांकडे पाहून समाधान मानले!

पावसामुळे आज कँपफायर शक्य नव्हते. मग आम्ही आमच्या खोलीत मजा केली. एव्हाना बरोबरच्या लोकांशी ओळख झाली होती. मग सतत आर्मी प्रिंटचे कपडे घालणाऱ्या दोघांच 'कमांडो', अजून एकाच त्याच्या शरीरयष्टीमुळे 'थंगबली' असं नामकरण झालं आणि त्यावरून अमर्याद खिदळूनही झालं. ग्रुपमधल्या एक मुलगी शास्त्रीय संगीत शिकणारी होती. तिने खूप छान गाणी ऐकवली. इतक्या करमणुकीनंतर दिवसभराचा शीण निघून गेला. उद्या ट्रेक संपणार. रात्री आपण कोचीच्या हॉटेलमधल्या स्वच्छ बेडवर झोपणार, अशी स्वप्न पडत होती!

सेंट्रल स्टेशन - टॉप स्टेशन - मुन्नार - कोची - पुणे

आज ट्रेकचा शेवटचा दिवस. शेवटच्या दिवशी नेहमी मिश्र भावना असतात. आपल्या शहरी, सुखसोयींच्या जगात जायचं, घरच्या उबदार वातावरणात परतायचं म्हणून आनंद होत असतो. पण ही निखळ मजा संपणार म्हणून वाईटही वाटतं. बरोबरच्या लोकांशी जुळलेल्या मैत्रीचा बंध हळूहळू विरतो. सुरवातीला प्रत्यक्ष भेटी, फोन, सोशल मिडीया आणि नंतर काही नाही. हे अपरिहार्य असत. पण तो निरोपाचा क्षण त्रासदायक असतोच.

आज मुन्नार पर्यंत चालायचं. नंतर जीपने मुन्नार स्थलदर्शन असा दिनक्रम होता. मात्र आम्हाला घाई असल्याने आम्ही स्थलदर्शन टाळून डायरेक्ट कँप गाठणार होतो. ट्रेक पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेणे, आम्ही कोडाईकॅनालला जमा केलेलं सामान हातात पडलं की बसने थेट कोची गाठायचं होतं.

कालच्या पावसानंतर आजचा दिवस मात्र छान सोनेरी उन्हाचा होता. रस्ता ट्रेकला आदर्श म्हणता येईल, असा होता. पुरेसा रुंद, वर्दळ अजिबात नाही. हलकासा न दमवणारा चढ. आजूबाजूला छान झाडी. नजरेला सुखावणार निसर्गसौंदर्य. गवतीचहाचा भन्नाट वास. मधूनमधून लागणारी चिमुकली गावं. एखाद्या निसर्गचित्रात शोभून दिसेल, अशी झाडाफुलांची, रंगांची उधळण.

20161221114611_IMG_2055_0.JPGflowers_original (1).jpg

मी आणि माझी एक मैत्रीण बरोबर चालत होतो. बहुतेक सगळे पुढे निघून गेले होते. त्यामुळे सगळीकडे अगदी शांत होतं. अशी शांतता आता परत मिळणार नाही, म्हणून ती कानात-मनात साठवून घेत होतो. तीनेक तास चालल्यावर गाड्यांचे आवाज ऐकू येऊ लागले. ट्रेक संपला. सगळे आमची वाट बघतच होते. सगळ्यात शेवटी पोचायचा मान मिळवल्याबद्दल आमचं टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं. सगळ्यांचा निरोप घेतला. ह्या मंडळींचा ऋणानुबंध इतकाच. आता पुन्हा भेट होईल, नाही होईल कोण जाणे?

आम्ही आठ जण डायरेक्ट मुन्नारला जाणाऱ्या जीपमध्ये बसलो. पुन्हा एकदा टूरिस्टी, मधुचंद्रीय मंडळी दिसायला लागली आणि आपण शहरी संस्कृतीकडे चाललोय ह्याची जाणीव झाली. कँपवर पोचल्यावर भराभर पुढच्या कामांना लागलो. ट्रेक संपल्यावर काही फॉर्म भरावे लागतात. चेक-आऊट फॉर्म, फीडबॅक फॉर्म वगैरे. त्यानंतरच ट्रेक पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र मिळत. सरकारी नोकरीत असलेल्यांना ह्या ट्रेकसाठी विशेष रजा मिळू शकते, त्यासाठी ते आवश्यक असत.

हे झाल्यावर आमचं जमा केलेलं सामान मिळालं. कँपलीडर सरांचे आम्ही त्यांच्या सहकार्याबद्दल मनापासून आभार मानले. मुन्नार-कोची बसमध्ये आमचं प्रचंड सामान चढवलं आणि कोचीच्या रस्त्याला लागलो. बस 'हात दाखवा गाडी थांबवा' तत्त्वावर आधारीत होती. त्यामुळे घरोघरी थांबत होती. पण आम्ही सगळेच इतके थकलो होतो की बराचसा वेळ झोपलोच होतो. लहान-मोठी गावं मागे जात होती. नाताळ आणि नव्या वर्षांसाठी सज्ज झालेली, दिव्यांच्या माळा आणि आकाशकंदिलांनी नटलेली घर-दुकानं बघताना उत्सवी, उत्साही वाटत होतं.

कोचीच्या हॉटेलमधले कर्मचारी आमचे आणि आमच्या सामानाचे अवतार बघून नक्कीच हादरले असतील. बहुतेक वेळा शेवटच्या कँपवर जरा बरे कपडे घालायला, आवरायला वेळ मिळतो. आज इतके धावपळ झाली, की हे काही जमलंच नाही. सकाळी चालताना जे कपडे घातले होते, तेच कपडे अंगावर होते. केस पसरलेले, चेहरे सुकलेले!

खोलीतल्या स्वच्छ नॅपकीन, बिछान्यांना हात लावायची हिंमत होईना. अंघोळी करून आम्ही जेवायला गेलो. आज आपलं ताट, वाटी धुवायला लागणार नाही हे सुख वाटत होतं! पोटभर सुग्रास जेवण झाल्यावर ट्रेक संपला, व्यवस्थित पार पडला, ह्या आनंदात आइसक्रीमही खाल्लं. जड पोटाने आणि हलक्या मनाने तरंगत तरंगत खोलीत परत आलो.

उद्या परतीचा प्रवास करायचा होता. काही तासांमध्ये घरी जायचं होतं. घरची ओढ जाणवत होतीच. पण मैत्रिणीबरोबरची फाटाफूट होणार होती, ती नकोशी वाटत होती. दिल्लीची मैत्रीण सकाळीच विमानाने आणि आम्ही उरलेले सात जण दुपारच्या ट्रेनने पुण्याला जाणार होतो.

समारोप

ट्रेक किंवा पदभ्रमणाचे दिवस हे शहरी, सुखवस्तू लोकांना कठीणच जातात. राहण्याच्या जागा, जेवण्याची सोय, प्रसाधनगृहे ही सोय जेमतेमच असते. चैनीचा, आरामाचा लवलेशही त्यात नसतो. रोज बारा-पंधरा किलोमीटरचे चढ-उताराचे अवघड रस्ते चालून पाय दुखतात, सॅकच्या ओझ्याने खांदे भरून येतात, पावलाला झालेले ब्लिस्टर्स टोचतात. वेगवेगळ्या घरांमधून आपापल्या वावरण्याच्या, स्वच्छतेच्या सवयी घेऊन आलेल्या मंडळींबरोबर जुळवून घ्यावं लागतं. मग प्रश्न असा येतो, की इतक्या गैरसोयी सोसून ट्रेकिंगला जाणारे आपला सुखाचा जीव दुःखात का घालतात? असं कोणाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको. कारण ते खरंच आहे.

पण जे लोकं ट्रेकिंगला जातात, त्यांना मात्र इतर कुठल्याही आरामदायी प्रवासांपेक्षा ट्रेकमध्येच जास्त मजा येते ह्याबद्दल ठाम असतात. त्या मजेची जातकुळी मात्र पूर्णपणे वेगळी असते. इथे पोशाखीपणाला पूर्ण सुट्टी मिळते. त्याबरोबरच इलेक्ट्रॉनिक विश्वालाही. मोबाईल, इंटरनेट, टी.व्ही. ह्यातलं का_ही_ही नसतं. भोवताली असतात माणसं आणि अस्पर्श्य असा निसर्ग. कँपच्या जागा बहुतेक वेळा गर्दीपासून लांब असतात. सकाळीची जाग गाड्यांच्या, गाण्यांच्या आवाजाने न येता, शांततेच्या आवाजाने, फार तर पक्ष्यांच्या सुरेल शीळेने येते.

ट्रेकहून येताना आणल्या जातात त्या आठवणी. एखाद्या ट्रेकमधली नदीच्या आवाजाची आठवण, एखाद्या ट्रेकमध्ये ऐकलेलं पहाडी गाणं. ह्या ट्रेकची माझी आठवण आहे गवती चहाच्या वासाची. डोंगरच्या डोंगर गवती चहा. आता कुठेही अगदी लहानशा कुंडीतही गवती चहा बघितला, की माझ्या डोळ्यासमोर ते डोंगर येतील आणि त्याबरोबर बाकीही सगळं आठवेल. बरोबरचे लोकं, त्यांच्याबरोबरचे हास्यविनोद, लहानशा तंबूत केलेल्या गप्पाटप्पा. सगळंच.

खूप चालून आल्यावर पायाचे तुकडे पडलेले असताना '*** कँपवर तुमचं स्वागत' असा बोर्ड दिसल्यावर जे 'हुश्श' होतं, ते अमूल्य असतं. असे असंख्य अमूल्य क्षण आपल्या झोळीत ह्या दिवसात पडतात. परत आल्यावर पुन्हा आपलं नेहमीच आयुष्य सुरू होतच. कामधंदा, स्वैपाकपाणी, रुपये-पैसे. ते काही बदलत नाही आणि तशी गरजही नसते. पण त्याची गोडी वाढते, ती आनंदाने आपलं मन भरून उतू जात असत, त्यामुळे. लहान-सहान कुरकुरीला आता मनात जागाच उरत नाही.

ह्या ट्रेकला आमचा आठ जणांचा ग्रुप होता. बॅच पन्नास जणांची होती. त्यामुळे ओळखीची कंपनी तर होतीच, पण त्या बरोबर नवनवीन लोकांशी ओळखी करून घ्यायची संधीही होती. घरून मात्र मी एकटीच गेले होते. असं एकट्याने ट्रेकला जायची ही काही माझी पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही कितीतरी वेळा एकटी गेले होते आणि मला खात्री आहे, की पुढेही जाईन.

ट्रेकच्या संदर्भात मला ज्या शंका विचारल्या जातात, त्यात 'एकटीच जाणार का?' हा प्रश्न बहुमताने निवडून येईल. नवरा किंवा मुलगा बरोबर असले, तर छान वाटतच. पण मला एकटीने जायलाही आवडतं. आता कामाच्या निमित्ताने कितीतरी स्त्रिया एकट्याने प्रवास करतात. पण सुट्टीसाठी, मजा करायला जाताना मात्र बऱ्याच जाणीन थोडंसं अपराधी वाटतं. 'तू नसताना मग स्वैपाक / घरातील ज्येष्ठ नागरिक / मुले हे सगळं कोण करणार?' असे प्रश्न त्या अपराधीपणाला अजून वाढवतात.

एकट्याने सुट्टीला जायचं, म्हणजे आपल्या घरच्या / बाहेरच्या कामांची ओळ तर लावावी लागतेच. आपल्या जबाबदाऱ्या थोडे दिवस बाजूला ठेवायच्या असतात, टाळायच्या नसतात, बेजबाबदार नसतं व्हायचं. माझा अनुभव असा आहे, की आपण जर हे सगळं नीट समजावून सांगितलं, तर फार काही प्रश्न येत नाही. घरची मंडळी आपली ओढ समजून घेऊन व्यवस्थित सहकार्य करतात.

आपण रोज जी कामं रोज बिनबोभाट करतो, ती कुटुंबातल्या इतर सदस्यांना करावी लागली, की त्यांना त्या कामांची जाणीव होते आणि त्यातली थोडी (तरी) त्यांच्या अंगावर ढकलता येतात. शिवाय ह्या जबाबदाऱ्या फक्त मीच सांभाळू शकते, माझ्याशिवाय काही म्हणजे काही होणार नाही, हा समज आपण करून घेतलेला असतो, त्याला धक्का बसतो.

माझ्या मनासारखं मला वागता येत नाही, ह्या विचारात सदैव खंतावत जगणाऱ्या स्त्रीपेक्षा जमेल तेव्हा स्वतःसाठी वेळ काढणारी, आपलं स्वतंत्र विश्व असलेली आनंदी, समाधानी स्त्री कुटुंबाला जास्त हवीशी वाटते. कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांच्या आवडीनिवडी एकसारख्या नसतात. त्यामुळे एकमेकांच्या आवडींचा सन्मान करायला हवा, हे मुलांना कळायला लागतं. 'आई' ला गृहीत न धरता, तिच्याकडे एक माणूस म्हणून सगळेच बघायला लागतात. आपल्या आवडी-निवडी मोकळेपणाने सांगायला लागतात. आपणच स्वतःला महत्त्व दिलं नाही, तर बाकीचे देतील ही अपेक्षा करणं चूक नाही का? दुसऱ्यावर अन्याय करू नये, पण स्वतःवर कशाला करायचा?

एकट्याने प्रवास करताना अनिश्चिततेचा सामना करावा लागतो, अडचणी आल्या तर आपल्यालाच त्यातून मार्ग काढावा लागतो. आपण अनोळखी लोकांशी संवाद साधायला लागतो. मदत करायलाही लागतो आणि कमीपणा वाटून न घेता मदत स्वीकारायलाही लागतो. आपल्या हिमतीवर आपली मुक्कामाची जागा गाठली, की मिळणारा आत्मविश्वास आपल्या व्यक्तिमत्त्वात किती बदल घडवून आणतो, हे स्वतःच अनुभवायला हवं.
ही एकटेपणाची मजा घ्यायला ट्रेकिंगलाच जायला हवं असं काही नाही. सिनेमा - नाटक बघायला जाणे, गाण्याच्या कार्यक्रमाला जाणे, गेला बाजार बाजारात मनमुराद फिरणे ह्यातही खूप मजा येते. विशेषतः बाजारात फिरताना 'काही घ्यायचं नसेल, तर कशाला उगीच फिरायचं?' असे अरसिक उद्गार काढणारी व्यक्ती बरोबर नसल्यावर अपार आनंद मिळतो!

सगळी व्यसनं वाईट नसतात. शरीराचं, कुटुंबाचं आणि पर्यायाने समाजाचं नुकसान करणारी व्यसनं नक्कीच वाईट. पण ट्रेकिंग सारखी निसर्गाच्या जवळ नेणारी, शारीरिक क्षमता वाढवणारी, भौतिक गोष्टींच्या पलीकडची मजा करायला शिकवणारी व्यसनं ज्याला असतील, त्यांच्यासारखे नशीबवान व्यसनी तेच!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. पण खर सांगु का, तु खुप छोटा ट्रेक केलास अन् त्यामुळे आम्हाला पण कमी लेखन मेजवानी मिळाली. Happy मोठा ट्रेक कर बर आता.

मस्तच! समारोप तर खूपच सुंदर लिहिलायत! खरं आहे, असे ट्रेक्स केले पाहिजेत! तुमचं वाचून मलाही स्फूर्ती आली आहे Happy

नेहेमीप्रमाणे छान लिहिलंय.

ट्रेक / मुख्य वस्तुविषयाच्या वर्णनानंतर समारोपातली खास तुझी जी एक टिप्पणी असते ती पण मला नेहेमीच आवडते.

क्लासच.....
समारोप तर हाय क्लास... Happy

ह्या तसंच आधीच्या दोन्ही भागांना प्रतिक्रिया देणार्यांचे मनापासून आभार! असाच लोभ असू द्यावा.
माझे इतर लिखाण वाचण्यासाठी माझ्या ह्या ब्लॉगला भेट देण्याची नम्र विनंती..
http://aparnachipane.blogspot.com