वाघजाई आणि घोडेपाडी

Submitted by योगेश आहिरराव on 23 November, 2017 - 23:49

वाघजाई आणि घोडेपाडी

दिवाळी आणि ट्रेक हे गेले काही वर्षे जणू समीकरणच झाले आहे. दिवाळीतला किमान एक दिवस तरी सह्याद्रीत मनसोक्त भटकल्याशिवाय चैनच पडत नाही. सहाजिकच एक दिवसासाठी नेहमीचं सूत्र, प्रवासाचे अंतर कमी जेणेकरून ट्रेकला जास्त वेळ देता येईल. भिमाशंकर कर्जत भागातील काही घाटवाटा मनात होत्या. त्यातही फेण्यादेवीच्याजवळ दक्षिणेकडे असणारा घोडेपाडी घाट जास्त खुणावत होता. त्यात आमचे मित्र ‘जितेंद्र खरे’ मागील दोन महिन्यांत हाच घाट तब्बल तीन वेळा करून आले, त्यामुळे जरा जास्तच ओढ लागली होती. आता मुख्य प्रश्न होता, तो या वाटेला जोडून दुसऱ्या वाटेचा ते काही ठरत नव्हते. तसं फेण्यादेवी व घोडेपाडी व्यतिरिक्त अन्य काही घाटवाटा सावळात जातात असे ऐकून होतो. पण ठोस माहिती हाती लागत नव्हती, दोघातिघांना विचारले पण काही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अचानक मला मागे ‘ओंकार’ सोबत झालेली चर्चा आठवली, त्याने विकिमापियाचा एक स्क्रीनशॉट पाठवला होता. त्यात सावळा गावाअलीकडून एक मोठी वाट सरळ रेषेत मांडवणे जवळ उतरताना दिसत होती. (अर्थात हे काय प्रकरण आहे याचा उलगडा आम्हाला ट्रेकच्या सुरुवातीला झाला) त्याने सावळातल्या एकाचा नंबर दिलेला, खुप वेळा फोन लावला पण नॉट रिचेबल. याबद्दल जितेंद्र सोबत चर्चा सुरू होती, त्यांचीही उत्सुकता वाढली. सावळ्यात संपर्क होत नव्हता आता पर्याय होता तो कोकणातल्या गावातून माहिती मिळवणं. मांडवणे, पिंपळपाडा, हेदुर्ली, काराळेवाडी व भिवपुरी कुठे तरी संपर्क साधून माहिती मिळवणं आणि त्या अनुषंगाने नियोजन करावे असे ठरवले. हुमगावचा ‘राहुल’ आमच्याकडे टेक्निशियन होता, त्याला फोन लावला पण कुसुर घाट, हाईस्ट आणि साईडोंगर यापलीकडे जाऊन तो काही सांगू शकत नव्हता. मग त्यालाच शेवटी मांडवण्यात जाऊन चौकशी करायला सांगितले. या गडबडीत मध्येच शिल्पाने ट्रेकसाठी विचारले, मग तिला हे सर्व सांगितले. स्वत: शिल्पाने सावळ्यात कुणाला तरी फोन वर विचारले पण हाईस्टच्या वाटेपलीकडे काही गाडी जात नव्हती.
दोन दिवसांनी राहुलचा फोन आला.
राहुल : ‘सर, मांडवण्यातून वाट आहे पण वापरात नाही जास्त कुणी जात नाही’.
मी : ‘म्हणजे काय ? वाट जुनी आहे की सध्या जंगल वाढल्याने बुजली काय’ ?
राहुल : ‘कुठे तरी रस्सी लावलीय, जास्त वापरात नाही. गाववाले सांगतात की कराळेवाडीतून एक वाट हाईस्टकडून जाते.’
मी : ‘अरे बाबा, मला हाईस्टची वाट नको. मला जंगलातली जुनी वाट हवीय’.
राहुल : ‘सर इथून वाट आहे पण तुम्हाला इथे आल्यावरच समजेल’.
शेवटी कराळेवाडीत जाऊनच काय ते पाहू आणि घोडेपाडीने उतरू असे ठरवले. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मी, जितेंद्र, विनायक आणि नव्याने आमच्यात सामील झालेली शिल्पा असे चौघे, बदलापुर नेरळ रस्त्याच्या कृपेने आठ साडेआठच्या सुमारास काराळेवाडीत पोहोचलो. चौकात सर्वांच्या नजरा आमच्यावर, आम्ही अर्थात वयस्कर काकांकडे चौकशी केली. टाटा पॉवरची कॉलनी पार करुन वरती जाण्यासाठी वाट आहे असे त्यांनी सांगितले. कराळेवाडीतून पूर्वेला सह्याद्रीची रांग खुपच जवळ त्याच दिशेने जाणारा कॉलनीचा रस्ता पकडला. वाटेत एका घरातून आम्हाला पाहून थोडेसे वयस्कर मामा आमच्या मागे चालू लागले. बोलणं झाल्यावर कळलं की ते इथे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते, आज पुन्हा सावळ्यात निघाले होते. स्वत: हून आम्हाला म्हणाले, मला काही घाई नाही चला मी आहे तुमच्यासोबत. मामांच्या सोबतीने आमचा वाट शोधण्याचा वेळ वाचणार होता. मग काय जे होते ते चांगल्यासाठीच. मामा फारच गप्पिष्ट ‘सुदाम कावळे’ त्यांचे नाव. टाटा पॉवरच्या कॉलनीत सिक्युरिटी गार्ड ने जुजबी चौकशी करून आत सोडले, त्यात आतमध्ये फोटोग्राफी करू नका असे फर्मान सोडले. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या टाटा पॉवरची कॉलनी फार प्रशस्त. आतमधील रुंद रस्ते, मोठमोठे बंगले, शाळा, दवाखाना त्या जोडीला महाकाय वृक्षांची सोबत संपूर्ण परिसर हिरवागार वनश्रीने नटलेला. एका शाळेच्या इमारतीकडुन डावीकडे वळालो, आता पायवाट वर चढू लागली. छोटा टप्पा पार करताच वाघजाईचे रानातल मंदिर दिसलं, मामांनी देवाला दोन चार छोटी दगड व्हायली. देवाला मनोमन नमस्कार करून पुढे निघालो. या मुळेच बहुधा या घाटाला वाघजाई नाव पडले असावे.
काही अंतरावर मोठा जेसीबी जाईल एवढा रस्ता लागला मग मामा म्हणाले, इथून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे त्यासाठी हा जेसीबी इथून वर चढवला आहे. मांडवण्यातून सावळात पाईप लाईन टाकत आहेत. आता मला लक्षात आलं की ओंकारने पाठवलेला स्क्रिनशॉट काय प्रकार आहे ते. ती वाट नसून एलपीजी गॅसची लाईन टाकायचे काम चालू होते. एका टेकाडावर वाट बाहेर आली, उजवीकडे पाहीले तर खाली दरीत टाटा पॉवर स्टेशन त्यातवरुन आंध्र ठोकरवाडी धरणांतून येणाऱ्या मोठ्या पाईप लाईन. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस या वीज निर्मिती केंद्राची सुरुवात झाली, सध्या वीजनिर्मिती आणि हे पाणी उल्हास नदीतून पुढे अंबरनाथ बदलापूर डोंबिवली औद्योगिक वसाहतीत पाठवले जाते. त्यापल्याड होती ती कुसूर घाटाची सोंड, त्या मागे ढाकचे मोठं पठार आणि भिवगड, गाळदेवी घाटाची बाजु. अगदी हेच दृश्य समोरुन कुसूर घाटाच्या ट्रेकच्या वेळी पाहिले होते. याच पाईपलाईनचे टप्पे ११ नंबर १८ नंबर अशा काही नावाने ओळखले जातात. सर्वात वरचा टप्पा १८ नंबर तिथून खांडी कुसुरचे ग्रामस्थ तसेच कर्मचारी ये जा करत, पण दोन एक वर्ष़ापूर्वी घडलेल्या दुर्घटनेनंतर आता हाईस्टने जाता येत नाही. पण पाईपाजवळच्या शिडीच्या मार्गाने कदाचित जाता येऊ शकते.
22.jpg
यंदाच्या मोसमात पाऊस भरपूर रेंगाळल्यामुळे वाटेतल्या ओढ्यांना अजुनही वहाते पाणी, त्यात जंगलही चांगलेच बहरलेले. हवा जरी फारशी स्वच्छ नसली तरी उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता हिच काय ती जमेची बाजू. मातीच्या रुंद घसरड्या रस्त्याने चढाई करून पदरात दाखल झालो, आता समोरची वाट पाईपलाईनकडे जात होती आम्ही मात्र मामांच्या मागे डावीकडची आडवी वाट पकडली अर्थात दिशेनुसार तीच योग्य होती. हा एकमेव टप्पा लक्षात ठेवायचा अन्यथा चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पदरातून आडवे जात एका ओढ्याजवळच्या कातळावर नाश्त्यासाठी थांबलो. दिवाळीचा फराळ, ब्रेड बटर, त्यात जितेंद्र यांनी सकाळी घरून तयार करून आणलेले खमंग ढोकळे तर लाजवाब. या सर्व गडबडीत अर्धा पाऊण तास आरामात गेला. याच जागेला ‘म्हातारीचा खडक’ म्हणतात असे मामांनी सांगितले. मामांची या वाटेने कायम ये-जा असते, मामांच्या वडीलांनी, चुलत्यांनी खुद्द मामांनी टाटा पॉवर मध्ये रोजंदारीवर काम केलं आहे. जुन्या आठवणींना चांगलाच उजाळा मिळाला, मामा जाम खुश होते. इथुनच पदरातील जेसीबीची आडवी वाट सोडून उजव्या बाजूने जंगलात चढाई सुरु केली. मागे सोडलेली आडवी वाट गॅस पाइपलाइन जवळ जात पुढे घोडेपाडीच्या दिशेने जाते. या दिवसातले जंगल फारच मोहमय किती फोटो काढू किती नाही अशी अवस्था. उंच उंच झाडे त्यावर लगटलेल्या राक्षसी वेली, खाली गर्द पालापाचोळ्याची वाट आणि जोडीला विविध प्रकारच्या पक्ष्यांचा मुक्त संचार अजुन काय हवे. शिल्पा तर पक्ष्यांच्या आवाजावरून तसेच दुरुन बघून सुध्दा पक्षी अचूक ओळखायची. पक्षी निरीक्षण हा एक जिव्हाळ्याचा विषय असो सध्या आवरतं घेतो. पुढच्या चढाईने मात्र चांगलाच दम काढला, उन्हाचा फार त्रास नव्हता तरी घामाच्या धारांनी ओलेचिंब, थोडक्यात ऑक्टोबर हीट अनुभवली. काही ठिकाणी वाट एकदम रचाई किंवा बांधून काढलेली आणखी पुढे जातो तर समोरा समोरच्या दोन मोठ्या दगडांवर काही ठिकाणी शेंदूर फासलेला. हा इथला पुरातन ‘गवळीदेव’. त्याची प्रचिती पुढे जाताच सपाटीवर आम्हाला गाय बैलांचा कळप सामोरा आला, त्यांना बगल देऊन सटकलो. जसजसे वर जात होतो तसं माथ्यालगतचे डोंगर अजून दूर वाटत होते, नक्की वाट कुठून माथ्यावर जाईल याचा अंदाज येत नव्हता. कमरेपेक्षा अधिक उंचीच्या गवतातून जात वळसा मारुन थोडेसे वर चढतो तोच समोर डांबरी रस्ता. म्हणजे घाटमाथा गाठला तर. हाच रस्ता उजवीकडे १८ नंबर स्टेशन वर जातो. खाली पाहिले तर कुठून सुरुवात केली, कसें वर आलो यावर विश्वास बसत नव्हता. ख़रं सांगू तर वाट माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठी निघाली. ( उंची आणि चाल या बाबतीत ) पण मनात मात्र याबद्दल आनंदच झाला. डांबरी रस्त्याने भर उन्हात सावळ्याच्या दिशेने निघालो. साधारण दीड एक किलोमीटर अंतरावर उजवीकडे पाण्याचे पुरातन कुंड नजरेस पडले, आजूबाजूच्या गुरांना चांगलाच पाणवठा मिळाला आहे. कुंडाच्या समोरुन डांबरी रस्ता ओलांडून दरीच्या टोकावर गेलो एक छोटा ओढा मस्तपैकी खाली झेपावला होता. खाली दरीत दूरवर दिसणारं भिवपुरी, टाटाच्या पाईपलाईन, कराळेवाडी, मांडवण्यातले मंदिर, खालचा पाझर तलाव हे बराच वेळ पाहत राहिलो. थोड्या अंतरावर उजवीकडे गॅस पाइपलाइनचे काम चालू असताना डोंगर उतारावर कड्यात अजस्त्र जेसीबीचे धुड आपलं काम चोख बजावत होते. खाली नजर टाकली लाईन सरळ दोन अडीच हजार फूट थेट कोकणात उतरत होती. पदरातल्या टप्प्यापर्यंत लाईन टाकलेली, पदरातून पायथ्याचे काम चालू होते. आम्ही चढाई करताना पदरात डावीकडे जेसीबीची वाट सोडली तीच इथे येऊन मिळते. मामांच्या मते पाईपाच्या बाजूने थोडे उतरून उजवी मारुन घोडेपाडीच्या वाटेला लागता येईल पण प्रत्यक्षात या घसरणीच्या ठिसूळ वाटेने? पाईपाच्या बाजूने उतराई शक्यच नव्हतं. थोडेसे काही झाले की कमीत कमी दिड दोनशे फूट खाली. पुन्हा माघारी वर येत दरीच्या कडेकडेने छोटासा ट्रेव्हर्स मारुन माथ्यावर आलो. पलीकडे फेण्यादेवी घाटाच्या जवळचे टेपाड दिसले जे सरळसोट कळकराईत उतरले आहे. शेततळ्याच्या बाजूने छोट्या ओढ्यालगतच्या झाडीभरल्या वाटेच्या समोर उभे ठाकलो हिच घोडेपाडी घाटाची सुरूवात. एव्हाना एक वाजून गेला होता इथेच कावळे मामांचा निरोप घेतला. घोडेपाडी व फेण्यादेवीच्या लगतचे पठार या दिवसात फार सुंदर, खरतर मुक्काम करण्याजोगे पुन्हा कधीतरी नक्कीच सवड काढून येणार.
उतराई सुरू करत ओढ्यालगतच व्यवस्थित जागा पाहून जेवणासाठी थांबलो. घरातून आणलेले भाजी भात चपाती चटणी असा मेनू, भरपोट जेवण आणि थोड्या विश्रांतीनंतर चालू पडलो. ओढ्याच्या संगतीने दाट झाडीच्याबाजूने वाट कड्यावरून बाहेर आली, खाली माळेगाव, पिंपळपाडा या भागातले कोकण नजरेत आले. पद्धतशीर मळलेली वाट, आजबाजूला आंब्यांची भरपुर झाडे बहुदा यामुळेच गावकरी घोडेपाडीलाच आंब्याचे पाणी असे म्हणत असावेत. माळेगाव पिंपळपाडातून सावळा आणि खांडी या भागात जाण्यासाठी सोयिस्कर. औंदुबराच्या छायेत सपाट जागेत जरा वेळ विसावलो. ऑटोमोड वर ग्रुप फोटो झाला. थोड्या अंतरावर उजव्या बाजूला कातळात ऐके ठिकाणी दगडाला शेंदूर फासलेला. स्थानिक वाटसरुंची निसर्गातली पुर्वापार पुजलेली श्रध्दास्थानच, खासकरुन घाटवांटामध्ये याचा प्रत्यय येतोच. पुढे निघाल्यावर बघतो तर उजवीकडे कड्यालगतची वाट ढासळली होती, बराच दगडा मुरुमाचा घसारा. जितेंद्रंनी पुढे जाऊन वाट अचूक शोधली. हिरवीगार झाडी भरली वाट फेण्यादेवीच्या दिशेने तिरकी जात थेट पदरात उतरली. घड्याळात वेळ पहिली तर तीन वाजून गेले होते. त्याच वाटेने काही अंतर जात मुख्य पिंपळपाड्याची वाट सोडुन डावीकडे यू टर्न मारला. कारण आम्हाला पिंपळपाड्यात उतरून पुन्हा हेदुर्ली मग मांडवणे आणि शेवटी कराळेवाडी असा लांबचा फेरा नको होता. त्यात मध्ये घोडेपाडी घाटालगतची सोंड या गावांच्यामध्ये उतरली आहे साहजिकच ती ओलांडवी लागणार हा सर्व मामला वेळेच्या दृष्टीने परवडणार नव्हताच मुळी. पदरातून आडवे जात दक्षिणेकडे वाघजाई घाटाच्या दिशेने निघालो. सुरुवातीची स्पष्ट वाट अधेमधे हुलकावणी देऊन लागली. सहसा घाटवाटेच्या पदरात आपण जेव्हा येतो तेव्हा आपली अर्धी चढाई उतराई संपलेली असते. पण इथे मात्र आमच्या उतराईचे तीन टप्पे शिल्लक होते.
पहिला टप्पा- आत्ताचा, पदरातून गॅस पाइपलाईनचे जंक्शन गाठणे. जे दुपारी माथ्यावरून पाहिलं होते.
दुसरा टप्पा - जंक्शन ते वाघजाई घाटातला वाटनाका, जिथून आम्ही पदरातली आडवी वाट सोडून वर आलो होतो ती जागा.
तिसरा टप्पा - वाघजाई वाटनाक्यापासून कराळेवाडी पर्यन्तची उतराई म्हणजे सकाळचा आमचा मार्ग.
उच्च विद्युतदाबाच्या तारांखालून वाट आणखीनच दाट जंगलात शिरली, दिशेनुसार चालत नंतरची वाट दरीच्या कडेकडेने खाली सरळसोट दिड एक हजार फूटाचा कडा तिथुन कुठे खाली उतरायची अजिबात शक्यता नाही. पाऊण तासाच्या चालीनंतर मोठा ओढा आडवा आला, तिथेच खालच्या बाजूला एक जण अंघोळ करताना दिसला. भर गर्द रानात त्याला तिथे पाहून थोडं आश्चर्य वाटले. कारण मधला बराच भाग तसा निर्मनुष्य, मुळात घोडेपाडी घाट हाच तुलनेने कमी वापरता त्यात आम्ही आलो त्या वाटेच्या स्थितीनुसार फार कुणी ये जा करण्याची शक्यता कमीच. घड्याळात पाहिलं तर चार वाजत आलें होतें. विश्रांती हवीच होती, ओढ्याची जागा तर खूप भावली होती. लगेहात अंघोळ उरकून थोडा उरलेला फराळ पोटात ढकलला. त्या मुलाकडून पुढच्या वाटेची खात्री करून निघालो. वाटेतले दोन तीन छोटे ओढे पार करत दाट जंगलातून वाट पुढं सरकत होती. एका टप्प्यावर जेसीबीचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. म्हंटले चला आलो पहिल्या टप्प्यात. पण जस जसे आता शिरु लागलो जंगल आणखी दाट होऊ लागले आणि वाट अस्पष्ट, कट्याकुट्यातून झाडीझुडूपातून जेव्हा अंग घासत जावे लागले तेव्हाच कळून चुकले काहीतरी गडबड आहे. त्यात जेसीबीचा आवाज आणखी दूर भासू लागला, त्या मुलाच्या सांगण्यानुसार दहा बारा मिनिटातच आम्हीं जेसीबीच्या रस्त्याला लागायला हवे होते. पण वीस मिनिटे झाली तरी काहीं खूण दिसेना. थोडेफार मागे पुढे शोध घेण्याचा प्रयत्न केला. शेवटी चर्चेअंती पुन्हा माघारी ओढ्याजवळ जाण्याचा निर्णय घेतला कारण साधे आणि सरळ होते, थोड दमाने घेत शांत चित्ताने वर खाली, डाव उजव पाहून कदाचित वाट शोधू शकलो असतो पण वेळचे आणि अंतरचे गणितं अवघड होऊन बसले असते. उतराईच्या आतच अंधार गाठण्याची शक्यता दाट होती. त्यात काही अन्य कारणांमुळे घरी लवकर परतणे भाग होते. पुन्हा आल्यावाटे ओढ्याकाठी आलो, खाली हाक देऊन पाहिलं सुदैवानं तो मुलगा तिथेच होता, अन्यथा पिंपळपाड्यात उतरणं हा पर्याय होता. ‘रघुनाथ गायकवाड’ त्याचे नाव, त्याला म्हटलं तूच चल थोडं अंतर आमच्यासोबत. ज्या वाटेने आम्ही गेलेलो तीच वाट पकडली मोजून पाचव्या मिनिटाला एक छोटीशी वाट डाव्या हाताला वर चढली जी आमच्या नजरेस आली नाही. ज्या पदराच्या भागात आम्ही होतो त्याच्या थोड्या वरच्या अंगातून एक मोठा वळसा घेऊन ओढा पार करून बाहेर आलोतर जेसीबीचा रस्ता. ओढ्यापासूनचे जेमतेम पंधरा मिनिटाचे गणित आम्हाला भलतेच महाग पडले. रघुनाथ इथून माघारी फिरला, त्यावाटेने पुढील दहा मिनिटांत जेसीबी नजरेसमोर आले. हाच तो पदरातला पहिला गॅसपाईप जंक्शनचा टप्पा. विनायक पळतच तिथल्या कामगारांना विचारायला गेला न जाणो मांडवण्यात किंवा आणखी एखादी वाट मिळाली तर लवकर खाली उतरता येईल. कारण इथून दुसरा टप्पा वाघजाई घाटाचा वाटनाका तासाभराच्या अंतरावर होता, जेसीबीचा रस्ता चूकण्याची बिलकुल शक्यता नाही तरी पुढे तिसर्या टप्प्याची कराळेवाडीची उतराई. घड्याळात पाच वाजून गेलेले, या दिवसांत सहा वाजताच अंधारते किमान त्याआधी तरी जंगलातली उतराई संपून बाहेर पडणे आवश्यक होते.
पण म्हणतात ना, जे होते ते चांगल्यासाठीच ! याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. कामगारांनी त्यांच्या सोयीसाठी मांडवण्यात ये जा करण्यासाठी वाट तयार केलेली आहे. अगदी विनायक तिथे चौकशीसाठी पोहचला, तेव्हा ती मंडळी काम बंद करून खाली त्या वाटेने खाली उतरायला निघाली होती. खरच नवीन वाट मिळून आमचे दडपण क्षणात कमी झाले. मुख्य म्हणजे बहुमुल्य वेळ वाचणार होता आणि तसेही सकाळपासून चाल ही बरीच झाली होती. कामगार पुढे गेल्यावर आम्ही त्याच वाटेने उतरू लागलो. मातीच्या चक्क पायऱ्या, व्यवस्थित बनवलेली वाट. एका ओढ्याच्या टप्प्यात आधाराला दोर लावलेला. ( मला लगेच राहुल सोबत झालेले बोलणे आठवले, खरचं बहुतेक गोष्टी जुळून आल्या होत्या.) शेवटचा टप्पा पार करून बाहेर आलो तेव्हा संधिप्रकाश सर्वत्र पसरला होता, आला मार्ग डोळ्यात साठवत दीड दोन किमी कच्ची पायवाट तुडवत मांडवण्यात दाखल झालो. दिवेलागण होऊन चिल्लीपिल्ली फटाकडी फोडत होती. एका घरापाशी येऊन विसावलो, तिघांना तिथेच थांबवुन ‘नंदा दाभाडे’ यांच्या मोटरसायकलने कराळेवाडीत आलो. पुन्हा मांडवण्यात गाडी नेऊन तिघांना सोबत घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. दिवसभराच्या तंगडतोडीनंतर सुध्दा चौघेही प्रचंड समाधानी होतो. शिल्पाने ट्रैक रेकॉड केला, पाहिलं तर दिवसभरात बावीस किमीची चाल आणि जवळपास अडीच हजार फूट पेक्षा जास्त चढाई उतराई.
IMG-20171026-WA0000.jpg
खरंच आमची अनुभवाची शिदोरी या घाटवाटांनी नक्कीच वाढवली यात शंकाच नाही. दिवाळीत यापेक्षा चांगली भेट काय असु शकते !

फोटो साठी हे पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2017/11/vaghjai-ghodepadi.html

योगेश चंद्रकांत आहिरे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users