चारठाण्याचे शिल्प वैभव- बरेचसे अप्रसिद्ध
चारठाणा हे माझ्या सासुबाईचे माहेरगाव. म्हणजे त्या तिथे अगदी जन्मल्या किंवा लहानाच्या मोठ्या झाल्या नाहीत पण वडीलांचे मूळ गाव म्हणून जाणे येणे कायम होते, आजही आहे.काकांची शेतीभाती आहे, जुने घर आहे अगदी माळदाचे. माळद हा छप्पराचा एक प्रकार असतो मराठवाड्याच्या तुफान गरमीत माळदाचे घर म्हणजे एअर कंडीशंड... एवढेच नाहीतर ह्या माळदाच्या छतात दागिने, पैसे ते अगदी वेळ पडली तर हैद्राबाद मुक्ती संग्रामातले क्रांतिकारकही लपत. असे ते जाड भक्कम छत. पण ह्या माळदाच्या छतात सापही वस्तीला असतात त्यामुळे जेवताना झोपताना वरून साप अंगावर पडणे अगदी नित्याचे नसले तरी सवयीचे. (आपली तर हे ऐकून फाटली आणि आपली खाट आपण बाहेर अंगणात लावली. जन्म काढला तरी मला अंगावर वरून साप पडण्याची सवय होणार नाही... असो.)
तसे पाहू जाता चारठाणा हे परभणी जिल्ह्यातले एक अगदी साधे से खेडेगाव. पण इथे असलेल्या पुरातन मंदिरांच्या आणि भाग्नावाशेषांच्या ठेव्यामुळे ते अनेक इतिहासतज्ञाना आणि पुरातन वास्तू प्रेमीना माहिती असते. तरीही ते इतके काही प्रसिद्ध नाही.( ते एका अर्थी बरेच आहे म्हणा अन्यथा ह्या गावाताली शांतता बिघडायची आणि फक्त काळाचेच घाव सोसत आलेला हा ठेवा पर्यटकांच्या उत्पाताने नष्ट व्हायचा.)
चारठाण्याचे मूळ नाव चारूक्षेत्र. चारू म्हणजे सुंदर. हा परिसर तसा रखरखीतच पण डिसेंबर- जानेवारी महिन्यात मात्र हवामान आल्हादकारक असल्याने मलातरी सुंदर भासला आणि त्याकाळी तरी नक्कीच सुंदर असणार. हा सगळा भाग राष्ट्राकुटान्च्या अंमलाखाली येत असे (इसविसनाचे ६वे ते ९वे शतक)राष्ट्रकुट सम्राट अमोघवर्ष्र. ह्याची आई चारुगात्रीदेवी ही मोठी शिवभक्त होती. तिने म्हणे ह्याभागात एक सहस्त्र शिवमंदीर उभारण्याचा संकल्प सोडला होता (हे तिचे जन्म गाव असावे किंवा इथे काही शुभ घटना घडली असावी)तिची ही इच्छ राजाने पूर्ण केली. आणि खरोखरच ह्यागावात जवळपास ३६० लहान मोठी शिव मंदिरे आहेत.बरीच जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. १९९३ च्या भूकंपानंतर इथल्या अनेक मंदिरांची बरीच नासधूस झाली आहे पण नवीन बरीच मंदिरे सापडलीही आहेत. अजूनही सापडतात अक्षरश: लोकांच्या घरात, अंगणात शेतात सापडतात. भारतीय पुरातत्व खाते जप्त करेल, घेऊन जाईल, जागा बळकावेल अशा भीतीने लोक सांगत नाहीत किंवा सापडलेली शिवलिंग, मुर्त्या बाहेर काढून ठेवतात. अशी मूळ जागा सोडलेली, रस्त्याच्या कडेला, झाडाखाली, वळचणीला पडलेली शिल्प गावात जागोजागी खूप दिसतात ...असो
गावात( आणि इतिहास प्रेमींमध्ये ) सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे दीपमाळ किंवा विजयस्तंभ.हा जवळ पास ४५ फुट उंच आहे. गावकरी जरी ह्याला दीपमाळ म्हणत असले तरी हा दीपमाळ वाटत नाही शिवाय आजूबाजूला तेवढे मोठे मंदीर किंवा त्याचे भग्नावशेषही नाहीत. आश्चर्य म्हणजे हा अख्खाच्या अख्खा उभा मातीखाली गाडला गेलेला होता. आमच्या सासुबाइन्च्या काकांनी- भाऊ काकानी ( माझे चुलत आजे सासरे- वय वर्षे ८५ )सांगितल्याप्रमाणे मुसलमान आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी तो लोकांनीच माती खाली गाडला. तसेच इतर आणखी ही काही मंदीरेही मातीखाली गाडली.
हा इतका उंच,सुंदर, आणि भव्य आहे कि ह्याच्याकडे कितीहीवेळ बघत राहिले तरी मन भरत नाही पण वर बघून बघून मान मात्र चांगलीच दुखून येते. हा बऱ्याच चांगल्या स्थितीत टिकून आहे त्यामुळे तत्कालीन कला आणि नक्शीकामातले ट्रेंड्स कळून येतात. वेरूळचे कैलास लेणे हे हि राष्ट्राकुटानीच बांधले( मी चूक असल्यास जाणकारांनी चूक सांगावी )पण तिथले विजय स्तंभ आणि हा विजय स्तंभ ह्यात फरक जाणवतो.
ह्या स्तंभाच्या आसपासचा परिसर मात्र अत्यंत बकाल आहे, झाड झुडप,चिखल, खड्डे त्यात लोळणारी डुकरं, गाई बैलांच्या आणि कुत्र्यांच्या विष्ठा इतस्तत:विखुरलेल्या, त्यांचा उग्र दर्प ह्यामुळे तिथे जाणे अवघड होऊन बसते.
स्त्म्भाच्या वरच्या बाजूला असलेले हे रुद्राक्ष आणि घंटाची नक्षी अत्यंत अप्रतीम आणि नाजूक आहे. ४० फुटावरून ती नुसती लटकवलेली दिसते. मागची दगडी कॉलर दिसतच नाही. फोटो झूम करून पाहिल्यावर ही पातळ दगडी कॉलर दिसते.अत्यंत पातळ आणि परफेक्ट वर्तुळाकार आहे ही.
तिथेच बाजूला पडलेला कोरीव काम केलेला दगड...
ह्या विजय स्तंभाच्या जवळच उकंडेश्वर महादेवाचे मंदीर आहे. भीती वाटावी असे तडे आणि भेगा गेल्यात. हे सगळे नष्ट व्हायच्या बेतात आहे
मन्दीराबाहेरच्या सप्त मातृका,ह्यांनाच सात आसऱ्या म्हणतात. सर्वसाधारणत: सप्त मातृकांबरोबर गणेशही असतो पण इथे नाही दिसला.
सासरेबुवांच्या घराबाहेर कडूनिम्बाच्या झाडावर करकोच्यानी केलेलं घरटे. करकोचे माणसाच्या वस्तीच्या इतके जवळ घरटे करून राहतात हे माहितीच नव्हते.
रस्त्याच्या बाजूला अशी भग्न शिल्प पडलेली दिसतात
उकंडेश्वर महादेवापासून काही अंतरावर असलेले रेणुका देवीचे मंदीर, हिला खुराची देवी असेही म्हणतात. का? ते पुढे कळेल
हे अख्खे मंदीर मातीखाली गाडलेले होते. वरचे मातीचे ढेकूळ अजुनही तसेच आहे. खाली रेणुका देवी ची मूर्ती
स्पष्ट सांगायचे तर मला वाटते ही मूर्ती नंतर इथे बसवली गेली आहे. मूळ मूर्ती मंदीर मातीखाली झाकताना मुसलमानी आक्रमकांपासून वाचवण्यासाठी हलवली असावी, पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे, पण परत आणलीच गेली नाही किंवा सगळा प्रकार विस्मृतीत गेला असावा.
मंदिराचे छत
गाईच्या खुरांसाराखा आकार बघितलात म्हणून ही खुराची देवी. ह्यात जी खुर उभारून आलेली दिसताहेत ती प्रत्यक्षात खुराच्या आकाराचे खड्डे आहेत. पूर्ण छताचा फोटो टाकला तर दृष्टीभ्रम कसा होतो ते कळेल. हे असे मला इतर कुठे ही आढळले नाही
जबरदस्त दृष्टीभ्रम होतो कि नाही! छताला तडे गेलेत त्यामुळे खाली उभे रहायला भीतीच वाटते .
ह्या मंदिराला अगदी जोडून असलेले जोड महादेव मंदीर ( म्हणून बहुधा जोड महादेव)
सर्वसाधारण पणे पिंडीची साळून्खा मंदिरातील प्रवेशाच्या बाजूने पहिली तर उजवीकडे असते ही डाव्या बाजूला आहे. की मी चूक आहे? जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
जोड महादेव मंदिरातले छत – जीर्ण अवस्था
गावाबाहेर असलेल्या गोकुळेश्वर मंदिराकडे जाताना ही वस्तू लागते. हे मंदीर नाही पण बहुधा जुन्या मंदिराच्या तटाचा भाग असावा.दाराला कडी कुलूप आहे पण पलीकडे काहीच नाही
आणि हे नक्की काय होते कुणास ठावूक बहुधा जुनी दीपमाळ असावी.
ह्या अशा मुर्त्या/ कोरीव खांब जागोजागी पडलेलेआढळतात
गोकुलेश्वर मंदिराबाहेर अशा भग्न मुर्त्या लोकांनीच आणून ठेवल्या आहेत. त्या अत्यंत हलाखीत आणि दुर्लक्षित अवस्थेत आहेत. हा अनमोल ठेवा नष्ट होईल किंवा चोरी होईल.
गोकुळेश्वर मान्दिराबाहेरची पुष्करणी – अत्यंत सुंदर
पुष्कारणीतले कोरीव काम
ही एवढी पाण्याने भरलेली नसते पण यंदा पाउस तुफान झाला. नेट वरून मिळालेला जुना कमी पाण्यातला फोटो खाली टाकत आहे. पाणी खूप असल्याने आत जाता नाही आले. पुढच्या वेळी जाईन
नदीकाठचे महांकाळेश्वर (शनी) मंदीर
शनी मंदीर म्हणून बाहेर हनुमान असावा पण हा हनुमानही नाही. ही मर्कट शिल्प आहेत. अशीच हम्पीला पहिली होती.
शनी महाराज! ( मूर्ती नक्कीच नवीन आहे ) ही बाहेर ठेवली आहे आत पिंड आहे.
विष्णू मंदिरात यज्ञ वराह असतो पण हा मात्र मूषक आहे. कानावरून तसे वाटते. जाणकारांनी सांगावे
भाऊ काकांच्या शेतात सापडलेले शिव मंदीर. हे त्यानी झाकून लपवून ठेवले आहे (म्हणजे होते.)
हे विटांचे बांधकाम त्यांनीच केले दिवाबत्ती ही करतात.
मंदिराचे जोते
वापरात असलेल्या बर्याप शिल्पाना शेंदूर आहे.शेंदाराने ओबड धोबड मुर्त्या सुंदर दिसतात पण ज्या मुर्त्या सुबक सुंदर आहेत त्यांचा सुबकपणा मात्र कमी दिसतो.कदाचित शेंदराने मूर्त्यांच्या नाजूक नक्षी चे काहीप्रमाणात संरक्षणही होत असावे .
भारतीय पुरातत्व खात्याने असे जागोजाग फलक लावणे आणि काही ठिकाणी मान्दिराला आणि देवाला ओबड धोबड दिसणारे लोखंडी दरवाजे लावून कुलूप घालण्यापलीकडे जास्त काही केलेलं नाही.
गावकरी त्यांच्या पद्धतीने हा ठेवा जतन करतात पण त्यांच्याकडे शास्त्र शुद्ध ज्ञान नाही आणि इतर व्यवधानं आहेतच. एकंदरीत हा ठेवा धोक्यात आहे.एका छोट्याश्या खेड्याच्या आजूबाजूला इतके प्रचंड शिल्प वैभव आहे आणि अगदी आजूबाजूला हो कुठे मोठा डोंगर चढून जायचे नाही कि गुहा धुंडाळायच्या नाहीत. अगदी just around the corner असे ही वैभव पडून आहे . एक दोन दिवसाच्या भेटीत पाहून होणे शक्यच नाही. कमीतकमी आठवडा तरी नक्की लागेल.
पुण्याहून जाण्याचा रस्ता( साधारण ३८०-४०० किमी)
गावात रहायची काहीही सोय नाही.
पुणे- अहमदनगर-औरंगाबाद-जालना- मंठा- चारठाणा ( हमरस्त्यावर चारठाणाकडे जाणारा फाटा फुटतो. तिथे कमान आहे.)
आदित्य
छान माहिती, उत्तम
छान माहिती, उत्तम प्रकाशचित्रे आणि ओघवते लिखाण...
चांगली माहिती दिली आहे.
चांगली माहिती दिली आहे. धन्यवाद!
मस्त..सगळ्या प्रचि सुंदर.
मस्त..सगळ्या प्रचि सुंदर.
अद्भूत आहे ठिकाण. माहिती मस्त
अद्भूत आहे ठिकाण. माहिती मस्त रोचक लिहीली आहात. फोटोही आवडले
अरे देवा, किती मोठा खजिना
अरे देवा, किती मोठा खजिना पडलाय इथे.
इथे पूरातत्व विभागाचे अस्तित्व आहे हे शेवटचा फोटो पाहून कळले. नेहमीची अनास्था दिसतेय. गावकर्यांनीच हे आता वाचवावे आणि काही फोटोत फासलाय तसा रंग फासण्यापासून हे सगळे वाचवावे.
रोचक माहिती. इतका सुंदर ठेवा
रोचक माहिती. इतका सुंदर ठेवा इतका दुर्लक्षित पाहून वाईट वाटले.
मस्त माहिती आणि फोटो
मस्त माहिती आणि फोटो
श्री मुकुंद कुळे यांच्या "इतिहासाचे साक्षीदार" या पुस्तकात याबद्दल वाचलं होतं आणि आज तुमच्यामुळे फोटोतुन पहायला मिळाले.
धन्यवाद!!!!
सुरेख डिटेलिंग व लेख. धन्यवाद
सुरेख डिटेलिंग व लेख. धन्यवाद हे शेअर केल्याबद्दल..!