लवकर प्रवास संपवा

Submitted by नानाकळा on 10 November, 2017 - 14:02

समाजात राहून समाजापेक्षा वेगळंही दिसायचं, श्रेष्ठही दिसायचं आणि त्यांच्यातलंच एक आहोत हे ही दाखवायला धडपडायचं. सर्वच कर्मकांडांमागे हीच अगम्य भावना असते माणसाची. त्यातूनच वेगवेगळे पूजाविधी, देव जन्म घेतात. 'मी इतरांपेक्षा जास्त श्रद्धावान आणि परमभक्त आहे' ही भावना ही एकाच देवाच्या देवळात जमलेल्या भक्तांच्या वेगवेगळ्या आविर्भाव, हालचाली, घोषणा यांतून जाणवते. सृष्टीवर आपले नियंत्रण चालत नाही म्हणजे नियंत्रण ठेवणारा कुणीतरी असलाच पाहिजे, त्याला आपण खुश ठेवलं पाहिजे ह्या विचित्र अहंकारातून 'देव' संकल्पनेचा जन्म झाला. सृष्टीवर नियंत्रण करणारा कुणीतरी आहे आणि त्याची भक्ती-खुशामत केल्यावर त्याच्यावरही आपण नियंत्रण करू शकू अशी 'महान' कल्पना मानवी मेंदूने प्रसवली. मग आपल्या नियंत्रणात असलेल्यांनी जसे आपल्यापुढे झुकावे ही सुप्त इच्छा असते तद्वतच त्या अज्ञात देवापुढे आपण झुकलो नाही तर बरे दिसणार नाही असे वाटायला लागले. त्यातून नुसते झुकून काय फायदा, ते तर सगळेच करतात. आपल्या मनातले भाव अजून स्पष्टपणे दिसावेत (इतरांना) म्हणून फूल, पान अर्पण करणे. तेही सगळे करायला लागल्यावर अजून पुढचं, अजून श्रेष्ठ करत करत अशा पद्धती आपल्या आपणच शोधून काढून त्याला शास्त्र असे नाव दिले. मग अमूक एक गट असाच करतो, त्या गटाशी जुळवून घ्यायला, सामाजिक सुरक्षा मिळवायला त्याच्या पूजाविधी आपण तशाच्या तशा करायच्या. यातून चालीरिती-परंपरा आल्या. नवससायास सूरू झाले. संप्रदाय निर्माण झाले. लोक खर्‍या श्रद्धेने पालन करू लागले. आपलाच धर्म/संप्रदाय/भक्तीमार्ग/पुजाविधी श्रेष्ठ म्हणून इतरांची शारिरीक/मानसिक/बौद्धिक कत्तल करू लागले.

याच्याविरूद्ध आचरण करणारेही आपले संप्रदाय बनवून बसलेच. अघोरी-तामसी-वाममार्गी. पण मूळ इच्छा कुणालाच कधीच दाबून टाकता आली नाही.

पण हे सगळेच मूळ इप्सित साध्य करायला फोल पडते म्हणून अपयशाला वेगवेगळी कारणे दिली गेली. नेहमीच. अशा अपयशाला कंटाळून 'देव नाहीच म्हणणारे' वेगळे पडले. पण 'देव नाही' म्हणजे 'आपण नियंत्रण करू शकू अशी शक्ती आपल्या आवाक्याबाहेर आहे' याबद्दलची निराशा मोठी होती. मूळ स्वभाव आणि इच्छा 'सृष्टीचे नियंत्रण आपल्या मनासारखे झाले पाहिजे' हीच. ते होत नाही म्हणजे कुठेतरी आपल्यावर कुणाची तरी सत्ता आहे याची सूक्ष्म जाणीव व त्यातून येणारी दहशत राहतेच.

या चक्रातून नास्तिक आस्तिक कुणालाही बाहेर पडणे शक्य नाही. हे कसे? एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही याचा उद्वेग आस्तिकापेक्षा नास्तिकाला जास्त असतो. कारण तीच सुप्त नैसर्गिक इच्छा, "सृष्टीचे नियंत्रण मला हवे, मला इतरांपेक्षा श्रेष्ठ व्हायचे आहे."

पिंडी ते ब्रह्मांडी म्हणतात ते उगीच नाही. ब्रहमांडाचा सगळ्यात लहान भाग असलेला अणु. त्याच्या रचनेत असलेले इलेक्ट्रॉन्स बाहेर पडायची सतत अविरत धडपड करत असतात. त्याच वेळेस केंद्र त्यांना ओढून धरते. नाही तर ही व्यवस्थाच कोलमडून पडेल, अस्तित्व नष्ट होईल. आपली अशी ओळख राहणार नाही. माणसांचही तेच चाललेलं असते, समाजात राहायचे पण आणि फटकून पण राहायचे. असे दाखवायचे की मला कुणाचीच गरज नाही पण समाज सोडायची कुणाचीच तयारी नाही. अगदी मी मी म्हणणारे सन्यासीसुद्धा.

जे या सगळ्यातून बाहेर पडत जातात त्यांना ब्रह्म गवसते. तेव्हा कळते उगाच आपण सृष्टीतून स्वत:ला वेगळे काढत होतो. आपण तर सृष्टीचाच एक अविभाज्य भाग आहोत. समुद्रातल्या पाण्याच्या थेंबासारखे. किनार्‍यावरच्या वाळूच्या कणासारखे, झाडावरच्या पानासारखे. वार्‍याच्या झुळूकीसारखे. मग आपले खरे स्वरूप उमजते. नाना विद्या, कला, शक्ती, सिद्धी आपल्याच ठायी असल्याचा साक्षात्कार होतो. पण त्याचा काहीच उपयोग नसतो. अस्तित्व अद्वैत झालेले असते. मिळणे न मिळणे यापलिकडे मन गेलेले असतं. श्रेष्ठ-कनिष्ठ या संकल्पना गळून पडतात. नियंत्रणात आपण असतोच, नियंत्रकही आपणच असतो. कार्यकारणभाव उमजतो. अमर्याद शक्तीचा साक्षात्कार होतो. आणि तेव्हाच त्याचा काहीच उपयोग नाही हेही समजते. इलेक्ट्रॉन-प्रोटॉन-न्युट्रॉन सगळे एक होतात. त्यांचे एकूण अस्तित्व लक्षात येते. जीवन कळते. खरे ध्येय साध्य होते. मग सागराच्या लाटेवर स्वच्छंदपणे स्वार झालेले आपण एक थेंब असतो. तिथे उद्याची आशा नसते. कालची किल्मिषं नसतात. सजग, निरंतर, अनादी, अनंत वर्तमान हेच चिरंतन सत्य असतं.

हे सर्व लिहिण्याचे कारण: ज्योतिषात जर कर्मफलसिद्धांत मानतात तर पुजा-कर्म-ग्रहशांती हे थोतांड आहे असेच समजले पाहिजे. कर्मफलसिद्धांत आणि शांतीपूजा परस्परविरोधी संकल्पना आहेत. भरती येते ती चंद्रामुळे. चंद्राची कितीही शांती केली तरी भरती- ओहोटी टळणार नाही. कुंडली-ज्योतिष-मांडलेले ग्रह आत्म्याच्या प्रवासातले मैलाचे दगड आहेत. त्यांना शेंदूर फासल्याने प्रवास संपत नाही. वळणं येणार, चढ-उतार येणार ते आपण केलेल्या कर्माने. त्या वळणाचे, चढ-उताराचे ते दिशादर्शक-धोकादर्शक फलक आहेत. खड्डा चुकणार नाहीच. त्यातून किती वेगाने जायचे ह्याची कल्पना फलक बघून येऊ शकते. ते फलक योग्य वेळी दिसणेही पूर्वकर्मांवर आधारित आहे. कारण फलकाचा अर्थ सांगण्याचा बहाणा करणारे 'वाईच च्यापान्याला धा रुपं' घेऊन तुम्हाला वाटेला लावतात. त्यामुळे चांगला मार्गदर्शक शोधणेही तुमच्या-आमच्या हातात नसतं. सृष्टीच्या कार्यकारणभावात असते तेव्हा नकळत मार्गदर्शक अवतरतो, कुठल्याही वेशात. काही ध्यानी-मनी नसतांना पण अगदी योग्य वेळी. सांगण्याचा मुद्दा एवढाच की दहा ठिकाणी पत्रिका घेऊन धावणे योग्य नाही. नशिबात असेल तर बिनमांगे योग्य सल्ला मिळून जातो. नसेल तर जंगजंग पछाडून शष्प फरक पडत नाही. कित्येकदा योग्य सल्ला मिळूनही खड्डे चुकत नाहीतच. अनेकांना अनुभव असेल.

पण आपला उद्देश प्रवास करणे कुठे आहे? आपला उद्देश लवकरात लवकर प्रवास संपवणे आहे. कर्म हे गाडीतले इंधन आहे. ते प्रवास करूनच संपवायचे आहे. पण प्रत्येक पेट्रोलपंपवर इंधन भरत राहिलो तर कसं व्हायचं? प्रवास संपवायचा असेल तर निष्कर्म व्हा. बॅलन्स कमी करत जा. कर्मकांडांची गरज मनातल्या सुप्त भावनांना खाद्य देण्यापुरती आहे. त्याचा आयुष्यातली सुखं-दुखं कमी-जास्त होण्याशी काही संबंध नाही. खरंतर त्यातून कर्माचा बोजा अजून वाढतो. पण कर्मकांड अतिशय सोपे, भयानक कठीण ते 'निष्कर्म होणे'. मग जे सोपे तेच आचरल्या जाते. गाडी फुल्ल टँक होत जाते.

पण पुढे प्रवासाचा कंटाळा यायला लागतो. येइलच ना? कुठेच पोचायचं नाही पण गाडीत एसी आहे, मस्त गाणी चालू आहेत म्हणून किती प्रवास करणार? सुख-दुखाचा कंटाळा येऊ लागतो. चूक उमजू लागते. मन प्रवास संपवायचा निर्धार करतं. आत्मा योग्य मार्गावर लागतो. पण त्याला तीव्र निर्धार लागतो. तो ह्या कंटाळ्यातूनच निर्माण होतो. जितका जास्त प्रवास तितका जास्त कंटाळा, तितका जास्त या प्रवासातून सुटण्याचा निर्धार.

जेव्हा प्रवास संपतो तेव्हा लक्षात येतं. अरे आपण तर इथे एकाच जागी उभे होतो केव्हापासून. हे सगळे भ्रम होत होते तर. काहीसे या व्हिडीयोत दाखवलेल्या लोकांसारखे आपण प्रत्यक्ष आयुष्य जगत आहोत. भ्रमाने सत्य विसरायला होतं. इथे या विडीयोत हे फारच तात्पुरतं आहे. प्रत्यक्ष आपला आत्मा करोडो जन्मांमधून परत परत असंच भासमान आयुष्य जगत आलाय.

शेवटी एक कुठेतरी आंजावर वाचलेली कर्मसिद्धांतावरची कथा सांगतो:
महाभारत युद्धानंतर शंभर पुत्रांच्या निधनाने व्याकूळ झालेला धॄतराष्ट्र कृष्णाला म्हणतो, 'हे द्वारकाधीशा, तुला तर चल, अचल, भूत, भविष्य या सगळ्यांचे ज्ञान आहे. आपला एक मुलगा बापाच्या हयातीत मरण पावला तर त्या बापाचे दु:ख हिमालयाच्या वजनापेक्षा जास्त असते. इथे तर माझे शंभरच्या शंभर पुत्र एका झटक्यात गेले रे? माझ्या दु:खाची तुला काही जरी कल्पना असेल तर मला सांग. मला सांग मी असे कोणते पाप केले की ज्यामुळे मला इतका भयंकर प्रसंग भोगावा लागतोय."

श्रीकृष्ण म्हणाला, "तुम्हाला ठावूक नसेलच पण या जन्माआधीपासूनच्या पन्नासाव्या जन्मात तुम्ही पारधी होता. व्यवसायानिमित्त पशु-पक्ष्यांची शिकार करणे तुमचा धर्म होता. पण एका मोहाच्या क्षणी तुम्ही एका पक्षाची शंभर पिल्ले मारली. तेव्हा तो त्यांचा बाप तिथेच वर फांदीवर बसून ते सगळं पाहत होता. एक पक्षी असल्याने तुमच्यासारख्या विशालदेही मनुष्यासमोर तो कुठलाच प्रतिकार करू शकत नव्हता. सर्व दु:ख मनात ठेवून त्याने आपल्या डोळ्यासमोर आपले शंभर पुत्र मरतांना पाहिले. त्याची हाय तुम्हाला लागली. ते दु:ख तुमच्या अकाउंटला लागले. ते आज फेडल्या गेले."

धृतराष्ट्र संभ्रमात पडले, "ते सर्व ठीक आहे. पण मग तेवढ्यासाठी एवढे पन्नास जन्म का वाट बघावी लागली? कर्मफल लगेच का मिळालं नाही?"

श्रीकृष्णाने मंदस्मित करत उत्तर दिले, "महाराजाधिराज, शंभर पुत्र व्हावे, योग्य वेळ येइस्तोवर त्यांचा योग्य सांभाळ व्हावा इतके पुण्य कमवायला तुम्हाला हे पन्नास जन्म लागले. एका झटक्यात ते इतक्या सहज तुमच्या डोळ्यासमोर मरावे यासाठी हे राज्य तुम्हाला मिळाले. इतके सगळे पुण्य कमवायला पन्नास जन्म फार कमी आहेत पण तुमच्या कर्माच्या तीव्रतेने ते साध्य केले."

असो.

सगळ्यांच्या गाडीतलं इंधन लवकर संपो आणि प्रवासाचा सगळ्यांना मनस्वी कंटाळा येवो अशी मनीषा व्यक्त करतो आणि थांबतो. (लेख फार विस्कळीत वाटत आहे पण गोड मानून घ्या.)

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय भंपक आणि बिनबुडाच्या विधानांनी भरलेला लेख आहे. जसे इतर धाग्यांवर (विविध बाबाबापुंचे गुणगान करणारे व ज्योतिषाला शास्त्र म्हणणारे) विवेकवादी येऊन विरोध/थट्टा करतात त्याचप्रमाणे वा त्यापेक्षाही अधिकच अश्या वरवर तार्कीक दिसणार्‍या छद्म 'ज्ञानी' धाग्यांवर विरोध करावा.

लेखकाने दुसर्‍या कुठल्यातरी धाग्यावर त्यांचा उत्क्रांतीवर आधी विश्वास नव्हता, मात्र नंतर वाचन, अधिक ज्ञानी लोकांच्या सहवासाने त्याची सत्यता पटले असे नमूद केल्याचे स्मरते. तद्वतच या लेखाच्या विषयाबद्दल त्यांचे आधीच असलेले विपुल वाचन अधिक विपुल होत सत्याच्या जवळ (लिमिट टू ०) ते जावेत ही सदिच्छा.

आपल्या आरारा काकांचा ढेकूण कसे मारावे हे सांगणारा एक धागा आहे. त्यांनी स्वतः शेकडो ढेकूण मारलेत आणि बाकी लोकांना मार्गदर्शनही केलंय. ते काही पेस्ट कंट्रोल वाले नाहीत की ढेकूण मारणे हा त्यांचा धर्म असावा. तर त्यांच्या गाडीच्या टाकीत किती इंधन जमा झालं असेल? किती जन्मानंतर त्यांना याचं फलित मिळेल?

थोडे विस्कळीत आहे, पण छान लिहिलेय. आवडले.

ज्योतिषात जर कर्मफलसिद्धांत मानतात तर पुजा-कर्म-ग्रहशांती हे थोतांड आहे असेच समजले पाहिजे. कर्मफलसिद्धांत आणि शांतीपूजा परस्परविरोधी संकल्पना आहेत. भरती येते ती चंद्रामुळे. चंद्राची कितीही शांती केली तरी भरती- ओहोटी टळणार नाही>>>>>

माझेही हेच मत आहे.

नाना, तुमच्या लेखाचा प्रवास आधी नास्तिक, मग डायरेक्ट समाधीनंतरची माणसाची अवस्था आणि शेवटी आस्तिक,पुनर्जन्म वैगरे असा झालाय.
तुम्ही नक्की कोण आहात? नास्तिक, आस्तिक की संदेहवादी?
बाकी येथे काहीजण रीसर्च पेपर्स मागतील तर काहीजण....
जाऊ द्या चोथा झालाय ह्या सगळ्याचा. स्वत:च अभ्यास केलेला बरा, व्यर्थ काथ्याकूट करण्यापेक्षा..

तुम्ही नक्की कोण आहात?

>> शोध चालू आहे..... कोणताही दावा करणे व्यर्थ आहे एवढेच आतापावेतो कळले आहे. Happy

पण एका मोहाच्या क्षणी तुम्ही एका पक्षाची शंभर पिल्ले मारली
>>> हा कोणता जातीचा पक्षी ज्याला शंभर पिल्ले होती?

मी फक्त आत्ता इथे काय विचार मांडले आहेत त्यावर मला काय वाटले ते लिहितो.
<<<<कुंडली-ज्योतिष-मांडलेले ग्रह ..................... पूर्वकर्मांवर आधारित आहे. .........कित्येकदा योग्य सल्ला मिळूनही खड्डे चुकत नाहीतच. >>>>

ज्योतिष शास्त्राचे हे स्पष्टीकरण वाचून कळते की ज्योतिषाच्या मागे लागण्यात अर्थ नाही असे मला वाटते. मला पटते.

<<<<अतिशय भंपक आणि बिनबुडाच्या विधानांनी भरलेला लेख आहे.>>>>
असे लिहिणार्‍या लोकांइतका मी विद्वान नाही.
मी फक्त लिहिलेले विचार वाचतो. प्रत्येक विचार पुरावा देऊन सिद्ध केलाच पाहिजे असा माझा आग्रह नसतो, जर पुरावा मी अनुभवला नसेल तर आपोआपच त्या विचाराशी मी सहमत नसतो नि तसे हि लिहितो.
<<<<तुम्ही नक्की कोण आहात? नास्तिक, आस्तिक की संदेहवादी?>>>
असे अनेक प्रश्न इथे उभे रहातात. उद्या असेहि विचारता येईल की तुम्ही ब्राह्मण आहात की इतर जातीचे? तुम्ही भा़जपवाले की त्यांच्या विरुद्ध? पूर्वी तर इथे, तुम्ही अमेरिकेत बसून लिहिता की भारतात बसून हाहि प्रश्न विचारला होता -
कारण मुळात स्वतःची ओळख देऊन विचाराची सत्यासत्यता सिद्ध होत नाही. म्हणून इथे कुठल्याहि नावाने लोक विचार मांडतात. ते त्यांची मते मांडतात. वाटले तर पटले की नाही एव्हढे लिहावे - उगीच पुरावे, लिहिणारा कोण, कसा, कुठे आहे याचा संबंध नसतो.

माझी खात्री आहे - उद्या एखाद्याने नुसते साधे विधान केले तरी लोक विधानाच्या सत्यासत्यते ऐवजी केवळ तुम्ही नक्की कोण, आस्तिक की नास्तिक?, पूर्वी तुम्ही इथे असे का लिहीले नाहीत, आत्ताच का? तुम्ही हिंदू की मुसलमान? एव्हढेच प्रश्न इथे अनेक लोक लिहितील!

शिवाय हे बिन पुराव्याचे आहे, किंवा लिहिणार्‍याचा आय क्यू कमीच असला पाहिजे असेहि लिहितील - दुसर्‍यावर सतत टीका केली की आपले शहाणपण सिद्ध होते असा सर्व जगातील अनेक लोकांचा समज आहे. नि त्यामुळे जिथे जाईन तिथे नावे ठेवीन असे धोरण असते.

शोध चालू आहे..... कोणताही दावा करणे व्यर्थ आहे एवढेच आतापावेतो कळले आहे. >>> Happy शोध घेताय, संदेह मिटवायला बघताय हेच महत्वाचे. मग जो काही शोध लागेल तो लागो. शोध लागला की मनातली खळबळ शांत होते .... हे अनुभवले आहे.