स्पिती - मंतरलेले दिवस ! .... भाग ८

Submitted by सव्यसाची on 9 November, 2017 - 03:26

आषाढ कृष्ण पंचमी (१४ जुलै) - लांगजा

आज तसे आरामात उठलो कारण जेमतेम पन्नास एक किलोमीटरच जायचे होते. किंवा आम्हाला तसे वाटले Happy निवांतपणे आमलेट पाव, पराठा असा जोरदार नाश्ता केला. मग नेहमीप्रमाणे रपेटीला सुरुवात केली. आज आम्ही लांगजा या ठिकाणी राहणार होतो. उद्या लोसरला राहायचे होते. जे आमच्या मनालीच्या वाटेवरच होते. त्यामुळे नायक काल जेव्हा म्हणाला की परवा आपण काजाला इंधनासाठी व जेवायला येऊ, तेव्हा आम्ही दोघांनी ठरवले होते की आपण उलटे दहा बारा किलोमीटर कशाला यायचे त्यापेक्षा आपण त्या तिठ्यावरच थांबू. याचं कारण म्हणजे आम्हाला इंधनाचे योग्य व्यवस्थापन करायचे होते. जेणेकरून दुचाकी परत देताना जास्त इंधन राहणार नाही. त्यानुसार आम्ही खूपच मोजमाप करून आज इंधन भरले होते. आज टाकी पूर्ण भरली नव्हती. फक्त दोन लिटरच्या एका बाटलीत इंधन घेतले होते. अडीअडचणीला असावे म्हणून. नाही वापरले तर आमच्या इतर मंडळींना देऊन टाकले असते कारण ते मनाली ते चंदिगड जाणार होतेच. चालवायला सुरवात केली आणि लगेचच २ किमी मधेच तो तिठा आला. म्हणजे १० १२ किमी काही मागे जागे लागणार नाही उद्या. चला त्या निमित्ताने हा पर्यायही खुला झाला.

कि गुहा लवकरच दृष्टीस पडली. फारच उत्तम दृश्य होते. थोडेसे आकाशाकडे बघत असताना गुहा व त्याच्या मागे उंच पर्वत व त्यावरही निळेशार निरभ्र आकाश !

लवकरच गुहेपाशी देखील पोहोचलो. गुहा तशी चांगली आहे. पण इतर असतात तशीच आहे. एकूणच इथल्या गुहांमध्ये बुद्ध प्रतिमा, जाडजूड ग्रंथ, खाली लालसर जाजम पसरलेले, खांबांना रंगबिरंगी पताका फडकवलेल्या, भरपूर काळोख, वाकूनच जावं लागेल अशा खोल्या, भिंतींवर भिंतभर चितारलेली दृष्य ...असा ठरलेला ढाचा असतो. एक दोन पाहिल्या की पुढच्या पाहायलाच पाहिजेत असं मला तरी वाटत नाही. फक्त मला तिथलं जुनं लाकडी बांधकाम, त्यावर केलेला कोरीव काम हे बघायला आवडतं. आता आम्ही किब्बर या गावाकडे चढू लागलो. डोक्यावर रणरणतं ऊन होतं. जरादेखील हिरवळ दिसत नव्हती. त्या उन्हातच एक फिरंगी जोडपे सामान घेऊन वर चढत चालले होते. बहुदा किब्बरला चालले असावेत. फिरंगी लोक काय काय करतील याचा नेम नाही. बराच वेळ वर वर जात राहिल्यावर डावीकडे घळीच्या पलीकडे हिरवळ दिसू लागली. तसेच छोटी छोटी घरं पण दिसू लागली. नायकाची गाडी लावलेली पाहिली तिथेच आमच्या गाड्यापण लावल्या व दोरजेच्या घरात स्थानापन्न झालो.

मुख्य खोलीत भिंतीला लागून गाद्या टाकल्या होत्या. त्याच्या पुढ्यात बैठी लांबलचक टेबले होती. ज्यांना पाहिजे त्यांनी चहा व चहा नकोवाल्या माझ्यासारख्यांनी स्थानिक सफरचंदाचे पेय घेतले. पोट बऱ्यापैकी भरलेलेच असल्यामुळे आम्ही बिस्किटे फार खाल्ली नाहीत. ही मोठीच चूक झाली हे आमच्या नंतर लक्षात आले. त्या इतक्या उंचावरच्या गावात आठवीपर्यंत शाळा आहे हे ऐकून चाटच पडलो. कॉलेजसाठी मात्र त्यांना रामपूर मनाली अशा ठिकाणी जावे लागते. मग थोडा वेळ गच्चीत फिरून आलो. काल रात्री आमचा नायक इथेच येऊन झोपला होता. तो काजाहून रात्री फक्त तेवढ्यासाठी इकडे आला होता व पहाटे परत काजामध्ये आला होता. रात्री इथून आकाशगंगा नक्कीच तुफान दिसली असणार. अर्थात आज रात्री आम्ही ती बघूच. तिथून निघाल्यावर तीनएक किलोमीटर परत आल्यावर आम्ही डावीकडे जाणारा फाटा घेतला. परत डोंगरावर चढत गेलो व नंतर थोड्याश्या सपाट भागावरून गेल्यावर उजवीकडे जाणारा फाटा घेतला. अक्षय आणि काही लोक पुढे असल्यामुळे ते हा फाटा न घेता सरळ पुढे गेले. आम्ही बोंबलून त्यांना थांबवायचा प्रयत्न केला पण ते हाकेच्या अंतराच्या पुढे गेले होते. या फाट्याला वळल्यावर एखादा किलोमीटरमधेच एका कड्याच्या टोकाशी पोचलो. इथूनच बरोबर खाली कि गुहा दिसत होती. फारच उत्तम जागा होती. कदाचित इतर मंडळं इथे लोकांना आणतही नसतील. लवकरच चुकलेले फकीर देखील परत येऊन इथे पोचले. मग जोरदार फोटोसेशन झाले.


-

-

मारवाडी बंधूंनी नेहमीप्रमाणे सदरे काढून उघड्याने फोटो काढले. हा खूपच आडबाजूचा भाग होता. त्यामुळे इथे बाकी कोणीच नव्हते. खाली ती गुहा, त्याच्या पलीकडे स्पिती नदी आणि दोघांच्या मधून जाणारा रस्ता... फारच सुंदर दृश्य होते. बराच वेळ तिथे काढून आम्ही परत निघालो. आम्हाला वाटले आता आपण सरळ निवासस्थानी जायचे. पण नायकाचे विचार वेगळे होते. त्याला आम्हाला अजून बिनरस्त्याच्या भागात घेवून जायचे होते. त्यामुळे आम्ही मगाशी चुकलेले फकीर जिकडे गेले होते त्याच दिशेला निघालो. आमच्यातले बरेच लोक तिकडे आले नाहीत. आम्ही काहीतरी पाचच जण पुढे गेलो. जवळपास दहा किलोमीटर पुढे गेल्यावर परत मस्त हिरवळ लागली व भरपूर याक चरताना दिसले.

दोनचार घरे व बाजूला झुळझुळ वाहणारे पाणी देखील होते. एकदम विहंगम दृश्य होते. इथून थोडेसेच पुढे गेल्यावर रस्ता पूर्ण संपला. म्हणजेच आम्ही ताशिगंग या छोट्याशा गावी पोचलो होतो. इथून उजवीकडे दिसणाऱ्या दरीपलीकडे आमचे लांगजा हे निवासस्थान होते. पण तिथे जायला इथून रस्ताच नव्हता. त्यामुळे आम्हाला परत उलटे जाऊन मोठा टल्ला पडणार होता. पण रस्ता बांधणार आहेत अशी माहिती नायकाने दिली. इथे निवांत दहा मिनिटे बसून निघालो.


-

आता प्रचंड भूक लागली होती. वाटेत याक जिथे होते तिथे डावीकडे एक रस्ता जात होता. हाच रस्ता बहुतेक पुढेमागे लांगजाला वाढवतील. नायकाने त्या रस्त्यावर अजून एकाला घेऊन पोबारा केला. आम्हाला सांगितले तुम्ही पुढे जा आम्ही येतोच.
पुढे जाता जाता एकाची दुचाकी बिघडली. मधून मधून चालू होत नव्हती. तेव्हा ते ढकलत होते. दुरुस्ती वाहन पुढे तिठ्यापाशी होते. म्हणून मी आणि अक्षय पुढे गेलो. तज्ञ म्हणाला की थोडावेळ थांबून गाडी इथे पोचल्यावर दुरुस्त करू. आता पोटातले कावळे देखील कोकलून दमले होते. मी म्हणत होतो की उलट दिशेला का होईना पण किब्बर तीन किलोमीटर वरच आहे. तर तिथे जाऊन दोरजेकडेच जेऊ. पण ते काही कोणास पसंत पडेना. मग वाहन चालकाच्या लक्षात आले की मारवाड्यांनी त्याला ठेपले दिले आहेत. पिशवी बाहेर काढली तर तब्बल वीस-पंचवीस होते. शिवाय कसलातरी लाडू देखील होता. मी तर चांगलाच ताव मारला. आम्ही मारवाडी बंधूंना नावे ठेवत होतो की हे लोक इथेही खाकरा ठेपले जिलबी काय वाट्टेल ते खात होते. पण आत्ता त्यांच्यामुळेच जीव वाचला होता. वेळेवर खायला मिळाले होते. ते सुद्धा भरपूर ! अजूनही ते दुचाकीवाले आले नाहीत उलट आमचा नायकच पोचला. तो म्हणाला ती गाडी चालूच होत नाहीये तेव्हा तज्ञाला घेऊन मी तिकडे जातो.
मग मी आणि अक्षय पुढे निघालो. मुख्य रस्त्याला येऊन डावीकडे वळून काजाकडे निघालो. आता आम्हाला सात-आठ किलोमीटर गेल्यावर परत डावीकडे वळून वर वर चढत जायचे होते. अक्षयला सरळ रस्ता दिसल्यावर तो वेगाने पुढे निघून गेला. पण अगदी दोन तीनच किलोमीटर पुढे गेल्यावर तो मला त्रस्त चेहेऱ्याने रस्त्याच्या कडेला थांबलेला दिसला. इतके दिवस आम्ही एकमेकांना धरूनच गाडी चालवत होतो. कारण दुरुस्ती वाहन कुठे असेल हे नक्की सांगता येत नाही. काही गरज पडली किंवा अगदी कोणी दरीतच पडला तर निदान साक्षीदार तरी असायला पाहिजे ना ! जवळ जाऊन पाहतो तर म्हणाला की माझी ऍक्सिलरेटर केबल तुटली आहे. म्हटलं चला दुरुस्ती वाहनाची किती जबरदस्त गरज असते ते आता कळते आहे. आम्ही गाडी बाजूला लावून दहा पंधरा मिनीटे वाट बघितली पण आमचे वाहन काही आले नाही. आम्ही दुचाकीचे अतिरिक्त सामान आणले तर होते. पण ते सगळे दुरुस्ती वाहनात होते. पण बहुतेक मागे बंद पडलेलीच दुचाकी अजून दुरुस्त झाली नव्हती. आम्ही रस्त्याच्या उजव्या बाजूला नदी होती तिकडे जाऊन तिथे एकमेव मोठा दगड होता त्याच्या आडोशाने बसून राहिलो. गरम होत होते. भूक अजूनही थोडीफार होतीच. या वेळेस तर मी नेहमी नेतो ते ऊर्जा बार पण नव्हते. अर्धा पाऊण तास असाच गेला गाडी काही आली नाही.

शेवटी मी म्हटले चल बघूया आपल्याला काही करता येते का. स्क्रू पिळून गाडीचे आयडलिंग पूर्ण वाढवून ठेवले. आता म्हटलं पहिला गिअर टाकून ठेव, क्लच दाबून ठेव, गाडी चालू कर आणि क्लच सोड. गाडी पहिल्या गिअरवर चालेल. आपण असं करत करत सरळ काजाला जाऊ. तसंही आम्हाला वाटलं होतं लांगजाला जायच्या तिठयापासून काजा सात ते दहा किलोमीटर लांब आहे, तसं नव्हतं. ते फक्त दोन किलोमीटरवर आहे. गुगलबाबा कधीकधी चुकीच अंतर दाखवतो हे आम्हाला दोन तीन वेळा जाणवलं होतंच. तर मग काजालाच जाऊन गाडी नीट करून घेऊ. पण ह्या उपायानेसुद्धा गाडी पुढे जात नव्हती. मग गाडीची हत्यारे बाहेर काढली. विचार असा होता कि हँडलच्या खाली जिथे केबल अडकवलेली असते, तिथले स्क्रू काढून केबल हातात किंवा पक्कडीत धरून खेचायची. गाडी चालवता येते. मी माझी टीव्हीएस मोपेड अशी चालवत असे.. पण ते स्क्रूच काढता येईनात. बहुधा गंजले असावेत. उगाच जास्त ताकद लावून फिरवले तर त्यांचे माथे बिघडायचे Happy म्हणजे, खरोखरच त्याच्या डोक्यातील पिळायला दिलेली खोक झिजते आणि मग तो काढायला तज्ञांना देखील फारच त्रास पडतो. आता काय करायचे याचाच विचार करत होतो तेवढ्यात मला एक युक्ती सुचली. त्यातला एक पान्हा ऍक्सिलरेटर केबल ज्या धातूच्या पत्र्याला गोल फिरवते त्या पत्र्याच्या खाली घुसवला. आता थोडक्यात पूर्ण ऍक्सिलरेट केल्यासारखं झालं. अक्षयला म्हंटलं आता हे जमलं असेल तर न थांबता सरळ काजाकडे जात राहा. मी येतोच मागून. ही युक्ती एवढी लागू पडली होती की अक्षय जवळपास चाळीसच्या वेगाने गाडी पळवत होता. तिठ्यावर आल्यावर तो म्हणू लागला की आपण सरळ निवासस्थानी जाऊ मग रात्री दुरुस्ती गाडीतून केबल घेऊन बदलून घेऊ. पण मी म्हटले तसे नको काजा जवळच आहे. आपण सरळ तिकडे जाऊन बदलून घेऊ. दुरुस्ती गाडी कधी येईल सांगता येत नाही कारण ती पहिली गाडी दुरुस्त झाली का ते देखील आपल्याला माहीत नाही. आणि हे केले ते बरेच झाले असे नंतर दिसले.

तर आमची जोडगोळी पुन्हा एकदा काजाच्या बाजारात हजर झाली. विचारपूस करताना अचानक आठवण झाली ती काल बघितलेल्या रस्त्यावरच्या तज्ञाची. मग दुचाकी घेऊन तिकडे गेलो. तो म्हणाला करून देईन आणि त्याच्याकडे केबलपण आहे. आता आमच्या नायकाला कळविणे गरजेचे होते. आमचे दोघांचेही फोन लागत नव्हते. एकूणच या वारीत फक्त भारत संचार निगम चालते असे दिसले होते. आणि बाजारात एकही पब्लिक फोन नव्हता. तेवढ्यात अक्षयला बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये सकाळचे जोडपे दिसले ज्यांच्याबरोबर आम्ही पीन दरीबद्दल वार्तालाप केला होता. त्यांच्याकडे भारत संचार होता हे आम्हाला माहीत होते. त्यांनीही उदार मनाने तो आम्हाला देऊ केला. काही खाणार आहात का असं विचारल्यावर तर आमचे डोळेच भरून आले Happy आमचे नायकाशी बोलणे झाले तेव्हा तो म्हणाला की ती आधीची दुचाकी चालू झालीच नाही व आम्ही ती दुरुस्ती वाहनात टाकून काजालाच आणत आहोत. काल आयफोनचे नखरे बघितले होते. आज बुलेटचे पाहीले. बुलेटची केबल बदलायला चक्क टाकी व पहिले आसन काढून ठेवावे लागते. हे म्हणजे चार आण्याची कोंबडी असला प्रकार होता. अर्थात त्या तज्ञाने झटपट सराईतपणे काम केले व योग्य तेवढेच पैसे घेतले. आम्हीच बळेच त्याच्या हातात थोडे जास्त पैसे कोंबले.

आता आम्ही दुचाकी घेऊन परत लांगजाकडे निघालो. परत तिठ्यावर पोचलो तरी आमची दुरुस्ती वाहन किंवा मंडळी काही दिसली नाहीत. आता अंधार पडायला जेमतेम अर्धा तास शिल्लक होता. म्हटलं आपण पुढे जाऊ. आम्ही पुन्हा एकदा घाट चढू लागलो. जरा वेगानेच हाणत होतो. गाव अगदीच दोन किलोमीटर राहिले असताना आम्हाला आमचेच तीन चार लोक दिसले. काय झालं विचारता अजून एकाची गाडी बंद पडली आहे असे कळले. आता बोचरी थंडी पडली होती. अंधारही जवळपास पडलाच होता अगदी शेवटची लालसर छटा आकाशात रेंगाळत होती. मग त्याची दुचाकी तिथेच ठेवून आम्ही सगळे गावात पोचलो. तर शेवटी आमची आजची रपेट तब्बल शंभर वगैरे किलोमीटर्सची झाली.

आजचे निवासस्थान खऱ्या अर्थाने होमस्टे होते. गाव एकूणच छोटे होते. पहिल्या मजल्यावर राहण्याची सोय होती. तळमजल्यावर ते कुटुंब राहत होते. गेल्या गेल्या मस्त चहा झाला. मग मी प्रातर्विधीची सोय बघून आलो. ही म्हणजे चक्क दुमजली खोली होती. आपण पहिल्या मजल्यावर बसायचे व खाली तळमजला पूर्ण खत होण्यासाठी वापरलेला. मग लोकांना ही माहिती दिली. हो उगाच रात्रीच्या अंधारात कोणी धडपडायला नको. थोड्याच वेळात नायक आणि दुरुस्तीची गाडी येऊन पोचली. त्यांनी आधीची दुचाकी शेवटी गाडीत टाकून काजाला नेली. तिथे आमच्या कालच्या निवासस्थानापाशी सोडली. त्यामुळे ते आम्हाला वाटेत सापडले नाहीत कारण ते निवासस्थान बाजारापासून लांब होते. मग ते इकडे आले. वाटेत त्यांना दुसरी दुचाकी बंद पडलेली दिसली. आता आमचा तज्ञ ती दुरुस्त करत होता. थोडक्यात आजचा दिवस दुचाकीसाठी वाईट होता. आमच्या चक्क तीन गाड्या आज बिघडल्या. पहिल्या गाडीचं तर म्हणे पूर्ण वायरिंगच स्फोट होऊन जळून गेलं. म्हणजे आता ती गाडी दुरुस्त होणारच नाही की काय? नायक म्हणाला की मनालीहून येणाऱ्या त्याच्या एका ओळखीच्या चालकाला वायरिंग आणायला सांगितले आहे. उद्या सकाळी काजाला पोचेल. हे जरा अवघडच वाटत होते. पण आम्ही काळजी बाजूला ठेऊन समोर आलेल्या गरम गरम जेवणावर ताव मारला. गप्पा गोष्टी करता करता कोणीतरी चेष्टेत म्हणालं की अक्षय आणि मला एक खोली द्या. मग मी पण म्हटले हो नाहीतरी आम्ही मधुचंद्रावर आहोत. जेवल्यावर मी दहा-पंधरा मिनिटे बाहेर आकाशगंगा बघत बसलो. कृत्रिम प्रकाश अजिबातच नसल्यामुळे आकाश तारकांनी खचाखच भरलेले दिसत होते. आकाशगंगा अगदी सहजच कळत होती. लोकांना थोडी तारका, आकाशगंगा, नक्षत्र यांची माहिती दिली. आम्ही झोपायला जाईपर्यंतही दुसरी गाडी दुरुस्त होऊन आली नव्हती. उद्याचा दिवस फारच खडतर जातो की काय असे वाटायला लागले. दुसरी गाडी जर चालू झाली नाही तर दोन दोन गाड्या काही दुरुस्ती वाहनात टाकून मनालीला नेता आल्या नसत्या. असो. उद्याचं उद्या बघू. पांघरायला म्हणून चक्क गादीच होती. थंडी ही तशीच होती म्हणा ! मस्त गुरफटून घेऊन झोपून गेलो.

---

सर्व भाग

https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाग आणि फोटो मस्त.
>>काही खाणार आहात का असं विचारल्यावर तर आमचे डोळेच भरून आले >> मायबोलीवर लिहिताना ‘टडोपा’ म्हणायचं की भावना पटकन पोचतात. Wink

मस्त चाललीय मालिका. मजा येतेय वाचताना व हेवा ही वाटतोय. मलाही स्पितीला जायचंय पण हे असे या आयुष्यात जमायचे नाही, आम्ही निवांत चारचाकीवाले. Happy

बाकी त्या गुंफांबद्दल अगदी अगदी.... मीही उत्साहाने पहिल्या दोन पाहिल्यावर नंतर नाद सोडून दिला. You hv seen one, you HV seen all असे फिलिंग आले. Happy

Back to top