आषाढ कृष्ण प्रतिपदा (१० जुलै) - सांगला
जवळपास अकरा तासानंतर जाग आली तेव्हा दोन दिवसांचा शिणवटा पूर्णपणे निघून गेला होता. मग झटपट आवरले. उत्तम पराठ्यांचा नाश्ता केला व बाहेर जाऊन सामान गाडीवर लावेपर्यंत मंडळी आलीच. मी आता थोडे सामान सॅकमध्ये टाकले होते. त्यामुळे दुरुस्ती गाडी येईपर्यंत थांबून राहिलो. तोपर्यंत नमस्कार चमत्कार झाले. आमच्या या नितीन नामक नायकाची देखील अव्हेंजर होती. जशी लडाखच्या नायकाची होती. एकूण ह्या गाडीवर नायकांचा विश्वास जास्त दिसत होता. आता आम्हा दोघांना दुरुस्ती गाडीचा पाठिंबा उपलब्ध होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त हिरवीगार झाडी होती.
-
लवकरच तो घाट आला जिथे त्या प्रसिद्ध दगडाच्या कमानी आहेत. म्हणजे खरतर डोंगर पोखरून जेवढ्यास तेवढा घाट तयार केला आहे. इथे जोरदार फोटोसेशन व चलतचित्रण झाले.
-
-
आम्ही अतुलचा व्हिडिओ कॅमेरा घेऊन जाणार होतो. पण काही कारणास्तव तो नेला नाही. मग पहिले दोन दिवस अक्षयने एक युक्ती केली होती. तो कमरेचा पाऊच छातीवर लावून त्यामध्ये त्याचा आयफोन खुपसत असे. पण यामुळे चित्रण उभे येत आहे हे मी त्याला सांगितले. हा घाट मात्र फोटोत दिसतो तेवढा प्रत्यक्षात काही अरुंद किंवा अवघड नाही. पण पलीकडच्या डोंगरावर मात्र जो घाट होता तो अगदीच अरुंद होता. जेमतेम सुमोसारखी गाडी जाईल एवढाच. आणि तो पूर्णपणे मातीचा होता. अर्थात तो आम जनतेसाठी नव्हताच. त्यावरून एक टेम्पो जाताना दिसत होता. अगदी सावकाश, मोजून मापून चालवत होता.
.
foto
घाट पार करून गेल्यावर सतलज नदीकाठचा प्रवास सुरु झाला. थोड्या वेळाने भरपूर कुमारवयीन लोक दिसायला लागले. रामपूरचे कॉलेज जवळ आले होते. प्रीती झिंटा इथेच शिकली ! ईती आमचा महानायक ! आजूबाजूच्या सुंदरी बघून ते म्हणणे पटलेच लगेच. काही लोकांचा तर आता इथेच टाका तंबू आता असा विचार चालू झाला म्हणून आम्ही एक चहासाठी थांबा घेतला. चाय पे चर्चा झाल्यावर साधकबाधक विचार करून आम्ही पुढे निघालो. आता एका फारच वाईट दिसणाऱ्या धाब्यावर जेवायला थांबलो. राजमा उसळ फुलके भात असा बेत चवीला चांगला होता. पाणी मात्र आम्ही बंद बाटली विकत घेऊनच प्यायले. पुढे सुद्धा पूर्ण वारीभर बहुतांशी सगळे बाटलीबंद पाणीच पीत होते. मी आणि अक्षय मात्र मधून मधून स्थानिक पाणी देखील पीत होतो. आता मस्त सतलज आणि बास्पा नदीचा संगम पाहिला. मग बास्पा नदीच्या कडेने सांगला खोरे या पुढच्या ठिकाणी पोचलो आणि मस्त गरमागरम चहा आणि भजी खायला मिळाली. किन्नर कॅम्प हे आमचे आजचे निवासस्थान अफलातून होते. इतकी उत्तम बडदास्त, इतका स्वच्छ तंबू, इतक उत्तम जेवण आणि मुख्य म्हणजे इतकी अप्रतिम बास्पा नदीच्या काठची जागा.. जणूकाही स्वर्गातच होतो. त्यामुळे लवकरच यक्ष किन्नर गाणी गाणार आणि अप्सरांचा नाच सुरू होतो की काय अशी उत्सुकता लागून राहिली
चहा पिऊन झाल्यावर लगेच नदीकाठी जायला पळालो कारण आता अंधार पडायला फारवेळ बाकी नव्हता. नदीकाठ सगळा हिरव्यागार सूचीपर्णी वृक्षांनी भरलेला होता. दोन्ही बाजूला उंच डोंगर, मध्ये खळाळत वाहणारी बास्पा नदी, आम्ही दोघे सोडून बाकी कोणीही मनुष्यप्राणी नाही, मस्त संधिप्रकाश असं सगळं वातावरण एकदम अफलातून झालं होतं. अक्षयने लडाख मध्ये हमखास केला जाणारा दगडावर दगड रचण्याचा उद्योग सुरू केला. मी मात्र एका कातळावर निवांत आडवा पडून राहिलो. डावीकडे हात पसरला की थेट पाण्यात जात होता.
-
-
-
मन एकदम शांत सुखिन झाले होते. थोड्या वेळाने आमच्यातील इतर मंडळीही थोडीशी खालच्या अंगाला नदीकाठी आलेली दिसली. अंधार खूपच पडला तसे नाईलाजाने पण उल्हसित मनाने तंबूत परतलो. आमच्याबरोबर बारा-चौदा चक्क मारवाडी लोकांचा संच होता. ही मंडळी भारीच हरहुन्नरी होती. त्यांनी पत्त्यांचा डाव टाकला होता. ती मंडळी पूर्ण वारीवर रोज संध्याकाळी थकून मुक्कामी पोचलो की उत्साहाने पत्ते खेळायची. कहर आहे ! आमच्या मराठी संचामधील लोकांनी आचमने घ्यायला सुरुवात केली होती. अक्षय तर पितच नाही व मी लडाख प्रमाणेच इथेही वारी भर मदिरा घ्यायची नाही असे ठरवले होते. पण अर्थातच त्यांच्याबरोबर गप्पा मारायला मांडी ठोकली. उद्या पहाटे सव्वापाचला चिटकूलला जायला निघायचे होते. साडेआठच्या सुमारास जेवण तयार आहे अशी आरोळी ऐकू आली व लगेच जेवायला पळालो. बघतो तर तिथे मारवाडी लोकांनी किशोरची मस्त गाणी लावली होती. म्हणजे मैफिल आधीच जमली होती. आम्ही पण सुग्रास जेवण ताटात घेऊन मैफिलीत सामील झालो. जेवणानंतर तंबूबाहेर थोडावेळ खुर्चीत बसून विचारमंथन केले मग मात्र हे आपले काम नोहे हे लक्षात येऊन लगेच झोपायला पळालो.
---
सर्व भाग
https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप
मस्त फोटोज. दगडातून खणून
मस्त फोटोज. दगडातून खणून काढलेली खिंड मस्त आहे.
एकावर एक दगड रचण्याचा उद्योग - हे काय प्रकरण आहे?
स्पिती - मंतरलेले दिवस ! ....
स्पिती - मंतरलेले दिवस ! .... भाग ४?? बहुधा हा सहावा भाग आहे. तसेच प्रवासवर्णन जरा अधिक विस्ताराने लिहावे, ह्या आधीचे भाग त्रोटक वाटत आहेत.
मैत्रेयी , अगं लगोरीसारखं
मैत्रेयी , अगं लगोरीसारखं एकावर एक दगड रचून ठेवायचे जमतील तेवढे, हा उद्योग ! लडाखमध्ये हे असा जागोजागी करून ठेवलेले दिसते स्थानिकांनी. त्यामागे काही कारण असणार धार्मिक वगैरे. आणि किती दगड रचायचे ते पण असणार. पण आपण पाहिजे तेवढे रचतो
राहुल, मी रोज एका दिवसाचं
राहुल, मी रोज एका दिवसाचं वर्णन टाकतो आहे. बघतो अजून काही आठवतं का प्रवासातलं आणि वाचनीय असेल तर नक्की भर घालेन.
घाटाचे फोटो मस्त आले आहेत.
घाटाचे फोटो मस्त आले आहेत.