दरवाजा १

Submitted by अविनाश जोशी on 26 October, 2017 - 05:47

दरवाजा
-१-
समीर. वय २८.
समीर पटेल हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते.
लहानपणीच आईवडिलांचा इस्ट आफ्रिकेत अपघाती मृत्यु झाल्यामुळे समीर मुंबईत काकांकडेच वाढला होता.
त्याचे काका म्हणजे मुंबई शेअरबाजार आणी मेटलंमार्केट मधे एक मोठे प्रस्थ होते. लग्नाशिवायच होते आणी समीरचे पालन त्यांनी मुलासारखे केले होते.
मलबारहील वर बंगला असल्याने उच्च्भ्रु आणी उच्चपदस्थ लोकात उठबस होती.
पुणे, अलीबाग, सुरत अशा प्रॉपर्टीज होत्या. बऱ्याच कंपन्यात गुंतवणूक होती.

समीर तर हीरोच होता. गोरापान आणी राजबींडा तर होताच पण त्याचे डोके अफ़लातुन होते. IIT मधुन बी टेक झाल्यावर त्याने लॉ ची डिग्री पण घेतली होती.
काका गेल्यावर प्रॉपर्टी संभाळणे, फास्ट गाड्या व मोटरबाईकस फीरवणे आणी उचापती करणे एवढाच त्याचा उद्योग होता. मेंदुला झीणझीण्या आणणारी कोडी त्याला फार आवडत. बरेच अवघड आणी नाजुक प्रसंग त्याने सोडवले होते.
पोरींच्या बाबतीत तो एकदम विरुद्ध होता. म्हणजे पोरी त्याच्याभोवती फीरायच्या पण हा त्यांना कटवायचा.

कुणाल कोहली.
खबर वर्तमानपत्र व चैनेलचा वार्ताहर. सुंदर पण अघळ पघळ, अफाट मित्रमंडळ.
बोगोर बुदूर केस नंतर एकदम फेमस.
समीर बद्दल आदर आणि प्रेमही. त्याच्या व्यवसायामुळे त्याचे भरपूर फिरणे होत असे आणि गावागावातून दोस्त बनत असत. काही घडले की कुणालला निमंत्रण यायचे. बहुतेक वेळेला समारंभ बातमी करता फार जवळची ओळख नसली तर तो टाळायचा.
समीरकडे जायला आणि आळसात वेळ घालवायला त्याला फार आवडायचे. दोघेही मलबार हिल वर राहायचे. कुणाल दर्यासारंग नावाच्या बिल्डिंगमध्ये तर समीरचा जवळच लालमहाल हा आलिशान बंगला होता.
समीरच्या बंगल्यावर लोक खुष असत. दोन अवाढव्य जर्मन शेफर्ड्स, स्वीमींग पुल, मोठी बाग आणी खायचे लाड पुरवणारा तानाजी. पिकनीकला आल्यासारखेच वाटायचे. अर्थात बंगल्यात प्रवेश मर्यादित लोकांनाच होता. त्यात एक कुणालचेही नाव होते.

अशाच एका आळसलेल्या सकाळी दोघेही लॉनवर समुद्राकडे टक लावून रिक्लायनरवर बसले होते. जोडीला तानाजीची वाफाळलेली कॉफी आणि स्विस ऑम्लेट असा भरभक्कम मेनू होता. दोघेजणही शांत होते. बोलण्यापेक्षा शांततेतच वेळ घालवत होते.
अचानक कुणालचा मोबाईल वाजला. फोन वर नाव बघून कुणालने बंद केला.
दोन मिनिटांतच परत तोच फोन आला. कुणालने परत बंद केला.
" कुणाल फोन घे तरी किंवा स्विच ऑफ कर " समीर
" अरे वार्ताहराला फोन स्विच ऑफ करून चालत नाही. आणि तो नंबरही ओळखीचा नव्हता. "
" आणि न घेतलेला चालतो?.
" बरं घेतो आता आला तर "
दोघांनाही कल्पना नव्हती कि फोनमुळे ते कशात गुंतणार आहेत.
परत दोन मिनिटांत त्याच नंबर वरून फोन आला ..

-२-

कुणालने फोन उचलला
" हैलो "
" कोण कुणाल का?"
"बोलतोय"
" मी रमेश बोलतोय. रमेश शेटे,"
" माझ्या लक्षात नाही आले"
'खबर मध्ये काम करणाऱ्या मोनाचा मी मावसभाऊ"
'मग?"
" तिनेच मला तुमचा नंबर दिला"
"का?"
"मी फार अडचणीत आहे हो
' पैसे हवेत का? '
'नाही नाही. तुम्ही प्लीज इकडे याला का?'
'हे बघ रमेश, मला काहीही कळले नाही . जरा नीट आणि सविस्तर सांगाल का?'
'मी रमेश शेटे. कणकवलीला माझा हॉटेल व्यवसाय आहे. खरेदी करण्याकरिता मी आसपासच्या गावातून फिरत असतो. कुडाळला माझे मामा असतात.
' तू आता मला तुझी सगळी वंशावळ सांगणार आहेस का?
' नाही या मामांबद्दलच मला सांगायचे आहे आणि त्याकरताच तुमची मदत मला हवी आहे
' अरे मी तर वार्ताहर मी कसली मदत करणार?
' तुम्हालाही बातमीसाठी खाद्यमिळणारी गोष्ट आहे
' काय ?
'बातमी अशी आहे कि येथून लोक बेपत्ता होत आहेत. गेल्याच महिन्यात येथून ७ ते १० लोक नाहीशी झाली आणि कालपासून माझा मामेभाऊ सुहास हि बेपत्ता आहे
' हे बघ रमेश कोणत्याही पुराव्याशिवाय मी बातमी देऊ शकत नाही , आणि मी काय मदत करणार ? तुला पोलिसांकडे जायला हवं
' पोलीसपण काही मदत करत नाहीत फारतर ते प्राथमिक अहवाल लिहून घेतात आणि थांबतात त्याचे कारण म्हणजे येथील भॊगोलिक परिस्थिती
स्पीकरवर फोन असल्यामुळे समीर हि सर्व ऐकत होता तो म्हणाला
' रमेश तू गोंधळून गेलेला आहेस. मी समीर. कुणालचा मित्र. तू जरा पहिल्यापासून व्यवस्थित सांगशील?
' मामा मूळचे झाराप या गावाचे तिथे त्यांची शेती वाडी व घराण्यात चालत आलेला मोठा जुना गढीसारखा वाडा आहे. त्यांचे पूर्वज शिवकालीन सरदार होते. अफाट शेती, गडी माणसं असा मोठा राबता होता.
' मग कुडाळचे काय ?
' मुलं मोठी झाल्यावर ती शहरात येऊन पांगली आणि त्यानंतर ते कुडाळला स्थायिक झाले. झाराप गाव येथून अर्ध्या तासाच्या अंतरावर असल्यामुळे जाणेयेणेही सोयीचे होते. त्यात झाराप हे कोकण रेल्वेचे स्टेशन असल्यामुळे माल मुंबईला पाठवणे सोयीस्कर होते '
' ते कुडाळला एकटेच राहत होते का?
'' हो. त्यांचा एक जुना गडी तुका हा त्यांच्याबरोबर राहतो आणि त्यांचीच एक बालविधवा बहीण मंदा घराची देखभाल करते . दोघेही त्यांच्याबरोबर झाराप पासून आहेत
' मग हा सुहास कुठून मध्येच उपटला.?
' तो मुंबईला नोकरीला होता त्याची अचानक नोकरी गेली त्यामुळे तो एकटाच मुंबईत राहत होता आणि त्याची बायको आणि मुलगा काही दिवसांकरिता कुडाळला आले होते. त्याला दुसरी नोकरी पालघरला लागणार होती त्यामुळे त्याने स्वतःचे राहण्याचे ठिकाणही पालघरला हलवायचे ठरविले '
' मग काय झाले ?
' नशीब त्याच. पालघरला निघालेली बायको आणि मुलगा , जी बस पूल तुटून सावित्री नदीत पडली त्यात होते. त्यांची प्रेते सुद्धा हाताला लागली नाहीत.
' अरेरे !
' सुहास सर्व सोडून कुडाळला आला होता. त्याने बायको आणि मुलाला शोधण्याकरिता जंग जंग पछाडले पण काही उपयोग झाला नाही
' मग त्याला वेडच लागले असेल ?
' हो ना तो भ्रमिष्ठासारखा वागायला लागला. सहा महिने असेच गेले देवदेवळे उपासतापास व्रतवैकल्ये सर्वकाही त्याने केले. शेवटी त्याने झारापच्या वाड्यात जायचे ठरविले.
' एकटाच?
' हो घरातल्या सर्वानी त्याला बरेच समजाविले पण तो कोणाचे ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता.

' मग काय झाले?
' सहा महिन्यापूर्वी वाड्याची तात्पुरती साफसफाई करून तो राहायला गेला. तीन चार महिने शांततेत गेले मग हळूहळू अफवा पसरू लागल्या.
' कसल्या?
'हळूहळू गडी माणसं बेपत्ता होऊ लागली. त्यांच्या बेपत्ता होण्यास घरगुती किंवा आर्थिक करणे नव्हती आणि मग एकेदिवशी महिन्याभरापूर्वी सर्व गडी काम सोडून निघून गेले . ' मग सुहास परत आला का?
' नाही. छोटे मालक तर आनंदात दिसत होते
' आनंदी राहण्याचे कारण
' काही कल्पना नाही पण त्यानंतर गावातील माणसं बेपत्ता होऊ लागली.
' अरे बापरे !
' गाव तस छोटं त्यामुळे अफवा पसरायला वेळ लागला नाही. ' गावाच्या मताने ते बेपत्ता होणे छोट्या मालकांमुळेच होत होते. आणि आता तीन दिवसापूर्वी सुहास मालक हि बेपत्ता झाले.
' मग काही शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही ?
' केले ना. पोलीस कंप्लेंट केली आम्ही तिघांनी जाऊन गढीवर शोधला. ते एकटेच राहत असल्यामुळे बराचसा भाग बंदच होता. त्यांचे सर्व कपडे वस्तूही जागच्या जागीच होते. हे प्रकरण आमच्या आकलनाबाहेर गेले आहे म्हणून तुम्हाला फोन केला
' अरे मी तर वार्ताहर आहे
' रमेश, मी समीर बोलतोय मी कुणालबरोबर आलो तर चालेल का?
' पण आपण कोण ?
' अरे रमेश माझ्या बरोबर समीर आला तर निश्चितच या कोड्याचा उलगडा होईल. तुला थोड्यावेळाने फोन करून कार्यक्रम कळवतो.
' असे म्हणून कुणाल ने फोन बंद केला
'
-३-
' समीरच्या चेहऱ्यावर आळस जाऊन पूर्ण उत्साह पसरला होता. बऱ्याच दिवसांनी त्याच्या योग्य काही कामगिरी मिळेल याची खात्री होती. त्याच्या बऱ्याचशा भानगडी व उचापती अशा छोट्या गोष्टीतच सुरु झाल्या होत्या आणि प्रत्येक गोष्टीतच त्याच्या बॅंकबॅलन्स वाढत होता.
' अरे कुणाल, कुडाळ हे गोव्याजवळच आहे
' मग तुझा काय विचार आहे ?
' सोप्पं आहे आपण विमानाने गोव्याला जाऊ. एअरपोर्ट वरच एखाद्या महिन्याकरिता कार ठरवू किंवा रमेश ला एखादी स्थानिक कार अरेन्ज करायला सांगू .
' तानाजीला बोलावूकी
' नको लोकल गाडी असली कि लोकांना संशय येत नाही आणि बातम्या काढणे ही सोपे होऊन जाते.
' हो आणि त्याला तिथले रस्ते ही माहित असतात.
' चल मग वेळ न घालवता संद्याकाळच्या फ्लाईटच बुकिंग कर. तुझे म्हणणेही बरोबर आहे आपण तानाजीलाही बरोबर घेऊ.
' म्हणजे तीन बुकिंग करायची का?
' हो तुझे सामान आवरून तू इकडे ये आपण एअरपोर्टला जाऊ.
' बरं पण संध्याकाळी का ? दुपारच्या फ्लाईट चे का नको ?
' अरे मला तयारी करायला वेळ लागेल आणि शक्यतो आपण तिघे जातोय हे लोकांना न कळलेले बरे '
' ठीक आहे.
' कुणालने तेथूनच समीर, तानाजी आणि स्वतःचे बुकिंग केले .
जेट एअरवे चे विमान संध्याकाळी ७ वाजता होते त्यामुळे ते दाबोलीमला आठ साडेआठ पर्यंत पोहचले असते. तिथून कुडाळ अंदाजे पंचाहत्तर किलोमीटर वर आहे त्यामुळे चांगला ड्राइव्हर असेल तर ते दहा पर्यंत रमेशकडे पोहचले असते.
एका दृष्टीने कुणाच्या नकळत रमेश च्या मामाकडे जायला ती सोयीस्कर वेळ होती.
बुकिंग झालयावर त्यांनी रमेशला फ्लाईट नंबर कळविला आणि साडेआठला गाडी एअरपोर्टला पाठवायला सांगितले. शक्यतो मामाची गाडी नको असे समीर ने त्यांना सांगायला सांगितले. कारण सरळ होते. ती गाडी ओळखीची असल्यामुळे लोक तोंड उघडणार नाहीत.
रमेशच्या ओळखीचे बरेच टुरिस्ट ऑपरेटर्स होते त्यामुळे त्याने कणकवलीच्या हॉटेलमध्ये फोन करून गाडी पाठवायला सांगितले.
त्यानंतर त्याने कुणालला फोन केला
' कुणाल दाबोलिंम एअरपोर्टला साडेआठ वाजता बीएमडब्लू किंवा मर्सडीज तयार असेल "रमेश'
'अरे एवढ्या महागड्या गाड्या कशाला ' कुणाल '
'अरे कुणाल येथे या सामान्य गाड्या आहेत बहुतेक टॅक्सी इंपोर्टेड असतात ' रमेश '
' ठीक आहे तुझी मर्जी ' कुणाल '
'आणि हे बघ कुणाल मी स्वतःच एअरपोर्टवर तुम्हाला घ्यायला येईन ' रमेश '
' अरे तू कशाला त्रास घेतोयस ' कुणाल '
' अरे आपल्याला एअरपोर्ट ते कुडाळ जाईपर्यंत दीड दोन तास सविस्तर बोलता येईल कि जे मामाच्या घरी बोलणे अवघड जाईल. ' रमेश '
'फोन झाल्यावर समीर ला सांगून तो दर्यासारंग मध्ये गेला. फ्रेश होऊन आटपेपर्यंत तीन वाजलेच होते. समीरकडे तो चार वाजता पोहचला. त्याची स्वतःची एक कॅरीबॅगच होती. पण समीरच्या अवाढव्य बॅगा, सॅक असे सामान बघून ती हादरलाच. समीर अरे एवढे सामान ? ' कुणाल '
अरे किती दिवस राहायला लागेल याचा भरवसा नाही आणि कोणकोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल याचाही भरवसा नाही त्यामुळे सर्व तयारीनिशी गेलेले बरे आणि खर सांगायचं तर एवढं तरी सामान पुरणार आहे कि नाही याबद्दल शंकाच आहे ‘समीर’
अरे तुला काय वाटते आहे ? ' कुणाल '
' एखादा माणूस बेपत्ता होणे किंवा दोन तीन दिवस न सापडणे हे समजू शकतो पण एकाच गावातील पंधरा वीस माणसे बेपत्ता होणे , दोन तीन महिन्यानंतर ही त्यांचा तपास न लागने किंवा त्यांची प्रेते हि न सापडणे हे सर्व संशयास्पद आहे ' समीर '
' तुझा काय अंदाज आहे ?' कुणाल '
' कुणाल मी वस्तुस्थिती पाहिल्याशिवाय कसलेच अंदाज बांधत नाही. तेथे गेल्यावर परिस्थिती पाहू आणि मग ठरवू. तिथे जाईपर्यंत हा विषय बंद.
' दोघेही सांताक्रूझ टर्मिनल २ ला गेले. नशिबानी विमान वेळेवर होते.
' विमान सुरूहोताच समीर झोपी गेला. मिळेल तेव्हा विश्रांती घेणे आणि हवे तेव्हा तीन तीन दिवस जागणे हे त्याच्या हातात होते त्याची झोप हुकमी होती.

-४-

विमान वेळेवर दाबोलिंमला पोहोचले सामानाचा थोडाफार गोंधळ सोडल्यास सर्व व्यवस्थित होते.
रमेश बाहेर कुणाल कोहली अशी पाटी घेऊन उभाच होता त्यांन एक मोठी लँडरोव्हरआणली होती. गाडी पाहून समीर खुश झाला.
गाडीत तानाजीने सामान टाकले आणि ड्राइव्हर शेजारी जाऊन बसला. गाडी लंडन टॅक्सी सारखी दोन कंपार्टमेंटमध्ये होती.
मागच्या कम्पार्टमेन्टमध्ये समोरा समोर सीट्स होत्या. ड्राइव्हर कम्पार्टमेन्ट आणि पॅसेंजर कम्पार्टमेन्ट मध्ये एक सरकणारी काच होती त्यामुळे मागचे संभाषण ड्रायव्हरला ऐकू जाणे शक्यच नव्हते . गाडीत छोटा फ्रीज, बार आणि ओव्हन सुद्धा होता. तिघे गाडीत बसल्यावर रमेशने माईकवरून ड्रायव्हरला पत्ता सांगितला.
'बर तुम्ही दोघे काही थोडेफार खाणार आहात का?? ‘रमेश’
' काहीतरी थोडेसेच दे ' कुणाल '
' मी तुच्यासाठी सावंतवाडीवरून खास पफ आणि पेस्ट्री आणल्या आहेत 'रमेश '
' अरे मलबार हिलवर राहणाऱ्या लोकांना सावंतवाडीच्या पदार्थाचे काय कौतुक ' कुणाल '
' सावंतवाडीत तीन हजारहून जास्त बेकरी आहेत आणि इतकी व्हरायटी कुठेच सापडणार नाही. पूर्वीपासूनच गोवा हे त्याचे मुख्य विक्री केंद्र आहे. ' समीर'
' पफ आणि पेस्ट्री चा समाचार घेतल्यानंतर खास अरेबियन कॉफी चे मग्स घेऊन तिघांनी बोलायला सुरवात केली.
' रमेश काय भानगड आहे ते सांगशील का ? ' कुणाल'
कुणाल अरे मामांचे सुखी कुटुंब होते
' मामा -मामी दोन मुलं सुहास आणि सुभाष आणि एक मुलगी सुरेखा. मामांची बिचारी बहीण काही कळायच्या आताच विधवा झाली आणि ती मामांकडे राहत होती. माझी आई ही दुसरी बहीण . प्रशस्त घर, नारळ, पोफळी, आंबा, आणि काजूच्या बागा. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं हे कुटूंब ' रमेश '
' मग ? ' समीर'
' मुलं हळूहळू मोठी होत होती. शिक्षणाची सोय सावंतवाडीला चांगलीच आहे. तिन्ही मुलं हुशार होती आणि अभ्यासात, खेळात नेहमीच पुढे असायची. सुभाष इंजिनियर करण्यासाठी पुण्याला गेला तर सुरेखा मेडिकल करिता गोव्याला गेली. सुहास सगळ्यात लहान त्यामुळे शिक्षणाकरिता बाहेर पाठवायला घरच्यांचे मन तयार नव्हते.
सावंतवाडीवरूनच त्याने बी. एस सी. केलं आणि वेंगुर्ल्याहून एम. एस. सी. ऍग्रो केलं. त्याला संशोधनाची प्रचंड आवड होती. कुठलेही कुतूहल त्याला स्वस्थ बसू द्यायचे नाही. ' रमेश '
' आत्ता पर्यंततर सगळे व्यवस्थित दिसतंय मग फाटाफूट कशी झाली ? 'समीर '
' त्याच्या तीन वेगवेगळ्या कथा आहेत. सुभाष बी.ई झाल्यानंतर अमेरिकेला निघून गेला तो कायमचाच. त्याला शेती-वाडी मध्ये काहीही रुची नव्हती. सुरेखा एम. बी. बी. एस. झाल्यानंतर तिने मुंबईत एम. डी. केलं आणि तिथल्याच एका डॉक्टर बरोबर लग्नही केलं. तिला दोन गोंडस मुलं आहेत व अधून मधून ती चक्कर टाकते. ' रमेश '
'सुहासच काय झालं ? ' समीर'
' त्याची कथा वेगळीच आहे. एम एस सी केल्यानंतर त्याला शेती मध्ये वेगवेगळे प्रयोग करायचे होते त्याकरिता तो नैनिताल ला गेला. त्याच्या सांगण्याप्रमाणे फक्त नैनिताल मध्येच ऍग्रीकल्चर इंजिनियर चे शिक्षण मिळत होते. दोन तीन वर्ष नैनिताल मध्येच तो राहिला. इकडे मामींचे निधन झाले आणि त्यामुळे मामा एकटेच पडले. एवढ्या मोठ्या गढीतल्या खोल्या कित्येक वर्ष बंदच होत्या त्यात आणखी काही खोल्यांची भर पडली.
शेवटी मामांनी कुडाळला एक छोटासा बंगला बांधला आणि मंदा मावशीसोबत ते तिकडे राहायला गेले. ' रमेश '
' अरे मग वाडीचे काय ? ' समीर '
वाडीबद्दल अनेक लोकांनी त्यांना विकण्याची गळ घातली. भरपूर पैशाचे अमिष दाखविले पण मामाची आशा होती कि सुहास परत येऊन त्या सगळ्याची व्यवस्था बघेल. ' रमेश '
' पण तो येईपर्यंत काय ? "समीर '
' एकतर दोन तीन वर्षांचाच प्रश्न होता आणि सर्व गडीमाणस विश्वासू होती. पाच ते दहा टक्के चोऱ्या व्हायच्या पण नव्वद टक्के तरी हाती लागायचं. त्यातून मामांची दिवसाआड चक्कर असायचीच त्यामुळे गडी पण दबून होते.
' पण मग सुहास केंव्हा परत आला?? ' समीर '
' सुहास दोन तीन वर्षांनी परत आला पण आला तो बायकोला घेऊनच. ती मुलगी नैनिताललाच शिकायला होती आणि डेहराडून ची होती. तिचे वडील सैन्यात मोठे अधिकारी होते आणि एकूलती एकच होती. साहजिकच ती अत्यंत लाडात वाढलेली होती. 'रमेश'
'तिच्या घरच्यांचा काही विरोध झाला नाही का ? 'समीर '
' नाही कारण विरोध करायला घरी कोणीच नव्हते. आई वडील एका अपघातात गेले आणि ती काकांकडे राहत होती. 'रमेश '
' मामांची काय प्रतिक्रिया ?? 'समीर '
' मामानी अत्यंत समंजसपणे घेतले. नवीन सुनेचे स्वागत केले आणि आठ दहा दिवसातच सुहास ने आणि त्याच्या बायकोने झाराप च्या घरात प्रवेश केला. घर परत एकदा गजबजले. 'रमेश'
' पण सुहास तर मुंबईत होता ना ? 'समीर '
' झाराप ला गेल्यावर तीन चार महिने ठीक गेले पण नंतर शहरी वातावरणात वाढलेली सुहासिनी म्हणजे सुहासची बायको तिच्या शेतीबद्द्लच्या कल्पनेत भरमसाठ पाऊस, वेळीअवेळी कुठेही निघणारे साप, विंचू, घिरट्या घालणारा बिबट्या अशा कशाचाच समावेश नव्हता त्यामुळे ती नेहमी दुखी राहू लागली. शेवटी मामांनी सुहासला सांगितले कि त्याने वाडीचा विचार सोडून द्यावा आणि तिला हवी असेल ती नोकरी पत्करावी. 'रमेश '
' त्याचवेळी नवी मुंबईत एक अत्याधुनिक शेतीचा प्रकल्प उभा राहत होता आणि अशा प्रकारची शेती भारतात प्रथमच होत होती. साहजिकच सुहासने अर्ज पाठिवला त्याची ताबडतोब निवड झाली. कंपनीने त्याला खारघरला राहायला प्रशस्त फ्लॅट दिला. 'रमेश '
'शेतीचा प्रकल्प म्हणजे काय? ' कुणाल '
' मलाही काही कल्पना नाही पण सुहास जे सांगत असे त्यावरून हि शेती व्हर्टिकल फार्मिंग टाईप होती आणि त्यात जमिनीशिवाय पिके निघत होती. सुहास ला फारच आवडलेला प्रोजेक्ट होता. त्यातच त्याच्या मुलाचा जन्म झाला त्यामुळे ते त्रिकोणी कुटुंब फारच सुखी होते. अधून -मधून मामा तिकडे जायचे किंवा सुट्टी घेऊन ती तिघे इकडे यायचे. एक दिवस अचानक ती जागा नव्या होणाऱ्या एअरपोर्ट साठी संरक्षित झाली आणि कारखाना बंद झाला. सुहासने बायको आणि मुलाला काही दिवसांकरिता कुडाळला पाठविले आणि तो नवीन नोकरीच्या शोधकार्यास मुंबईतच राहिला. मुंबईचा प्लॅट हि त्याला आता कंपनीला परत द्यायचा होता. आता कंपनीचं बंद झाली होती त्यामुळे तो चांगल्याच पेचात सापडला होता. 'रमेश '
'मग त्याने सरळ कुडाळ ला किंवा झाराप ला जायचे ?
' त्यात मुख्य अडचण बायकोची होती कुठल्याही परिस्थितीत तिची खेडवळ गावात राहायची तयारी नव्हती. 'रमेश'
' मग हे कोडे कसे सुटले ?? 'समीर '
' एक दिवशी सकाळीच कंपनीच्या संचालकांचा फोन आला.
' सर मी नोकरी शोधतो आहेच आणि प्लॅट हि दोन तीन दिवसात परत करेन.
' सुहास नोकरी शोधत बसूच नकोस आम्ही हा प्लांट उचलून पालघर ला नेतोय त्यामुळे तू पालघरला यावे अशी आमची इच्छा आहे.' संचालक'
' सुहासच्या मनात एकच होत कि बायको पालघरलाही खेड म्हणाली तर काय करायचं?
' आणि हे बघ सुहास पालघरला तुला आम्ही कारखान्याजवळच एक प्रशस्त बंगला देत आहोत आणि फॅक्टरी इथून हलेपर्यंत पुढचे दोन तीन महिने आत्ताचा प्लॅटही तुझ्याकडेच राहुदेत. 'संचालक'
' कंपनीला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता एवढे आवडते काम व सोयी त्याला दुसरीकडे मिळणे कठीण होते. त्याच रात्री त्याने बायकोला फोन करून ही बातमी सांगितली आणि ताबडतोब मुंबईला येणास सांगितले. 'रमेश'
' ठीक आहे. असं झाल तर ' समीर '
' आपण नंतर बोलूया. मामांचा बंगला आला.

-५-
मामांचा बंगला छोटा पण टुमदार व अत्याधुनिक होता. गाडी बंगल्याच्या पोर्चमध्ये गेल्यावर मामा स्वतःच स्वागतासाठी बाहेर आले. रमेशने यांचे सर्व सामान दोन खोल्यात लावायला सांगून तानाजी व ड्रायव्हरला आउटहाऊस मध्ये राहायला व अगोदर जेवायला सांगितले.
' रमेश हे कोण पाहुणे म्हणायचे ? "मामा'
' मामा, हा कुणाल आपल्या मोनाच्या ऑफिस मध्ये वार्ताहर आहे. घरचा गडगंज श्रीमंत आहे. मलबार हिल ला राहतो 'रमेश'
' आणि हे दुसरे कोण? 'मामा '
' हे कुणालचे मित्र समीर आणि तो त्यांचा नोकर तानाजी. त्यांच्याबद्दलची माहिती कुणाल च सांगू शकेल. 'रमेश'
'
मी कुणाल चा मित्र समीर पटेल. एका प्रकरणात माझी आणि कुणालची ओळख झाली आणि मैत्रीही झाली. तानाजी हा माझा नोकर नाही तर जीवास जीव देणारा मित्र आहे. 'समीर'
' मामा समीरने सांगितलेले खरे आहे पण सर्व खरे नाही याचा मलबार हिलवार आलिशान बांगला आहे. संपत्ती म्हणाल तर अब्जाधीश आहे. शिक्षणानं बी टेक आणि एम बी ए आहे. अतिशय तल्लख बुद्धिमत्ते मुळेअसंख्य कोडी सोडविण्यात आणि गुन्हे उजेडात आणण्यात मुंबई पोलिससुद्धा याची मदत घेतात. रमेशचा फोन आला आणि तोच म्हणाला कि आपण दोघेही जाऊ. 'कुणाल'
' अरे बापरे ! एवढ्या मोठ्या पाहुण्यांची गरिबांच्या झोपडीत कशी काय सोय लागणार? 'मामा'
'मामा घराच्या भिंती, दार, आणि फर्निचर म्ह्नणजे घर नव्हे, त्यातली माणसं म्हणजे घर 'समीर
'खर रे पोरा 'मामा'
' चला मामा आम्ही जरा फ्रेश होतो ' कुणाल'
' चटकन आवरा आणि जेवायला चला फार उशीर झाला आहे. मी व मंदा तुमच्यासाठी थांबलो आहे. बाकीचं उद्या सकाळी बोलू. 'मामा'
' नाही नाही जेवून घेऊ. पण जेवणानंतर या विषयावर बोलायला लागू कारण उद्या सकाळी आम्ही झाराप ला जायचा विचार करतोय. 'समीर'
' अरे दमलाअसाल प्रवास करून ' मामा'
' नाही हो विमानाने तर आलो आणि वेळ जेवढा कमी वाया जाईल तेवढे बरे. 'समीर'
' दोघांनी फ्रेश होऊन जेवण केले. जेवणात छानपैकी ताज्या माशाची करी आणि कालव घातलेल्या बिरड्या होत्या. त्यामुळे समीर खुश होता. जेवणानंतर तिघेही व्हरांड्यात खुर्ची टाकून गप्पा मारायला बसले. बाहेर मोकळी हवा असल्यामुळे गारवा वाटत होता.

-६-
मामा मी यांना थोडक्यात तिन्ही मुलाच्या पुर्व आयुष्याची कल्पना दिली आहे. सुहास ने बायको आणि मुलाला मुंबईला बोलावून घेतले हेही सांगितले आहे. पुढचे तुम्हीच सांगितलर तर बरे होईल. 'रमेश'
'मी शामराव देसाई, रमेश ने तुम्हाला झाराप आणि मुलांबद्दल तसेच शेतीवाडी बद्दल सांगितले असेलच त्यामुळे ते मी परत सांगत नाही. एकच सांगायचं म्हणजे सुहास जेव्हा झाराप ला एकटाच राहायला गेला तेव्हा आम्ही त्याला चार पाच खोल्या साफ करून दिल्या. वाडा तीनशे वर्षाहून जास्त जुना आहे पण सुस्थितीत राखला आहे. खरं सांगायचं तर सर्व वाडा आम्ही सुद्धा नीट फिरून बघितला नाही. कित्येक खोल्या वर्षनुवर्षे बंदच असतात. पन्नास साठ वर्षांपूर्वी माझ्या लग्नाच्या वेळेला वाडा बऱ्यापैकी उघडला होता. तेव्हा काका होते, वडील होते आणि पाहुण्या रावळ्यांनी वाडा गजबजून गेला होता. त्यावेळी वाड्याच्या बऱ्याच खोल्या उघडून साफ झाल्या होत्या. माझ्या काकांनी कधी लग्नच केले नाही व मरतांना सगळी संपत्ती वडिलांना देऊन टाकली. माझ्या तीन मुलांपैकी सुभाष ने अमेरिकेतच लग्न केलं. सुरेखा ने तर कोर्ट मॅरेज केलं आणि सुहासच लग्न कुडाळला झालं. म्हणजे लग्ननानंतर चे रिसेप्शन झाल. थोडक्यात पन्नास वर्षात तो वाडा पुन्हा गजबजलाच नाही. आठ दहा वर्षांपूर्वी मी कुडाळला राहायला आल्यापासून तर त्याची अवस्था झाली होती. नाही म्हणायला दिवाळीच्या अगोदर साफ-सफाई बरीचशी व्हायची आणि आवश्यक ती डागडुजी व रंगकाम व्हायचे. काकांचा देवावर फार विश्वास होता. ते सतत पूजा-अर्चेत गढलेले असायचे. काका गेल्यावर काही मोठ्या पूजा झाल्याचं मला आठवत नाही. 'मामा'
' मामा तुम्ही थोडक्यात सर्व चित्र आमच्या डोळ्यासमोर उभे केले ' समीर'
' पण सुहासने बोलाविलेल्या दिवशी काय झाले ? 'कुणाल'
' सुहासचा सकाळी साडे दहा ला फोन आला त्याने त्याच्या बायकोआणि मुलाला लगेच येणास सांगितले. तीन चार दिवस पाऊस लागून राहिला होता व घरात बसून सगळेच कंटाळले होते. कोणतीही बस त्यादिवशी जाणार नव्हती. गोव्यावरून बस जातात पण थोडी रिस्क होती. त्यादिवशी नेमकी आवस हि होती. मी सुनेला बरेच समजावून सांगितले पण तिची थांबायची तयारी नव्हती. लग्झरी नाहीतर सावंतवाडीवरून सुटणाऱ्या एस टी बस ने जाईन असं ती म्हणाली. समजावून सांगून काहीच उपयोग नव्हता. मी गड्याला पाठवून एस टी रिझर्वेशन आणले आणि संध्याकाळी मुंबईच्या गाडीत बसविले. घरी आलो तर झोप लागतच नव्हती.
मनात अशुभ शंकांनी घर केल होत. पण पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नव्हती.
पहाटे साडेतीनला कधीतरी डोळा लागला आणि जाग आली ती गडी व समोरचा चंदुलाल यांनी हलवल्यामुळेच. चंदुलाल ला पाहताच मंदानं चहा टाकलाच होता चहा पिऊन होताच चंदुलाल मला म्हणाले आपल्याला महाडला निघायला पाहिजे. काय झालं ते सांगायची त्यांची तयारी नव्हती. थोडेसे आवरून मी, चंदुलाल आणि एक नोकर महाडकडे निघालो. महाडला पोहचायला दुपारचे तीन वाजले होते. तुफान पाऊस कोसळत होता. महाडच्या ब्रिज च्या अलीकडेच पोलीसांनी गाडी वळवून दुसऱ्या बाजूने जायला सांगितले. पुलावर व नदीच्या दोन्ही काठावर भरपूर गर्दी जमली होती. सावित्री नदीने रौद्र रूप धारण केले होते. मला वाटले पूर पाहायला लोकं जमली असावीत. भरपूर पोलिसांचाही बंदोबस्त होता. वार्ताहर आणि टीव्हीकॅमेरामनही फिरत होते. पुलाच्या मध्यभागी जाऊन बघितले तर शेजारचा पूल नदीत कोसळला होता. चंदुलाल मला म्हणाले शामराव आपली माणसं ज्या गाडी ने गेली आहेत ती बस नदीत कोसळून वाहून गेली आहेत. मन घट्ट करा. जेथे सर्व नातेवाईक जमली आहेत तेथे जाऊ. माझे मन इतके बधिर झाले होते कि माझ्या तोंडून एक शब्द फुटत नव्हता 'मामा'
चंदुलाल बरोबर मी नातेवाईक जमले होते त्या ठिकाणी गेलो. तिथे गेल्यावर कळले कि दोन तीन बस आणि सात आठ गाड्या वाहून गेल्या होत्या. त्या दिवशी ज्या लोकांचे नातेवाईक प्रवास करत होते अशा लोकांचा मोठा समुदाय जमला होता प्रत्येकाला अशा होती कि त्यांचे नातलग कुठेतरी सुखरूप असतील आणि सापडतील. पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी त्यांच्या प्रयत्नांची शर्थ करत होते. नदीत पडलेल्या बस व गाड्या यांचा पत्ता लागला नव्हता. नदीचे पाणी इतक्या जोरात वाहत होते कि शोध घेणे अवघड होते. संध्याकाळपर्यंत आपत्ती कालीन व्यवस्थापनाच्या तुकड्याही येऊन पोहचल्या, वाऱ्यात, पावसात आणि अंधुक प्रकाशात त्यांनी काम सुरूच ठेवले होते ' मामा '

' मग सुहास ला केव्हा कळवलं ? 'कुणाल'
येथे पोहचल्यावरच खरी बातमी कळल्यामुळे त्याला फोन केला. त्याचा फोन लागत नव्हता. त्यामुळे त्याला संघ्याकाळीच कळाले. तो तातडीने टॅक्सी घेऊन निघाला आणि पहाटे पाच च्या सुमारास पोहचला. आल्या आल्या आम्हाला पाहताच त्याला रडू कोसळले. त्याचा बायकोवर फार जीव होता. ती अशी जाऊ शकते हि कल्पनाच त्याला सहन होत नव्हती.

-७-
दुसऱ्या दिवशी शोध कार्य पुन्हा सुरु झाले. आत्तापर्यंत एकही प्रेत अथवा जिवंत व्यक्ती सापडली नव्हती. शोध कार्याकरिता नौदल व वायुदलानीही मदत करायला सुरवात केली होती. दुसरा दिवस गेला तरीसुद्धा कुठलाही थांगपत्ता लागला नव्हता. अफवा तर बऱ्याच पसरत होत्या. बस समुद्रात वाहून गेल्या, रत्नागिरीमध्ये काही प्रेते आढळली. महाडच्या एका रिसार्टच्या पाठीमागे प्रेते आढळली अश्या वेगवेगळ्या बातम्या येत होत्या. अखेर तिसऱ्या दिवशी दहा प्रेते बाहेर आली. नदीचे पाणीही ओसरू लागले होते त्या दहा मध्ये आमची सुहासिनी नव्हती 'मामा'
हो आम्हाही त्या सर्व भीषण बातम्या दूरदर्शन वर पाहत होतो 'कुणाल'
चौथ्या दिवशी आता कोणीही जिवंत असण्याची शक्यता नाही असेच अधिकारी सांगत होते. दोन बस मध्ये तीस - पस्तीस प्रवासी होते त्यात आमच्या घरचेही होते. प्रत्येक प्रेत नदीतून काढल्यानंतर ते आपल्या कोणाचे नाही ना हे पाहण्यासाठी नातेवाईक धावत होते. खाण्यापिण्याची तर कोणालाच शुद्ध नव्हती. आजूबाजूच्या गावातील लोकांनी नातेवाईकांसाठी चहा आणि पुरी भाजीची सोय केली. त्यात कोणताही व्यापारी हेतू नव्हता. कार्यकर्ते लोकांना समजावत होते, धीर देत होते, खायला लावत होते. 'मामा'
' किती दिवस तुम्ही तेथे थांबला होता?? 'कुणाल'
' पाच - सहा दिवस. नंतर शोध कार्य पण थांबलं आणि आंम्ही दुखी अंतःकरणांनी कुडाळ ला परतलो. आल्यावर मंदाला सांगताना इतका वेळ थांबवून ठेवलेलं रडू कोसळलं. मंदाला अंदाज आला होता त्यामुळे तिने धीर धरून आम्हाला जेवायला आणि विश्रांती घ्यायला भाग पाडले. 'मामा'
' फारच विदारक प्रसंग होता 'कुणाल'
' हो ना आणि तेव्हापासून सुहास च्या जीवनातील स्वारस्य संपलं. तो अबोल राहू लागला त्याला जेवणाखाण्याची शुद्ध नव्हती. आंम्हाला ही काही कळेनासे झाले होते. त्याला कसे समजवावे हे आमच्या बुद्धी पलीकडचे होते. त्याला बोलते करण्याचा बराच प्रयत्न मी आणि कुडाळ मधील त्याच्या मित्रांनी केला पण त्याची मनोवृत्ती बदलायला तयार नव्हती. सतत हसत खेळत राहणारा, भरपूर गप्पा मारणारा सुहास एकदम तुटक वागू लागला होता. सतत शुन्याकडे नजर लावून बसलेला असायचा. ' मामा'
मग तो झारापला राहायला कसा गेला? 'कुणाल'
' सुनेचं आणि नातवाच शरीर तर सापडलच नव्हतं. पण धार्मिक विधी केले. त्यावेळेला बरीच मित्रमंडळी आणि वाडीवरची लोक आली होती. त्या सर्वानाच सुहासमधील वागण्याचा फरक कळत होता.

-८-
मामा -
या प्रसंगानंतर माझी उमेदच हरवली होती. मंदा मला सारखी सुहासशी बोलायला सांगत होती. घरात आम्ही तिघेजण पण दिवसभरात एकमेकांशी साधी तीन वाक्ये हि बोलत नव्हतो. एकेदिवशी सुहासच्या संचालकांचा फोन आला. त्यांना अर्थातच सर्व कळाले होते.
' सुहास आहे का ? मी कारखान्याचा संचालक बोलतोय.
' मी सुहासकडे फोन दिला
' सुहास मी कारखान्यातून बोलतोय. आता बांधकामाची बरीच प्रगती झाली आहे. तुमच्यासाठी बंगला पण बघून ठेवला आहे. केव्हा येताय पालघरला? ' संचालक'
' मी आपला आभारी आहे. पण मला पालघरला येता येईल असे वाटत नाही. 'सुहास'
' का हो ? काही सोयीसुविधा कमी वाटतात का ? 'संचालक'
' नाही तसे नाही पण सर्वस्व गेल्यामुळे आता मला कशातच रुची राहिली नाही. क्षमस्व. ' सुहास'
' ठीक आहे आम्ही अजून महिनाभर वाट पाहू ' संचालक'
' नाही. नका वाट पाहू. आणि हो खारघरच्या माझ्या फ्लॅट मधील सामान अगदी कपड्या सकट कोणाही गरजू कुटुंबाला देऊन टाका. त्या सगळ्यामध्ये माझ्या फार आठवणी गुंतल्या आहेत. आणि त्या परत पाहणं किंवा वापरणं मला अशक्य आहे. 'सुहास'
' ठीक आहे तुमची मर्जी. 'संचालक'
' सुहासने फोन ठेवला आणि परत शून्यात नजर लावण्याचा कार्यक्रम सुरु केला. मी आणि मंदाने संभाषण ऐकले होते. आणि साधारण काय झाले याची कल्पना आली होती. मंदा मला सतत सुहासशी बोलण्याबद्दल खुणावत होती. शेवटी मी ही सुहासशी बोलायचे ठरविले.
' सुहास पालघरला तू जात नाहीस का?
' नाही बाबा 'सुहास'
' पुढे काय करायचे ठरविले आहेस? दुसऱ्या शहरात नोकरी करणार आहेस का?
' नाही आता माझे कशातच लक्ष लागत नाही. मी अजून काहीच ठरविलं नाही. काही ठरवायला मला वेळ लागेल 'सुहास '
' सुहास तू वेळ घे पण आत्ता तू तिशीत आहेस. अजून सर्व आयुष्य तुझ्यासमोर आहे. मलाही तुझ्याशिवाय कोणीच उरलेले नाही. सुभाष अमेरिकेला आणि सुरेखा मुंबईत त्यामुळे तू काय करणार आहेस ते ठरवून सांग.
' काही दिवस तसेच गेले.
सुहासच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता. देह धर्म म्हणून तो जेवायचा.
खायचा पण ते सुद्धा खायचं म्हणून. पानात कारल्याची भाजी आहे कि आमरस आहे याची त्याला शुद्ध नसायची. मंदा त्याला त्याचा आवडीचे पदार्थ खायला घालायची. पण त्याचे लक्षच नव्हते.
अशातच त्याला काकांच्या अध्यात्मिक पुस्तकांचा ठेवा सापडला. आणि त्या ग्रंथाचा अभ्यास करण्यात तो गुंतला. पतंजली योगशास्त्र, रावणसंहिता, योगवशिष्ठ, भृगुसंहिता असे योगावर व भविष्यावर असंख्य ग्रंथ कपाटात होते. काकांचं वाचन दांडग होत. आणि ते सिद्धवाणीचे जोतिषीही गणले जायचे. ते गेल्यावर अर्थातच ग्रंथावर धूळ साठली होती. पण सुहासला ती कपाटं सापडली आणि तो त्याच्यातच हरवून गेला.
सुहासने दुसरे लग्न करावे कि काय अशा चर्चा मंदा आणि माझ्यात होत असत. खर म्हणजे त्याला नात्यातल्या मुलीही सांगून यायला सुरवात झाली होती. पण त्याच्याकडे हा विषय कसा काढायचा हे कळत नव्हते.
शेवटी एका सणाच्या दिवशी मंदाने दोन मुलींना जेवायला बोलावलं. स्वंयंपाक ही साग्र संगीत झाला होता. जेवायला आम्ही पाचही जण एकत्रच बसलॊ. मंदा त्या मुलीचे गुणवर्णन करीत होती. पण सुहासच तिच्याकडे लक्षच नव्हतं. दोन्ही मुली सुंदर, सुशिक्षित, व चांगल्या घराण्यातील होत्या. शेवटी मंदा सुहासला म्हणाली 'सुहास मी या दोघीना त्यांच्या लहानपणापासून ओळखते. ही डावीकडची लीना म्हणजे खर नाव नलिनी पण सगळे तिला लीना म्हणतात. ती एम. एस. सी. झाली आहे आणि कॉलेज मध्ये शिकवते. आणि ही उजवीकडची नीता तिचेही खरे नाव सुनीता आहे. पण सगळे तिला नीता म्हणतात. ती बी.ई. झाली आहे आणि स्वतःचा व्यवसाय करण्याकडे तिचा कल आहे. 'मंदा'
' हो का छान छान. आपल्या तालुक्यातील मुलीही शिकतायेत हे छानच आहे. 'सुहास'
आणि मुख्य म्हणजे दोघीचीही अजून लग्न व्हायची आहेत. सुहास मी काय म्हणतेय हे तुला कळतंय का? 'मंदा'
' हो हो त्यांची लग्न व्हायची आहेत मग काय त्यांच्या पत्रिका मांडून हव्या आहेत का ? सुहास वेड पांघरुन म्हणाला. '
' मांड मांड त्या दोघींच्या पत्रिका आणि तुझी कोणाशी जुळते का ते बघ. मंदा ही काही कमी नव्हती
' हे बघा नीता आणि लीना तुम्ही सुंदर आहात, सुविद्य आहात पण मला वाटत नाही कि मी कधी सुहासिनीला विसरू शकेन त्यामुळे तुम्ही दुसरीकडे वरसंशोधन करा. असे म्हणून सुहास उठून त्याच्या खोलीत गेला. त्याच्या सडेतोड पणामुळे त्या दोन मुली आणि आम्ही दोघेही हादरलो होतो. नीता आणि लीना कश्याबश्या जेवण उरकून गेल्या. मंदा आणि मला पुढे काय वाढून ठेवले आहे हे कळेनासे झाले होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच !
आणि मागच्या कथेचा संदर्भ आहे हे ही छान.