एकविसाव्या शतकाने सर्व स्तरातल्या लोकांसाठी अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. जलद झालेले दळवळण, आंतरजालाचा पसारा (इन्टरनेट) आणि माहितीचा झपाट्याने होणारा प्रसार ह्यामुळे लोक आधी कधीही न अनुभवलेल्या अशा काही परिस्थितींमध्ये स्वतःला अडकलेलं पाहतात की तिथे झटपट आकलन, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे अपेक्षित असते. पारंपरिक साधने ही अशा समस्यांवर उपाय शोधण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यासाठीच नव्या साधनांचा, नव्या पद्धतींचा अवलंब केला जाणे आवश्यक ठरत आहे.
ह्याच संदर्भात आजकाल 'डिजाइन थिंकिंग' नावाची संकल्पना बरीच ऐकायला येत आहे. साध्यासोप्या मराठीत ह्या पद्धतीला "कल्पकतेने विचार करुन उत्तर शोधण्याची पद्धत' किंवा छोट्या स्वरुपात 'संकल्प-विचार' असे म्हणू शकतो.
डिजाइन थिंकिंग ह्या पद्धतीबद्दल सविस्तर बोलण्याआधी सर्वप्रथम समस्त भारतीयांना 'डिजाइन' ह्या इंग्रजी शब्दामुळे होणारा गैरसमज दूर करुयात.
'डिजाइन' म्हणजे सर्वसाधारणपणे चित्रकला, बांधकाम, कारागीरी यातले सौंदर्य उल्लेखण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. एखाद्या लग्नपत्रिकेचे डिजाइन, घराचे डिजाइन, फर्निचरचे डिजाइन, कपड्यावरचे डिजाइन, इत्यादी पद्धतीने आपण सर्रास 'डिजाइन' हा शब्द कलाकुसर, सौंदर्यनिर्मिती ह्या अर्थाने वापरतो. पण त्याचा खरा अर्थ तो नाही. आपण जेव्हा म्हणतो की 'ह्या सोफासेटचे डिजाइन मला आवडले', किंवा 'साडीवरचे वेलबुट्टीचे डिजाइन' मला आवडले नाही तेव्हा आपण त्या वस्तूला देखणं, आकर्षक बनवण्याच्या दृष्टीने केल्या गेलेल्या कलाकुसरीबद्दल बोलत असतो. डिजाइन ह्या मूळ संकल्पनेबद्दल नाही.
डिजाइन म्हणजे संकल्प. एखादी वस्तू कशी असावी, दिसावी, वापरता यावी ह्याचे नियम ठरवणे, आरेखन करणे, तिचा आराखडा, रचना तयार करणे म्हणजे डिजाइन. 'घराचा दरवाजा डिजाइन करणे' म्हणजे त्यावर गणपती काढावा, कमळाची फुलं काढावी, वेलबुट्टी काढावी की गोल-त्रिकोण-चौकोन ने भौमितिक कलाकुसर करावी हे डिजाइन नव्हे, तर तो दरवाजा किती फूट उंच, किती रुंद असेल, कोणत्या बाजूने उघडेल तर जास्त जागा वाया जाणार नाही व येण्याजाण्याला सोयीस्कर होईल, त्याची उघडण्याची-बंद व्हायची पद्धत काय असेल, कशी असेल, हॅन्डल कसे असतील, कुठे असतील, कसे फिरतील, चावी-कुलूप याची योजना काय असेल, कडी कोयंडा लावणार की लॅच लावणार असे सर्व प्रश्न जेव्हा सोडवले जातात तेव्हा एक दरवाजा डिजाइन झाला असे म्हणता येते. त्यावरचे नक्षिकाम हा त्याला आकर्षक बनवण्यासाठी केला गेलेला एक छोटासा भाग असतो, ते डिजाइन नव्हे. तर दरवाजाचा आराखडा म्हणजे डिजाइन. असेच प्रत्येक वस्तू, सेवा, इत्यादींचे असते. कस्टमर केअर ला फोन लावल्या जाणे, तिथून ऑटोमेटेड व्हाईसने तुम्हाला उत्तर देणे, सूचना देणे हे खरे 'डिजाइन' आहे. त्यातले नक्षिकाम म्हणजे ऑटोमेटेड व्हाईसचा आवाज किती गोड व आश्वासक आहे हा भाग. नुसता आवाज गोड आहे पण काम होत नसेल तर ते डिजाइन-फेल्युअर आहे. म्हणजे दरवाजावर नक्षिकाम अगदी तासभर पाहत राहावे असे पण दरवाजा उघडणे-बंद करणे हा घरमालकालाच डोक्याला ताप होत असेल तर ते डिजाइन फेल्युअर आहे असे समजले पाहिजे.
तलवार ही एक वस्तू बघूया. तलवारीचे काम आहे कापणे, ती चालवतांना तलवारबाजाला ते मूळ काम अधिकाधिक सोपे कसे वाटेल हे पाहणे म्हणजे तीचे डिजाइन करणे. त्यावर दमदार घोषणा कोरुन लिहिणे, तीची मूठ हिरेजडित आणि सिंहमुखी करणे म्हणजे डिजाइन नव्हे. केवळ तोच उद्देश असेल तर ती तलवार एक शो-पिस समजली जाईल, खरी तलवार नव्हे. असेच वेगवेगळ्या कामांसाठी वापरल्या जाणार्या चाकूंबद्दल. प्रत्येक चाकूचे डिजाइन त्याच्या कामाप्रमाणे असते.
असेच अनेक उत्पादनांबद्दल आपल्याला बघता येईल. जसे की टूथब्रश. पूर्वी अगदी कपडे घासायच्या ब्रशसारखे काटकोन चौकोनात असलेले ब्रश असायचे. आजकाल तर कपडे घासायच्या ब्रशचे डिजाइनही खूप बदलले आहे म्हणा. तर ते टुथब्रश नंतर पुढे निमुळते होत गेले. त्यात नवनवीन 'डिजाइन्स' आल्या. ज्या लोकांनी हे स्थित्यंतर अनुभवले असेल त्यांना हे नक्की झटकन समजेल. कालपर्यंत चौकोनी ब्रश वापरणार्यांनी आज सकाळी निमुळता ब्रश तोंडात घातल्याघातल्या तो प्रचंड फरक झटकण जाणवलाच असेल. तोंडात खोलवर शेवटच्या दातापर्यंत जाणारा पण कुठेही न टोचणारा अशी त्या ब्रशची खासियत होती. दिसायला चौकोनीपेक्षा सुंदर, मॉडर्न, आकर्षक असणे हे त्या ब्रशचे 'अपघाताने मिळालेले' वैशिष्ट्य म्हणता येईल.
हा तर्क आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक वस्तूंना, सेवांना लावून बघा. डिजाइन शब्दामागची मूळ संकल्पना उदाहरणासहीत लक्षात येईल.
कल्पकता, संशोधन आणि संकल्प-रचना यात फरक आहे तोही थोडा बघूया, कारण पुढे यात गैरसमज होण्याची शक्यता आहे.
"कपडे धुण्याचे मशिन बनवले तर काय मज्जा येईल" ही एक क्रांतीकारी कल्पना म्हणजे 'आयडिया' होती. तर असे मशीन बनवणे शक्य आहे का? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी केलेला शोध म्हणजे संशोधन म्हणजे रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट. उत्तर मिळाले की 'हो शक्य आहे अशी मशीन'. 'बरं मग ती कशी असेल?' ह्या प्रश्नाचे उत्तर देणार 'संकल्प-रचना' म्हणजे डिजाइन. कपडे कसे धुतल्या जातात, त्याला कशाकशाची गरज लागते त्या सर्व वस्तूंचा एकमेकांशी असलेला संबंध, उपयोगात येण्याचा क्रम हे सर्व लक्षात घेऊन त्याची क्रिया पूर्ण होण्यासाठी ते मशीन कसे असले पाहिजे ह्याचा विचार म्हणजे डिजाइन चा विचार. वॉशिंग मशीन ह्या आपल्या रोजच्या वापरातल्या मशीनचा इतिहास जर बघितला तर फार म्हणजे फारच रंजक आहे. अगदी सुरुवातीच्या आणि आज आपण वापरत असलेल्या मशिन्समध्ये अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. आज कोणाला त्या मशिन दाखवल्या तर विश्वास बसणार नाही की ह्या कपडे धुण्याच्या मशीन्स आहेत. त्यांचे कार्य जरी कपडे धुणे एवढेच असले तरी प्रत्येक संशोधक व डिजायनरने ते आपल्या स्वतःच्या पद्धतीने विचार करुन बनवले होते. एकमेकांशी अजिबात साधर्म्य नसलेल्या अनेक डिजाइन्स सुरुवातीला आल्या. त्यातून उत्क्रांत होत होत आजचे सर्वोत्कृष्ट व उपयोगास सर्वात सोपे डिजाइन तयार झाले आहे. फ्रंटलोड की टॉप-लोड हा सुद्धा डिजाइनचा एक भाग आहे. पाणी सोडणारा पाईप किती इंची असावा, कुठे असावा, बटने किती-कशी-कोणती-कुठे असावी हासुद्धा डिजाइनचा भाग आहे.
औद्योगिक क्षेत्रात ह्याला प्रॉडक्ट डिजाइन म्हणतात. एव्हाना लक्षात आलेच असेल की प्रॉडक्टचा रंग आणि सौंदर्य म्हणजे डिजाइन नव्हे तर त्याचा वापर उपभोक्त्याला त्याच्या गरजेनुसार योग्य प्रकारे करता आला पाहिजे ह्याचा विचार म्हणजे डिजाइन.
हे झाले वस्तूंच्या बाबतीत. आता थोडे सेवांच्या बाबतीत बघूया. अगदी सर्वांनी कधी ना कधी अनुभवलेला हॉटेल मध्ये खाण्याचा प्रसंग. कित्येक हॉटेलांत वेगवेगळ्या पद्धती असतात. काहींमध्ये वेटर येऊन टेबलावर ऑर्डर घेऊन जेवण वाढतो, काहींमध्ये स्वतः ऑर्डर देऊन मग तयार झालेले स्वतः घेऊन येऊन टेबलवर खावे लागते, काहींमध्ये बुफे पद्धत असते - भांड्यांमधले उपलब्ध पदार्थ पाहिजे तसे, तेवढे घ्या. राजधानीसारख्या हॉटेलांत तर टेबलवर बसल्याबसल्या धडाधड ताट मांडून काहीएक न विचारता सर्व पदार्थ प्रचंड वेगाने तुमच्या पुढ्यात वाढले जातात. ताटातले संपले की लगेच न सांगता पदार्थ वाढले जातात. बार्बेक्यु नेशनमध्ये टेबलवरच बार्बेक्यु-शेगडी असते व तिथेच गरमागरम कबाब वगैरे थेट स्वतः काढून हवे तितके खाता येतात. अगदी रस्त्यावरच्या पाणीपुरीतही दोन प्रकार, एक म्हणजे एक-के-बाद-एक पुरी भरुन खाणे व पुरीची प्लेट बनवून सावकाश खाणे. हे सगळे डिजाइन आहे. प्रत्येक हॉटेलात खाण्याचा एक्स्पिरीयंस कसा वेगवेगळा डिजाइन केला आहे ते बघता येईल. आलेल्या ग्राहकाला जेवायला घालणे हा साधा प्रकार कितीतरी वेगवेगळ्या स्वरुपात आपल्यासमोर येतो. फास्टफूड जगतात क्रांती करणार्या मॅक्डोनाल्ड्स बंधूंनी नेहमीच्याच बर्गर आणि फ्राइज च्या पदार्थाला तयार करण्यापासून ते वाढण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया क्रांतिकारकपणे बदलून टाकली. त्याकाळात सर्वसामान्य सभ्य अमेरिकन नागरिकास फास्टफूड खाणे हे 'अडला हरी' पद्धतीचे होते. अशा टपर्या-हॉटेलांमध्ये सभ्य कुटूंब वगैरे फारसे जात नसत, तसेच तिथे जेवण मिळायला अर्धातास वगैरे लागत असे. मॅक्डोनाल्ड यांनी ही सर्व पद्धत मोडीत काढून ऑर्डर दिल्यावर तीस सेकंदात मिळेल अशी योजना तयार केली आणि अंमलात आणली, आज हे मॉडेल जगभरात यशस्वी झाले, ग्राहक व मालक दोहोंसाठीही. ही सर्व उदाहरणे ग्राहकसेवेत डिजाइन थिंकिंग प्रमाणे काम करुन बदल घडवल्याची आहेत.
ह्याच प्रकारे आपण रोज वापरत असलेल्या अनेक सेवांना बघितले तर त्यात डिजाइनचा काय विचार केला आहे की नाही हे समजून घेता येईल. जिथे जी सेवा वापरायला तुम्हाला कटकटीचे, तापदायक काम आहे असे वाटते तिथे डिजाइन मार खाते आहे असे समजावे. ग्राहकांचा विचार करुन जी सेवा किंवा वस्तू डिजाइन केली जाते ती नेहमीच यशस्वी होते असा अनुभव आहे.
अशा प्रकारे आपण बघितले की डिजाइन म्हणजे एखादी वस्तू, सेवा वापरकर्त्याच्या सोयीनुसार योग्य तर्हेने तयार करणे. तर कलाकुसर, रंगकाम हा सौंदर्यनिर्मितीचा विषय आहे.
आता डिजाइन-थिंकिंग ह्या संकल्पनेबद्दल विस्ताराने दुसर्या भागात बघूया.
तोवर तुम्हाला भावलेल्या, आवडलेल्या प्रॉडक्ट आणि सर्विस डिजाइन ची यशस्वी उदाहरणे प्रतिसादांमध्ये द्या.
चांगली सुरुवात! पुभाप्र.
चांगली सुरुवात! पुभाप्र.
भारतात डिझाईन थिंकिंग ची प्रचंड गरज आहे सर्वच ठिकाणी! मला माझ्या कल्पनेप्रमाणे उपयोगी अशी पावसाळी पादत्राणे कोठेही मिळाली नाहीत
AI वापरून ऑटोमेटेड काल्स हे
AI वापरून ऑटोमेटेड काल्स हे लेटेस्ट design आवडलेले
मस्त सुरुवात. युजर
मस्त सुरुवात. युजर एक्सपिरीअंस इज की!
वेळ मिळाला की लिहितो.
लेख आवडला! पुभाप्र
लेख आवडला! पुभाप्र
पुभाप्र.
पुभाप्र.
मागे एकदा टायटन रागा सिरीजच्या डीझाईन वर एक रंजक लेख वाचण्यात आला होता. त्यात बंगरुळूच्या डीझाईन कॉलेजचा पाम उल्लेख होता. मला तेव्हा कळलं की डिझाईन असे काही कोर्सेस असतात आणि त्यात लोक करियर पण करतात.
हा लेख वाचल्या वाचल्या पहिल्यांदा टायटन रागा सिरीज, आयकिया आणि स्विस नाइफ्स क्लिक झाल्या. गाड्यांचे अंर्तबाह्य डिझाईन करणारे पण किती विचार करत असतील.
लेख छान जमलाय. पुभाप्र.
लेख छान जमलाय. पुभाप्र.
छान लेख नानाकळा..
छान लेख नानाकळा..
पुढचा भाग लिहून वृत्तपत्रात द्या हा..
मस्त लेख!
मस्त लेख!
इंटरेस्टिंग लेख नाना,
इंटरेस्टिंग लेख नाना,
आत्ता आठवलेले उदाहरण सांगतो , याला आम्ही डॉक्युमेंटेशन म्हणतो, पण नाना नि लिहिलेल्या ऑटोमेटेड व्हॉइस असिस्टन्स शी मिळते जुळते आहे म्हणून चालेल असे वाटते.
मशीनच्या अपग्रेदेशन, सॉफ्टवेअर पॅच लोड करणे या साठी टेक्निकल डॉक्युमेंट बनवले जाते,
अगदी CD आत टाकली की काय स्क्रीन येईल, तुम्ही कोणता ऑप्शन सिलेंक्त करा, सिस्टम च्या सॉफ्टवेअर व्हर्जन प्रमाणे किती स्टेप स्किप करा हे सगळे स्टेप बाय स्टेप स्क्रीन शॉट देऊन सांगितलेले असते,
एकंदर मांडणी अगदी नवशिक्या माणसाला पण ते जमले पाहिजे इतकी सोपी केली असते.
असेच डॉक्युमेंट मशीन इन्स्टॉल करण्यासाठी सुद्धा असते, म्हणजे अगदी हेड वरचा ,उजव्या बाजूच्या, अमुक रंगाचा स्विच दाबा वगैरे इतके डिटेल, जोडीला फोटोग्राफ्स असतातच. (इतके करून लोक चालायचा तो घोळ घालतातच )
ही डॉक्युमेंट डिझाईन करायला, आणि वेगवेगळ्या भाषेत भाषांतरीत करायला एक स्पेशल वेगळी टीम असते.
हा अल्गोरिथम develop करणे बरेच महत्वाचे आणि किचकट काम असते.
शाळांमधे येणारे अनेक प्रश्न
शाळांमधे येणारे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी 'डीझाईन थिंकिंग' ही कल्पाना खूप उपयोगी पडू शकते असे वाटतेय , जसे की
१. मुलांचे दप्तराचे ओझे कमी करणे त्यासाठी योग्य प्रकारे - timetable design करणे .
२. दुबार शिफ्ट मधे चालणार्या शाळा (सकाळ - दुपार) सुटण्या / भरण्याच्या वेळी शाळेबाहेर , रस्त्यावर प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक ची कोंडी होते. अशा गर्दीचे उत्तम नियोजन कराण्यासाठी अशा शाळंआच्या अॅड्मिनीस्ट्रेशननी खरेतर 'डीझाईन थिंकिंग' करण्याची प्रचंड गरज आहे
असेच अजुन खूप काही करता येऊ शकते
मस्त!
मस्त!
धन्यवाद वाचकमित्रहो!
धन्यवाद वाचकमित्रहो!
----
सिम्बा.
तुम्ही जे उदाहरण दिले आहे ते इन्स्ट्रक्शनल डिजाइन ह्या प्रकारात मोडते. ह्यात सर्वात बेसिक मॉडेल म्हणजे छापील युजर मॅन्युअल. त्याची नंतर अॅडव्हान्स वर्जन्स आली. ह्यातल्या काही प्रकारांत मला काम करायला मिळाले हे माझं भाग्यच. इन्स्ट्रक्शनल डिजाइनचा उगम आफ्टरसेल्स सर्विस ला येणार्या फोनकॉल्स चा भार कमी करण्याकरता झाला. ८०-९० टक्के केसेस मध्ये ग्राहक स्वतःच समस्या दूर करु शकतो अशी परिस्थिती असते.
इन्स्ट्रक्शनल डिजाइन मध्ये सर्वात महत्त्वाचा रोल असतो तो इन्स्ट्रक्शनल रायटरचा. अतिशय क्लिष्ट तांत्रिक माहिती ते सहज सोप्या आणि सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने लिहितात. त्यांनतर त्याला पुरक अशी इलस्ट्रेशन्स तयार केली जातात. हे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित ले-आउट करुन एक पुस्तक तयार केले जाते. जे साधारण सर्वच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसोबत येत असायचे. आता दुर्मिळ झाले कारण त्याच छ्पाईचा प्रचंड खर्च असतो व ग्राहक त्याचा वापर करत नाहीत.
तेव्हा पुढचा भाग आला तो अॅनिमेटेड युजर मॅन्युअल चा. यात प्रॉडक्टमध्ये येणार्या विविध समस्यांवर कसे उपाय करावे हे अॅनिमेशनद्वारे दाखवले जाते. यातही रायटर आणि डिजायनर यांची भूमिका तशीच राहिली फक्त माध्यम बदलले. ही युजर मॅन्युअल सिडींमध्ये भरुन प्रॉडक्टसोबत दिली जाऊ लागली. मी स्वतः नोकिया फोन, एचपी प्रिन्टर्स यांच्या प्रॉडक्टसबद्दल अॅनिमेशनची खूप कामे केली आहेत. आमच्या टीमला मर्सिडेज मेक्लेरेन ह्या सुपरकार च्या कॉकपिटमध्ये ड्रायवरसाठी टचस्क्रिन युजरमॅन्युअल बनवण्याचीही संधी मिळाली होती. त्याचे छान प्रोटोटाइप आम्ही बनवले होते. काही सॉफ्टवेअरसाठीचेही युजर मॅन्युअल्स चे अॅनिमेशन्स बनवले होते. ह्या सर्व ग्राहकांच्या दृष्टीने तयार होणारी इन्स्ट्रक्शनल मॅन्युअल्स होती. आता हे सगळंच त्या त्या कंपन्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे व अपडेट केलं जातं.
यासोबतच अजून एक प्रकार होता. तो दुरुस्ती करणार्यांसाठीच्या सर्विस मॅन्युअलचा. मी रोल्सरॉइस जेट इंजिनासाठी त्याच्या काही भागांसाठीचे सर्विस मॅन्युअल बनवले होते व बम्बार्डियर विमानाच्या दरवाजाच्या सर्विससाठीचेही मॅन्युअल बनवले होते. ही सर्व मॅन्युअल्स ऑनलाईन उपलब्ध असतील व जगातल्या कोणत्याही भागातल्या एअरपोर्टवर काही समस्या आली तर तिथल्या अवलेबल स्टाफला हे सर्विस मॅन्युअलचा अॅक्सेस देऊन दुरुस्ती करता येईल अशी ती योजना होती. एक जनरल मोटर्स साठी कारचे टायर व संबंधीत असेंब्ली काढण्याचे व परत लावण्याचे स्टेप बाय स्टेप अॅनिमेशनही केले होते.
इन्स्ट्रक्शनल रायटींग व डिजाइनिंगला औद्योगिक क्षेत्रात बराच मान आहे. कारण ते लोक उद्योजकांचे वाया जाऊ शकणारे बरेच पैसे वाचवू शकतात.
शाळांमधे येणारे अनेक प्रश्न
शाळांमधे येणारे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी 'डीझाईन थिंकिंग' ही कल्पाना खूप उपयोगी पडू शकते असे वाटतेय ,
>> डेलिया, अगदी सहमत आहे.
ह्या लेखमालाचा प्रमुख उद्देश शालेय शिक्षणात डिजाइन थिंकिंगचा उपयोग हाच आहे. मी पहिला भाग त्यावरच लिहिणार होते, पण काही लोकांशी गेल्या काही दिवसांत बोलतांना अचानक लक्षात आले की 'डिजाइन' ह्या शब्दाबद्दल गैरसमज आहेत. म्हणून नमनालाच घडाभर तेल वाहिलं.
पुढच्या भागात डिजाइन-थिंकिंग शालेय शिक्षणात कसे वापरले जाऊ शकते व त्याची काही उदाहरणे देणार आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
AI चा उल्लेख वाचला वर.जॉन
AI चा उल्लेख वाचला वर.जॉन सर्ल यांचा चायनीज रुम थॉट एक्स्पीरीमेंट वाचून बघा.
छान सुरुवात. नमनाला घडाहर तेल
छान सुरुवात. नमनाला घडाभर तेल वाटले...पण अर्थ नीट समजावलात ते चांगलेच केले.
पुढच्या भागात डिजाइन-थिंकिंग शालेय शिक्षणात कसे वापरले जाऊ शकते व त्याची काही उदाहरणे देणार आहे. >> वाट पाहत आहे
नमनाला घडाभर तेल घालणे
नमनाला घडाभर तेल घालणे जरूरीचेच होते व त्यामुळे पाया तयार नी मजबूत झालाय. छान लेख नाना.
फोन ते मोबाईल फोन चे डिझाईन मला आवडते. बाजारात इतके फोन सतत येतात की कोणता घ्यावा प्रश्न पडतो. प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे फोन उपलब्ध आहे. नवीन काय घालावं ठरवणं किती कठीण आहे ना!
हा प्रकार सॉफ्टवेर
हा प्रकार सॉफ्टवेर एंजिनियरिंग्/आर्किटेक्चरचा इंट्रिंझिक कांपोनंट आहे आणि तो गेल्या ३०-३५ वर्षांपासुन अस्तित्वात/वापरात आहे. अशाच प्रकारचा स्ट्र्क्चर्ड्/डिसिप्लिन्ड अॅप्रोच इतर क्षेत्रात आवश्यकते नुसार आणला तर चांगलंच आहे...
मस्त ओळख करुन दिलीत . जनरल
मस्त ओळख करुन दिलीत . जनरल इलेक्ट्रिक च्या होम अप्लायंस डिझाइन मधे ग्राहकांचा खूप सहभाग असतो असे वाचले होते. डिझाइनर मंडळी वेगव्गेळ्या ग्राहकांना लॅब मधे बोलवून उपकरणे वापरायला देतात व नोंदी करतात वगैरे.
आपल्याकडे सर्व्हिस मेंटॅलिटीच अभावाने आढळते. सर्व्हिस डिझाइनची गरज कधी कळेल कोणास ठाउक.
छान ओळख. तो डिझाइन शब्दाचा
छान ओळख. तो डिझाइन शब्दाचा पूर्वीचा अर्थ पार विसरून गेलो होतो. पण इथे तो खुलासा आवाश्यक होता.
आत्ता पटकन आठवत नाही पण असे अनेकदा झालेले आहे की एखादी गोष्ट वापरताना एखाद्या स्पेसिफिक स्टेप मधे आपल्याला त्यात जी सोय लागते ती कोणीतरी आधी विचार करून केलेली आहे - एरव्ही ठळकपणे दिसली नाही तरी- असे त्या वेळेस जाणवते. अशा वेळेस त्या डिझायनर च्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. उदाहरण आठवले की लिहीतो.
पुढील भाग येउद्या.
मस्त लेख.
मस्त लेख.
बिल्डिंगचे डिझाइन (स्ट्रक्चर, मटेरियल आणि एकंदरच डिझाइन ) अभ्यासक्रमात शिकलो होतो पण तरी प्रत्येक वस्तू च्या डिझाइनमागे किती अभ्यास करावा लागतो याचा अंदाज नव्हता आधी.
मैत्रिणीचा नवरा ( तेंव्हाचा बॉयफ्रेंड) प्रॉडक्ट डिझाइन मध्ये पोस्ट ग्रॅजुएशन करत होता. त्याला त्याच्या अभ्यासाचा भाग म्हणून दिवसेंदिवस उंटाच्या हालचाली ( उठणे, बसणे, चालणे ) अभ्यासताना बघितल्यावर आणि त्या अभ्यासाचा त्याच्या डिझाइन केलेल्या वस्तूमध्ये वापर करताना बघितल्यावर डिझाइन चा खरा अर्थ समजला.
लेखाच्या पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
मस्त लेख.
मस्त लेख.
नमनाला घडाभर तेल जरी असले तरी गरजेच च आहे.
पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत.
छान सुरवात , अन आवडीचा विषय.
छान सुरवात , अन आवडीचा विषय.
नमनाच तेल पण गरजेचच होतं .
उदा. - स्मार्ट सिटिइज ची चर्चा भरपूर होतेय , पण नक्की स्मार्ट म्हणजे काय ह्याबाबत बहुतेक अंधारच आहे. ( फ्री वायफाय म्हणजे स्मार्ट म्हणणारे महाभाग भेटले आहेत ) स्मार्ट नावाखाली राबवलेले प्रोजेक्ट म्हणजे रस्त्यांच सुशोभीकरण ह्यापलिकडेही विचार जात नाहीये. ह्या बाबत ही डिझाइन थिंकिंग ची गरज आहे.
असे अनेकदा झालेले आहे की एखादी गोष्ट वापरताना एखाद्या स्पेसिफिक स्टेप मधे आपल्याला त्यात जी सोय लागते ती कोणीतरी आधी विचार करून केलेली आहे - एरव्ही ठळकपणे दिसली नाही तरी- असे त्या वेळेस जाणवते. अशा वेळेस त्या डिझायनर च्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते.>> फारेंड , जपान मधे पाहिलेली बाब पटकन आठवली. अंध लोकाना अवलंबून न रहाता , स्वतंत्र पणे प्रवास करता यावे ह्यासाठी टॅक्टाइल टाइल्स ( ह्या आपल्याकडेही आहेत बरेच ठिकाणी) . एवढ्यावरच न थांबता सिग्नल पाशी (उत्तर दक्षिण अन पूर्व पश्चिम असे दोन वेगवेगळे ) पक्ष्यांचा आवाज हिरव्या सिग्नल बरोबर वाजतो .
मस्त सुरुवात. पुढील भागाच्या
मस्त सुरुवात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत
शाळांमधे येणारे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी 'डीझाईन थिंकिंग' ही कल्पाना खूप उपयोगी पडू शकते असे वाटते >>>> +१
स्मार्ट सिटिइज ची चर्चा भरपूर होतेय ह्या बाबत ही डिझाइन थिंकिंग ची गरज आहे. >>>> +१
छान लेख!
छान लेख!
शाळांमधे वर्गात सरसकट डेस्क आणि बाक अशी बसण्याची व्यवस्था करण्या ऐवजी बसण्याच्या व्यवस्थेत वैविध्य हे डिझाइइन थिंकिंगचे एक उदाहरण. ४-६ खुर्च्या एका टेबलाभोवती अशी टेबल्स, एकटे बसता येतील अशी लिहायचे पॅड जोडलेल्या काही खुर्च्या, एखादे आडवे टेबल आणि काही खुर्च्या, खाली बसून काम करायचे असल्यास सतरंजी आणि उश्या, कंफर्ट साठी काही सॉफ्ट टॉईज आणि थ्रोज अशी सोय इथे बर्याच वर्गातून करतात. खुर्च्यांमधेही वैविध्य असते. दिवसभर एकाच जागी बसून रहा असे बंधन नाही. मुलं आपल्या गरजेनुसार कधी एकटे बसून काम करतात तर कधी ग्रूपमधे. कधी ताण कमी करण्याची, मन शांतवायची गरज असेल सॉफ्ट टॉय जवळ घेतात. काही मुलं सतरंजीवर बसून काम करतात. एकमेकांना मदत करत मुलं आनंदाने शिकतात.
तोवर तुम्हाला भावलेल्या,
तोवर तुम्हाला भावलेल्या, आवडलेल्या प्रॉडक्ट आणि सर्विस डिजाइन ची यशस्वी उदाहरणे प्रतिसादांमध्ये द्या.
<<
फसलेल्या मंदबुद्धी डिझाईन्सबद्दल लिहिलं तर चालेल का?
आजच्या फ्लॅटस्क्रीन टीव्ही काँटेक्स्टमधे सेट टॉप बॉक्स हा अत्यंत मंदबुद्धी पणे कॅरीऑन केलेला आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
मुळात जेव्हा हे बॉक्स डिझाईन झाले तेव्हा ते "सेट टॉप" अर्थात सीआरटी टीव्हीच्या टॉपवर बसतील असे होते.
इतक्या वर्षांत भिंतीवर चिकटतील असले फ्लॅट टीव्ही आलेले असताना एकाही डिझायनरच्या डोक्यात त्या बॉक्सचा सेन्सर ९० अंशात वळवून फ्लॅट बाजूवर लावावा, जेणेकरून ती डब्बी भिंतीवर टीव्हीसारखीच फ्लॅट माउंट होईल, हे कसे काय आलेले नाही, हा मला कायम सतावणारा प्रश्न आहे.
कुणी या बॉक्स मॅन्युफॅक्चर करणार्यापर्यंत ही कल्पना पोहोचवेल का?
भिंतीला सुबक चिकटलेला टीव्ही अन त्याखाली ते भले मोठे सेटटॉप बॉक्ससाठीचे हँगर.. इरिटेटिंग.
हॉटेलांमधे इस्त्र्या असतात
हॉटेलांमधे इस्त्र्या असतात त्याची कॉर्ड नेहमी ऑटो वाइंडिंग असते. पण त्यांचे इतर फीचर्स इतके खास नसतात - सरफेस एरिआ छोटा असतो. नॉन स्टिक सरफेस असेल तर तो टिकाउ नसतो, वॉटेज कमी असते, वगैरे. इतर फीचर्स चांगले असलेल्या इस्त्रा असतात त्यांना कधिही ऑटो वाइंडिंग कॉर्ड नसते.
हेअर ड्रायर, इस्त्री, टोस्टर , मिक्सर, फूड प्रोसेसर यांचे कॉर्डस अगदी क्लटर्ड असतात. नीट , सहज , व्यवस्थित गुंडाळून ठेवता येतील असे कॉर्डस का बनवत नाहीत देव जाणे . लॅप टॉपचे पावर कॉर्ड सगळ्यात बेकार. एकाच कंपनीचे दोन वेगळे लॅपटॉप असले तर दोन वेगळे पावर कॉर्ड लागतात. अन ते अतिशय भोंगळ आणि कॉर्ड इकडे तिकडे लटकत रहाणार.
फसलेल्या मंदबुद्धी
फसलेल्या मंदबुद्धी डिझाईन्सबद्दल लिहिलं तर चालेल का?
>> हे काय विचारणं झालं का? नक्कीच सांगा. त्यानिमित्त पेन पॉइन्ट्स काय असतात तेही क्लिअर होईल.
नाना,
नाना,
तुमचा हा धागा माझ्या आयडियेमुळे इरिटेटिंग डिझाईन्स या वळणावर जाऊन पडेल अशी भीती वाटते.
**
एकाच कंपनीचे दोन वेगळे लॅपटॉप असले तर दोन वेगळे पावर कॉर्ड लागतात. अन ते अतिशय भोंगळ आणि कॉर्ड इकडे तिकडे लटकत रहाणार.
<<
हे मार्केटिंग आहे मेधा. एकाच चार्जरवर भागले, तर दोन कसे काय विकले जातील? सेल कमी होतो.
आमच्या मेडिकल इन्स्ट्रूमेंट्समधे अनेक बल्ब्स असतात. इतके चित्रविचित्र पॉवरचे अन सहजी कुठे न मिळणारे बल्ब का वापरतात हा प्रश्ण कुणाला पडला, तर तो बल्ब उडेपर्यंत वाट पहावी. मग जो २५ वॉटचा नॉर्मल बल्ब १० रुपयांना मिळतो, तोच अमेरिकन स्टाईल स्क्रू वालं होल्डर लावून ५०० रुपयांना विकतात.