शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना

Submitted by अनिंद्य on 6 October, 2017 - 07:42
Namache bazaar Nepal

प्रस्तावना:

'आज नवीन टीचर आली माझ्या वर्गावर' - माझ्या सातवीत शिकणाऱ्या कन्येने शाळेतून घरी आल्या आल्या उत्साहाने सांगितले. 'पण ती खडूस असावी, तिने आम्हाला जरा कॉम्प्लिकेटेड असाईनमेन्ट (काय ते मराठी!) दिले आहे - भारत आणि शेजारी देश ह्या विषयावर आम्हा मुलांना ग्रुप असाईनमेन्ट म्हणून एका प्रेझेंटेशन तयार करायचे आहे (का ते म !) - सो लेटअस डिसकस धिस व्हेन वी हॅव डिनर ..........

आणि मग संध्याकाळी घरात एका गमतीदार चर्चेची सुरवात झाली. तिला काही माहिती सांगण्याआधी मीच तिला काही प्रश्न विचारले. त्यातून कळलेल्या काही गोष्टी:

तिला भारताच्या भौगोलिक सीमा बऱ्यापैकी व्यवस्थित माहित होत्या, सीमेलगतच्या शेजारी देशांची नावे ठाऊक होती. अपवाद म्यांमार (बर्मा) चा.

पाकिस्तान आणि चीन दोन्ही शेजारी देशांशी भारताचे युद्ध झालेले आहे हे माहित होते, बांगलादेशची निर्मिती अश्याच एका युद्धातून झाली हे माहित होते, पण भूतान आणि नेपाळ ह्या देशांची फक्त नावेच माहित होती.

श्रीलंका ही भारताशेजारी असलेली 'आयलंड कंट्री' आहे हे तिला माहित होते पण भारत-लंका ह्यांची भौगोलिक सीमा (physical border) आहे हे तिला मंजूर नव्हते, पाण्यात असलेल्या देशाची जमिनीवर 'बाउंडरी' कशी असेल असा तिचा प्रश्न होता. श्रीलंकेच्या कोलंबो विमानतळावर आपण अति-तिखट ‘मसाला थोसे' (डोसा) खाल्ला होता हे तिला मात्र पक्के आठवत होते. श्रीलंकन एअरवेजच्या हवाई सुंदऱ्या वेगळ्याच स्टाईलने साडी नेसतात आणि म्हणून त्या खूप सुंदर दिसतात असे सर्टिफिकेट तिने दिले (आणि मी अर्थातच त्याला अनुमोदन दिले.)

म्यांमार (बर्मा) हा शेजारी देश आहे आणि भारत-म्यांमार ह्यांची जवळपास 1600 किमि सीमा आहे हे तिला अजिबात मंजूर नव्हते. पण आम्ही एका मेजवानीत खाल्लेले बर्मीज जेवण हे मात्र तिच्या दृष्टीने 'बर्मा हा छानच देश असावा' असे सर्टिफिकेट देण्यासाठी पुरेसे कारण होते.

अफगाणिस्तान हा भारताचा नसून पाकिस्तानचा शेजारी देश आहे, पण तो जवळच असावा आणि त्याला भारताचा शेजारी देश म्हणता येईल असे तिचे मत पडले. म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान ह्यांच्यात भौगोलिक सीमा (physical border) होती / आहे हे तिला मंजूर नव्हते. (डुरॅन्ड लाईन म्हणून ओळखली जाणारी ही सीमारेषा आताच्या POK म्हणजे पाकव्याप्त काश्मीरच्या प्रदेशातून जाते आणि हा प्रदेश भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून, म्हणजे पाकिस्तानच्या निर्मितीच्या पूर्वीपासून 'विवादास्पद मालकी' असलेला प्रदेश आहे. पण डुरॅन्ड लाईन ला आंतराष्ट्रीय सीमा म्हणून आजही मान्यता आहे आणि भारताने ह्या विवादास्पद भागावरचा हक्क काही सोडून दिलेला नाही.)

मालदीव हा देश मात्र माहित होता, कदाचित गेल्याच वर्षी तिथली सहा दिवसांची भरगच्च सहल झाली असल्यामुळे. ‘कॅन वी गो देअर अगेन टू फीड दोज लव्हली किड शार्क्स?’ माझ्या खिश्यावर प्रचंड मोठा ताण आणू शकणारा प्रश्न आला. पण मग कस्टर्ड संपवता संपवता 'I certify that Maldives is the most beautiful country I have seen' असे सर्टिफिकेट तिने (पुन्हा एकदा) न मागता देऊन टाकले आणि मी धोका टळल्याची नोंद घेतली.

चर्चेतून माझ्या पुन्हा एकदा लक्षात आलेली गोष्ट म्हणजे आज शाळा कॉलेजेस मध्ये शिकणाऱ्या मुलांना अमेरिकेची तर अगदी इत्यंभूत माहिती असते. म्हणजे अमेरिकन स्टार्स, पर्यटनस्थळे, तेथे घडणाऱ्या घटना, खाद्यसंस्कृती वगैरे, अगदी नुकत्याच झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका ह्याबद्दल माहिती असते. (अर्थात अमेरिका ही महाशक्ती आहे आणि तिचे आपल्याकडे पूर्वापार आकर्षण आहे आणि असणारच हेही खरे) तसेच यूरोपच्या देशांबद्दल, अगदी ब्राझील, चीन, जापान सकट बहुतांशी देशांबद्दल थोडीफार माहिती असली तरी भारताच्या सख्ख्या शेजारी देशांबद्दल फारशी माहिती असेलच असे नाही.

जी गोष्ट लहानांची तीच थोरांची. आपल्यापैकी कितीजण शेजारी राष्ट्राबद्दल 'अपडेटेड' असतो? एका सामान्य भारतीयाला अमेरिका, युरोप, चीन, जापान बद्दल थोडीफार तरी माहिती असते, पण आपल्या शेजारी असलेल्या ह्या देशांबद्दल त्रोटक सुध्दा माहिती नसते. थोडाफार अपवाद पाकिस्तानचा. पाकिस्तानबद्दल आपल्याला जी काही माहिती असते ती सर्व बहुदा आतंकवादी घटना, घुसखोरी, सीमेवरचा गोळीबार, पुन्हा पुन्हा निर्माण होणारी युद्धसदृश्य परिस्थिती, सरकारी पातळीवर होणाऱ्या चर्चा अश्याच प्रकारची असते. नेपाळ, भूतान, बांगलादेश तर कुठेच नसतात. अगदी 2008 पासून मला जेव्हा कामानिमित्त मालदीवला जावे लागायचे तेव्हा माझ्या मुंबईसारख्या महानगरात राहाण्याऱ्या बहुतेक मित्रांना तो आपला शेजारी देश आहे याची कल्पना सुद्धा नसायची. लाहोरला भेट द्यायची ठरवले असता पाकिस्तानचा व्हिसा न मिळाल्यामुळे माझी होणारी चिडचिड त्यांना समजून यायची नाही. नेपाळमध्ये काही पाहण्यासारखे असेल हे कमीच लोकांना पटायचे. आता चित्र थोडे बदललेले आहे. नेपाळ, श्रीलंका, भूतान हे देश भारतीय पर्यटकांच्या नकाशावर हळूहळू दिसू लागले आहेत, थोडीफार व्यापारिक, सांस्कृतिक घेवाण देवाण सुरु आहे, पण अजूनही 'शेजारी' देशाच्या मानाने आपले आर्थिक, सामाजिक आणि मुख्य म्हणजे 'पीपल टू पीपल' संबंध पुरेसे घनिष्ठ नाहीत असेच दिसते.

बांगलादेश म्हणजे घुसखोर, भूतान म्हणजे आनंदी देशांच्या यादीत अव्वल स्थान असलेला देश, नेपाळ हे एकमेव हिंदू राष्ट्र, पाकिस्तान तर बोलून चालून आतंकवादी देश, श्रीलंका म्हटले की रावण आणि प्रभाकरन, अफगाणिस्तान म्हणजे तालिबान आणि त्या बामियान बुद्धमूर्तींची विटंबना असेच काही ठराविक ठोकताळे आपल्या मनात असतात. ते दूर होतील अश्या काही बातम्याही आपल्यापर्यंत पोचत नाहीत. टीव्ही, वर्तमानपत्रे वगैरे आपल्या संपर्क माध्यमातून आपल्या शेजारी राष्ट्रांबद्दल फारशी माहिती, कार्यक्रम, बातम्या नसतात. त्यामुळे ह्या देशांशी आपले संबंध जरी शतकानुशतके चालत आलेले असले तरी वरवरचे भासतात.

मला माझ्या कामानिमित्ताने, उपजत कुतूहल आणि हौसेमुळे, मित्र आणि परिवारजनांच्या भेटीगाठींच्या निमित्ताने, त्या त्या देशातील मित्र, सामान्य लोक, कवी, लेखक आणि राजदूत इत्यादी मान्यवरांशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतून, वाचन, पर्यटन आणि अश्याच अन्य कारणामुळे आपल्या ह्या शेजारी देशांबद्दल थोडेफार अनुभवता आले. आज कन्येला माहिती देताना 'तू नीट लिहून का काढत नाहीस?' असे सुचवण्यात आले आणि म्हणून ही तोंडओळख आपल्या शेजारी देशांची.

ह्या विषयावर लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिण्याचा उत्साह किती टिकेल याची खात्री नसल्यामुळे हे लेखन सध्या सार्क देशांपुरतेच. चीन आणि म्यांमार (बर्मा) दोन्ही शेजारी देशांवर लिहिणे एक मोठे काम होऊ शकेल, त्यामुळे ते जमल्यास थोडे नंतर. तसेच संदर्भांची यादी बनवणे एक किचकट काम आहे पण ते करावे लागेल खरे, माझे थोडे लिहून झाले की करीन.

पहिला देश - नेपाळ

नेपाळबद्दल विशेष ममत्व असण्याचे कारण म्हणजे अगदी लहान असताना आयुष्यातला पहिला 'विदेश'प्रवास आणि पहिलाच विमानप्रवास घडला तो काठमांडूला जाण्यासाठीचा. दोनही गोष्टींचे प्रचंड अप्रूप होते तेंव्हा. म्हणून 'random selection' करायचेच तर नेपाळचा क्रमांक पहिला.

थोडे अवांतर:

8 डिसेम्बर 1985 ला ढाका येथे स्थापन झाली SAARC सार्क ही संघटना. बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे सात संस्थापक देश असलेल्या ह्या 'साऊथ एशिअन अससोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन' मध्ये त्यावेळी अफगाणिस्तान हा देश नव्हता, तो नंतर सामील करण्यात आला. सार्क ह्या संकल्पनेचे श्रेय भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींचे. सार्क आणि पुढे 1 नोव्हेंबर 1993 ला जन्माला आलेली युरोपियन यूनियन ह्या सारख्याच संकल्पना आहेत - प्रादेशिक सहकार्य आणि त्यातून सर्व सदस्य देशांचा विकास. युरोपचे एकीकरण घडून आता परत त्याच्या विसर्जनाचे / विघटनाचे बिगुल वाजू लागलेत तरी सार्क अजून आहे तिथेच आहे. भारत आणि त्याचे सख्खे शेजारी देश मिळून एक शक्तिमान प्रादेशिक महासंघ निमार्ण करण्याचे सार्क संस्थापकांचे स्वप्न आजून फारसे पुढे गेले नाही हे खरे आहे.

saarc-country-map

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाहोरला भेट द्यायची ठरवले असता पाकिस्तानचा व्हिसा न मिळाल्यामुळे माझी होणारी चिडचिड त्यांना समजून यायची नाही.
☺️

@ भावना गोवेकर
@ निलेश ८१
@ कऊ,

मायबोलीवर पहिल्यांदाच लिहीत आहे. प्रोत्साहनाबद्दल आभार !

@ च्रप्स
@ शालिनी_वादघाले
@ भरत.
@ मानव पृथ्वीकर,

आभार !

छान लिहीत आहात. फारसे प्रतिसाद आले नाहीत तरी लिहायचे थांबवू नका. वाचले आणि आवडले तरी प्रतिसाद दिलाच जातो असे नाही.

शीर्षक नीटसे कळले नाही.

@ साधना,
प्रोत्साहनाबद्दल आभार !

थोडेसे 'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या शीर्षकाबद्दल:

पूर्व महाराष्ट्रात / विदर्भात एक 'भुलाबाई' म्हणून मुलींचा सण/खेळ असतो. त्यात म्हणल्या जाणाऱ्या एका गाण्यात 'शेजाऱ्याचा डामाडुमा वाजतो तसा वाजू द्या - आम्हाला खेळ मांडू द्या' असे शब्द आहेत. थोडक्यात 'शेजाऱ्याच्या घरातील घटनांकडे / गोंधळाकडे दुर्लक्ष करा' असा अर्थ आहे.

आपल्या शेजारी देशांबद्दल हेच होतंय असे माझे मत. ह्या लेखमालिकेला शीर्षक म्हणून हे शब्द आठवले, समर्पक वाटले, वापरले Happy

- अनिंद्य

@ साधना,
आभार.

आता नेपाळबद्दलचे सर्व भाग प्रकाशित केले आहेत इथे. मायबोली प्रशासकांनी मालिकेचे भाग एकत्र ओवून दिले आहेत आणि पहिल्या भागाला चित्र लावलेय.