भाग तिसरा – मुक्काम लेह, अल्ट्रा मॅरेथॉनची पुर्वतयारी
तारीख ६ सप्टेंबर २०१७
सकाळी नेहेमी सारखे ७, ८, ९ प्रमाणे तयार होऊन बेस कॅम्प वरून निघालो. अगदी ‘अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जातो गाव‘ वाले फिलिंग येत होते. परतीच्या वाटेवर ट्रेक लीडर बरोबर भरपूर गप्पा मारल्या येताना ज्या गोष्टी कळल्या नव्हत्या त्या जाताना कळल्या. ‘चांग मा’ हे पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणाला पडलेले नाव झाडावरून आहे. ही झाडे म्हणजे त्याचे लाकूड घर बांधणी करता उपयोगी पडते. वाटेत दुपारी ‘चांग मा’ इथल्या मित्राच्या कॅफेवर जेवायला थांबलो ते सोडले तर १४ किमी अंतर मजल दर मजल करत काटून आम्ही सगळे दुपारी ३ च्या सुमारास स्टोक गावात पोचलो. वाटेत परत अर्जुन वाजपेयी भेटला आज त्याच्या सोबत एक नीटसा / व्यवस्थित फोटो काढता आला. तिथे चहा पीत असतानाच कळले की गावात गाड्या केव्हाच येऊन थांबल्या आहेत, मग चहा पिऊन झाल्यावर भराभर गाडीपाशी पोचलो. आम्हालाही लेहला लवकर पोचायची घाई होतीच. पुढचे सगळे बिब कलेक्शन ई. पार पाडायचे सोपस्कार डोळ्यासमोर येत होते.
परत आल्यावर निखील आणि अमनदीप यांना भेटलो असता त्या दोघांनी खारदुंग ला पर्यंत बाईक वर जाउन आल्याचे सांगितले आणि वर सांगितले की मधला भरपूर अंतराचा रस्ता खराब आहे, रस्त्यावर चिखल आहे, पाण्याचे ओहोळ वाहत असतात आणि माझे नेहेमीच्या वापराचे Decathlon मधे मिळणारे ‘न्यू फील’ कंपनीचे मिनिमलीस्टिक शूज तिकडे चालणार नाहीत. मी नवीन बूट घ्यावे म्हणून दोघेही मागे लागले. त्यानी तर लेह मधली अनेक दुकाने फिरून एक दुकान आणि स्केचर्स चे शूज शोधूनही ठेवले होते. खरेतर असा नियमच आहे म्हणा ना की रेसच्या दिवशी आयत्यावेळी नवीन काहीही वापरायचे नसते, नवीन काहीही खायचे नसते, नवीन काहीही प्यायचे नसते. बूट, मोजे, कपडे, वाटेत खायच्या गोष्टी प्यायचे एनर्जी ड्रिंक सगळे काही आपल्याला आधीपासून सवयीचे असते तेच वापरायचे. असे असताना मध्ये फक्त एक दिवस राहिला असताना नवीन बुटाचा जुगार खेळायचा का? नेहेमीचे बूट, खराब रस्ता त्यावरून वाहणारे बर्फगार पाण्याचे ओहोळ ह्या सगळ्यांना पुरून उरतील का? वगैरे गोष्टींचा विचार करून मेंदूला शीण येण्याच्या आत निर्णय घेतला की जोडे विकत घेउन ठेवू. एक दिवस वापरून पाहू पायांना कसे वाटताहेत, खारदुंग कडे जाताना तो रस्ता मलाही खराब वाटला तर ते घालून धावू. त्याप्रमाणे मग जोडेखरेदी केली.
त्याआधी ‘रिमो एक्सिपीडीशन’च्या ऑफिसात जावून बिब कलेक्ट केले. त्यानी दुसऱ्या दिवशी साडेचार वाजता ब्रीफिंग करता यायचे आहे असे सांगितले. मी ट्रेक मध्ये असताना, राम अय्यर लेहला पोचलेला होता तो वेगळ्याच एका हॉटेलात रहात होता, तो ही भेटला. तो हाफ धावणार होता. त्याने आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी निखील आणि अमनदीप सोबत निदान ५ किमी धावूया असे ठरवले.
आम्ही हॉटेलवर परतलो. त्या रात्रीचा मुक्काम देखील TTH तर्फे होता. ती रात्र ट्रेकमेटस सोबतची शेवटची रात्र. काही दुसऱ्या दिवशी परत जाणार होते, काही पंगोंग लेक वगैरे कुठे कुठे फिरायला. हाफ वा धावणाऱ्या लोकांच्या हातात अजून तीन दिवस होते. आम्हाला TTH तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात येणार होते त्याकरता एकत्र जमायला सांगितले होते. साधारणतः सर्व जण एकत्र असण्याची ती शेवटची रात्र असल्याने ती झाली पार्टी नाईट. तसे आम्हाला TTH तर्फे साडेआठ वाजता एकत्र जमायला सांगितले होते सगळे माझ्याच रूम मधे जमले होते. पण एकंदरीतच आम्हाला जमायला मग प्रशस्तीपत्र द्यायला वगैरे बराच उशीर झाला. त्यानंतर बाहेर जावून खाण्यापेक्षा बाहेरून खाणे मागवायचे ठरले. सचिनने बाहेर जाउन आम्हा सगळ्यांकरता खायला आणले. उशीर झाल्याने बिचाऱ्याला बरेच भटकावे लागले पण ‘वाजवान’ नावाच्या रेस्तोरांत मधून आणलेले जेवण अत्यंत स्वादिष्ट होते. जेवण झाल्यानंतरही मग बराच वेळ सगळे बोलत थांबलो होतो. एकमेकांनी संपर्कात राहायचे ठरवून, फोटो कसे कुठे अपलोड करायचे वगैरे बोलणी करून एकमेकांची रजा घेतली तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते.
दुसऱ्या दिवशी (ते नवीन घेतलेले बूट घालून) धावायचे ठरवले असल्याने (बराच पसारा तसाच ठेवून) घाईघाईने झोपलो.
तारीख ७ सप्टेंबर २०१७
रात्री उशीर होईल याचा तसा अंदाज असल्याने अमन आणि निखील बरोबर नेहेमीच्या वेळेऐवजी साडेसहा वाजता पळायला जायचे ठरवले होते. व तसे राम अय्यरलाही कळवले होते. निदान ५ किमी धावावे म्हणून निघालेलो आम्ही जवळ जवळ १० किमी धावलो. अमन-निखीलने ‘खारदुंग ला’ कडे जाणाऱ्या रस्त्यावर धावायचे ठरवले होते ह्याच रस्त्यावरून एक फाटा लेह राजवाड्या कडे जातो. तिथवर जाउन परत आलो. वाटेत राजवाड्याकडे जात असताना चढावरून जाताना धाप लागत होती अमन निखील मात्र एका विशिष्ट गतीने न थांबता धावतच होते. मी खूप दिवसांनी पळत असल्याने मला खूप भारी वाटत होते आणि लागलेल्या धापेमुळे एकीकडे चिंतीतही व्हायला झाले. राजवाड्याकडे जात असताना काही धावपटू धावताना दिसले शिवाय त्यांचे शूटिंग चालू होते, त्यांचा एक शॉट चालू असल्याने त्यांनी आम्हाला जरा थांबायला सांगितले मग त्यांच्याशी थोडे बोललो असता ती मंडळी पुण्याचीच निघाली एक जण बोट क्लब रस्त्यावर रहात होता असे कळले म्हणून त्याला माझ्या वाडीया कॉलेज बद्दल सांगितले तर दुसरा तर नेस वाडीयाचाच निघाला. मी खारदुंग ला धावणारे कळल्यावर त्यांच्या नजरेतून विस्मय आणि कौतुक ओसंडून वाहू लागले. ते लोक ह्या लडाख मॅरेथॉन संदर्भात एक डॉक्युमेंटरी तयार करत होते. ह्या मॅरेथॉन मुळे स्थानिक युवकां मुलांवर कसा चांगला प्रभाव पडत आहे ह्यावरती फोकस करत होते. लडाख मॅरेथॉन मध्ये (बहुतेक) मागच्या वर्षीपासून ७ किमी अंतराकरता शाळकरी मुलांना काहीही फी न भरता धावू दिले जात आहे, त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये फील गुड फाक्टर तर आहेच पण त्यांच्यात एक जोशही निर्माण झालेला जाणवत होता. शाररीक क्षमता वाढवण्याकरता रनिंग कसे उपयोगाला येत आहे वगैरे त्यांच्या डॉक्युमेंटरीचा विषय होता.
तिकडून परत आल्यावर मग नाष्टा केला आणि घरी जातानाच माझे सामान अमन निखील वाल्या गेस्ट हाउस मध्ये शिफ्ट केले. थोडी झोप काढायचा प्रयत्न केला पण गेस्ट हाउस मध्ये वाय फाय असल्याने तो मोडीत निघाला.
दुपार चे जेवण घ्यायला बाहेर पडलो तर कळले की आज मार्केट कसल्याशा कारणामुळे बंद ठेवण्यात आले आहे म्हणजे सगळी दुकाने, रेस्तोरंट, वगैरे बंद आहेत इतकंच काय तर भाज्या विकायला बसलेल्या लोकांना देखील तेथून हटवण्यात आहे. दरम्यान काहीच नाही मिळाले तर म्हणून राम अय्यरने गाजरं फळे वगैरे विकत घेउन ठेवली होती पण अमनने कसे बसे एक ठिकाण शोधून काढले. त्या रेस्तोरांत मधे त्यांनी आम्हाला खायला द्यायचे कबूल केले ते वरच्या मजल्यावर असल्याने शक्य होउ शकले. जेवण चांगले होते. मात्र ह्या सगळ्या बंद प्रकरणामुळे घरी जावून झोपायचा इरादा धुळीस मिळाला. तिकडेच वेळ घालवत साडेचारला रीमोच्या ऑफिस मधे ब्रीफिंग करता जायचे ठरवले. त्यानुसार मग तिकडे गेलो. घरून निघताना उन होते जेवताना पाउस आला आणि आता तिकडे जायला निघालो असता गार वारे वाहात होते. रिमो एक्सपीडीशनच्या ऑफिस पाशी पुण्याच्या एएफएमसी मधले डॉक्टर लोक एनड्युअरंस खेळाडूवर हाय अल्टीट्युडचा परिणाम अशा काहीशा विषयावर संशोधन करण्यासाठी म्हणून रक्त घेत होते त्यांना रक्ताचा नमुना दिला. मग वाटले की आता कोणत्यातरी हॉलमधे ब्रीफिंग देतील तर बाहेरच काही गोष्टी सांगितल्या आणि आम्हाला बस मध्ये बसवून हायवे सोडून लेह गावात शिरायच्या वेळी घ्यायच्या वळणापाशी घेउन गेले. इथून स्पर्धा संपायच्या ठिकाणापर्यंतचे अंतर ५ -५.५ किमी होते. खारदुंग ला कडून लेह कडे येणारा रस्ता इथवर सरळसोट म्हणजे तसा सरळसोट नव्हे तर इतर कुठे जायचे फाटे नसलेला होता. मात्र इथून तो हमरस्ता सोडून लेह गावात शिरण्याकरता एक यु टर्न घ्यायचा होता. बसमधून आम्हाला त्या ठिकाणी घेउन गेले. त्याठिकाणी मात्र सविस्तर माहिती सांगण्यात आली. प्रश्नोत्तरे झाली, शंका समाधान करण्यात आले. वैद्यकीय कारणामुळे स्पर्धा सोडायचा प्रसंग उद्भवला तर आयोजक कसे तयार आहेत पण स्पर्धकांनी त्यांना त्रास होत असेल तर लपवाछपवी करू नये, उगाच मी स्पर्धा सोडणार नाही असा हट्ट करू नये हे ही नीटपणे सांगण्यात आले. पहाटे तीन वाजता तपमान शून्यापेक्षा कमी असू शकते आणि नंतर ते दिवसासोबत वाढत जाउ शकते तर सुरुवातीस एकच जाडजूड जेकेट घालण्यापेक्षा कपड्यांचे एकावर एक थर घालावेत, (थराचा फायदा हा इथल्या लहरी हवामानात, तपमानानुसार कपडे घालण उतरवणे सोपे पडते. तसेच धावताना आपले शरीर गरम झाले असता एकेक कपडा उतरवत गेल्यावर एकदम थंड वाटणार नाही अथवा अचानक गार वारे वगैरे सुटले अथवा पाउस पडायला लागला तर त्याप्रमाणे थर वाढवत जायचा) दिवसा तपमान वाढल्यावर असे कपडे काढायचे झाल्यास ते कुठे ठेवता येतील, प्यायचे पाणी कुठे मिळेल, मदत केंद्र कुठे असतील, वैद्यकीय सेवा कुठे उपलब्ध असेल, स्वच्छतागृह कुठे असतील अशी सगळी माहिती देण्यात आली. त्याच वेळी काही स्पर्धकांनी वाटेत बूट किंवा टी-शर्ट बदलायचा असेल किंवा अजूनही स्वतःचेच काही सामान हवे असेल तर ते मिळू शकेल का अशी विचारणा केली पण मग ते कुठे आणि कसे द्यावे यावर माफक चर्चा होउन अशी आपल्याला पाहिजे त्या सामानाची पिशवी अगोदर देउन ठेवल्यास सोउथ पुलू ला मिळण्याची सोय करता येईल असे तिथल्या तिथे जाहीर केले. त्याप्रमाणे एक मिनीबस अशा पिशव्या ठेवण्याकरता नियुक्त केली गेली. आयोजकांनी अजिबात आढेवेढे न घेता ही आयत्यावेळची मागणी मान्य केली आणि धावकांना आणि त्यांच्या सोयी सुविधांना ते किती महत्व देताहेत ते प्रकर्षाने जाणवले. हे सगळे भाषण-संभाषण झाल्यावर तिथपासून ते मार्केट पर्यंत शेवटचे सर्व अंतर, आम्हा स्पर्धकांना स्पर्धा-मार्ग नीट समजावा म्हणून चालवत परत आणले. मला खरेतर अजिबात उत्साह नव्हता. आधीच दुपारी झोप घेईन म्हटले होते ती झाली नव्हती त्यात वर परत हे चालत जायचे पण मागच्या काही वर्षांच्या स्पर्धांच्या वेळेस शेवटचा टप्प्यात अनेक स्पर्धक रस्ता चुकले होते त्यामुळे त्यानी ह्यावेळी ही काळजी घेतली. मग हे असे चालत परत पोहोचेपर्यंत संध्याकाळ होउन गेली. तरीही बंद दुकाने उघडली नव्हती. खरेतर ते लडाखी झेंडे, स्वेटर वगैरेखरेदी करायची होती पण कसलीही खरेदी करता आली नाही. रात्रीचे जेवण गेस्ट हाउस मधेच करायचे ठरवले होते मग घरी गेलो, दुसऱ्या दिवशीची तयारी केली. बॅग भरणे हे मोठेच काम होउन बसले. माझ्याकडे नेमके पाउस आला तर घालायला रेन जॅकेट नव्हते. ट्रेक मधे पोंचो चालून गेला पळताना तो अजिबातच सोयीस्कर ठरला नसता. मग निखीलकडून त्याचे रेन जॅकेट घेतले.
त्या दिवशी खास मला भेटायला म्हणून गुंजन नावाचा मित्र (हा आम्हाला आम्ही कच्छच्या रणातली 'रन द रण' केली त्यावेळी भेटलेला मुलगा) त्याच्या दोन मित्रांसमवेत आला होता. आम्ही रण नंतर आताच भेटत होतो. गुंजन हाफ मॅर्रेथॉन धावणार होता. खूप मस्त गप्पा झाल्या. इतक्या कालावधीनंतरही तो इतक्या आपुलकीने आवर्जून मला भेटायला आला त्यामुळे खूप छान वाटले.
रात्रीच्या जेवणात माझ्याकरता खास भाजी बनवली होती ( बाकीचे सामिष भोजनाचे भोक्ते असल्याने भाजी खास माझ्यासाठी) मटाराचे एक स्थानिक वाण होते, नेहेमी पेक्षा तिप्पट मोठा दाणा होता. खूप मस्त चव. जुनेद गेस्ट हाउस मधले जेवण म्हणजे त्यांच्या घरीच बनवलेले जेवण. त्यामुळे कायमच तिथल्या जेवण-खाण्याला इतकी सुंदर चव होती की बास. एकंदरितच ते गेस्ट हाऊस म्हणजे हॉटेल आणि होम स्टे यांचा सुवर्ण मध्य आहे. परत जाईन तेव्हा मला तिकडे जाऊन राहायला आवडेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता रिमोच्या ऑफिस पाशी पोचायचे होते त्यामुळे सकाळवर काहीही काम ठेवायचे नव्हते. उरले सुरले सर्व पॅकिंग आटोपले आणि मग जेवून झोपी गेलो.
भाग चौथा – खारदुंग गाव ते लेह , ७२ किमी मार्गे खारदुंग ला
https://www.maayboli.com/node/64126
जबरी रे !!
जबरी रे !!
मस्तच, छान उत्सुकता निर्माण
मस्तच, छान उत्सुकता निर्माण झालीय.
मस्त.
मस्त.
पळणं वगैरे जमणार नसल्याने तुमचं खाणं वर्णन वाचून ते करायला जायला हवं अस ं वाटतंय.
मस्त चालू आहे लेखनमालिका. हा
मस्त चालू आहे लेखनमालिका. हा भाग पण आवडला.
मस्तच, छान उत्सुकता निर्माण
मस्तच, छान उत्सुकता निर्माण झालीय. >>>> + 999
जबरदस्त.....
नुसतं वाचतानाही रोमांचक
नुसतं वाचतानाही रोमांचक वाटतंय. पण प्रत्यक्षात नक्कीच ते तसं नसावं.
पुढे कसं काय काय ह्याबद्दलची उत्कंठा वाढलीये.
एकदम प्रत्ययकारी लिहितोयस.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
सायो - तरी बरे मी खाण्यापिण्याचे फोटो टाकले नाहीयेत.
लेह मधे तरी खाण्यापिण्याची विविधता होती. आम्हाला इस्रायिली, फ्रेंच , तिबेट, स्थानिक सगळे पदार्थ मस्त बनवलेले मिळाले. फक्त म्हणे पंजाबी म्हणून जे मिळात होते ते अजीबात चांगले नव्हते.