नदीच्या वाहण्याची गोष्ट!!

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

माझी फिल्म येतेय. त्या प्रवासाबद्दल थोडसं लिहिलं होतं ब्लॉगवर. तर माचकरांनी ते आपल्या पोर्टलसाठी परत आणि तपशिलात लिहून मागितलं. तो परत लिहिलेला लेख अ‍ॅडमिनच्या परवानगीने इथे टाकतेय. हा प्रवास इथे शेअर करताना मला खरंच खूप आनंद होतोय. श्वासच्याही आधीपासून मायबोलीशी माझं नातं आहे. त्यामुळे मायबोलीचे माझ्या आयुष्यात एक स्पेशल स्थान आहे. हे एक कारण आणि दुसरं म्हणजे यातला माझा बराचसा प्रवास चालू होता त्या काळात मी मायबोलीवर भरपूर अ‍ॅक्टिव्ह होते. अनेकांना माझ्या इकडेतिकडे फिरण्याच्या कहाण्याही सांगितल्या आहेत तेव्हा. तर हा लेख.

21441542_10154965990127151_1152969059_o.jpg

'मला नदी, पाणी याबद्दल कराविशी वाटतेय फिल्म!’ 'चालेल. करूया!’ असा एक संवाद आमच्यात घडला तो दिवस. 

’इथे घरात नळाला पाणी येतं आपल्या. ते कुठल्या धरणातून येतं माहितीये पण धरण कुठल्या नदीवर आहे? नदीचं काय झालंय हे कुठे माहितीये आपल्याला? इथे नद्यांची तर परिस्थिती बिकट झालेली आहे. याचा शोध घ्यायला हवा.’ संदीप मनापासून बोलत होता. मलाही पटलंच.

काम सुरू झालं. पाणी, नदी याबद्दलची पुस्तकं जमा होऊ लागली. ती वाचून काही माहिती जमा होऊ लागली. जलतज्ञ माधवराव चितळे, हिवरे बाजारचे पोपटराव पवार अश्या दिग्गजांशी संपर्क साधला. त्यांच्या कामाबद्दल समजून घेतले. कधीही विचारांची देवाणघेवाण, चर्चा करायची गरज पडली तर माधवराव चितळे आवर्जून वेळ काढत.


महाराष्ट्राचे जलनायक वाचून मग एक दिवस जागतिक बॅंकेच्या जलस्वराज्य योजनेचे काम समजून घ्यायला आकेरीला डॉ. देवधरांच्या घरी जाऊन पोचलो. जलस्वराज्याचे काम बघितलेच पण भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे काम आणि डॉ. देवधरांचा वेगळा दृष्टिकोनही समजायला लागला. तिथून सुरू झाला संदीपचा नद्यांचा, नद्याकाठच्या गावांचा शोध.  

प्रत्येक दौर्‍यानंतर नदी, नदीकाठची आणि नदीची माणसं फिरून संदीप घरी यायचा तेव्हा त्याच्या सगळ्या असण्याला येणारा जंगलाचा, नदीचा हिरवा वास. त्याच्या बरोबरच्या कुठल्या तरी पिशवीतून निघालेलं एखादं रानफूल, एखादा दगड, मुंढरच्या साळवींच्या शेतातली तवशी आणि माणसांच्या रग्गड कहाण्या. 

यावेळेला धरणामुळे विस्थापित झालेला एकजण भेटला. डोळ्यात पाणी होतं त्याच्या. 

मायनिंगसाठीची जनसुनावणी बघून आलो. खोटेपणाचा कळस. 

एक म्हातारबाबा भेटले होते. आयुष्यभर कष्ट केल्याच्या खुणा होत्या अंगावर. ’आयुष्य खूप सुंदर गेलं!’ म्हणाले.

गोव्यात राजेंद्र केरकर आहेत, त्यांच्या घरी अनेक मुलं शिकायला राहतात. सगळ्यांना जंगल पाठ असतं. त्यांची समृद्धी एवढीश्शी आहे पण कधीही जंगलात नदीवर जायला तयार.

डॉ बापू भोगटेकडे जाऊ एकदा आपण. रानडुकराची शिकार ते कोंबडीपालन सगळ्यामधे एक्स्पर्ट माणूस आहे. 

समीरचं कृषि पर्यटन केंद्र, सचिनचे हळदीचे प्रयोग, पौनीकरांचा वेगळा दृष्टीकोन, हेमंत तांबेच्या टिप्पण्या, नितूची कलिंगडाची शेती, प्रसादचे (डॉ. देवधर) ग्रामविकासासाठीचे प्रयोग आणि बायोगॅस नावाचं त्याचं लाडकं प्रकरण.

एक मुलगी आहे. विशीबाविशीची. तिचं नदीशी नातं आहे...  पटकथेने आकार घ्यायला सुरूवात केली.

पटकथेचा आवाका संदीपच्या नजरेत आल्यावर मग मीही त्याच्याबरोबर नद्या फिरायला सुरूवात केली. तिथलं जग, माणसं, निसर्ग सगळं ’बघायचं’ होतं मला आणि योग्य वेळी कॅमेर्‍यासमोर उभंही करायचं होतं. तेव्हा त्या निसर्गाला भिडताना माझ्या शहरी गाभ्याला सुरूवातीला दडपायला झालं. पण त्या दडपणाचं हळूहळू मैत्रीत रूपांतरही झालं. मग खळाळतं, वाहतं पाणी नजरेला, पायाला भिडल्यावर माझी तंद्री लागणंही सुरू झालं. 

पटकथा आकार घेत असतानाच अभिनयाच्या कार्यशाळा आणि स्क्रीनटेस्टसही सुरू झाल्या. त्यात आमची, अंतीची माणसं सापडत गेली. एका ऑडिशनला समोर पूनम मांद्रेकर (आता शेटगावकर) समोर आली. हीच आपली नदीशी नातं असलेली मुलगी. तंतोतंत.

डॉ. हर्षदा देवधरची वीस रूपयाच्या नोटेची कविता. डॉ. प्रसाद देवधरबरोबर फिरताना उमजत गेलेलं कोकण, कोकणातलं गाव, कोकणी माणूस आणि राजकारण. पाण्याचं, जमिनीचं, निसर्गाचं राजकारण.
गोव्याचा श्रीकांत जोशी, त्याचं फार्म आणि तिथे येणारे मोर. आमचं गोव्यातलं घरच असल्यासारखं. असं निघून नसतं जायचं रे श्रीकांत! आता  माझ्या आणि संदीपच्या डोक्यावर हात ठेवून ’सूरज कही भी जाये, तुमपर ना धूप आये!’ कोण म्हणणार?
नदीचे रंग, झाडांचे पोत, ऋतूंची रूपे, माणसांच्या रंगरेषा... ’परीसराची एकेक शीर जाणतेय मी!’ याची अनुभूती मिळेतोपर्यंत सगळा आसमंत हळूहळू आत झिरपू द्यायचा.
एखाद्या गावाचा चेहरा आनंदी दिसला की समजावं इथली नदी वाहती आहे. लोकांची आयुष्यं समृद्ध करतेय. गाव आणि नदीचं हे नातं अप्रूपाचं, सांभाळून ठेवण्याचं.

हे माझे पहिलेच कलादिग्दर्शन. आणि बरोबर कितव्यांदातरी केलेले वेशसंकल्पनही होते.

"कुणी निर्माता आपल्यासाठी उभा राहणार नाहीये. जमवू काहीतरी पैशाचं. आपणच करायला हवं." "तुझं श्रेय तुझंच असायला हवं आता. आपणच करायला हवं." अश्या संवादांचा एक दिवस. निर्माता बनायचं राज्य घेऊन बसलो. मग बाकीच्या कामाबरोबर पैसा उभा राहण्यासाठी प्रयत्न करणे आणि वाट बघणे हे आलंच.

शूटींगपर्यंत पोचलो. पहाटे पहाटे सावंतवाडीत तलावाच्या बाजूला कार्स, व्हॅन्स, ट्रक्स मिळून १५ -१६ गाड्यांचा जथ्था. सगळ्या गाड्या रांगेने लोकेशनवर पोचणार. अगदी कुडाळहून नाश्ता घेऊन आलेला टेम्पोही त्यातच. एकावेळेला १५-१५ दिवस सलग शूटिंग. अर्धे दिवस गोव्याच्या जंगलात अर्धे दिवस सिंधुदुर्गातल्या कानाकोपर्‍यात.

अजून असंख्य बारीक सारीक गोष्टी. या प्रवासाचे साथीदार आणि साक्षीदार असलेले असंख्य मित्र व सहकारी.

 या सगळ्या सगळ्यातून आता फिल्म रिलीज होतेय. नदी वाह्ती होतेय या सप्टेंबरमधे २२ तारखेला. ती वाहती ठेवणं तुमच्या हाती. तिकीट काढून प्रेक्षागृहात जाऊन फिल्म बघा अशी विनंती करून तुमच्या शुभेच्छा गृहित धरते आहे.

नदी वाहते चे दोन टिझर्स प्रसिद्ध झाले आहेत त्यांचे दुवे इथे देते आहे.
पहिला टिझर

दुसरा टिझर

- नी

विषय: 
प्रकार: 

जबरदस्त प्रवास आहे नदी वाहतेचा , तुमचं कष्ट , झपाटलेपण दिसून येतयं .
नदी वाहते टीमला खुप खुप शुभेच्छा !

खूप सार्या शुभेच्छा !! चित्रपट तयार करण्याचा प्रवास छान मांडलाय. विषयाबद्दल ची कळकळ आणि मेहनत दोन्ही दिसून येतेय.
नक्की बघणार !!

खूपच कळकळीनी लिहीलं आहेस नी ! तुमचे कष्ट , मेहनत शब्दाशब्दामधून जाणवते आहे. बघायची खूप इच्छा आहे.
अमेरिकेत घेऊन येणार आहात का ?

सर्वांचे आभार.

अमेरिकेत घेऊन येणार आहात का ?<< प्रयत्न आहेत शुगोल.

हे देवरुखचे का बाय एनी चान्स?<< हो तोच.

अरे ग्रेट !! मस्त लिहिलेय...
टीजरमधील नदीच्या वाहत्या पात्राचे क्लोज शॉटस मस्त आलेत .. शुभेच्छा Happy

वा !! सुंदर लेख नी. तुमची कळकळ आणि प्रयत्न अगदी नीट जाणवतात. चित्रपटाला शुभेच्छा. इकडे येणार असेल तर नक्की बघू. काही डिजीटल माध्यमातून (यु एफ ओ वगैरे सारखे) आमच्या गावात दाखवता येईल का ते पण पाहता येईल.

मस्त लिहीलंयस, नी. पिक्चरमधे काय असेल याची थोडी थोडी कल्पना आली आणि उत्सुकता पण वाढली आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

मस्त लिहीले आहे. खूप उत्सुकता आहे चित्रपटाबद्दल. ते वरचे पोस्टर इतके दिमाखदार आहे! सगळा चित्रपटही असाच विज्युअली सुद्धा सुंदर असेल तर आणखी आवडेल. नद्या हा माझा लहानपणापासून आवडीचा विषय असल्याने आणखीनच.

टिसर छान आहे.. पण views खूप कमी आहेत.. पब्लिसिटी कमी पडतेय.. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे..
Youtube विडिओ टायटल मध्ये upcoming marathi movie असे ऍड करता येईल का.. खूप लोक असा सर्च करतात..

भारीच प्रवास आहे हा! एखादी इमारत उभी राहात असतानाच ती सगळीकडून फिरून पाहावी आणि त्यातलाच एखादा चौकोनी तुकडा मनात भरावा... 'हेच आपलं घर' म्हणून! तसं वाटलं वाचताना. नक्की पाहाणार!

Pages