पण आज ती वैतागलेली होती!

Submitted by आर.ए.के. on 28 May, 2013 - 03:13

पाssssरब्रम्ह परमेश्वर, पाssssरब्रम्ह परमेश्वर, तूम सबके स्वामी,
ओsssम जय जगदीश हरे...!

सकाळी सकाळी अगदी तारस्वरात चालणार्‍या या आरतीचा तीला वैताग आला. किती भेसूर आणि भसाड्या आवाजात गातो हा माणूस! सकाळ्च्या प्रसन्न वातावरणात समोरच्या मंदिरात चालू असलेल्या आरतीमुळे आधीच थोडा खराब असलेला तीचा मूड आणखीनच खराब झाला. हातातला चहाचा कप तसाच ठेवून ती गेलरी बंद करुन पुन्हा घरात आली. हॉलचा दरवाजा उघडून तिने पेपर आला आहे का ते पाहिलं. नेमका आज पेपरसुद्धा आला नाहीये. ती अजून थोडी वैतागली. आतून बशी आणून तिने चहा फटाफट संपवला आणि रोजच्या सारखी ती तिच्या कामांना लागली, अगदी यांत्रिकपणे! तो अजून झोपला आहे. आत्ता उठेल, मग त्याला चहा करुन द्यावा लागेल आणि मग दोघांचा डबा बनवावा लागेल.. श्शी...काय रुटीन आहे आपल! स्वतःसाठी वेळच नाहीये आपल्यापाशी! एखाद्या रोबोटप्रमाणे ठरलेली कामे, ठराविक वेळात पार पाडायची. रोबोट आणि आपल्यात फक्त एकच फरक!
रोज तीच तीच कामे करुन तो कधी कंटाळत नाही , आपण कंटाळतो! आणि मग असा उगाचच मूड्-ऑफ होतो , चिडचिड होते , लहान्-सहान गोष्टींमुळे आपण वैतागायला लागतो. आज तिचही नेमकं असच झाल होतं! ना ती त्याच्यासोबत भांडली होती , ना ऑफिसमध्ये तिचं कोणासोबत वाजल होतं, पण आज ती वैतागलेली होती...कशाला ? तर रोजच्या रुटीनला!
डबा बनवून पटापट तिने ऑफिसला निघण्याची तयारी केली.तो आवरुन ऑफिसला केंव्हाच गेलेला होता. पार्किंग मधून गाडी काढून ती ऑफिसला निघाली. तिचा रोजचा ऑफिसचा रस्ता त्या मंदिरापासुन असायचा. मंदिरात येणार्‍या लोकांमुळे त्या रस्त्यावर नेहमी गर्दी असायची. दर्शनाला आलेली लोकं रस्त्यावर कोठेही गाड्या पार्क करायची , त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता आण्खीनच अरूंद व्ह्यायचा. हे रोजचचं होतं . पण आज ती वैतागलेली होती. रस्त्याच्या मधेच उभा असलेल्या फुगेवाल्याकडे तिने एक जळजळीत कटाक्ष टाकला. दहा वेळेला हॉर्न देवूनही तिला आडव्या आलेल्या टू व्हीलर वाल्याला तिने मनातल्या मनात शिव्या दिल्या आणि "काय दादा हॉर्न ऐकू येत नाही का? का कान फुटले? अशी शालजोडीतली मारली. टू व्हीलर वाल्याने पण तिला काहीतरी प्रत्युत्तर दिल पण ते ऐकून घ्यायला ती थांबली नाही! लाल्-हिरव्या सिग्नल्सना पार करत करत कशी बशी ती ऑफिसला पोहोचली. स्वतःच्या खुर्चिवर जावून जवळपास आदळली. आज तिच चित्त थार्‍यावर नव्हतं! समोर येणार्‍या कामातसुद्धा तिचं मन लागत नव्हतं. मन नसलं तरी काय म्हणा? इथही यांत्रिकपणेच सगळं चालतं! मॉनिटरमध्ये मान खुपसायची आणी कीबोर्डवर बोटं बडवतं बसायची..हाय काय अन नाय काय! ए.सी. किती वाढवतात ही लोकं? भर उन्हाळ्यात पण अंगावर काटे येताहेत थंडी वाजून! तिने शेजारणी जवळ तक्रार केली. "फोन करुन सांग ना सिक्युरिटी गार्डला!" थंड आवाजात शेजारणीनं उत्तर दिलं. एरवी तिने फोन केला पण असता, पण आज ती वैतागलेली होती. ए.सी. एवढा ठेवल्यामुळे आतल्या लोकांना त्रास होऊ शकतो एवढा साधा कॉमन सेन्स नसावा त्या सिक्युरिटी गार्ड जवळ? कशाचा पगार घेतात ही लोकं? एवढ बोलून ती पुन्हा कामाला लागली. तसा तिला शेजारणीचा पण रागच आला. काही फरक पडत नाही या लोकांना. आपण चिडलेले असलो काय किंवा खुष असलो काय? किती थंडपणे बोलली ती "फोन करुन सांग ना सिक्युरिटी गार्डला" तेवढं मलाही कळतं. फुकटच्या सल्ल्याची काही गरज नव्हती! आपल्या मनात चाललेली खळबळ हिला काय कळणारं. शेवटी ती पण रोबोटचं ना? दिलेलं काम ठराविक वेळेत पूर्ण करुन देणारी. सुखं-दु:ख असली शब्द यांच्या शब्द्कोषातच नाहीत. विचार करुन करुन ती कंटाळली होती. शेवटी जेवायचा ब्रेक झाला आणि ती जेवायला गेली. कैन्टीनच्या किलबिलाटामुळे तिच डोकं अजूनच फिरायला लागलं. कित्ती बोलतात ही माणसं! डोकं थंड राहावं म्हणून तिने ताक घ्यायच ठरवलं. कूपन घेण्याच्या लाईन मध्ये थांबून तिने "एक ताक!" असं काऊंटर वाल्याला सांगितलं, आणि १० रु. ची नोट दिली. ताक ८ रु. ला मिळायचं. रोजच्या सवयीप्रमाणे काऊंटरवाल्याने तिला दोन चॉकलेटं परत केली. एरवी ती २ चॉकलेटं गुपचुप खिशात घालून तिने मागच्याला रस्ता मोकळा केला असता, पण आज ती वैतागलेली होती ,तिने पर्स मध्ये हात घालून तावातावाने अशीच आधी जमा झालेली ८ चॉकलेटस शोधून बाहेर काढली आणि काऊंटरवर आदळली! "ते १० रु. परत करा, आणि ही ८ चॉकलेट्स घ्या ताकासाठी! एकदा ठीक आहे दोनदा ठीक आहे म्हणलं तर रोजच चॉकलेट्स द्यायला लागले तुम्ही! नाही खायची मला चॉकलेट्स ! सुट्टे पैसे नसतात तर कशाला धंदा करता तुम्ही? का ह्या चॉकलेट्सची एजन्सी चालवता? ड्रॉवर उघडल ना तुमचं की भरपूर सुट्टे पैसे असतील त्यात पण मग ही चॉकलेट्स कोण विकणार नाही का? काऊंटरवाला घामेघूम झाला. त्याने मुकाट्याने २ रु. सुट्टे काढून तिला दिले. रागारागाने ते २ रु.घेवून ती डबा खायला निघून गेली. रागारागातच डबा संपवून ती खाली येवून जागेवर बसली!
आज त्याचा सकाळ्पासून एकही मेल आलेला नाहीये, एरवी तिने तो कामात असेल अशी स्वतःची समजूत करुन घेतली असती ,पण आज ती वैतागलेली होती, तिला राग आला.
मग तिने एक मेल ड्राफ्ट केला. "कुठे आहेस? दिवसभरात दोन मिनिटांचा वेळ काढून मला दोन ओळींचा मेल टाकावासा नाही वाटत का तुला? Don't tell me that u r too busy to text few lines"
ह्यावरुन त्याला तिच्या मूड्चा अंदाज आलाच असावा.
मेलबॉक्स बंद करुन ती पुन्हा तिच्या कामाला लागली. कामात पुन्हा दिवस कसा संपला ते तिला कळलं नाही. पण मघा आपण त्याला मेल पाठवला होता त्याचा रिप्लाय आला आहे का ते चेक करायला तिने मेल्बॉक्स उघडला. त्याने रिप्लाय केलेला नव्हता. एरवी तिने त्याकडे दुर्लक्ष केलं असतं, पण आज ती वैतागलेली होती ,तिला राग आला. कसा वागतो हा? मी जर एखाद्या दिवशी याला फोन नाही केला तर तो पण नाही करत. दिवस कसे बदलतात नाही. लग्नाच्या आधी हाच दिवसातून किमान ५ वेळा फोन करायचा. आणि आता? आता काय , एखादी वस्तू आपल्या मालकीची झाली की मग त्याची किंमत कमी होते किंवा त्या गोष्टीमागच कुतूहल कमी होतं , तसचं माणसांचं पण होत असावं का? विचारांच्या ह्याच तंद्रीत ती घरी जाण्यासाठी पार्किंग मधून गाडी काढून माणसांच्या बाजारात शिरली..!

पुन्हा तोच कलकलाट!
ह्या गर्दीपासून आणि गोंगाटापासून आज ती जेवढ्या लांब पळू पाहत होती तेव्हढीच ती गर्दी तिला घरी जायला उशीर करत होती. फोर व्हिलरवाल्यांचा ढिम्मपणा आणि टू व्हिलर वाल्यांचा अती चपळपणा रस्ते जाम करायला कारणीभूत होत होता. कशीबशी रस्ता काढत काढत ती घराच्या पार्कींग एरियात पोहोचली. मे महिना सरत आला होता. संध्याकाळची वेळ होती. संधीप्रकाश आणि वार्‍याची थंड झुळूक तिला आल्हाददायक वाटली पण क्षणभरचं! या थंड वातावरणाचा पण तिला जास्त उपभोग घेता येणार नव्हता कारण घरी जावून तिला स्वयंपाकाच्या तयारीला लागायच होतं. तो घरी आला असेल. पण त्याची गाडी दिसत नव्हती. इतक्यात कुणीतरी हॉर्न वाजवला. कुणीतरी काय? त्यानेच , तिच्या नवर्‍यानेच हॉर्न वाजवला. हा काय करतोय खाली? वर जावून कदाचित फ्रेश होऊन आलेला दिसतो आहे. त्याच्याकडे पाहून तिला छान वाटलं.पण मेल ला रिप्लाय न केल्याचा राग अजूनही मनात होताच.
तो गाडीवर बसूनच तिच्याजवळ आला.
"चल , बैस!"
"कुठे?"
"चल गं , जरा चक्कर मारुन येऊ!"
ती जास्त कटकट न करता मुकाट्याने त्याच्या मागे गाडीवर बसली. आता तिच्यात वाद घालण्याइतकीही शक्ती उरली नव्हती.
तो तिला त्यांच्या घराजवळच्या मंदिरात घेऊन आला. त्याने सुद्धा तशीच रस्त्यावर मिळेल तिकडे गाडी पार्क केली. "बाहेरच्यांवर का चिडा ? आपला नवराही तसाच आहे" ती मनात म्हणाली.
अजूनही तो फुगेवाला रस्त्यातच उभा होता. पण सकाळ्पेक्षा चित्र जरा वेगळ दिसत होतं. दर्शनासाठी आलेली बरीचशी लहान मुले त्याच्याभोवती गराडा टाकून होती. फुगा फुग्यावर घासत, वेगळे वेगळे आवाज काढत तो मुलांची करमणूक करत होता. तिच्या मनात विचार आला, मी उगाचच रागराग करते या फुगेवाल्याचा! हा इतका काही वाईट नाही. हा रस्त्यात उभा रहतो खरा, पण त्याच्याकडे तरी दुसरा पर्याय काय आहे? जिथे लहान मुलं जमतात तिथेच या बिचार्‍याचा व्यवसाय चालणार. त्याच्यामुळे ट्रेफिक मध्ये अडथळा होतो खरा पण चालायचचं! किमान लहानग्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवण्याच पुण्याचं काम तरी करतोय तो!
गाडीवर बसल्यापासून ते मंदिरात प्रवेश घेईपर्यंत तो तिच्याशी काहिही बोलला नव्हता. पण तो आपल्याशी बोलत नाहिये ह्याचा रागही तिला आला नव्हता. तिच्या मनात काहितरी वेगळच चालू होतं!
चप्पल स्टैंड मध्ये चपला सोडून दोघांनीही देवाच दर्शन घेतलं. आणि मंदिराच्या आवारातल्या एका बाकड्यावर बसले. तो काहीच बोलत न्व्हता. ती पण गप्प होती. देवळात येणार्‍या-जाणार्‍या लोकांकडे ती पाहत बसली होती. "श्शी , जीन्स आणि टाईट टी-शर्ट घालून काय पोरी देवळात येतात? येऊ देत म्हणा आपल काय जातयं? निदान देवदर्शन घ्यायला देवळात येण्याची वृत्ती आणि संस्कृती अजून त्यांच्यात शिल्लक आहे हेच पुष्कळ झालं.ती आता दोन्ही बाजूंनी विचार करायला लागली होती.
तितक्यात मंदिराच्या सभा मंडपात कुणीतरी तबल्यावर थाप मारली, त्या पाठोपाठ पेटीचे सूर घुमू लागले. स्पिकर बहूदा फुल्ल व्हॉल्युम ला सेट केला होता. बहूतेक आरतीची वेळ झाली होती.
"जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती"
तिने विचार केला,घराच्या गेलरीत उभारुन ज्या माणसाच्या आवाजाने आपण रोज वैतागतो , तो भसाड्या आवाजाचा हाच तो माणूस. पण किती तल्लीन होऊन तो आरती म्हणत आहे. उच्चारात बर्‍याच चुका करतो आहे पण जो काही तो म्हणायला शिकला आहे ते तो तन्मयतेने म्हणत आहे. अगदी डोळे मिटून, ब्रम्हानंदी टाळी लागल्यासारखा. सुरुवातीला अगदी हळू आवाजात चालू असणारी आरती हळू हळू रंगात यायला लागली. म्हणणार्‍यांचे सूर ,आवाज आणि वेग टीपेला पोहोचले जेंव्हा "ओम जय जगदीश हरे" चालू झालं. आज सकाळी ह्या भजनाच्याच एका ओळीला वैतागून आपण गेलरी बंद करुन आत आलो होतो. पण आता का नाही येत वैताग? सकाळ्पेक्षा कितीतरी जवळून ती हे भजन ऐकत होती , आणि तिच्या मनात असे वेगवेगळे प्रश्न उमटत होते. हा समोरचा माणूस चांगला गातोय का मी माझा त्याच्याकडे बघण्याचा द्रुष्टिकोन बदलला आहे? ह्याच्याकडेच काय पण तो फुगेवाला , विचित्र कपडे घालून देवळात येणार्‍या मुली ह्या सर्वांकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिल, तर ही सगळी माण्सं तशी चांगलीच आहेत. आपण त्यांच्याकडे जशा दृष्टीकोनातून पाहू तशी ती आपल्याला दिसतात. इतक्या वेळ ती त्याला विसरुनच गेली होती. तो मात्र तिच्याकडेच पाहत होता.
दमला असेल तो फार. खूप दगदग होते त्याची आजकाल. आज ऑफिसहून आल्यानंतर साधा चहा तरी पिलाय की नाही कुणास ठाउक? काही मिनिटांपुर्विच ती त्याच्यावर पण वैतागलेलीच होती. पण आता तिचा वैताग हळू हळू कमी होत चालला होता. प्रत्येक गोष्टींमागचा चांगला अर्थ ती काढायला लागली होती! मागे आरती जोरजोरात चालू होती. तो तिला मोठ्ठ्या आवाजात म्हणाला, "चल निघूया का?"
तिने लांबूनच देवाला नमस्कार केला आणि मग दोघही मंदिराच्या बाहेर आली.
"सांग कुठल्या हॉटेलला जायचं?" त्याने गाडीवर बसता बसता विचारलं.
ती आता बरीच फ्रेश झाली होती. दिवसभराचा तिचा थकवा, वैताग आता कुठल्या कुठे पळाला होता.
"आपण आज घरीच जेवलो तर चालेल का तूला?" तिने हासून त्याला प्रश्न विचारला.
त्याला माहीत होतं की ही कधी खूप चिड चिड करायला लागली की हिला तिच्या रोजच्या रुटीन मधून एखाद्या बदलाची गरज असते. आणि आज त्याने तो तिला दिला होता.तिचा बदललेला मूड पाहून त्याला पण बरं वाटलं.
"चालेल!" म्हणून त्याने गाडीला किक मारली आणि दोघेही घराकडे निघाले.
मागे मंदिरातून तो भसाड्या आवाजाचा माणूस अगदी तन्मयतेने भजन आळवत होता ,
"तूम पूरण परमाssत्मा , तूम अंतर्यामी, स्वामी तूम अंतर्यामी
पाssssरब्रम्ह परमेश्वर, पाssssरब्रम्ह परमेश्वर,
तूम सबके स्वामी,ओsssम जय जगदीश हरे...!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

waiting for next part...agree with prafullashimpi and भानुप्रिया

टायटल सगळीकडे अन ते पण बोल्ड मधे का लिहिलंय. वाचणार्‍यांना समजतंय की नायिका वैतागलेली असेल म्हणुन. नाही तर पहील्याच पॅरामधे "ती वैतागली होती" असं लिहायचं. वाचताना आम्हालाच वैताग आला ना!!

मस्त.. तुमचे सर्व लेखन आज वाचल..
जे रोजच्या लाईफ मध्ये घडत असतं ते किती मस्त शैलीत लिहता..