आपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ८वे वर्ष. या उपक्रमांतर्गत चांगले काम करणाऱ्या; गरजू व नोंदणीकृत सेवाभावी संस्थांची नावे, त्यांबद्दलची माहिती आणि त्या संस्थेची सध्या काय गरज आहे याची एक यादी करुन, त्या माहितीची शहानिशा करून यादीतील संस्थांना मदत करण्यासाठी आपण मायबोली.कॉम, मिसळपाव.कॉम तसेच फ़ेसबुकच्या माध्यमातून एक जाहीर आवाहन केले.
याप्रकारे आवाहनात दिलेल्या यादीतून इच्छुक देणगीदारांनी आपापल्या पसंतीच्या संस्था निवडल्या व ते देणगी देऊ शकत असलेली रक्कम सामाजिक उपक्रम टीमला कळवली. तसेच त्या संस्थेकडे पैसे जमा केल्यावर त्याबद्दलही आम्हाला कळवले. त्यामुळे त्या संस्थेकडून देणगीची पावती घेणे, ती देणगीदारांस सुपूर्द करणे व ज्या कामासाठी किंवा वस्तूसाठी देणगी दिली आहे त्या कामाची / वस्तू खरेदीच्या प्रगतीची संस्थेकडून माहिती घेणे यासंदर्भात आम्ही थोडीफार मदत करू शकलो. ज्यांनी असा पसंतीक्रम कळवला नव्हता त्यांना देणगी देण्यासाठी आपण संस्था अशाप्रकारे निवडून दिल्या की जेणेकरुन प्रत्येक संस्थेला शक्यतो समप्रमाणात देणगी मिळणे शक्य व्हावे. असे करताना आपण त्या त्या संस्थेच्या गरजेची शक्यतो पूर्तता होईल याकडेही शक्य तेव्हढे लक्ष दिले आहे. सांगावयास आनंद वाटतो की या वर्षीदेखील उपक्रमाची माहिती वाचून मायबोलीचे सभासद नसलेल्या किंवा मायबोलीवर केवळ वाचनमात्र येणाऱ्या काहीजणांनीही मदतीचा हात पुढे केला. नियमीतपणे उपक्रमाचा भाग होणारे आपले देणगीदार, नवीन देणगीदार, मायबोलीकरांचे मित्र नातेवाईक, मिसळपावचे सभासद, युनायटेड किंगडम येथील
लंडनस्थित काळे ट्रस्ट अशा सगळ्यांच्या हातभारामुळे हा उपक्रम पूर्णत्वास जाऊ शकला आहे. देणगीदारांकडून त्या त्या संस्थेत देणगी जमा करण्याचे काम पूर्ण झाले आहे. आवाहनात लिहील्याप्रमाणे त्या देणगीचा विनियोग देखील काही संस्थांनी केला आहे. काही संस्थांमधे विनियोगाचे काम अजून चालू आहे. त्या सगळ्याची माहिती खाली देत आहोत. आपण यंदा एकूण ३,७५,०७६ /- (रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार शहात्तर मात्र) इतकी देणगी जमा करु शकलो संस्थांची नावे व त्यांना मिळालेल्या देणगीतून त्यांनी केलेली कामे / घेतलेल्या वस्तूंची यादी देत आहोत :
1. सहारा अनाथालय: रु. ७०५७५/- (रुपये सत्तर हजार पाचशे पंच्याहत्तर मात्र) इतकी रक्कम देणगी दाखल देण्यात आली आहे. देणगी रकमेतून अनाथालयातील मुलींसाठी १० बंक बेड्स करुन घेण्यात आले.
2. अनुराधा किल्लेदार नवजीवन प्रशाला : संस्थेने त्यांना मिळालेल्या रु. ५५००१/- (रुपये पंचावन्न हजार एक मात्र) या देणगी रकमेमधून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य खरेदी केली आहे आणि मेडीकल कँप आयोजीत करणार आहेत.
3. माऊली सेवा प्रतिष्ठान: संस्थेने त्यांना मिळालेल्या रु.५२५००/- (रुपये बावन्न हजार पाचशे मात्र) या देणगी रकमेमधून त्यांच्या ६०० बेड असलेल्या हॉस्टेलसाठी बांधकाम साहित्याची खरेदी केली आहे.
4. घरकुल परिवार : आपण त्यांना रु. ५५०००/- (रुपये पंचावन्न हजार मात्र) देणगी जमवून दिली. या देणगी मधून संस्थेला डायनिंग टेबल आणि खुर्च्या खरेदी करायच्या आहेत. संस्थेच्या आवरातील बांधकाम अजुन पूर्ण झाले नसल्याने अजून खरेदी केलेली नाही. खरेदी पूर्ण झाल्यावर माहिती प्रकाशित करु.
5. सुहित जीवन ट्रस्ट: आपण त्यांना रु. ६२,०००/- (रुपये बासष्ठ हजार मात्र) देणगी जमा करून दिली. त्याच्या विनियोगाबद्दल लवकरच माहिती प्रकाशित करु.
6. सावली सेवा ट्रस्ट: आपण त्यांना रु. ८०,०००/- (रुपये ऐंशी हजार मात्र) देणगी जमा करून दिली. या देणगी रकमेचा विनियोग त्यांनी गरजू मुलींची फी भरणे आणि शालेपयोगी साहित्य खरेदीसाठी केला आहे. सर्व संस्थांनी देणगीदारांना पावत्या दिल्या आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी साहित्य खरेदीच्या पावत्या, साहित्याचे फोटोग्राफ्स आपल्यासाठी पाठविले आहेत. ते आपल्या वाचनासाठी लवकरच प्रकाशीत केले जातील.
उपक्रमासाठी काम करणारे स्वयंसेवक : सुनिधी, अतरंगी, महेंद्र ढवाण, निशदे, अरुंधती कुलकर्णी, प्राची, वृंदा, कविन
या सर्व उपक्रमामध्ये प्रत्येक पावलाला मायबोलीकरांनी आणि मिपाकरांनी खूपच मोलाचे सहकार्य केले. मायबोली प्रशासनाने मायबोलीचे माध्यम वापरण्याची परवानगी दिली यासाठी त्यांचे खास खास आभार. सोशल नेटवर्किंगमधून काही उत्तम, विधायक व समाजोपयोगी कार्य करता येणे व त्यानिमित्ताने अगोदर कधी न भेटलेल्या मायबोलीकरांनी एकत्र येऊन काम करणे हा अनुभव नेहमीइतकाच यावर्षीही आम्हां सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी होता.
काही उल्लेख नजरचुकीने राहिलेले असल्यास आपण लक्षात आणून द्यालच याची खात्री आहे.
सस्नेह,
सामाजिक उपक्रम २०१७ स्वयंसेवक टीम
उत्तम उपक्रम
उत्तम उपक्रम
सुरेख आढावा घेतला आहे.
सुरेख आढावा घेतला आहे. धन्यवाद.
उत्तम उपक्रम
उत्तम उपक्रम
धन्यवाद कविन!
धन्यवाद कविन!
फार मस्त उपक्रम. संपूर्ण
फार मस्त उपक्रम. संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेक अनेक शुभेच्छा!
खुप छान उपक्रम आणि आढावा.
खुप छान उपक्रम आणि आढावा.
टिमचे खूप खूप अभिनंदन.
खूप छान आढावा !!!!! संपूर्ण
खूप छान आढावा !!!!! संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !!!!!!!
तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन व
तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा.
(No subject)
सहारा अनाथालय साठी सामाजिक उपक्रम २०१७ देणगी मधून बनविलेले बंक बेड्स....
खूप छान उपक्रम आणि आढावा!
खूप छान उपक्रम आणि आढावा!
टिमचे खूप अभिनंदन!
छान उपक्रम आणि आढावा,
छान उपक्रम आणि आढावा, अभिनंदन टीम.
अतरंगी >> छान फोटो.
अतरंगी >> छान फोटो.
अभिनंदन संपूर्ण टीम चे.
खूप छान उपक्रम आणि आढावा! बंक
खूप छान उपक्रम आणि आढावा! बंक बेड छान दिसतायत..
टिमचे खूप अभिनंदन!
सुहित जीवन ट्रस्ट यांना
सुहित जीवन ट्रस्ट यांना दिलेल्या देणगीतून त्यांनी घेतलेल्या वस्तूंचे फोटो व बीलाचा फोटो सोबत देत आहे
बीलामधे उल्लेख केलेल्या पॅरलल बारची डिलीव्हरी बाकी आहे. ती या महिन्यामधे पुर्ण होईल. त्यानंतर त्याचे फोटो इथे अपडेट करेनच.
शाळा बघायला येऊन मुलांसोबत संवाद साधण्यासाठी त्यांनी मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण दिले आहे.
धन्यवाद!
अनुराधा किल्लेदार प्रशालेने
अनुराधा किल्लेदार प्रशालेने गणवेश खरेदी केले त्याची ही पावती. कॅम्प सध्या परत खूप पाऊस पडत असल्यामुळे टेक्निकल कारणांसाठी पोस्ट्पोन केला आहे . संपन्न झाला कि कळवेनच