जुन्या-नव्या पुस्तकांची ओळख करून देणारे लेख माझ्या खास आवडीचे. अशा लेखांमधून समजलेली काही पुस्तकं अगदी लक्षात राहतात. (पुढे ती आवर्जून मिळवून वाचली जातातच असंही नाही, तरीही.) काही दिवसांपूर्वी ‘अनुभव’च्या अंकात अशाच एका पुस्तकाबद्दल समजलं : The Seasons of Trouble. Life amid the ruins of Sri Lanka’s Civil War. तो लेख वाचला आणि प्रथमच असं झालं की पुस्तक मी लगेच विकत घेतलं. त्याला कारण ठरला पुस्तकाचा विषय!
शाळेत असताना लंकन यादवीच्या बातम्या सतत कानावर पडायच्या. दिल्ली दूरदर्शनच्या हिंदी बातम्या देणारी एक बाई LTTE चा उच्चार करताना त्यातला L लांबवायची... एऽऽऽल्लटीटीई! आम्ही तिची नक्कलही करायचो. ही यासंदर्भातली सर्वात जुनी आठवण... LTTE, IPKF यांचे फुलफॉर्म्स माहित झाले होते. प्रभाकरन, कोवळे टायगर्स तरूण-तरूणी, त्यांना मिलिटरी ट्रेनिंग असतं म्हणे, सायनाईडच्या कॅप्सूल्स, वगैरे सामान्यज्ञान वाढीस लागलं होतं. जाफना, नॉर्थ-साऊथ बट्टिकलोवा इत्यादी नावं अगदी ओळखीची वाटायची. श्रीलंकेत तामिळ-सिंहलींमधला काहीतरी गोंधळ चालू आहे, हे त्या सगळ्याचं सार. तेव्हा बातम्यांमधून त्याची राजकीय अंगाने चर्चा अधिक असायची. तरी आपल्या देशाच्या शेजारीच असं काहीतरी चालू आहे, त्यावरून आपल्या देशातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत, हे मनात रजिस्टर झालंच.
काही काळाने या बातम्या फॉलो करण्याचं कमी कमी होत गेलं. कदाचित राजीव गांधींच्या हत्येनंतर, त्यातल्या गुन्हेगारांना अटक आणि शिक्षा झाल्यानंतर आपल्याकडच्या बातम्यांमधलं त्याचं कव्हरेज कमी झालं असावं. त्यामागची कारणं जी असायची ती असोत, पण या सार्या पार्श्वभूमीवर, अनुभवमधला तो लेख वाचून माझ्या लक्षात आलं, की लंकन यादवी संपल्यानंतर त्यात भरडल्या गेलेल्या नागरिकांचं पुढे काय झालं, याबद्दल आपल्याला फारसं काहीच माहिती नाहीये. त्याबद्दल जाणून घेण्याचा आपण कधीच प्रयत्न केलेला नाहीये हे मला स्वतःलाच जरासं टोचलं. मग मी पहिलं काय केलं, तर ते पुस्तक ऑनलाईन ऑर्डर केलं. इतर २-३ पुस्तकं वाचत होते. ती बाजूला ठेवून हे वाचून काढलं. आणि वाचून पूर्ण झाल्यावर त्याची लेखिका रोहिणी मोहन हिला आधी मनोमन त्रिवार दंडवत घातला!
२५०-३०० पानी हे पुस्तक... नुसतं चाळलं तर वाटावं यादवीच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी आहे. पण तसं नाही. रोहिणी मोहनने पाच वर्षांचा रिसर्च, मुलाखती आणि मेहनतीतून तीन पात्रांची ही सत्यकथा जबरदस्त गुंगवून टाकणार्या पद्धतीने लिहिली आहे.
म्युगिल (Mugil), सर्वा (Sarva) आणि इंद्रा (Indra) ही ती तीन पात्रं. सर्वा म्हणजे कोलंबोत राहणारा २६-२७ वर्षांचा तामिळ तरूण. इंद्रा ही त्याची आई. तर म्युगिल ही प्रभाकरनच्या फौजेतली एकेकाळची तडफदार टायगर. म्युगिलचा बाकी दोघांशी काहीही संबंध नाही. त्यांच्यातला समान धागा एकच - यादवी.
सर्वाला श्रीलंकन (सिंहली) जवानांकडून एक दिवस कोलंबोतल्या रस्त्यावरून अक्षरशः ‘उचललं’ जातं, त्याचा टायगर्सशी संबंध असल्याच्या संशयावरून. तिथून पुढची दोन वर्षं पोलीस कोठडीत, तुरुंगात तो अनन्वित छळाला सामोरा जातो. बाहेर इंद्राची त्याच्या सुटकेसाठी ससेहोलपट सुरू राहते. या कथानकात सर्वाचे बाकीचे कुटुंबीयही पात्रं म्हणून येतात. पण आई-मुलाचं नातं, त्याचे व्यक्तीसापेक्ष पदर, जुन्या पिढीच्या मानगुटीवरचीही तामिळ-सिंहली भेदाची भुतं, ऐंशीच्या दशकातलं अर्बन श्रीलंकेतलं सामाजिक वातावरण हे सारं अतिशय स्वच्छपणे आणि तितक्याच साधेपणाने आपल्या पुढे येतं.
दुसरीकडे म्युगिलच्या कथेचा ट्रॅक याला समांतर जातो. म्युगिल अगदी कोवळ्या वयात स्वेच्छेने आणि भारावून जाऊन एलटीटीईत सामिल झालेली; तिथे बर्यापैकी कर्तृत्व गाजवलेली; धडाकेबाज आणि खमकी मुलगी; तिचा भाऊ, नवरा हे दोघंही एलटीटीईत आहेतच; तिला दोन लहान मुलं आहेत; घरच्यांचा तिला, एलटीटीईला पाठिंबा आहे. तिच्याबद्दलची इतपत माहिती अगदी थोडक्यात प्रस्तावनेतूनही समोर येतेच. मात्र पुस्तकात म्युगिल अवतरते त्या क्षणापासूनच आपल्याला जाणवायला लागतं, की ती या सगळ्याचा पुनर्विचार करण्याच्या निर्णयाप्रत आली असावी. आपण करतोय हे योग्य आहे का, ही संघर्ष आपल्याला (म्हणजे एकूण टायगर्सना) पुढे कुठे घेऊन जाणार आहे, यावर तिचं चिंतन सुरू झालेलं असतं. आता मुलांना, कुटुंबियांना अधिक वेळ द्यायला हवा हे तिनं ठरवायला सुरूवात केलेली असते. तिचं आणि तिच्या कुटुंबियांचं - त्यात तिचे आई-वडील, बहीण हे देखील आले - नातंही लेखिकेने इतक्या बारकाईने रंगवलं आहे, की तेव्हा गाजावाजा (गाजावाजा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, दोन्ही प्रकारचा) झालेले टायगर तरूण-तरूणी व्यक्ती म्हणून कसे होते, टायगर होण्यापूर्वीची त्यांची जडणघडण, नंतरची विचारसरणी, तेव्हाची कौटुंबिक व्यवस्था कशी होती हे अनेक सूक्ष्म पदरांतून आपल्या समोर उलगडतं. पुन्हा म्युगिलचं कुटुंब श्रीलंकेच्या उत्तर भागात राहणारं. तर सर्वा-इंद्रा कोलंबोतले, म्हणजे देशाच्या दक्षिणेकडचे. हे भौगोलिक भेद बातम्यांमधून वगैरे आपल्याला सहजी उमगत नाहीत. बाहेरच्या लोकांना ते पूर्णतया उमगावे अशी अपेक्षाही नसावी कदाचित. रोहिणी मोहनचं पत्रकार-लेखिका असणं इथे अतिशय परिणामकारकरीत्या प्रत्ययास येतं.
पुस्तकात पत्रकार रोहिणी मोहन लेखिका रोहिणी मोहनच्या वरचढ ठरत नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा. कारण पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यावर मला तस्लिमा नसरीनच्या ‘लज्जा’ने जराशा वाकुल्या दाखवल्याच होत्या. माझ्या मते, सामाजिक संघर्षाचं वास्तव कादंबरीसदृश पुस्तकातून मांडताना काय करू नये याचं ‘लज्जा’ हे उत्तम उदाहरण होतं. तर ‘सीझन्स ऑफ ट्रबल’ हे पुस्तक म्हणजे ते कसं करावं याचा उत्तम नमुना म्हणायला हवा. (हे तिनं नेमकं कसं जमवलं, पुस्तकामागचा तिचा दृष्टीकोन नक्की कसा होता हे जाणून घ्यायचं असेल तर तिची ‘द हिंदू’ वेबसाईटवरची ही मुलाखत वाचायलाच हवी.)
श्रीलंकेच्या उत्तरेतले तीस लाख तामिळ विस्थापित आपलं किडूकमिडूक घेऊन, सैन्याच्या बाँबवर्षावातून बचाव करत, या गावातून त्या गावात जात होते; एकीकडे टायगर्सची पीछेहाट सुरू झालेली होती; विस्थापितांसाठी सैन्याने काही भाग सुरक्षित म्हणून घोषित केला होता. तिथे त्यांच्यासाठी छावण्यांची सोय केली होती. या छावण्यांचं पुस्तकातलं वर्णन अंगावर येतं! लेखिका या छावण्यांमध्ये जाऊन अनेक लोकांना भेटली. त्यांच्याशी बोलली. काहींना ती बोलतं करू शकली; काहींना नाही. म्युगिलचं कुटुंब या छावण्यांमध्ये अनेक महिने राहतं. पुढे त्यांची सुटका होते. सुटकेपश्चात पुनर्वसनाच्या नावाखाली त्यांची रवानगी थेट श्रीलंकेच्या उत्तरेकडच्या टोकावरच्या एका गावात केली जाते. प्रभाकरनच्या मृत्यूपश्चात कट्टर टायगर तरूण-तरूणींचं काय झालं ते म्युगिलच्या या प्रवासातून पुढे येतं. तो सर्व भागही खूप ‘हॉन्टिंग’ आहे. यादवी युद्ध संपुष्टात आलं म्हणून श्रीलंकन सरकार सगळीकडे आपली पाठ थोपटून घेत असताना त्या युद्धात सर्वस्व गमावलेल्या, कसंतरी करून पुन्हा तग धरू पाहणार्या सर्वसामान्य जनतेला कोणत्या दिव्याला तोंड द्यावं लागलं ते वाचताना सुन्न व्हायला होतं.
दुसरीकडे कोलंबोत लेखिकेला एका मध्यमवयीन स्त्रीकडून समजलेल्या तिच्या व्यथेतून पुस्तकातली इंद्रा साकारली गेली. जंग जंग पछाडून, मानवाधिकार संघटनांच्या मदतीने इंद्रा सर्वाला श्रीलंका सोडून ब्रिटनमध्ये आश्रय मिळवण्यात यशस्वी होते. लेखिकेला हा सर्वा इंग्लंडमध्ये प्रत्यक्ष भेटला. तो स्वतःच्या खर्या नावाने पुस्तकात येतो. पुस्तकातली त्याची कथा तुलनात्मक सुखांत ठरते, तर म्युगिलची अनिश्चित. त्या अनिश्चिततेदरम्यानच कधीतरी लेखिकेची आणि तिची गाठ पडली होती. त्यांचा पहिला वार्तालाप केवळ पाच मिनिटांचा, त्रोटक होता. पण पुढच्या काही भेटींमधून ती कहाणी लेखिकेनं जाणून घेतली. ती एकट्या म्युगिलची कहाणी नव्हतीच; अगणित तरूण टायगर्सची आणि त्यांच्या कुटुंबियांची होती.
या सार्या विवेचनात कोण चूक, कोण बरोबर, तामिळ बिच्चारे, सिंहली जुलुमी, श्रीलंकेचं हे चुकलं, भारताने ते करायला हवं होतं, अशा प्रकारचे कोणतेही दावे केले गेलेले नाहीत. जे घडलं, कहाण्यांमधून समजलं ते मांडलेलं आहे. मुलाखतीत रोहिणी मोहनने सांगितलं आहे, की श्रीलंकेच्या यादवीतल्या काही कहाण्या सांगणं इतकंच माझं मूळ ध्येय होतं. तिच्या ध्येयापासून ती एकदाही ढळली नाही; त्या नेमकेपणामुळेच हे पुस्तक प्रातिनिधिक बनलं आहे; त्याला एका खणखणीत दस्तऐवजाइतकं महत्त्व आहे.
मी आजवर भारतीय पत्रकारांचं/लेखकांचं इंग्रजी लेखन खूप काही वाचलेलं नाही. कधी आवर्जून पुस्तकांच्या दुकानांमध्ये, प्रदर्शनांमध्ये या प्रकारची पुस्तकं शोधली आहेत असंही झालेलं नाही. पण हे पुस्तक वाचून मला जाणवलं की आपल्याला जिव्हाळ्याच्या वाटणार्या विषयांवरच्या अशा पुस्तकांचाही शोध घ्यायला हवा.
उत्तम परिचय.
उत्तम परिचय.
सुंदर लिहिलंय, पुस्तक वाचायला
सुंदर लिहिलंय, पुस्तक वाचायला कधी जमेल माहित नाही पण आवडेल वाचायला.
आमच्या शाळेची सहल गेली होती श्रीलंकेला, मला जाता आले नव्हते पण मित्रांकडून खूप ऐकले होते, त्यावेळपासूनच श्रीलंकेला फॉलो करत आलेलो.
नंतर मग परदेशात श्रीलंकेच्या सिंहली कलीग कडून एल टी टी ई ला परकीय शक्ती मदत करतात असे ऐकले त्यावेळी क्षणभर परकीय शक्ती शब्द ऐकला आणि वाटलं पाकिस्तान का मदत करेल पण परिप्रेक्ष्य बदलले की शब्दार्थ कसे बदलतात हे नीटच कळून चुकले.
यादवी आणि अशांतता यामुळे अनेक लोकांना सुंदर प्रदेश सोडून जबरदस्तीने स्थलांतर करावे लागते ते पाहून फार वाईट वाटते. आपण हवे तेव्हा परत येऊ शकतो म्हणजे किती नशीबवान आहोत याचे बरेही वाटते आणि भारतातली अशी तुलनात्मक दृष्ट्या खूप चांगली परिस्थिती टिकवून ठेवायच्या जबाबदारी मध्ये आपण कमी तर पडत नाहीयोत ना अशी बोचरी जाणीवही होते.
उत्तम परिचय. पुस्तक मिळवून
उत्तम परिचय. पुस्तक मिळवून वाचेन म्हणते
छान परिचय! ते बातम्यांमधून
छान परिचय! ते बातम्यांमधून कॅण्डी, जाफना, बट्टिकलोआ वगैरे नावे ऐकू येण्याबद्दल अगदी तशाच आठवणी आहेत. बट्टिकलोआ चा तर त्या वेळच्या बातम्यांनंतर आज अनेक वर्षांनी पुन्हा उल्लेख वाचला.
अजून लिहीत जा पुस्तक परिचय व इतर लेखही!
फारच छान परिचय करवलात. नक्की
फारच छान परिचय करवलात. नक्की घेऊन वाचेन.
श्रीलंका प्रश्नाबद्दल 2008-9मध्ये जेव्हा युद्ध निर्णयक झाले तेव्हा बरेच वाचले होते. एका मराठी ब्रिगेडियारांचे (पित्रे?) देखील शांतिसेनेवर पुस्तक आहे.
थोडेसे विनोदी: तामिळ वाघांचा लढा 88-89दरम्यान जेव्हा अतिशय पेटलेला होता तेव्हा वर्तमानपत्रात कायम तामिळ वाघानी अमूक तमूक लोकांची गोळ्या घालून हत्या अश्या बातम्या असत. आमची आजी एकदा पेपर वाचता वाचता म्हणाली 'छे छे छे, आजकाल वाघांनासुध्दा बंदूकी चालवायला शिकवतात का'.
अतिशय उत्तम परिचय. पुन्हा
अतिशय उत्तम परिचय. पुन्हा एकदा परिचय परत वाचणार आहे. खूपच छान वाटलं वाचायला.
तमिळ वाघांच्या काळात मी फार मोठा नव्हतो, त्यामुळे ही सगळी नावे पेपरात वाचली असली, तरी फार प्रत्यक्ष संबंध आला नाही. आता अर्थात माहिती आहे, पण हे पुस्तक वाचून मानवी दृष्टिकोनातून ती परिस्थिती चांगली कळेल, असे दिसते.
छान परिचय आहे. आता पुस्तक
छान परिचय आहे. आता पुस्तक वाचायला पाहिजे. माझ्यासारख्या वाचायची खूप आवड असलेल्या, पण वाचनाला फारशी दिशा नसलेल्या जनतेसाठी असे लेख फार चांगले असतात. आपल्याला पुस्तक आवडेल की नाही, ह्याचा अंदाज येतो आणि यादीत भर पडते.
अशीच पुस्तक-ओळख करून द्यावी, ही विनंती.
मस्त ओळख करून दिली आहेस.
मस्त ओळख करून दिली आहेस. वाचायच्या यादीत टाकलंय हे पुस्तक
चांगला परिचय! पुस्तक मिळतंय
चांगला परिचय! पुस्तक मिळतंय का ते बघते.
छान परीचय पुस्तक मिळवून
छान परीचय
पुस्तक मिळवून वाचेन ...
छान परिचय लले
छान परिचय लले
प्रीती
प्रीती
त्यादिवशी तू हे पुस्तक दिलंस आणि हा लेख टाकलास. मुद्दामच प्रतिक्रिया दिली नव्हती, म्हंटल आधी वाचूया.
खप गारुड करणार पुस्तक आहे. 3/4 वाचून झालं आहे. ही कादंबरी नाहीये, हा अनुभव आहे. बाकी लज्जा किंवा तस्लिमा बद्दल जे लिहीलं आहे ते तंतोतंत पटले.
छान पुस्तक परिचय.
छान पुस्तक परिचय.
आमच्या Department मध्ये एकजण ex-serviceman होते. ते जाफन्याला शांतीसेनेत होते. काश्मिरमध्येही होते. ते तिथल्या कठीण प्रसंगांबद्दल सांगत.
मस्त लिहिलं आहेस ललिता !
मस्त लिहिलं आहेस ललिता !
माझ्या मते, सामाजिक संघर्षाचं
माझ्या मते, सामाजिक संघर्षाचं वास्तव कादंबरीसदृश पुस्तकातून मांडताना काय करू नये याचं ‘लज्जा’ हे उत्तम उदाहरण होतं. >>Can u elaborate more?
खूप छान पुस्तक परिचय! धन्स
खूप छान पुस्तक परिचय! धन्स इथे लिहिल्याबद्दल.
अलीकडेच जॉन अब्राहमचा मद्रास कॅफे दुसऱयांदा पाहिला, त्यामुळे श्रीलंन्का डोळ्यांसमोर आहे
आजकाल वाघांनासुध्दा बंदूकी चालवायला शिकवतात का'.

Can u elaborate more? >>>
Can u elaborate more? >>>
त्यासाठी 'लज्जा'वर कुणीतरी लेख लिहायला हवा.
मी ते करणार नाही, कारण त्या पुस्तकाने माझा फार मोठा भ्रमनिरास केला होता.
पण थोडक्यात सांगायचं तर -
`लज्जा' ही बांग्लादेशातल्या एका हिंदू कुटुंबाची कहाणी आहे. बाबरी मशिद प्रकरणानंतर बांग्लादेशात झालेल्या धार्मिक दंगलींच्या पार्श्वभूमीवर आई, वडील, तरूण भाऊ-बहीण अशा चार जणांचं कुटुंब त्याबद्दल काय विचार करतं, आसपास घडणार्या घटनांवरची त्या चौघांची आपापल्या आयडिऑलॉजीनुसारची प्रतिक्रिया, आपलं घर, गाव सोडून निघून जावं का, भारतात जावं का, याबद्दल त्यांच्यात मतभेद असतात... तर हे सगळं कथन सुरू होताना कादंबरीचा फॉर्म निवडला आहे; सुरूवातीला वातावरणनिर्मिती चांगली केली आहे; पण पुढे या फॉर्मची गाडी घसरते. तेव्हा स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या संबंधित बातम्यांचे मजकूर जसेच्या तसे यायला लागतात. पुढे पुढे हे प्रमाण इतकं वाढत जातं, की वाटतं, हेच वाचायचं तर नेटवर जुने पेपर काढूनही वाचू शकतो. त्या नादात दंगलींचं, तिथल्या सरकारच्या धोरणांचं `चित्रण' होतच नाही. त्या बातम्या धक्कादायक आहेतच, त्याबद्दल प्रश्नच नाही. पण मग मुद्दा असा, की ते सगळं सांगायला कादंबरीचा फॉर्म का निवडला? ही माझ्यासाठी सर्वात मोठी विरस करणारी बाब होती.
(लज्जा वाचून जवळपास १०-१२ वर्षं झाली. नावडतं पुस्तक फारसं लक्षात राहत नाही, तरी ढोबळमानाने हे सारं बरोबर असावं.)
सीझन्स... मध्येही तेव्हाच्या रिअल लाईफ घटनांचे संदर्भ येतात, पण ते इतके बेमालूमपणे कथानकात मिसळले आहेत, की वाचताना ते जराही खटकत नाहीत.