"समिपाss काय झालं ग? दार उघडss " जोरजोरात दार वाजवत रेवती ओरडली.. समिपाने एका हाताने कसेबसे दार उघडले.
घाईघाईने आत येत तिने समिपाचा हात बघितला. "आईग!! कसं काय लागलं हे एवढं? देवा रे.. ही मुलगी पण ना.. " म्हणत तिने फर्स्ट एड बॉक्स आणला. त्यातून डेटॉल बाहेर काढून त्यात बुडवलेल्या कापसाने जखम पुसून काढली आणि वरून हळुवार हाताने औषध लावले. "हं, आता सांग कुठे धडपडलीस? केवढी किंचाळलीस आणि, मी कॉल सोडून धावत आले"
समिपाने घडलेली सगळी घटना सांगितली, अगदी ओल्या वाळूसकट!
रेवती जरा साशंक झाली पण ते चेहऱ्यावर जाणवू न देता ती हसून म्हणाली, "अग बाळा, कुठाय वाळूबिळू? तूच खाजवलंय हातावर. आधीच म्हटलं होतं टेरेसवरून खाली ये, डास असतील."
समिपाने हाताकडे पाहिलं तर बोटांवर खरेच वाळू दिसत नव्हती! हात अगदी मॅनिक्युअर केल्यासारखा स्वच्छ दिसत होता..
---------------------------------------------
दुसऱ्या दिवशी लवकर जेधेवाडीला जायचे होते. समिपाला बरे नसल्यामुळे नलिन बरोबर येणार होता. सकाळी लवकर कार काढून दोघे रवाना झाले. समिपा खिडकीच्या काचेला डोकं टेकून डोळे मिटून अजूनही कालच्या घटनेचाच विचार करत होती.
"माझ्याशी वैर घेतेस काय, बघतोच तुला. ये, तू पुढे ये फक्त.." तिच्या कानात गरम श्वास सोडत कुणीतरी पुटपुटले. समीपाचे डोळे खाडकन उघडले.
"स्टॉप!!" ती जोरात किंचाळली. नलीनने लगेच ब्रेक दाबला, कार जोराने हादरून मोठा आवाज करत थांबली. समोर आडवा आलेला एक भटका कुत्रा घाबरून शेपूट घालून कॅss कॅss ओरडत रोड क्रॉस करून झाडीत नाहीसा झाला.
"थँक गॉड! मला दिसलाच नव्हता तो.. बरं झालं तुझं लक्ष गेलं तिकडे" नलिन हुश्श करत म्हणाला.
पुन्हा कुणीच काही न बोलता दोघे वनराजी समोर पोहोचले. आतून काम सुरू असल्याचे आवाज येत होते. हातोड्याचे ठोके, इलेक्ट्रिक करवतीचा चर्रर्रर्र आवाज, मजुरांची आरडाओरड यांनी वातावरण भरून गेले होते. बाहेरच्या भिंती स्वच्छ होऊन घासलेल्या काळ्या पाषाणाचा रंग चमकत होता. इथे काही काळापूर्वी माजलेले शेवाळ होते हे खरेही वाटत नव्हते. बाहेर दिसणारा फरक पाहून समिपा खुश झाली. नलिनला कामाचे अपडेट देत दोघे दिंडी दरवाज्यातून आत शिरले. त्यांना बघून सखुबाई घाईघाईने येऊन " या, या साहेब, लै ब्येस काम चाललंय" सांगून दारातून बाहेर गेली. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता.
आतल्या भिंती रंगकामासाठी घासून ठेवल्या होत्या. चौकातील चिखलपाणी उपसून फरश्या बसवण्यासाठी खोदकाम सुरू होते. संपूर्ण घर नव्या नवलाईने झळाळत होते. सगळ्या लाकुडसामानाला पॉलिशमुळे चमक आली होती. जिन्याच्या जीर्ण पायऱ्या बदलून नव्या लाकडाच्या पायऱ्या बसवल्या होत्या. सगळे निरीक्षण करत समिपा आणि नलिन जिन्यातून वर गेले.
वर दिवाणखाना आणि इतर खोल्याना सायीचा मलईदार पिवळट रंग दिला होता. कोनाड्यांच्या आतल्या भागाला आंब्याचा केशरी रंग होता. छताला पांढराशुभ्र पीओपी आणि रंगीत काचेच्या स्वच्छ हंड्या लटकत होत्या. जमीन अँटिक डेकोरला शोभेशी दिसण्यासाठी काळ्या कोटा दगडाचे गुळगुळीत फ्लोअरिंग केले होते. दिवाणखान्याच्या भिंतीवर एक मोठे गणपतीचे म्युरल लाल टेराकोटामध्ये केले होते. लोड तक्के नव्या रंगीत रेशमी खोळी घालून मालकाची वाट पहात होते.
हे सगळं पाहून नलिनने न राहवून एक शिट्टीच वाजवली. "मान गये उस्ताद! एक नंबर काम झालेलं आहे. मॅडम ह्यावेळी प्रमोशन नक्कीच!" नलिन हसत म्हणाला. समिपाच्याही चेहऱ्यावर समाधानाचे हसू पसरले होते.
राजुभाईला हाक मारून समिपा काही बारीक सारीक दुरुस्त्या सांगू लागली. तितक्यात तिला अचानक आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे असे वाटू लागले. आजूबाजूला तर बाकी कोणीच नव्हते. हवेत एक विचित्र गंध पसरू लागला.. खूप शिव्या देऊन कोणीतरी भांडते आहे असे आवाज येऊ लागले. तिने नलीनकडे पाहिले पण तो राजुभाईना रेलिंगचे डिझाईन समजावत होता. डोक्यात घणाघाती ठोके पडू लागले आणि तिने हैराण होऊन बोटांनी कपाळ चेपायला सुरुवात केली.
"राजुभाईss जरा इदर देको. जिमीन कुच तो अलssगीच है" खाली चौक खणणारा रामण्णा ओरडला.
आता काय झालं.. म्हणून वैतागून समिपाने खाली धाव घेतली. राजुभाई आणि नलिन निघेपर्यंत ती चौकात पोचलीही होती.
"हां, क्या है?" समिपाने विचारलं.
"देको मेडम.." म्हणत रामण्णाने दोन ठिकाणी कुदळ आपटून दाखवली एका ठिकाणी भरीव आणि एका ठिकाणी घुमल्यासारखा आवाज आला.
डोकेदुखीमुळे समिपा आधीच तिरमिरली होती. ती झटक्यात बघू म्हणत पुढे झाली. कुदळ मारल्याजागी तिचा पाय पडताच तिच्या पायाकडून बाहेरच्या दिशेने जमिनीला मोठे वेडेवाकडे तडे गेले आणि भूस्सss आवाज येत तिच्या पायाखालची जमीन नाहीशी झाली. ती अधांतरी एका काळोख्या पोकळीत खोल खोल खेचली गेली.. सगळ्यांच्या आरडाओरडीत नलिन तिला धरायला येईपर्यंत समिपा त्या काळोख्या पोकळीत नाहीशी झाली होती.
क्रमशः
उत्कंठावर्धक!!!!
उत्कंठावर्धक!!!!
मस्त
मस्त
मस्त..
मस्त..
बापरे जबरदस्त
बापरे जबरदस्त
आता काय होणार बापरे।।।
आता काय होणार बापरे।।।
भयानक!! घाबर्ले
भयानक!! घाबर्ले
आने दो अगला भाग. इंतजारमे
आने दो अगला भाग.
इंतजारमे
अजूनच उत्कंठा वाढली आहे.
अजूनच उत्कंठा वाढली आहे.
मस्त!
मस्त!
खतरनाक . प्रत्येक भागागणिक
खतरनाक . प्रत्येक भागागणिक उत्सुकता वाढतच चाललीये.....मस्तच लिहिलय
कसली भन्नाट चाललीय कथा .
कसली भन्नाट चाललीय कथा . मस्तच मॅगी