एव्हाना समिपाच्या मागोमाग सखुबाई हजर झाली होती. डोळे मोठे करून कोपऱ्याकडे पहात ती म्हणाली "म्याडम, ह्ये एकदम वंगाळ काम बगा. मंतरलेलं हाय त्ये समदं. तिथे सामना कराय जाल तर लै लुकसानी हुईल."
समिपा शांतपणे मागे वळून राजुभाईला म्हणाली, "एक माणूस पाठवा इथे लगेच, त्याला सांगा हे सगळं झाडूने सुपात भर आणि बाहेर कचऱ्याच्या डब्यात टाकून ये. आणि सखुबाई तुमचा नातू त्या समोरच्या झाडावर चढतो ना? मी पाहिलंय त्याला एकदोनदा, त्याला त्या टांगलेल्या बाहुलीला खाली काढायला सांगा. उगीच पोरं सीआयडी वगैरे बघून असलं काहीतरी खेळत असतात!"
आश्चर्याने सखुबाईंचे डोळे खोबणीतून बाहेरच यायचे बाकी होते. तरी गडबडून हो हो.. सांगतो म्हणत त्या पटकन नाहीश्या झाल्या.
-------------------------------------------------
काम व्यवस्थित सुरू करून देऊन समिपा घरी आली. टेरेसवरच्या झुल्यात बसून तिने अर्धवट राहिलेली कादंबरी हातात घेतली. झुल्याच्या प्रत्येक झोक्याबरोबर तिला कासवलीच्या झोपाळ्याच्या पितळी कडयांची कुरकुर आणि लांबून तालात म्हटलेल्या पाढ्यांचा बारीक आवाज यायला लागला. हळूहळू तो आवाज तिच्या कानात मोठा मोठा होत तिला सातवीतल्या मे महिन्यात घेऊन गेला..
"आबा, माझं शुभंकरोती, रामरक्षा, पाढे सग्गळं म्हणून झालं, आता मी शुभुताईकडे झोपायला जाऊ? तिने जेवायला बोलावलंय मला. पावभाजी केल्ये!" पावभाजी म्हणताना समिपाचे डोळे आनंदाने चमकले.
"आता एवढं ठरलंच आहेss तर जाss" आजोबा खोटं रागवत म्हणाले. मग हसून म्हणाले, "पण ती मोठी बॅटरी घेऊन जा, हो. नाहीतर गडग्यावरून दोणीत पडशील पाय घसरून.. गडगा जरा बुळबुळीत झलाय. कुपणात गारव्याला जनावर पण असतं एखादं.. नीट पायाखाली बघ.."
"हो आबा, ही बघा बॅटरी! गुड नाईट" म्हणून पायात स्लीपर अडकवून समीपा बाहेरही पडली. आकाश चांदण्यांनी भरलेलं असल्यामुळे टॉर्चशिवायही तसं बऱ्यापैकी दिसत होतं. वर आकाशाच्या पार्श्वभूमीवर माडा-पोफळीची काळपट डोकी उठून दिसत होती. कुंपणाजवळ फ्लॅश मारत, आपला इवलुशी निळसर चेक्स असलेली पांढर्या रंगाची नाईटी हाताने वर धरून समिपा अलगद गडगा चढून पलीकडे गेली, तरी थोड्याश्या लाल मातीचा डाग लागलाच.
शुभुताई म्हणजे शेजारची शुभांगी समीपापेक्षा तीन वर्षांनी मोठी होती, आताच दहावीची परीक्षा दिल्यामुळे समिपाबरोबर पूर्णवेळ खेळणे, फिरायला समुद्रावर जाणे सुरू होते. वयानुसार एकमेकींची सिक्रेटस शेअरिंग पण सुरू होते.
मागच्या दाराची कडी वाजवल्यावर सीमाकाकूने दार उघडले. मागचे दार शुभुच्या स्वयंपाकघरात उघडायचे. येये म्हणत सीमाकाकूने पाट मांडले. चुन्याने रंगवलेल्या मातीच्या भिंती आणि जमिनीला लालसर रंगाचा कोबा असल्यामुळे उन्हाळ्यातही भरपूर थंडावा होता. शुभुचा दादा मुंबईहून कॉलेजच्या सुट्टीत होस्टेलवरुन आला होता. दादा आणि शुभुच्या बाबांचे जेवण होऊन ते पडवीत शेताचे हिशेब लिहित बसले होते. आजी नेहमीप्रमाणे सात वाजताच जेऊन बाळंतिणीच्या खोलीत झोपली होती. स्वयंपाकघरात बल्बचा पिवळट प्रकाश होता. पावभाजीचा खमंग वास सगळीकडे दरवळत होता. शुभुने गरम तव्यावर चमचाभर घरी केलेले लोणी चुरचुरत घातले आणि पाव भाजायला घेणार इतक्यात अचानक दिवे गेले. "अरे.. आत्ताच लाईट जायचे होते!" म्हणत काकूने उठुन कंदिलाची वात वर करून तो पेटवला आणि पडवीत नेऊन दिला. "आपलं जेवायचं काम काय, बारीक उजेडात होईल" म्हणत तिने औषधाच्या रिकाम्या बाटलीत वात घालून तयार केलेली दिवटी पेटवली.
दिवटीच्या थरथरणार्या ज्योतीच्या उजेडात पाव भाजून जेवण सुरु झाले. शुभुने नवीन शिकलेली पावभाजी समीपाने भरपूर कौतुक करत खाल्ली आणि आवराआवरीत मदत करून दोघी माजघरात झोपायला गेल्या. शुभुच्या आईने गाद्या घालूनच ठेवल्या होत्या. शुभुने स्वयंपाकघरातली दिवटी माजघराच्या खिडकीत आणून ठेवली. त्या थरथरत्या उजेडात खिडकीच्या गजातून बाहेरच्या झाडांच्या काळ्या सावल्या हलत होत्या.
"शुभुताई, आज आपला स्लीपओव्हर आहे हं, म्हणजे काय असतं माहितीये का, आपण मैत्रिणीकडे झोपायला जायचं आणि रात्रभर गप्पा मारायच्या, गेम्स खेळायचे, मज्जा करायची! आणि ना आम्ही प्रिन्सेस सारखा ड्रेसअप आणि मेकअप पण करतो.. its so much fun! अशी माहिती समिपाने आधीच दिली होती.
शाळेबद्दल, मैत्रिणी, मित्र, मोठ्ठया मुलींच्या गप्पा, शुभुच्या वर्गातल्या निलेशने कशी रुपाला चिट्ठी पाठवली मग रूपाच्या भावाने कसा नारायणाच्या देवळामागे जाऊन त्याला चोपला इत्यादी विषय खुसफुुसून झाल्यावर शुभु तिची आजी किती जास्त सोवळं पाळते, सारखी सगळीकडे गोमूत्र शिंपडते वगैरे वैतागून सांगत होती. समिपाचे अचानक डोळे भरून आले.
"तुला हे सगळं सांगायला आजी तरी आहे, माझी आज्जी तर बाबा लहान असतानाच गेली आणि आईचे आई-बाबा मी लहान असताना. आता माझे सुरेश आजोबाच आहेत फक्त."
शुभु अचानक शांत झाली. "समू, तुला तुझ्या आजीबद्दल काही सांगितलंय का आजोबांनी?"
"नाही, मी आजीचे फक्त जुने ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप फोटो बघितलेत. मी तशीच दिसते ना? बाकी मधेच आजोबा तिने केलेल्या चिंचगुळाच्या आमटीची खूप आठवण काढतात. ती खूप मस्त करायची म्हणे आमटी! आता ही मंगल येते करायला पण तिची आमटी म्हणजे नुसती पाणचट असते."
"अग अग थांब जरा.. मी ते नाही म्हणत गं.. अम्म.. म्हणजे.. म्हणजे.. तुझी आजी कशाने वारली वगैरे काही माहिती आहे का तुला? " जरा दबल्या सुरात शुभुने विचारलं.
समिपाने एकदम डोळे विस्फारून शुभूकडे पाहिलं. "असोलीला जाताना ऍक्सिडंट झाला होता तीचा, असं बाबाने सांगितलं होतं. पण बाकी सगळं नाही सांगितलं मला."
"होय?? तुला नाही माहीत? असली सॉलिड होती तुझी आजी! मी माझी आजी आणि वरच्या आळीतली नलुआजी गप्पा मारताना एकदा ऐकलं होतं!" जीभ दाखवत शुभु म्हणाली. समिपा कान देऊन ऐकत होती.
"तेव्हा ना म्हणजे साधारण ६०-६५ साली ती मोठी लांबलचक पुळण आहे ना कासवली आणि असोलीच्या मधे, तिथे ना खूप चोर डाकुंची एक टोळी होती. कातकरी लोक होते ते. एकदम भयंकर! त्यांचा मुख्य डाकू होता श्रावण नावाचा. तो असे सहज गळे कापायचा लोकांचे. ते स्मशानाजवळ असायचे त्यामुळे तो काहीतरी काळी जादू, मंत्रतंत्र पण करायचा म्हणे. त्याची सगळी टोळी दिवसा केवड्याच्या माजलेल्या जंगलात लपून राहायची आणि संध्याकाळी एकटी बैलगाडी दिसली की लोकांना मारून लुटायची. ही टोळी आणि त्यांच्या अघोर विद्येला दोन्ही गावातली लोकं खूप घाबरली होती. संध्याकाळच्या वेळेस कोणीच पुळणीकडे फिरकायचे नाही." समिपा तोंडावर हात ठेवून ऐकत होती. तिच्या नजरेसमोर हळुहळू हे चित्र उभे रहात होते. बाहेर कुठलातरी पक्षी जोरात पंख फडफडत उडाला..
"तर, एकदा काय झालं तुझी आजी म्हणजे सुमती आणि वरच्या आळीतली नलूआजी दोघीही असोलीच्या, लग्न होऊन आपल्या गावात आलेल्या त्यामुळे त्या मैत्रिणी होत्या. तुझे बाबा तेव्हा पाच सहा वगैरे वर्षाचे असतील, ते तुझ्या आजोबांबरोबर घरी थांबले होते. सुमती, नलूआज्जी आणि तिचा मुलगा म्हणजे राघवकाका- तो तेव्हा दोनच वर्षाचा होता, हे तिघे बैलगाडीने असोलीच्या उत्सवासाठी निघाले.
वाटेत गाडीला जुंपलेला एक बैल थोडा उधळला त्यामुळे तो शांत व्हायची वाट बघ हे लोक थांबले. निघताना लख्ख दिवस होता पण जसजसे ते पुळणीकडे पोहोचले ढग येऊन आकाश काळवंडलं आणि अंधार पडला. वाऱ्यामुळे पुळण फार उडून सगळ्यांच्याच नाकातोंडात जात होती, दोन्ही बैलपण डोळ्यात वाळू गेल्यामुळे थयथय करत होते. अंधार, वाळुचं वादळ, पुढेपुढे येणाऱ्या लाटा.. तुला म्हैतीये, समुद्र असला खवळला होता की सगळं पाणी मातीमुळे लालसर झालं होतं!
समिपा घाबरून ऐकत होती, तिचे श्वास जलद होऊ लागले.
"पुळणीच्या सुरुवातीलाच गाडी मागून घोड्याच्या टापा ऐकू यायला लागल्या तसा गाडीवान घाबरला, त्याने बैलांचे कासरे आवळले आणि जोरात गाडी पळवू लागला. त्याबरोबर ह्या दोघीजणी घाबरल्या, राघवकाका जोरजोरात रडायला लागला. एकीकडून पावसाने जोर धरला होता, वाळूचा चिखल झाल्यामुळे खूप पळवूनसुद्धा बैलगाडी चिखलात रुतत रुतत हळू जात होती..
क्रमशः
आज मी पहिली.
आज मी पहिली.
मी आज पहिली..
मी आज पहिली..
मी तिसरा. कथा पकड घेते आहे.
मी तिसरा. कथा पकड घेते आहे. कॅरी ऑन
कथा मस्त!
कथा मस्त!
मस्त चाललीये ...उत्कंठावर्धक.
मस्त चाललीये ...उत्कंठावर्धक.
कथा पुढे जात आहे. मस्त भाग.
कथा पुढे जात आहे. मस्त भाग.
मस्तच चालू आहे
मस्तच चालू आहे
उत्सुकता वाढत चाललीये...
उत्सुकता वाढत चाललीये...
भारीच!!!
भारीच!!!
थरारक......
थरारक......