पुळण - भाग २

Submitted by मॅगी on 8 July, 2017 - 03:15

भाग १

लॅचचा आवाज आला आणि दार हळूहळू उघडले. हॉलचे दिवे तर बंदच होते. मी काळोखात चाचपडत "आई, बाबा कोण आहे इथे? दिवा लावा ना.." म्हणत बटनापर्यंत जाऊन बटन दाबले. खोलीभर प्रकाश पडला पण.. पूर्ण खोली रिकामी होती! मग दार कोणी उघडलं? मी बाबाss बाबाss ओरडत बेडरूमकडे पळाले, बेडरूमचे दार सताड उघडे आणि आत कोणीही नाही. अजबच आहे.. इतक्या रात्री दोघे कुठे गेले असतील म्हणत माझी खोली, बाथरूम्स सगळं चेक केलं पण अख्ख घर तसच्या तसं, काहीही जागेवरून हललेलं नाही. सगळ्या खिडक्यांच्या काचा बंद!

कुठे कॉल करू? नलीनलाच बोलावते परत म्हणून मोबाईल हातात घेतला तोच अचानक हवेचा दाब वाढू लागला, कानात कुंss ट्रूss ट्रूss असे रेडिओ स्टॅटिकचे आवाज यायला लागले नंतर ते थांबून गडगडाट आणि मुसळधार पावसाचा आवाज, अति पाऊस पडून कुजलेल्या पानांचा हिरवट, कुबट आणि समुद्राचा पावसाळी खारट दुर्गंध सगळीकडे पसरू लागला.

कोणीतरी झाडोऱ्यातून घसपटत कोयत्याने खटाखट झुडपांच्या फांद्या तोडत पुढे पुढे सरकत जाते आहे, लांबवर कुठेतरी जोरजोरात काहीतरी स्तोत्रपठण सुरू आहे हे सगळे आवाज एकमेकांत गुंतून येऊ लागले. हवेचा दाब वाढू लागला, हवा सजीव असल्याप्रमाणे तिला स्पर्श करता येईल इतकी जड जड झाली. खूप जोर लावून श्वास घ्यावा लागत आहे हे जाणवलं. डोळ्यावर एक विचित्र हिरवट काळा पडदा येऊन समोर सगळं विरळ दिसायला लागलं. कानाला दडे बसले. तो पडदा अचानक गडद गडद होत डोळ्यासमोर अंधार येऊन हातापायातली शक्ती गेली आणि मी कोसळले.

-------------------------------------

"मिलिंद! बरं झालं आलास! कधीपासून वाट पाहतोय तुझी. अरे काल रात्री आम्ही कधी नव्हे ते पार्टीत उशिरापर्यंत थांबलो. घरी आलो तर समि अशी पॅसेजमध्ये पडलेली होती. डोळे टक्क उघडे आणि काहीतरी पुटपुटत होती की हे थांबवा, मी येते, भेटते असं काहीतरी.. रेवती तर घाबरून तिच्या उश्याशी बसून आहे रात्रीपासून. अजूनही समि बेशुद्धच आहे पण काहीतरी चित्रविचित्र बडबडते आहे. नक्की काय झालंय अरे.. प्लिज पटकन चेक कर ना.." सुनील वीरकर आपल्या शाळासोबती डॉ. मिलिंद रावला घाईघाईत सांगत होते. शाळा संपल्यावर जरी सुनील कॉमर्स कॉलेजला जाऊन सीए झाला आणि मिलिंद एक यशस्वी पीडिऍट्रीशियन, तरीही दोघांची मैत्री तेवढीच घट्ट होती. समिपाच्या जन्मापासून आता ती मोठी झाली तरीही ती मिलिंदचीच पेशंट होती.

"अरे घाबरू नका तुम्ही दोघे, साधंच असेल काही. मी बघतो." असे म्हणत डॉक्टरांनी समिपाचे मनगट हातात घेऊन नाडी तपासली. स्टेथोस्कोप लावला तर हदयाचे थोडे प्रमाणाबाहेर जलद जाणवले म्हणून बीपी चेक केले तर ते प्रचंड हाय होते. बोटाने अलगद पापण्या वर करून टॉर्चचा प्रकाश टाकला तर बुब्बुुळाचा रिफ्लेक्स तरी व्यवस्थित होता.

"मिलिंद, तू तिला तिच्या जन्मापासून तपासतो आहेस, हे असं अचानक बेशुद्ध होणं.. मला काही समजतच नाहीये रे.. श्या, काय दुर्बुद्धी सुचली आणि आम्ही पार्टीत थांबलो. आम्ही एन्जॉय करताना समा इथे कळवळत पडली असेल रे.. समाला काय झालंय नक्की? मला प्लीज खरं खरं सांग" अगदी रडवेल्या चेहऱ्याने रेवतीने विचारलं. पार्टीत नेसलेली साडी न बदलता रात्रभर समिपाच्या उशाशी बसल्यामुळे ती अगदी कोमेजून गेली होती. चेहऱ्यावरचा मेकअप पुसट होऊनसुद्धा तीचा मूळचा गोड चेहरा उठून दिसत होता.

"ती कसल्यातरी जबरदस्त शॉकमध्ये आहे. त्यामुळेच ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. ते आपण आधी कंट्रोल करूया. ही गोळी मी लिहून देतो तशी द्या तिला आणि हो, काही दिवस मीठ अजिबात नको. तिला पाणी भरपूर प्यायला लावा. बाकी she's all right असं सध्या तरी वाटतंय."

हे म्हणत असला तरी मिलिंदच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी होती. त्याची नजर किंचित विचारात पडल्यासारखी वाटत होती. अचानक काहीतरी आठवल्यासारखे त्याचे डोळे चमकले,

"रेवती, तुम्ही शेवटचे कोकणातल्या घरी कधी गेला होतात ग? समीपासुद्धा गेली होती ना बहुतेक.."

"अम्म हो, मागच्याच वीकेंडला तर गेलो होतो. समिपा तर दिवसरात्र समुद्रावरच पडीक होती.. पण त्याचं काय आता?"

आता हे काय वेगळंच म्हणून आपल्या निळसर घाऱ्या डोळ्यांनी रोखून बघत जरा वैतागूनच रेवतीने उत्तर दिले.

"मी विचार करतोय की समिपाला कोकणची हवा किंवा कुठल्या गोष्टीची ऍलर्जी वगैरे तर नाही? आठवतंय? लहानपणीसुद्धा तिकडून आल्यावर बऱ्याचदा तिला ताप असायचा.. हम्म.. असो! बघूया. चला मी निघतो आता, गोळी मी सांगितली तशी दे तीला." म्हणून मिलिंद कारमध्ये बसून निघून गेला.

तीन चार दिवस भरपूर आराम आणि औषधांनंतर समिपाही टवटवीत होऊन ऑफिसला जायला लागली.

भाग ३

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! Happy

मस्त मस्त...
मोठे मोठे भाग टाक मॅगे..
मला वाटल डॉ म्हणतात बाधा कि काय अ‍ॅजयुजवल..बरय अ‍ॅलर्जी म्हणाले ते..
आधीपासुन होत होत तर.. हं...