सचिsssन सच्चिन.. क्लॅप क्लॅप क्लॅप !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 June, 2017 - 00:11

जे जसे सुचलेय तसे लिहिलेय. या चित्रपटाबद्दल असेच लिहिणे शक्य होते.

सचिन बिलिअन ड्रीम्स !

चित्रपटात असे फारसे काही नाही जे एखाद्या क्रिकेटप्रेमीला नव्याने समजते. तरीही जर तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल तर तुमची नजर क्षणभरासाठीही पडद्यावरून हटणार नाही.

ज्यांना क्रिकेटची आवड नाही त्यांना अध्येमध्ये बोर होऊ शकते. माझी गर्लफ्रेंड अध्येमध्ये झाली. मात्र चित्रपटावर चर्चा करताना तिने तो पुर्ण व्यवस्थित पाहिलाय हे जाणवले.

ए. आर. रेहमानची म्युजिक मस्त जमून आलीय. खास करून सचिssन सच्चीनचा नारा थिएटरला स्टेडीयम बनवतो. ज्या दृश्यात अंगावर शहारे येतात त्यात बॅकग्राऊंड म्युजिक नेहमीच महत्वाची भुमिका बजावते. तिथेही ते आपले काम करून गेलेत.

सचिनच्या लहानपणीच्या खोड्या दाखवताना जो कोणी निरागस अन खट्याळ चेहरयाचा बालकलाकार घेतलाय त्याच्या लोभसवाण्या अदाकारीला तोड नाही.

चित्रपटात कुठलाही ड्रामा क्रिएट करायचा प्रयत्न नाही. जिथे सहज शक्य होते तिथेही नाही. त्यामुळे एखादा शाहरूखचा रोमांटीक वा आमीरचा थ्री ईडियट बघताना जसे डोळे पाणावतात तसे होत नाही. मात्र हे काल्पनिक नसून सत्य आहे आणि आपण हा अनुभव प्रत्यक्ष घेतलाय या जाणीवेने ऊर नक्की भरून येतो.

सचिनचे पुर्ण चित्रपटभर स्वत:चे निवेदन हा या चित्रपटाचा प्लस पॉईण्ट आहे. सचिन आपल्या कोवळ्या आवाजात फार छान बोलतो.

चित्रपट संपल्यावर सचिनचा रेकॉर्ड म्हणून त्याने केलेल्या लाखो धावांची आणि शेकडो शतकांची पाटी दाखवतात आणि थिएटरमधील लोकं त्याच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवतात.

सचिनचे रीअल लाईफ घरगुती विडिओ दाखवले आहेत. त्यात त्याला मराठी बोलताना पाहून आनंद अभिमान आत्मीयता सगळं थोडं थोडं मनात दाटून येतं.

एकाने मला काल विचारलेले की चित्रपट आहे की डॉक्युमेंटरी?
मी म्हणालो बरीचशी डॉक्युमेण्टरी.
पुढे तो म्हणाला, बरं.. पण मनोरंजन मूल्य आहे का?
मी म्हणालो, जर दोन लवस्टोरया आणि चार रोमांटीक गाणी यातच मनोरंजन मूल्य शोधत असशील तर नको जाऊस.
हे धोनी चित्रपटाच्या संदर्भाने असले तरी तो टोमणा नव्हता तर फॅक्ट होते. मी स्वत: धोनीचा चाहता आहे आणि मला त्याचा चित्रपटही आवडलेला. असो!

चित्रपटात मोहम्मद अझरुद्दीनचा चेहराही दाखवला नसता तर मला चालले असते. तो आणि जडेजा हे मनातून उतरलेले दोन चेहरे आहेत. फलंदाज अझरचा कौतुकास्पद उल्लेख करून अझरचा एरोगन्स दाखवत त्याची एक मॅच फिक्सर म्हणूनच ओळख करून दिली हे आवडले.

कांबळी आणि सचिनचे आजचे संबंध पाहता जेवढे अपेक्षित होते तेवढेच कांबळीबद्दल दाखवले गेलेय. आणि माझ्या माहितीप्रमाणे याला कांबळीच जबाबदार आहे. असो!

सचिनच्या नाकाला लागलेला बॉल, त्याने कादीरला मारलेले सिक्स, विंडीजला 82 धावांत उडालेली घसरगुंडी जी सल सचिन नेहमी बोलून दाखवतो, शेन वॉर्नने भारत दौरयातील पहिल्याच सामन्यात सचिनला स्लिपमध्ये बाद करणे आणि त्यानंतर उर्वरीत मालिकेत सचिनने त्याची पिसे काढ्णे, शारजाची मोस्ट पॉप्युलर वादळी खेळी, कलकत्याचा ऐतिहासिक सामना, त्या सामन्यात गोलंदाज म्हणून चमकलेला सचिन, त्याच मालिकेतील शेवटच्या सामन्यातील सचिनचे शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलण्दाजाच्या भुमिकेत देखील सरस ठरत काढलेल्या पाच विकेट, चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मॅकग्राथवर ठरवून केलेला एटेक, पाकिस्तानविरूद्ध चेन्नईचे फेमस शतक आणि त्यानण्तर गमावलेला सामना, 1996 विश्वचषकात व्यंकटेशने काढलेला सोहेलचा दाण्डका, श्रीलंकेसमोर उडालेली घसरगुंडी आणि रडलेला कांबळी, 1999 च्या विश्वचषकात बाबा गेल्यावर फक्त या खेळासाठी आणि देशवासीयांसाठी मैदानावर उतरणारा सचिन, केनियाविरुद्ध मारलेले आणि वडीलांना अर्पण् केलेले शतक, 2003 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची अविश्वसनीय सुण्दर खेळी, आणि आहाहा.. तो अख्तरला मारलेला सिक्सर.. अंतिम सामन्यात एक चौकार मारल्यावर मॅकग्राथने घेतलेला सचिनचा बळी, त्यानंतर 2007 विश्वचषकाच्या कटू आठवणी, एण्डुलकरची चर्चा, सचिनचे परत येणे, जसे आधी टेनिस एल्बोमधून आलेला, पुन्हा जोमाने फलण्दाजी करत पुन्हा शतकांची टाकसाळ उघडणे, जे युवा फटकेबाज फलंदाजांना तोपर्यंत जमले नव्हते ते एकदिवसीयमधील पहिलेवहिले द्विशतक मारणे, आणि त्यानण्तर मग भारतीय क्रिकेटच्या आणि सचिनच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा आणि सोन्याचा क्षण... 2011 विश्वचषक.. अंतिम सामन्यात लंकेविरुद्ध दोन चार चांगले ड्राईव्ह मारत अचानक त्याचे बाद होणे पण तरीही ईतरांनी निग्रहाने तो सामना, तो वर्ल्डकप जिण्कवून देणे, म्हटलं तर युवराजने मालिकावीर बनत वा धोनीने सामनावीर बनत जिंकवून दिलेला विश्वचषक .. पण सचिनची 89 सालापासूनची कारकिर्द पाहता जाणवते की हे सचिनचेच स्वप्न होते, हे सर्व भारतीयांचे स्वप्न होते की जो खेळाडू प्रत्येक विश्वचषकात सातत्याने आपला सर्वोत्तम खेळ करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणत होता पण काही कारणाने तो विजय काही गवसत नव्हता तो विजय, तो विश्वचषक त्याच्या निवृत्तीच्या आधी या शेवटच्या संधीत मिळायलाच हवा. त्यामुळेच युवराज आणि कोहलीच्या प्रतिक्रिया नेमक्या वाटतात..

पिक्चर वर्ल्डकपलाच संपत नाही. सचिनचा शेवटचा सामना. किती वेळा असे दिसते. विंडीजच्या सॅमीने सचिनचा झेल घेतला आणि तिथेच बसकण मारली. ते कुठलेही ढोंग नव्हते. आता पुन्हा सचिन मैदानावर खेळताना दिसणार नाही याचे प्रतिस्पर्ध्यांनाही वाईट वाटत होते. आणि हे सचिनसाठी पहिल्यांदा नव्हते. शेन वॉर्न ते अक्रम या दिग्गज गोलंदाजांनी सचिनची नेहमीच अशी भरभरून तारीफ केली आहे. आम्ही टीम ईंडियाशी नाही तर सचिन तेण्डुलकर नावाच्या एका माणसाशी हरतो हे जेव्हा ऑस्ट्रेलियाचा ऑल टाईम ग्रेट संघ बोलतो आणि खरेच तसे मानतो यातच सारे काही आले.

सचिननेही शेन वॉर्नला चित्रपटात योग्य सन्मान दिला आहे. वॉर्नचा सामना करायलाही त्याला काय तयारी करावी लागली याबद्दल छान सांगितले आहे. आणि मग हे पाहताना कुठेतरी वाटते की या लढती आपण याचि देही याची डोळा अर्थातच लाईव्हमध्ये पाहिल्या आहेत हे आपले भाग्यच आहे.

या चित्रपटाची एक आवडलेली एक गोष्ट की हा बदललेल्या भारतीय क्रिकेटबद्दल आणि त्यातील सचिनच्या भुमिकेबद्दलही भाष्य करतो. ऐंशी नव्वदीच्या दशकात या विकसनशील देशात बेरोजगारीने ग्रासलेल्या आणि अंडरवर्ल्ड, भ्रष्टाचाराने त्रस्त तरुणांना सचिन नावाचा एक लिजंड मिळाला ज्याकडे ते बघून बोलू शकतील की हा एक माणूस आमच्याकडे आहे जो जगात बेस्ट आहे.
त्यानंतर एकंदरच भारतीय क्रिकेटचा दर्जा कसा उंचावला, आणि क्रिकेटमध्ये कसा पैसा आला. कसे सचिनला क्रिकेटचा ब्रांड बनवले गेले. या सचिन ईफेक्टमुळे कसे भारतीय प्रेक्षक क्रिकेटला एक खेळ नाही तर त्यापलीकडे एक धर्म म्हणून बघायला लागले. त्यामुळे कसे भारत ही क्रिकेटची मोठी बाजरपेठ बनली. ईसपीएनने बीसीसीआयशी केलेले मोठे कॉन्ट्रेक्ट वगैरे.. एकूणच आज भारतीय क्रिकेट म्हणजे क्रिकेटची महासत्ता असणे हे कसे घडले ते थोडक्यात पण नेमक्या पद्धतीने समोर आलेय..
आज आयपीएलमध्ये शेमडी पोरेही जी लाखोने कमावत आहेत ते आज सचिनने या खेळाला भारतात मोठे केल्यानेच शक्य झालेय. तो नसता तर ईतर क्रिकेट खेळणारे देश आणि आपण यात काही वेगळी परिस्थिती नसती. कोणताही खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नसला तरी तो त्या खेळाला मोठा करू शकतो याचे ऊदाहरण म्हणजे सचिन!

सचिनचे निरोपाचे भाषण! मुळातच हे क्लास आहे. चित्रपटात शेवटी येते तेव्हा जणू या चित्रपटाचा समारोप करायला यापेक्षा उत्तम स्क्रिप्ट लिहिता आली नसती असेच वाटते. सचिन आज खेळत नाहीये ही जाणीव क्षणभर अस्वस्थ करते. पण क्षणभरच. कारण सचिन अमर आहे. त्याच्या आठवणी कधी पुसल्या जाणार नाहीत. त्याचा आदर्श कधी मिटला जाणार नाही. एक माणूस म्हणून, एक खेळाडू म्हणून, एक फलंदाज म्हणून त्याचे अनुकरण पुढच्या कित्येक पिढ्या करणार आणि आपल्याला या ना त्या रुपाने कोणाच्या ना कोणाच्यात सचिन दिसत राहणार ..

- ऋन्मेष

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यामुळे एखादा शाहरूखचा रोमांटीक वा आमीरचा थ्री ईडियट बघताना जसे डोळे पाणावतात तसे होत नाही. >>> हे सोडून बाकी छान लिहिलंय.. आवडलं आणि पटलं.. Happy
अजून एक गोष्ट सिनेमा पाहताना जाणवली, की सचिनची पत्नी अंजलीचा आवाज खूप छान आहे. गायक या अर्थाने नाही, तर एक निवेदक या अर्थाने.

मित, हो. त्याची गरज नव्हती. पण जसे क्रिकेटप्रेमी क्रिकेटवर चर्चा करतात तेव्हा ती सचिनच्या उल्लेखाशिवाय पुर्ण होत नाही, तसे शाखाप्रेमींचा चित्रपटावर चर्चा करताना हाच हट्ट असतो. लोकं आता अनुभवाने ईग्नोर करायला शिकले असतीलच असे गृहीत पकडून मी ही सवय बदलत नाही Happy

सचिsssन सच्चिन.. क्लॅप क्लॅप क्लॅप !>>
ह्यातला च्च चुकिच आहे, पालथ्या घड्यावर पाणी होणार म्हणुन बदलायला सांगत नाही...पण माझा निषेध नोंदवतो..
*शेपो*
अवांतर सचिनच्या लेखाच्या शिर्षकातच ही गोष्ट खटकली म्हणुन रुन्म्याचा धागा उघडुन लिहिलं, बाकी रुन्म्याचे धागे आणि प्रतिसाद वाचणे ह्यात वेळ घालवणे कधिच सोडुन दिलय..

छान लिहीले आहे. विशेषतः शेवटून दुसरा परिच्छेद आवडला. कांबळी चा उल्लेख असायला हवा होता. नंतर काय झाले माहीत नाही पण तरीही आधीचे बदलत नाही.

(शाखाचा उल्लेखही खटकला नाही. इथे स्पॉण्टेनियस आहे :). उलट सचिन आणि शाखा एकत्र नावे आल्याने ती १९९९ च्या वर्ल्ड कप च्या वेळेस आलेली पेप्सी ची अ‍ॅड आठवली. धमाल होती.)

उलट सचिन आणि शाखा एकत्र नावे आल्याने ती १९९९ च्या वर्ल्ड कप च्या वेळेस आलेली पेप्सी ची अ‍ॅड आठवली. धमाल होती.)
>>>>

तीच आहे का, सचिनचा डुप्लिकेट बनून शाखा पेप्सी प्यायला जातो. ड्रेसिण्ग रूममधल्या गमतीजमती. मग बहुतेक दादा त्याला बॅटींगला धाडतो. झालं. फसतो. पण नशीबाने त्याला रस्त्यात सचिन भेटतो. पण सचिन त्याच्या हातातून बॅट न घेता पेप्सी घेतो .. अगदी माझे बालपण जागे झाले Happy

अजून एक गोष्ट सिनेमा पाहताना जाणवली, की सचिनची पत्नी अंजलीचा आवाज खूप छान आहे. गायक या अर्थाने नाही, तर एक निवेदक या अर्थाने.>>>>>>>+101%
अंजली पण भाव खाऊन जाते..मस्त जमलाय चित्रपट ..

छान लिहिलंय. एक नवीन धागा ऋ यांना सुचवू इच्छितो. उद्या 8 तारीख आहे. वटपोर्णिमा आणी धागे यावर काही खुमासदार लेखन वाचायला आवडेल. पुढील लेखनास शुभेच्छा

ओके
माझी एक आरती नावाची कॉलेज मैत्रीण होती.. तिला हाक मारताना मी आरती बोलून तीन टाळ्या वाजवायचो. मला वाटले त्यातला प्रकार असावा..

येनीवेज, एखाद्या धाग्याला कमी प्रतिसाद आले की ते वाढवायला काय एकेक पीजे मारावे लागतात Happy