असा पाऊस दुसरी कडे नाही...!

Submitted by Charudutt Ramti... on 29 May, 2017 - 04:29

सकाळी सकाळीच घामानं अर्ध्या ओल्या झालेला बनियन! उकाड्यान हैराण झालेला त्या बॅनियनच्या आतला मी. इच्छा नसतानाही सकाळ चा पेपर आणि सकाळ चा चहा एकत्र रिचवायलाच हवा हा केवळ एक वर्षानूवर्ष पाळलेला रिवाज म्हणून गरम गरम चहाचे झुरके घेत पेपर उघडला. वर्ष-भर अभद्र बातम्या पुरवून वाचकांची सकाळ भकास करणार्या समग्र प्रिंट मीडिया मधील अख्या वर्षातल्या तीनशे पासष्ठ हेड लाईन्स धुंडाडाळून काढल्या तर मनाला भावणार्या अश्या चांगल्या हेड लाईन्स फक्त हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच सापडतील. त्या सर्व बकाल मथळयां मधे पहिल्या क्रमांकावरील सर्वात सुखद जर कुठला असेल तर तो म्हणजे 'मान्सून केरळ मध्ये दाखल'! हा मथळा मे महिन्याच्या शेवटी वाचला की मग इस उकाडे वाली रात की सुबह नही असे वाईट विचार येत कश्या बश्या काढलेल्या रात्री आता संपणार म्हणून जरा 'समाधान' वाटत. 'केरळ आणि मान्सून'ची बातमी वाचून काढली. खरंतर मला भूगोलात शून्य गती आहे. माझे आणि गॅलिलिओ, कोपर्निकस किंवा न्युटन यांच्याशी कधीच म्हणावे तसे फारसे पटले नाही. गुरूत्वाकर्षण शक्ति, पृथ्वीचा साडे सत्तावीस अंश कललेला (आणि मला कधीच न कळलेला) तो तिचा आस. त्या कललेल्या आसा मुळे होणारे तीन ऋतू. ती खग्रास की खंडग्रास कसली कसली ग्रहणे तर चक्क आयुष्य भर माझ्या अभ्यासात ग्रहण बनूनच राहिली. ते खारे वारे, मतलई वारे, मान्सून (हा शब्द मुळातला इंग्रजी की मराठी?), रिवर्स मान्सून, ईशान्य मौसमी वारे, नैऋत्य मौसमी वारे, एल निनो, ओझोन चा तो वर्षानू वर्ष कमी कमी होत जाणारा थर, हे सगळे कशाशी खातात हेही मला माहीत नाही. मौसमी वार्याने पर्जन्य छाये मधील प्रदेशातील सरासरी पर्ज्यन्य वृष्टी वर होणार्या परिणामा पेक्षा, मला नेहमीच ‘त्या’ पर्ज्यन्य वृष्टी मधे भिजत असलेली आणि त्या मतलई की मतलबी वार्या मुळे इतस्तत: उडणारा तिचा पदर सांभाळत 'रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन... असे म्हणत अमिताभ बरोबर मुंबईतल्या चिंब पावसात भिजलेल्या साठ सत्तर च्या दशकातली प्रणय करणारी मौसमी (सॉरी मौशुमी) चॅटर्जी जास्त परिणामकारक वाटते.

भारताच्या नकाशावर इनसॅट दोन का तीन ने पाठवलेल्या ढगाळ आणि अस्पष्ट अशा चित्रात बातमीत लिहिल्या प्रमाणे स्पष्ट दिसत होते की भारतीय उपखंडातील समशीतोष्ण प्रदेशातून वाहणार्या कमी दाबाच्या वार्याचे पट्टे आता हळू हळू नैऋत्ये ला सरकत सरकत अरबी समुद्रा मधून बंगाल च्या उपसागराकडे निघाले आहेत. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात केरळ मधे मान्सून धडकण्याची चिन्हे, शक्यता, लक्षणे, वगरे वगरे...!
मला अश्या बातम्या वाचताना, आमच्या स्वयंपाक घरातील ओट्यावरल्या गॅस वर मंद आचेने तळलेल्या कांदाभजीचा खमंग वास त्या कमी की जास्त दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण होणार्या वार्यावर आरूढ होऊन आमच्या दिवाण खान्यात किंवा बाल्कनित भरून राहिला आहे, असे भास होऊ लागतात. तेव्हढ्यात हिने पटकन, "भजी चे पीठ भिजवले आहे, जरा तिखट मीठ कमी जास्त पाहता का टेस्ट करून?" अशी प्रेमाने हाक मारली आहे, आणि मी त्यावर अगं खारे वारे भरपूर आहेत बाल्कनि मधे, तुझ्या त्या भजांची गलबतं त्या उकळत्या तेलाच्या दरियातून बाहेर काढून चटकन बंदरात आण थोडे कमी असले मीठ तरी चालेल, तssळ तssळ लवकर तssळ त्या भज्या...अशी काव्यमय विनवणी मी हिला करतोय असे ही भास होतात.

मान्सून बिनसून की काय जगात फक्त आणि फक्त भारतीय उपखंडातच काय तो येतो असं परवा डिस्कवरी किंवा नॅशनल जियोग्रॅफिक चॅनेल वर ऐकल्याच धूसर आठवतय.. खरे खोटे काय असेल ते असेल...पण जसा मान्सून आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सन्ह्याद्री च्या पर्वत रांगांमधे येतो, तसा जगात नक्कीच कुठे येत नसणार हे शंभर टक्के सत्य. अर्ध्या फेब्रुवारी पासूनच सुरू झालेल्या, पुढे मार्च एप्रिल आणि पुढे जवळ जवळ तीन चतुर्थाउन्श मे पर्यंत सुरू असलेल्या रणरणत्या उन्हाची आग सबंध शरीरावर सोसत काळ्या कभिन्न बेसॉल्ट ने रापलेला तो अजस्त्र असा सन्ह्यद्रि, जून च्या पहिल्या दोन तीन पावसात आपल रंगरूप चांगलच बदलू न टाकतो. शरीरावर उन्हांने तडे गेल्यासारखे दिसतात त्या भग्नशा खडकांमधिल भेगांमधून पाहता पाहता पहिल्याच पावसात चक्क थंड गार असे झरे नीपजतात. एखाद्या अजस्त्र नागाने कात टाकावी तसा हा माझा सान्ह्याद्री जणू कात टाकतो.

पुण्या पासून फार दूर नाही, अर्ध्या पाऊण तासा वरच असलेल्या मुळशी च्या जराश्या पुढे ताम्हीणी घाटातल्या दर्या खोर्यांमधे जून च्या पहिल्या पावसातच भर दुपारी दोन वाजताही चक्क गडद अंधार भरून राहतो. गरूडमाची वरल्या देवराई मधला वृक्ष न वृक्ष पावसाच्या मार्याने धरणी पुढे झुकून गेल्या सारखा दिसतो. जरा रस्त्याकडेला गाडी उभी करून पहावं तर विजेच्या च्या तारांवरून थेंब थेंब खाली ठिबकत असतात अव्याहत पणे पाण्याचे. त्या पारदर्शी थेंबांमधून हळूच एक प्रकाशाचा किरण पारावर्तीत व्हावा आणि इतक्यात तो थेंब स्वत:पुरताच एक छोटासा सप्तरंगी इंद्र धनू बनवण्या आधीच, आधीचा गोल आकार हरवत हळू हळू लम्बगोल होत शेवटी नाइलाजाने तारे वरुन निखळून पडावा. त्याच तारे वरती गन्जलेल्या खांबा वर बसलेला एक अनोळखी पक्षी थंडी ने थरथरावा. आणि त्या थरथरण्यात त्याच्या पंखात साठलेल पाणी अगणित अश्या सूक्ष्मशा जल बिंदू मधून अवती भोवती आकाशात विरावं. आपण ‘तो पक्षी कोणता? खंडया', की आणि कोण असं ओळखयला जावं, तेवढयात तो त्या तारे वरुन सर्र्कन क्षणार्धात क्षितीजा कडे उडून जावा...जणू काही त्याला आपली ओळख गुलदस्त्यातच राहावी अशी इच्छा असल्या सारखा.
तिकडे तम्हिणी पासून सत्तर ऐंशी किलोमीटर वर खंडाळया च्या घाटात राजमाची वरुन तीनशे चारशे फूट खोल पोटात गोळा आणणारा धबधबा कोसळत असतो. त्याचे त्या राजमाची कड्याला काटकोनात चोफेर पसरणारे असंख्य तुषार समोरची दरी व्यापून टाकत असतात. तेवढ्यात जमिनीवरच्या लाल चिकण मातीच्या चिखललाला न जुमानता कुणीतरी रस्त्या कडेला स्टोव वर भाजलेली आणि गरजे पेक्षा जरा जास्तच मस्त मीठ घासलेली गरम गरम कोवळी कणसं त्याच्याच पिवळसर हिरव्या नैसर्गिक अशा नॉयलॉन सारख्या चर्चर करणार्या आवरणात धरून ‘हात भाजताहेत लवकर घे’ म्हणत घेऊन येत. त्याचा एक न एक दाणा सम्पवत खोल दरीत भिरकावून दिलेली ती देठं! तिथून मग स्ट्रेट गाठलेला धबधबा...आणि मग ती केलेली मनमुराद अंघोळ. आणि अंगावरच वाळवलेले ते कपडे. चिखलात चालता चालता चप्पल स्लीपर चा तो तुटलेला बंद, ते माती च्या मडक्यात कुरकुरीत भाजलेले खारे शेंगदाणे आणि दोन शंकू आकृती कागादातल्या पुडीचे वीस रुपये देताना त्या फेरी वाल्याबरोबर होणारी भिजलेल्या नोटांची मुकाट अदलाबदल आणि पाकिटात पावसाचे पाणी जाऊ नये म्हणून उडालेली ती धांदल.
दुपारी दोन अडीच वाजता मग लोणावळ्यातल्या फसे काकूं च्या खाणावळीत जाऊन जबरदस्त ''चिकन'' ओरपायाच. पन्हाळी तून पडणार्या बदाबदा पडणार्या पाण्याच्या धारेवरच हात धुवायचा.
शेवटी लोणावळ्यातून चार वीस ची ‘’पुणे’’ लोकल पकडण्याची लगबग
येता येता डूलत डूलत भिजलेल्या मोबाइल वर, नाले नद्या पूर येऊन दुथडी भरून वाहत असलेल्या बातम्या वॉटसअप वर वाचायच्या. आणि त्यात आपलेही दुथडी भरून पाण्यात गुडघा भर उभे राहून काढलेले सेल्फी टाकायचे. कशाला हो पाहिजे कुणी खगोल शास्त्रद्न्य किंवा नॅशनल जिओग्राफीचा चॅनेल हे सांगायला की ''असा मान्सून जगात फक्त आपल्या कडेच पडतो म्हणून...?"
लोकल मधे समान ठेवायला असत त्या डोक्यावरच्या लोखंडी पायपांन्नी बनवलेल्या रॅक वजा जागेतून ओल्या रेनकोट आणि छत्री मधल पाणी टिप टिप करून गळत असत. शर्टावर कॉलर जवळ खांद्यावर लगट करत शर्टातच विरून जातात. खिडकीतून बाहेर पहावं, खिडकीच्या गजाही पाण्यात भिजून लोखंडाचा एक काही स्वत:चा असा वैशीष्ट्यपूर्ण असा वेगळाच वास दरवळत असतात. तळेगांव आलं तसा पाऊस थांबून उन्हेरी हिरवळ भवताली पसरलेली असते. हिरव्या गवातावर थुई थुई करत पिवळी फुले मोजत फूलपाखरं उन्हे पीत असतात. आयुष्याचा एक दिवस कारणी लागावा म्हणून जणू काही आलेला हा पाऊस. रात्र भर कोसळतो तेव्हा घाबरवून टाकणारा, दिवस भर कोसळतो तेंव्हा भारावून टाकणारा. फांदी फांदी वर, पन्हाळी पन्हाळी वर...रानात शेतात...चोफेर...!
असा सन्ह्याद्री दुसरी कडे नाही, असा पाऊसही दुसरी कडे नाही...!

चारूदत्त रामतीर्थकर,
29 मे 2017
पुणे,

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults