माझ्या आठवणीतील रिमा

Submitted by सुमुक्ता on 18 May, 2017 - 05:14

सिनेमा पाहून तो समजायला लागल्यावर रिमांना पहिल्यांदा पाहिले ते सलमान खानची आई म्हणून. नवऱ्याच्या विरोधात जाऊन स्वत:चे कंगन काढून लेकाच्या हातात देणारी आई हिंदी चित्रपटात तेव्हा फारच वेगळी पण खूप छान वाटली होती. आईने कसे कायम दु:खी आणि सोशिकच असले पाहिजे ह्या परंपरागत प्रतिमेला छेद दिला तो रिमांनी. त्यांच्यामुळेच तर स्वतंत्र विचारांच्या, आधुनिक आणि आनंदी आया प्रेक्षकांनी स्वीकारल्या. एक वर्षानुवर्षांची परंपरा मोडून काढणे हे कर्तृत्व मोठेच पण तेवढीच त्यांची ओळख नाही. त्या एक अतिशय ताकदीची अभिनेत्री होत्या हे मला खूप नंतर त्यांचे इतर सिनेमे / मालिका पाहिल्यावर कळले. अशा अभिनेत्रीला रंगमंचावर अभिनय करताना पाहणे मात्र राहून गेले ही रुखरुख मात्र सदैव राहील.

त्यांच्या आभिनयाबद्दल मी काही बोलावे एवढा माझा अनुभव नाही पण त्यांनी प्रत्यक्ष भेटण्याचा योग्य दोन वेळा आला तेव्हाचे अनुभव लिहावेसे वाटत आहेत. आम्ही युरोपिय मराठी स्नेहसंमेलन करायचे ठरविले तेव्हा कार्यकारी समितीने एकमताने अध्यक्ष म्हणून दिलीप प्रभावळकर आणि प्रमुख पाहुण्या म्हणून रिमा ह्यांची निवड केली. दोघेही अतिशय ताकदीचे अभिनेते आणि विशेष म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके. त्यांनी कार्यक्रमास येण्यासाठी होकार दिला तेव्हा खूप आनंद झाला. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची खूप उत्सुकता होती.

संमेलनाच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी मी पुण्यात होते तेव्हा पहिल्यांदा मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले. रिमा चित्रपटात जेवढ्या सुंदर दिसतात त्याहीपेक्षा अधिक सुंदर त्या प्रत्यक्षात दिसत होत्या. कोणाताही बडेजाव न करता अतिशय साध्या वेषात त्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आल्या होत्या. माझी त्यांच्याशी ओळख करून दिली गेली आणि त्यांनी एक हलकेसे स्मितहास्य केले. मितभाषी म्हणून त्या प्रसिद्ध आहेत हे मला आधीच माहित होते त्यामुळे माझ्याशी त्यांनी बोलण्याचा प्रश्नच नव्हता पण त्यांच्या ऑरापुढे मलासुद्धा त्यांच्याशी धड बोलता आले नाही. प्रेस कॉन्फरन्स पार पडली त्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडले. त्यानंतर मला फार रुखरुख लागून राहिली की आपण एवढ्या कशा बावळटासारखा वागलो. पण इलाज नव्हता. मला माझी चूक सुधारायला अजून एक मोका मिळणार होता.

प्रेस कॉन्फरन्सनंतर तीन महिन्यांनी संमेलनाचा दिवस उजाडला. मी मस्त पैठणी घालून नटून थटून तयार होते. प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी मी अतिशय साध्या वेषात बिनामेकप गेले होते. त्यातच रिमांशी प्रत्यक्षात पाचच मिनिटे बोलणे झाले असेल नसेल. त्या मला ओळखतील ह्याची मला खात्री नव्हती. पण त्या आल्यावर मला पाहून एक क्षण थांबल्या आणि म्हटल्या "तूच होतीस ना प्रेस कॉन्फरन्सला!!". मला फारच आनंद झाला. मी हो म्हटले आणि त्यांचे स्वागत केले. आमच्या स्मरणिकेचे उदघाटन त्यांच्याच हस्ते झाले. त्यानंतर संमेलनात आयोजनाच्या अनुषंगाने ह्या ना त्या कारणाने त्यांच्याशी बोलणे होत गेले. मितभाषी असल्या तरीही त्यांचे उत्साही आणि प्रसन्न व्यक्तिमत्व मला पदोपदी जाणवत होते.

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही "व्हाईट लिली अँड नाईट रायडर" नाटकाचा प्रयोग ठेवला होता तेव्हा सकाळी उठून सोनाली कुलकर्णीला मेकप करण्यासाठी मदत म्हणून त्या बेकस्टेज हजर होत्या. नाटकाची माहिती मला प्रेक्षकांना सांगायची होती म्हणून ती माहिती बरोबर आहे ना कोणते मुद्दे राहिले नाहीत ना ह्याची पडताळणी करायला मी सोनाली कुलकर्णीकडे गेले होते. जेवढ्या उत्साहाने सोनाली त्या नाटकाबद्दल बोलत होती तेवढ्याच उत्साहाने त्यांनी पण मला एक-दोन महत्वाचे मुद्दे सांगितले. आपल्या सहकलाकारांना मदत करण्याचा त्यांचा हा गुण मला प्रकर्षाने जाणवला. खरेतर त्यांचा त्या नाटकाशी काहीच संबंध नव्हता पण तरीही त्या केवळ सोनालीला मदत म्हणून तेथे आल्या होत्या.

तिसऱ्या दिवशी संमेलनाचा समारोप होणार होता. सकाळी "सेलिब्रिटी गप्पा" हा कार्यक्रम ठेवला होता. त्यांचा मितभाषी स्वभाव ह्या कार्यक्रमात अगदी प्रकर्षाने जाणवला. त्यांच्याकडे सांगण्यासारखे खूप असले तरीही त्यांना बोलते करण्याइतका वेळ दुर्दैवाने कार्यक्रमामध्ये नव्हता. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची फारशी संधी मिळालीच नाही ही रुखरुख कार्यक्रम संपल्यावरही माझ्या मनात राहिली. असो. काही व्यक्ती गूढ असतात आणि कदाचित त्या तशाच रहाव्यात अशी योजना असते.

आज सकाळी रिमांच्या निधनाची बातमी ऐकली आणि प्रचंड मोठा धक्का बसला; त्यांच्या भेटीचे हे सर्व प्रसंग मनामध्ये तरळून गेले. कार्यक्रमाचा समारोप झाल्यानंतर मी त्यांना एक फोटो काढू द्या म्हणून विनंती केली. तो एक फोटो ह्या तीन दिवसाची सुरेख आठवण म्हणून माझ्या संग्रही आहे.

आज त्या आपल्यात नसल्या तरीही आपल्या अभिनयाने त्या पुढच्या पिढीस सदैव प्रेरित करत रहातील. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो!!

With Rima.jpg

Group content visibility: 
Use group defaults

छान आठवणी. आज एका चॅनेलवालीने त्यांची तुलना निरुपमा रॉय शी केली. हसत्मुख, प्रसन्न , वात्सल्यमूर्ति रिमाची तुलना त्या दीईईईनवाणी, केविलवाणी नि रॉशी Sad Sad ! रिमाला विनम्र श्रध्दांजली!

सुमुक्ता , रीमा यांची ही सुखद आठवण तुला अश्यावेळी शेअर करावी लागेल असे स्वप्नातही वाटले नसेल ना.. रिअली..नियतीचे अजब खेळ..

एखाद दोनदा रस्त्यात किंवा लोकल सुपर मधे अशीच अचानक भेट झाली होती आमची, तिच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य विसरणं केवळ अशक्य आहे.

रीमा यांची ही सुखद आठवण तुला अश्यावेळी शेअर करावी लागेल असे स्वप्नातही वाटले नसेल ना >> खरेच. फारच धक्का बसला आहे!! वयानेसुद्धा खूप मोठ्या नव्हत्या त्या Sad

मी पाहिलेले रिमाचे पहिले नाटक कोपता वास्तुदेवता हे होते. तेव्हा ती जेमतेम विशीची असेल .त्यानन्तर सविता दामोदर परान्जपे, घर तिघान्चे हवे आणि बाकीची तिची रन्गभूमिवर आलेली एकूण एक नाटके. अभी तो दिल भरा नही बघायचे राहिले फक्त. कारण नन्तर कलाकार बदलले. पुरुष मधे तिने घशाला कोरड पडल्याचा अभिनय केला आहे तो आठवला तर अजून अन्गावर काटा येतो. बुलन्द आणि विठोरखुमाय ही तिची नाटके मला वाटते खूप जणाना माहीत नसतील. टी व्ही आणि सिनेमा तर जाऊदे पण रन्गभूमिने आज तिचे आणखी एक रत्न अकाली गमावले आहे.

इथे ही माहिती फोटोसहित दिल्याबद्दल धन्यवाद.
त्यांचे वय फारसे नव्हते, किंबहुना अशी काहि बातमी ऐकावी लागेल अशी कणभरही शक्यता जाणवलेलीही नव्हती.
त्यांचा सहज अभिनय परिणामकारक होता.
त्यांना श्रद्धांजली.

पडद्यावरचे मोठे कलाकार बरेच वेळा प्रत्यक्ष आयुष्यात अति - सामान्य किंबहुना माणुसकी नसल्यासारखे वागतात. रिमा ताईंबद्दल या आठवणी वाचून खूप बरे वाटले आणि त्या गेल्याचे दु:ख्ख ही!
श्रद्धांजली ! __/\__

खूप वर्षांपूर्वी रीमाचं हिंदी नाटक पाहिलं होतं.' बिन आये न बने' .. शफीक इनामदार सहकलाकार होता. अतिशय प्रभावी आणी अगदी आगळावेगळा विषय होता नाटकाचा..

चांगल्या आठवणी आहेत..
हिंदीत म्हणावे तसे त्यांना सशक्त भुमिका मिळाल्या नाहीत. आईच्या भुमिकेतच अडकल्या. पण त्यातही वैविध्य होते. वास्तव मधली वास्तव आई ते राजश्री प्रोडक्शन मधली कौटुंबिक आई ते करन जोहरपटातील मॉडर्न आई...
विक्रम गोखले, मोहन जोशी या कॅटेगरीतले पडद्यावरचे एक ठसठशीत व्यक्तीमत्व होत्या त्या.. त्यांची आठवण आणि उणीव राहील

रीमा लागू यांच्याविषयी माझ्या मनातून कधीच न पुसली जाणारी एक आठवण आहे, जी मी आपणां सर्वांबरोबर शेयर करू इच्छितो. १९८५-८६ साली मी मुंबईत डिग्री कॉलेजमध्ये शिकत होतो. माझे साहित्यिक वाचन भरपूर होतं. सिनेमे, नाटकंही तेवढीच पहायचो. नाटक सादर करताना प्रेक्षकांशी समोरासमोर होणाऱ्या सुसंवादाच्या आकर्षणापायी तेव्हा मला नाटकात काम करण्याची प्रचंड आवड निर्माण झाली होती. मी कॉलेजमध्ये सादर होणाऱ्या नाटकात भाग घेई. त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या श्री.कृ.रा.सावंत यांचा 'नाट्य प्रशिक्षण कोर्स'ही मी यशस्वीरित्या पूर्ण केला होता. नाट्याभिनय क्षेत्रात शिरण्याचा माझा मानस असल्याने मी लोकांच्या ओळखी काढत होतो. तेव्हा माझी अशा एका व्यक्तींची ओळख झाली ज्यांची व्यावसायिक नाट्यक्षेत्रात असणाऱ्या निर्मात्यांशी घनिष्ठ संबंध होते. त्या व्यक्तींच्या ओळखीने मी एका हॉलमध्ये चालणाऱ्या व्यावसायिक नाटकांच्या तालमी पहायला रोज हजर रहात असे.

असेच एके दिवशी माझी नाटकाची आवड पाहून तालमीत असणाऱ्या एका बॅकस्टेज आर्टीस्टने शिवाजी मंदिर येथे 'सविता दामोदर परांजपे' या नाटकाचा प्रयोग बॅकस्टेजने पहाण्याची मला संधी दिली. नाट्यगृहात मी उशिरा गेलो तेव्हा प्रयोग अर्धा होत आला होता. स्टेजच्या बाजूच्या अंधाऱ्या विंगेमध्ये 'प्रकाश योजना' करणारी व्यक्ती आपल्या साहित्यानीशी हजर असते. त्याच्याबाजूला उभ्याने मी प्रयोग पहात होतो. विंगेमध्ये सर्वत्र अंधार होता. स्टेजवर रीमा लागू आणि राजन ताम्हाणे यांचा प्रवेश चालू होता. संवादांची आतिषबाजी होत होती.

आणि अचानक तो क्षण आला. रीमा लागू यांचा प्रवेश संपला. त्यांनी स्टेजवरून एक्झिट घेतली आणि विंगेमध्ये अंधारात मी उभा होतो तेथून अवघ्या सातआठ फुट पलीकडे त्या सरसर येऊन उभ्या राहिल्या.

बापरे!! काय रोमांचक क्षण होता तो!! गूढ नाटक असल्याने स्टेजवर रंगीबेरंगी प्रकाशात चाललेला राजन ताम्हाणे यांचा गूढ अभिनय आणि संवाद. नाट्यगृह तुडुंब भरलेले असूनही भांबावून चिडीचूप बसलेला एकूणएक प्रेक्षक. बाजूला विंगेच्या आतमध्ये अंधारात उभा असलेला प्रकाशयोजनाकार आणि त्याच्या बाजूला हबकून उभा असलेला मी. आणि माझ्यापासून अवघ्या सात आठ फुटांवर माझ्याकडे रोखून पहाणाऱ्या, पांढऱ्या शुभ्र साडी परिधान केलेल्या रीमा लागू......

contd....

contd......

तेव्हा त्या ऐन तिशीत असाव्यात. किती करारी आणि लोभसवाणं व्यक्तिमत्त्व दिसत होतं त्यांचं. मला माझ्या काळजाची धडधड जोरात ऐकू येऊ लागली होती.

रीमा लागू यांचा लगेच पुन्हा स्टेजवर प्रवेश होता. फक्त एका मिनिटाकरिता त्या विंगेमध्ये माझ्यासमोर काही न बोलता स्तब्ध उभ्या होत्या आणि मग पुन्हा स्टेजवर गेल्या.

झालेल्या प्रसंगाचे माझ्या मनावर एवढे दडपण आले की मी गुपचूप मागच्यामागे बॅकस्टेजच्या बाहेर पडून नाट्यगृहाच्या बाहेर आलो.

एवढ्या वर्षांनंतरही विंगेच्या अंधारात एका मिनिटाकरिता पाहिलेली रीमा लागू यांची छवी माझ्या डोळ्यांपुढे अजूनही तशीच्या तशी दिसते आहे.

मी रीमा लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.