सूचना: फोटो सध्या क्रोमातून दिसतील
आगरी जमातीमध्ये लग्न म्हणजे एक धुमशान सोहळा. दाग-दागिने, थाट-माट, असंख्य पाहुण्यांची गजबज त्याच बरोबर आगरी लोकांचे लग्नातील खास जेवण व भोकाचे वडे हे विशेष असते. हे भोकाचे वडे उरण येथे जास्त प्रचलित आहेत. लग्न ठरताच लग्नाच्या तयारीच्या चर्चेत वड्यांची चर्चा अग्रेसर असते. ऐपत व आप्तांच्या गोतावळ्यानुसार वड्यांच्या मापनाचा अंदाज घेतला जातो. मोठ्या टोपल्या व रवळी (छोटी उभट टोपली) ची ऑर्डर दिली जाते.
वडे करण्यात निष्णात अशा काही बुजुर्ग बायका गावामध्ये असतात त्यांना भेटून साधारण किती माणसे येतील याचा अंदाज सांगून त्यांच्याकडून वड्याच्या सामानाची यादी घेतली जाते. साधारण गहू आणि तांदूळ सम प्रमाणात घेतले जातात.
ज्याप्रमाणे नवरीचा नूर चढण्यासाठी काही दिवस आधीपासून तयारी चालू असते तशीच एकीकडे वड्यांची तयारी चालू होते. साधारण १५-२० दिवस आधी तांदूळ व गहू आणून ठेवले जातात. हे तांदूळ व गहू निवडण्यासाठी एक खास दिवस ठरवून शेजार-पाजारच्या स्त्रियांना खास ह्या निवडण्याच्या कामासाठी आमंत्रण दिले जाते. बायका जमल्या की गहू तांदळाची पोती त्यांच्यापुढे ठेवली जातात. निवडता निवडता हळदी कुंकवाचा कार्यक्रमही चालतो. प्रत्येक सवाष्णीला हळद कुंकू, फुल दिले जाते. खाऊची डिश व चहा किंवा सरबत देऊन हा निवडण्याचा छोटासा समारंभ पार पाडला जातो.
लग्नाला ७-८ दिवस राहिले असताना वड्यांचे तांदूळ धुवण्याचा कार्यक्रम केला जातो. ह्या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणजे पाण्याची सोय, टोपल्या, रवळी , तांदूळ धुण्यासाठी मोठे गंज (मोठी टोपे), बालद्या एकत्र आणून ठेवल्या जातात.
सर्व प्रथम ज्या ठिकाणी तांदूळ धुणार म्हणजे नळ/विहीर वगैरे तिथे नारळ-कलश, पानाचा विडा, नारळ ठेवून घरातील मुख्य स्त्रिया त्याची पूजा करतात. हा विधी बुज्रुर्ग बायकांच्या मार्गदर्शनाखाली होतो.
ज्या टोपल्यांमधे आणि रवळीमधे धुतलेले तांदुळ ठेवायचे असतात त्या भोवती रांगोळी काढली जाते.
जिचे किंवा ज्याचे लग्न ठरले आहे त्याला किंवा तिला कुंकू लावून, थोडी वाटीत हळद ओली करून गालावर दोन बोटे लावली जातात. उरलेली हळद इतर जण एकमेकांच्या दंगामस्ती करत लावून एन्जॉय करतात. सगळ्या सवाष्णींना हळद-कुंकू, फुल आणि गोड खाऊ वाटला जातो. मोठ्या टोपात अगर बालदीत तांदूळ घेऊन २-२ किंवा ३-४ जणींचा ग्रुप करून टीम वर्कने तांदूळ धुण्याचे काम केले जाते.
तांदूळ धुऊन झाले की मोठ्या टोपल्यांमध्ये फडके टाकून ते निथळण्याकरिता ठेवतात.
पाणी ठिबकायचे बंद झाले की घरातील एका कोपर्यात रांगोळी काढून पाट मांडले जातात. मग मध्ये रवळी ठेवून बाजूला तांदूळ भरल्या टोपल्या ठेवल्या जातात. ह्या टोपल्यांना हळद कुंकू लावून त्यावर कापड झाकण देऊन त्यावर बोरीच्या झाडाच्या फांद्या शास्त्र म्हणून ठेवल्या जातात.
दुसर्या दिवशी हे तांदूळ उन्हात थोडे वाळवले जातात.
वाळलेले तांदूळ एका गोणीत भरून ठेवतात. गिरणमालकाची अपॉइंटमेंट आधीच घेतली जाते. धुतलेले तांदूळ व गहू घेऊन ३-४ बायका व घरातील १-२ पुरुष मंडळी गिरणीकडे रवाना होतात. गिरणवाल्यांनी वड्याच्या पिठात भेसळ होऊ नये म्हणून गिरण साफ केलेली असते. मंगलकार्याचे पीठ दळायचे म्हणून दळण घेऊन आलेल्या सवाष्णी गिरणीची पुजा करतात.
त्यानंतर गिरणीत गहू व तांदूळ घालून त्याचे रवाळ पीठ दळले जाते. घरी आल्यावर ह्या गोणी व्यवस्थित एका ठिकाणी ठेवल्या जातात. मध्येच पीठ चाळवण्याचे काम करून पीठ व्यवस्थित पुन्हा पोत्यात भरून ठेवले जाते.
लग्नाच्या दोन दिवस आधी वा आदल्या दिवशी वडे करण्याचा बेत ठरलेला असतो. ज्या दिवशी वडे करायचे त्याच्या आदल्या दिवशी गावात जाऊन "उद्या सकाळी पीठ मळायला आणि संध्याकाळी वडे काढायला या" असे आमंत्रण लग्नघरातील एखाद्या व्यक्तीमार्फत गावभर फिरते. सूर्यनारायणांचे आगमन होण्यापूर्वीच वडे-निष्णात सुगरण हजर असते. तिच्या मार्गदर्शनाखाली पीठ मळले जाते. स्त्रिया लाइनमध्ये आपल्या समोर पराती वा ताटे व पीठ मळण्यासाठी पाणी घेऊन आपल्या लगबगीच्या गप्पागोष्टी करत असतात.
आग्री जमातीच्या लग्नामध्ये लग्नाच्या विधीच्या प्रसंगांना अनुसरून एक स्त्री गाणं म्हणते. ह्या गाणे म्हणणार्या स्त्रीला धवलारीण म्हणतात. तिलाही तितक्याच मानाने बोलावले जाते. धवलारीण प्रत्येक विधी, प्रसंगाला अनुसरून आगरी भाषेत गाणं म्हणते. गाण्यात नवरा/नवरीचे, त्याच्या घरातल्या सगळ्या कुटुंबातील माणसांची नावे विधीसाठी जमलेल्या स्त्रियांची समाविष्ट केली जातात.
पीठ मळायच्या वेळीही धवलारीण गाणी म्हणण्यास सज्ज असते. पीठ मळण्यासाठी गरम पाण्याचा मोठा गज चुलीवर चढविला जातो.
ह्या पाण्यात किंवा पिठात धणेपुड, जिरेपुड, पापड खार, मीठ इ. टाकण्याचे काम मुख्य वडेमाहीतगार महिलेच्या हस्तेच केले जाते.
हे पाणी सुक्या पिठात थोडे थोडे टाकत लाटणीच्या साहाय्याने प्रार्थमीक स्वरूपातील पीठ कालवले जाते. हे थोडे घट्टच ठेवतात. मग हे पीठ परातीत घेऊन ते जमलेल्या स्त्रियांच्या परातीत थोडे थोडे मळण्यासाठी दिले जाते.
पीठ मळून झाले की एक स्त्री हे मळलेले पीठ मोठ्या टाकीमध्ये जोरदार आपटून जमा करते. असे आपटल्याने पीठ अजून सैल होते. टाकी भरली की वर जळता कोळसा टाकून त्यावर थोडे तेल ओतून टाकीचे झाकण लावले जाते. जमलेल्या स्त्रियांना हळदकुंकू चहा-नाश्ता दिला जातो. व वडे तळण्यासाठी ४-५ तासानंतरची वेळ दिली जाते.
वडे तळण्यासाठी गावातील काही घरांमध्ये मोठे तवे/कढई असतात. त्या त्यांच्याकडून आणून ठेवलेल्या असतात.
वडे करण्यापूर्वी आपले वडे चांगले निर्विघ्न व्हावे, बिघडू नये अशी मनोकामना मनी बाळगून चुलीच्या पूजेची तयारी केली जाते.
रांगोळ्या काढून त्यावर ३-४ चुली मांडल्या जातात. चुलींची हळद-कुंकू, फुल वाहून पुजा केली जाते.
चुली पेटवून त्यावर मोठे तवे चढवून तेल तापविले जाते. पहिले पाच वडे नवरा मुलगा किंवा नवरी मुलीच्या हस्ते कढईत सोडले जातात. तोपर्यंत हळू हळू गावातील स्त्रिया जमा होतात व ४-५ चुलींभोवती वडे सोडायला व तळायला हौशेने सज्ज होतात. पीठ पुन्हा परातीत घेऊन थोडे पाण्याने सैल करून घेतले जाते. हाताला पाणी लावून पिठाचा गोळा हातात चपटा करून मध्ये भोक पाडून सटासट वडे तेलात सोडले जातात.
मोठ्या काठ्यांची टोके निमुळती करून त्या काठ्या वडे उलटण्यासाठी व काढण्यासाठी वापरतात.
वडे लालसर खरपूस झाले की टोपलीत काढले जातात.
हे तळत असताना खरपूस खमंग वास परिसरात दरवळत असतो. वडे ठेवण्यासाठी एक वेगळी खोली आधीच तयार ठेवलेली असते. त्यात कापड अंथरून त्यावर तळलेले वडे थंड करण्यासाठी पसरवले जातात.
वडे करण्यासाठी आलेल्या सर्व स्त्रियांना, गावातल्या प्रत्येक घरात वड्यांची भेट दिली जाते. आल्या-गेल्या पाहुण्यांना ह्या वड्यांचा आस्वाद दिला जातो. दुपारच्या वेळेत चहा बरोबर तर संध्याकाळी मटण, जवळा, चवळी/वाटाण्याच्या भाजी बरोबर वडे पानात वाढले जातात.
आगरी जमातीत देवांच्या मानासाठी हे वडे व तांदळाच्या फेण्या नैवेद्यात ठेवल्या जातात. मंडपातील तसेच लग्न ठिकाणातील दारकशीलाही फेण्या व वड्यांचे तोरण बांधले जाते.
तर असे हे सगळ्या गावकर्यांना आपल्या आनंदात सामावून, विविध विधी करून तयार झालेले रुचकर भोकाचे वडे लग्नघरातील मेजवानीत रंगत आणतात.
हे लेखन ऑगस्ट २०१६ च्या माहेर अन्नपूर्णा ह्या अंकात प्रकाशीत झालेले आहे.
हे सगळं कित्ती नविन आहे
हे सगळं कित्ती नविन आहे माझ्यासाठी...
मस्त लिहिलयेस जागूतै
कित्ती सुंदर लिहिलंय जागू.
कित्ती सुंदर लिहिलंय जागू. मस्त वाटलं वाचुन.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
पण फोटो मात्र एकही दिसला नाहीये मला.
खुप छान आणि माहितीपर लेख
खुप छान आणि माहितीपर लेख असतात तुमचे.
वाह खुप सुदंर ओळख वडे
वाह खुप सुदंर ओळख वडे परंपरेची , छान माहिती आणि फोटो.
जागु.. कित्ती सुंदर वर्णन.
जागु.. कित्ती सुंदर वर्णन..अगदी नवीन आहे ही माहिती. मस्तं वाटलं वाचताना.. फोटो ही फारच बोलके आहेत..वाह!!!
सर्व वड्यांचा एकसारखा सोनेरी रंग पाहून यामागच्या कुशल हातांना ___/\___
खुप मस्त लिहिलय्स....नवीनच
खुप मस्त लिहिलय्स....नवीनच माहिती जागुताई....तुझ्या लेखांमधुन नेहेमीच काही ना काही नवीन वाचायला मिळतं.
वॉव , मस्त माहिती
वॉव , मस्त माहिती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह किती सुन्दर लिहिलेय.
वाह किती सुन्दर लिहिलेय. नवीनच माहीती कळली.
मस्त माहिती आणि वडे लाळगाळू
मस्त माहिती आणि वडे लाळगाळू दिसत आहेत अगदी!
रिया, सस्मिता, श्री, पिंकी,
रिया, सस्मिता, श्री, पिंकी, वर्षूदी, स्मिता, स्वस्ती, पद्मावती, मॅगी धन्यवाद.
मलाही आज बर्याच दिवसांनी इथे लेख टाकून तुमचे इतके सुंदर प्रतिसाद मिळाल्याने समाधान झाले आहे.
एडीट होत नाही का? काही फोटो डबल आलेत ते काढायचे आहेत. एडीट ऑप्शनमधे फोट आणि लेख दोन्ही दिसत नाही. बाकीचे ऑप्शन दिसतायत.
जागू, काय सुंदर लिहीलंयस ग !
जागू, काय सुंदर लिहीलंयस ग ! नवीन माहिती. निगुतीने करण्याचा व खाऊ घालण्याचा अध्यात्मिक आटापिटा करणार्या ह्या सुगरणींना _/\_
फोटो खूप छान आलेत. त्यामुळे
फोटो खूप छान आलेत. त्यामुळे सगळी कृती छान समजली. आपल्याकडे संस्कृती मध्ये किती वैविध्य आहे, माहीतही नसते.
वा...मस्तच लिहिलंय...
वा...मस्तच लिहिलंय... प्रथेबद्दल पण आणि वड्यांबद्दल पण..
मस्त माहिती ! फार आवडली ही
मस्त माहिती ! फार आवडली ही पद्धत. वडे सुद्धा फार आकर्षक दिसताहेत. एकुणच फार मोठ्या प्रमाणावर असूनही अतिशय स्वच्छ आणि शोभिवंत केलेली आहे प्रत्येक गोष्ट.
आधी वाचलेला तेव्हाही खूप
आधी वाचलेला तेव्हाही खूप आवडला होता हा लेख ! फोटोही नेहमीप्रमाणे छान! त्या टोपल्या-रोवळ्या आणि वाळत घातलेले तांदूळ बघून एकदम जुने दिवस आठवले. .
जागू, अशा वेगवेगळ्या कार्याच्या निमित्ताने काय गाणी म्हणतात त्याबद्द्लही एक लेख लिही ना!
किती सुरेख, निगुतीनं,
किती सुरेख, निगुतीनं, पायरीपायरीनं फोटो दाखवत सांगितलं आहेस जागू!
हे असे सगळ्या क्रियांना महत्त्व देण्याचे रिवाज आणि सगळ्यांना सोबत घेऊन कार्य सिद्धिस नेण्याची परंपरा बघून प्रसन्न वाटलं.
खुप मस्त लिहीलय..
खुप मस्त लिहीलय..
फार सुंदर,
फार सुंदर,
प्रत्येक स्टेप किती निगुतीनं केली जाते, लिहिलय पण खासच
मंजूताई, सारेग, नटूकाकी, रावी
मंजूताई, सारेग, नटूकाकी, रावी, स्वाती, सई, सायली धन्यवाद.
हो मलाही त्या गाण्यांचे संकलन करायचे आहे. मी त्याला सुरुवात करेन. पूर्वी हौसेने गाणारी धवलारीण मिळायची. आता पैसे देऊन बोलवावी लागते.
मस्त लिहिलंय. पहिल्यांदाच
मस्त लिहिलंय. पहिल्यांदाच समजली ही माहिती! इन्टरेस्टिंग आहे.
एकही फोटो सफारीतून दिसत
एकही फोटो सफारीतून दिसत नाहीये म्हणून क्रोममधून लॉग ईन केलं. पण तरीही नाहीच.
लेख आवडला.
अरे व्वा... झकास
अरे व्वा... झकास "डॉक्युमेन्टेशन " जमलय... फोटोसहित... !
खुपच छान लिखाण ! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो दिसत नाहीयेत...
फोटो दिसत नाहीयेत...
फोटो क्रोमातून दिसतील.
फोटो क्रोमातून दिसतील. पुन्हा एकदा प्रयत्न करा.
मैत्रेयी, सायो, लिंबुदा, नानाकळा, अर्पणा धन्यवाद.
मस्त लिहलय. फोटोही छान आहेत .
मस्त लिहलय. फोटोही छान आहेत .
काय छान लिहीलेस जागू..
काय छान लिहीलेस जागू.. फोटोंसहित म्हणून अजुन मजा आली. धन्यवाद इथे लिहील्याबद्द्ल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा! मस्त लेख आणि झक्कास फोटो.
वा! मस्त लेख आणि झक्कास फोटो.
सुरेख लेख, सुपर्ब फोटो , मस्त
सुरेख लेख, सुपर्ब फोटो , मस्त रुचकर दिसतायत वडे, प्रत्येक गोष्ट खुप मन लावुन केलेली आहे, आणी एव्ढा मोठा घाट असुन कुठे पसारा दिसत नाही, सगळ साधच पण सुबक, सुरेख, निटनेटक आहे,
छान फोटो व माहिती. अगदी
छान फोटो व माहिती. अगदी प्रत्येक कृतीचे फोटो छानच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टोपल्या, रोवळी, पाहून बालपणात पोहोचले.
फोटो क्रोमातून दिसतील. हे लेखात वरतीच लिही ना.
)
म्हणजे आधीच आम्ही क्रोमात जाऊ . (सवयीचा परिणाम
नवीन माहीती कळली. मस्त जमला
नवीन माहीती कळली. मस्त जमला आहे लेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages