मी दिनेश विश्वनाथ शिंदे....
मी ऑगस्ट २००१ पासून मायबोलीचा सभासद आहे ( माझ्या प्रोफाईल मधली तारीख चुकलेली आहे, कारण
जून्या मायबोलीवरून डेटा घेण्यात काहीतरी गल्लत झाली असावी. )
मी माझ्या पाककृती या संकेतस्थळावरुन का मागे घेतोय, त्यामागची माझी भुमिका.
ही कैफियत नाही, आरोपपत्रही नाही. आहे ती निव्वळ माझी भुमिका.
१) पहिल्याप्रथम, भारतीय नागरिकांबद्दल अभिमान असणे वगैरे..
तामाम भारतींयाबद्दल केलेले एक खोडसाळ विधान हे कदाचित निमित्त झाले असेल, पण ज्या बाबींबद्दल मी
संवेदनशील आहे, त्यापैकि हि एक. पुर्वीदेखील असे प्रकरण झाले आहे.
त्यावेळी सगुणा या आय डी ने, मुलगा होण्यासाठी काय उपाय करावेत, असा बीबी उघडला होता. त्यावर इथल्या
काही जेष्ठ सभासदांनीही प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. कुणाला त्यात काही आक्षेपार्ह वाटले नव्हते.
त्यावेळी " बेटी बचाओ आंदोलन" वगैरे सुरु झालेही नव्हते पण गर्भनिदान चाचणीवर भारतात बंदी आली होती.
( भारताबाहेर अनेक देशांत नव्हती ) तरीही भारतीय भाषेत असलेल्या एका संकेतस्थळावर अशी चर्चा व्हावी,
हे मला अजिबात पटले नव्हते. त्यावर इथल्याच एका सभासदाने, फारसे सिरियसली घेऊ नकोस, ओल्ड वाईव्ज
टेल्स एवढेच याचे महत्व आहे. असे मला सांगितले होते. तरीही मी आग्रही राहिलो, आणि तो बीबी नंतर बंद करण्यात आला.
त्यामूळे एखाद्या तत्वासाठी माझा आग्रह आजचा नाही.
२) मेघना पेठे यांचे पुस्तक, नतिचरामी
या पुस्तकांची अत्यंत व्यापक प्रमाणावर जाहीरात करण्यात आली होती. भारतीय साहित्याचा
इतिहास बदलवणार वगैरे दावे करण्यात आले होते. हे पुस्तक मी वाचले. त्यापुर्वी या लेखिकेच्या
काही कथाही वाचल्या होत्या.
एकंदर पुस्तक वाचल्यावर मला ते अजिबात आवडले नव्हते आणि त्यब्बद्ल मी इथे लिहिले. आता सर्व संदर्भ
आठवत नाहीत, पण दोन उदाहरणे आठवताहेत ती लिहितो.
पुस्तकात असे विधान आहे कि मुंबईतील फोर्ट मधे पारश्यांची जी विहिर आहे, त्यात पारसी लोक प्रेते टाकतात.
हे विधान अत्यंत खोडसाळ आहे. ती विहीर आणि त्या विहीरीतले पाणी हे पारसी लोकांसाठी अत्यंत पवित्र आहे.
फोर्ट मधल्या अनेक इमारतीत पुर्वी पाणीपुरवठा होत नसे ( तशी सोयच नव्हती ) अनेक पारसी केवळ त्याच विहिरीचे
पाणी पित असत. आणि मी त्या काळात फोर्ट विभागात अनेक वेळा जात असे म्हणुन हे मला माहीत होते.
मुंबई विद्यापिठाच्या कुंपणालगत पण अशी विहीर होती ( अजूनही असेल ) आणि तिथूनही प्यायचे पाणी
पुरवले जात असे. ( कारण वरचेच, अनेक इमारतीत पाणी पुरवठ्याची सोय नव्हती. ) आणि पारसी लोक,
त्यांचे मृतदेह, एका अत्यंत पवित्र भावनेने, टॉवर ऑफ सायलेंस मधे ठेवतात. त्यामूळे लेखिकेचे हे विधान अयोग्य होतेच.
त्याच पुस्तकात आणखी एक बेधडक विधान असे होते कि, फोर्ट मधे गुलाबाची फुले विकणारी मुले, ती फुले
थडग्यावरुन उचलून आणतात. हे पण एक खोडसाळ विधान होते. ( आजही के रुस्तम च्या बाहेर, ती मुले अत्यंत
निगुतीने फुले नीट करताना दिसतील )
आणि एकंदरच पुस्तकाबाबत बर्याच न पटणार्या गोष्टी होत्या, त्याबद्दलही मी तीव्र नापसंती व्यक्त केली. आणि
ती करताना, लेखिकेचाच " क्लायमॅक्स" हा शब्द वापरला. झालं, त्यावरून या सभासदांचा पापड मोडला.
म्हणजे त्यांच्या विरोधात मत नोंदवायचा इथे कुणाला अधिकारच नाही जणू. त्यापुर्वी प्रत्यक्ष भेटलेल्या आणि परीचित
असलेल्या एका कवियत्रीने पण माझ्याशी अबोला धरला होता. पण पुढे माझ्या चुलतभावाच्या अपघातानंतर
स्वतःहून सांत्वनाचा प्रतिसाद दिला. सध्या ती मायबोलीवर दिसत नाही. या संपूर्ण ग्रूप माझ्या विरोधात
जायचे कारण हे. त्यापुढे लेखिकेची काही पुस्तके प्रसिद्ध झाली का, किंवा काय इतिहास घडवला ते मला माहीत
नाही. पण इथे मात्र इतिहास घडला.
३) पित्त, गुरुवर्य डॉ. शरदीनी डहाणूकर आणि मी
डॉ. डहाणूकर माझ्या लेखनातील गुरु. त्यांच्याबद्दल चार शब्द लिहायला हवेत. २५ वर्षे अलोपथीची
प्रॅक्टीस करून त्या आयुर्वेदाकडे वळल्या होत्या. पण त्यांना इतर अनेक विषयात रस होता आणि
त्या विषयांवर, खास करुन झाडांवर त्या महाराष्ट्र टाईम्स मधे लेख लिहित होत्या. त्यासोबत आमच्या
कॉलनीत राहणारी मृदुला नाडगौडा हिने काढलेले सुंदर फोटोही असत. त्यांचा मी चाहता होतो आणि आहेही.
१९९६ - १९९८ या काळात मी नायजेरियात होता. तिथेही मी त्यांचे लेख वाचतच असे ( तेव्हा इंटरनेट नव्हते,
मी वर्तमानपत्रे कुरियर ने मागवायचो ) तिथे असताना मला यलांग यलांग ( हे नाव तेव्हा माहीत नव्हते )
या झाडाची ओळख झाली. त्यांच्या कुठल्या लेखात या झाडाचा उल्लेख नव्हता ( हे झाड भारतात मी
त्यापुर्वी बघितले नव्हते. ) म्हणून कौतूकाने मी त्यांना त्या झाडाचा फोटो आणि एक पत्र पाठवले. पत्रात
अर्थात त्यांच्याच काही लेखांचा उल्लेख होता. त्या उत्तर देतील, अशी अपेक्षाही नव्हती, पण त्यांनी तत्परतेने
उत्तर पाठवले, माझ्या चार ओळींचे खुप कौतूक केले आणि चक्क भेटायला बोलावले.
पुढच्या भारतभेटीत मी त्यांना भेटलो. तो पर्यंत त्यांनी झाडांवरचे लेखन थांबवले होते आणि पाककलेवरच्या
लेखनाकडे वळल्या होत्या. मी तिच तक्रार केली तर त्या म्हणाल्या, कि आता तू लिहायला सुरवात कर.
मी माझा एक लेख, लोकसत्ता कडे पाठवला, पण तो प्रसिद्ध होईपर्यंत त्यांचे निधन झाले होते.
झाडांबद्दल, पुढे प्रा. महाजन, प्रा. घाणेकर वगैरेनेंही विपुल लेखन केलेय, पण तरीही डॉ. डहाणुकरांची
मिश्किल शैली, एकमेव अशीच आहे. त्यांचे बोलणेही असेच मिश्किल होते. सहज बोलता बोलता त्यांनी
मला विचारले कि तू पित्त प्रकृतीचा का ? मला तेव्हा ते नीट कळले नाही, पण तरीही त्यांनी माझ्याबद्दल
त्यांचे काही आडाखे सांगितले ( उदा. मला उपवास सोसत नाहीत वगैरे ) आणि ते खरे होते.
पुढे एका लेखाच्या निमित्ताने मी ते आडाखे इथे लिहिले. ते सत्य असल्याने, पित्त प्रकृतीची माणसे ते
सहज स्वीकारणार नव्हतीच. झालं, त्यावरून पण इथे वादळ. एका विदुषीने तर थेट असा आरोप केला,
कि माझा कुणाबद्दल तरी आकस असणार म्हणून मी असे लिहिले. ( आणि त्यांची प्रकृती कुठली, हे मला
माहीत असायचे काही कारणच नव्हते. ) काय काय लिहिले गेले इथे माझ्याबद्दल.
पुढे, डॉ डहाणूकरांच्या " स्वास्थ्यवृत्त " या पुस्तकातील पानांचे स्कॅन इथे दिले. मी केलेली बहुतेक विधाने
त्या पुस्तकातीलच होती. त्या लेखाला मी, " हा सूर्य आणि हा जयद्रथ" असे नाव दिले होते. एवढा सबळ
पुरावा, या लोकांच्या पचनी पडणे शक्यच नव्हते. पुढे मग गंमतच झाली, तो लेखच इथून गायब करण्यात
आला. त्यानंतर तो गूगलवर दिसत होता, पण इथे दिसत नव्हता. हे त्यांचे कर्म, त्यांनाच जाचत राहिले.
मग त्यांच्याच एका गटग च्या चर्चेत, गटग ला जयद्रथ येणार आहे का ? अशी चर्चा झाली होती. आहे कि नाही मज्जा ?
४) वर्षा विहार आणि मी
मायबोलीचे वर्षा विहार सुरु होण्यापुर्वी मी स्वतः एक वर्षा विहार आयोजित केला होता. क्षिप्रा, सोनचाफा,
बॉम्बे व्हायकिंग वगैरे काही मोजके मायबोलीकर त्याला हजर होते. त्यानंतर सिंहगडावर एक सहल गेली होती,
त्यातही मी सहभागी होतो, तो जरी पहिला वर्षाविहार मानण्यात आला असला तरी त्याला मायबोलीचे नाव नव्हते,
ती प्रथा नंतर सुरु झाली.
तोपर्यंत मायबोलीवर अत्यंत मोकळे वातावरण होते आणि त्याला अनुसरून मी माझ्या एका नव्या मैत्रीची कबूली
दिली होती. ती पुढे मायबोलीवर आली, पण आमच्या मैत्रीबद्दल इथे एवढ्या घॄणास्पद चर्चा झाल्या, कि तिने
मायबोली सोडली, ती कायमची. ती आजही माझी अत्यंत जिवलग मैत्रिण आहे.
त्यानंतर मायबोली वर्षाविहार सुरु झाले. त्यावेळी आयोजकांची चर्चा इथे न होता, याहू ग्रूप वर(सुद्धा) व्हायची. तर
इथल्या साळसूद चर्चेत मी भागही घेत असे. पण तिथे माझ्याशी गोड गोड बोलणारे सदस्य माझ्या माघारी
माझ्या पुरुषार्थाची चवीने चर्चा करत होते. म्हणजे सगुणा फार्म मधल्या म्हशीवर दिनेश बसला म्हणायचा कि
बसलं म्हणायचं अशी. आहे कि नाही मज्जा ? म्हणजे ज्या गोष्टीची चिंता माझ्या बायकोने करायची, त्या ह्या सर्व
जणी करत होत्या. ही सर्व चर्चा मला, तिथल्याच एका सदस्याने पाठवली होती. मी प्रतिक्रिया दिली नाही,
पण त्यानंतर कुठल्याही व वि ला हजेरी लावली नाही.
या पातळीवरची चर्चा करण्यासाठी त्यांना एक क्लोज्ड ग्रुप हवा असतो. आणि तो इथे उपलब्ध करुन दिला
जातो. आनंद आहे.
५) मैत्री आणि यांची मते
स्त्री पुरुष मैत्रीबद्दल विद्वत्तापुर्ण आव आणून चर्चा करणार्या इथल्या सभासदांची मानसिकता सांगणारा, एक किस्सा.
मायबोलीवरच्या एका उपक्रमाच्या निमित्ताने, एक जूनी सभासद परत इथे आली. तिचे स्वागत करताना मी
"जूनी मैत्रिण" असे शब्द वापरले. हे शब्द माझ्या वैयक्तीक आयुष्यात तर अनेक स्त्रिया आणि मुलींबद्दल
वापरेन.
तर या दोन शब्दांवरुन, इथल्या सभासदांनी तिला जीव नकोसा केला. तिची मानसिक अवस्था काय केली असेल
याची मला तर कल्पना आहेच पण आणखी एका सभासदाला आहे.
पुढे याच सभासदाने, या ग्रुपचे वकीलपत्र घेतले. हि बाब तर आणखी नवलाची.
६) मी आणि माझ्या कथा
मायबोलीवर मी सुरवातीला अनेक कथा लिहीत असे. त्या काळात त्या खुप लोकप्रिय पण झाल्या
होत्या. गिरीराज सारखे माझे मित्र तर मला केवळ माझ्या कथांमुळे लाभले होते. तो आजही
माझा मित्र आहे पण मी आता कथा लिहित नसल्याने, तो मायबोलीवर फिरकत नाही.
मी आजही इथल्या कथा ( क्रमशः नसतील तर ) वाचतो. काही अपवाद वगळले तर मला त्या एका
ठराविक वर्तुळात फिरताहेत असे वाटते. एका कथेत तर हुंडा वगैरे पण उल्लेख होता. शक्यतो,
नकारात्मक प्रतिसाद द्यायचा नाही, हा माझा विचार असल्याने, मी तिथे काहीच लिहिले नव्हते.
चौदा वर्षांपेक्षा जास्त वर्षे मी आफ्रिकेत घालवली. इथले माझे सहकारी माझे जिवलग मित्र आहेत.
एकदा आपला मानल्यावर ते माझ्यावर खुप विश्वास ठेवतात आणि आपले प्रश्न आणि अनुभव
अत्यंत मोकळेपणानी माझ्याशी शेअर करतात. ठराविक भारतीय संकल्पनाना छेद देणारे
आयुष्य हे लोक जगतात. यांच्या आयूष्यावर कथा लिहिण्याचा प्रयत्न मी केला होता. त्यावर इथल्या
एका विदुषीने इतका थयथयाट केला, कि विचारता सोय नाही. माझ्यावर चक्क सेक्स्यूअल हरासमेंट
वगैरेचा आरोप. अरे प्रत्यक्ष ती मुलगी विश्वासाने मला सांगते ( अर्थात हे विषय आफ्रिकेत मोकळेपणी
चर्चिले जातात. ) या विषयावर आफ्रिकन देशात नाटकेही सादर होत असतात.
पण इथले वातावरण बघता ( ज्या प्रयोगात जेन फोंडा आणि व्हुपी गोल्डबर्ग सारख्या अभिनेत्री
सहभागी होतात ) त्या नाटकांच्या नावाचाही उल्लेख इथे करावासा वाटत नाही. त्या कथेवर
माझ्यातर्फे एका दुसर्याच सभासदांने या विदुषींना उत्तरे दिली होती, पण मी मात्र ना त्या बीबी कडे
परतलो ना कधी परत कथा लिहिली. इथले वातावरण प्रगल्भ व्हायला, माझी हयात पुरणार नाही
एवढे नक्की.. ( रच्याकने, एका चित्रपटासंदर्भात मी प्रगल्भ हा शब्द वापरला, तर तो देखील यांच्यासाठी
विनोदी ठरला. )
७) माझे ललित लेख.
पुर्वी मी भरपूर ललित लेखन करत असे. तेव्हा फोटो वगैरे द्यायची सोय नव्हती. आता मी ते देखील
बरेच कमी केले आहे, कारण तेच.
एक उदाहरण सांगतो. माझ्या नायजेरियातील वास्तव्याबद्दल मी लिहिले होते, त्या १० वर्षांपुर्वी लिहिलेल्या
लेखाचा फोकस होता, माझे मित्र. त्यानंतर अलिकडे मी माझ्या वेगवेगळ्या देशांतील घरांवर एक मालिका
लिहिली.
आता मूळ घटना अशी. माझ्या फ्रेंच मित्राने त्याच्या आफ्रिकन मैत्रीणीसाठी मला भारतातून साडी आणायला
सांगितली. ती मी नेली. तिथे नेल्यावर त्याने मला सांगितले कि तूच तिला नेसव, ते मला अवघड वाटल्याने
मी स्वतः साडी नेसून दाखवली. आता त्यात वावगे ते काय ?
आणि झाले एवढेच कि माझ्या दुसर्या लेखात, मी स्वतः साडी नेसल्याचा उल्लेख केला नाही. त्यात लाजण्या
सारखे काही नव्हते आणि मुद्दाम मिरवण्यासारखेही काही नव्हते. लेखाच्या अनुषंगाने जे रेलेव्हंट वाटले,
तेवढा उल्लेख मी केला. झालं, विदुषी खवळल्या. चक्क दहा वर्षापुर्वीच्या एका लेखाची लिंक घेऊन
हजर झाल्या ( आता त्यापुर्वी तिथे किती चविष्ठ चर्चा केली असेल, त्याची कल्पना करा. ) अरे बाबा, नाही
ना पटत आपलं. मग दूर रहा कि. मी काही कुठे रिक्षा घेऊन जात नाही, माझे लेख वाचा म्हणुन. कि प्रतिसाद
द्या अशी याचनाही करायला जात नाही.
बरं, आता या विदुषीबाईंची आणखी एक मजा. एका विषयाच्या लेखात मी माझी बाजू मांडताना एक
अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातल्या एका उतार्याचा संदर्भ दिला, तर तोच या बाईंना आठवेना.
मग मी त्या पुस्तकाचा स्कॅन दिला.. असो नंतर काय झाले, ते बघायला मी आलो नाही. तात्पर्य काय कि,
कधीकाळी मी लिहिलेल्या लेखातला संदर्भ यांना आठवतो. पण अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातला नाही.
असो, मी नंतर ललित लेखनही थांबवले.
८) युक्ती सुचवा आणि युक्ती सांगा
या बीबीवर स्वयंपाक करताना काही अडचणी आल्या तर त्यावर सल्ले दिले जातात. गेली
अनेक वर्षे मी पाककलेत प्रयोग करत असल्याने भरपूर अनुभव माझ्या गाठीशी आहे. आणि
त्यानुसार मी सल्ले देत असे.
तर त्यावरुन यांच्या ग्रुपवर माझा उल्लेख "वहिनोदा" असा करण्यात आला, आणि तो
उल्लेख त्यांच्याच पैकी एकीने मला सांगितला. मी उद्वैगाने तक्रार केली, पण त्याबद्दल
काहिही करण्यात आले नाही.
त्या उल्लेखात सहभागी असणार्या एका सभासदाने मात्र, मुद्दाम फोन करुन, दा, लहान
समजून मला माफ करा, असे सांगितले. पुढे आमच्यात काही कटूता राहिली नाही. पण
आता तिच सभासद इथे काही लिहित नाही. कारणांचा उल्लेखही तिला करावासा
वाटत नाही.
त्यानंतर मी फारश्या युक्त्या सांगायला तिथे गेलो नाही. धाकटी बहिण असणार्या एका
सभासदाने काही विचारले, तर सांगितले असेन, तेवढेच.
"भाकरीचे पिठ भिजवून फ्रीजमधे ठेवा आणि भाकरी करण्याआधी मळून घ्या" असे सल्ले
तिथे दिले गेले. तेवढे पाककौशल्य माझ्याकडे नाही. सो, माझा पास !!
९) रविवार सकाळ आणि ते
माझ्याबद्दलच्या विकृत पातळीवरच्या चर्चा मायबोलीवरच्या सो कॉल्ड क्लोज्ड ग्रुप पुरत्याच
मर्यादीत राहिल्या नाहीत. रविवार सकाळ मधल्या एका लेखावर, दिनेशदा असे नाव घेऊन,
माझे आणि माझ्या आफ्रिकन हाऊसमेड चे सबंध आहेत, असे सुचवणारा एक प्रतिसाद दिला
गेला. मी काही तो पेपर वाचत नाही, पण माझ्याच एका चाहत्याने, त्या बातमीची लिंक
मला पाठवली होती.
मीसुद्धा पाठपुरावा करण्याचे ठरवले. सायबर सेल कडे तक्रार केली. त्या बातमीची लिंक
आणि मी लिहिलेल्या इ मेल ची कॉपी मी इथे दिली होती. ती व्यक्ती कोण असेल, याचा
साधारण अंदाज होताच आणि त्यावर नंतर शिक्कामोर्तबही झाले. त्या व्यक्तीबद्दल कुठलिही
कार्यवाही करण्याची मला इच्छा नव्हती म्हणून मी ती तक्रार मागे घेतली.
तर यावरुन इथल्या एक विदुषी ( अरे यार, सगळ्याच विदुषी आहेत, आणि त्यांना क्रमांक
देण्यातही अर्थ नाही ) माझ्यावर खार खाऊन आहेत, का तर ती व्यक्ती कोण, हे मी उघड
केले नाही. याच विदुषी मी कधी काळी इथे केलेल्या माझ्या गौरवर्णाच्या उल्लेखावर नाराज
आहेत. आता तो कधी आणि कुठल्या संदर्भात केला होता, ते आठवतही नाही.
( पण चुकीचा नाहीच... आणि त्या बाई हा वारसा अगदी निष्ठेने पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतात.
विडंबनातील गोरेपणाचा संदर्भ आहे तो हा. फारेण्ड यांनी लिहिले आहे, कि असे संदर्भ नवीन
लोकांना माहीत नसतात. पण माझ्या बाबतीत मात्र सर्व संदर्भ असे पुढच्या पिढीपर्यंत
पोहोचवले जातात. )
त्यानंतर मी इथले दिनेशदा हे नाव टाकले ( हे नावाचे बारसे पण इथल्याच एका विदुषीबाईनी
केले होते. )
१०) मी इतरांवर केलेली टिका
एका सभासदाने, मी पण इतरांवर टिका करतो आणि ती त्यांनी वाचली आहे, असे लिहिले आहे.
मी ती सार्वजनिक ठिकाणी केली होती, आणि अर्थातच फार पातळी सोडून केली नव्हती.
आणि ती सातत्याने तर नक्कीच नाही.
त्यापैकी एक ऋन्मेष. त्याच्यावर विनोद केले होते. ते त्यानेही मनावर घेतले नाहीत.
दुसरे : प्रा. देवपूरकर. ते गृहस्थ एकाकी आणि आजारी असतात, असे मला कळले होते. त्यांची
विचारपूस देखील मी केली होती. त्यांच्या एका गझलेवर टिका केली होती, तर त्यांनी मला
गझलेतलं काय कळतं, असे विचारले होते ? नंतर मी कधीच त्यांच्या गझलेवर प्रतिसाद दिला
नाही. पण त्यांचे भरमसाठ लेखन सुरुच होते. नंतरही मी इतरत्र टिका केली होती, त्यावर
इथल्या एका विदुषींनी मला ओसीडी झाला आहे, असे थेट विधान केले होते ( थेट विधान, लक्षात
घ्या. ) त्याचा पुरावा देऊन मी तक्रार केली होती.. पण त्यांच्यावर देखील काहिही कार्यवाही झाली
नाही.
आणि राहिला बी ! अगदी पहिल्या वहिल्या दिवसांपासून तो माझा मित्र होता. आताच नाही तर
पुर्वीदेखील तो अनेक नावाने खोडसाळ लिहित असे. मी त्याला आव्हान केले होते आणि त्याने
स्वतःहून त्याची कबूली दिली होती. मला प्रत्यक्ष फोन करून त्याने माफी मागितली होती.
त्याच दिवसात डॉ. डहाणुकरांचे पत्र इथे अपलोड करायलाही त्यानेच मदत केली होती.
वैयक्तीक आयूष्यातले प्रॉब्लेम्स आणि एकटेपणा यांनी तो गांजला होता. त्याच्या इथल्या शेवटच्या
दिवसातही मी त्याच्या बाजूने ठाम राहिलो. आजही आम्ही फेसबूक वर मित्र आहोत. मायबोली
सोडून तो सुखी आहे. अत्यंत सुंदर असे फोटो, तिथे पोस्ट करत असतो तो.
आपल्याच घरातलं एखादं माणूस जर कुठल्या समस्येने ग्रासलेले असल, तर आपण
त्याला आणखी त्रास देतो का ? तो आणि मी ज्या काळात इथे सभासद झालो होतो,
तो काळ असाच जिव्हाळ्याचा होता. त्याला होणारा त्रास त्याच्याच शब्दात सांगायचे
तर बलात्काराइतकाच क्लेशदायी होता. त्याने जरूर इतरांचा अपमान केला असेल,
पण आपण मन मोठे केले नाही, हे देखील आहेच.
गेलेल्या लोकांबद्दल वाईट लिहायचे नाही, असा एक संकेत आहे. पण सत्य लिहायला हरकत
नसावी.
नताशा यांची आणि माझी ओळख असायचे काही कारणच नाही. माझ्या लेखनात काही
शुद्धलेखनाच्या चुका होत असतात. त्याबद्दल त्यांनी एकदा नापसंती व्यक्त केली होती
आणि मी त्यांची माफी मागितली होती.
त्याच्या रहमानीया या लेखावर प्रतिक्रिया देताना, मी त्याचे संगीत मला आवडत नाही,
असे लिहिले होते. मी लिहिलेल्या मुद्द्यांपैकी १ मुद्दा लता मंगेशकर यांचे मत होते.
माझ्या धोरणाप्रमाणे मी नंतर कधीच त्याच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिली नाही.
पण नंतर माझ्या एका लेखात, एक संदर्भ मला सापडला नव्हता तो त्यांनी शोधून दिला होता
आणि दुसर्या एक लेखात, चित्रपट संगीतातील प्रादेशिकता, यावर आमचे मतभेद झाले होते.
ते सुद्धा थेट नव्हेच, दोन्ही वेळेस त्यांनी स्वतःहून प्रतिक्रिया दिली होती.
त्यानंतर त्या माझा उल्लेख, जुनी खोडं असा करु लागल्या होत्या. मुद्दाम सविस्तर लिहिले
कारण, या एवढ्याश्या मतभेदाला नंतर कुठे खतपाणी घातले गेले, त्याची कल्पना येईलच.
आणि आता राहिल्या त्या माझ्या पाककृती.
आधी लिहिल्याप्रमाणे पाककृती लिहिणे हि माझ्यासाठी पॅशन होती. ( आहे आणि राहीलच )
पण त्याही कुणाच्या कुचेष्टेचा विषय का व्हाव्यात ? विडंबन हा साहित्यप्रकार मलाही आवडतो,
पण त्यातही एक आब राखलेला असतो. दृष्टीआड सृष्टी असे म्हणत मी कधी लक्ष दिले नाही,
पण जे समोर आले ते अत्यंत क्लेशकारक होते, शिवाय हे इथे सातत्याने होत होते ( आणि
ते होऊ दिले जात होते ) ते तर त्याहूनही क्लेशकारक आहे.
आणि याबाबतीतही काही लिहून मोकळे झालेच पाहिजे. मी रुढ अर्थाने भाविक नाही. पण
संतसाहित्य माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केनयातील वास्तव्यात मला तिथे अनेक भाज्या
सहजी उपलब्ध व्हायच्या. त्यातल्या अनेक भाज्या, भारतात ( निदान त्या काळात तरी ) सहज
मिळत नव्हत्या.
म्हणुन त्या भाज्यांची ओळख व्हावी म्हणुन मी अवघी विठाई माझी, हि मालिका सुरु केली.
प्रत्येक भाजी स्वतः शिजवून, तिची माहिती आणि फोटो असे त्या मालिकेचे स्वरुप होते.
तर विठाई हा शब्द सुद्धा कुचेष्टेचा विषय व्हावा ? आपला अपमान आपण सहनही करतो, पण
आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान, सहन करु ? डॉ. डहाणुकरांचाही असाच उपमर्द इथल्या
विदुषींनी केला होता.
याच मालिकेत, मी लीक या भाजीबद्दल लिहिले होते. स्पेलिंगवरुन देवनागरीत लिहायचे
झाले तर त्या भाजीचे नाव असेच लिहावे लागणार. आता मी ते नाव असेच का लिहिले असा
एक निरोप घेऊन एक विद्वान आले होते.. निरोप अश्यासाठी लिहितोय कारण, काल आमची
तिथे चर्चा झाली.. वगैरे सुरवात होती. या शब्दावरून त्यांना नेमके काय आठवले ते त्यांनाच
माहीत.
पाककृती मला काही अधिकार आहे असे मी अजिबात मानत नाही. उलट या क्षेत्रात लाजो माझी
गुरु आहे, असे मी जाहीररित्या मान्य केले होते. इथेही ज्या ज्या सूचना चांगल्या मनाने केल्या
जातात त्यांचे मी स्वागत करतोच आणि गरज वाटल्यास मी बदलही करतो. त्यात लाजिरवाणे ते
काय ? पण अर्धवट ज्ञानावर जर काही प्रतिक्रिया आल्या, आणि त्या सुद्धा काही विशिष्ठ आयडी कडून
तर मी काय म्हणून सहन कराव्यात ? वाटीभर काजू घेऊन त्यात १ टेबलस्पून तांदूळ घालून केलेल्या
पदार्थाला, खांडवी म्हणालेले मी सहन करायचे ?
आता मला मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भ देणात येणार हे नक्की, मी जी प्रतिक्रिया दिली होती
त्यात एक म्हण वापरली होती पण त्यातलाही मला ग्राम्य वाटलेला शब्द वगळला होता.
एका संताच्या अभंगाचा दाखला दिला होता, तर त्यातला एकच शब्द उधृत केला गेला होता.
असो त्यानंतर तिथल्याच काही प्रतिक्रिया उडवल्या गेल्या आणि नंतर मी त्या पानावर गेलो
नाही. तसेही मी मायबोलीवर येतो तेव्हा, फारतर पहिलेच पान बघतो. त्यामूळे कुणी मी
लिहिलेल्या पाककृतीवर नंतर कुणी प्रतिसाद दिला असेल, तर माझ्या नजरेत तो येत नाही.
----
आता परत एका रुपकाचा आधार घेतो. रवांडा देशात जो नरसंहार झाला त्यावर ३ चित्रपट आले.
त्यापैकी हॉटेल रवांडा अनेक जणांनी बघितला असेल. त्यात मुख्य कलाकार अमेरिकन होते.
तो चित्रपट अंगावर येतोच पण याच काळावर आधारीत समटाईम्स इन एप्रिल आणि किनयारवांडा
हे दोन चित्रपट आले होते. त्यात स्थानिक कलाकारच होते. ते चित्रपट अगदी थेट चित्रण दाखवतात.
त्या देशातले दोन गट, एकमेकांच्या विरुद्ध ऊभे रहायला काय कारण झाले होते. तोपर्यंत ते एकत्रच
रहात होते, त्यांचे आपापसात विवाहही होत होते, पण त्यांच्यात एक कृत्रिम रेषा आखण्यात आली..
अत्यंत अनैसर्गिक अशी.
आणि पुढे जे झाले ते झालेच.
------------------------------------------------------------------------------------------------------
ज्या संकेतस्थळाशी गेली १५ वर्षे बांधलो गेलो होतो, आणि जिथे अनेक मित्र मैत्रिणी ( हो मैत्रिणी )
लाभले, त्यांच्याशी ऋणानुबंध जूळले, तिचा निरोप घेताना कटूता नाही.
एक जूनी मायबोलीकर म्हणाली, इतकी वर्षे सहन का केले ? खरंच, का केले ?
वर साधना म्हणतेय, कि माझ्या लेखनावर मालकी मायबोलीचीही होती, त्याच न्यायाने जे,
इथे भले बुरे लिहिले गेले, त्याचीही मालकी मायबोलीचीच आहे.
मला पाककलेतले फार काही येते असा माझा समज अजिबात नाही, तरीही माझी कुठलीही
पाककृती हवी असेल, याच किंवा इतर कुठल्याही बाबतीत माझी मदत हवी असेल,
तर मी सदैव उपलब्ध असेन.
मी इथले लेखन थांबवल्याने मायबोलीला काही फरक पडेल, या भ्रमात मी
नाही. सकस आणि दर्जेदार लेखन इथे होतच राहिल. पण अगदी कालच्या
तारखेपर्यंत चालू असलेली मुजोरी थांबेल का ?
या लेखात मी कुणाचेही ( म्हणजे घेऊ नये त्यांचे ) नाव घेतलेले नाही. तरीही हा लेख इथे
राहणे, अनेकांना अडचणीचे वाटेल. हे माझ्यातर्फे सत्यकथन आहे.
हे टीपापा काय आहे?
हे टीपापा काय आहे?
बाकी जे आहे ते आहे पण जे
बाकी जे आहे ते आहे पण जे निमीत्त घडलं ( रेसिपी विडंबन) त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून हे प्रकरण क्लोज होऊ शकत नाही का? >> मी त्या धाग्यावर Apologies हा पहिला शब्द लिहिलाय सशल. तेही अॅदमिनच्या कुठल्याही वॉर्निंगशिवाय. जर आडमुठेपणाच करायचा असता तर करता आला असता.
ऑफिसमधून निघताना नेमका हा
ऑफिसमधून निघताना नेमका हा धागा वाचला आणि हादरून गेले. आत्ता सुद्धा काय लिहावं सुचत नाहीये. मनात आहे ते पटकन योग्य शब्दात मांडावं अशी इथल्या काही जणांसारखी प्रतिभा देखील नाहीये. माबोचा बराच अभ्यास झालाय आपला असं वाटणाऱ्या मला ह्यातलं बरंच काही माहीत नव्हतं. आता देखील हे वाचून सहानभूति नाही तर फ़क्त आणि फ़क्त आदर दुणावला आहे. का सहन केलं तुम्ही इतकं दिनेशजी? आता दा म्हणावसं वाटत नाहीये. खुप प्रेमाने,आदराने वापरत होते मी हे संबोधन. माबोमुळे तुमची आणि तुमच्यामुळे असंख्य गोष्टींची ओळख झाली. वर लिहिले आहे तसं ज्याना खरोखरीचे भेटावेसे वाटते त्यात तुमचा नंबर पहिल्या तिघात कायम होता. खुप काही काही बोलावसं वाटतंय पण सुचत नाहीये. तुमच्या लेखनाने खुप समृद्ध केलय मला. इथे प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक वेळी भरभरुन प्रतिसाद न दिल्याचा खुप पश्चाताप होतो आहे. दरवेळी वाचायचं, आवडलेल्या गोष्टी टिपून ठेवायच्या आणि मनातच थैंक्यू म्हणायचं.. असं बऱ्याच जणांकडून झालं असणार पण आता तुम्हाला कळलं असेलच तुमचं गुडविल किती जास्त आहे ते..
तुम्ही ब्लॉग/साइट जे काही उघडाल त्यात आम्ही सोबत असूच आणि सक्रीय देखील राहू. तुम्हाला खुप शुभेच्छा! We all love u very much.
ह्यावर बऱ्याच आधी ठोस action का घेतली नाही माहीत नाही पण या सर्वात माबोला दूषण असं द्यावसं वाटत नाही. माबोमुळेच तुमची आणि इथल्या इतर चांगल्या लोकांची ओळख झाली. नुसती वाचायला म्हणून इकडे आले आणि कधी गुंतत गेले कळलच नाही. मी माबोकड़े फ़क्त सोशल नेटवर्क म्हणून बघत नव्हते म्हणून कदाचित जास्त दुःख्ख होतय. ऋन्मेष, विद्या भुतकर असे काही मोजके आवडीचे आयडी आहेत तोपर्यन्त इथे येणे-जाणे होईल, पण आता वावर नक्कीच कमी होईल.
हे बरंच विस्कळीत झालं आहे, इतरांसारखं मुद्देसूद नसेल,पण खुप मनापासून लिहिलय. ह्याआधी इथे काही भांडणे बघितली, आयडी लुप्त होताना बघितले,पण इतके क्लेश पहिल्यांदाच झाले आहेत.
नताशा, तू "अपॉलॉजी" दिनेश कडे
नताशा, तू "अपॉलॉजी" दिनेश कडे मागितलीस.
मी म्हणतेय की दिलगिरी दिनेश पुरती नाही. त्या सेन्सिटिव्ह मॅटर च्या दृष्टीने जाहिर दिलगिरी. आणि हे केवळ आता ह्या निमीत्ताने तूही इथून जायची भाषा करू नयेस ह्या हेतूने मी म्हणत आहे.
वरचेवर असली निमीत्त होऊन इकडून लोकांनां कायमचं जावं वाटणं हे मला दुर्दैवी वाटतं.
नताशाने लिहिलेले तपशील वाचून
नताशाने लिहिलेले तपशील वाचून आँ झालंय. कारण इतके करंट्स, अंडरकरंट्स मला माहित नाहीत आणि माहित करून घेण्याची इच्छा, वेळ, शक्ती नाही. इतके तपशील सतत ट्रॅक करण्याएवढी माबो माझ्या आयुष्यात महत्वाची नाहीये.
एखादी आयडी खूप मनस्तापाने लिहिते तेव्हा त्याला फक्त एकच बाजू नसते हे आम्हा बहुतेकांना ठाऊक असतेच पण तरीही त्यामुळे त्या आयडीचे म्हणणे पूर्ण पोकळ ठरते असे मला वाटत नाही...
माझा यातल्या टिपापा, अड्डा याचे सदस्य किंवा आणखी कुणाशीच माझे कधी वाद झालेले नाहीत, वाईट संबंध नाहीत त्यामुळे मी आकसाने निश्चित लिहित नाहीये.
दिनेश. च्या तपशीलाच्या चुका अधूनमधून मी ही दाखवल्या आहेत. इतरांनीही वेळोवेळी दाखवल्या आहेत. पण त्यावरून दिनेश. ने कधी मला वेडेवाकडे प्रतिसाद दिले नाहीत की त्यांच्या चाहत्यांपैकी कुणी. मी त्यांच्या चाहत्यावर्गापैकी नाही. तरीही. तेव्हा ज्यांना तसे प्रतिसाद आलेत त्यांच्याशी दिनेश. चे निश्चित इतर काही इश्यूज असणार ज्यामुळे आयडीविषयी कडवटपणा आलेला असेल (हे दिनेश.चे समर्थन नाही). तेव्हा जशी दिनेश. ना आत्मपरीक्षणाची गरज आहे असे इथे लिहिले गेले आहे तसे समोरच्या पार्टीला पण असणार मग. टाळी दोन्ही हातांनी वाजते...
पिटी पार्टी किंवा सिंपथी टूर इतर काहीजणांसाठी असेल/ नसेल कदाचित. माझ्यासाठी नाही. मी एक सामान्य वाचक म्हणून जे वाटलं ते लिहिलं.
नताशा, प्रामाणिक खुलासा आवडला
नताशा, प्रामाणिक खुलासा आवडला. मीठ आणि रेसिस्ट असे काही तुमच्या मनात नसावे हे जाणवले.
>>>>>>दिनेश ह्यांच्या लेखात, लिहिण्यात एक पॅटर्न आहे. तो सतत रिपीट होतो. ज्यांना तो प्रत्येकठिकाणी दिसतो, त्यांना तो विनोदी वाटू शकतो, हे कोणी अमान्य करु नये. अनेकदा ते "आपल्याकडे पुर्वी गहू उगवत नसे", "कोकणात पुर्वी पुरणपोळी केली जात नसे", "व्हीटी स्टेशनच्या बाहेर एका सिग्नलवर एक भेळवाला बसतो, तिथे एक जॅकरांडाचे झाड आहे", " मागे मला अमुक एक सेलेब्रिटी भेटल्या होत्या, त्यांनी मला अमुक माहिती सांगितली" असे उल्लेख करत असतात, जे कुणीही पडताळून बघू शकत नाही. कारण एकतर त्यात स्पष्ट उल्लेख नसतात. उदा. "पुर्वी" म्हण़जे किती पुर्वी? तर हा पॅटर्न मला एकटीलाच दिसत होता असे नाही, इतरांनाही दिसत होता. अनेकदा मी/इतरही कुणी त्यांना स्पेसिफिक माहिती विचारली किंवा त्या फझी विधानांतली विसंगती दाखवली तेव्हा एकतर त्यांनी पुर्ण दुर्लक्ष केले किंवा आकांडतांडव केले. त्यामुळे तो नाद सोडून त्या लिखाणाची विडंबनं सुरु झाली.
---मान्य. पण हे आपण सर्वच करत असतो. असे बरेच लेख, पाकक्रुती इतर लिखाण माबोवर आहे जे कुणीच पडताळुन पाहु शकत नाही. ह्यात, आज माझ्या ऑफिसात हे झाले, माझ्या मुलांनी हे केले, शाळेत असताना असे झाले, परदेशात गेलो तेव्हा हे भेटले यापासुन कॉलेजात नाटकात अमुक बक्षीस मिळाले, डॉ. नी तपासुन अमुक सांगितले, माझे अमुक अमुकशी जवळचे संबंध आहेत असे काहिही खपु शकते. वाचक वाचताना असे विचार करतोच. पण महत्त्व इतर कंटेंटलाही असतेच ना? स्टेप बाय स्टेप, फोटोसहित, मनोरंजनपर माहिती देउन लेख वाचनीय होतात. खरे खोटे प्रत्येकवेळी केलेच पाहिजे का? आणि कोकणात पुपो होत नसे असे वाक्य आले तेव्हा माझ्यासकट अनेकांनी ते विधान खोडले हे पुरेसे असावे. दिनेशदांनी कबुली, माफी द्यावी अशी अपेक्षा का? प्रतिसादातुन समजते ना काय बरोबर काय नाही ते. सुज्ञ वाचक हवे तेवढेच बरोबर घेतात.
परत एकदा लिहिते, दिनेशदा हे काही संत महात्मा नाहीत. गुणदोष त्यांच्यातही आहेत. ते त्यांनी कबुल करावेच हा अट्टाहास का? त्यांच्या लिखाणातील जे पटत नाही ते त्याच धाग्यावर लिहुन मोकळे व्हावे. दिनेशदा अॅकनॉलेज करो वा न करो (त्यांच्या वरील अनुभवांवरुन त्यांचीही भुमिका पटतेय. माकडांच्या हातात कोलित का द्या असा विचार त्यांनी केला तर काही चुक नाही). आत्मपरिक्षण सगळ्यांनीच करावे. आपण कोण कुणाकडुन काही अपेक्षा ठेवणारे? ज्या अपेक्षा आपण दुसर्याकडून ठेवतो त्यापैकी आपण किती पुर्ण करु शकतो हे पहावे.
वरदाच्या ह्या पॅराला पूर्ण
वरदाच्या ह्या पॅराला पूर्ण अनुमोदन. तुमची ओळख (माझ्यासाठी तरी) नि माझ्या माहितीतल्या (माबो नि माबोबाहेरच्या ही) बर्याच जणांसाठी तुमच्या साध्या सोप्या पाककृती हि आहे. ती पुसू नका हि आग्रहाची विनंती.
>> +१
दिनेशदा, पाककृती पुसू नका ही आग्रहाची विनंती.
मूळ धाग्याचे सर्व संदर्भ
मूळ धाग्याचे सर्व संदर्भ माहीत नाहीत, लेख आणि वरच्या प्रतिक्रिया वाचून जे मनात आल ते लिहिण्याचा हा प्रयत्न.
भारताबाहेर पाश्चिमात्य देशात अनेक वर्ष राहिल्यामुळे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याच्या त्याबद्दल विचार करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडतो असे वाटते
प्रत्येक गोष्ट तपासून घेणे, स्वतः खात्री करून घेणे, मुख्य म्हणजे प्रश्न विचारणे आणि सर्वसाधारण पणे बहुमता विरोधात आपले मत द्यायला न कचरणे, टीका करणे अशा प्रकारे वागण्याची प्रवृत्ती साधारणपणे वाढीस लागते
वैयक्तिक आयुष्यात मला हे जाणवते. भारतातील नातेवाईक, मित्र मंडळी यांची विचार करण्याची पद्धत, एखाद्या विषयाला अप्रोच होणे यात माझ्या आणि त्यांच्या पद्धतीमध्ये फरक जाणवतो
हे सर्व करताना सामाजिक संदर्भ, वागणुकीचे वेगळे नियम, परदेशात राहिल्यामुळे स्वभावात आलेला एक प्रकारचा धीटपणा, आत्मविश्वास जो आपल्या नकळत कधी कधी उद्धटपणाकडे झुकतो आणि इतरांना ठळक पणे जाणवतो इत्यादी मुळे भिन्न भौगोलिक ठिकाणी राहणाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण होण्याला संपूर्ण वाव असतो.
त्याचवेळी भारतात राहणाऱ्यांचा अप्रोच असा वाटतो मला , जेव्हा मी इथून पाहतो की
"अमेरिकेत जाऊन जास्त शहाणपणा करतोय आम्हाला अक्कल शिकवू नको"
बरोबर कोण? चूक कोण? कोण ठरवणार?
त्यामळे सर्वानीच कोणत्या ही प्रकारे नकारात्मक प्रतिक्रिया द्यावीशी वाटते, त्या वेळी संयम पाळायचा प्रयत्न करणे महत्वाचे. ती वेळ टाळता आली तर बरेच वाद उद्भवत नाहीत हा माझा वैयक्तिक अनुभव.
मानवी स्वभाव आहे की टीका किंवा विरोध कोणाला ही आवडत नाही. मी ही ह्याला अपवाद नाही.
पण त्याला कशा प्रकारे प्रतिक्रिया द्यावी हे आपण प्रयत्नपूर्वक नियंत्रणात ठेवायला हवं.
प्रत्येक वेळी मला हे जमतच अस नक्कीच नाही, पण प्रत्येक वेळी प्रयत्न करणे हे कसोशीने पाळले जाणे आवश्यक वाटते.
सोशल मीडिया वर हे करणं सोप्पं असायला हवं कारण आपण कोणाशी ही प्रत्यक्ष समोरासमोर बोलत नसतो .
आयला, हे सगळे मायबोलीवर चालले
आयला, हे सगळे मायबोलीवर चालले आहे?!
किती बदलली मायबोली! ओळखूच येत नाही!!
मग २००१ पूर्वी पासून इथे लोक एकमेकांच्या लिखाणाबद्दल काय काय लिहीत होते, ते वाचून तर झीटच येईल!
पण कुणि एकमेकांविषयी तक्रार केली नाही. बरेचदा प्रत्यक्षात भेटी झाल्यावर कुणिहि म्हंटले नाही की तुम्ही असे का लिहीले. उलट मैत्री अधिक दृढ झाली.
कित्येक जण तर मायबोलीवर एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जायचे पण ते प्रत्यक्ष भेटल्या वर काय घडले याचे वृत्तांत व फोटो मायबोलीवर येऊन गेले आहेत.
टीका, उपहास, विडंबन हे सगळे लिखाणावरून, फा. को. वगैरे करण्यासाठी लिहीत असत, त्यात कुणाला वैयक्तिक रीत्या दुखवण्याचा उद्देश नसे, हे सर्वांनाच ठाऊक होते.
कुणि जास्त गंभीरपणे लिहायला लागले तरी त्यांच्या लिखाणाची टिंगलच होत असे. पण म्हणून कुणि मायबोली सोडून गेले नाहीत. त्यांना माहित होते मायबोली जगभरात पसरली आहे - सगळेच काही गंभीर नसतात, किंवा सगळेच टिंगल करत नसतात. पण काहीजण नेहेमीच टवाळखोरी करत हिंडत असतात, त्यांच्या कडे दुर्लक्ष करावे.
पण काही लोकांना टीका झाल्यावर जास्तच वाईट वाटते. जेंव्हा मला असे जास्तच वाईट वाटते तेंव्हा मी काही दिवस मायबोली बंद करतो - मग पुनः चालू करतो. जेंव्हा वेळ आली की माझे लिहिणे मायबोलीला कायदेशीर धोक्यात आणू शकेल, तेंव्हा मीच आय डी उडवला, पण रहावले नाही म्हणून परत आलो.
आता हे वरचे सगळे पाहिल्यावर वाटते जाऊ द्या - 'quora' किंवा इतर काही जास्त मनोरंजक आहे. उगाच इथे काहीतरी लिहायचे नि पुनः वरच्यासारखे काही होऊन बसायचे!!
कोतबोतच आहे, म्हणून एक अवांतर
कोतबोतच आहे, म्हणून एक अवांतर, लांबलचक व असंबद्ध प्रतिसाद.
दिनेशदा. तुमच्या लेखाच्या निमित्ताने व संदर्भाने.
*
मायबोलीवर आलो, त्याआधी कित्येक वर्षे माझा इंटरनेटवर वावर होता. अनेक चॅट्साईट्स, याहू ग्रूप्स, ऑर्कुट इ. वापरून झाले होते. पण मसं नामक प्रकार माबोआधी समहाऊ हाताळला गेला नव्हता.
मधे एक महीनाभर सुटी मिळाली, अन टाईमपास करताना माबो सापडली. इथे आलो, "पहिल्या आयडीने" सदस्य झालो, त्याआधी मी संपूर्ण "बखर" वाचून काढली. हितगुज पूर्ण वाचता आले नाही, समहाऊ, आय डिडन्ट गेट द हँग ऑफ इट. पण त्यातले अनेक धागे/बीबी वाचून झाले आहेत. अन त्यालाही आता ५-७ वर्षे होऊन जातील. इतरही मसं वर रुजू झालो. मनोगत, उपक्रम, मिपा, वाचले. उपक्रम, मी मराठीचा अंत, अन ऐसी अक्षरे चा जन्म पाहिला, या सर्व संस्थळांवर बरेच लेखनही केले. मिपाची पैशाची लफडी समजली, मीमवर चक्क पैशाची देणगीही दिली, वगैरे.
एकंदरितच मराठी संस्थळे व त्यावर वावर असणार्यांबद्दल बरेच काँटेक्स्ट्स अन इतिहास ठाऊक आहे. बराच विस्मरणातही गेला आहे.
तर.
हा लेख, व त्यावर नताशा म्हणून ज्या यंग लेडी आहेत/होत्या, त्यांच्या नव्याने ब्लॉक झालेल्या दुसर्या आयडीच्या प्रतिसादाबद्दल.
सर्वात आधी नमूद करतो, की माझे त्यांचे मस्त भांडण होत असे. मुद्द्यावरून. मायबोली प्रोफाईलमधे एक "आवडते वाक्य" असा भाग आहे, त्यात मी लिहिलेले एक वाक्य डकवून, ते "मायबोलीकर ***" यांचे वाक्य आहे, असे लिहिणार्या नताशा या एकमेव आयडी होत्या, असे माझ्या आठवणीत आहे. मी लेख लिहिणारा वा धागे काढणारा प्राणी नसून बाहुल्याने "प्रति"साद देणारा या भूमीकेत इथे जास्त वावरलेलो आहे.
तर, वादविवाद होतच असत. त्यांच्या वयाचा/त्याआधीच्या वयात मी माझ्यासमोर/संपर्कात आलेल्या अनेक ज्येष्ठ लोकांना ज्या हिरिरीने व जे प्रश्न विचारत असे, ते व तसेच येत असत. मीही उत्तरे देत असे, काही साचेबंद काही आजच्या काँटेक्स्टने बदललेली. वाद-संवाद होत होता, पण वितंडवाद नव्हता.
तो कधीतरी वितंडात बदलला अन त्यादिवशी बोलणे टाकल होते, ते परवा एक प्रतिसाद देऊन परत बंद केले होते. हे असे व इतके भांडण होते व ते तितकेच होते हे नोंदवितो.
*
आता हे सगळे मी का लिहिले? काय संबंध?
तर माबोवर बराच 'एस्टॅब्लिश' झाल्यानंतर दरम्यानच्या कुण्या एका कालखंडात, मी पार्ले उर्फ टीपापा उर्फ आजकालचा बीटरगाव नामक 'हिडन' बाफचा मेंबर होतो. हौसेने पार्ले काय असते ते विचारल्यानंतर त्या बाफची लिंक मला दिली गेली होती. त्याकाळी ते टिपापा होते. (संपादनः बिटरनेस आला नव्हता तेव्हा. सुरुवात असेल कदाचित.) मजा यायची गप्पा मारायला. तिथल्या लोकांच्या विनोदाला एक वेगळी धार आहे. स्थळकाळाचे वेगळे काँटेक्स्टही आहेत. माझ्या कलंदर डोक्याला पटतील असे अपने जैसे टाईपके लोग आहेत, असे बहुतेक ठिकाणी वाटत असे. तिथेही मी पडीक असत होतो.
कधीतरी पोलिटीकल व्ह्यूज वेगळे आहेत हे लक्षात आले, त्यातून कडवटपणा वाढीस लागण्याआधी तिथून बाहेर पडलो. तो (संपादनः कडवटपणा) पूर्ण थांबला नाही ते अलाहिदा.
पण.
एक गंमत मी माबोवर ऑब्झर्व केली आहे. जी इथे जस्ट घडून गेली.
नताशा यांनी लिहिलेल्या प्रतिसादानंतर, अत्यंत संयत/कायदेशीर नियमानुसार भाषेत एकाच ठिकाणावरून निघून, एकामागून एक टोन चेंजर प्रतिसाद येऊन, हळूहळू मूळ लेखाला, त्यात मांडलेल्या व्यथेला वेगळा टोन देण्यात येऊ लागला आहे. व लवकरच तो टोन बदलून एक संदिग्ध इतिहास निर्माण होईल, ज्यात दिनेश विश्वनाथ शिंदे हे संशयास्पद असावेत असा "रिझनेबल डाऊट" निर्माण होईल, अन मग..
असो.
कठीण आहे.
*
आमचा अड्डा नामक एका ग्रूप मर्यादित वाहत्या पानाचा मी सध्या सदस्य आहे. पूर्वी पुपु वर लिहीत असे. टिपापावरही लिहित असे. निगवर काही थोडेफार १०-१२ प्रतिसाद असतील. माबोवर अनेक ठिकाणी अनेक प्रकारे लिहिलंय. काही लेख, पाककृतीही (जुन्या अवतारांत) लिहिल्या आहेत. (उडवल्यानंतर का परत येतो ते वेमांना सांगितलंय त्यामुळे इथे लिहीण्याची गरज नाही.)
पण कुठेही मी माझी व्यक्तीगत ओळख दिलेली नाही. अगदी अड्ड्यावरही नाही.
भरत मयेकर अन टण्या यांच्यात झालेल्या एका प्रतिसादचकमकीनंतर नताशाने क्वोट केलेले डंबलडोरचे वाक्य, 'It takes more courage to stand against your friends' हे सत्य आहे, अन मी घाबरट असल्याने, मित्र बनवतच नाही. व्यक्ती समजली, की राग/लोभ सुरू होतात अन मग गुंता वाढत जातो.
मित्रांनी दगा दिला, किंवा दुखावलं, तर किती जिव्हारी लागतं ते मला रियल लाईफमधे ठाऊक आहे. व्हर्चुअल वर्ल्डमधले असले, तरीही मित्रांच्या (मित्र हा लिंगनिरपेक्ष शब्द आहे) वागण्याने जर दुखावले गेले तर किती दुखते, तेही ठाऊक आहे. सो बेटर स्टे अॅनॉन अँड डोन्ट मेक फ्रेंड्स.
तर, दिनेशदा,
तुम्हाला काय वाटते/वाटले, ते समजू शकतो. हे नमूद करून थांबतो. मी तरी तुम्हाला दिनेश म्हणून हाक मारणार नाही. दिनेश"जी" म्हणणे बोगसपणा वाटतो, अन एकेरीवर दिनेश म्हणणे वयाने सम/थोडा लहान/मोठा असलो, तरी जमणार नाही.
कित्येक जण तर मायबोलीवर
कित्येक जण तर मायबोलीवर एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जायचे पण ते प्रत्यक्ष भेटल्या वर काय घडले याचे वृत्तांत व फोटो मायबोलीवर येऊन गेले आहेत.
<<
व्हय झक्कीजी. पाहिलेत आम्ही.
दिनेशदा, मी मायबोलीवर चार
दिनेशदा, मी मायबोलीवर चार वर्ष आहे. तुमच्या रेसिपीज आणि निसर्गाच्या गप्पांवरचे तुमचे फोटो, माहीती यांची मी फॅन आहे. मी मेंबर नव्हते तेव्हाही काहीजणांच्या रेसिपीज, लिखाण हे आवडायचं त्यातले तुम्ही एक आहात त्यामुळे हे सर्व मी मिस करेन नक्कीच. शक्य झाल्यास परत द्या सर्व. बाकी तुम्ही घ्याल त्या डीसिजनला रिस्पेक्ट.
असुफ,
असुफ,
तुमचा प्रतिसाद व बदलत जाणार्या परिप्रेक्ष्याबद्दल सहमत.
फक्त, त्यात अनेकदा, "Everything back home was problematic/bad/dubious" असा जो एक अंडरकरंट तयार होतो, तो उल्लेख तुम्ही विसरलात असे वाटते. जनरलायझेशन करू नका, हे सांगतानाच, देशातले सगळेच जनरलाईजच करतात, अशी एक कन्सेप्ट कुठेतरी टिकटिक करीत असते, वगैरे.
असो.
दिनेशदादा ( दा चा इतिहास
दिनेशदादा ( दा चा इतिहास माहित नव्हता, मी आदराने बोलत असे)
हे सगळे वाचून मला इतका त्रास होतोय तर तुम्हाला काय वाटत असेल याची कल्पना येतेय. मला नीट व्यक्त होता येत नाही पण तुम्ही इथे नसल्यास माबोला फरक पडेल की नाही माहीत नाही पण माझ्यासारख्या वाचकांना नक्कीच फरक पडेल व नुकसानही होईल.
वरदा, ऋ व इतरांनी सांगितल्याप्रमाणे ते करू नका जे तुम्ही करावे असे तुम्हाला त्रास देणारयांना वाटते. काही दिवस ब्रेक घेऊन मन शांत झाल्यावर पुन्हा लिहते व्हा.
जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'
जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!'
मी जातां राहील कार्य काय ?
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील;
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल कांहिं का अंतराय ?
मेघ वर्षतील, शेतें पिकतील,
गर्वानें या नद्या वाहतील,
कुणा काळजी कीं न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय ?
सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपल्या कामी लागतील,
उठतील, बसतील, हसुनि खिदळतील,
मी जातां त्यांचें काय जाय ?
राम-कृष्णही आले; गेले !
त्याविण जग का ओसचि पडलें ?
कुणीं सदोदित सूतक धरिलें ?
मग काय अटकलें मजशिवाय ?
अशा जगास्तव काय कुढावें ?
मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?
हरिदूता कां विन्मुख व्हावें ?
कां जिरवुं नये शांतींत काय ?
...
अरे भै, यह टीपापा आखिर है
अरे भै, यह टीपापा आखिर है क्या??![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
दिनेश - पक्के मुंबईकर आहात.
दिनेश - पक्के मुंबईकर आहात. म्हणजे कसं, लहानपणी क्रिकेट खेळताना काहि कारणांवरुन भांडण (किंवा बॅटिंग करताना आउट) झाल्यावर बॅट्/बॉल आणणारा रागाने ते घेउन जायचा - अगदि त्याचीच आठवण झाली.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या मते यात जास्त नुकसान (असलंच कोणाचं तर) दिनेश यांचंच आहे. रागाच्या भरात त्यांनी स्वतःचीच डिजिटल फुटप्रिंट पुसुन टाकलेली आहे - अर्थात सारासार विचार करुनच. आणि या धाग्याच्या उद्देशावरुनच सूचीत होतंय कि हि हॅज मुव्ह्ड ऑन, सो एव्हरीबडि शुड फॉलो सुट...
जाता जाता, सोशल नेट्वर्किंगचा एक अलिखित नियम - आपण एखाद्याला दोन ठेउन देत असु तर चार घेण्याची तयारी हि ठेवली पाहिजे...
विनोदाची वेगळी धार म्हणजे,
विनोदाची वेगळी धार म्हणजे, ज्यावर हल्ली पाच वर्षांची मुलंही हसत नाहीत असे विनोद का? ह्यालाच हल्ली प्रतिभा म्हणत असावेत. वेमा फक्त ह्यांच्याच गटगला जातात ही फुशारकी आहे की धमकी?
--- हा प्रतिसाद मी नंद्या४३ यांच्या लेटेस्ट प्रतिसादावर दिला. पण पोस्ट करेतो त्यांचा प्रतिसाद दिसत नाहीए. असो.
वाईट वाटलं. माझ्या
वाईट वाटलं. माझ्या मायबोलीच्या मर्यादीत वापरामध्ये दिनेश यांच्या कडून कधी कोणावर वयैक्तीक टिपण्णी केलेली बघितली नाही आहे पण त्यांच्या विषयी अशी टीका, बुलिंग होते हे बघितले आहे जे खेदजनक आहे.
दिनेशदा, लेख वाचुन खरेच वाईट
दिनेशदा, लेख वाचुन खरेच वाईट वाटले. संध्याकाळी जो थोडासा निवान्त वेळ मिळतो, तेव्हाच मायबोलीवर लॉगिन करता येते. तेव्हासुद्धा इथल्या अमेरिकेतील वेळेप्रमाणे जे काही धागे दिसतात/ वाचले जातात, तिथेसुद्धा बरेच काही कळते. Usually,Bitterगाव आणि बे एरीया, कॅलिफॉर्निया हे
धागे जे पहिल्या पानावर जवळ जवळ असतात,ते compare केले तरी लगेच समजते.
If you cann't get along, simply stay away इतकी साधी गोष्ट लोकांना कळत नाही. पण नाही, पाकृ/लेख वाचायचे आणि तिथे स्पष्ट न लिहिता भलतीकडेच चर्चा (अगदी खालच्या पतळीवर आणि मुद्दामुन उकरुन काढुन) करायची , ही मानसिकता काही कळत नाही. मायबोलीचे standard अशाच गोष्टींमुळे खालावते. फारएण्ड,सशल, आर्च, लालु, स्वाती२, परदेसाई, सावनी ह्या आयडीचे प्रतिसाद/लेखन नेहेमीच आवडतात. दिनेशदांचेही सर्वच लेखन आवडत होते/पटत होते असे नाही, पण प्रतिसाद कुठे द्यायचा अन कुठे नाही हे मीच ठरवु शकते. आताही हा प्रतिसाद लिहिण्याचे कारण हेच की ह्या सर्व प्रकारांमुळे केवळ मायबोलीचेच नुकसान झाले आहे, याचे वाईट वाटते.
चुकत कोणाचे नसते? कोण चूकत
चुकत कोणाचे नसते? कोण चूकत नाही? दिनेशजींचा कांदापोहे यांच्याबद्दल गैरसमज झाल्यावर मी ते स्पष्ट लिहीले होते, या दोघांमध्ये ताण नसावा हेही मला वाटले होते. दिनेशजी, गैरसमज करुन घेऊ नका हे ही मी स्पष्ट लिहीले होते. कारण दिनेशजी व कापो हे दोघेही सरळमार्गी आहेत हे मला माबोवरच्या माझ्या नियमीत वापरा मुळे माहीत आहे. नताशा यांचे काही मुद्दे ( टीपापा सोडुन इतर बाफांवरचे ) मला पटायचे. त्यांनी शांताराम कागाळे गृप वर लिहीलेली मते पण मला पटली पण दिनेशजींच्या पथ्यकर पालेभाजी या बाफावरची भाषा मात्र पटली नाही. मी कशाला येईन इथे कडमडायला असे एक वाक्य होते. मला ती भाषा पटली नाही, तो त्रागाच वाटला. दिनेशजींनी त्यांना सयंमीत उत्तर दिले होते. पण ते जास्त होत गेले. नताशा यांचा तो हेतू नसेलही पण इतर सदस्यांनी त्याचा फायदा उठवुन सतत बोचरी टीका कशी केली ते मी वाचले आहे. पण वाहत्या पानावरचे संदर्भ देऊ शकत नसतो.
आणी इथेच टीका होतेय असे नाही, तर जुन्या मायबोलीवर ( आता विषय निघाला आहेच म्हणून लिहीते, दिनेशजी आणी नलिनी मला माफ करा) दिनेशजींनी, नलिनी ( या आय डींना दिनेशजी आपली धाकटी बहिण मानतात ) या आय डींना सुरेख पत्र लिहीले होते, ते ही अगदी निरालस जिव्हाळ्याने, आपुलकीने लिहीले होते. पण तेव्हा काही जुन्या हितगुजकरींनी ( ज्यात आताच्या ३ व पूर्वीची १ अशा स्त्री आय डीज ) खालच्या थराला जाऊन टीका केली होती. अगदी जुन्या सिंहगड रोड बाफावर पण मनसोक्त धुराळा उडवुन आपली ईच्छा शमवली होती. वास्तवीक आजकाल कोणी कुणाला पत्र लिहीत नाही, ई मेल आणी समस चा जमाना आहे, म्हणून पत्र लिहीले आहे असे दिनेशजी यांनी सांगुनही हे सदस्य वाहत्या बाफावर वाटेल ते बोलत होते. हे मी रोमात असतांना बघीतले होते, पण विरोध करण्याचा धीरच झाला नाही कारण या लोकांमध्ये माझी दुसरी एक मैत्रिण होती, जिच्याशी मी आता बोलत नाही.
त्यामुळे कोणी असे समजत असेल की दिनेशजी त्रागा करतायत तर तो गैरसमज त्यांनी काढुन टाकावा. १०० टक्के मायबोलीकरांपैकी हे असे २५ टक्के आहेत, की ज्यांनी, दिनेशजी त्यांच्या अध्यात मध्यात नसतानाही, वारंवार खिल्ली उडवली आहे. काय कारण होते यांना एकट्यानाच लक्ष्य करण्याचे? आहे उत्तर याचे की मग नंबरांची संख्या वाढवायची आहे?
याच गृप मधल्या ४ जणींनी ( या पैकी १ जण आता माबोवर येत नाही ) एका जुन्या स्त्र्री सदस्याला असेच पिडले होते. तिने काही नवीन लिहीले की या चौघीजणी वाटेल ती गरळ ओकायच्या. शेवटी कंटाळुन तिने पण मायबोली सोडली. मायबोली आज टिकली आहे ती सरळ मार्गी लोकांमुळे व त्यांच्या प्रेमामुळे, नाहीतर मायबोलीचे मनोगत झाले असते.
soft bullying चा प्रकार
soft bullying चा प्रकार वाटतोय सगळा . हे एकट्याने करता येत नाही. you need group. junior college मधे हे प्रकार चालतात.
कित्येक मुले बिचारी १० वी मधे चांगले गुण असुन soft bullying मुळे ११-१२ मधे खुप मागे पदलेली मी बघतली आहेत .पालकांअना कलतच नाही काय झाले?
ragging नसते . त्यामुळे दोश असा कोणाला देता येत नाही. you can not pin point out certain actions/comments . बघायला गेले तर सगलेच नियमात बसणारे असते.
soft bullying करणार्यांना आपण ते करतोय हेच कित्येकदा गावी नसत.for them its as normal as brushing your teeth. एव्हड काय मनाला ला लाउन ग्ययचे असे वाटु शकते.
some kids are smart/strong enough to escape/ignore this , some are not.
मी ह्या ID चे लिखान वाचले आहे. पाल्हाळिक्,समोर बसुन गप्पा मारल्यासारखे. असा लेखनप्रकार kaahee जणांना आवदु शल्कतो काही जणांना खतकु शकतो. पण प्रचंड टीका व्हावी असे मला तेरी कधी काही त्यात सापदले नाही.Zero nuisance value होती त्याला.
मायबोलिवर हल्लि फक्त चित्रपट
मायबोलिवर हल्लि फक्त चित्रपट विषयक धागे चाळत असल्याने हा सर्व वाद कशावरुन झाला त्या मुळ धाग्याचि कल्पना नाहि(इथल्या कमेंटस वरुन थोडी हिंट मिळालिय)
दिनेशदांच्या सविस्तर फोटो टाकलेल्या रेसिपी मी वाचायचे.झाडाफुलांचे धागे पण
(कधीकाळी एक रेसिपी बेस्ड ड्रुपल बनवत होते तेव्हा "या पाकृ लेखकाला आपल्या सायटिवर खेचायचं" वगैरे कॉर्पोरेटी विचारहि बाळगुन होते, ती साईट अजुनहि लॅपटॉप वरच पडून आहे ही गोष्ट वेगळी.)
वर्षानुवर्ष जे साईट वर आहेत्,त्याला आपलं दुसरं कुटुंब मानतात अश्या जुन्या मेंबराना दुखावल्यासारखे वाटणे साहजिक आहे.
परत एकदा, लिखाण सोडून 'व्यक्ती' वर टिपणी जेव्हा चालु होतात तेव्हा हे सर्व हेवेदावे आलेच.कुटुंब जितकं विस्तारलं तितक्या मजा वाढल्या आणि थोड्याफार गॉसिपिंग आणि कागाळ्याही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
प्रत्येक कंटेंट बेस्ड साईट या मैत्रीच्या,मजेच्या,कंपीबाजीच्या,वादाच्या,उबगाच्या आणि परत बहराच्या लाइफसायकल मधून मध्ये मध्ये जात राहते.त्याच सायकल चा हा अजून एक बळी
एका माहितीपूर्ण संकेतस्थळावर एक मेंबर असाच विनोदी कट्ट्याचा वृत्तांत लिहायचे.पण ते ज्या आयडिज बद्दल लिहायचे त्या कोपरखळ्या पूर्णपणे त्या आयडी च्या लेखन शैली वरच असायच्या.
जाउदे.या सगळ्या अवांतर माहितीतून सार काहीच निघत नाहीये.जस्ट थिंकिन्ग लाउड.
दिनेश, जिथे लिहाल त्या ब्लॉग ची/साईट ची माहिती नक्की द्याल.आम्ही तिथे वाचू.
बाप रे... मी नवीनच आहे इकडे..
बाप रे... मी नवीनच आहे इकडे... सुन्न झालं मनं हे सगळं वाचून... मायबोलीला अशीही एक बाजू असू शकते हे माहीत न्हवते... या निमिताने बऱ्याच गोष्टी नव्याने कळाल्या.. बऱच शिकायला मिळाल् या सर्व संवादातून... काय करावे आणि काय करू नये हेही कळलं... आणि कितपत या सर्व गोष्टींना आपल्या वैयक्तिक आयुष्यात महत्व द्यायचे हेही कळालं... धन्यवाद दिनेशदा यांना आणि इतर प्रतिसादांना...
(हे आता थोडं भित भितच लिहितीये...)
गुळगुळीत दगड सतत मारली तर
गुळगुळीत दगड सतत मारली तर त्यातून जखम होते. पण हे गुळगुळीत दगड मारणार्यांना मान्य नाही. आमचे बघा दगड कशी गुळगुळीत आहे. लागतात तरी का.? असा बचाव इतकी वर्ष काहींनी केला होता. " आपण किती छान दिसता" हे एक वाक्य अत्यंत सुंदर स्त्रीला/व्यक्तीला बोलल्यावर सर्वप्रथम त्यांची रीअॅक्शन " धन्यवाद" अशीच असेल परंतू तेच वाक्य त्यांना सतत बोलत राहिले तर त्या स्त्रीची/व्यक्तीची रीअॅक्शन कशी बदलते ते बघावे.
"धन्यवाद,
आभारी आहे,
हो का थँक्स,
ठिक आहे,
ह्म्म्म,
कळलं मला,
मला माहीत आहे,
आधीपासून आहे,
माहीत आहे मला... सारखे सांगू नका,
अरे कळलं मला कितीदा सांगत आहात,
हो मी नेहमीच छान दिसते,
तुम्हाला काही प्रोब्लेम आहे का?,
अरेच्या एकदा सांगितलेले कळत नाही का?
ए माकड्या, जरा गप बस..
वेडे आहात का? वाजवू का?
एकच गोष्ट मुद्दामून सतत सांगितल्याने एखाद्या व्यक्तीच्या उत्तर देण्याच्या पध्दतीत नक्कीच बदल होतात. मग ती गोष्ट कितीही छान का असेना प्रत्येक गोष्ट सांगायची एक मर्यादा असते, सुरुवातीला आपण त्या व्यक्तीला उत्तर देतो, त्याला एंटरटेरमेन्ट करतो, हसून बोलतो, मग जरा हातचे राखून बोलतो, हळूहळू बोलताना एक कोरडेपणा दाखवतो, आपल्याला बोलण्यात स्वारस्य नाही असे ही दाखवतो, थोडाफार संताप आल्यावर कडक भाषा वापरतो, थोडेफार अपशब्द बोलून समोरच्याला "तु एका लिमिटच्या बाहेर जात आहे" असे ही सुचवतो, परंतू त्यानंतर ही समोरचा हेकेखोरपणा सोडायला तयार नसतो. अशा वेळी एक तर तुम्ही त्याला सोडून दुसरीकडे जातात...नाही तर त्याला इतके टोकदार सुनावतात (ज्याचा की दुसरा काही पर्यायच उरत नाही) की तिसर्या व्यक्तीला वाटू लागते की तुम्ही त्या ट्रोलव्यक्तीला त्रास देत आहात.
याचा उपाय समोरच्याला इग्नोर करणे हा एकमेव आहे. परंतू सदर व्यक्ती जर तुमच्याच घरात येऊन तुम्हाला विनाकारण ट्रोल करत असेल तर तुम्ही स्वतःचे घर तर सोडून जाणार नाही ना. तुम्ही त्या व्यक्तीला घरातून हकलून लावणार. स्वतः नाही जाणार.
उदा. दिनेशदा यांच्या एका धाग्यावर बहुदा "निकाल" या धाग्यावर गंभीर चर्चा चालू असताना कोणीतरी मुळव्याध, वगैरे विषय मुद्दामुन घुसवले होते. त्यामुळे पुढील काही प्रतिसाद अक्षरशः खिल्ली उडवणारे होते. त्यावरून काही सदस्यांनी आक्षेप घेतलेला दिसला परंतू तो विषय काही बंद झाला नाही. काहींची तर टिंगलटवाळी नेहमीप्रमाणे त्यावरून सुरु झाली. एकीकडे दिनेशदा पोटतिडकीने एका गंभीर विषयावर बोलू पाहत होते तर दुसरीकडे मुळव्याध वगैरे वर टवाळी चालू होती. अशा प्रकारला ट्रोल करणे म्हणतात
मुळात मायबोली अमेरिकास्थित
मुळात मायबोली अमेरिकास्थित मराठी लोकांनी सुरु केली . त्यात परदेशात आपसात नेटवर्किन्ग व्हावे. परदेशात मराठी मजकूर तरी दिसावा असा नोस्टाल्जिक हेतु , मराठी भाषेची सेवा अशा हौशी उद्देशने बहुधा सुरू झाली असावी. परदेशात डिटेचमेन्टचे फीलिंग आलेल्याना तर हा फार मोठा भावनिक आधार होता. इंतरनेटची उपलब्धता, ते वापरण्याचे ज्ञान, सुलभता हे बहुतांश अमेरिका अथवा इतर देशात स्थित मंडळीना सहजी उपलब्ध होते . भारतात त्यावेळी बहुधा १०-१५ किलो बिट्सपर सेकन्द ( बाईट्स नव्हे) स्पीड मिळे हे आता आठवूनही आठवत नाही. मायबोलीचे पान उघडायला खूप वेळ लागे . भारतात. सुरुवातीला मराठी रोमन मधून लिहावे लागे. या सर्व कारणामुळे अमेरिका स्थित मण्डळीण्चे माबो वर प्राबल्य होते. आता सगळी मण्डळी सारखी नसतात. त्यात कंपू तयारक्झाले. यातली बहुतेक मण्डली एकमेकाना व्यक्तिशः ओळखीत होती. त्या काळी भारतीय मेबर कमी असत. त्यांना ह्यांची तांत्रिक अथवा जार्गन भाषा कळत नसे. ते जरा न्यून गंडानेच वावरत. या सुरुवातीच्या सिनियारिटीचा फायदा घेऊन काही लोकानी मायबोली आपल्या तीर्थ रूपांचीच आहे असा समज करून घेतला आणि मग बाकीचे उपरेच आहेत या भावनेने नवीन मेम्बर, कंपूबाहेरचे मेम्बर यांची हेटाळणी करणे , खिल्ली उडवणे , कुचू कुचू करणे , सूचक शब्दात व्यक्ती लक्षात येईल अशा पद्धती हिन्ट्स देऊन नालस्ती करणे असले प्रकार सुरू झाले. त्यात आता सिनियर म्हनवणार्या काही महिलांचाही विशेष सहभाग असे. झकी सिनिअर मोस्ट - वयाने आणि मेम्बर म्हणून - असल्याने त्याना मान होता. त्यांचा अपमान करण्यापर्यन्त या कुच कुच कॅपेनची मजल जाई. फार मोठी दहशत होती या लोकांची.
पुढे शिवाजी फॉण्टने मराठी लेखन सुलभ झाले आणि इकडचे लोक लिहिते झाले. आता तर मायबोली इतर गावंढळ लोकानी डॉमिनेट केली आहे त्यामुळे ह्या लोकांचे महत्व कमी झाले असले तरी आम्हीच माबोचे सन ऑफत्द सॉईल आहोत हा अहंगंड गेलेला नाही. मात्र इतरत्र कोनी आता दखल घेत नाही म्हणून काना कोपर्यात जाऊन अशा मोहिमा चालवाव्या लागतात. मायबोलीवरची नवी जनरेशन अल्ट्रामॉडर्न , सकस कंटेन्ट देनारी , तांत्रिक दृश्ट्या तुल्यबळ असलेली असल्याने ह्यांच्या पाताळयंत्री गावगप्पा मागे पडल्या म्हणून हे सगळे अंडर ग्राऊन्ड चालू आहे म्हणून बर्याचशा लोका ना हे आताही क्लोज्ड ग्रुपच्या माध्यमातून चालू असल्याचे माहीत नाही आणि आता अचानक सर्फेस झाल्याने सर्वाना कळत आहे एवढेच.
अ3, सॉल्लिड! जबरा प्रतिसाद...
अ3, सॉल्लिड! जबरा प्रतिसाद...
वाईट वाटलं हे वाचून. इथे
वाईट वाटलं हे वाचून. इथे इतक्या खालच्या पातळीवर टिका/ताशेरे ओढले जात असतील असे वाटले नव्हते.
वरदा यांच्या पोस्ट्स्ला +१.
अजय, तुमचे विवेचन योग्य आहे
अजय, तुमचे विवेचन योग्य आहे असे मला वाटते. आपण एका संपन्न देशात राहत आहोत हा अहंगंड पण प्रतिक्रियांतून दिसत असतो.
आपण या सर्वशक्क्तिमान देशात आहोत म्हणजे आपल्याला सगळेच कळते हा गैरसमज उगाचच बाळगून असतात. ताजे उदाहरण नोटाबंदीचे! इथे भारतात नोटाबंदीने काही त्रास नाही, सगळे सुरळीत चाललेय असे सांगत होते. अरे इथे उन्हातान्हातून ATM च्या लाईनीत तिष्ठणार्यांना माहित ना काय त्रास होतोय ते? एकवेळ मत प्रकट करा, प्ण आम्ही सांगतोय ना म्हणजे बरोबरच असे का ?
असो! हा प्रतिसाद अवांतर वाटत असल्यास उडवून लावावा.
रश्मी, मलाही कायम हा प्रश्न
रश्मी, मलाही कायम हा प्रश्न पडतो की इतक्या खालच्या स्तरावर जाऊन टीका करायचे कारण काय? 'हे वाट्टेल ते लिहितात आणि यांचे भक्त माना डोलावतात', 'नव्या सदस्यांना काय माहित यांचे प्रताप, ते बिचारे फसतात' वगैरे कमेंट्स एकदोनदा नाही तर खूप वेळा पाहिल्यात. दिनेश यांनी कुठेतरी काहीतरी महापाप केलेय आणि अशा पापी माणसाला आता नवे मेंबर चांगला म्हणताहेत, भजनी लागताहेत, त्यामुळे यांचा पर्दाफाश करायलाच हवा हा जो आविर्भाव सतत दिसत राहतो त्याचे नेमके कारण काय? आणि एवढेच आहे तर दिनेशच्या उम अली पदार्थावर हा पदार्थ बेक करूनच केला जातो म्हणत टीका करणाऱ्या लोकांनी, जेव्हा चिनुक्सने तिथे येऊन बेक आणि आटीव अश्या दोन्ही प्रकारे पदार्थ केला जातो म्हटल्यावर निदान चिनुक्सला तरी धन्यवाद द्यायला हवे होते. ह्या प्रकारचे वाद अजून खूप वेळा झालेत जिथे शेवटी खरेखोटे झाल्यावर टीकाकारांनी येणे सोडले, ते होईतो मात्र सतत येऊन टीका करत राहिले.
या बाबतीत दिनेश आणि बी ही तुलना करणे व्यर्थ आहे कारण माझ्यासकट इथल्या बऱ्याच लोकांनी चांगल्या भावनेने बीला मदत केली पण ती भावना त्याला कळली नाही, मदत करू इच्छिणाऱ्यांना, त्यांनी केलेली मदत विसरून तो टिककरांमध्ये ओढत राहिला. तो हे आधीपासूनच करत होता हे इथे वेळोवेळी लोकांनी दाखवून दिलेले आहे. पण दिनेशच्या बाबतीत तसे नाहीये.
वर उल्लेखलेली नातीचरामी चर्चा मी मुद्दाम शोधून वाचली, फॉन्ट प्रॉब्लेममूळे दिनेशची मूळ पोस्ट वाचता आली नाही पण पुढच्या त्यांच्या पोस्टीं वाचता आल्या, त्या पोष्टींवरून अंदाज आला. मी नातीचरामी वाचलेही असेल, आता आठवत नाही पण हंस अकेला वाचलेय आणि खूप आवडलेय. लेखकाचे 1 पुस्तक आवडले म्हणजे तो ग्रेटच असणार हे मी मानत नाही. तरीही मला दिनेशनी मांडलेली सगळीच मते पटली नाहीत. तशी ती इतर काही जणांनाही पटलेली नाहीत हे त्या चर्चेवरून दिसते. त्या चर्चेचे पर्यवसान दात धरण्यात झाले असे दिनेशनि वर लिहिलेय. हे खरेच असेल तर आश्चर्य आहे. लोक या कारणाने आयुष्यभराचा उभा दावा धरत असतील तर कमाल आहे.
मी दिनेशना व्यक्तिगत रित्या ओळखते, खूप वेळा भेटलोय, ते माझ्या गावच्या घरीही आलेले आहेत. आम्हा निसर्गगप्पा वाल्यांचा मस्त ग्रुप आहे, आम्ही मिळून धमाल करतो. असे असूनही माझे मायबोलीवर आणि आमच्या ग्रुपवर खूप वेळा दिनेशशी वाद झालेले आहेत. मलाही त्यांच्या खूप गोष्टी खटकतात. इथे कोण परिपूर्ण आहे? जिथे खटकले तिथेच मी ते लिहिले आणि पुढे गेले. खटकलेले लक्षात ठेऊन माणसाची सतत पारख करत राहणे आणि त्याला टोचत राहणे, हे इतके गरजेचे आहे का?
दिनेशवर सातत्याने टीका करणारे कोण आहेत हे आता सगळ्यांना कळलेय. दडपून खोटी माहिती देणे आणि माहिती खोटी आहे हे मान्य न करणे या दोन गोष्टींमुळे आम्ही टीका करतो हे कारण बऱ्याच वेळा पुढे केले गेलेय. पण हे खूप सामान्य कारण वाटते. खोटी माहिती देणे योग्य नाहीच पण हा मनुष्यस्वभाव आहे. आणि एखादा 75 टक्के खरी माहिती देत असेल आणि 25 टक्के खोटी देत असेल तर ती खोटी आहे हे दाखवून देण्याचा इतरांना पूर्ण हक्क आहे. जे 75 टक्के माहिती वाचतात तेच तूमची 25 टक्के बरोबर केलेली माहितीही वाचत असणार आणि त्यांना योग्य वाटेल तशी ती 75 टक्के माहितीही with a pinch of salt घेत असणार. पण त्यासाठी दिनेशच्या इथल्या इतर वावरावर जहरी टीका का? वर त्यांनी त्यांच्या इथल्या मैत्रीबद्दल झालेल्या टिकेबद्दल लिहिलेय, सगुणा बाग संदर्भात त्यांच्यावर झालेल्या टिकेबद्दल लिहिलेय. त्या गोष्टींचा त्यांच्या पाकविभागातल्या चुकांशी काय संबंध? जहरी टीका केलीच पाहिजे तर ती जिथे लागू होते तिथे करा, ती तशी न करता तुम्ही जिथे जिथे दिनेश नाव दिसते तिथे टीका करत असाल तर हे बुलीइंग आहे.
मी पुढे दिलेल्या उदाहरणाचा दिनेश ह्या व्यक्तीशी संबंध नाहीय हे लिहून मगच उदाहरण देते, मला उगीच गैरसमज नकोत. तुमच्या ऑफिसात एकजण आहे जो ऑफिसचे त्याचे काम इतर चारचौघांसारखे पार पाडतो. इतर चारचौघाइतक्या चुका करतो, त्यांच्याइतके बरोबरही करतो. तो त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात मात्र चारचौघांसारखा नाहीय. हे फक्त तुम्हाला माहित आहे , बाकी कोणालाही नाही. मग तुम्ही त्याचे ऑफीसातले काम त्या फक्त तुम्हालाच माहीत असलेल्या गोष्टींवरून जोखत राहणार? तुम्हाला ती गोष्ट पटत नसेल तर ती गोष्ट मनात ठेवून त्या अनुषंगाने त्याला त्याच्या ऑफिसतल्या कामावरून घालून पाडून बोलणार?
Pages