अनघाची गोष्ट
ठाणे स्टेशन जवळ येऊ लागले होते. घरी जाऊन काय काय कामे करायची ह्याचाच डोक्यात विचार सुरू होता. मी सीट वरून उठून दाराजवळ यायला लागले. तेव्हड्यात समोर लांब अनघा दिसली. हात उंच करून हसली. मीही सवयीने हसत हात उंच केला. इतक्यात माझ्यामागून आवाज आला . ओ बाई,स्टेशनला उतरायचे आहे ना..मी मागे वळून त्यांना हो म्हणेस्तो समोर बघते तो अनघा दिसेना.आणि अचानक मला एक झटका बसल्या सारखा झाला. अरे बापरे, हिला तर जाऊन दीड वर्ष होऊन गेले .मी झरकन मागे वळून बघितलं,तिथे कोणीच नव्हते. स्टेशन आल्याने मी गर्दीच्या रेट्याने खाली आले. मागे वळून मी आत पाहू लागले . तेव्हड्यात गाडी सुरू झाली .
“ हल्लो, अजित. अरे कुठे आहेस ?”
“अग ताई, किती दिवसांनी फोन करत्येस.”
“ते जाऊदे, आत्ता मला भेटू शकतोस का ?”
“अग मी घरीच आहे . काय एव्हडे खास काम?”
“आल्यावर सागेन”.
मी लगेच माझ्या घरी सासुबाईंना मोबाइल केला.
“हं बोल ग, काय झाल?”
“अहो मी जरा मुलुंडला आई कडे जाऊन येते .अजितला भेटायचेय.”
“का ग, परत काही प्रॉब्लेम ?”
“आल्यावर सांगेन,ह्यांना पण जरा निरोप द्या .”
लगेच रिक्षाने मी मुलुंडला जायला निघाले .
अजित , माहेरी आईच्या बाजूचेच बिर्हाड .लहानपणापासून आम्ही एकत्रच वाढलो .माझ्यापेक्षा आठ वर्षानी लहान. त्यामुळे मला ताई म्हणूनच म्हणायचा .मी एमएससी झाल्यावर एका फार्मासीटीकल कंपनित कामाला लागले. तेव्हा हा सी ए करत होता . नंतर माझ लग्न झाल,...आमोदशी. आमच्या कॉलेज मध्येच होता. ठाण्यात त्यांची दोन मेडिकल दुकान होती.त्याच्याशी माझ लग्न झाल आणि मी ठाण्यात आले. आईकडे येण जाण होतेच . अजित भेटायचं कधीतरी .तो सी ए झाला. त्याला एका मोठ्या फर्म मध्ये चांगल्या पॅकेज ची नोकरी मिळाली . तीन वर्षापूर्वी त्याचे लग्नही झाले .अनघाशी .तीही सी ए होती .एका चांगल्या प्रायवेट कंपनित कामाला होती.त्यांच्या लग्नात खूप धमाल केली होती आम्ही .अनघा चांगली वाटली .अल्लड होती .पण लग्नाच्या वयात कोण एव्हढ मॅचुअर्ड असत . आई कडे गेले की ह्याच्या बद्दल काहीनाकाही बातम्या कळायच्या .
“ताई मला न तुला भेटायचंय .कधी वेळ आहे.”
लग्ना नंतर एखाद वर्षानि मला अजितचा फोन आला
“अरे येन माझ्या घरी.”
“नको. दोघांच्याही घरी नको.”
मग आम्ही दोघे ठाण्यातल्या एका हॉटेलात भेटलो.
“हं बोल”
“अगदी खर सांगू का .अनघाशी मी लग्न करून जरासुद्धा सुखी नाही आहे.”
“अरे बाबा असे झालेतरी काय?”
“खूपच उश्रुंखल आहे ती .जरासुद्धा मॅचुरिटी नाही .खरेतर तिची फॅमिली बॅकग्राऊंड ही फार चांगली आहे असे नाही, पण हिला न तिच्या कल्पनेप्रमाणे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी हव्या आहेत. मोठे घर , मोठी गाडी, खूप दागिने काय न काय ..”
“अरे अजून लहान आहे ती. काही वर्ष गेली न की होईल सगळे व्यवस्थित .”
“झालं तर चांगलेच आहे. पण मला असे कुठे दिसत नाही .तुला कळलच असेल आमच्या घरातील भांडणाबद्दल”
“हं आई म्हणत होती असेच काही “
“अग कुठल्याही छोट्या छोट्या कारणावरून ह्या दोघीची बाचाबाची सुरू होते. आमची आई तुला माहितीच आहे किती व्यवस्थित आहे ती ,तिला हिचा गलथानपणा जराही चालत नाही . हल्ली मला ऑफिस मधून संध्याकाळी घरी यायचीच भीती वाटते. घराचे दार उघडताना माहीत नसते आज कुठल्या कारणावरून हवा गरम असेल ते .हिचा आवाजही एवढा मोठा होतो की आजूबाजूच्या सर्वांना कळते की सिनेमा सुरू झाला म्हणून .”
“ सिनेमा ...”
“हो हो सिनेमा ...एकदा संध्याकाळी घरी येताना कोणीतरी म्हणताना कानावर आल..झाला का ह्या सासुसूनेंचा सिनेमा सुरू. हो आणि दुसर अस की आता त्यातल्यात्यात एक चांगली बातमी तुला सांगायला हरकत नाही, की तू आता आत्या होणार आहेस ते . ही सगळी मारामारी नातवासमोर नको म्हणून आईच म्हणाली की तू आता जवळच वेगळं घर बघ म्हणून. मी नवीन गाडी घेतल्याचेही तुझ्या कानावर आले असेलच .तेव्हा ही असेच झाले. हिला मोठ्ठी गाडी हवी होती .तिला मी म्हटलं की आता आपण मिड सेगमेंट मधली घेऊ.. तर म्हणाली नाही. मग झक्कत मोठी घेतली , मग आल मागे...हाय ई एम आय , हाय इन्शुरेंस .”
“हे बघ प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात .काही दिवसानी तिला हे सर्व पटेल. कदाचित तिची चूक तिला कळेल. मी तिच्याशी काही बोलू का?”
“नकोग बाई ...बघू काय होतय ते, हं आणि काय म्हणतेस ..तुझा मुलगा सर्वेशच काय चाललाय ..”
आणि आमची गाडी दुसर्या विषयावर वळली .
“इथेच उतरायचे होत का बाई “...रिक्शावाला म्हणाला.
“हो हो .थांब बाबा इथेच.”आधी आईकडे न जाता मी अजितच्या घराकडे गेले.
बेल मारल्यावर अजित ने दार उघडले .
“क्या बात है, अशी अचानक.”
“अरे हो. आई कडेही डोकावले नाही अजून .सरळ इथेच आले. काकू कुठे आहेत,आणि छोकरा ..विनीत कुठे आहे”
“अग आई आताच त्याला घेऊन स्टेशन वर गेली आहे,संध्याकाळी हल्ली अशी कुठेतरी फेरी हवीच असते .येईल थोड्या वेळात .बोल काय झालं ग “
“अरे आत्ता गाडीतून येताना न मला अनघा दिसली.”
“काय....”
“हो .म्हणजे बघ, माझा देवावर काय तर भुतावरही विश्वास नाही .पण एव्हढं नक्की सांगते की मला ती दिसली,माझ्याशी हसली आणि हातही केला.मला नक्की भ्रम झाला नाही .पण परत ती काही दिसली नाही .”
“काय सांगतेस काय..अग ती अशाप्रकारे गेल्यावर मलाही कधी दिसली नाही आणि तुला म्हणजे ..”
“अरे असहि नाही झाले की तिचा कधी विषय निघाला होता आणि माझ्या मनात तिचा विचार येत होता .आत्ताही माझ्या डोळ्यसमोर ते दृश्य नीट दिसतय.म्हणजे अस म्हणतात ना की अमुक माणसाला ह्या देवाने दर्शन दिले .तर मला असे वाटते की त्या माणसाच्या मनात चोवीस तास त्या देवाच्या प्रतिमेचा विचार, मनन, चिंतन चालू असते. त्यामुळे एखाद्यावेळी मनाच्या अशा अवस्थेत त्याला प्रत्यक्ष ती मूर्ति ,ती प्रतिमा समोर दिसत असेल आणि त्याला वाटत असेल की देवाने मला दर्शन दीले..म्हणजे आज हे सर्व बघितल्यावर माझ्या मनात हे विचार आले .”
“मला तर काही सुचतच नाही.”
“आपण खरेतर आधी ह्या विषया वर बोलण्याकरता भेटलो होतो, पण अनघाने जेव्हा सुसाईड केले तेव्हा आम्ही बाहेरगावी गेलो होतो.इथे आल्यावर आपण भेटलो पण काही ना काही कारणाने तुझ्याशी व्यवस्थित बोलणं झाल नाही .आईकडून तस कळले होते. काही सणानिमित्ताने मी आईकडे यायची पण अशा प्रसंगी हा विषय बोलणे प्रशस्त वाटेना .शिवाय मध्ये आमच्या सासूबाईहि खूप आजारी होत्या. त्त्यामुळे आपल बोलण राहूनच गेले होते. पण खर सांग,तिने अशी ही सुसाईड करायची स्टेप का घेतली असेल?”
“अग मलाही अजून पूर्ण कळले नाही की ती अशी का वागली. मध्ये आपण एकदा भेटलो होतो ना त्या नंतर तिच्यात फरक पडला पण तो नेगेटिव्ह,म्हणजे तिचा आक्रस्तळेपणा दिवसेंदिवस वाढतच होता.आई व तिच्या भांडणाची कटकट नको म्हणून मी हायवे पलीकडे कमी रेट्ने दोन वर्षात पझेशन मिळेल असा फ्लॅट बूक केला , तेव्हाही मारामारी . तिला मोठा फ्लॅट हवा होता. मी किती समजावले की ऑलरेडी गाडीचा ई एम आय चालू आहे, जरी तुझाही पगार असेल तरी आपल्याला येणार्या छोट्या करता काही फंड बाजूला ठेवावा लागेल.पण नाही , रोजच्या भांडणाळा कंटाळून मोठा फ्लॅट बुक केला. “ मध्येच त्याने एक दीर्घ श्वास घेतला.
“मग विनीत झाला. तीन महिन्या नंतर आई म्हणत होती की त्याला ती सांभाळेल म्हणून पण हिने त्याला डे केअर सेंटर मध्ये ठेवले . फ्लॅट मिळायला अजून वेळ लागेल असे बिल्डर म्हणत होता. त्यामुळे सगळीकडून माझी गळचेपी होत होती . रोजचं काहीनाकाही चालू असायचे . विनीत सहा महिन्याचा झाल्यावर हिच्या मनात काय आल माहीत नाही .तिला असे वाटायला लागले की ती खूप जाडी झाली आहे.मला म्हणाली की मी जाडी झाली आहे कारे. मी म्हटले अग मूल झाल्यावर सगळ्याच जणी थोड्या सुटतात ,पण थोड खाण्यावर कंट्रोल कर व थोडा व्यायाम कर. सगळं व्यवस्थित होईल .पण कसलं काय,हिने लगेच एका जीम मध्ये नाव घातलं . हिने एकदा मनावर घेतले की ती गोष्ट व्ह्यायलाच हवी. महिनाभर कडक डाएट व व्यायाम. एका महिन्यात हिने आठ किलो वजन कमी केले .हिचा फोटो त्या जीम वाल्यांनी जीम बाहेर लावलाच पण मोठ्या त्यांच्या होर्डिंग वरही दिला.ह्या बाई खुश. पण त्यानंतर काय माहीत नाही ही जास्तच विचित्र वागायला लागली ...”
अजित भडभडा बोलत होता . मी काही मध्ये त्याला थांबवले नाही.
“विचित्र म्हणजे..”
“तीच वजन एकदम एवढं कमी झाले की तिला साध चालताना धाप लगायला लागली .चेहरा एकदम सुकल्यासारखा झाला.”
“अरे पण अस काय घडलं होते की तिला एकदम आत्महत्या करावीशी वाटली”
“खरे तर मलाही अस काही खास आठवत नाही..हा पण आदल्या दिवशी तिने लकडा लावला होता की तिला ह्या घरातील सर्व फर्निचर बदलून हवे होते .मी म्हटलं की अग हा काय वेडेपणा आहे.आपल्याला फ्लॅट मध्ये गेल्यावर नवीनच सर्व फर्निचर घ्यायचेच आहे ना,आता इथे मी परत नवीन खर्च करणार नाही.तर ति एकदम रागावली होती .त्या आदल्या रात्रीही ती माझ्याशी काहीही बोलली नाही.त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे विनीतला डे केअर मध्ये सोडून ऑफिसला गेलो.आईने सकाळीच मला, पण हिला कळेल अश्या भाषेत जोरात संगितले की ती आज तिची मामी जी वेस्टला राहते तिच्या कडे दिवसभर जाणार आहे . मी ऑफिस मध्ये गेल्यावर एकदा बारा साडेबाराला तिला मोबाइल केला होता.पण तो बंद होता. परत लंच टाइम मध्ये फोन लावला,परत बंद.एकदा वाटलं असच घरी जाव पण तेव्हाढ्यात माझ्या बॉसनि काही काम मला दिले.आणि साडेतीन नंतर शेजार्यांचा माझ्या मोबाईलवर फोन आला की लगेच जसे असाल तसे निघा ,अनघाला काहीतरी झालाय . तसाच धावत निघालो. घरी येऊन बघतो तर दाराबाहेर ही गर्दी .पोलिस ही होते ,म्हणजे नेमकं काय झालय तेच मला कळेना . झाल अस होत की तीन वाजता कामवाल्या बाई आल्या .शेजारून त्या चावी घेऊन नेहमीप्रमाणे घरात शिरल्या आणि अनघाला बेडवर अस्ताव्यस्त पडलेली बघून ओरडतच बाहेर आल्या . मग शेजारी आले . बेगोन चा वास सगळीकडे भरून राहिला होता . ती जीवंत नव्हतीच .तरी त्यांनी डॉक्टर ना बोलावले .डॉक्टरांनी पोलिसांना फोन केला कारण ही आता सुसाईड ची केस झाली होती. “
त्या सर्व आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागले .मी उठले आणि फ्रीज मधील पाण्याची बाटली त्याला दिली.थोड पाणी प्यायल्यावर त्याला बारे वाटले .
“मी तिला बघितले, अशी बेडवर अस्ताव्यस्त पडलेली होती .सुसाईड का, कशाकरता ...मला काहीच समजेना, डोक एकदम बधिर झाल होत. ती सकाळी ऑफिसला न जाता बाहेर पडून बेगोन ची बाटली घेऊन आली .वॉचमननेही तिला विचारले की काय आज ऑफिस ला गेला नाहीत का म्हणून,पण तिने त्याला उत्तर काय पण त्याच्याकडे बघितलेही नाही आणि घरी येऊन सगळि बाटली प्यायली. अग त्याचा वासच एव्हढा भयानक येत होता आणि ही सगळी बाटली प्यायली कशी . तिच्या मनात माझा जाऊदे पण विनीतचाही विचार आला नाही का ग ...”असं म्हणत तो ओक्साबोक्षी रडू लागला.
मी उठले आणि त्याला जवळ घेतले. आईच्या कुशीत शिराव तसे शिरून तो रडू लागला . थोडावेळ मी त्याला थोपटत होते.
“अगदी खर सांगू ताई, ते सर्व बघून माझ्या मनात पहिलं काय आल असेल तर मी आईचे व देवाचे आभार मानले .जर आई घरात असती किवा मी लवकर घरी आलो असतो तर पोलिसांनी आम्हा दोघावर संशय घेतला असता की आम्हीच दोघांनी मिळून हिला ते पाजले म्हणून,कारण आमच्याघरी सासू सुनेची नेहमी भांडणे होतात हे तर जगजाहीर होते.”
“बापरे सर्वच भयानक आहे रे, पण मला आजूनही तिच्या आत्महत्येचे कारण पटत नाही म्हण किवा कळत नाही म्हण. आणि एक विचारू का? कारण माहीत नाही पण त्या विचित्र गोष्टीमुळे असेल, मला इथे बसून खूप दडपल्या सारखे होतेय रे. ती गेल्यावर ह्याच घरात तूला कधी भीती ....”
“हो, ती अशी गेली आणि मी अक्षरशः उन्मळून पडलो .मला समजेचना की माझे काय चुकले. पहिला जवळ जवळ महिना भर मी ह्या बेडवर झोपू शकलो नाही . इथे ह्या रूम मध्ये आलो की घाबरायला व्ह्यायचे ,ती अशी अस्ताव्यस्त पडलेलीच डोळ्यासमोर यायची,ती बेगोन ने ओली झालेली बेडशीट ,तो त्याचा भयानक वास , आणि मग मला इथे ह्या बेड वर झोपायची हिम्मतच व्हायची नाही. सुरवातीलातर रात्री ह्या रुमच्या बाहेरुन पाणी प्यायला जायची ही भीती वाटायची .पण मग मी ठरवले की असे घाबरून चालणार नाही.मग बेडवरच्या सर्व वस्तु बदलल्या. अगदी बेडशीट, पिलोकव्हर सुद्धा .आता एव्हढ काही वाटत नाही .
पण एक गोष्ट मी केली की एका मित्राच्या ओळखींच्या सायकीयाट्रिस्ट कडे गेलो , माझ्या डोक्यातील गुंता सोडवायाला.त्यांना मी घडलेले सर्व काही संगितले. ते शेवटी तिच्या जीमवर येऊन थांबले .त्यांनी दोन दोनदा विचारले की एक महिन्यात किती किलो वजन कमी केले? त्यांच्या म्हणण्यानुसार हल्ली त्यांच्याकडे अशा काही केसेस येऊ लागल्यात की ज्यात महिन्या दोन महिन्यात खूप वेट कमी केलेल्या केसेस मध्ये ती माणसे नेहमीपेक्षा वेगळी वागतात . मध्ये ते एका अशा कोन्फरन्सलाही गेले जिथे ह्या अश्या केसेस ची चर्चा झाली .त्यांनी संगितले की आपला मेंदु हा आपल मन, विचार तसेच शरीराचे समतोल राखतो .जेव्हा तुमचे वजन वाढते तेव्हा समजा ते सहा महिन्यात वीस किलो वाढले असेल तर आपल्या मेंदुला तशी त्या वाढत्या शरीराची हळूहळू सवय होते.आपले रिफ्लेक्सेस तसे चेंज होत जातात ,पण जेव्हा आपण आपले वजन महिन्याभरात एकदम आठ किलो कमी करतो तेव्हा त्यालाही आपल्या ह्या अचानक कमी झालेल्या शरीराच्या वजनाशी मॅच व्हायला वेळ लागतो, मध्येच कधीतरी त्याचा मनावरील किवा विचारावरील ताबा सुटतो आणि माणूस त्यावेळी अनप्रेडिक्टेबल वागतो. तसे वागताना त्याच्या बरोबर जर कोणी नसेल तर तो काहीही करतो. युवर्स माइट बी सेम केस, अस ते म्हणाले”
“म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार सुसाईडच हेही एक कारण असू शकेल?”
“माइट बी.. पण मला स्वतःला हे कारण बरेचसे पटले. कुठलीही आई नवर्याशी कितीही भांडली तरी तिला लहान मूल असताना इतकी टोकाची ती स्टेप घेणार नाही.”
“इतक्या लहान वयाचा हा, कठीण गेल असेल न ह्याला वाढवायला . रागाऊनकोस पण मग तुला दुसरे लग्न...”
“अग वर्षभराने आईही मागे लागली होती,तिलाही आता आजारपणामुळे काम होत नाही. अनिच्छेने का होईना दोन तीन मुली पाहिल्या . ताई, काय होते महित्ये का की आपण म्हणतोना की दुधाने तोंड भाजल्यावर माणूस ताकही फुंकून पितो तसे होते ह्या दुसर्या लग्नाच्या वेळी .प्रत्येक जण एका लग्नाचा फटका खाऊन आलेला असतो, त्यामुळे सर्वजण साशंकच असतात . मला मोठा प्रॉब्लेम आला म्हणजे मी सरळ सांगायचो की हिने सुसाईड केले आहे म्हणून . बापरे, त्यावर काय काय प्रश्न..तिने अस का केले,तुम्ही कींवा तुमची आई..असा कोणाचा तिला त्रास होता का . कारण सुसाईड हे माणूस तेव्हाच करतो जेव्हा त्याला सहन करण्या पलीकडे त्रास होतो. मला हे आधी माहीत असते तर मी इथे येऊन वेळ फुकट घालवला नसता .एकीने तर सरळ विचारले की हा मुलगा तुमचाच आहे ना की तुम्हाला काही सेक्षुयल प्रॉब्लेम आहे...असले प्रश्न ऐकल्या वर मी ठरवून टाकले की आता मीच ह्याचा बाबा व मीच ह्याची आई .”
इतक्यात दारावरची बेल वाजली .मी उठून दार उघडले, काकु विनीतला घेऊन आल्या होत्या. त्याच्या हातात आइसक्रीम होते.
“आजीकडे हट्ट धरलास का? तुला मी संगितले होते ना की रोज संध्याकाळी फिरायला गेल्यावर आजीकडे काहीही मागायचे नाही म्हणून, बॅड मॅनर्स ...”
बाबाची भूमिका सोडून त्याची आता आईची भूमिका सुरू झाली तर ...मी त्याच्याकडे पाहतच राहिले ...
पण अजूनही घरी परतताना हा प्रश्न मनात घोंगावत होताच की अनघा मला गाडीत दिसली तो भ्रम होता की......
खूप छान शब्दात मांडलाय सर्व
खूप छान शब्दात मांडलाय सर्व प्रसंग ....... फार हृदयद्रावक घटना आणि तरीही जीवनातील सत्याला सामोरे जाणाऱ्या ह्या धारीष्ट्याला सलाम !
कथा आवडली!!
कथा आवडली!!
कथाबीज छान,लेखनशैली सुंदर, पण
कथाबीज छान,लेखनशैली सुंदर, पण कथा अर्धवट वाटली..
नक्की काय सांगायचे आहे ते कळले नाही... क्रमशः आहे का?
कथाबीज छान,लेखनशैली सुंदर, पण
कथाबीज छान,लेखनशैली सुंदर, पण कथा अर्धवट वाटली..
नक्की काय सांगायचे आहे ते कळले नाही... क्रमशः आहे का?>>>>> +11
Nice story
Nice story
मस्त वाटली....!!! आजकाल
मस्त वाटली....!!! आजकाल मुलींचा पारा हा मुलांच्या रागापेक्षा दिवसेंदिवस खुप वाढत आहे....!!
चांगली लिहिली आहे. पण क्रमशः
चांगली लिहिली आहे. पण क्रमशः आहे का?
कथा आवडली!!
कथा आवडली!!
छान लिहीली आहे. आवडली.
छान लिहीली आहे. आवडली.
अर्धवट वाटतीये, अनघा तीला का
अर्धवट वाटतीये, अनघा तीला का दिसली हे अनुत्तरीतच राहीलेय.
छान लिहिलिये..अनघा नसती दिसली
छान लिहिलिये..अनघा नसती दिसली तरी चाललं असतं बहुतेक..
मला नीट कळली नाही.अनघा का
मला नीट कळली नाही.अनघा का दिसली मग ????
नक्की काय सांगायचे आहे ते
नक्की काय सांगायचे आहे ते कळले नाही...
..अनघा नसती दिसली तरी चाललं असतं बहुतेक..
>>>
+११११११
नमस्कार मीत्रांनो . बर्याच
नमस्कार मीत्रांनो . बर्याच वरश्यांच्या गॅप नंतर ही कथा पोस्ट केली आहे. ही अगदी सत्य घटना आहे. संवाद काल्पनिक आहेत पण प्रसंग अगदी खरे घडलेले आहेत. अनघा जीच नाव बदललेले आहे ती ट्रेन मध्ये दिसली हेही सत्य आहे. ती का दिसली ह्याचे मलाही कोडे आहे.पण बाकीचे प्रसंग अगदी जसेच्या तसे लिहिले आहेत. ती ट्रेन मध्ये दिसल्यावर तिच्या नवर्याला भेटण्याची उर्मि झाली हेही सत्य आहे. तुमच्या प्रमाणे मीही अजून गोंधळलेला आहे .तिच्या दिसण्याचा व लगेच त्यांचं घर गाठण्याचा कुठेतरी संबध असावा असे वाटले म्हणून तोही प्रसंग मी कथेत समाविष्ट केला .
प्रतिसादा बद्दल आभार.
प्रतिसादा बद्दल आभार.