श्रीमती शांता शेळके - 'लताबाई'

Submitted by चिनूक्स on 28 September, 2009 - 13:48

lata_M.jpg

छाया - श्री. मोहन वाघ , प्रताधिकार - श्री. मोहन वाघ

'मराठा तितुका मेळवावा'पासून 'हे गीत जीवनाचे'पर्यंत शांताबाईं शेळक्यांनी लिहिलेली असंख्य गीतं लतादीदी गायल्या. पण यापलीकडेही दोघींचं अतिशय दृढ असं मैत्र होतं. माई मंगेशकर तर शांताबाईंना आपली मुलगीच मानत.

'वडीलधारी माणसं' या व्यक्तिचित्रसंग्रहात शांताबाईंनी 'दुर्गाबाई', 'वहिनी', 'साहेब', 'आशा' अशी काही विलक्षण व्यक्तिचित्र रेखाटली. आचार्य अत्रे, श्री. म. माटे, दुर्गाबाई भागवत, आशा भोसले यांची ही व्यक्तिचित्रं शांताबाईंच्या ऋजु स्वभावाचं दर्शन तर घडवतातच, पण या सर्वार्थानं मोठ्या माणसांचं अस्सल माणूसपणही समोर आणतात.

Shantabai_Shelke.jpg

प्रताधिकार अज्ञात

'लताबाई' हे याच पुस्तकातलं श्रीमती लता मंगेशकरांचं व्यक्तिचित्र. या दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वांतलं जिव्हाळ्याचं नातं समोर आणणारं. शांताबाईंनी लतादीदींबद्दल लिहिलेला हा सुंदर लेख लतादीदींच्या सहस्रचंद्रदर्शनसोहळ्यानिमित्त पुनर्प्रकाशित करत आहोत.
_________________________________________________

संध्याकाळचे सात वाजून गेले आहेत. मुंबईच्या फोर्ट विभागातल्या 'शिरोम' या अँटिक्स विकणार्‍या दुकानात खरेदीसाठी आलेल्या लताबाई खरेदी आटोपून बाहेर पडतात. पटांगणात उभ्या असलेल्या आपल्या गाडीत येऊन बसतात. दुपारचे रेकॉर्डिंग, नंतरचे हिंडणे, खरेदी ह्यामुळे त्या खूप दमल्या आहेत. इतक्यात पंधरासोळा पारशी शाळाकरी मुली तिथे येतात. लताबाईंची गाडी त्यांनी ओळखली आहे. त्याबाहेर आल्या की त्यांचा ऑटोग्राफ घ्यावा असा त्या मुलींचा बेत आहे. मी त्या मुलींचे उत्सुक हसरे चेहरे, डोळ्यांतली अपेक्षा बघते. मला प्रश्न पडतो, इतक्या दमलेल्या लताबाई या मुलींना सह्या देतील ? पण लताबाईंनी केव्हाच त्यांचे हसून स्वागत केलेले असते. गोळा झालेल्या मुलींची त्या प्रेमाने विचारपूस करतात. आणि मग एकूण एका मुलीची छोटी वही, ऑटोग्राफ बुक, कागदाचा सुटा कपटा - जे काही पुढ्यात येईल त्यावर त्या सही करतात. सार्‍या मुली आनंदाने परत गेल्यावर मगच त्या आपल्या ड्रायव्हरला गाडी तिथून बाहेर घ्यायला सांगतात.

असाच आणखी एक प्रसंग. माझी तेव्हा लताबाईंची नुकतीच कुठे ओळख होऊ लागली होती. त्या दिवसांत एकदा त्यांनी मला सुप्रसिध्द जादूगार के. लाल यांचे जादूचे कार्यक्रम बघण्यासाठी आपल्याबरोबर नेले. त्यानंतर दोनतीन दिवसांनी मी त्यांच्या घरी गेले तेव्हा त्या घरातल्या मंडळींना आपण पाहिलेल्या कार्यक्रमातल्या गंमती सांगत होत्या. मध्येच त्यांनी के. लाल यांच्या बोलण्याची नक्कल सुरु केली. के. लाल यांची निवेदनपद्धती, त्यांचे विशिष्ट उच्चार, कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांची मने वेधून घेण्यासाठी त्यांनी वापरलेल्या युक्त्या, त्यांच्या बारीकसारीक लकबी यांचे असे हुबेहूब चित्र लताबाईंनी ऐकणार्‍यांसमोर उभे केले की, घरातल्या माणसांना हसता हसता पुरेवाट झाली. लताबाई नकला छान करतात असे तोपर्यंत मी नुसती ऐकून होते. पण त्या नकलांचा दर्जा इतका वरचा असेल याची मला कल्पना नव्हती. खरे म्हणजे के.लाल यांचा तो कार्यक्रम लताबाईंबरोबर मीही पाहिला होता. पण तेव्हा माझ्या नजरेतून सुटून गेलेले कितीतरी बारकावे आता लताबाईंनी केलेली ती नक्कल बघताना माझ्या ध्यानात आले. ती नक्कल बटबटीत नव्हती. केवळ इतरांना हसविणारीही नव्हती. लताबाईंचे सूक्ष्म अवलोकन, त्यांची स्मरणशक्ती, पाहिलेल्या वा ऐकलेल्या गोष्टींतला गंमतीदार तपशील नेमका टिपून घेणारी त्यांची तल्लख विनोदबुध्दी या सार्‍यांचा त्यातून प्रत्यय येत होता. त्यांची नाट्याची जाणही स्पष्ट होत होती.

गेल्या पंचवीससव्वीस वर्षांत लताबाईंची जवळीक, त्यांचा सहवास आणि स्नेह मला लाभला. त्या काळात ध्यानात राहून गेलेल्या त्यांच्या असंख्य आठवणींमघल्या या दोन आठवणी.

लताबाईंशी माझा प्रथम संपर्क आला तो चित्रपटांतली गाणी लिहिण्याच्या निमित्ताने. त्यावेळी त्या 'आनंदघन' या नावाने मराठी चित्रपटांना संगीत देत होत्या. त्यांच्याबरोबर काम करायचे या कल्पनेने प्रथम माझ्या मनावर मोठेच दडपण आले होते. पण प्रत्यक्षात तो एक अतिशय सुंदर, सुखद अनुभव ठरला. गाणी करताना त्या पुढ्यात पेटी घेऊन बसत. "मला पेटी फार चांगली वाजवता येत नाही हं !" असे हसत हसत म्हणून पेटीवर मला चाली सांगत. 'मराठी तितुका मेळवावा', 'तांबडी माती', 'मोहित्यांची मंजुळा' अशा चित्रपटांची गाणी मी त्यांच्याबरोबर केली. ही गाणी करताना त्या त्या चालींचा उगम त्या मला सांगत. काही गाणी आपल्या आजीकडून ऐकलेल्या जुन्या लोकगीतांच्या चालीवर त्यांनी बसवली आहेत तर 'रेशमाच्या रेघांनी' ही लावणी त्यांनी एका कानडी गाण्याच्या चालीवर स्वतंत्र चाल बांधून केली आहे. सहजता, सोपेपणा, चालींचे अस्सल मराठमोळं वळण आणि विलक्षण गोडवा ही त्यांच्या स्वररचनेची वैशिष्ट्ये मला प्रामुख्याने जाणवली. काम करताना मला कंटाळा आला, काही सुचत नाहिसे झाले तर त्या माझ्यासाठी चहा मागवत. आणि म्हणत "काम राहू द्या. आज आपण नुसत्या गप्पाच मारू." मग तोही वेळ फार मजेत जाई. त्यावेळी त्यांच्या तोंडून गाणी ऐकणे, गीतांची चाल, शब्दरचना यांवरचे त्यांचे भाष्य ऐकणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव असे. त्यांच्याबरोबर काम करताना मनाने मी कधी मोकळी होत गेले, माझा प्रारंभीचा संकोच कसा मावळला हे माझे मलाही कळले नाही.

सुरुवातीच्या काळात माझ्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाला मी हजर रहात असे. लताबाईंशी जसा अधिक परिचय झाला तशी त्यांच्या गाण्यांच्या रेकॉर्डींगलाही मी जाऊ लागले. त्यांची ही बहुतेक गाणी हिंदी चित्रपटांमधली असत. पण हिंदीप्रमाणे मी लताबाईंची बंगाली, मराठी, गुजराती, मराठी गाणीही खूप ऐकली. ताडदेवचा रेकॉर्डींग स्टुडिओ, तिथून जवळ असलेले फिल्म सेंटर, दादरची बाँबे लॅबोरेटरी, वांद्र्याचा मेहबूब स्टुडिओ ही मुंबईतली चित्रपटगीतांच्या ध्वनिमुद्रणाची प्रमुख ठिकाणे आहेत. पण परळच्या शांतारामबापूंचा राजकमल स्टुडिओ आणि ताडदेवचा शशांक यांचा छोटा पण सुसज्ज स्टुडिओ इथेही लताबाईंची ध्वनिमुद्रणे मी ऐकली आहेत. कधी मी लताबाईंच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर स्टुडिओत जाई तर कधी माझ्या घरून त्यांना फोन करून त्यांचे गाणे कुठल्या स्टुडिओत होणार आहे हे आधी विचारून घेई आणि माझ्या कॉलेजमधून परस्पर तिकडे जाई. त्याही मला हौसेने बरोबर नेत. कधी एखादे गाणे त्यांच्या दृष्टीने विशेष चांगले किंवा वेगळे असेल तर त्या मला फोन करून सांगत, "उद्या अमुक अमुक ठिकाणी माझे रेकॉर्डिंग आहे. येणार का?"

लताबाईंच्या अशा ध्वनिमुद्रणाच्या कितीतरी आठवणी सांगण्याजोग्या आहेत. त्यांच्या गाण्यातली समृध्दता, विविधता, वैपुल्य यांच्या जशा त्या निदर्शक आहेत तशा कलाकार म्हणून आणि माणून म्हणूनही लताबाईंचे मोठेपण त्या व्यक्त करणार्‍या आहेत. एक प्रसंग मला आठवतो. त्या दिवशी मेहबूब स्टुडिओत त्यांचे रेकॉर्डिंग होते. सहसा एका दिवशी एकापेक्षा अधिक गाणी त्या हल्ली करत नाहीत. पण त्या दिवशी कशी कोण जाणे, दोन गाणी त्यांना करायची होती. शिवाय आणखी एका गाण्याचे पहिले कडवे, प्रारंभीच्या ताना ध्वनिमुद्रित करणे आवश्यक होते. कारण निर्मात्यांना ती टेप त्या दिवशीच रातोरात कलकत्त्याला पाठवून द्यायची होती. तो गुरुवारचा दिवस होता. गुरुवारी लताबाईंचा उपास असतो. सकाळी त्या नुसती कॉफी घेऊन आल्या होत्या. पहिली दोन गाणी झाल्यावर त्या थोडा वेळ काढणार होत्या, आणि जवळच खारला पंडित नरेंद्र शर्मांचे घर होते, तिथे जाऊन उपासाचे काही खाऊन येणार होत्या. मी पहिल्या स्टुडिओत गेले तेव्हा पहिल्या गाण्याची रिहर्सल चालू होती. लताबाईंची मला आपला बेत सांगितला. त्या म्हणाल्या,
"ही गाणी झाली की आपण पंडितजींकडे जाऊन येऊ. मग उरलेलं लहानसं रेकॉर्डिंग आहे ते मी नंतर उरकून टाकेन."

पण त्या दिवशी लताबाईंना काही खायला मिळावे असा योगच नव्हता. पहिली दोन गाणी आटपायला मुळी चार वाजून गेले. लताबाईंनी मुकाट्याने फराळाची आशा सोडून दिली. आपल्या ड्रायव्हरबरोबर पंडितजींच्या घरी तसा निरोप पाठवला. थोडीशी कॉफी घेतली आणि तिसर्‍या गाण्यासाठी त्या माईकसमोर उभ्या राहिल्या. सर्व काम आटोपून घरी जायला त्या दिवशी त्यांना सात साडेसात वाजले असतील.
त्याच दिवशी घडलेला आणखी एक लहानसा प्रसंगा माझ्या ध्यानात राहून गेला आहे. त्या दोन गाण्यांतल्या एका गाण्याबरोबर कोरस होता. कोरसला नेहमीच्या गायिका हजर होत्या. गाणे संपल्याबरोबर त्यांतली एक आत आली आणि एकदम खाली वाकून लताबाईंचे पाय धरून गहिवरल्या स्वरात म्हणाली, "लता, तुम सचमुच देवी हो. कितना अच्छा गाती हो. भगवान तुम्हे सदा सुखी रखे."
तिचं ते पाय धरणे बघून लताबाई विलक्षण अवघडून गेल्या. त्यांना फार चमत्कारिक वाटले. त्यांनी तिला उठवून आपल्या शेजारी बसवले. तिला कॉफी दिली. अत्यंत मायेने तिची विचारपूस केली. ती गायिका जरा सावरली. ती गेल्यावर लताबाई म्हणाल्या,
"ही चाँद. एकेकाळी फार चांगली गात असे. तिला थोडंफार नावही होतं. आज तिची परिस्थिती बिकट आहे. आणि पोटासाठी बिचारी 'कोरस' मध्ये गाते आहे." चाँदला बघून लताबाईंचे मन फार विषण्ण झाले होते, आणि अंत:करण हेलावून गेले होते.

लताबाईंची गाणी ऐकत असताना मला त्यांच्याबरोबर हिंदीतल्या इतरही किती गायक-गायिकांची गाणी ऐकायला मिळाली. आशा, उषा यांच्याबरोबर त्यांची द्वंद्वगीते मी ऐकली, तशीच महंमद रफी, किशोरकुमार, मुकेश, हेमंतकुमार यांच्याबरोबर त्यांची अनेक द्वंद्वगीते ऐकायला मिळाली. नौशाद, मदत मोहन, बर्मनदा, रोशन अशा बुजुर्ग संगीतदिग्दर्शकांपासून तो कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा त्यावेळी जरा नव्या असलेल्या संगीतदिग्दर्शकांपर्यंत अनेकांची गाणी करताना मी त्यांना पाहिले. बरेच गायक हे लताबाईंचे वर्षानुवर्षांचे सहकारी. बरोबरीने काम करणारे कलावंत. त्यांच्याशी लताबाई खूप खेळीमेळीने वागत. किशोरकुमार त्यांना 'लता'च म्हणत. ते गाण्यासाठी स्टुडिओत आले की अगदी धमाल उडवून देत. सैगलपासून अनेक जुन्या गायकांच्या ते हुबेहूब नकला करत. गाताना मजेदार आविर्भाव करत. एकदा एका द्वंद्वगीतात नायक वेलीवरची फुले की फळे काहीतरी तोडत आहे असे वर्णन कवीने केले होते. ते गाणे गाताना किशोरकुमार यांनी गाण्याच्या ठेक्यावर फुलेफळे खुडण्याचा अभिनय सुरु केला. ते बघताना लताबाईंना हसू आवरेना. शेवटी त्या म्हणाल्या, "किशोर, अब ये तुम बंद नही करोगे तो मै गाऊंगीही नही !" मग किशोरकुमारांचे हातवारे थांबले आणि दोघांचे गाणे ध्वनिमुद्रित झाले.

आणखी एक आठवणीत राहून गेलेला प्रसंग. ताडदेवच्या स्टुडिओत एका हिंदी चित्रपटातल्या गाण्याचे ध्वनिमुद्रण चालू होते. लताबाई मुकेशबरोबर गात होत्या. त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक. मुकेशना काही केल्या गाणे जमेना. पाचसात रीटेक झाले. संगीत दिग्दर्शकाने गाणे ओ.के. केले. परंतु मुकेश मात्र मनातून नाराज होते. लताबाईंच्या ते ध्यानात आले. त्या मुकेशना म्हणाल्या, "मुकेशभय्या, तुम्ही अगदी काळजी करू नका. तुमचं गाणं छान झालेलं आहे. पण तरीदेखील तुमचं पुरेसं समाधानं झालेलं नसेल तर दोन दिवस थांबा. मी कोल्हापूरला जाऊन येणार आहे. मी आल्यानंतर आपण स्टुडिओ 'बुक' करू आणि हे गाणं पुन्हा रेकॉर्ड करू. मी तशी व्यवस्था करीन." त्या दिवशी मी तिथे हजर होते. घरी येताना मी लताबाईंना म्हटले, "लताबाई, तुम्ही मुकेशना किती धीर दिलात. एरवीसुद्धा तुम्ही गाताना खूप सहनशीलपणा दाखवता. कधी चिडत नाही कंटाळत नाही. कसं जमतं हे तुम्हाला?"
त्यावर लताबाई म्हणाल्या, "गाण्याचं रेकॉर्डिंग ही तशी फारच अवघड गोष्ट आहे. संगीतदिग्दर्शक, वादक, गायक, रेकॉर्डिस्ट हे सगळेच अशा वेळी फार नाजूक मनःस्थितीत असतात. त्यात गाणार्‍याच्या मनावर तर विशेष ताण असतो. गाणे नीट जमत नाही असं वाटलं तर गायक हवालदिल होतो. आपल्यामुळे बरोबरच्या आर्टिस्टला पुन्हा पुन्हा गावं लागत आहे, एकसारखे रीटेक होताहेत असं दिसायला लागलं तर त्याला आणखीनच अवघडल्यासारखं होतं. अशा वेळी त्याला धीर देणं, संभाळून घेणं सार्‍यांचंच कर्तव्य असतं. मुकेशभय्या फार मोठे कलावंत आहेत. ते फार सेन्सिटीव्ह आहेत. त्यांच्या मनाला आज किती त्रास झाला असेल ते मी ओळखू शकते. मागं काही वर्षांपूर्वी मी सायनस मुळे आजारी होते. त्यावेळी मीदेखील अशा मन:स्थितून गेले आहे. अशा वेळी गाणार्‍याला किती वाईट वाटतं ते मी अनुभवलं आहे."
लताबाईंच्या या उद्गारातून कलावंत म्हणून मला त्यांच्या मनाचा आणखी एक सुंदर पैलू दिसला. त्या हा प्रसंग कदाचित विसरून गेल्या असतील. माझ्या मात्र तो कायमचा ध्यानात राहून गेला आहे.

लताबाईंचे स्पष्ट आणि निर्दोष शब्दोच्चार हे त्यांचे एक वैशिष्ट्य समजले जाते. पण ही गोष्ट त्यांनी परिश्रमाने साध्य केली आहे. संस्कृतच्या श्लोकांची त्यांना संथा देण्यासाठी या मुलांच्या बालपणी त्यांच्या वडिलांनी - दीनानाथांनी- शिक्षक ठेवले होते. त्यामुळे शुद्ध शब्दोच्चाराचे लताबाईंना बाळपणापासून वळण लागलेले आहे. मराठी साहित्याचे, काव्याचे त्यांचे वाचन चांगले आहे. गडकर्‍यांचे 'भावबंधन'सारखे नाटक, त्यांच्या अनेक कविता लताबाईंना पाठ आहेत. बी कवी, तांबे, माधव ज्यूलियन, बालकवी यांच्या अनेक कविता ध्वनिमुद्रित करताना ते कवीही त्यांनी कसून वाचले आहेत. हे सर्व करताना उच्चारांच्या निर्दोषतेकडे त्यांनी बारकाईने लक्ष पुरवले आहे. उच्चारांबद्दल त्या किती साक्षेपी व जागरूक असतात याचे मला एक उदाहरण आठवते. मी कोळीगीते लिहिली. ती लताबाई गाणार होत्या. मी कोळी भाषेतील लोकगीते वाचून साधारण रचना केली होती. पण तेवढ्याने लताबाईंचे समाधान होईना. त्या मला म्हणाल्या, "शांताबाई, तुम्ही कोळी नाही आणि मीही कोळी नाही. शब्दाचे खास कोळ्यांच्या वळणातले उच्चार झाले नाहीत तर गाणी बिघडतील. तेव्हा आपण वरळीकर आणि पार्टीच्या कलाकारांना बोलावून घेऊ. मी त्यांच्याकडून सर्व उच्चार नीट समजावून घेते. आणि मगच गाणी रेकॉर्ड करू."

आणि त्यांनी तसेच केले. कोळी कलाकारांकडून शब्दांचे विशिष्ट उच्चार, त्यांचा खास ढंग व लय, 'बाई' ऐवजी 'बय' म्हणणे या सार्‍या बारकाव्यांचा तपशील समजावून घेतला. गाण्यांची रिहर्सल त्यांना ऐकवली, आणि मगच कोळीगीते ध्वनिमुद्रित केली. लताबाईंच्या बंगाली गाण्यांची अनेक ध्वनिमुद्रणे मी ऐकली आहेत आणि बंगाली शब्दांच्या योग्य उच्चारांबद्दलचा त्यांचा साक्षेपही पाहिला आहे. बंगालमध्ये दसर्‍याच्या कालीपूजेच्या खास पूजा ध्वनिमुद्रिका काढतात. त्यासाठी कितीतरी गाणी लताबाईंनी गायली आहेत. सलील चौधरींपासून मानस मुकर्जींपर्यंत अनेक बंगाली संगीत दिग्दर्शकांची बंगाली गाणी त्यांनी केली आहेत. अशा वेळी केवळ गाण्याचे शब्द आणि त्यांचे उच्चार समजून घेऊन त्या थांबत नाहीत, तर त्या काव्याचे मर्मही त्या जाणून घेतात. लताबाईंना काव्याची चांगली जाण आहे आणि संवेदनशील वृत्तीमुळे चांगल्या कल्पनांचे सौंदर्यही त्यांना भिडते. त्यांनी गायलेले 'शात भाई चंपा जागो रे जागो रे' हे गाणे बंगालीमध्ये खूपच लोकप्रिय झाले होते. कोळीगीतांचे बंगाली रुपांतर सलील चौधरी यांनी केले व मग ती बंगाली कोळीगीतेही बंगालीमध्ये गाजली. लताबाईंनी एकदा मला 'मोनीहार' (मणिहार) या आपल्या बंगाली चित्रपटगीतांची ध्वनिमुद्रिका दिली. त्यातली गाणी फार गोड होती. त्यांच्यामुळेच मला बंगालीबद्दल हौस आणि ओढ निर्माण झाली. लताबाईंनी रवींद्र संगीतही गायले आहे आणि सलील चौधरी, हेमंतकुमार, बासू भट्टाचार्य, हृषिकेश मुखर्जी यांच्याबरोबर त्या बंगालीत छान बातचीत करू शकतात. उर्दूबद्दलही हेच सांगता येईल. उर्दूचे आपले उच्चार निर्दोष व्हावेत म्हणून त्यांनी अनेक वर्षे एक उर्दू शिक्षक नेमले होते. या 'मास्टरजीं'कडून त्यांनी उर्दूचा पद्धतशीर अभ्यासही केला.

लताबाईंची व्यावसायिक ध्वनिमुद्रणे मी खूपच ऐकली. त्यात त्यांचे एक वैशिष्ट्य मला जाणवले. एखादे गाणे शास्त्रीय संगीतावर आधारलेले, रागदारीचे, जरा अवघड असले तर लताबाई त्या संगीतदिग्दर्शकाच्या घरी जाऊन तिथे रिहर्सल करीत. नैशाद, एस.डी. बर्मन, मदन मोहन, सलील चौधरी यांच्या घरी त्यांनी केलेल्या अशा अनेक रिहर्सलना मी त्यांच्याबरोबर गेलेली आहे. एरवीचे साधे गाणे स्टुडिओत लिहून घेऊन तिथल्या तिथे बसवून ते गाण्याचा लताबाईंचा नेहेमीचा परिपाठ. पण अवघड गाण्यांची त्यांनी आधी कसून रिहर्सल केलेली असते, आणि परिश्रमांची मागणी करणार्‍या गाण्याला लताबाई ते परिश्रम भरपूर देतात. त्यांची ध्वनिमुद्रणे ऐकताना आणखी एक गोष्ट मला विशेष जाणवली. राजकपूर, देव आनंद, बी. आर. चोप्रा, एन.पी. सिप्पी. हे या व्यवसायातले फार मोठे निर्माते-दिग्दर्शक. त्यांचे चित्रपट प्रचंड बजेटचे. आणि ते देशभरच नव्हेत, तर देशाबाहेरही चालणारे. उलट एखादा मराठी, गुजराती किंवा बंगाली चित्रपट हा मर्यादित बजेट असलेला. त्याचा प्रेक्षकवर्गही त्या त्या प्रांतापुरता, भाषेपुरता मर्यादित. पण गाणे गाताना हा भेदभाव लताबाईंच्या मनात अजिबात नसायचा. मोठ्या चित्रपटातील हिंदी गाणे त्या जेवढ्या कसोशीने गात तेवढेच सर्वस्व पणाला लावून त्या मराठी, गुजराती, बंगाली गाणेही ध्वनिमुद्रित करत. विशेषत: या कमी बजेटच्या निर्मात्यांकडून त्यांनी कधी पैसेही घेतलेले नाहीत. कित्येकदा निर्मात्याने दिलेली रक्कम त्यांचे मनापासून आभार मानून त्यांनी हसतमुखाने त्याला परत केलेली आहे. यातही कसली आढ्यता किंवा उपकार केल्याचा भाव नसे. असायची केवळ आस्था, सौजन्य.

लताबाईंचे गाणे ध्वनिमुद्रित होताना ऐकणे हा खरोखरी मोठा आनंददायक अनुभव असे. गाणे बसत असताना संगीतदिग्दर्शकाशी गप्पा मारणे, त्यांना विनोद, कोट्या ऐकवणे, हे सारखे चालू असे. मी बाजूला अवघडून बसलेली, पण लताबाई त्या निर्मात्याशी, संगीतदिग्दर्शकाशी, एखाद्या बड्या पाहुण्याशी माझी ओळख करून देत. मला परक्यासारखे वाटू नये, हा त्यात हेतू असे. पुढे पुढे कल्याणजीभाई, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन यांच्याशी माझीही चांगली ओळख झाली होती. लताबाईंचे गाणे ऐकायला कधी कधी बाहेरची माणसेही येत. त्यात निर्मात्यांचे स्नेही, त्यांच्या घरातली बायकामुले, कधी राखी किंवा पूनम धिल्लॊं यांसारख्या चित्रपट अभिनेत्री, कधी एखादा परदेशी चाहता अशी विविध प्रकारची मंडळी असत. ती रेकॉर्डिंग रुममध्ये येऊन लताबाईंची ओळख करून घेत. त्यांची स्वाक्षरी मागत. खरे तर गाण्याची रिहर्सल चालू असता असा विक्षेप लताबाईंना रुचत नसणार. पण हा भाव त्या चेहेर्‍यावर चुकूनसुद्धा दाखवत नसत. एकूणच 'पब्लिक'विषयी त्यांच्या मनात आपुलकी आहे. आपल्या पाच मिनिटांच्या भेटीने वा चार शब्द बोलल्याने जर या माणसांना आनंद वाटत असेल तर त्यांना तो का नाकारावा अशी त्यांची भावना असे.

रिहर्सलच्या खोलीला अर्ध्या काचेच्या भिंती असत. त्यांतून बाहेरची माणसे, वादक इ. सर्व दिसे. गाणे ऐकण्यासाठी आलेली हौशी मंडळीही दिसत. पण आतले बोलणे मात्र बाहेर ऐकू जात नसे. लताबाईंची तीक्ष्ण नजर सर्वत्र फिरत असे आणि तल्लख विनोदबुद्धी सदैव जागी असे. मग अमकीची साडी किंवा केशभुषा कशी आहे, तमका बोलताना कसे हातवारे करतो आहे, मागल्या रांगेतला दहावा व्हायोलिनवादक कुठे चुकत आहे, आज तबला काय छान वाजवला जात आहे अशी सारखी टीकाटिप्पणी चालू असे. कधी लताबाई इतका गंमतीदार शेरा देत, की मला हसू अनावर होई. मग त्या हलकेच म्हणत, "शांताबाई, हसू नका. ते लोक बघताहेत आपल्याला!"

गाण्यातला एखादा शब्द खटकला, तर लताबाई कवीला बोलावून घेत. एखाद्या ओळीत मात्रा कमी पडलेल्या असल्या तर तेही त्यांना चटकन जाणवे. "इथं बघा. स्वर उगाच खेचावा लागतो आहे", असे त्या म्हणात. कधी "इथं आम्हांला श्वास घ्यायलादेखील जागा ठेवलेली नाही," अशी एखाद्या लांबलचक ओळीबद्दल तक्रार करत. चांगली मुरकी, चांगली तान सुचली तर संगीत दिग्दर्शकाला ती ऐकवतही. पण गाण्याच्या बाबतीत शेवटचा शब्द संगीतदिग्दर्शकाचा ही भावना सतत मनात जागी असे.

अनेकदा मोठ्या चित्रपटांचा मुहूर्त लताबाईंच्या ध्वनिमुद्रणानेच व्हायचा. मग 'माइक' पुढे नारळ फोडणे, त्याला फुलांचा हार घालणे, सर्वांना पेढे वाटणे हा कार्यक्रम असे. लताबाईंसाठी निर्मात्याने भलाथोरला पुष्पगुच्छ आणलेला असायचा. पेढ्यांची मोठी बॉक्स त्यांना घरी नेण्यासाठी दिली जायची. मग फोटोंचा कार्यक्रम तर हवाच. एरवीसुद्धा गाण्याचे ध्वनिमुद्रण झाल्यावर लताबाईंना अनेक फोटोंसाठी उभे राहावे लागे. कधी कवी त्यांना गाणे वाचून दाखवत आहे, कधी संगीतदिग्दर्शक चाल समजावून सांगत आहे, कधी निर्माता त्यांच्या हातात पुष्पगुच्छ देत आहे व त्या हसतमुखाने स्वीकार करत आहेत, कधी गाणे ऐकायला आलेल्या मंडळींना त्यांच्याबरोबर आपले फोटो काढून घ्यायचे आहेत अशा कितीतरी पोजेस लताबाईंना घ्याव्या लागत. चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी काही फोटो हवे असत. एकदा गाणे ध्वनिमुद्रित झाले, की लताबाई थकून कंटाळून गेलेल्या असत.स्टुडिओतून कधी बाहेर पडू असे त्यांना झालेले असे. पण कुणाचे मन मोडू नये, म्हणून हे सर्व फोटो त्या काढू देत. अगदी प्रसन्न चेहरा करून त्या फोटोसाठी उभ्या राहत आणि सगळी सर्कस करत. सर्वांच्या आनंदात आपणही सामील होत. एखाद्या वादकाने काही विशेष वाजवले असेल तर त्याला तोंड भरून शाबासकी देत. क्वचित इतरांच्या नकळत त्याला एखादी हिरवी नोट बक्षीस देऊन टाकत.

लताबाईंची हीच सोशिक वृत्ती गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळीही दिसून येई. पंधरा पंधरा, सोळा सोळा टेक झाले, तरी दरवेळी त्याच उत्साहाने त्या गात. चित्रपटातले गाणे असते तीन ते पाच मिनिटांचे. पण त्याचे ध्वनिमुद्रण ही फार किचकट, कंटाळवाणी वेळ खाणारी गोष्ट आहे. पुष्कळदा तांत्रिक अडचणींमुळे रिटेक होतात. कधी वादक चुकतात, कधी गायक व गायिका चुकते, कधी आणखी काही विक्षेप येतो. पण अशा वेळी कितीही रीटेक झाले तरी लताबाई आपली मन:प्रसन्नता ढळू देत नसत. भोवतालचे वातावरण कलुषित करत नसत. रीटेक वाढत चालले की संगीतदिग्दर्शकांनाच ओशाळल्यासारखे वाटे. मग राहुलदेव बर्मन किंवा राजेश रोशन सारखा तरुण संगीतदिग्दर्शक अपराधी स्वरांत म्हणे, "दीदी, सिर्फ एक रीटेक करेंगे." लताबाई चटकन गोड, आश्वासक स्वरांत म्हणत, "हां हां जरूर!"
"सॉरी दीदी. आप थक गयी होगी."
"नही नही. मै बिलकूल ठीक हूं!" आणि पुन्हा गाणे सुरू.

असे कितीतरी रीटेक मला आठवत आहेत. स्वत:च्या गाण्याबद्दल लताबाई सहसा बोलत नसत. पण एखादे गाणे त्यांच्या मनासारखे झाले आहे, हे मला त्यांच्या मुद्रेवरील प्रसन्नतेवरून ध्यानात येई. अशा वेळी त्या विशेष खुषीत असत. रेकॉर्डिंग करून आलेला त्यांचा थकवा निघून जाई आणि त्या म्हणात, "चला आज जरा शॉपिंग करू या." मग वेगवेगळ्या दुकानांसमोर गाडी थांबवून खरेदी सुरू व्हायची. कधी त्या नवीन आलेल्या साड्या बघत. कधी मुलांसाठी आलेले नवीन फॅशनचे कपडे बघत. कधी शोभेच्या वस्तू, खेळणी बघत. बरीचशी खरेदी करत. मग दोनतीन तासांनी गाडी घराकडे वळवत.

अशा हिंडताना लताबाई फार मजेत असत. गाणार्‍या कलावंतांच्या नकला करून दाखवत. रेकॉर्डिंग करून घरी आल्या की त्या दिवशीच्या गाण्याचे वर्णन करत. बरोबर गाताना गायकाच्या विशिष्ट ताना, गाताना झालेला त्याचा गोंधळ, शब्दोच्चारातल्या गंमती सारे हुबेहूब करून दाखवत. विशेष म्हणजे या नकलांतून त्या स्वत:लाही वगळत नसत. एखद्या गाण्यात त्यांना एकच तान पुन्हा पुन्हा घ्यावी लागली असली तर "अहाहा! काय तान होती पण! मी आपली सारखी सारखी तीच तान घेते आहे. तेच तेच गाते आहे!" असे म्हणून आपलीच नक्कल करून त्या भरपूर हसत. पण बरोबरचा गायक उत्तम गायला असेल तर तेही तितक्याच कौतुकाने सांगत, संगीतदिग्दर्शकाने विशेष सुंदर चाल दिली असेल तर दिवसभर म्हणत, "वा! काय छान चाल बांधली आहे. कमाल आहे!" सलील चौधरी, एस.डी. बर्मन यांच्या काही गाण्यांच्या ध्वनिमुद्रणानंतर त्यांच्या चालींचे लताबाईंनी तोंड भरून कौतुक केलेले मी ऐकले आहे. पण कधी कधी असेही व्हायचे. एखादा संगीत दिग्दर्शक जुनीच एखादी चाल घेई. तिच्यात नाममात्र बदल करी. आणि ती नवी म्हणून लताबाईंना ऐकवी. त्या वेळी त्या काही बोलत नसत. पण नंतर हळूच म्हणत, "कसली आली आहे नवी चाल? आतापर्यंत एक हजार एक वेळा ही चाल चित्रपटांमध्ये वापरून झालेली आहे." नुसते इतकेच म्हणून त्या थांबत नसत तर रेकॉर्डिंग वरून परत येताना ती चाल यापूर्वी कधी कधी, कुठे कुठे, कोणकोणत्या चित्रपटांतून येऊन गेली आहे हे ती ती गाणी गुणगुणून आपले विधान त्या पुराव्यानिशी सिद्ध करत. गंमतीची गोष्ट अशी की त्यांतली किती गाणी त्यांनी स्वत:च गायलेली असायची.

ही झाली लताबाईंची व्यावसायिक ध्वनिमुद्रणे, पण यांखेरीज त्यांनी आपल्या हौसेने, आनंदासाठी आणि एका सांस्कृतिक कर्तव्यबुद्धीने इतर अनेक गीते ध्वनिमुद्रित केली. भगवद्गीतेचे दोन अध्याय, ज्ञानदेवांच्या विराण्या आणि पदे, तुकारामांचे अभंग, 'शिवकल्याण राजा'मधली गीते, गालिबच्या गझला, मीरेच्या गीतांच्या दोन ध्वनिमुद्रिका हे सारे लताबाईंनी अगत्याने ध्वनिमुद्रित केले. कामांची तुफान गर्दी व रेटा असताना त्यातून वेळ काढून ही गाणी त्यांनी गायली. हे काम लताबाईंनी एका वेगळ्या भावनेने आणि मन:पूर्वक केले. त्यामुळे त्यांना काही वेगळ आनंद, कृतार्थता लाभली असावी. 'चाला वाहि देस' हे मीरेचे गाणे त्यंनी ध्वनिमुद्रित केले त्या दिवशी त्या फार प्रसन्न मन:स्थितीत होत्या. "बरेच दिवस योजलेलं एक काम माझ्या हातून पार पडलं, आज मला फार समाधान वाटतंय," असे त्या म्हणाल्या आणि दिवसभर ध्वनिमुद्रणाचा ताण पडलेला असतानाही घरी गेल्यानंतर त्या कितीतरी वेळ आनंदाने गप्पा मारत राहिल्या.

एक प्रसंग मला आठवतो. गालिबच्या गझलांचे ध्वनिमुद्रण चालू होते. 'रोनेपे और इष्कमें' ही गझल लताबाई गात होत्या. त्यावेळची त्यांची मूर्ती अद्यापही माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्या सर्वस्व ओतून गात होत्या. गझलमधल्या अवघड जागा हुबेहूब याव्यात म्हणून प्रयत्नांची शिकस्त करीत होत्या. चेहरा एकाग्र, डोळ्यांत जीव एकवटून आलेला, सारे व्यक्तित्त्व धनुष्याच्या ताणलेल्या प्रत्यंचेसारखे उत्कट बनवलेले आणि अपूर्व सुंदर असा स्वरांचा आविष्कार होत असलेला; त्या क्षणी लताबाईंचे रुप मला वेगळेच भासले. त्या वेळी मला त्या फार एकाकी, सार्‍यांपासून दूर गेलेल्या अशा वाटल्या. मनात आले, त्या कुठल्यातरी एका अगदी अज्ञात, अपार्थिव अशा प्रदेशात या वेळी वावरत आहेत, जिथे त्या आणि त्यांचा स्वर यांखेरीज दुसरे कुणीही नाही. त्या क्षणाच्या कृतार्थतेचा आनंद अगदी त्यांचा होता आणि त्या क्षणची वेदनाही त्यांचीच होती. लताबाईंचे ते दर्शन मी कधीच विसरणार नाही.

कलेच्या क्षेत्रात स्वत: इतक्या नामवंत असणार्‍या लताबाई इतर कलाकारांबद्दलही मनात आदर बाळगतात. सैगल, अमीर खांसाहेब, बडे गुलाम अली खां यांसारखे गानतपस्वी कलावंत लताबाईंना आदरणीय वाटतात यात नवल नाही. पण नॅट किंग कोल, बालमुरलीकृष्ण, भीमसेन अशा समकालीनांबद्दलही पराकाष्ठेचे प्रेम व आदर त्यांच्या हृदयात आहे. मद्रासला पी. सुशीला या अभिनेत्रीचा सत्कार झाला त्या वेळी लताबाई प्रमुख पाहुण्या म्हणून गेल्या होत्या. मद्रासच्या मुक्कामात पहिली महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली ती म्हणजे बालमुरलीकृष्णांच्या सर्व ध्वनिमुद्रिका त्यांनी विकत घेतल्या. इतकेच नव्हे, तर नंतर आपल्या वडिलांच्या- दीनानाथांच्या पुण्यतिथीला त्यांना मुंबईला आमंत्रण देऊन मुंबईकर श्रोत्यांना त्याच्या गायनाचा आनंद त्यांनी घडविला. भीमसेन जोशींबद्दल त्यांच्या मनात असाच आदरभाव आहे. पुणे कॉर्पोरेशनने लताबाईंचा गौरव केला. त्यांना मानपत्र दिले, त्यावेळी भीमसेन जोशी आपण होऊन त्या कार्यक्रमात अभंग गाऊन गेले. सर्व कार्यक्रम सुंदर झाला होता. नंतर मी लताबाईंना विचारले,
"आजच्या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांत कोणती गोष्ट आवडली?"
क्षणाचाही विलंब न लावता लताबाई चटकन म्हणाल्या, "भीमसेनजींनी आपण होऊन माझ्या सत्कारप्रसंगी यावे, गावे, ही मला सर्वात मोठी गोष्ट वाटली. एवढ्या मोठ्या कलाकाराने या कार्यक्रमात भाग घ्यावा हा मला मोठाच गौरव आहे--"

नॅट किंग कोलसारख्या नीग्रो कलाकाराची कला लताबाई मोठी मानतात. मेहेदी हसनसारख्या पाकिस्तानच्या गझलगायकाची टेप ऐकतान भान विसरून क्षणाक्षणाला दाद देत राहतात. 'बीटल्स' गायकांतला जॉर्ज हॅरिसन भारतात येतो तेव्हा तो लताबाईंच्या भेटीची इच्छा तीव्रतेने व्यक्त करतो, आणि लताबाई आवर्जून त्याला भेटतात. कर्नाटकी संगीतापासून ते अत्याधुनिक बीटल्सपर्यंत आणि विस्तारयुक्त ख्यालगायकीपासून ते रोशन सातारकरच्या 'जाऊ कशी तशी मी नांदायला'सारख्या उडत्या चालीच्या गीतांपर्यंत सार्‍यांमध्ये लताबाईंना रस वाटतो.

लताबाईंचे गाण्याचे प्रेम आणखीही एका प्रकारे व्यक्त होत असते. त्यांची कामे रोज चालू असतात. अशात एखादे ध्वनिमुद्रण काही कारणाने रद्द झाले तर शाळकरी मुलांना अचानक सुटी मिळाल्यावर व्हावा तसा आनंद लताबाईंना होतो. अशा वेळी त्या गाडी काढत आणि निव्वळ फिरण्यासाठी किंवा बरेच दिवसांचे राहून गेलेले शॉपिंग करण्यासाठी बाहेर पडत. कामाचा व्याप नसे. समोर भरपूर मोकळा वेळ असे. अशा वेळी लताबाईंचे वेगळेच रूप प्रकट व्हायचे. त्या अत्यंत प्रसन्न मन:स्थितीत असत. मग त्यांना गाण्याची लहर येई. असे त्यांचे सहज, निर्हेतुक, केवळ स्वत:च्या आनंदासाठी गाइलेले गाणे ऐकणे हा एक विलक्षण सुंदर अनुभव असे. मग लताबाई कधी सैगल, नूरजहाँ यांची खास आपल्या आवडीची गाणी गात, तर कधी जुन्या मराठी नाटकांतले नाट्यसंगीत ऐकवत. चित्रपटांतली गाणी मधल्या म्यूझिकसकट त्यांना पाठ असावीत यात नवल नाही. पण जुन्या नाट्यसंगीताचे त्यांचे पाठांतरही तितकेच पक्के आहे. 'भावबंधन'मधली अनेक गाणी त्यांना पाठ आहेत. कारण त्या नाटकात त्यांनी स्वत: काम केलेले आहे. पण एकदा अशा भ्रमंतीत 'स्वयंवर', 'सौभद्र', 'संशयकल्लोळ', 'मानापमान' यांतली कितीतरी सुंदर गाणी त्यांनी मजेत मनाच्या मुक्त लहरीत मला ऐकवली. 'सौभद्रा'तली 'बहुत दिन नच भेटलो सुंदरीला' ही प्रसिद्ध दिंडी जुने नट म्हणतात तशा पद्धतीने, तशा ताना घेऊन त्यांनी गाइली. 'नच सुंदरि करू कोपा' हे गाणे झाले. त्यानंतर 'सुजन कसा मन चोरी' हे 'स्वयंवर'मधले गाणे त्यांनी अतिशय गोड हळव्या नाजूक पद्धतीने, गाण्यातला प्रेमार्ततेचा रुसव्याचा भाव विषद करत गाइले. मग त्या म्हणाल्या, "आपल्या नाटकांतले नट गाण्याचं शास्त्र जेवढं सांभाळतात तेवढे त्यातल्या हळुवार भावना समजून घेऊन का गात नाहीत कोण जाणे! आता असलं गाणं किती नाजुकपणे गायला हवं. ते आपलं उगाच काहीतरी थिरथिरेपणानं गातात! " मला लताबाईंचे ते विधान मार्मिक वाटले. त्यातही त्यांचा तो 'थिरथिरेपणानं' हा शब्द माझ्या विशेष ध्यानात राहून गेला.

चित्रपटसंगीत, नाट्यसंगीत, रागदारीच्या चिजा या तर मातबर गोष्टी झाल्या. पण यापेक्षा आणखीही काय काय तरी लताबाईंच्याकडून अशा वेळी ऐकायला मिळे. कधी त्या 'रामरक्षे'तला एखादा श्लोक ऐकवत. कधी रामदासांचे 'मारुतिस्तोत्र' म्हणत. कधी 'घरे सुंदर सौख्य नानापरीचे। परी कोण जाणेल हे अंतरीचे' सारखा श्लोक अत्यंत आर्तपणे गाऊन दाखवत तर कधी 'का रे नाठवीसी कपाळ देवासी पोशितो जगासी एकलाची' सारखा तुकारामांचा अभंग थेट शाळकरी मुलांच्या सुरात, त्या चालीत ऐकवत. एकदा त्यांनी 'जाईजुईच्या झाडाखाली फुलांचा भडिमार गं' अशी एक ओळ मला गुणगुणून दाखविली. मी विचारले, "हे कुठलं गाणं आहे?" त्यावर लताबाई म्हणाल्या, "लहानपणी आमच्या दारासमोर येणार्‍या एका भिकारणीच्या तोंडून ऐकलं होतं मी हे." लताबाईंच्या आजी म्हणजे माईंच्या आई ही एक अजब व्यक्ती त्यांच्या घरात होऊन गेली. या आजी उत्तम सतार वाजवत आणि अतिशय गोड गात. कधी आठवण झाली तर लताबाई आजींच्या तोंडून ऐकलेली जुनी गाणी खास आजीच्या पारंपारिक चालीत म्हणून दाखवीत. 'दोन प्रहर रात्र झाली ॠषि आले भोजना। निद्रिस्त आम्ही होतो त्यांनी केली गर्जना' हे द्रौपदीचे किंवा 'कुठे तुझे पंचपती दावि गे मला' असे कीचकाचे गाणे लताबाईंच्या गळ्यातून फार सुंदर वाटे. लोकगीतांच्या चालीचा गोडवा त्यात पुरेपूर भरलेला असे.

या झाल्या कामात गुंतलेल्या, घराबाहेरच्या लताबाई. घरातल्या लताबाई पुन्हा वेगळ्याच असतात. घरामध्ये आपल्या कुटुंबियांत, आप्तेष्ट मंडळींत वावरणार्‍या लताबाई अगदी घरगुती वाटतात. मग गप्पा, थट्टामस्करी, मुलांचे कौतुक, त्यांची भांडणे सोडवणे, आल्यागेल्यांची विचारपूस करणे असे सारखे चालू असते. कधी मुलांबरोबर त्या चक्क स्वत:ही दंगा करतात. अशा वेळी जणू बाहेरच्या मोठेपणाचे, प्रसिद्धीचे, कीर्तीचे ओझे त्या डोक्यावरून उतरून ठेवतात. आणि मग ही बनते घरातली मुलगी. सर्व भावंडांत थोरली, अधिक समजूतदार, तरीही मुलगीच. फार लहान वयात लताबाईंना प्रौढपणे घराची जबाबदारी घ्यावी लागली. त्या वेळी दाबले, दडपले गेलेले हे बालवय घरी प्रकट होते. कधीही, कशानेही कोमेजू नये असे एक सुंदर शैशव, बालमन लताबाईंना लाभले आहे. ते फार विलोभनीय आहे.

या बालवृत्तीचाच एक आविष्कार म्हणजे लताबाईंना असलेली छोट्या, सुबक, सुंदर वस्तूंची आवड. त्यांच्या ड्रेसिंग टेबलावर, ड्रावरमध्ये, कपाटात अशा किती तरी वस्तू बघायला मिळत. आणि त्यांत सारखी भर पडत असे. छोटी चित्रे, काचेच्या, चंदनाच्या, हस्तिदंताच्या पेट्या व डब्या. रंगीबेरंगी कार्डे, माळा, बाहुल्या, प्राण्यांच्या प्रतिकृती, वापरलेल्या आणि न वापरलेल्या सेंटच्या चित्रविचित्र आकारांच्या बाटल्या अशा वस्तूंचा केवढातरी संग्रह त्यांच्यापाशी आहे. देशातल्या देशात दिल्ली, मद्रास, बंगलोर अशा ठिकाणी लताबाईंना वारंवार जावे लागते. गेल्या काही वर्षांत गाण्यांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने परदेशातही त्यांचा केवढा तरी प्रवास झाला आहे. या प्रवासात असल्या वस्तू खरेदी करण्याची लताबाईंना भारी हौस. बरे, ही खरेदी केवळ स्वत:साठी होईल असेही नाही. त्यांतल्या कितीतरी चिजा घरच्या मंडळींसाठी, मित्रमैत्रिणींसाठी आणलेल्या असतात. आणि त्या त्यांना देऊन टाकण्यात लताबाईंना अतिशय आनंद वाटतो. स्वत:जवळची एखादी वस्तू कुणाच्या तरी मनात भरली आहे, कुणी तिचे विशेष कौतुक केले आहे असे ध्यानात आले तर अचानक कधीतरी ती वस्तू त्या माणसाला त्या देऊन टाकतात. त्याला चकित, आनंदित करतात, त्याच्या आनंदाने स्वत: आनंदित होतात.

स्वत:जवळच्या वस्तू नीटनेटक्या ठेवणे ही लताबाईंची आणखी एक आवड. एकूणच त्यांच्या स्वभावात कमालीचा नीटनेटकेपणा, चोखंदळपणा, टापटीप आहे. कपाटात शेकडो साड्या असतात. पण प्रत्येक साडीवरचा ब्लाऊज ठरलेला. त्या साडीवर तोच ब्लाऊज हँगरला लावून ठेवलेला दिसेल. त्यात कधी चुकूनसुद्धा बदल व्हायचा नाही. कागदपत्रे, फोटोचे आल्बम, भेटीदाखल आलेल्या वस्तू, शाली, कोट, स्वेटर प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे अगदी व्यवस्थित ठेवलेली असते. त्यामुळे आपल्याजवळच्या इतक्या सामानातूनही पाहिजे त्या वेळी पाहिजे ती वस्तू, फोटो, पत्रे, सेंट्स - नेमके त्या शोधून काढतात, सुटीच्या दिवशी जरा सवड मिळाली तर सारे कपाट, ड्रेसिंग टेबल, ड्रॉवर्स स्वत: उघडतील, सामान बाहेर काढतील. स्वच्छ कपड्याने धूळ पुसून काढतील. लहान लहान वस्तू ओल्या फडक्याने पुसतील आणि सारे पुन्हा जिथल्या तिथे नेटके लावून ठेवतील. यांमध्ये वस्तूंचा लोभ नसतो. त्यांच्या सौंदर्याची, नाजुकपणाची कदर असते. जपणूक असते. कुठल्याही सुंदर कलापूर्ण गोष्टीचा अपमान व्हावा हे लताबाईंना आवडत नाही. त्या दु:खी होतात.

माणसांना भेटी देणे, वस्तू देणे ही लताबाईंची अत्यंत आवडीची गोष्ट. घरातल्या तर सर्व माणसांचे वाढदिवस त्या प्रेमाने साजरे करतातच पण मित्रमंडळींना, त्यांच्या मुलाबाळांना देखील वाढदिवसाच्या निमित्ताने भेटी पाठवणे सतत चालू असते. भेटवस्तू देण्याचीही लताबाईंची खास पद्धत आहे. कुणाला काही कसेतरी देण्यात त्यांना गंमत वाटत नाही. भेटीची वस्तू शोभिवंत कागदात नीट गुंडाळतील. चिकटपट्टी लावून कागदाच्या कडा बंद करतील. पुस्तके, साड्या अशा वस्तूंना कागद गुंडाळणे सोपे आहे पण अडनेड्या आकाराच्या सेंटच्या बाटल्या, बाहुल्या अशा वस्तू देखील लताबाई इतक्या रेखीव नेटकेपणाने पॆक करतात की बघतच राहावे. त्यानंतर त्यावर सुबक आकाराचे एक छोटे कार्ड लावतील. आपल्या हाताने शुभेच्छा व अभिनंदन लिहितील. खाली स्वत:ची सही करतील. मग ती वस्तू त्या व्यक्तीकडे प्रेमाने, इतमामाने पाठवून देतील.

लताबाईंच्या वैभवामुळे लोकांच्या त्यांच्याबद्दल अफाट कल्पना असतात. त्यांतली एक कल्पना ही - लताबाई घरात इकडची काडी तिकडे करत नसतील. पण लताबाईंना ज्यांनी थोडेसे जवळून पाहिले आहे त्यांना ही कल्पना किती चुकीची आहे, ते पुरतेपणी ठाऊक आहे. लताबाईंना आपली कामे आपण करून टाकण्यात कसलाही कमीपणा वाटत नाही. उलट कामे स्वत: उरकण्याची सवय लहानपणापासून त्यांनी अंगी लावून घेतली असावी असे ध्यानात येते. त्यांनी परदेशातले एवढे लांब लांबचे प्रवास केले. पण जाताना आपले सगळे सामान काढणे, मोठमोठ्या पेट्या भरणे, औषधापासून ते गाण्यांच्या कागदापर्यंत आणि पूजेच्या देवापर्यंत सगळे आठवणीने बरोबर घेणे ही कामे त्यांनी आपली आपण केलेली मी पाहिली आहेत. पूजेचे देव ही त्यांच्या प्रवासातली सतत बरोबर असणारी गोष्ट. अगदी दोन दिवसांसाठी जरी लताबाई कुठे बाहेरगावी गेल्या तरी आधी नीट जागा बघून तिथे बाबांचा फोटो ठेवतील, देव ठेवतील आणि मग बाकीचे सामान ठेवतील. रोजची देवपूजा प्रवासात देखील चुकणार नाही मग घरी ती चुकण्याचे नावच नको. गावाला निघाल्या, कार्यक्रमासाठी निघाल्या तर देवघरातल्या मंगेशाला नमस्कार करतील, आईच्या पाया पडतील. मगच घराबाहेर पाऊल पडेल.

प्रवासावरून आठवण झाली. लताबाईंबरोबर प्रवास करण्याची संधी मिळणे हा एक अतिशय प्रसन्न, सुंदर, रोमांचकारक अनुभव आहे. मला त्यांच्याबरोबर कलकत्ता, मद्रास, इंदूर असे दूरचे प्रवास करण्याची संधी मिळाली. प्रवासात लताबाई खूप मनमोकळ्या असतात. भरपूर गप्पा मारतात. बरोबर आणलेल्या माणसाची काहीही गैरसोय होऊ नये, त्याला कुठेही अवघडल्यासारखे वाटू नये याबद्दल त्या अत्यंत दक्ष असतात. कलकत्त्याला लताबाईंचा कार्यक्रम होणार होता. कार्यक्रमाचे तीन दिवस त्या हॉटेलबाहेर पडल्या नाहीत. सकाळी वादकांबरोबर रिहर्सल आणि संध्याकाळी कार्यक्रम. पण कार्यक्रमातून मोकळ्या झाल्यावर त्या खूप फिरल्या. भरपूर शॉपिंग केले. कलकत्यातली अनेक प्रसिद्ध स्थळे मला आवर्जून दाखवली. मद्रासला मी त्यांच्याबरोबर गेले तेव्हा तिरुपती, महाबलिपुरम ही ठिकाणे त्यांनी मला दाखवली. प्रवासात लताबाईंचे आणखी वेगळे गुण जाणवतात. कुठेही जायचे असेल तर सर्वांच्या आधी आंघोळ करून, कपडे बदलून त्या तयार असतात. कितीही आरामाचा प्रवास असला तरी त्यात काही ना काही गैरसोयी उद्भवतात. काही अचानक वेळापत्रकात बदल होतो, पण लताबाईंना त्याचे काही वाटत नाही. 'प्रवासात ही पण एक गंमतच' असे म्हणतील आणि सोडून देतील. त्या कुठेही गेल्या तरी सर्वपरिचित असतात. कलकत्त्याचे लोक बंगालीत "की लोता? की खोबोर?" म्हणून आपुलकीने त्यांची विचारपूस करतील. मद्रासला त्या गेल्या तर मोठेमोठे निर्माते त्यांच्या दिमतीला अपाली गाडी व ड्रायव्हर देतील. दिल्लीला अशोका हॉटेलमध्ये त्यांची उतरण्याची व्यवस्था केली जाईल. त्या जिथे जातील तिथे चाहत्यांची गर्दी, मानसन्मानाचे हारतुरे, थाटाच्या मेजवान्या, असंख्य फोटो, वृत्तपत्रांत मुलाखती, बातम्या हा सगळा प्रकार चालू असतो. विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर या सोहळ्यांत आपली भूमिका वठवत असतात, आणि लता नावाची एक सुजाण, परिपक्व, शहाणी, प्रौढपणातही आपले शैशव जपून ठेवलेली व्यक्ती ते सारे दुरून, अलिप्तपणे, शांतपणे बघत असते, गर्दीचे देणे गर्दीला देऊन टाकते, आपले खासगीपण आपल्यापुरते अबाधित राखते.

अलीकडे अगदी शेवटी त्यांच्याबरोबर प्रवास करण्याची संधी मला मिळाली ती लताबाई कोल्हापूर विद्यापीठाची डॉक्टरेटची पदवी घेण्यासाठी कोल्हापूरला गेल्या तेव्हा. योगायोग असा की, त्यावेळी घरात आजार, कामे अशा अडचणींमुळे कोणालाच त्यांच्याबरोबर येता येणे शक्य नव्हते. लताबाईंनी मला बरोबर येणार का म्हणून विचारले, मी लगेच तयार झाले. पहाटे आम्ही मुंबईहून निघालो. छोटी फियाट गाडी होती. सोबत ड्रायव्हर व त्याचा दहा वर्षांचा मुलगा एवढे दोघेजण होते. प्रवासात लताबाई ट्रान्झिस्टरवर कुठली तरी क्रिकेटची मॅच ऐकत होत्या. मध्येच त्यांनी टेपवर 'रझिया सुलतान' आणि 'शंकर हुसेन' या चित्रपटांतली त्यांची स्वत:ची, त्यांना आवडलेली दोन गाणी मला ऐकवली. कोल्हापूरपर्यंतचा प्रवास अगदी मजेत झाला. लताबाईंनी अनेक गमती सांगून मला खूप हसवले होते. वाटेत सातारला एका छोट्या हॉटेलात आम्ही मजेत खाल्लेही होते. कोहापूर हाकेवर आले, आणि कळले, गुळाचे की कसले तरी भाव चढल्यामुळे शेतकरी खूप चिडले आहेत आणि कोल्हापूरात जाणारे बाहेरचे एकूण एक रस्ते त्यांनी रोखले आहेत. मोठीच पंचाईत झाली. रस्ते कधी मोकळे होणार आणि आम्ही गावात कधी पोचणार काहीच पत्ता लागेना.

शेवटी ड्रायव्हरने एका आडरस्त्याला, झाडांच्या सावलीत गाडी थांबवली. दिवसभराच्या प्रवासाने माझे पाय आंबून गेले होते. अंग दुखत होते. चहा फार हवासा वाटत होता. वाटेत असे थांबावे लागले याची मला भयंकर चीड आली. पण कुणावर चिडायचे तेही कळेना. लताबाई मात्र शांत होत्या. त्या म्हणाल्या, "चला खाली उतरून जरा पाय मोकळे करू. नाही तरी आता आपण काय करू शकणार?"

आम्ही खाली उतरलो. रस्त्याच्या कडेला वडाची, पिंपळाची, पिंपरणीची झाडे उभी होती. सूर्य मावळतीला टेकला होता. त्याचे तिरपे किरण झाडांच्या गर्दीतून भाल्यासारखे घुसले होते. रस्त्याच्या लगत खाली एक छोटासा ओढा वाहत होता. शेतातल्या बायका तिथे धुणी धूत होत्या. एकूण वातावरण रम्य होते. लताबाईंनी कॆमेरा काढला. भराभर फोटो घेतले. मग जवळची थोडी बिस्कीटे काढून मला दिली. आपण खाल्ली. एकीकडे थट्टाविनोद, कोट्या चालूच होत्या. मी मात्र रडकुंडीला आले होते. इतक्यात दोन तरुण मुले सायकलीवरून दोनदा तीनदा त्या रस्त्याने गेली. ती दुरून लताबाईंकडे बघत होती. शेवटी ती जवळ आली. नमस्कार करून उभी राहिली. मग त्यांतल्या एकाने नम्रपणे लताबाईंना म्हटले, "आम्ही आपल्याला ओळखलं. इकडे कुठे?"

लताबाईंनी आपण कोल्हापूरला कशासाठी जात आहोत ते त्यांना सांगितले. आणि वाटेत आपल्याला का थांबावे लागले याचाही खुलासा केला. ती मुले म्हणाली, "आम्ही मारवाडी आहोत. हे पेठ नावाचं गाव आहे. आम्ही कापडाचे व्यापारी. जवळच आमचं गोदाम आहे. आपण तिथे जाऊन जरा विश्रांती घ्या. चहापाण्याची व्यवस्था करतो. आपण आमच्याकडे आलात तर आम्हांला फार बरं वाटेल."

लताबाईंनी लगेच होकार दिला. त्या दोघा भावांनी आम्हांला आपल्या गोदामात नेले. तिथे त्यांचे नोकरचाकर होते. आम्हांला प्यायला पाणी मिळाले. चहाचीही व्यवस्था झाली. तेवढ्यातल्या तेवढ्यात त्या दोघा भावांनी कुठूनतरी केळी, संत्री अशी फळे आणवली. लताबाईंचा पाहुणचार केला. लताबाईही गप्पा मारण्यात रमल्या. मारवाडामधले त्या मुलांचे गाव, त्यांची कुलदेवता, इथल्या त्यांच्या धंद्याचे स्वरूप या सा‍र्‍या गोष्टींची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्या इतक्या शांत, प्रसन्न होत्या. जणू त्या थकलेल्याच नव्हत्या. जणू प्रवासात आलेल्या विक्षेपाचा त्यांच्या मनावर परिणाम झालेलाच नव्हता. लताबाई शांत असल्या तरी त्या दोघा भावांना लताबाईंची झालेली गैरसोय बघून वाईट वाटत होते. शेवटी त्यांतल्या एकाने विचारले,
"आम्हांला आपल्यासाठी काही करता येईल का?"
क्षणभर विचार करून लताबाई म्हणाल्या, "एवढंच करा. तुमचा फोन आहे का?"
"हो. आहे."
"मग मी दोन फोन करते. एक कोल्हापूरला स्टुडिओत अन् दुसरा मुंबईला घरी. मी अजून आले नाही म्हणून स्टुडिओत लोक काळजी करत असतील, अन् घरी माझा फोन नाही म्हणून ती मंडळीही चिंतेत असतील." लताबाई म्हणाल्या.
दोन्हीकडे फोन केल्यावर मगच त्यांना हायसे वाटले.

लताबाईंनी खूप प्रवास केले आहेत. त्या जगभर फिरल्या आहेत. अलीकडे तर वर्षातील काही महिने त्या परदेशीच असतात. तरी भारत, मुंबई, तिथले आपले घर ही त्यांची फार आवडीची ठिकाणे आहेत. 'प्रभुकुंज'मधल्या आपल्या खोलीत त्यांना जे सुख वाटते ते अन्य कुठेही वाटत नसेल. लताबाईंची ती खोली घरातल्या सार्‍यांचे गप्पांचे, विसाव्याचे, हसण्याखिदळण्याचे, घरगुती बेत ठरवण्याचे ठिकाण. मित्रमंडळी तिथेच बसतात. मुले तिथे दंगा करतात. चहा, कॉफी दिवसभर चालू असते. कधी कधी जेवणही लताबाई तिथेच घेतात. कुणी मित्रमैत्रीण सोबत असेल तर त्यांनाही लताबाईंच्या पंगतीचा तिथे लाभ मिळतो. ट्रँझिस्टरवर गाणी सुरू असतात. फोन सारखा वाजत असतो. मी त्या खोलीत कितीदा तरी लताबाईंबरोबर गप्पा मारल्या. त्यांच्याबरोबर काम केले. मलाही ती खोली विलक्षण आवडत असे.
पण कधी कधी त्याच खोलीचे एक अगदी वेगळे रूप निदर्शनाला येई. आजही ते माझ्या डोळ्यांसमोर जसेच्या तसे उभे आहे. एखादे वेळी हीच खोली अगदी रिकामी असते. घरची सर्व मुले माणसे सिनेमाला गेलेली असतात. रेकॉर्डिंग करून आलेल्या लताबाई थकून आपल्या बिछान्यावर आडव्या झालेल्या असतात. रस्त्याकडच्या खिडक्यांतून आलेल्या मावळतीच्या सौम्य उन्हात खोलीचा निळा रंग उजळतो. लताबाईंच्या आवडत्या सेंटचा किंवा मद्रासच्या उदबत्तीचा सूक्ष्म गंध वातावरणात दरवळत असतो. काचेच्या पुष्पपात्रातल्या गुलाब निशीगंधांचा सुवास त्यात मिसळलेला असतो. ट्रँझिस्टरमधून एखाद्या गाण्याचे सूर झरत असतात. बाकी सारे शांत, नि:स्तब्ध असते. पलीकडे मीरेची मूर्ती. शिवाजी महाराजांचा बस्ट. समोरच्या भिंतीवर दीनानाथांचा फोटो. आणि लताबाई निवांत डोळे मिटून पडलेल्या. अंगावर साधी पांढरीशुभ्र साडी. लहानशी काया. सावळी शांत मुद्रा. त्यांच्या अत्यंत कार्यव्याप्त, सदैव माणसांनी गजबजलेल्या जीवनातले हे दुर्मिळ विसाव्याचे क्षण. मला अनेकदा त्यांचे हे रूप बघायला मिळाले आहे. अशा वेळी काही बोलावेसे वाटत नसे. त्या शांततेचा, लताबाईंच्या विश्रांतीचा भंग करण्याचे धैर्य होत नसे. सारे शांत. फक्त लताबाईंचे उजवे पाऊल हलत असे. गाण्याला ताल देत असे.

लताबाई दिसतात कशा? त्यांच्या फोटोवरून त्यांच्या व्यक्तित्वाची, रूपाची कल्पना येत नाही. एक तर हे अतिशय चैतन्यमय, लवलवते, प्रसन्न व्यक्तित्व फोटोतल्या स्थिर चित्रणात पकडले जात नाही. दुसरे म्हणजे लताबाईंच्या सार्‍या रुपाला त्यांच्या किनर्‍या, उंच, विलक्षण मधुर स्वराची आणि तितक्याच मंजूळ वेधक हसण्याची जोड मिळालेली असते. ती फोटोतून प्रत्ययाला येत नाही. लताबाईंच्या फोटोत न मिळणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचा नाजूकपणा. त्यांची चण लहान आहे आणि नाजूकपणा त्यांच्या सर्व अंगोपांगांत आहे. तो त्यांच्या छोट्या स्फुरणशील जिवणीत आहे, त्यांच्या निमुळत्या लांबसडक कलावंत बोटांत आहे, इतकेच नव्हे तर सोन्याच्या साखळ्यांनी सजलेल्या त्यांच्या विलक्षण सुरेख गोजिरवाण्या पावलांत देखील आहे. लताबाई बोलतात तेव्हा हे अवघे व्यक्तित्व बोलत असते. चैतन्याने लवलवत असते. घडोघडी आपले भिन्नभिन्न आविष्कार प्रकट करत असते. डोळ्यांतून चमकत असते. हसण्यातून निनादत असते. लताबाईंनी एकेकाळी कथ्थक नृत्याचे पाठ घेतलेले आहेत. त्या बोलत असता त्यांच्या हातांची हालचाल होते ती इतकी कलात्मक की त्या हातांकडे बघताना त्यांचे बोलणे विसरायला होते, आणि या सार्‍या व्यक्तित्वाला जिवंतपणा आणला आहे लताबाईंच्या निर्व्याज, स्नेहशील, अकृत्रिम वर्तनाने. त्यांची पब्लिक 'इमेज' झगमगती आहे. तिच्याभोवती कला, कीर्ती, पैसा, नावलौकिक यांचे एक तेजस्वी वलय तळपत आहे. त्यामुळे त्यांना प्रथमच भेटायला येणारा माणूस या वलयाने दिपून गेलेला असतो. काहीसा अवघडलेला, बावरलेला असतो. प्रत्यक्ष भेटीत मात्र लताबाईंचे अगदी वेगळे रूप त्याला बघायला मिळते. अकृत्रिम वागणे बोलणे, स्नेहशील वृत्ती, सरळपणा, मोकळेपणा, मुख्य म्हणजे अभिजात साधेपणा या त्यांच्या गुणांचा प्रत्यय आला म्हणजे या माणसाला आश्चर्य आणि आनंद एकाच वेळी अनुभवायला मिळतात.

लताबाईंच्या स्वभावात काही गमतीदार विरोध आहेत. रेकॉर्डिंगला जाताना अतिशय साध्या, प्रायः अलंकारविहीन असणार्‍या लताबाई एखाद्या दिवशी पाचूची बहुमोल अंगठी हौसेने बोटात घालून जातील. रोजच्या कामात साध्या सुती किंवा बंगाली साड्या नेसणार्‍या लताबाई सेंट वापरतील तो मात्र अगदी निवडक. खूप महागाचा. 'खैबर', 'ताज'सारख्या उंची हॉटेलांत भावंडांना, मित्रमैत्रिणींना जेवू घालणार्‍या लताबाई त्यांच्यासह पूर्वी सिनेमाला जात त्या आधी फॅमिली सर्कलची तिकिटे काढून जात. सर्वसामान्य प्रेक्षकांत मजेने बसत. चित्रपटव्यवसायातले प्रीमियर शोज, त्यानंतरच्या पार्ट्या, समारंभ, धनिकांघरची जेवणाची आमंत्रणे यांना नकार देणार्‍या लताबाई साध्या गरीबाऊ घरात जाऊन तिथला साधासुधा पाहुणचार आनंदाने घेतील इतकेच नव्हे तर आपल्या विलक्षण साधेपणाने, मनमोकळ्या अकृत्रिम हसण्याबोलण्याने, अत्यंत प्रसन्न व्यक्तित्वाने त्या घरातील लोकांना अगदी खूष करून टाकतील. सार्‍या सुंदर आणि वैभवसंपन्न गोष्टींचा रसिकपणे आस्वाद घेणार्‍या लताबाई पुन्हा त्या सार्‍यांतून तेवढ्याच निर्लेपपणे बाजूला होतील. आता मित्रमैत्रिणींच्या, भावंडांच्या मेळाव्यात बसून हास्यविनोदात रंगलेल्या लताबाई दुसर्‍या घटकेला तितक्याच मनःपूर्वकतेने, एकाग्र तन्मयतेने गाण्याच्या रिहर्सलमध्ये गढून गेलेल्या दिसतील. लताबाईंना माणसांची फार आवड आहे. त्यांचा मित्रपरिवार विविध स्वरुपाचा, मोठा आहे. पण या सार्‍या मेळाव्यात अत्यंत रमणार्‍या लताबाई अगदी एकट्या देखील मजेत राहू शकतात. पन्हाळ्यावरच्या आपल्या बंगल्यात त्या विश्रांतीसाठी जातात तेव्हा फक्त स्वतःच्या संगतीचे सुख त्यांना पुरेसे वाटते. मग त्या रामकृष्ण परमहंसांची पत्रे, ग्रंथ वाचतात. आवडत्या विवेकानंदांचे पुन्हा एकदा पारायण करतात किंवा शिवचरित्रात अवगाहन करतात. नाहीतर मग त्या आपला कॅमेरा काढतात आणि मावळता सूर्य, एखादे लहान मूल, एकाकी निष्पर्ण वृक्ष, उमलते फूल अशांची छायाचित्रे घेण्यात रमतात. त्या उत्कृष्ट फोटो काढतात.

लताबाईंच्या स्वभावात एक अलिप्तता, एक निरिच्छपणा आहे. सार्‍यांत असूनही कशात नसलेल्या अशा त्या अनेकदा वाटतात. सुंदर वस्तू त्या जेवढ्या हौसेने खरेदी करतात तेवढ्याच सहजपणे त्या इतरांना वाटून टाकतात. मला आठवते, एकदा त्या काश्मीरला गेल्या आणि आठदहा हजारांची खरेदी करून आल्या. त्यात तर्‍हेतर्‍हेच्या रेशमी साड्या, काश्मिरी शाली, अक्रोडाच्या कलापूर्ण वस्तू, मण्यांच्या माळा, आणि अशाच इतर कितीतरी सुंदर सुंदर चिजा होत्या. पण लताबाई मुंबईला आल्या आणि आठदहा दिवसांतच त्या सार्‍या वस्तू हळूहळू अदृश्य होत गेल्या. स्वतः लताबाईंनीच त्या कुणाकुणाला वाटून टाकल्या होत्या. या अलिप्त वृत्तीला त्यांच्या विनोदबुद्धीनेही साह्य केले असावे. त्या पूर्वी फार रागीट होत्या असे मी ऐकले आहे. त्याही स्वत: तसे सांगतात. पण माझ्या परिचयाच्या काळात तो राग माझ्या तरी कधी निदर्शनास आला नाही. आता त्या खूप शांत, संयमी असतात. दुसरे माणूस बोलत असता ते सगळे शांतपणे ऐकून घेण्याचा स्त्रीच्या ठायी सहसा न दिसणारा दुर्मिळ गुण त्यांच्या ठायी आहे. कितीतरी आत्मप्रौढीची, खुळेपणाची भाषणे त्या आपल्या अभिजात विनोदबुद्धीने सुसह्य करून घेतात. एक गमतीचा प्रसंग मला आठवतो. लतबाईंच्या पार्श्वगायनाच्या कारकीर्दीला पंचवीस वर्षे लोटली त्या वेळची गोष्ट. त्यांचे सर्वत्र गौरव होत होते. अनेक लोक नाना प्रकारच्या भेटवस्तूंचा त्यांच्यावर वर्षाव करत होते. अशातच मद्रासची एक गायिका किंवा नटी त्यांना भेटायला आली होती. तिने चांदीचा एक सुंदर करंडक लताबाईंसाठी भेट म्हणून आणला होता. तो लताबाईंच्या हाती दिल्यानंतर काहीशा आढ्यतेने ती म्हणाले,
"लता, बहोत महंगी चीज है. जरा सम्हलके रखना!"
लताबाईंना खूप हसू कोसळले असावे. पण त्या चेहरा शांत, गंभीर ठेवून आश्वासक स्वरात तिला म्हणाल्या,
"हां हां. बिलकुल सम्हालके रखूंगी!"

मला स्वत:ला लताबाईंनी भरभरून स्नेह दिला. मुंबईला मी होते तेव्हा माझ्या बारीकसारीक अडचणी, तशाच मोठ्या समस्या त्या आस्थेने, सहृदयतेने समजून घेत. सल्ला विचारला तर तोही देत. माझ्या कामात त्यांनी सतत रस घेतला. त्यांचा परिचय झाला तेव्हा मला माणसांत बसणे उठणे, वाङ्मयविषयक गप्पा मारणे यांची अतिशय आवड होती. ते लताबाईंच्या ध्यानात आले असावे. एकदा त्या म्हणाल्या,
"शांताबाई, माणसं आवडणं, गप्पा आवडणं हे सारं ठीक आहे, त्यात वावगं काही नाही. पण तुम्हांला एक सांगू? कधी कधी तुम्ही एकट्या राहायला शिका. केव्हातरी स्वत: स्वत:च्याच संगतीत राहणं फार चांगलं असतं. आपलीच आपल्याला एक वेगळी ओळख पटते."

माझ्याबद्दल त्यांना वाटणारी आस्था अनेक रीतींनी प्रकट होत असे. वांद्र्याला 'साहित्य सहवास'मध्ये आम्ही फ्लॅट घेतला. त्याबद्दल त्या सतत चौकशी करत. फ्लॅट आमच्या ताब्यात आला तेव्हा त्यांनी एकदा मला विचारले,
"आता वास्तुशांत करणार की नाही?"
फ्लॅटचे पैसे भरता भरता मी जिकिरीला आले होते. शेवटचा हप्ता देताना तर माझी अगदी तारांबळ उडाली होती. मी काहीशा विरक्तपणे म्हटले,
"मी कसली वास्तुशांत करणार? ते खर्चाचं काम आहे.." आणि मग एकदम काही कल्पना सुचून मी म्हणाले,
"तुम्हीच येऊन गणपतीच्या चित्राची पूजा कराल का? आम्ही तीच वास्तुशांत समजू."
मी असे म्हटले खरे, पण लताबाई येतील असे मला खरोखर वाटत नव्हते. एक तर त्या आजारी होत्या. दुसरे म्हणजे हृदयनाथचे लग्न ठरले होते. त्याची खरेदी, पत्रिका वाटणे हे सारे काम चालू होते. पण लताबाईंनी माझ्या विनंतीला तात्काळ मान दिला. गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून त्या 'साहित्य सहवास'मध्ये आल्या. बरोबर मीनाताई, त्यांची मुले, ड्रायव्हर होता. आल्यावर त्यांनी गणपतीची पूजा केली. पथ्य असल्यामुळे त्या काही खाणार नव्हत्या. पण कपभर दूध त्यांनी घेतले. बराच वेळ आमच्याकडे घालवला. फ्लॅटचे तोंड भरून कौतुक केले, आणि तिथून मग त्या पत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडल्या. त्यांच्या दिलदार, स्नेहशील स्वभावाचे एक सुंदर दर्शन त्या दिवशी मला घडले.

फार तरुण वयात कीर्तीचे, संपत्तीचे, लोकप्रियतेचे लोटच्या लोट अंगावर कोसळले. पण त्या कशाचेही ओझे लताबाईंनी होऊ दिले नाही. एवढ्याशा कीर्तीने, पैशाने, मानसन्मानाने माणसे किती बिघडतात. त्याखाली ती कशी मोडून जातात. लताबाईंनी सारा मोठेपणा अंगावरून असा सहज जाऊ दिला आहे. त्यामुळेच त्या इतक्या साध्या, निर्मळ, स्वाभाविक राहिल्या आहेत. मानसन्मानाबद्दलची त्यांची निरिच्छा गंमतीदार रीतीने व्यक्त होत असते. स्वत:ची सुंदर रेकॊर्ड असेल तर ती त्या कौतुकाने ऐकवतील. पण स्वत:ला मिळालेली मेडल्स, मानचिन्हे मात्र सहज विसरून जातील. त्यांच्या घरी मी जाई तेव्हा एखादे नवे मानचिन्ह घरात दिसे. कधी एखादे मेडल मिळालेले असे. कधी बंगालच्या किंवा मद्रासच्या फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचे गौरवाचे मानपत्र धाडलेले असे. पण त्याविषयी लताबाई स्वत: चुकूनही बोलत नसत. मी कुतूहलाने विचारले तर थोडक्यात त्याची माहिती देऊन वेगळाच विषय सुरू करत. त्या तिरुपती मंदिराच्या आस्थान संस्थान गायिका आहेत. खैरागड युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट दिली आहे. भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पदवी दिली आहे. इतरही अनेक गौरव त्यांच्या पायांशी लोळण घेत आहेत. पण हे सारे त्यांनी सहजपणे स्वीकारले. चित्रपट व्यवसायातली पंचवीस वर्षे पूर्ण झाली. वृत्तपत्रांनी लताबाईंबद्दल लेख लिहिले. सर्वत्र त्यांचे गौरव झाले. 'हिज मास्टर्स व्हॉइस'ने त्यांच्या सन्मानार्थ ताजमध्ये थाटाची पार्टी दिली. पण या सार्‍या सोहळ्यात लताबाई तशाच साध्या होत्या. वेळी स्वत:चीही थट्टा करत होत्या. सत्कार समारंभ संपला. माणसांची घरी सुरू असलेली वर्दळ संपुष्टात आली. गौरवाच्या पुष्पमाळा, पुष्पगुच्छ यांचा सुगंधही ओसरला. आणि एके दिवशी लताबाई हसत हसत म्हणाल्या,
"चऽऽला! संपला सत्कार एकदाचा. आता उद्यापासून आपलं रोजचं काम सुरू. उद्या रेकॉर्डिंग ठेवलंय मी."

त्या क्षणी माझ्या मनात आलं, या खर्‍या लताबाई. सार्‍या मानसन्मानातून, गौरवातून, जयजयकारातून झटकन अलिप्त होणार्‍या. पुन्हा आपल्या गाण्याकडे वळणार्‍या. तीच उत्कटता, तीच प्रामाणिक कर्तव्यनिष्ठा. जातिवंत कलाकाराच्या मनातले कलेवरचे तेच निर्भर प्रेम.

बाहेरून खूप विनोदी, प्रसन्न वाटणार्‍या लताबाईंच्या अंतर्यामी एक उदास सूर आहे. कसल्याही ऐहिक गोष्टीच्या उणिवेतून तो सूर निर्माण झालेला नाही. खोल विचारी, संवेदनशील, कलावंत हृदयाला जाणवणार्‍या असीम करुणेतून त्या सुराचा उगम झाला आहे. मानवी जीवनाच्या मूलभूत एकाकीपणातून, व्यथेतून, वेदनेतून तो सूर उमटलेला आहे. या सुराने लताबाईंना श्रेष्ठ कलावंत केले. त्यानेच गाढ सहानुभूती त्यांना दिली. दुसर्‍याच्या दु:खाशी चटकन समरस होण्याची शक्ती त्यांना दिली. आणि त्याचबरोबर अपार सोशिकपणाही त्यांना दिला. मोठ्या कलावंताचे हे सर्वश्रेष्ठ वैभव लताबाईंना लाभले आहे. त्याने त्यांना फार थोर केले आहे. त्याचबरोबर अत्यंत नम्रही केले आहे.

त्यांच्या सहवासातली आणखी एक आठवण. अशीच एक संध्याकाळ होती. फोर्टमधल्या कावसजी जहांगिर हॉलमध्ये भरलेले राजस्थानच्या कलावस्तूंचे प्रदर्शन पाहून लताबाई घरी परत येत होत्या. 'केम्प्स कॉर्नर'पाशी त्यांची गाडी आली आणि एकदम त्या म्हणाल्या, "आपण इथेच खाली उतरू. ड्रायव्हर गाडी घेऊन पुढे जाईल. आपण अशा चालत चालत घरी जाऊ या." बरोबर उषाताई आणि मी. संध्याकाळची वेळ. पेडर रोडवर उलटसुलट गाड्या धावत होत्या. अफाट रहदारी होती. या गर्दीतून पायी जायचे? रस्ता ओलांडायचा? पण लताबाईंना ती कल्पना फार आवडली होती. त्या चटकन गाडीतून खाली उतरल्या आणि त्यांनी भरभर चालायला सुरूवात केली. चालण्याचा वेग इतका की त्यांच्याबरोबर पावले ताकणे अवघड होऊ लागले. मुक्तपणे, निर्भर आनंदाने, लहान मुलीच्या उत्सुकतेने त्या चालत राहिल्या. घर जवळ आले होते. लताबाई आमच्याकडे वळून म्हणाल्या,
"बघ कशी मजेत चालत आले मी. वाटेत मला कुणीही ओळखलं नाही."
त्या इतके बोलत आहे तेवढ्यात समोरून चित्रपटव्यवसायातले एक बडे गृहस्थ सपत्निक गाडीतून येताना दिसले. लताबाईंना बघून त्यांनी गाडी थांबवली. त्यांना रस्त्याने चालताना बघून ते अगदी विस्मयचकित होऊन गेले.
"अरे! लताजी! आप यहां कैसी?"
मग नमस्कारचमत्कार. विचारपूस. थोड्या व्यावसायिक गप्पा, प्रकृतीची अगत्याने चौकशी. सारे काही यथासांग झाले. कधी नव्हे ती जरा मोकळीक मिळालेल्या छोट्या हौशी मुलीची पुन्हा विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर बनली. प्रसिद्धीचे ते झगझगीत वलय पुन्हा भोवती तळपू लागले.

_________________________________________________

हा लेख मायबोलीवर प्रसिद्ध करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्री. केशव गोपाळ शिरसेकर व सुरेश एजन्सी, पुणे, यांचे मनःपूर्वक आभार. लेखाचे सर्वाधिकार श्री. केशव गोपाळ शिरसेकर यांच्याकडे सुरक्षित.

टंकलेखन साहाय्य - adm, aarfy, sajira, shraddhak

_________________________________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचायच्या आधीच धन्यावाद देते चिनूक्स!
कारण हा लेख वाचणे किती आनंददायी असणार आहे हे नुसते चाळल्यावरच लक्षात येतेय.
आता आरामात वाचेन.

-----------

झाले वाचून.
अतिशय सुंदर!!

सुरेख! लगेच वाचले.. किती हृद्य आठवणी आणि त्यांचे शब्दांकनही! चिन्मय आणि इथे पोचवणार्‍या सर्व संबंधितांचे धन्यवाद!

अप्रतिम सुंदर!! वाचून झाल्यावर काय वाटतंय ते शब्दांत सांगता येणं अवघड आहे.

हे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल चिनूक्स, अडम, आर्फी, साजिरा आणि श्रद्धा तुम्हाला मनापासून धन्यवाद.

हे येथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल चिनूक्स आणि इतर सर्वांचे आभार !
एकदम मस्त वाटलं...

सुं द र!
दिवस सार्थकी.
फक्त एक प्रश्न विचारू का?
शांताबाईनी लतादीदींच्या सहस्रचंद्रदर्शनसोहळ्यानिमित्त कसा लिहिला हा लेख? सहस्रचंद्रदर्शनसोहळा म्हणजे ८० पूर्ण झाल्यानंतर ना? म्हणजे आता २००९ साली लतादीदींचा सहस्रचंद्रदर्शनसोहळा असेल. पण शांताबाई तर २००२ मध्येच गेल्या ना?

ह लेख सहस्रचंद्रदर्शनसोहळ्यानिमित्त लिहिलेला नाही. आपण फक्त तो या सोहळ्यानिमित्त मायबोलीवर प्रकाशित केला. 'वडिलधारी माणसं' हे पुस्तक तसं बरंच जुनं आहे.. या पुस्तकातला हा लेख आहे. Happy

लतादीदींच्या सहस्रचंद्रदर्शनसोहळ्यानिमित्त शांताबाईंनी लतादीदींबद्दल लिहिलेला हा लेख <<<

झेलम ची शंका अगदीच चुकीची नाही. वरील वाक्याचा तोपण एक अर्थ होतो.

"शांताबाईंनी लतादीदींबद्दल लिहिलेला हा लेख लतादीदींच्या सहस्रचंद्रदर्शनसोहळ्यानिमित्त इथे टाकत आहे" असे जास्त बरोबर झाले असते Happy

सुंदर लेख. लतादीदींना वाढदिवशीच्या (उशीराने) शुभेच्छा!
chinoox, adm, aarfy, sajira, shraddhak हा लेख इथे वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.

खरंच सुरेख लेख. छान वाटले वाचून. चिन्मय आणि ग्रूपचे आभार. Happy

<<मग त्या रामकृष्ण परमहंसांची पत्रे, ग्रंथ वाचतात. >>
या वाक्याच्या संदर्भाबद्दल थोडी शंका आहे. रामकृष्ण परमहंसांनी बहुतेक स्वत: कोणाला पत्रे लिहिलेली नाहीयेत. पत्रे सगळी विवेकानंदांची आहेत.

हे आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल चिनूक्स, अडम, आर्फी, साजिरा आणि श्रद्धा तुम्हाला मनापासून धन्यवाद
----------------------------------------------------------------------------------
अनुमोदन!

.

Pages