अमृतातेहि पैजा जिंके ...
ऑफिसातल्या टेबलसमोर मुकेश डोकं धरून बसला होता. त्याला काही सुचत नव्हतं . गेले सहा महिने त्याने नुसत्या विचारात घालवले होते , पण जसजसा जास्त विचार करी तसतसा तो आणखीन गोंधळात पडत होता . लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेच असूनही त्याचा निर्णय झाला नव्हता . त्याच्या ह्या निर्णयावर पुढच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या . निर्णय जर चुकला तर सर्व खापर त्याच्या डोक्यावर फुटणार होतं , आणि जवळपास तशीच परिस्थिती निर्माण झाली होती . आयुष्यात कधीतरी अशी वेळ येतेच ज्यात घेतलेले निर्णय पुढची दिशा ठरवतात , ती वेळच खुप महत्वाची असते . मुकेश सध्या विचित्र परिस्थितीत अडकला होता . कालच मित्रांबरोबर झालेला संवाद.... संवाद कसला , वादच ! त्याला आठवला .
" मुलगा तीन वर्षांचा झाला तरी अजून स्कुलमध्ये टाकला नाही ? माझी मुलगी तर अडीच वर्षांची असतानाच मी प्ले ग्रुपला टाकली ... हाऊ कॅन यु बी सो केअरलेस मुक्या ? "
" मुलाच्या भविष्याचा काही विचार आहे का नाही तुला ? "
" इतका आळशीपणा बरा नाही रे ... स्वतः तर आळशी आहेस आणि मुलाला पण तसल्याच सवयी लावतोस ? "
मित्रांच्या प्रश्नांच्या सरबत्तीपुढे मुकेशला काही बोलताच आलं नव्हतं . मुलाच्या शाळेच्या बाबतीत आपण थोडा उशीरच केला असा विचार मनात येऊन त्याला आता अपराधी वाटू लागलं . त्याला तसं कारणही होतं . गेले सहा महिने तो त्याच विचारात होता . त्याने काहीतरी मनाशी ठरवलं होतं , पण आजूबाजूची परिस्थिती अशी होती की त्याला निर्णय घ्यायला वेळ लागत होता . तरी मोठ्या धीराने त्याने आपल्या मनातला विचार मित्रांसमोर बोलून दाखवण्याचा निश्चय केला . आपला निर्णय जर ह्यांना सांगितला तर आत्ता ते जेवढं बोलतायत त्याच्या दुप्पट बोलणी खावी लागणार ह्याची त्याला खात्री झाली होती .
" मी मुलाला मराठी शाळेत पाठवायचा विचार करतोय " मुकेश म्हणाला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याच्या मूर्खपणाचे वर्णन करणारे बॉम्बगोळे त्याच्यावर येऊन आदळलेच !
" तुला अक्कल आहे का रे ? मराठी शाळेत ? "
" मराठी शाळांची अवस्था काय झालीय म्हायतेय का तुला .... ? "
" जगाच्या कॉम्पिटिशनमधे तुझा पोरगा कसा टिकेल रे ? "
" मुक्या , मला माहित आहे तुला मराठीचा लय पुळका आहे ते , पण तुझ्या पोराचं कशाला नुकसान करतोय ? "
" इंग्लिश मस्ट झालंय रे आजकाल .... त्याला ऑप्शन नाही "
नाही म्हटलं तरी मित्रांच्या ह्या हल्ल्यापुढे तो एकटा असा किती टिकणार होता ? सगळ्यांनीच त्यांची मुलं इंग्लिश मिडीयममधे घातली होती आणि ज्यांची लहान होती , किंवा ह्या दुनियेत अद्याप आलेली नव्हती , ती सुद्धा इंग्लिश मिडीयममधेच जाणार होती . काहींनी तर मुलांच्या शिक्षणाचं इतकं टेंशन घेतलं होतं की , मूल जन्माला यायच्या आधीच त्याच्या उच्च शिक्षणापर्यंतची तयारी करून ठेवली होती . प्रवाहाचं म्हणणं होतं की , इंग्लिश मिडीयमच मुलांच्या शिक्षणासाठी योग्य आहे आणि त्या प्रवाहाच्या उलट जायचं म्हणजे विरोध होणार हे तर निश्चित होतंच. मुकेशला कुठेतरी मनातून असं वाटत होतं की आपल्या मातृभाषेतून, म्हणजे मराठीतून मुलाने शिक्षण घ्यावं. परंतु त्याच्या ह्या विचारांना प्रथम सुरुंग लागला तो त्याच्या स्वतः च्या घरातूनच !
" माझ्या बहिणीची मुलं कॉन्व्हेंटमध्ये जातात , आणि आपला मुलगा त्या थर्डक्लास मराठी शाळेत टाकला तर काय किंमत राहील आपली ? त्या मुलांसारखा फाड फाड इंग्लिश कधी बोलायला शिकेल तो ? " इति अर्धांगिनी .
" त्या इंग्लिश मिडीयमची मुलं पोएम का काय म्हणतात ते ऐकायला फार गोड वाटतं बाई ... " इति मातोश्री .
" इंग्रजी म्हणजे वाघिणीचं दूध ! ते पचायला सोपं नाही , तेव्हा त्याचं शिक्षण इंग्लिश मिडीयममधूनच व्हायला पाहिजे " इति पिताश्री .
बायकोने जाऊन इंग्लिश मिडीयमच्या शाळांचे फॉर्मसुद्धा आणून ठेवले होते . काय करावं त्याला सुचेना . तशा त्याने जवळच्या दोन तीन मराठी शाळा पाहून ठेवल्या होत्या , परंतु त्यांची स्थिती पानगळ झालेल्या झाडांसारखी झाली होती . एकेका वर्गात दहा - पंधराच मुलं ! तुकड्या वगैरे भानगड इतिहासजमा झाली होती. तुकड्यांचेच तुकडे झाले होते . त्यात शाळेत म्हणाव्या तशा सोयी सुविधा नव्हत्या . त्यामुळे खालसा झालेल्या संस्थानाची व्हावी तशी मराठी शाळांची अवस्था झाली होती. वास्तविक मुकेश मराठी शाळेत शिकलेला , त्याची बायकोही मराठी शाळेची विद्यार्थिनी , त्यांच्या काळी इंग्लिश मिडीयमच्या शाळा फार नव्हत्या आणि तशी काही गरजही वाटत नव्हती पण आता मात्र गेल्या काही वर्षात मशागत न केलेल्या शेतात तण उगवावं तशा इंग्लिश मिडीयमच्या शाळा उभ्या राहिल्या होत्या . मराठी शाळांची स्थिती भिकेला लागलेल्या सावकारासारखी झाली होती . कारण कोणतेच सुजाण आईबाप आपल्या मुलाला मराठी शाळेत पाठवायचं धाडस करत नव्हते . मुलं नाही म्हणून शाळांची दयनीय अवस्था आणि शाळांच्या सुमार स्थितीमुळे मुलं येत नव्हती अशा दुष्टचक्रात मराठी शाळा अडकलेल्या .... नाही म्हणायला काही मराठी शाळा चांगल्या होत्या , पण आता सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं त्यांच्या बाबतीत होत होतं . मुलासाठी मराठी शाळेत प्रवेश घेण्याची खूप इच्छा असूनही मुकेशपुढे हे प्रश्न उभे राहिले होते . त्यात पुन्हा मुलगा मोठा झाल्यावर समजा तो स्पर्धेत मागे पडला तर तोच आपल्याला विचारील की त्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत का घातला नाही ? तो आपल्यालाच दोष देईल ... त्यावेळी आपण त्याला काय उत्तर देणार ? काय करावं ? त्याचं डोकंच चालणं बंद झालं होतं. कामात लक्ष लागेना . काहीतरी मार्ग निघाला पाहिजे ... कोणीतरी योग्य दिशा दाखवायला हवी … देवा ! काय करू काहीच कळत नाही … विचारात असतानाच , अचानक टेबलावर पडणाऱ्या प्रखर प्रकाशाने त्याने वर पाहिलं , तर त्याचे डोळेच दिपून गेले . समोर एक तेजस्वी तरुण उभा होता , अंगावर भगवी वस्त्रे परिधान केली होती . मानेपर्यंत रुळणारे , मागे फिरवलेले काळेभोर केस . , गळ्यात रुद्राक्षांच्या माळा , कपाळावर अष्टगंध आणि डोळ्यांत अलौकिक तेज . समोर कोणीतरी दिव्य व्यक्ती उभी असल्याचं त्याने पाहिलं. आधी तर त्याला कळेना कि हा काय प्रकार आहे ? मग त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली . त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना , समोर साक्षात ज्ञानेश्वर माऊली उभे होते .
" माऊली तुम्ही ? " त्याने आश्चर्याने विचारलं .
" होय " चेहऱ्यावर प्रसन्न हास्य आणत माऊली म्हणाले .
"मी ... मला .... मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना ... " समोरचं तेजस्वी रूप बघून मुकेश पुरता गोंधळून गेला .
" बऱ्याच दिवसांपासून तू चिंतेत आहेस ... म्हणून म्हटलं तुला भेटावं "
" माऊली , तुम्ही मला भेटायला आलात ? हे तर माझं परमभाग्यच ! पण मला अजूनही विश्वास बसेना ... " मुकेशने आजूबाजूला पाहिलं , त्याला सगळ्यांना सांगावंसं वाटत होतं कि साक्षात ज्ञानेश्वर माउली त्याच्या समोर उभे आहेत , पण जो तो आपापल्या कामात मग्न होता. कुणाचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं.
" तुझ्याशिवाय मला कोणीही पाहू शकत नाही . त्यामुळे तू बाकीच्यांना काही सांगण्याच्या भानगडीत पडू नकोस . सध्या तू ज्या विचारात गुंतलेला आहेस त्यात तुला मदत करावीशी वाटली म्हणून मी आलोय "
" बरं झालं माउली तुम्ही आलात. आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा ... मला काहीच सुचत नाही "
“ त्यात न सुचण्यासारखं काय आहे ? चल , आपण जरा एक फेरफटका मारून येऊ ... "
" चालेल .... पण कुठे माऊली ?"
" आपण काही ठिकाणी जाणार आहोत . कदाचित त्यामुळे तुला निर्णय घ्यायला मदत होईल ... "
" ठीक आहे , मी लगेच तयार होतो . ” म्हणत त्याने ड्रॉवरमधून एक कागद काढला आणि त्यावर काहीतरी लिहू लागला .
" काय लिहितोयस ? "
" अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा अर्ज… " मुकेश म्हणाला, त्यावर माऊली प्रसन्न हसले अन म्हणाले , " त्याची काही गरज नाही .... आपण सूक्ष्मदेहाने जाऊन लगेच परतणार आहोत "
" ज्ञानेश्वर माऊली , मी धन्य झालो .... अशाही माझ्या सी एल संपतच आल्या होत्या ... "
" डोळे मिट ...." माऊली म्हणाले. मुकेशने आपले दोन्ही डोळे बंद केले आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या कानांवर पुन्हा शब्द पडले , " डोळे उघड " त्याने डोळे उघडले . ते एका इंग्लिश मिडीयमच्या शाळेत आले होते .
" माऊली हे आपण कुठे आलोय ? कोणती शाळा आहे ही ? "
" ते तितकंसं महत्वाचं नाही . आता आपण ह्या शाळेतल्या समोरच्या त्या वर्गात जाणार आहोत . फक्त एक काळजी घ्यायची , कसलाही आवाज करायचा नाही . जे समोर घडत आहे ते फक्त पाहायचं , समजलं ? " मुकेशने लहान मुलासारखी मान डोलावली .
दोघे सूक्ष्मदेहाने समोरच्या वर्गात गेले . तो चौथीचा वर्ग होता . वर्गात टीचर शिकवत होत्या , अर्थातच इंग्लिशमधे ! माउलींनी खूण करताच खिडकीशेजारच्या बाकावर बसलेल्या एका मुलाकडे मुकेशचं लक्ष गेलं . तो मुलगा मख्ख चेहऱ्याने शिकवणाऱ्या टीचरकडे पहात होता . त्याला काहीच समजत नव्हतं . टीचरने त्यालाच एक प्रश्न विचारला , पण त्याला काहीच न समजल्यासारखा पाहु लागला . टीचर त्याला ओरडली . ती भाषा त्याला समजत नव्हती पण टिचरच्या हावभावावरून ती आपल्याला ओरडतेय हे त्याच्या लक्षात आलं. तो आणखीन अस्वस्थ झाला . आजूबाजूची मुलं त्याच्याकडे बघून हसु लागली . काय करावे हे न सुचून त्याच्या त्याचा चेहरा मलूल पडला . मुकेशला त्या लहान मुलाची दया आली . टीचर काय बोलतायत तेच त्याला कळत नव्हतं . शेवटी चिडून टीचरने त्याला खाली बसायला लावलं . तो बेंचवर डोकं ठेऊन हुंदके देऊ लागला . मुकेशला खूप वाईट वाटलं . माऊली त्याला बाहेर घेऊन आले .
" तुला काय समजलं मुकेश ? " माउलींनी विचारलं .
" त्या मुलाला काहीच कळत नव्हतं . इंग्रजीत बोललेलं त्याला समजतच नव्हतं बहुतेक ... "
" अगदी बरोबर ! मुलाच्या घरात मराठी भाषा बोलली जाते , आणि शाळेत इंग्रजी भाषा , त्यामुळे त्या मुलाचा गोंधळ उडालेला आहे. दोन्ही भाषांची मिसळ झाली आहे त्याच्या डोक्यात … शिक्षिकेने विचारलेल्या प्रश्नाचं त्याला आकलन झालं नाही त्यामुळे उत्तर काय देणार ? अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच त्याचा उरलासुरला आत्मविश्वासही नाहीसा होईल . ”
“ मला त्या मुलाची दया आली . वाटलं, त्याच्या जागी माझाच मुलगा आहे . ”
“ साहजिकच आहे . सर्वच नाही पण बऱ्याच मुलांची अशी अवस्था होत असेल . खरं तर प्रत्येक मूल हे बुद्धिमान असतं , पण जरा त्याच्या कलानं घेतलं पाहिजे . त्याला समजेल अशा भाषेत त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे . त्याला त्याच्या मातृभाषेत सांगितलेलं लवकर समजतं . बऱ्याच पालकांना ह्याची जाणीव नसते . मूल शाळेत अभ्यास करत नाही म्हणून त्याच्यावर पुन्हा अभ्यासाची जबरदस्ती केली जाते . पण जर त्याला भाषाच समजली नाही तर ते बिचारं मूल तरी काय करील ? ”
“ माउली , खरं आहे अगदी तुमचं … मुलाला समजेल अशीच भाषा वापरली पाहिजे . आणि मातृभाषेशिवाय त्याला जवळची दुसरी भाषा कोणती नसेल … ”
“ बरोब्बर ! चल , आपल्याला आता दुसऱ्या ठिकाणी जायचंय . डोळे मिट ” माउली म्हणाले
दोघे एका कुठल्याशा चाळीत आले. सूक्ष्मदेहाने समोरच्या घरात गेले . घर मध्यमवर्गीय माणसाचं होतं . बेताचं सामान , गरजेपुरती भांडी स्वयंपाक घरात होती . भिंतींचे पोपडे निघालेले , वर पत्रा उन्हाने तापला , त्यामुळे आत खुपच उष्णता जाणवत होती . एक मध्यमवयीन माणूस त्या घरात आला . तो त्या घराचा कर्तापुरुष असावा , कारण त्या घरातल्या गृहिणीने लगेच उठून त्याला पाणी दिले आणि विचारले , " आज लवकर कसे काय आलात ? " त्यावर तो माणूस काहीच बोलला नाही . त्याच्या चेहऱ्यावरून नवरा कसल्यातरी चिंतेत आहे हे त्या गृहिणीला समजलं . तिने काळजीने पुन्हा विचारलं . पण तो सांगायचं टाळत होता . शेवटी त्या गृहिणीने शपथ घातली तेव्हा त्याचा नाईलाज झाला .
" माझा जॉब गेलाय . दोन महिन्यांची नोटीस मिळालीय ऑफिसमधून… " म्हणत त्याने एक कागद तिच्यासमोर धरला . पायाखालची वाळू सरकावी तसं काहीतरी त्या गृहिणीला वाटलं . त्या धक्क्यातून सावरल्यावर तिच्या मनात पहिला विचार आला तो त्यांच्या मुलांचा ! त्यांना दोन मुलं होती , मोठी मुलगी आठवीत आणि लहान मुलगा पाचवीत . आपल्याला मिळालं नाही पण, मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून दोघांना महागड्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत घातलं होतं . आधीच त्यांच्या भरमसाठ फिया भरून त्या माणसाचं कंबरडं मोडलं होतं , त्यात आता त्याची नोकरी गेली होती . दुष्काळात तेरावा महिना !
“ आता काय करायचं ? मुलांच्या शिक्षणाचं कसं होईल ? ” गृहिणीने काळजीने विचारलं .
“ तू काळजी करू नको , मी करीन काहीतरी … एक दोन ठिकाणी सांगून ठेवलंय … बघू काय होतं ते ”
“ आपलं काही नाही हो , पण पोरांच्या शाळेचा काही प्रॉब्लेम व्हायला नको ”
“ तू नको काळजी करू … मी तसं काही होऊ देणार नाही ”
“ आपल्याला आता खूप काटकसर करावी लागणार … पुढच्या महिन्यात दोघांचे मिळून सव्वा लाख फी भरायचीय … काहीच सुचत नाही आता … ” तिने डोक्याला हात लावला .
माउलींनी खूण केली आणि दोघे त्या घराबाहेर आले .
“ खरंच माउली , शिक्षणाचा नुसता बाजार झालाय … मध्यमवर्गीयांच्या मुलांनी तर शिकावं कि नाही हाच प्रश्न पडलाय … ” मुकेश म्हणाला .
“ महाग म्हणजे चांगलं, असं प्रत्येकवेळी असेलच असं नाही . अरे , मध्यमवर्गीयच काय पण चांगली आर्थिक परिस्थिती असलेले लोकही पोरांच्या फियांच्या भाराने वाकलेत … त्या मानाने मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये फी कमी आहे आणि मुलांना विषयाचं आकलन चांगलं होतं . ”
“ माउली , आकलन होतं म्हणजे नेमकं काय ? ”
“ त्यासाठी आपण आणखी एका ठिकाणी जातोय . डोळे मिट ”
दोघे एका मराठी माध्यमाच्या शाळेच्या आवारात आले . माउली मुकेशला घेऊन त्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये गेले . तिथे आधीच एक पालक आपल्या मुलाला घेऊन आले होते . त्यांचा संवाद चालू होता .
“ पण तुम्हाला असं का करावंसं वाटलं ? ” मुख्याध्यापकांनी मुलाच्या वडिलांना विचारलं .
“ सर , खरंच माझी चूक झाली . शेजारच्याचा मुलगा कॉन्व्हेंटमधे जातो म्हणून मी पण ह्याला त्याच शाळेत टाकला . पहिल्यांदा बरं वाटलं . त्या इंग्लिश कविता , पोएम म्हणायचा , वन टू टेन म्हणायचा , मस्त वाटायचं … वाटायचं आपलं पोरगं किती हुशार झालं इंग्लिश मीडियमच्या शाळेत जाऊन … पण माझा गैरसमज होता तो … आता त्याला शाळेत काय शिकवतात ते कळतच नाही आणि पोराचा अभ्यास घ्यायला आम्हाला वेळ नाही . त्याची क्लासटीचर म्हणाली कि ह्याला सांगितलेलं काही समजत नाही . मग मला वाटलं कि आता त्याला मराठी शाळेतच टाकू . त्याचं ह्या वर्षी ऍडमिशन होईल ना ? प्लिज सर काहीतरी करा … पण ह्याला शाळेत घ्या . खूप उपकार होतील … ”
“ नशीब तुम्हाला लवकर समजलं . अहो , मुलांचं शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतच होणं गरजेचं आहे . त्याच भाषेत मुलांना विषयाचं आकलन नीट होतं . कारण मुलं त्यांच्या मातृभाषेतच विचार करतात . शिक्षणाची तीच भाषा असली तर विषय त्यांना लगेच समजतो … ”
“ मला तुमचं म्हणणं पटलंय सर . कितीही पैसे लागले तरी चालतील , पण त्याला तुमच्या मराठी शाळेत घ्या ”
“ पैशांचा प्रश्न नाहीच ! आपली फी काही जास्त नाहीच , पण तुमचा निर्णय पक्का झालाय ना ? ” मुख्याध्यापकांनी विचारलं .
“ हो … हो … सर ! एकदम पक्का ! ”
त्यांचं बोलणं संपलं आणि मग मुकेश आणि ज्ञानेश्वर माउली हळूच त्यांच्या ऑफिसबाहेर आले .
“ माउली , आता मला कळतंय तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करताय ते … ”मुकेश म्हणाला .
“ शिकण्याची भाषा जर तुमच्या मातृभाषेव्यतिरिक्त असेल तर बऱ्याच वेळा मुलांना शाळेत शिकवलेलं समजत नाही , त्यामुळे मग पालक क्लास लावतात . हे म्हणजे आगीतून फुफाट्यात पडण्यासारखं आहे . क्लासमधे तर मुलांना काही समजो न समजो , थेट उत्तरं पाठ करायला सांगतात. आणि नुसतं पाठांतर चांगलं असून उपयोग नाही , तर संकल्पना समजणं महत्वाचं “
“ तुमचं म्हणणं मला पटतंय . पण एक शंका आहे … समजा माझा मुलगा मी मराठी शाळेत पाठवला , आणि उद्या तो ह्या स्पर्धेच्या जगात मागे पडला तर ? तर तो मलाच दोष देईल … ”
“ इंग्रजी भाषा ही अन्य भाषेसारखी एक भाषा आहे. तिचा बाऊ करता काम नये , ती शिकलीच पाहिजे , पण त्यासाठी तुमचा पाया महत्वाचा ! आणि तो मातृभाषेतुन शिकल्यानेच मजबूत होणार आहे . असे कितीतरी लोक आहेत जे मातृभाषेतून , मराठीतून शिकले आणि पुढे मोठे झाले … आणि असे कितीतरी लोक आहेत जे इंग्रजी भाषेतून शिकतात आणि त्यांचं पुढे काहीही होत नाही . म्हणजे माझा म्हणायचं उद्देश हा कि यशस्वी होणं हे ज्याच्या त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे … मातृभाषेत घेतलेल्या शिक्षणातून मुलाचा पाया मजबूत होतो, त्याचा त्याला पुढे जाण्यास उपयोगच होतो . ”
” पण इंग्लिश बोलणाऱ्याची एक वेगळीच छाप पडते … त्यात मराठी माध्यमाची मुलं कुठेतरी मागे पडतात . “
“ आपल्याकडे ज्याला इंग्रजी चांगलं बोलता येतं तो सर्वात बुद्धिमान ! असा एक समज आहे जो अतिशय चुकीचा आहे . सरावाने मराठी शाळेत शिकलेली मुलंही चांगलं इंग्रजी बोलतात . त्यामुळे तू हा विचार मनातून काढून टाक . चल , आता आपण एका क्लासमध्येच जाऊ . तुला प्रत्यक्षच पाहायला मिळेल . " माऊली म्हणाले .
दोघे एका इंग्लिश मिडीयमच्या क्लासमध्ये पोहोचले . त्यात शिकवणारी टीचर मुलांना रकाने च्या रकाने पाठ करायला सांगत होती . मुलांना आपण काय वाचतोय , कशासाठी वाचतोय , काहीही समजत नव्हतं . फक्त टीचरने ह्या प्रश्नासाठी हा पॅरेग्राफ पाठ करायला सांगितला , तो करून टाकायचा , एवढंच ध्येय त्यांच्या समोर होतं . ती मुलं पुढे मागे डुलत पाठांतरात गढून गेली होती . त्यात दोन नववीतली मुलं केमिस्ट्रीचं पुस्तक उघडून बसली होती . थोड्या वेळाने टीचर त्यांच्या जवळ आली आणि त्या दोघांना त्यांनी पाठ केलेला उतारा म्हणून दाखवायला सांगितला . दोघांनीही थोडं फार अडखळत तो उतारा बोलून दाखवला . खाण्याच्या सोड्याबाबत परिच्छेद होता . त्यातल्या एकाने दुसऱ्याला तो वाचत असलेल्या वाक्याचा अर्थ विचारला . वाक्य होतं baking soda is used to lighten bread . आता ह्या वाक्याचा दुसऱ्या मुलाने जो अर्थ सांगितला तो ऐकून तर मुकेशला चक्कर येईल कि काय असं वाटू लागलं . तो मुलगा दुसऱ्याला म्हणाला , ‘ बेकिंग सोडा युज केल्यावर ब्रेड मधून लाईट येतो . ‘
“ माउली , आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला . मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिकवलं तर त्यांना विषयाचं आकलन होतं . विषय समजायला सोपा जातो . जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत . आणि त्यामुळे त्यांचं बालपण मुक्तपणे त्यांना जगता येतं . खरंच माउली , मी इतके दिवस उगाचच वाया घालवले . आता मात्र ठरलं ! अगदी पक्कं ठरलं … माझा मुलगा मराठी शाळेत जाणार … ”
“ मुकेश , तू घेतलेल्या निर्णयामुळे मला आनंदच झाला पण आजही माझ्या मनात एक रुखरुख लागून राहिली आहे … सर्वसामान्य लोकांना भगवत्गीता समजावी म्हणून मी तिचं ज्या मराठीत भाषांतर केलं , ज्या मराठी भाषेला ९०० वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे , ती आपली मातृभाषा कमकुवत कशी असेल ? त्यावेळी जशी संस्कृत होती तशीच आज इंग्रजी भाषा झाली आहे . माझ्या मराठीला नेहमी दुय्यम दर्जा का ? मराठी हि अन्य कुठल्याही भाषेपेक्षा कमी नक्कीच नाही. तुम्हाला तुमच्या मातृभाषेचा अभिमान नसेल तर काय उपयोग ? ”
“ नाही माउली , तसं बिलकुल नाही … आम्हाला मराठीचा अभिमान आहे .
‘ मराठी आहे , मराठीच राहणार ,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार ’
अशा प्रकारचे मेसेज आम्ही व्हॉट्स अपवर पाठवत असतो … ” मुकेश गर्वाने म्हणाला त्यावर माउली दिलखुलास हसले .
“ बरं ते जाऊ दे , मराठीचा आभिमान तर हवाच ! त्याचबरोबर इंग्रजीसारखी जगाची भाषाही शिकायला हवी . पण आपला पाया मात्र मातृभाषेशिवाय पक्का होणार नाही हेही तितकेच खरे ! मुकेश , तुझा निर्णय ऐकून मला आनंद झाला . मला आता निघायला हवं …
माझ्या मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजा जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
माउलींच्या रसाळ वाणीने मुकेशचे डोळे आपोआप मिटले गेले . त्याने डोळे उघडले तेव्हा तो ऑफिसच्या टेबलापाशी होता . आजूबाजूला माउली कुठेच दिसत नव्हते . परंतु माउलींनी त्याला दिशा दाखवली होती . आता कोणीही काहीही म्हणाले तरी तो त्याच दिशेने जाणार होता . त्याचा निर्णय आता पक्का झाला होता ….
१००% अगदी बरोबर विचार
१००% अगदी बरोबर विचार मांडलेत...!!! मी स्वतः मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहे...!! १२ वी पर्यंत मी मराठी मिडीयमलाच होतो...!! पुढे मी माझा बी बी ए आणि एम बी ए फक्त इंगलीश मिडीयम मधुन केला....!!! अजुन ही माझ्या कॉलेज ग्रुप मध्ये जवळ जवळ ९०% मित्र हे इंग्लीश मिडीयम मधुन शिकलेले आहेत. पण मी आजही माझ्या कॉलेजच्या मित्रांच्या ग्रुप मध्ये असलो तर, माझ्या ग्रुप मधल्या मित्रांपेक्षा माझं इंग्लीश स्पिकींग हे खुप 'फ्ल्युएंट' आहे. असे काही जरुरीचे नाही की, मुलाचे भविष्य जर चांगले बनवायचे असेल तर त्याला इंग्लीश मिडीयम मधुनच शिकवावे, मराठी मिडीयम मधुन शिकलेली कितीतरी मुलं आज चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत आहेत किंवा मोठे बिजनेसमन आहेत....!!!
छान.कथेतुन मराठीचे महत्त्व
छान.कथेतुन मराठीचे महत्त्व समजावले.
धन्यवाद
धन्यवाद
सुरेख !! याची सध्या फार गरज
सुरेख !! याची सध्या फार गरज आहे.
(No subject)
कथाकल्पना आवडली.
कथाकल्पना आवडली.
माउलींचं मर्हाटी तुम्हाला
माउलींचं मर्हाटी तुम्हाला आणि तुमचं मराठी माऊलीना समजलं , हे पाहून आनंद वाटला
खूप छान! मी मराठीतून च शिकले
खूप छान! मी मराठीतून च शिकले.रिलेट करू शकले त्यामुळे
खुपच छान..! मी आजपर्यंत
खुपच छान..! मी आजपर्यंत वाचलेल्या लेखांपैकी (मराठीच महत्व सांगणाऱ्या) मी पहीला क्रमांक या कथा वजा लेखाला देईल...! माऊलीच अवतरण ही सुरेख कल्पना वाटली. कृपया प्रयत्न करा की या कथेला अधिकाधिक वर्तमान पत्रात प्रसिध्दी मिळेल. ही कथा वाचुन मराठी माधयमाबद्दल अनेक पालकांचे मत परिवर्तन होऊल याची खात्री आहे..!
धन्यवाद ☺
धन्यवाद ☺
सर्व पालकांनी आपल्या मुलांना
सर्व पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावं असं मला वाटतं .
कथा आवडली.
कथा आवडली.