आमच्या घराजवळ एक सायकल ट्रेल आहे. एक जुनी रेल्वे लाईन होती ती काढून तिथे सायकलिंग साठी चा रस्ता बनवला आहे, मस्त सलग १० मैलापेक्षा जास्त लांबपर्यंत आहे. आम्ही मुलांना सायकली घेऊन त्यांच्यामागे रनिंग करत जातो. त्यामुळे गेल्या वर्षीपासून नवऱ्याला सायकल घ्यायची होती. यावर्षी त्याची घेतली आणि मी एकटीच राहिले होते. थोड्या दिवसांपूर्वी माझ्यासाठीही सायकल घेऊन आलो. काय माहित पण सायकल घेतानाही उगाच जमेल की नाही अशी शंका येत होती. एकतर माझी उंची कमी आणि सायकल चालवून बरीच वर्षं झाली आहेत. विकत घेण्यासाठी चालवून बघतानाही नीट जमत नव्हती. पण किंमत, उंची, रंग अशा महत्वाच्या गोष्टी पाहून घेऊन टाकली. पुढच्या रविवारी आम्ही ट्रेल वर गेलो मुलांसोबत अनेक वर्षांनी सायकल चालवली. सायकल चालवायला सुरुवात केली आणि खूप भीती वाटली. अजूनही तशी थोडी भीती वाटत आहेच. गियर वगैरे बदलता येत नाहीये, इ. पण सुरुवात झाली आहे. आजची पोस्ट माझ्या गेल्या अनेक वर्षातल्या सायकल स्वाऱ्यांबाबत. तुमच्याही अशा काही आठवणी असतील तर जरूर सांगा.
आयुष्यात उंची कमी असल्याचे अनेक तोटे आहेत हे अनेकवेळा जाणवले आहे. पण सर्वात जास्त पहिल्यांदा वाटले ते सायकल शिकताना. कमी उंचीमुळे सायकलवरून खाली कधी पाय टेकणार नव्हतेच. साधारण ६-७वीत असताना सायकल शिकलीच पाहिजे असे वाटले. तोवर बऱ्याच मुलींकडे वर्गात स्वतःच्या सायकली होत्या आणि त्यांना त्या चालवताही येत होत्या. माझ्याकडे दोन्हीही नव्हते. मी आणि माझी मधली बहीण सुट्टीच्या दिवशी वडिलांची सायकल घेऊन घराच्या मागे असलेल्या मोठ्या खाजगी रस्त्यावर जायला लागलो. एकतर ती जेन्टस सायकल, त्या दांडीच्या मधून पाय घालून शिकणे म्हणजे अवघडच. त्यात पडताना धरायलाही बहीणच, म्हणजे मोठं कुणी नाही. 'एकदा पेडल मारायला यायला लागलं की झालं आली सायकल' इतकंच ध्येय होतं. दोघी मिळून किती वेळा पडलो असू माहित नाही. त्यात आजूबाजूला घाणेरीची झुडपं गेलं की त्यात झुडूपातच. पण कशीबशी शिकलो.
आता सातवीत मला सायकल यायला लागली. मला नेहमी वाटायचं की लेडीज सायकल असेल तर किती नीट चालवत येईल. अनेक वेळा शाळेतल्या मैत्रिणीची सायकल दुपारच्या सुट्टीत मागून घेऊन चालवायची. कधी ती हो म्हणेल कधी नाही. हळूहळू मला नीट जमायला लागल्यावर मी घरी सायकल घ्यायचा हट्ट धरला. उत्तर 'नाही' होतं. एकदिवस मी अगदीच रागाने जेवण न करता एका खोलीत दार बंद करून बसून राहिले, दिवसभर. आता वाटतं किती बावळटपणा होता. असं केलं माझ्या मुलांनी तर मीही नाहीच म्हणेन. पण त्या रात्री शेवटी कुणी ऐकत नाही म्हणून खोलीतून बाहेर आले. माझ्या रुसलेल्या चेहऱ्याकडे पाहून आजोबांनीं हळूच बोलावलं. म्हटले,"सायकल नाही पण घड्याळ घेऊ तुला." मग एक दिवस जाऊन आम्ही एक सेकंडहँड घड्याळ घेऊन आलो. (त्याचं पुढे काय झालं आठवत नाहीये. ) पण ते आयुष्यातलं पहिलं घड्याळ मिळालं. असो. तरीही सायकलचा हट्ट होताच. तोही आजोबानी पूर्ण केला.
सायकलचा हट्ट पूर्ण व्हायला जरा वेळ लागला. तेव्हा मी आठवीत होते. आजोबांच्या ओळखीच्या माणसाकडूनच ती घ्यायची होती. मी त्यांना म्हटले, "मला बाकीच्या मुलींसारखी BSA ची सायकल हवी आहे". त्यांच्यादृष्टीने ऍटलासची सायकलच बेस्ट होती, एकदम टिकाऊ. त्यामुळे तीच घ्यायचे ठरले. त्यात दोनच पर्याय होते, २२ इंच आणि २४ इंच, मला छोटीच घ्यावी लागणार होती. ज्यादिवशी घ्यायची म्हणून दुकानात गेलो तर त्या माणसाने आणली नव्हती. मग अजून एक दिवस वाट पहावी लागली. अशा वेळी एक दिवस वाट पाहणे म्हणजे किती त्रासदायक असते ते कळते. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आजोबांसोबत जाऊन ती सायकल घेऊन आलो. काळी कुळकुळीत नवीन कोरी सायकल! कधी एकदा दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन जातेय असं झालं होतं. आता दुसऱ्या कुणाची सायकल चालवायची गरज नव्हती. हवी तेंव्हा, हवी तितका वेळ चालवता येणार होती.
दुसऱ्या दिवशी आवरून शाळेला निघणार तर दादा म्हणाले," सायकल चालवत नेऊ नकोस."
मी रागाने विचारले,"का?"
तर म्हणे, 'मला सायकल गर्दीत चालवायची सवय नव्हती आणि त्यामुळे कुठेतरी धडपडेन म्हणून हातात धरून चालत घेऊन जा' असं त्यांचं म्हणणं होतं. अर्थात मी ते ऐकलं नाहीच. पण आई-वडील म्हणून त्यांना तेंव्हा किती काळजी असेल हे आता जाणवत आहे. लवकरच मी नियमित सायकल घेऊन शाळेत जाऊ लागले. कधी गावात जाऊन सामानही आणू लागले. गावातल्या बसस्टँड जवळून सायकल नेताना भीती वाटायची, एकतर गर्दी आणि तिथे असणारा उतार. हळूहळू त्याच्याही सवय झाली. आता साधारण ४-५ महिने झाले असतील सायकल घेऊन. एकदा तोंडी परीक्षा देऊन घरी येत असताना घराच्या समोर मी रस्ता क्रॉस केला आणि क्षणभर कळलेच नाही, काय झाले होते.
मागून येणाऱ्या एका बाईकने मला जोरात धक्का मारला होता. आणि घराच्या गेटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मी कुठेतरी उडून पडले होते. रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मातीत माझा चेहरा पूर्णपणे घासला गेला आणि पुढे मग मला हॉस्पिटलमध्ये कसे नेले वगैरे काही आठवत नाही. दिवसभर माझ्यावर लक्ष ठेवून कुठे डोक्याला मार लागला नाहीये ना हे पाहिले आणि सोडून दिले. जी काही दुखापत झाली होती ती बरीचशी चेहऱ्यालाच होती. चेहऱ्यावर बरेच खरचटले होते, सूज होती. मला पाहायला वर्गातल्या सर्व मुली आल्या होत्या हे नक्की आठवतं. अनेक दिवस घरी राहून मग पुन्हा शाळा सुरु झाली. परीक्षा जवळ आल्या होत्या. ऊनही वाढलं होतं. लागलेल्या ठिकाणी उन्हाच्या झळा अजूनच त्रासदायक वाटायच्या. त्या परीक्षेला सायकलने गेले की नाही हे काही आठवत नाही. पण गेले असेन तर माझा हट्टच असेल तो.
पुढच्या वर्षी,९वीत पुन्हा सायकलस्वारी सुरु झाली. पण यावेळी सोबत लहान भाऊ होता. त्याची पहिली होती. 'शाळेत जायचे नाही' म्हणून तो हट्ट करायचा. त्याला शाळेत नेण्याची जबाबदारी माझीच. तिथेही आजोबांचं म्हणणं,"याला मागे बसवून सायकल चालवू नकोस. मागे बसव आणि तू चालत सायकल हातात धरून ने". काय लाड नुसते नातवाचे. पण हे असे अपवाद वगळता, सायकल आता एकदम सुरळीत चालू होती. ९वी-१०वी संपली आणि जुनियर कॉलेज मध्ये सायकलचे वेगळे पर्व आले. कॉलेज थोडे घरापासून दूर होते. (तीनेक किमी असेल पण तेव्हा ते खूप वाटायचे.) कॉलेजमध्ये आमचा मुलींचा एक चांगला ग्रुप जमला. मग आम्ही गावातून वेगवेगळ्या दिशांनी आपल्या बाजूला असलेल्या मैत्रिणीला घेऊन निघायचो. वाटेत कुठे भेट झाली की सगळ्या मिळून कॉलेजला. परत येतानाही एकत्र निघायचे आणि जिथून वेगळे होणार त्या ठिकाणी बराच वेळ गप्पा मारत रस्तातच उभे राहायचे. एकत्र जाताना अगदी रस्ता अडवूनच जायचो म्हणा ना. सायकलवरून जातानाही अनेक गप्पा व्हायच्या. तेंव्हाच्या त्या गप्पा आणि स्वप्नं वेगळीच होती.
पुढे इंजिनियरिंगला गेल्यावर वाटले सायकल सुटली. पहिल्या सेमिस्टर मध्ये चालतच सगळीकडे जायचो. पण कॉलेज खूप मोठं(तेंव्हा तरी वाटायचं). त्यात रूमवर यायला, जेवायला जायला इ बरंच चालावं लागायचं. म्हणून मग लवकरच घरून सायकल घेऊन आले. यावेळी बहिणीची छोटी रंगीत सायकल घेऊन आले होते. मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही अनेकदा माझ्या त्या सायकलवर डबलसीट जायचो. आम्हाला 'फिशपॉन्ड' पडला होता त्या वर्षी,"सोने की सायकल....". तेव्हा सायकल होती तर वाटायचे आपल्याकडे बाईक(स्कुटी) हवी. पण तीही चालवता येत नव्हतीच. त्याबद्दल पुन्हा कधीतरी. कॉलेजच्या शेवटच्या दोन वर्षात मित्राची MTB सायकल चालवायची भारी हौस होती. सगळीकडे घेऊन जायचे, मेसवर वगैरेही. भारी वाटायचे ती सायकल चालवायला. माझ्यामते बंडखोरीचं एक रूप होतं ते. अमुक एक प्रकारचीच सायकल का चालवायची असं काहीसं. असो.
कॉलेजची चार वर्षं संपली आणि सायकलचा प्रवासही संपला. नोकरी लागल्यावर गाडी घेतली आणि पुन्हा कधी सायकल चालवली नाही. मुलांना घेतली तेंव्हाही कधी वाटलं नाही आपल्यालाही हवी म्हणून. सानुला दोन वर्षांपूर्वी शिकवायला सुरुवात केली. तिला हळूहळू यायला लागलीही. पण एक दिवस लक्ष नसताना सायकलवरून पडून हात मोडून घेतला. हाड मोडले होते आणि तिच्या सर्जरीच्या वेळी उगाचच तिला शिकवली असं वाटलं. तिला भूल देत असताना पाहून खूप रडू आलं होतं. अजूनही ती चालवताना भीती वाटतेच. आता ती भीती कशी घालवायची माहीत नाही. माझ्या आई-वडिलांनी माझ्या अपघातानंतर मला कशी चालवू दिली काय माहित. मला तर जाम टेन्शन येतं. आयुष्याचं चक्र म्हणतात ते हेच असावं.
तर असा मोठा प्रवास माझ्या सायकलस्वारीचा. तो सगळा आठवला तो नवीन घेतलेल्या सायकली मुळे. शाळेत, कॉलेजमध्ये सायकल चालवताना एक वेगळं विश्व् मिळालं होतं. एक प्रकारचं स्वातंत्र्य, आपलं दप्तर मागे लावून वाऱ्यासोबत जोमाने पुढे जायचं, उतारावरून सुसाट जायचं, रात्रीही काही सामान लागलं तर पटकन आणून द्यायचं. तिथपासून ते आताच्या भित्र्या 'आई'पर्यंत मोठाच प्रवास घडला.आता, भित्री आई ते पुन्हा त्या मोकळ्या, मनसोक्त जगणाऱ्या मुलींपर्यंत पुन्हा कधी येते काय माहीत.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
साहिये, मस्त आठवणी आणि फोटो
साहिये, मस्त आठवणी आणि फोटो पण
छान लेख! आवडला.
छान लेख! आवडला.
आवडला लेख.
आवडला लेख.
भित्री आई, पुन्हा त्या मोकळ्या, मनसोक्त जगणाऱ्या मुलींपर्यंत यावी या करता शुभेच्छा
आशुचँप, सचिन, हर्पेन धन्यवाद.
आशुचँप, सचिन, हर्पेन धन्यवाद.
आशुचँप, तुमचे सायकल प्रवास आणि सायकल बद्दल्ची माहितीचे लेख मी वाचलेत. खूप छान आहेत.
हर्पेन,अनेक वेळा आपले रनिंग बरे वाटते पण सुरु करत आहे सायकलिंग.
विद्या.
लेख आवडला
लेख आवडला
एकतर ती जेन्टस सायकल, त्या दांडीच्या मधून पाय घालून शिकणे म्हणजे अवघडच. त्यात पडताना धरायलाही बहीणच, म्हणजे मोठं कुणी नाही. 'एकदा पेडल मारायला यायला लागलं की झालं आली सायकल' इतकंच ध्येय होतं. दोघी मिळून किती वेळा पडलो असू माहित नाही>>>अगदी अगदी.
दुपारी आमचे काका झोपले कि आम्ही बच्चे कंपनी गुपचुप त्यांची सायकल पळवायचो कोणालाच चालवता यायची नाही. अशीच दांडीच्या मधून पाय घालुन शिकलो. सुरुवातीला चालवायला आली पण ती थांबवायलाच जमायचे नाही मागे पळणारे दमून कधीच सायकल सोडून द्यायचे. मग दोनच पर्याय असायचे..... एकतर आपण उडी मारायची किंवा सायकलबरोबर पडायचे
लेख आवडला... चित्रात मागे
लेख आवडला... चित्रात मागे स्नो आहे का?
कोणती सिटी आहे ही?
मस्त मस्त आणि मस्तच
मस्त मस्त आणि मस्तच
े. शाळेत, कॉलेजमध्ये सायकल चालवताना एक वेगळं विश्व् मिळालं होतं. एक प्रकारचं स्वातंत्र्य, आपलं दप्तर मागे लावून वाऱ्यासोबत जोमाने पुढे जायचं, उतारावरून सुसाट जायचं,>>>> सुंदर
फोटो आवड्ले आनि सायकलहि
मी पन बुटुकबैंगनच.. छान लेख
मी पन बुटुकबैंगनच.. छान लेख विद्या.. फोटोसुद्धा मस्तच..
अशीच दांडीच्या मधून पाय घालुन
अशीच दांडीच्या मधून पाय घालुन शिकलो. सुरुवातीला चालवायला आली पण ती थांबवायलाच जमायचे नाही Lol मागे पळणारे दमून कधीच सायकल सोडून द्यायचे. मग दोनच पर्याय असायचे..... एकतर आपण उडी मारायची किंवा सायकलबरोबर पडायचे Lol >> +1 :))
Thank you all for your comments.
छान प्रसंग होता
छान प्रसंग होता