माझे धावणाख्यान ४ - गुढगेदुखी आणि त्यावर मात

Submitted by हर्पेन on 19 June, 2014 - 12:46

या आधी,

माझे धावणाख्यान १ - पुर्वरंग - http://www.maayboli.com/node/49304

माझे धावणाख्यान २ - शिकवणी http://www.maayboli.com/node/49334?page=1

माझे धावणाख्यान ३ - सराव आणि पहिली स्पर्धा http://www.maayboli.com/node/49416

आणि आता,

माझे धावणाख्यान ४ - गुढगेदुखी आणि त्यावर मात

आमचे पळण्याचे वेळापत्रक असे असते. आम्ही साधारणपणे एक दिवसाआड पळतो.
सोमवार – सुट्टी
मंगळवार – आरामात पळणे
बुधवार - सुट्टी
गुरुवार – वेगात पळण्याचा सराव, (हा रेसकोर्सवर) स्प्रिंट किंवा इंडिअन फाईल
शुक्रवार – आरामात पळणे
शनिवार – सुट्टी
रविवार – लांब अंतर धावण्याचा सराव (हे कधी विद्यापीठ परिसरात, कधी कोरेगाव पार्क ही ठिकाणे वेगवेगळी असतात.)

ह्या सगळ्या दिवसांमधे मला सगळ्यात अवघड वाटणारा प्रकार होता गुरुवारी होणारे इंडिअन फाईल प्रकाराने धावणे. ह्या मधे एका मागोमाग ओळीने धावायचे असते आणि बाकी सगळे धावत असतानाच सर्वात शेवट धावणार्‍याने सगळ्यांना मागे टाकत अग्रस्थानी येऊन पळायचे. मग त्यावेळी जो सर्वात शेवट असेल त्याने असेच सगळ्यांना मागे टाकायचे आणि पहिल्या क्रमांकावर येऊन पळतच रहायचे. सकृतदर्शनी हे सोपे भासले तरी हे करता करता हालत खराब व्हायची, अगदी वाट लागायची. कारण तुम्ही परत शेवटच्या क्रमांकावर येई पर्यंतच तुम्हाला रिकव्हर व्ह्यायला संधी मिळते ते पण धावता धावताच.

पण तरी आता माझ्यात एक आत्मविश्वास आला होता. सगळ्यांसोबत धावण्याच्या नादात माझा वेगही वाढू लागला होता आणि मी माझ्या सिनिअर्स सोबत धावायचा माझा प्रयत्न थोडाफार तरी सफल होत होता. आता गुरुवारच्या इंडिअन फाईल प्रकाराने पळत मी देखील बाकी सिनिअर्स प्रमाणे त्यांच्या इतक्याच फेऱ्या पळू शकत होतो पण माझा वेग आणि अंतर वाढत होते तसतसे पाय दुखण्याचे प्रमाण देखील....

माझे गुढगे वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट्टट्ट दुखू लागले होते. अर्थात हे काही अचानक नाही झाले, पण व्हायचे असे की आरामात धावताना मी व्यवस्थित धावू शकायचो, त्यावेळी काही नाही वाटायचं पण गुरुवारी स्पीड वर्क आऊट करताना मात्र पाय थोडे दुखायचे पण मग दुसऱ्या दिवशी आरामात पळताना मी खरोखरच आरामात व्यवस्थित पळू शकायचो पण संध्याकाळी / रात्री मात्र गुढगे दुखायला चालू व्हायचे. पण गुढगे /पाय पळताना दुखत नसतील तर पळत रहा असे सांगण्यात आल्याने मी पळत राहिलो आणि त्याच बरोबर मग, घरातल्या ज्ये. ना. च्या सौजन्याने घरात त्वरित उपलब्ध असलेली आयुर्वेदिक तेल, मलम लावणे असे पारंपारिक घरगुती उपाय , नवीनच शिकलेला, बर्फाचा उपाय म्हणजे दुखऱ्या भागावर बर्फ लावणे असे सगळे प्रकार चालू झाले. हा बर्फ लावण्याचा प्रकार मी तोपर्यंत कधीच केला तर नव्हताच पण ऐकला देखील नव्हता. अर्थात एका इंग्रजी चित्रपटात हाणामारी झाल्यावर हिरो बर्फाच्या टबात बसताना वगैरे पहिले होते पण आपल्याकडे म्हणजे अशी सांधेदुखी, पाय दुखणे वगैरे साठी गरम पाण्याने शेकणे हेच लहानपणापासून ऐकले होते, तर एकदम त्याउलट तिथे थंडगार बर्फ लावायचा? पण अनेक नवीन गोष्टी करून बघत होतो त्यात ह्याही गोष्टीची भर पडली. अर्थात हे नमूद करावे लागेल की त्याचा उपयोग मात्र होतो.

मला तो एक दिवस अगदी लक्षात आहे, गुढगे थोडे सुजल्यासारखे झाले होते, गुढग्याला हात लावला असता तिथे उष्णताही जाणवत होती, मला चालताना सुद्धा एक प्रकारची वेदना, म्हणजे अगदी वेदना नाही म्हणता येणार पण दाह, अवघडलेपणा किंवा अस्वस्थता जाणवत होती आणि बर्फ लावल्यावर ती जाणीव, ती वेदना, ते दुखणे, एखादी जादूची कांडी फिरवल्यासारखी अचानक पूर्णपणे नाहीशी झाली. मी तर आनंदाने अगदी उड्याच मारल्या होत्या. पण हे असले उपाय तात्पुरत्या आरामासाठी ठीक होते.

दरम्यानच्या काळात माझ्या पळण्यातल्या प्रगती(?) मुळे मी पुणे अर्ध मेंरेथोनसाठी रजिस्टर करून तर झाले होते आणि मग अचानक एक काळ असा आला की मला साधे चालताना देखील त्रास होऊ लागलेला.

ह्या मधल्या काळात मग पळून गुढग्यावर अधिक ताण येऊ नये म्हणून क्रॉस ट्रेनिंग करत होतो म्हणजे योगासने, सायकल चालवणे वगैरे. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्याबाबत झाली ती म्हणजे ‘वेदनेमुळे आता बास ते पळणे’ ही भावना माझ्या मित्रांमुळे कधीच निर्माण झाली नाही, संध्याकाळी / रात्री खूप वेदना होत असताना देखील सकाळी नेहेमी प्रमाणेच उठून, सगळ्यांसोबत असायचो. धावू शकत नव्हतो तेव्हा चाललो, कधी सायकलिंग केले पण रोज बाहेर पडलो. असे कधीच झाले नाही की घरीच झोपून राहिलो. पण मन अगदी म्लान असायचे बरोबरचे सगळे पळताहेत आणि आपण मात्र चालतोय, कधी संपणार ही गुढगेदुखी...

पण ह्या दरम्यान मित्रांचे प्रोत्साहनपर शब्द आणि घरच्यांचा पाठिंबा हा खूप मोलाचा होता. तू करू शकतोस हे अगदी चौकट राजा मधे अशोक सराफ दिलीप प्रभावळकरला 'म्हणा नंदूशेठ म्हणा, तुम्ही बरोबर म्हणताय' असे म्हणतो त्याच चालीवर मला म्हणायचे. आणि मी मनातल्या मनात म्हणायचो मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा....:)
कित्येकदा बायकोकडून तेल चोळून घेण्याचे लाड पुरवून घेतले. मुलांनी आपल्या जादूच्या हातांनी पाय चेपून दिले की माझे पाय दुखायचे लगेच थांबतात ही त्यांचीच काय माझीही ठाम समजूत आहे.

मला माझ्या दोनेक दुखापतग्रस्त अनुभवी मित्रांकडून हा सल्ला मिळाला होता की अशा वेळी नेहेमीच्या डॉक्टरांकडे गेलास तर ते तुला पळणे बंदच कर म्हणून सांगतात, त्यामुळे होता होईल तितके मी नेहेमीच्या डॉक्टरांकडे जायचे टाळत होतो. एका न पळणाऱ्या मित्राने डॉ राजीव शारंगपाणी यांच्याकडे जा असे सुचवले होते. पण त्यांची भेट १५ ते 20 दिवसापर्यत मिळणार नव्हती आणि पुणे मेंरेथोन तर अगदी १०-१२ दिवसांवर आलेली.

घरचे विशेषतः आई, “गुढगेदुखी वाईट रे बाबा! एकदा दाखव तरी डॉक्टरांना”, न पळणारे मित्र (फार माहित असल्याच्या थाटात उघडपणे) “डांबरी रस्त्यावर पळणे वाईट हे माहीत नाही तुला?” (मनातल्या मनात) “लेका हे काय वय आहे होय असं इतकाल्ली किमी धावणे चालू करायचे? मला वाटलेच होतं असा काही तरी होणार म्हणून” असे काय काय म्हणू लागल्याने नाही म्हटले तरी संभ्रम वाढला होते. काय करावे नी काय नाही हे कळेनासे झालेले. त्याच सुमारास माझ्या भावासाठी त्याच्या लिगामेंट सर्जरी नंतरची काही प्रिस्क्रिप्शन शिवाय न मिळू शकणारी औषधे घ्यायला मला त्याच्या (एका नामांकित हाडाच्या) डॉक्टरांकडे जायचेच होते, तर मग मी त्यांना माझी स्थिती दाखवली, त्यांनीही अपेक्षाभंग केला नाही. अपेक्षे प्रमाणेच त्यांनी तू काही आता पळू शकत नाहीस असे सांगितले.

त्याचीही खरेतर एक मजाच झाली. त्यांनी मला पहिल्याप्रथम थेटपणे, तू पळू नकोस / शकत नाहीस असे या शब्दात सांगितले नाही. त्यांनी मला सांगितले की काय करायचे नाही त्याची यादीच सांगीतली. स्क्वॅट, एरोबिक्स, स्किपींग रोप ई. करायचे नाही म्हणून सांगितले. मी खूष झालो की चला, डॉक्टर काही आपल्याला ‘पळू नकोस’ म्हणून सांगत नाहीयेत. मग मी म्हटले मी काही एरोबिक्स वगैरे करत नाही, जिम मध्ये जात नाही, दोरी वरच्या उड्या मारत नाही. त्यावर त्यांना माझ्या (अ)ज्ञानाची जाणीव झाल्याने अत्यंत करुणामय दृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि शुध्द मराठीत, भारतीय पद्धतीने संडासला बसतो तसे उकीडवे बसायचे नाही, दोरीवरच्या उड्या मारायच्या नाही आणि पळणे हे एरोबिक्स मधेच गणले जाते तर पळायचे देखील नाहीये असे सुस्पष्ट रीतीने सांगितले. मी इंग्रजीमध्ये खूपच मठ्ठ आहे असा साक्षात्कार मला त्यावेळी झाला. आणि मला हसूच फुटले.

त्यांना मग मी म्हटले अहो असे काय करता माझी स्पर्धा १०-१२ दिवसांवर आली आहे, मला काय तरी गोळ्या-बिळ्या द्या आणि लवकर बरे करा, कारण गेले ३ महिने मी ह्या साठी सराव करतोय, मॅरॅथॉन मध्ये पळणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे आणि मला काही झाले तरी पळायचेच आहे. त्यावर त्यांनी शांत पणे सांगितले आपल्या मनाचे करा, पळा आणि मग तुम्हाला यावेच लागेल माझ्याकडे, कदाचित ऑपरेशन देखील करावे लागेल मी काहीही सांगू शकत नाही.

मी हतबुद्ध! अरे देवा आता काय करायचे!

घरी सांगायची पण चोरी... गृप मधे बोललो तर मागे कोण कोण ऐन स्पर्धेच्या वेळी दुखापत ग्रस्त झाल्याने गोळ्या घेउन स्प्रे मारत स्पर्धा पुर्ण केल्या याच्याच गोष्टी. पण मला तसे करायचे नव्हते. मी मनाशी गाठ बांधली की वाईटात वाईट काय होईल की या वर्षी स्पर्धेत भाग घेता येणार नाही, पण पूर्ण तंदुरुस्त असल्याशिवाय स्पर्धेत भाग घ्यायचा नाही आणि आहे ती दुखापत अजून वाढेल असे काही करायचे नाही. आमचा कोच त्यावेळी पुण्याच्या बाहेर असायचा त्यामुळे त्याला ही हे सर्व फोन वर सांगून फार काही उपयोग होणार नव्हता तरी एक प्रयत्न तो ही करून पाहिला पण त्यातून त्याची माझी प्रत्यक्ष भेट न घेता आल्याने निर्णायक असे काही निष्पन्न झाले नाही.

पण मग त्यावेळी आमच्याच गृपमधला एम बी ए चा अभ्यास करत असल्यामुळे अधून मधून उगवणारा एक मित्र अर्जुन पळायला आलेला, त्याच्याशी बोलणे झाले. त्याला पण अशा अनेक दुखापती झालेल्या होत्या. त्याने मला सांगितले की तो जेव्हा अशा दुखापतींना सामोरा गेला तेव्हा सुरुवातीला असाच निराश झाला होता पण मग त्याला एक डॉक्टर मिळाले ज्यांनी त्याला ‘पळू नकोस’ असे कधीही सांगितले नाही आणि सर्व दुखापतींमधून त्याची सुटका केली.

सुदैवाने भेटीची वेळ घेण्यासाठी फोन केला असता त्यांची वेळ लगेचची मिळाली. मी लगेचच अगदी त्याच संध्याकाळी त्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यावर साधारण पणे १०-१५ मिनिटे माझी तपासणी झाली. आणि त्यांनी मी करायचे व्यायाम प्रकार मला समजावून सांगीतले, वारली पद्धतीची चित्रे काढून मला संपूर्ण उपाय योजना मराठीत लिहून दिली आणि सांगितलेले प्रकार मला समजले आहेत की नाही हे बघण्यासाठी ते व्यायाम प्रकार माझ्याकडून करवून घेतले आणि योग्य तऱ्हेने करतोय की नाही ते तपासून बघितले. काही सुधार सुचना दिल्या. एकूणात मिळून एक तासभर मी त्यांच्या दवाखान्यात असेल पण त्या तासभराने परत एकदा माझे पळणे चालू होणार होते आणि झाली देखील पण त्यांनी मला सांगितलेले व्यायाम प्रकार अगदीच सोपे असल्याने आणि एकाही नव्या पैशाची औषधे घ्यायला न सांगितल्या मुळे मन जरा साशंकच होते. पण त्यांनी केलेले निदान इतके अचूक आणि जे साधेसे वाटणारे व्यायाम प्रकार सांगितले ते इतके प्रभावी होते की त्यांनी संगीताल्याबर हुकुम एका आठवड्याच्या आत माझी गुढगेदुखी संपूर्णत: बरी झाली.

ह्या डॉक्टरांचे नाव हिमांशु वझे, हे जर्मनीहून, क्रीडा वैद्यकामधे पद्व्युत्तर शिक्षण घेऊन आले आहेत.

केवळ ह्यांच्या मुळेच माझ्या मनावरचे मळभ संपूर्णपणे गायब झाले, मी एका नव्या उत्साहाने पळायचा पुनश्च हरीओम केला. सरावासाठी दिवस अगदी कमी होते पण डोळ्यासमोर होते एकच लक्ष्य, पुणे मॅरॅथॉन!

ज्या स्पर्धेला लहानपणापासून पाहत आलो होतो ती पुणे मॅरॅथॉन!,
मॅरॅथॉन म्हणताच डोळ्यासमोर जी एकमेव स्पर्धा येत होती ती पुणे मॅरॅथॉन!,
आयुष्यात कधीतरी एकदा या स्पर्धेत भाग घेईन असे स्वतःला खूप पुर्वीच कधीतरी सांगितले होते ती पुणे मॅरॅथॉन!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट....
>>>> पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्याबाबत झाली ती म्हणजे ‘वेदनेमुळे आता बास ते पळणे’ ही भावना माझ्या मित्रांमुळे कधीच निर्माण झाली नाही, <<<<
अरे असे मित्र मिळायलाही नशिब लागते रे.... !

धन्यवाद केपी, आश्चिग, कचा, रांचो, प्रीति, लिंटी

ह्या पुढचे दोन भाग कच्चा खर्डा स्वरुपात माझ्या जुन्या लॅपटॉप्च्या स्क्रीन ने राम म्हटल्याने ट्रॅप झाले असल्याने टाकले गेले नाहीयेत.

ह्या महिन्याअखेरपर्यंत गडबडीत असल्याने मे महीना ही मालीका पुर्ण करण्यासाठी निर्धारित केलेला आहे.

बघू कसे काय होते ते.

दरम्यान माझ्या ३ पुर्ण मॅरॅथॉन आणि इतर अनेक अर्ध मॅरॅथॉन करून झाल्या.

लिहिण्यापेक्षा पळणेच सोपे

>>> लिहिण्यापेक्षा पळणेच सोपे <<<
अरेच्च्या.... म्हणजे आता तुला "लिहिण्याच्या" व्यायामाचे प्रकार सांगितले पाहिजेत ! Proud

क्रॉस म्हणून मी आता पळतोय. सायकलींगच्या आणि पळण्याच्या मसल्स वेगळ्या असल्यामुळे पुनश्च हरि ॐ आहे. बघू कुठपर्यंत पळता येईल ते.

काही महिण्यापूर्वी मी रेग्युलर राईडला लोणावळ्याला गेलो होतो. तिथे मिलिंद सोमन होता. तो मुंबई - पुणे पळत होता. विना बुट किंवा चप्पल.

>>> तिथे मिलिंद सोमन होता. तो मुंबई - पुणे पळत होता. विना बुट किंवा चप्पल. <<< अरे बापरे..
एक तर मुंबईपुणे इतके अंतर, त्यात परत अनवाणी.... ! मनाचा निर्धारच किती तगडा हवा याकरता..

ह्या डॉक्टरांचे नाव हिमांशु वझे, हे जर्मनीहून, क्रीडा वैद्यकामधे पद्व्युत्तर शिक्षण घेऊन आले आहेत.

>>> अरे मस्त डॉक आहेत हे! माझ्या लिगामेंटच्या दोन्ही दुखापतींमध्ये आणि गेल्या वर्षीच्या पाठीच्या दुखण्यामध्ये ह्यांनीच व्यायाम दिले. मीही त्यांना एकच प्रश्नच विचारायचो, 'ट्रेक बंद करायचे नाहीत, बाकी काय हवे ते व्यायाम द्या.' त्यांनीही नेहमी हीच खात्री दिली, की 'ट्रेक बंद करावे लागणार नाहित, फक्त बरा होईपर्यंत ट्रेक करू नकोस.'

हे असेच चालायचे ...

लहानपणी एक पाय नाचिव रे गोविंदा किंवा चाल चाल बाळा तुझ्या पायात वाळा पासून चालणे सुरू झाले ते तेवढ्यापुरतेच मर्यादित होते. म्हणजे तसे लहानपणापासून आपण किती चाललो हे आपणास लक्षात येत नाही. गावी १०वी पर्यंत पायात चप्पल हा प्रकार नव्हता. सगळीकडे अनवाणीच फिरायचे. ११वी ला अहमदनगराला शिकण्यास गेलो अन पायात पहिल्यांदा स्लीपर आली. नगरला असताना जवळच असणारे केडगाव येथे एकदा यात्रेसाठी चालत गेलो होतो. नंतर कॉलेज शिक्षण घेण्यासाठी पुन्हा गावी परत आलो. कॉलेज शिक्षण पूर्णं करून नोकरीसाठी पुणे गाठले व येथेच स्थायिक झालो. असो हा थोडक्यात पूर्व इतिहास. पुण्यात सायकल स्कूटर अन नोकरीच्या जागी कंपनीच्या बसने प्रवास अन बैठे काम म्हणजे थोडक्यात चालणे हा प्रकार फारच कमी. फक्त गणपती पाहण्यासाठी जे काही पायी हिंडलो असेल तेवढेच. माझ्या कंपनीतील सहकारी सतत कुठे ना कुठेतरी पायी दौरा करीत असत व त्याचे रसभरीत वर्णन करीत असत. ते ऐकून मलाही वाटे की आपणही थोडे चालावे म्हणून सरावासाठी रोज १-२ की.मी. सुरुवात केली. वयाची पन्नाशी उलटून गेल्याने हा सराव हळूहळू वाढवितं होतो. शेवटी एकदा सहकाऱ्यांना सांगितले की मला पण तुमच्या बरोबर पायी यावयाचे आहे. पहिली भ्रमंती ठरविली कात्रज बोगदा. म्हणजे कंपनीच्या बसने आंबेगाव येथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर उतरायचे अन तेथून पायी चालत चालत कात्रजच्या नव्या बोगद्यात शिरून जुन्या बोगद्यातून घाटातून चालत कात्रज डेअरी पर्यंत यावयाचे. अंतर १६ की. मी. कंपनीच्या बसने आंबेगाव येथे संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर उतरायचे अन तेथून पायी चालत चालत कात्रजच्या नव्या बोगद्यात शिरून जुन्या बोगद्यातून घाटातून चालत कात्रज डेअरी पर्यंत यावयाचे. अंतर १६ की. मी. तेथून बसने घरी. ६.३० ते १०.३० या वेळेत हे चालने पूर्णं केले. पौर्णिमेची रात्र असल्याने मजा आली. बोगद्यामध्ये जरी दिवे असले तरी बॅटरी वापरणे अपरिहार्य होते कारण लोखंडी ऍगल पायात आडवे येत होते अन गाड्यांचा धूर पण भरपूर होता

कात्रजच्या या यशस्वी चालीनंतर काही दिवसांनी ठरविले की ऑफिस सुटले की अकुर्डी ते देहू हे अंतर चालत जावयाचे. हे अंतर फक्त १२ की. मी. होते. तुकारामाच्या समाघीचे दर्शन घेऊन व येताना बसने घरी परतलो. चालताना भंडारा डोंगर पाहिला व पुढील वेळी येथे यावयाचे ठरवले पण तो योग आला नाही. अशा प्रकारे पायी चालण्याचा छंदच जडला. असेच एकदा सहजच ठरविले की का आपण ऑफिसमधून घरी बसने जाण्यापेक्षा चालतच जाऊ नये ? झाले. अकुर्डी ते दगडूशेठ गणपती असे २० की. मी. अंतर ५.३० ते रात्री ९.३० वेळेत पूर्णं केले. जुलै महिन्यात (भर पावसात) सहकाऱ्यांनी ठरविले म्हणून सिंहगडावर जायचे ठरले. पहाटे ५ वा. स्वारगेट ला रेनकोट वै. घालून हजर. पाऊस चालूच होता. मित्रांची वाट पाहत होतो पण कोणी आलेले दिसले नाही. वाटले पुढील थांब्यावर येतील पण कोणी आले नाही. आता काय करावयाचे. वाट माहिती नाही. योगायोगाने बसमध्ये एक कंपनीतील ओळखीचा चेहरा दिसला. तो खूपच अनुभवी होता अन मी नवशिका. असो. त्याच्याबरोबर सिंहगड भर पावसात चढावयास सुरुवात केली पण त्याचा वेग जास्ती होता व त्याला माझ्यावेगाने चालणे अवघड वाटत होते. शेवटी त्याला पुढे जाण्यास सांगून मी माझी चढाई चालूच ठेवली. पाऊस भरपूर होता. वरून पावसाच्या धारा अन रेनकोट मध्य घामाच्या धारा. पायवाटेवरून पाण्याचे लोट वाहत होते त्यामुळे त्या पाण्यातूनच वाट तुडवीत होतो. रस्ता नीट कळत नव्हता. पावसामुळे थोडेच लोक आले होते व ते पण केव्हाच वर चढून गेले होते. कसाबसा धापा टाकत पाऊण सिंहगड सर केला तेव्हा माझ्याबरोबर असणारा कंपनीतील सहकारी वर जाऊन परत फिरला होता. त्याने धीर दिला अन म्हणाला आता थोडेच राहिले आहे, बरोबर येऊ का? त्याला नकार दिला अन सांगितले की मी ह्या पावसात आता तुझ्याबरोबर परत उतरणार नाही. तू जा. मी जीपने खाली येईन. आणि मी देवाचे नाव घेत तसाच गड सर केला. हा अनुभव फारच वेगळा अन रोमांचकारी होता. जीपने उतरून बसने घरी परतलो अन मित्रांना फोन केला की ते का आले नाही. त्यांना तर मी सिंहगडावर जाऊन आलो यावर विश्वासच बसला नाही. त्यांना वाटले की मी काही या पावसात येत नाही व त्यांनी पण पावसामुळे येणे रद्द केले.

यानंतर साघारणतः पुढच्या महिन्यात कंपनी(अकुर्डी) ते आळंदी असे चालत जायचे ठरले अन १८ की. मी. प्रवास ४ तासात पूर्णं केला. आळंदीला दर्शन घेऊन बसने घरी परतलो. घरची मंडळी म्हणू लागली की एवढे चालू नका पण चालायची खुमखुमी काही कमी होत नव्हती. एकदा रविवारी कोथरुडला नातेवाइकांकडे जायचे होते. तेव्हा सहज गंमत म्हणून बसने न जाता मी ते ८ की. मी. अंतर चालत गेलो. परगावी सुद्धा हातात सामान वै. नसेल तर स्टॅड ते घर चालतच जायचो. सकाळी चालण्याची मजा काही औरच आहे. अजिबात थकवा जाणवत नाही. थोड्याचं दिवसाने टूम निघाली. राजगड करायचा आहे. अर्थात पौर्णिमेची रात्र निवडली होती. गुंजवणे मार्गे जायचे ठरले. कंपनी सुटल्यावर स्वारगेट वरून निघालो अन रात्री ८ वा̱. गुंजवणे ला पोहचलो. रात्रीच गड चढावयास सुरवात करून १२ वा. वर गडावरती पोहचलो. तेथील मंदिरात जेवण करून झोपलो. सकाळी बालेकिल्ला केला , संजीवनी माची केली अन दुपारी २ वा. गड उतरण्यास सुरुवात केली. गुंजवणे ते कात्रज जीप व नंतर बसने घरी. (या लेखात गडाचे वर्णन वै. लिहितं नाही कारण ते सर्वत्र उपलब्ध आहे. ) असो. काही दिवसांनी पुन्हा कंपनीच्या बसने तळेगावला उतरून तेथून चालत शिरगाव (प्रती शिर्डी) ला १६ की. मी. चालत मुंबई पुणे मार्गे अकुर्डीला आलो अन बसने घरी.

काही दिवसानंतर पुन्हा टूम निघाली की आळंदीला जायचे पण या वेळेस ते दगडूशेठ ते आळंदी असे २४ की. मी. चालावयाचे. पहाटे ५ ते सकाळी १० या वेळेत ते पूर्णं केले. अधे मध्ये २-३ वेळा रवीवारी सिंहगड चढणे उतरणे चालूच होते. आता चालण्यास वेग आला होता व सरावलो होतो. साधारणतः ५० मिनिटात वर जाता येत होते. वर पोहताच १ ग्लास सरबत अन लगेच परत खाली उतरणे. पण राजगडच्या ट्रेकने गड पुन्हा पुन्हा बोलवू लागले होते. सर्वांनी ठरविले की यावेळी हरिश्चंद्र गड करूया. मग काय ऑफिस सुटले की राजगुरुनगरला उतरून खिरेश्वर ला बसने गेलो. रात्री (पौर्णिमा) ९ वाजता सुरुवात केली अन टोलार खिंडीत १२ वा. पोहचलो. तेथे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा गड चढावयास सुरुवात केली. रात्री २वा. गडावर पोहचलो. गुहेत जागा नसल्याने तेथील झोपडीत आश्रय घेतला. फेब्रुवारी महिना होता तरीपण गडावर खुप थंडी होती. सकाळी स्नान करून तारामती पॉइंट पाहून दुपारी विश्रांती घेतली. ४ वाजता प्रसिद्धं कोंकण कडा पाहण्यास गेलो. अप्रतिम व अवर्णीनीय. तेथून गुहेत जागा मिळवली. रात्री खिचडी खाऊनं झोपलो. सकाळी उठून पाचनाई मार्गे गड उतरलो व पुण्यास परतलो.

अधूनमधून कंपनी (अकुर्डी) ते घरी (रविवार पेठ) अशी चालत जाण्याची हुक्की येई. हे २० की. मी. अंतर अंदाजे ४ तासात पूर्णं होई. असेच एका रवीवारी चतुर्थी येत होती. हा योग साधून आम्ही सारस बाग गणपती ते थेउर २५ की. मी. सोलापूर रस्त्याने गेलो. पहाटे ५ ला सुरुवात केली व १० वा. थेउरला पोहचलो. १ तास रांगेत उभे राहिलो व दर्शन घेतले अन बसने घरी परत. आमचे सर्व चालणे साधारणात १ महिन्याच्या अंतराने असे. वातावरण , वेळ, प्रसंग पाहून ठरवीत असू.

मध्ये बरेच दिवस हालचाल नव्हती अन चुळबूळ सुरू झाली कारण माझे एक सहकारी श्री. मराठे हे चालण्यात एकदम तरबेज. त्यांनी ३-४ वेळा पुणे ते अक्कलकोट, पुणे ते पंढरपूर, पुणे ते पंढरपूर व तेथून अक्कलकोट असे पायी प्रवास रोज ५० ते ६० की. मी. वेगाने पूर्णं केले होते. २५० ते३००की. मी. चालणे व बसने परत. अर्थात माझी तेवढी तयारी नसे. पण मला वाटे की आपण एका दिवसात किती चालू शकू? हे पाहावे म्हणून त्यांना एकदिवसीय पायी प्रवासाचे मनोगत सांगितले अन ठरले की चालत नारायणपुरला जायचे. रात्री ८ वा. (पौर्णिमा) शंकर महाराज मठापासून सुरुवात केली. कात्रज बोगद्याजवळ नास्ता केला. पुढे कैलास ची भेळ रात्री १२ वा. खाऊनं पहाटे ४ वाजता नसरापुर फाटा गाठला. पाय खूपच दुखू लागले होते अन फोड पण आले होते. परत फिरावे असे वाटू लागले पण मन हार मानावयास तयार नव्हते. शेवटी तसेच चालत चालत पहाटे ६ वाजता बालाजीला (नारायणपुर) पोहचलो. तेथे अंघोळ करून दर्शन घेतले व जीप/ बसने घरी परत आलो. हा ४२ की. मी. चा टप्पा गाठू शकलो. आतापर्यंतचा हा माझा सर्वात मोठा पल्ला.

पण हायरे दैवा ... पुढे पुढे माझे गुडघे दुखू लागले. औषधाने थोडे बरे वाटे पण त्रास वाढू लागला. डॉ. नि चालण्यास बंदी केली आणि माझा २-३ वर्षाचा चालीत्सोव बंद पडला. मनाची खुप तयारी असली तरी आता शरीर साथ देईनासे झाले. आता गरजेपुरते थोडे चालतो. असो हे सर्व जसे आठवेल तसे लिहून काढले आहे. आपण काय करू शकतो हे आपणास केल्याशिवाय कळत नाही. आपली ताकद आपण अजमावून पाहत नाही. पन्नाशीनंतर मी हे सर्व करू शकलो यावर माझाच विश्वास बसत नाही. अजूनही खुप चालावे वाटते. दुर्ग खुणावतात पण ... हे असेच चालायचे

राजेंद्र देवी...

हर्पेन माझ्या आशा पालवत आहेत.
गुडघेदुखीशी कॉम्प्रमाइझ करण्यापूर्वी या डॉक्टरांना भेटलेच पाहिजे असे वाटतेय.

श्श्या... असे काहि होत असले की जाम गोंधळ उडतो मनाचा, शिवाय मनात "भिती" घर करू लागते ते वेगळेच. अन इतरजण असतातच भितीला फुंकर मारमारुन शिलगावयाला...... तुम्ही त्यावर मात केलीत अन नशिबाने वझे डॉक्टर वेळीच भेटले हे सुदैवच. Happy ग्रेट..... Happy

हर्पेन, तुमचा लेख प्रेरणा देणारा आहे.

मी ऑस्ट्रेलीयामध्ये असताना खूप पाळायचे. रोज ४५ मिनिट ते १ तास. मी खूप मोजमाप केले नाही अंतराचे स्पीडचे वगैरे. पण तेव्हाच्या माझ्या फिटनेस लेव्हल कडे बघता मला ते पळणे चांगले लाभले होते. पण मला उजव्या गुढघ्यात तुम्ही म्हणता तशीच सेम दुखापत झाली. आणि डॉक्टरनी पळू नका असा सल्ला दिला जो मी आजपर्यंत फॉलो करते आहे. त्यानंतर मी संपूर्णपणे सायकलिंग, स्विमिंग आणि योगासनांकडे वळले.

पण मला परत पळणे सुरु करायची इच्छा आहे. पुण्यात असा कुठला ग्रुप आहे का?

खुपच मस्त आणि प्रेरणादायी लेख.
हे वाचुन मलासुद्धा अता पळायला सुरवात करावीशी वाटतेय.
मला पण मध्यंतरी गुडघेदुखीचा असाच भयंकर त्रास होत होता. अजुनही थोडा थोडा होतो. जास्त वाटला तर या डॉ. ना नक्कीच दाखवेन.

पण मला परत पळणे सुरु करायची इच्छा आहे. पुण्यात असा कुठला ग्रुप आहे का? >> +१ मलापण पळायला किन्वा चालायला आवडेल.
कोथरूड / कर्वेनगर परीसरात असा ग्रुप असेल तर सांगा.

राजेंद्र, तुमचे अनुभव खरोखरच भारी आहेत, त्याला वेगळ्या धाग्यात गुंफा. इथे प्रतिसादात लिहिलेले फार कमी जणांपर्यंत पोहोचेल.

धन्यवाद पद्मावती, मित, सई, डेलिया.

आनंदयात्री - डॉ . वझे यांचा अजून एक गुणविशेष मला भावला तो म्हणजे औषधाला म्हणूनही औषध देत नाहीत Proud
ना कसल्या गोळ्या ना इंजेक्शने .

मानव - जरूर भेटा. मला गुढगेदुखी होती हे आठवावं लागतंय आता.

सई, डेलिया - पुणे रनिंग तर्फे पुण्यात अनेक ठिकाणी गट बनवून पळणे चालूच असते.
अधिक माहीती त्यांच्या वेब साईट वर http://www.punerunning.com/
किंवा
फेसबुक पानावर
https://www.facebook.com/PuneRunning/
मिळू शकेल
पुणे रनिंग व्यतिरिक्तही अनेक गट पुण्यात कार्यरत आहेत.
जरूर कोणत्या ना कोणत्या गटात सामील व्ह्या पळणं चालू करायसाठी अनेक शुभेच्छा.

@सिम्बा
धन्यवाद. आजच फोन करणार. Happy

आनंदयात्री - डॉ . वझे यांचा अजून एक गुणविशेष मला भावला तो म्हणजे औषधाला म्हणूनही औषध देत नाहीत Proud
ना कसल्या गोळ्या ना इंजेक्शने .

>>> ते sports medicine आहेत. आणि मी असं ऐकलंय की sports medicine docs औषधे देतच नाहित. त्यांचा पूर्ण भर व्यायामाने स्नायू बळकट करण्याकडे असतो

मस्तच, त्यांनी काय व्यायाम सांगितले होते त्याबद्दल पण लिहा ना.>>>+१
मस्त खुप सुंदर तुमच्या जिद्दिला सलाम

राजेंद्र, तुमचे अनुभव खरोखरच भारी आहेत, त्याला वेगळ्या धाग्यात गुंफा. इथे प्रतिसादात लिहिलेले फार कमी जणांपर्यंत पोहोचेल.>>

हर्पेनजी धन्यवाद माझ्या अनेक दुर्लक्षिलेल्या कविता अन लेखापैकी हा एक... Sad

http://www.maayboli.com/node/42137

असो...

राजेंद्र देवी

हर्पेन, चारही भाग अफलातून आहेत. प्रेरणादायी आहेत. हे असं इन्स्पिरेशनल वाचायला मिळालं ना की फार छान वाटतं. आपल्याला दर वर्षी काहीतरी शिकण्याच्या संकल्पास शुभेच्छा. वाचनखूण!!!

लेख खूपच आवडला. तुमचे अनुभव 'हसत खेळत मॅरॅथॉन' असे नसले तरी लिहिण्यातल्या प्रसन्नतेमुळे ते तसे वाटले.
" चरैव इति, चरैव इति"!

Pages