माझे धावणाख्यान ४ - गुढगेदुखी आणि त्यावर मात

Submitted by हर्पेन on 19 June, 2014 - 12:46

या आधी,

माझे धावणाख्यान १ - पुर्वरंग - http://www.maayboli.com/node/49304

माझे धावणाख्यान २ - शिकवणी http://www.maayboli.com/node/49334?page=1

माझे धावणाख्यान ३ - सराव आणि पहिली स्पर्धा http://www.maayboli.com/node/49416

आणि आता,

माझे धावणाख्यान ४ - गुढगेदुखी आणि त्यावर मात

आमचे पळण्याचे वेळापत्रक असे असते. आम्ही साधारणपणे एक दिवसाआड पळतो.
सोमवार – सुट्टी
मंगळवार – आरामात पळणे
बुधवार - सुट्टी
गुरुवार – वेगात पळण्याचा सराव, (हा रेसकोर्सवर) स्प्रिंट किंवा इंडिअन फाईल
शुक्रवार – आरामात पळणे
शनिवार – सुट्टी
रविवार – लांब अंतर धावण्याचा सराव (हे कधी विद्यापीठ परिसरात, कधी कोरेगाव पार्क ही ठिकाणे वेगवेगळी असतात.)

ह्या सगळ्या दिवसांमधे मला सगळ्यात अवघड वाटणारा प्रकार होता गुरुवारी होणारे इंडिअन फाईल प्रकाराने धावणे. ह्या मधे एका मागोमाग ओळीने धावायचे असते आणि बाकी सगळे धावत असतानाच सर्वात शेवट धावणार्‍याने सगळ्यांना मागे टाकत अग्रस्थानी येऊन पळायचे. मग त्यावेळी जो सर्वात शेवट असेल त्याने असेच सगळ्यांना मागे टाकायचे आणि पहिल्या क्रमांकावर येऊन पळतच रहायचे. सकृतदर्शनी हे सोपे भासले तरी हे करता करता हालत खराब व्हायची, अगदी वाट लागायची. कारण तुम्ही परत शेवटच्या क्रमांकावर येई पर्यंतच तुम्हाला रिकव्हर व्ह्यायला संधी मिळते ते पण धावता धावताच.

पण तरी आता माझ्यात एक आत्मविश्वास आला होता. सगळ्यांसोबत धावण्याच्या नादात माझा वेगही वाढू लागला होता आणि मी माझ्या सिनिअर्स सोबत धावायचा माझा प्रयत्न थोडाफार तरी सफल होत होता. आता गुरुवारच्या इंडिअन फाईल प्रकाराने पळत मी देखील बाकी सिनिअर्स प्रमाणे त्यांच्या इतक्याच फेऱ्या पळू शकत होतो पण माझा वेग आणि अंतर वाढत होते तसतसे पाय दुखण्याचे प्रमाण देखील....

माझे गुढगे वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट्टट्ट दुखू लागले होते. अर्थात हे काही अचानक नाही झाले, पण व्हायचे असे की आरामात धावताना मी व्यवस्थित धावू शकायचो, त्यावेळी काही नाही वाटायचं पण गुरुवारी स्पीड वर्क आऊट करताना मात्र पाय थोडे दुखायचे पण मग दुसऱ्या दिवशी आरामात पळताना मी खरोखरच आरामात व्यवस्थित पळू शकायचो पण संध्याकाळी / रात्री मात्र गुढगे दुखायला चालू व्हायचे. पण गुढगे /पाय पळताना दुखत नसतील तर पळत रहा असे सांगण्यात आल्याने मी पळत राहिलो आणि त्याच बरोबर मग, घरातल्या ज्ये. ना. च्या सौजन्याने घरात त्वरित उपलब्ध असलेली आयुर्वेदिक तेल, मलम लावणे असे पारंपारिक घरगुती उपाय , नवीनच शिकलेला, बर्फाचा उपाय म्हणजे दुखऱ्या भागावर बर्फ लावणे असे सगळे प्रकार चालू झाले. हा बर्फ लावण्याचा प्रकार मी तोपर्यंत कधीच केला तर नव्हताच पण ऐकला देखील नव्हता. अर्थात एका इंग्रजी चित्रपटात हाणामारी झाल्यावर हिरो बर्फाच्या टबात बसताना वगैरे पहिले होते पण आपल्याकडे म्हणजे अशी सांधेदुखी, पाय दुखणे वगैरे साठी गरम पाण्याने शेकणे हेच लहानपणापासून ऐकले होते, तर एकदम त्याउलट तिथे थंडगार बर्फ लावायचा? पण अनेक नवीन गोष्टी करून बघत होतो त्यात ह्याही गोष्टीची भर पडली. अर्थात हे नमूद करावे लागेल की त्याचा उपयोग मात्र होतो.

मला तो एक दिवस अगदी लक्षात आहे, गुढगे थोडे सुजल्यासारखे झाले होते, गुढग्याला हात लावला असता तिथे उष्णताही जाणवत होती, मला चालताना सुद्धा एक प्रकारची वेदना, म्हणजे अगदी वेदना नाही म्हणता येणार पण दाह, अवघडलेपणा किंवा अस्वस्थता जाणवत होती आणि बर्फ लावल्यावर ती जाणीव, ती वेदना, ते दुखणे, एखादी जादूची कांडी फिरवल्यासारखी अचानक पूर्णपणे नाहीशी झाली. मी तर आनंदाने अगदी उड्याच मारल्या होत्या. पण हे असले उपाय तात्पुरत्या आरामासाठी ठीक होते.

दरम्यानच्या काळात माझ्या पळण्यातल्या प्रगती(?) मुळे मी पुणे अर्ध मेंरेथोनसाठी रजिस्टर करून तर झाले होते आणि मग अचानक एक काळ असा आला की मला साधे चालताना देखील त्रास होऊ लागलेला.

ह्या मधल्या काळात मग पळून गुढग्यावर अधिक ताण येऊ नये म्हणून क्रॉस ट्रेनिंग करत होतो म्हणजे योगासने, सायकल चालवणे वगैरे. पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्याबाबत झाली ती म्हणजे ‘वेदनेमुळे आता बास ते पळणे’ ही भावना माझ्या मित्रांमुळे कधीच निर्माण झाली नाही, संध्याकाळी / रात्री खूप वेदना होत असताना देखील सकाळी नेहेमी प्रमाणेच उठून, सगळ्यांसोबत असायचो. धावू शकत नव्हतो तेव्हा चाललो, कधी सायकलिंग केले पण रोज बाहेर पडलो. असे कधीच झाले नाही की घरीच झोपून राहिलो. पण मन अगदी म्लान असायचे बरोबरचे सगळे पळताहेत आणि आपण मात्र चालतोय, कधी संपणार ही गुढगेदुखी...

पण ह्या दरम्यान मित्रांचे प्रोत्साहनपर शब्द आणि घरच्यांचा पाठिंबा हा खूप मोलाचा होता. तू करू शकतोस हे अगदी चौकट राजा मधे अशोक सराफ दिलीप प्रभावळकरला 'म्हणा नंदूशेठ म्हणा, तुम्ही बरोबर म्हणताय' असे म्हणतो त्याच चालीवर मला म्हणायचे. आणि मी मनातल्या मनात म्हणायचो मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा....:)
कित्येकदा बायकोकडून तेल चोळून घेण्याचे लाड पुरवून घेतले. मुलांनी आपल्या जादूच्या हातांनी पाय चेपून दिले की माझे पाय दुखायचे लगेच थांबतात ही त्यांचीच काय माझीही ठाम समजूत आहे.

मला माझ्या दोनेक दुखापतग्रस्त अनुभवी मित्रांकडून हा सल्ला मिळाला होता की अशा वेळी नेहेमीच्या डॉक्टरांकडे गेलास तर ते तुला पळणे बंदच कर म्हणून सांगतात, त्यामुळे होता होईल तितके मी नेहेमीच्या डॉक्टरांकडे जायचे टाळत होतो. एका न पळणाऱ्या मित्राने डॉ राजीव शारंगपाणी यांच्याकडे जा असे सुचवले होते. पण त्यांची भेट १५ ते 20 दिवसापर्यत मिळणार नव्हती आणि पुणे मेंरेथोन तर अगदी १०-१२ दिवसांवर आलेली.

घरचे विशेषतः आई, “गुढगेदुखी वाईट रे बाबा! एकदा दाखव तरी डॉक्टरांना”, न पळणारे मित्र (फार माहित असल्याच्या थाटात उघडपणे) “डांबरी रस्त्यावर पळणे वाईट हे माहीत नाही तुला?” (मनातल्या मनात) “लेका हे काय वय आहे होय असं इतकाल्ली किमी धावणे चालू करायचे? मला वाटलेच होतं असा काही तरी होणार म्हणून” असे काय काय म्हणू लागल्याने नाही म्हटले तरी संभ्रम वाढला होते. काय करावे नी काय नाही हे कळेनासे झालेले. त्याच सुमारास माझ्या भावासाठी त्याच्या लिगामेंट सर्जरी नंतरची काही प्रिस्क्रिप्शन शिवाय न मिळू शकणारी औषधे घ्यायला मला त्याच्या (एका नामांकित हाडाच्या) डॉक्टरांकडे जायचेच होते, तर मग मी त्यांना माझी स्थिती दाखवली, त्यांनीही अपेक्षाभंग केला नाही. अपेक्षे प्रमाणेच त्यांनी तू काही आता पळू शकत नाहीस असे सांगितले.

त्याचीही खरेतर एक मजाच झाली. त्यांनी मला पहिल्याप्रथम थेटपणे, तू पळू नकोस / शकत नाहीस असे या शब्दात सांगितले नाही. त्यांनी मला सांगितले की काय करायचे नाही त्याची यादीच सांगीतली. स्क्वॅट, एरोबिक्स, स्किपींग रोप ई. करायचे नाही म्हणून सांगितले. मी खूष झालो की चला, डॉक्टर काही आपल्याला ‘पळू नकोस’ म्हणून सांगत नाहीयेत. मग मी म्हटले मी काही एरोबिक्स वगैरे करत नाही, जिम मध्ये जात नाही, दोरी वरच्या उड्या मारत नाही. त्यावर त्यांना माझ्या (अ)ज्ञानाची जाणीव झाल्याने अत्यंत करुणामय दृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि शुध्द मराठीत, भारतीय पद्धतीने संडासला बसतो तसे उकीडवे बसायचे नाही, दोरीवरच्या उड्या मारायच्या नाही आणि पळणे हे एरोबिक्स मधेच गणले जाते तर पळायचे देखील नाहीये असे सुस्पष्ट रीतीने सांगितले. मी इंग्रजीमध्ये खूपच मठ्ठ आहे असा साक्षात्कार मला त्यावेळी झाला. आणि मला हसूच फुटले.

त्यांना मग मी म्हटले अहो असे काय करता माझी स्पर्धा १०-१२ दिवसांवर आली आहे, मला काय तरी गोळ्या-बिळ्या द्या आणि लवकर बरे करा, कारण गेले ३ महिने मी ह्या साठी सराव करतोय, मॅरॅथॉन मध्ये पळणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न आहे आणि मला काही झाले तरी पळायचेच आहे. त्यावर त्यांनी शांत पणे सांगितले आपल्या मनाचे करा, पळा आणि मग तुम्हाला यावेच लागेल माझ्याकडे, कदाचित ऑपरेशन देखील करावे लागेल मी काहीही सांगू शकत नाही.

मी हतबुद्ध! अरे देवा आता काय करायचे!

घरी सांगायची पण चोरी... गृप मधे बोललो तर मागे कोण कोण ऐन स्पर्धेच्या वेळी दुखापत ग्रस्त झाल्याने गोळ्या घेउन स्प्रे मारत स्पर्धा पुर्ण केल्या याच्याच गोष्टी. पण मला तसे करायचे नव्हते. मी मनाशी गाठ बांधली की वाईटात वाईट काय होईल की या वर्षी स्पर्धेत भाग घेता येणार नाही, पण पूर्ण तंदुरुस्त असल्याशिवाय स्पर्धेत भाग घ्यायचा नाही आणि आहे ती दुखापत अजून वाढेल असे काही करायचे नाही. आमचा कोच त्यावेळी पुण्याच्या बाहेर असायचा त्यामुळे त्याला ही हे सर्व फोन वर सांगून फार काही उपयोग होणार नव्हता तरी एक प्रयत्न तो ही करून पाहिला पण त्यातून त्याची माझी प्रत्यक्ष भेट न घेता आल्याने निर्णायक असे काही निष्पन्न झाले नाही.

पण मग त्यावेळी आमच्याच गृपमधला एम बी ए चा अभ्यास करत असल्यामुळे अधून मधून उगवणारा एक मित्र अर्जुन पळायला आलेला, त्याच्याशी बोलणे झाले. त्याला पण अशा अनेक दुखापती झालेल्या होत्या. त्याने मला सांगितले की तो जेव्हा अशा दुखापतींना सामोरा गेला तेव्हा सुरुवातीला असाच निराश झाला होता पण मग त्याला एक डॉक्टर मिळाले ज्यांनी त्याला ‘पळू नकोस’ असे कधीही सांगितले नाही आणि सर्व दुखापतींमधून त्याची सुटका केली.

सुदैवाने भेटीची वेळ घेण्यासाठी फोन केला असता त्यांची वेळ लगेचची मिळाली. मी लगेचच अगदी त्याच संध्याकाळी त्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यावर साधारण पणे १०-१५ मिनिटे माझी तपासणी झाली. आणि त्यांनी मी करायचे व्यायाम प्रकार मला समजावून सांगीतले, वारली पद्धतीची चित्रे काढून मला संपूर्ण उपाय योजना मराठीत लिहून दिली आणि सांगितलेले प्रकार मला समजले आहेत की नाही हे बघण्यासाठी ते व्यायाम प्रकार माझ्याकडून करवून घेतले आणि योग्य तऱ्हेने करतोय की नाही ते तपासून बघितले. काही सुधार सुचना दिल्या. एकूणात मिळून एक तासभर मी त्यांच्या दवाखान्यात असेल पण त्या तासभराने परत एकदा माझे पळणे चालू होणार होते आणि झाली देखील पण त्यांनी मला सांगितलेले व्यायाम प्रकार अगदीच सोपे असल्याने आणि एकाही नव्या पैशाची औषधे घ्यायला न सांगितल्या मुळे मन जरा साशंकच होते. पण त्यांनी केलेले निदान इतके अचूक आणि जे साधेसे वाटणारे व्यायाम प्रकार सांगितले ते इतके प्रभावी होते की त्यांनी संगीताल्याबर हुकुम एका आठवड्याच्या आत माझी गुढगेदुखी संपूर्णत: बरी झाली.

ह्या डॉक्टरांचे नाव हिमांशु वझे, हे जर्मनीहून, क्रीडा वैद्यकामधे पद्व्युत्तर शिक्षण घेऊन आले आहेत.

केवळ ह्यांच्या मुळेच माझ्या मनावरचे मळभ संपूर्णपणे गायब झाले, मी एका नव्या उत्साहाने पळायचा पुनश्च हरीओम केला. सरावासाठी दिवस अगदी कमी होते पण डोळ्यासमोर होते एकच लक्ष्य, पुणे मॅरॅथॉन!

ज्या स्पर्धेला लहानपणापासून पाहत आलो होतो ती पुणे मॅरॅथॉन!,
मॅरॅथॉन म्हणताच डोळ्यासमोर जी एकमेव स्पर्धा येत होती ती पुणे मॅरॅथॉन!,
आयुष्यात कधीतरी एकदा या स्पर्धेत भाग घेईन असे स्वतःला खूप पुर्वीच कधीतरी सांगितले होते ती पुणे मॅरॅथॉन!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मस्तच. हा भाग जास्तच जवळचा वाटला.
तू म्हणतोस तसे मलाही फास्ट चालतांना किंवा झुंबा करतांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झालाय यंदा पहिल्यांदाच. काय करावे कळत नाही. नी कॅप वापरून जरा फरक पडतोय. बर्फाचा शेक, नारायण तेल इ. चालू आहे. अजून काय करता येईल? डॉक्टरकडे जाणे हा अगदी शेवटचा पर्याय आहे.

रुनी "स्क्वॅट, एरोबिक्स, स्किपींग रोप ई. करायचे नाही" असे वर दिलय ना ? Happy jokes apart तू minimilistic shoes वापरतेस का ? तसे असेल तर त्यांचे technique वेगळे असते नि त्याने त्रास होउ शकतो.

असामी
नाही रे मी असे कुठले शूज नाही वापरत, साधेच नेहमीचे रनिंग शूज वापरतेय. वय झाले आता असे म्हणून गप्प बसावे का Proud
पण शूज जूने झालेत हे कारण असू शकेल का? बदलून बघायला हवेत.

झुबा करताना /डान्स वर्कौट ला रनिंग वॉकिंग शुज चालत नाहीत न ?
रनिंग शुज पुढे मागे जायच्या पर्पझ साठी असतात , डान्स स्टेप्स , निरनिराळ्या अँगल मधल्या फुट स्टेप्स ना क्रॉस ट्रेनिंग / झुंबा स्पेशल शुज मिळतात ते घालावे असं माझ्या जुन्या इन्स्ट्रक्टर ने सांगितलं होतं .

डीजे
हो का. हे मला नव्हते माहिती. धन्यवाद. लगेच नवीन शूज घेण्यात येतील. त्याने गुडघेदुखी कमी झाली तर छानच. पण चालतांना, पळतांना पण दुखताहेत तेव्हा अजून काही कारण असेल का याचा शोध घेतेय.

मस्तच! खूप आवडला हा भाग. योग्य डॉक्टर मिळणे हा खरंच नशिबाचा भाग वाटतो कधीकधी!

वा, रंगत वाढत चाललीये आख्यानातली Happy
तुमच्याकडे नाउमेद न होण्याच्या ट्युशन्सला यावे म्हणते.. चिकाटी जबरदस्त आहे तुमची.

धन्यवाद मंडळी!

उदयन. - योग्य वेळी योग्य माणूस सापडला>> हे अगदी खरे!

असामी, अमितव - अगदी सोपे प्रकार होते ते, गुढग्यांच्या मधे उशी ठेवून दाबून धरायची, पायाच्या बोटांनी वर्तमानपत्राचा कागद चुरगळून त्याचा बोळा तयार करायचा व असे अजून काही. मात्र दिवसातून ४ ते ५ वेळा करायचे होते आणि मी आठवडाभर ते सगळे प्रकार, अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने केले Happy

ते व्यायामप्रकार माझा गुढगा, माझी धाव ई. गोष्टी तपासून खास माझ्यासाठी प्रिस्काईब केले आहेत त्यामुळे मुद्दामच ते वर टाकले नव्हते / आत्ताही इथे सगळे लिहीत नाहीये. कारण अशा गोष्टींचे सरसकटीकरण होण्याची धास्ती खूप असते.

रूनी, बूटांनी बराच फरक पडतो, डीजे म्हणत्ये तसे पळण्याचे जोडे झुंबा करतांना वापरू नका. आणि मी मागच्या भागात लिहिल्याप्रमाणे फॉर्म नीट आहे ना ते तपासून पहा. पावले आपल्या अंगाखाली येतील अशी छोटी पडू द्या, पायातूनच थोडे पुढे झूकून पळा म्हणजे आपोआप तसे होईल. अशाने गुढगे व एकंदरीतच सगळ्या सांध्यांवर ताण कमी येतो.

सुरुवातीला मी पण होता होईल तोवर डॉक्टरकडे जायचे टाळत होतो पण आता मात्र मी पण सल्ला देईन की क्रीडा-वैद्यकशास्त्रातला निपुण असा डॉक्टर शोधा आणि लवकर दुखणेमुक्त व्हा. आणि हो धावण्यासाठी वय कमी-जास्त वगैरे काहीही नसते. Happy

शैलजा, डॉ. हिमांशु वझे पुण्यातच असतात.

ललीता, योग्य डॉक्टर मिळणे हा खरंच नशिबाचा भाग वाटतो कधीकधी>>> अगदी अगदी, खरेतर नेहेमीच Happy

परत एकदा सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार Happy

मस्त लेख आहे हा सुद्धा!
तुमची चिकाटी अफाट आहे. कीप इट अप!

धन्यवाद ज्ञाती,

त्याच काळात केलेली मुक्तछंदातील एक रचना, ह्याला कविता विभागात टाकावे की नाही ह्या संभ्रमात होतोच Happy

http://www.maayboli.com/node/46449

पण त्या थंडीच्या दिवसातल्या उगवत्या सुर्याने मला माझ्या दुखापतीवर मात करायला खूप जबरदस्त प्रेरणा दिली.

मस्त रे. ते डॉक्टरांनी सांगितलेले उपाय टाकले नाहीस इथे ते बरेच केलेस. सगळ्यांना एकच औषध लागू नाही पडणार.

manuruchi - डॉ. वझे यांचा फोन नं आहे - ०२० २५४४१५१२, त्यांचा पत्ता असा नाही सांगता येणार पण त्यांचा दवाखाना कोथरुड भागात कर्वे पुतळ्या जवळ आहे.

ट्ण्या अमितव - समजून घेतल्याबद्दल धन्यवाद Happy

Pages