केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ६

Submitted by पद्मावति on 5 April, 2017 - 04:42

भाग 1 http://www.maayboli.com/node/59911
भाग २ http://www.maayboli.com/node/60016
भाग ३ http://www.maayboli.com/node/60087
भाग ४ http://www.maayboli.com/node/60268
भाग ५ http://www.maayboli.com/node/60576

साधारणपणे केपटाऊन पासून पूर्वेला पोर्ट एलिझाबेथ पर्यंतच्या आठशे किलोमीटरच्या पट्ट्याला गार्डन राउट असे नाव आहे. निळाशार समुद्र आणि त्याला बिलगुन वळणावळणाने पुढे जाणारा हा गार्डन रूट. उधाणणारा समुद्र, रूपेरीसुंदर समुद्रकिनारे, डोंगर रांगा, शांत स्वच्छ तळी, सरोवरे, जंगलं, द्राक्षांचे मळे, हिरवीगार समृद्ध वनराई त्याचबरोबर लहानसहान टूमदार गावं, गोल्फ कोर्सस, अभायरण्ये, पेटिंग झू, उत्तमोतम कॅफे, रेस्टोरेंट्स, शॉपिंगसाठी तुरळकच पण उत्तम दुकाने...असा हा गार्डन रूट! मात्र या भागात फिरण्यासाठी गाडी जरूरी आहे किंवा दुसरा पर्याय आहे गार्डन रूट टूर पॅकेज घेणे.

स्वच्छ, उत्तम रस्ते, सोबतीला वेड लावेल असे निसर्ग सौंदर्य. हे सौंदर्य, इथला समुद्र काही औरच आहे. तीन चार दिवस हाताशी ठेवून केप टाऊनहून निघा. रमत गमत ड्राइव करत मधूनच एखाद्या समुद्रकीनारी गाडी थांबवा...सागराची ती अथांग निळाई डोळ्यात साठवून घ्या. जवळच एखाद्या कॅफे मधे लंच करा आणि पुढे चला. वाटेत अनेक टुमदार गावं आहेत तिथे मनसोक्त फेरफटका मारा, वाटलं तर कुठेतरी बसून मस्तं कॉफी प्या. रात्री एखाद्या गावात मुक्काम करा. उठल्यावर जवळपासच्या शांत तळ्याकाठी फिरून या. नाहीतर कुठल्या एका फार्मवर चक्कर टाका. ट्रेकिंग करा, बोट राइड घ्या, रिवर रॅफटिंग, व्हेल वाचिंग मुलांसाठी झू....एक ना दोन! असंख्य पर्याय आहेत इथे.
सगळीकडे चांगल्या दरात हॉटेल्स उपलब्ध असतात. फिरतांना आम्हाला तरी अतिशय सुरक्षित वाटले. कुठेही अस्वछ्ता, गबाळेपणा आढळला नाही सुदैवाने. रस्ते सुद्धा उत्तम. फक्त एक गोष्ट जरा जाणवली ती म्हणजे इथे असलेला सार्वजनिक वाहतुकीचा अभाव. त्यामुळे भर महामार्गावर लोक आपल्या मुलाबाळा सकट येणार्‍या जाणार्‍या गाड्या, ट्र्क्स ना लिफ्ट मागतांना दिसले. हातातले पैसे दाखवून हे लोक भस्स्कन रस्त्यावर येतात तेव्हा जरा आपल्याला बिचकायला होतं. तेव्ह्डा एक लहानसा अपवाद सोडला तर हा संपूर्ण प्रवास अतिशय सुखकारक होता.

न्यास्ना (knyasa) हे या देवभूमीचे हृदय!!!
केपटाऊन पासून सुमारे सहा सात तासांच्या अंतरावर असलेले नितांतसुंदर शहर. गार्डन रूट मधली जवळपास सर्वच सुंदर ठिकाणे या न्यास्ना पासून एका दिवसात जाऊन परतता येतील अशी आहेत. इथे तंबू टाकून जवळपासच्या पर्यटन स्थळान्ना भेटी द्याव्या असा विचार आम्ही केला. पुढचे काही दिवस आमचा मुक्काम इथेच होता.
न्यास्नाला पोहोचेपर्यंत चांगलीच रात्र झाली होती. आम्ही गावात एके ठिकाणी जेवून घेतलं. दूध, ब्रेड, फळे अशी सटरफटर खरेदी केली आणि मुक्कामाच्या हॉलिडेघरी येऊन निवांत झोपी गेलो.
दुसर्या दिवशी उठल्या उठल्या घरातूनच बाहेरचा जो काही नजारा दिसला त्याने धप्पकन न्यास्नाच्या प्रेमात पडलो....

nyasna1.jpg2.jpg

हिरव्यागार पर्वतरांगांनी वेढलेले, खळखळणारी नदी उशाला आणि निळ्याशार न्यास्ना लगूनला कुशीत घेऊन निवांत पहुडलेले हे हिंदी महासागराच्या किनर्यावरचे हे देखणे रत्न. हसतमुख लोक, आल्हाददायक हवामान, चविष्ट जेवण आणि मुख्य म्हणजे सर्व आधुनिक सुखसोयी असूनही आपली शांत आरामशीर जीवनशैली जपणारे हे गाव.
इथल्या असंख्य पर्यटन स्थळांपैकी प्रमुख आहे न्यास्ना हेड्स! न्यास्ना लगूनच्या प्रवेशद्वारापाशी उभे असलेले दोन द्वारपाल. गावातूनच एक सुंदर नागमोडी रस्ता आपल्याला या हेड्स म्हणजे डोंगरावर घेऊन जातो. कार पार्क करून किंचित अंतर पायी गेले की व्यूयिंग प्लॅटफॉर्म आहे. व्यूयिंग प्लॅटफॉर्मवरुन खाली लगून आणि हिंदी महासागराचा अप्रतिम नजारा दिसतो. जवळच असलेल्या पायवाटेने चालता चालता निसर्गाच्या या अद्भुत सौंदर्याचे दर्शन देहभान हरपायला लावते.

4.jpg13.jpgIMG_1637.jpg

थोडेसे खाली उतरले की एक लहानसा पण सुंदरसा बीच आहे. त्या पाण्यात मात्र उतरायला नको वाटते. याचे कारण म्हणजे इथे पाण्याला प्रचंड ओढ आहे. भीती वाटावी इतका उसळणारा समुद्र आहे.

7.jpg

निसर्गाचे असे रुद्र सौंदर्य केपटाऊन ते न्यास्ना या पटट्यात ठिकठीकाणी दिसते. पण सागराच्या निळाईच्या इतक्या अनंत छटा असाव्यात हेही इथेच दिसते.
डोंगरावरून खाली अर्ध्या वाटेवर एक कॅफे आहे तिथे नक्की जा असे आम्हाला बरेच जणांनी सांगितले होते. अनायसे जेवणाची वेळ झालीच होती म्हणून त्या कॅफेच्या आत शिरलो. हे ठिकाण इतके लोकप्रिय का आहे त्याचा त्या कॅफेमधे शिरताक्षणीच अंदाज आला. जेवण जरी सर्वसाधारण असले तरी जेवतांना आजूबाजूला अथांग पसरलेला सफेत लाटांनी फसफसणारा निळाभोर लगून आणि त्या निळाईला साथ देणारे हिरवेगार डोंगर. डोळे सुखावून टाकणारा आसमंत!

6.jpgcafe.jpg

जेवण उरकून खाली गावात गेलो. थोडंफार शॉपिंग करावं, फेरफटका मारावा या उद्देशाने थीसन आयलंड कडे गाडी वळवली. हे मात्र फक्त नावालाच आयलंड आहे. गावातून सरळसोट रस्ता इथे जातो. इथे बोटिंगसाठी मरिना आहे, मुलांसाठी खेळायला छोटं प्लेग्राऊंड आहे, शॉपिंग आहे, चालायला, सायकलिंग करायला ट्रेल्स आहेत, रेस्टोरेंट्स आहेत. खूप काही विशेष नसलं तरी संध्याकाळ घालवण्यासाठी एक छान ठीकाण आहे. हेच आणि असेच येथील वॉटरफ्रंटलाही आहे. अगदी देखणे बांधकाम आणि मांडणी. इथल्या जेटटी वरुन बोटीमधून लगूनची सफर करता येते. शॉपिंग करायचे नसेल तरी इथे वेळ फार छान जातो.

shopping.jpgshopping2.jpg

दुसर्या दिवशी ब्रेकफस्ट आटोपून गावात आलो. आज जरा मुलांच्या दृष्टीने दिवसभर काय करता येईल याचा विचार मनात होता. न्यास्नापासुन अर्ध्या तासांवर एक एलिफेंट पार्क आहे तिथे जाण्याचे ठरवले.
अनाथ हत्तींना आसरा देणारे न्यास्ना एलिफेंट पार्क हे साऊथ आफ्रिकेतील पहिलावहीले एलिफंट पार्क आहे. जन्मत: अनाथ असलेली पिल्ले, सर्कस मधून रीटायर झालेले हत्ती त्याचबरोबर पॉप्युलेशन कॉंट्रोलचा उपाय म्हणून केल्या जाणार्‍या कत्तलींपासून वाचलेले हत्ती अशा सर्व हत्तींना इथे आसरा मिळतो. त्यांचे पालनपोषण केले जाते. पिले मोठी, सक्षम झाली की त्यांना अभयारण्यात सोडण्यात येते.
प्राण्यांसाठी शक्य होईल तितके नैसर्गीक वातावरण ठेवण्याचा या एलिफंट पार्कचा प्रयत्न असतो.

पार्कमधे पोहोचल्यावर तिकीट काढून आत गेलो. हत्तींना खाऊ घेण्यासाठी फळं, भाज्यांच्या टोपल्या विकायला ठेवल्या होत्या त्या घेतल्या. स्वागतकक्षाच्या दाराशी एका ट्रेलरवॅन मधे बसवून आम्हाला एका मोठ्या मोकळ्या मैदानात घेऊन जाण्यात आले. आमचा गाइड उत्तम इंग्रजीतून माहीती देत होता. वॅन मधून उतरतांना आजूबाजूला हत्ती होतेच. खूप माणसाळलेले वाटत होते. आमच्या सगळ्यांच्या हातात खाऊ पाहून ती पिल्ले मस्तं दुडदुडत आमच्या दिशेने येऊ लागली. त्यांचं ते दूदडुडणं आमच्या गाइडला जरी फार क्यूट वाटत असले तरी आम्हाला मात्र जरा दचकायला झाले Happy
पण पिल्ले खरोखर गोड होती आणि शहाणीपण. एका लाकडी लहानशा अडसरामागे शिस्तीत उभी राहयली. खाऊ खाल्ला, आमच्याकडून लाड करून घेतले....खूप मस्तं अनुभव होता तो.

10.jpgfeeding2.jpg

इथे रात्री राहण्याची सुध्हा सोय आहे. स्लीपओवर विथ द एलिफंट्स म्हणे! एक प्रचंड मोठी बंदिस्त हत्तीशाळा जिथे हे हत्तीगण रात्री झोपायला येतात तिथेच उंचीवर मुक्कामासाठी अत्याधुनीक मचाणे बांधली आहेत.
अतिशय वेगळा आणि छान अनुभव घेऊन आम्ही दुपारी परतीच्या वाटेला लागलो.

न्यास्ना हे गाव फार काही मोठे नाहीये आणि केप टाऊन इतके कॉस्मोपॉलिटन पण नाही दिसले. तरीही काही उत्तम भारतीय रेस्टोरेंट्स इथे आहेत. दुपारी जेवायला मुख्य रस्त्यावरच्या एका भारतीय उपाहारगृहात आम्ही गेलो. उपाहारगृहातले कर्मचारी स्थानीक मूळ वंशाचेच होते. आम्ही जागेवर बसल्यावर एक कर्मचारी ' नमस्ते, क्या खाना पसंद करेंगे आप? ' असे अगदी आपुलकीने आमची चौकशी करत होता. त्याला अशी एक दोन वाक्ये सोडली तर बाकी हिंदी अर्थातच येत नव्हतं पण तरीही ग्राहकाची त्याच्या भाषेत विचारपूस करण्याचे आगत्य आमच्या मनाला फार भावले. अत्यंत चांगल्या दर्जाची कस्टमर सर्वीस आम्हाला या देशात वेळोवेळी अनुभवायला मिळाली.

न्यास्ना मधे फिरण्यासारखी अनेक जागा आहेत. आसपासच्या गावांमधे करण्यासारख्या असंख्य आक्टिविटिज आहेत. मात्र मुलांचा फिरण्याचा उत्साह एव्हाना संपत आल्यामुळे आम्ही गाव सोडून कुठेही आसपास फिरलो नाही. पण फिरण्याची आवड असलेल्या लोकांनी न्यास्नामधे काही दिवस राहून जवळपासच्या नॅशनल पार्कला, ऑस्ट्रिच फार्मला आणि अर्थातच एकापेक्षा एक सुंदर समुद्रकिनार्‍यांना जरूर भेट द्यावी. खूप खूप करण्यासारख्या गोष्टी आहेत इथे.

आमचा या गावातला मुक्काम संपत आला होता. कितीही दिवस राहिलात तरी इथून पाय निघू नये इतके सुरेख हे गाव. निरोप घ्यायची वेळ आली होती. दुपारी पुन्हा एकदा नदीवर जाऊन शांतपणे कितीतरी वेळ त्या शांत निळ्या पाण्याकडे बघत बसलो.

12.jpgriver1.jpg

न्यास्नाला स्वत:चे विमानतळ नाही. प्रवासाच्या पुढच्या टप्प्याचे विमान पकडायला आम्ही एका तासावर असलेल्या जॉर्ज विमानतळावर पोहोचलो. रेंटल कार परत केली आणि क्रुगर नॅशनल पार्कला जाणार्‍या विमानात जाऊन बसलो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पद्मावती - खूप सुरेख प्रवास वर्णन आणि फोटो. तुम्हाला आवर्जून शुभेच्छा. केवळ तुमच्या ह्या लेख मालिकेमुळे मी केप टाउन अनुभवू शकले.

काही कामा निंमित जोहॅनेस्बर्ग ला 4 दिवस मुक्काम होता, तुमचे लेख काही महिन्यापासून वाचत होते. प्रेरित होऊन सरळ २ दिवसाची ट्रिप प्लान केली. केप टाउन खूप अप्रतिम आणि सुंदर. मी एकटी फिरले, कधीच कुठे भीतीदायक वाटले नाही.

केप ऑफ गुड होप, वॉटरफ्रंट, टेबल माउंटन आणि पेंग्विन्स - सगळे एकदम सुरेख. एप्रिल मधली हवा पण खूप छान होती.
मनापासून तुमचे आभार.

अतिशय सुंदर... फोटु तर फार्फार आवडले.
>>>स्लीपओवर विथ द एलिफंट्स...>>> मस्त वाटतंय... नक्की जाणार.