भारतीय सिनेमा बदलला आहे. त्याने कात टाकली आहे. आता ह्या सिनेमात कुठल्याही समग्र थिल्लरपणाला स्थान तर राहिलेले नाहीच, पण चतुराईने प्रयोगशील निर्मितीसुद्धा केली जात आहे.
खरं तर अजूनही शोकांतिकेच्या वाटेला सहसा आपण जात नाही आणि गेलोच तर ती शोकांतिका सगळं काही संपवून टाकणारीच असते. भयंकर घटना, डिझास्टर आपल्या सिनेमांत बहुतेक वेळेस तरी लार्जर दॅन लाईफ असते. रामगोपाल वर्मा (सत्या) असो की अनुराग कश्यप (सगळेच) किंवा विशाल भारद्वाज (मक़बूल, हैदर) असो की मणी रत्नम (दिल से, युवा, रावण) किंवा अजून कुणी, आपल्याकडच्या शोकांतिका नेहमीच मृत्यूपर्यंत जाणाऱ्या आणि/ किंवा सगळं काही संपवणाऱ्याच असतात.
पण शोकांतिका ही अशी 'लार्जर दॅन लाईफ'च असते असं नाही. अगदी साधे साधे प्रसंगही शोकांतिकेत बदलू शकतात. लहान लहान शक्यताही मोठी वेदना करू शकतात. छोटीशीच असली तरी तीसुद्धा एक दखलपात्र घटना असू शकते. एक माणूस एखाद्या पूर्णपणे रिकाम्या असलेल्या स्कायस्क्रेपरच्या ३५ व्या मजल्यावरच्या घरात अगदी सहजपणे अडकू शकतो. अश्या वेळी त्याच्याकडे मोबाईल व वीज नसू नसणे हीदेखील एक भयंकर घटना असू शकते. इतकी भयंकर की मदतीसाठी आरडाओरडा करून त्याचा आवाज घश्यातून बाहेर येईनासा होऊ शकतो, तो जखमी होऊ शकतो, मरूही शकतो. परिस्थिती कितीही बिकट असली, तरी तहान आणि भूक तर कधी पिच्छा सोडत नसतातच. जगण्यासाठी, ह्या कैदेतून स्वत:ची सुटका करवून घेण्यासाठी त्याला काहीही करावं लागू शकतं. एका छोट्याश्या चुकीची किंवा किरकोळ अपघाताची त्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते. इतकीही मोठी नाही की त्याचं आयुष्य संपेल किंवा उद्ध्वस्त होईल, पण इतकी तर नक्कीच झालेला घाव आयुष्यभर जाणवत राहील. त्यामुळे अशी एखादी घटनासुद्धा एखाद्या शोकांतिकेपेक्षा कमी नाहीच.
'ट्रॅप्ड'चं कथानक तेव्हढंच आहे जेव्हढं वर सांगितलं. इतकंसंच असलं, तरी बघण्यासारख्या आणि अनुभवण्यासारख्या काही जबरदस्त गोष्टी 'ट्रॅप्ड'मध्ये आहेत.
साधारणपणे ९९% सिनेमात तरी फ्रेममध्ये 'राजकुमार राव'च आहे. त्यातही बहुतांश अधिक भाग तर तो एकटाच आहे आणि त्यातही बहुतांश भाग तो त्या घरातच आहे. तिथून बाहेर निघण्यासाठी आणि बाहेर निघेपर्यंत तग धरण्यासाठी त्याची धडपड बेचैन करणारी वाटते. त्याच्यासोबत घडलेली दुर्घटना खूपच साधीशी असल्याने ती कुणाच्याही सोबत घडू शकते. त्यामुळे त्याच्या जागी कुणीही स्वत:ला ठेवू शकतो. म्हणूनच त्याचा संघर्ष आपलाच संघर्ष होतो. त्याच्यासोबत आपणही विचार करत राहतो की, 'अरे अमुक करायला हवं.. तमुक करायला हवं!' तो ते 'अमुक-तमुक' सगळं करतो. कधी त्यात यशस्वी होतो, तर कधी होत नाही.
तो मुंबईत राहणारा एक सामान्य तरुण आहे. एक नोकरदार. त्याचा रोजचा संघर्ष सकाळी लोकलमध्ये शिरण्यापासून रात्री लोकलमधून उतरेपर्यंत चालू असतो आणि त्याची रोजची धावपळही तशीच, घड्याळ्याच्या काट्याशी स्पर्धा करणारी असते. त्यालाही ऑफिसमधली एक मुलगी (गीतांजली थापा) आवडत असते. त्यांची आपल्यासारखीच सामान्य स्वप्नं आणि अपेक्षा असतात आणि त्या दोघांच्याही खिश्यात तितकेच पैसे असतात जितके आपल्यापैकी बहुतेकांच्या खिश्यांत असतात.
'राजकुमार राव'च्या अभिनय क्षमतेला न्याय देणाऱ्या भूमिका त्याला सतत मिळत आहेत आणि तो मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं चीज करण्यासाठी हर तऱ्हेची मेहनत घेतो हे जाणवतं. आजपर्यंत केलेल्या प्रत्येक सिनेमातली प्रत्येक भूमिका त्याने एकाच प्रामाणिकपणे केलेली आहे. अगदी 'हमारी अधुरी कहानी' सारख्या टुकारकीतही त्याने त्याच्याकडून १००% दिलं आहे. 'ट्रॅप्ड'मध्येही त्याने स्वत:च्या सुटकेची धडपड कमालीच्या ताकदीने दाखवली आहे.
ईशान्येच्या राज्यांतून मुख्य प्रवाहातील सिनेमाविश्वात आजपर्यंत खूप कमी लोक आले आहेत. अॅण्ड्रिआ तरिआंग, गीतांजली थापा ही नावं म्हणूनच खूप महत्वाची आहेत. छोटीशीच भूमिका असली तरी गीतांजली आपली छाप सोडते. तिच्या चेहऱ्यात, व्यक्तीमत्वात एक प्रकारचा खट्याळपणा आहे.
सिनेमा 'लो बजेट' असला तरी तांत्रिक सफाईत कुठेही कमी पडत नाही. बाल्कनीतून खाली उतरण्याचा प्रयत्न करतानाचं कॅमेरावर्क (सिद्धार्थ दिवाण) कुठल्याही चमत्कृतीविना असलं, तरी जबरदस्त आहे. तसंच विविध प्रसंगांत घेतलेले कॅमेऱ्याचे विशिष्ट कोनही जमून आले आहेत. एखाद्या कोपऱ्यात गोणपाटासारखा कॅमेरा पडून राहून आपल्या सहनशीलतेचा अंत पाहत नाही की गरगर फिरून किंवा झूम इन-आउटचे अंगावर येणारे खेळही तो करत नाही.
त्याचप्रमाणे 'आलोकनंदा दासगुप्ता' ह्यांचं पार्श्वसंगीत प्रत्येक प्रसंगाची तीव्रता अजून वाढवतं.
'साउंड डिझाईन' ह्या भागात गेल्या काही वर्षांत एकूणच भारतीय सिनेमा खूप काही करतो आहे, असं जाणवत आहे. ट्रॅप्ड' त्यालाही अपवाद नाहीच.
'उडान'मुळे दिग्दर्शक 'विक्रमादित्य मोटवाने'ला नावारूपास आणलं. विविध पुरस्कारांनी नावाजलेल्या 'उडान' नंतर आलेला 'लुटेरा' मात्र आला तसा गेला. कुणीही त्याची विशेष नोंद घेतली नाही. त्यानंतर चार वर्षांनंतर आता 'ट्रॅप्ड' आला आहे. 'ट्रॅप्ड'च्या कथानकात व्यावसायिक यश देणारा कुठलाही मालमसाला नाही. त्यात कुठला सामाजिक आशयही नाही आणि ही कहाणी 'शहरी' असल्यानेही नजरेत भरणारंही काही नाही. त्यात फक्त एक आव्हान आहे. ते स्वीकारण्याचा दम 'वि.मो.'नी दाखवला आहे. हे नक्कीच सोपं नसावं. एका मेजर फ्लॉपनंतर पुन्हा नव्याने एका अ-व्यावसायिक आव्हानाला सामोरं जाणं आणि ते यशस्वीपणे पेलणं, हे केवळ थोर आहे ! 'अनुराग कश्यप' ह्या एका 'फॅण्टम'ने ते 'बॉम्बे वेलवेट' नंतर 'रमन राघव २.०' करून केलं आणि आता ह्या दुसऱ्या 'फॅण्टम' ते 'ट्रॅप्ड'द्वारे केलंय. ह्या हिंमतीची खरोखरच दाद द्यायला हवी. कारण 'जाणकार' आणि 'रसिक' लोकांचा एक प्रचंड मोठा गट 'भारतीय सिनेमा म्हणजे दुय्यमच' ह्या ठाम मताचा आहे. चांगला सिनेमा बनवला, तरी ह्या लोकांना चित्रपटगृहाकडे ओढून आणणं शक्य नाहीय. 'चांगला असेल तर डाउनलोड करून पाहू', इथपर्यंत ह्यांचा पूर्वग्रह पोहोचलेला असल्याने सेन्सिबल भारतीय सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळणं कठीणच आहे. नेहमीच्या प्रेक्षकांची आवड खूपच भिन्न असताना आणि सुजाण प्रेक्षकांत एक प्रकारची अनास्था असतानाही आपली प्रयोगशीलता जपणं मोठं जोखमीचं आहे.
व्यावसायिक गणित काळजीपूर्वक मांडणं ह्या जोखमीसाठी खूप आवश्यक. 'रमन राघव २.०' फक्त ३ कोटींत बनवला होता आणि आता 'ट्रॅप्ड' तर फक्त अडीच कोटींत बनवला आहे. गणित इथेच जवळजवळ सुटल्यातच जमा आहे, पण पूर्णपणे सुटलेलं नाही !
असो ! नक्कीच, 'ट्रॅप्ड' आणि त्या कुटुंबातले आत्तापर्यंत येऊन गेलेले आणि येणार असलेले सिनेमे हळूहळू लोकांच्या डोळ्यांवरची झापडं बाजूला करतील. भारतीय सिनेमाला तथाकथित 'रसिक' भारतीय प्रेक्षक त्यांचा अंधविरोध किंवा पूर्वग्रह सोडून गांभीर्याने पाहतील. भारतीय सिनेमा म्हणजे फक्त चोप्रा, बडजात्या, शेट्टी किंवा सलमान आणि शाहरुख नाहीत. मोठ्या संख्येने लोक आहेत जे वेगळा विचार करत आहेत. असेही आहेत जे बदलत आहेत.
कधी तरी त्यांच्याही मेहनतीचं चीज होईल. लोकांची पाउलं सिनेमाकडे वळतील. लोकांच्या पूर्वग्रहाच्या कैदेत 'ट्रॅप्ड' असणाऱ्या भारतीय सिनेमाने जर त्यातून स्वत:ची सुटका करून घेतली, तर ती एक असामान्य सुटका असेल आणि मला खात्री आहे की ही सुटका होणारच !
कारण परिस्थिती कितीही बिकट असली, तरी तहान-भूक तर लागतेच, तसंच सिनेमा कितीही प्रामाणिक असला तरी त्याने पैसाही कमवावा लागतोच !
रेटिंग - * * * * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2017/04/trapped-movie-review.html
{{{ आता ह्या सिनेमात
{{{ आता ह्या सिनेमात कुठल्याही समग्र थिल्लरपणाला स्थान तर राहिलेले नाहीच, }}}
सुरुवातीलाच प्रचंड असहमत. दर दोनपैकी एका चित्रपटात कमोडचं एकतरी दृश्य असतंच ते काय त्याशिवाय सेन्सॉर सर्टिफिकेट मिळत नाही म्हणून की काय?
बाकी समीक्षण नेहमीप्रमाणेच आवडलं.
छान परिक्षण. पण मला हे असे
छान परिक्षण. पण मला हे असे चित्रपट पहावत नाहीत. एक सत्यघटना वाचलेली, एक माणुस closetध्ये अडकलेला दोनेक आठवडे. गेला बिचारा. एकटया राहणार्या व्यक्तीने, दर २४ तासांनी कुणीतरी आपली खबरबात घेईल याची व्यवस्था करावीच.
मला बघताना सारखी Cast Away ची
मला बघताना सारखी Cast Away ची आठवण येत होती. बर्याच प्रसंगात सारखेपणा आहे असं वाटलं. उदा. ज्याला आधी घाबरतो त्याच उंदराशी नंतर गप्पा मारणे वगैरे.
५ स्टार ! !
५ स्टार ! !
ट्रेलरवरून ईंटरेस्टींग वाटलेला... बघायला हवा आता हे रेटींग बघून.. असह्य नसणार एवढे नक्की, म्हणजे आवडेलच
विषयावरून १२७ अवर्स सारखा
विषयावरून १२७ अवर्स सारखा वाटला. अर्थात परिस्थिती कमालीची भिन्न आहे. बघायला आवडेल
छान परिक्षण डॅनी बोयल च्या
छान परिक्षण डॅनी बोयल च्या 127 hrs सारखा वाटतो ...राजकुमार राव सिटी लाइट्स पासून फेवरेट अॅक्टर त्यामुळे पाहणारच
मणिरत्नम चा युवा काही
मणिरत्नम चा युवा काही शोकांतिका वाटत नाही.
राजकुमार आवडतोच. खरं तर रुढ
राजकुमार आवडतोच. खरं तर रुढ अर्थाने तो देखणा, हँडसम वगैरे नाही पण प्रत्येक भुमिका प्रामाणिक पणे करतो.
हा पण बघणारच आहे.
१२७ खुपच भितीदायक होता.
१२७ खुपच भितीदायक होता. म्हणजे तो जसा आडकला होता ते.
दिनेशदा+११
मी बघणार आहे सिनेमा .
मी बघणार आहे सिनेमा .
छान लेख. मला बघायचा आहे पण
छान लेख. मला बघायचा आहे पण माझ्यासाठी परिस्थिती नवी नाही. म्हणून मी आगाउ पणा वाटला तरी एकटे लोक बाया, प्राणी ह्यांना जमेल तशी मदत करत असते.
बघायला हवा सिनेमा.
बघायला हवा सिनेमा.
१२७ बघुन भिती वाटली होती. पण हा बघताना त्याहीपेक्षा भिती वाटेल. कारण सामान्य प्रसंगातुन ट्रॅप होणं. तिथे तो ट्रेकिंग वैगेरे करताना अडकतो. पण इथे अगदी कुणावरही येउ शकतो असा प्रसंग आहे. म्हणुन जास्त भिती वाटेल मला.
प्रभादेवीची बिल्डींग आहे ती..
प्रभादेवीची बिल्डींग आहे ती.. पण मला वाटते, थोड्या प्रयत्नाने तो दरवाजा तोडू शकला असता. किंवा इतर मोठी आग वगैरे लावू शकला असता ( मॅट्रेस, चादर, लाकडी कपाट, अंगावरचे कपडे ) अर्थात हे फक्त कयास
करून केलं ????
नुराग कश्यप' ह्या एका 'फॅण्टम'ने ते 'बॉम्बे वेलवेट' नंतर 'रमन राघव २.०' करून केलं आणि आता ह्या दुसऱ्या 'फॅण्टम' ते 'ट्रॅप्ड'द्वारे केलंय
करून केलं ????
नसू नसणे पण आहे
नसू नसणे पण आहे
मला नाही आवडला चित्रपट..
मला नाही आवडला चित्रपट.. राजकुमार राव छान्च अभिनय करतो पण मला चित्रपट मात्र नाही आवडला..