भय इथले संपत नाही..एक अर्थान्वयन
भय इथले संपत नाही... या कवितेचं भय संपत नाही असं गमतीने म्हणावंसं वाटतं.
अनेकार्थांची शक्यता वागवणा-या या सशक्त कवितेचा वेध घेण्याचा माझाही हा एक प्रयास.हा पहिला नाही तसा अखेरचाही नाही. एका आन्तरजाल समूहातील मैत्रीण सज्जला जाधव हिच्या विशेष आग्रहातून हे लेखन झालं.
‘’भये व्यापले सर्व ब्रह्मांड आहे’’ असं रामदास किती यथार्थतेने म्हणतात, पण पुढे ‘’भयातीत ते संत शोधून पाहे’ असा आपल्या सामान्य जाणीवेला अपरिचित असा संकेत देतात. भय म्हणजे अज्ञानाचं भावरूप.मग त्याच्यावर मात करायची म्हणजे ज्ञानानेच. ते संत शोधून पाहतात.
या इथे संत नाही, पण एका विलक्षण कवीचं यक्षगान चालू आहे. प्रतिभासाधन हेच त्याचं अध्यात्म आहे. प्रतिमांचे विस्फोट ओळीओळीतून विखुरले आहेत.पायवाटेवर रंगीत काच-चुरा पसरावा तसे. वाट सुंदर दिसते आहे पण पावले रक्ताळून टाकणारी.
भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...
अंतर्यामीच्या अरण्यात एकाकी सावल्या गर्द होत आहेत.गाणी गायला शिकवणाऱ्या ’तुझी’ आठवण येते आहे.
कवितागत ’’तू’ कोण? कोणी शिकवली गाणी गायला ? आई ? वडील ? सुहृद ? प्रियतम ? ईश्वर ?कोण शिकवतं गाणी गायला ? वयानुसार हे स्रोत बदलतात , पण खरं तर आपणच आपल्याला भेटत नसतो का? गाणं आतूनच उन्मळून येतं. बाह्य आलंबन बदलतं.त्याचं नाव बदलतं.’’तू’’ हे स्वे-तर विश्वातलं प्रेयस आहे , भयावर मात करणारी प्रेमाची शक्ती. गाण्यातून तिचा जागर होतो.भयाचा विसर पडतो.
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
हे प्रतिभा अरण्य विलक्षण आहे. इथे महाशून्याच्या ऐसपैस आवारात भरपूर झाडझाडोरा आहे.पालापाचोळा आहेत. सावल्या-प्रकाश,काळोख आणि चांदणे - सतत बदलत्या प्रकाशयोजना आहेत.झरे वाहताहेत . चंद्रबिंब ज्यांच्या लहरीत शतभंग होतं ,आणि पूर्वापारच्या साजणांचे शत-संकेत ज्यांच्या काठाशी विखुरलेले असे प्रीती-निर्झर वाहताहेत. आसमंतावर पसरलेली संध्याछाया या अरण्याला भगव्या मायेत रंगवते आहे.
आपण, तू आणि मी, इथे झाडाशी निजलो आहोत, आसक्तीच्या कोशाला विरक्तीचे पदर सुटू लागले आहेत. या सृष्टीत विलीन होऊन आपलं प्राणतत्व पुन: याच सृष्टीत उगवून येईल. हे आता समजू लागलं आहे.
त्या वेळी नाजुक भोळ्या, वार्याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन, दारावर आली भरती
हा आकलनाचा क्षण, ही वेळ, तरल आहे.नाजूक आणि भोळी-निरागस आहे.आता या विस्तारात मध्येच हे दार कुठलं ? हे दार मनाचं आहे.या दारावर- मनाच्या उंबरठ्यावर - हसऱ्या आनंदी भावनांची भरती लोटली आहे. झाडांच्या पायथ्याशी निजून झाडात आपणच उगवून आलो आहोत या जाणीवेत विलीन झाल्यावर द्वैत संपलं. तुझ्या-माझ्यातलं प्रीतीविश्वातलं, तसंच बाह्य सृष्टी आणि मनोमय जगण्यातलं.
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणू राघव शेला
वनवासात सीतेला आधार होता रामरायांचा एक शेला, एक खूण तिच्या विपरीत आतंककाळात सोबत आलेली, तिला स्मरण आणि धीर देणारी. तसलाच एक मंद हळवा बोल , एक संवाद, एक आठवण या क्षणाची, तुझ्या प्रीती-सहवासात अनुभवलेल्या या विराट सृजनशील शांततेची , माझ्याबरोबर राहील आयुष्यभर.
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी, मी उरला सुरला थेंब
भग्न शिल्पित देऊळ आहे दूर कुठेतरी. अरण्य एक प्रतीक तसं देऊळ दुसरं प्रतीक.गडद सांजवेळी ही दोन्ही प्रतीकं जागतात. प्रतिमांना जागवतात.
तर हे देऊळ , ’तू’ चं भावजीवनातलं हे अंतिम रूप आहे . ईश्वरीय प्रेमाचं ते अन्तिम विश्रांतीस्थान आहे.या अरण्यातील भय लोपून दूरच्या देवळाची ओढ जागते आहे. भगवी माया परम-प्रियतमाला स्वत:त सामावून विरून जाऊ पाह्ते आहे.त्या देवळाच्या भग्न खांबापर्यंत तरी पोचून एक ओंजळ वाहायची आहे प्रार्थनेची.आर्त आस लागली आहे, आयुष्य एक अश्रू होऊन डोळ्यात ताटकळले आहे.
संध्येतील कमल फुलासम, मी नटलो शृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
आता मीच कमळ होऊन फुललो आहे,नटलो आहे अस्तित्ववैभवाने. पूर्णावलो आहे, माझ्या पूर्वायुष्यातील प्रियेसकट सृष्टीला स्वत:त सामावण्याचा अनुभव घेऊन . म्हणून हे आयुष्याच्या संध्याकाळी फुललेलं कमळ आहे.आता हे उत्फुल्ल देहकमळ तुला वाहायचे आहे ईश्वरा.या माझ्या कमळाभोवती निळ्या रानांची वलयं फुटताहेत. आता माझ्यासाठी पृथ्वी आणि जलतत्व एक झालंय. मीच जणू लहानसा शक्तीशाली केंद्रबिंदू आहे विराट विश्वाचा..
स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
या देवळाच्या आवारात माझी इंद्रियं स्तोत्र गुणगुणताहेत ( इथे ग्रेसांचीच ‘अनंत इद्रियांतले स्वतंत्र शोक जागवी’ ही ओळ आठवते !), त्या स्तोत्रातही दु:ख आहे. विरह आहे.. एक उत्कट अनुभूती देऊन ऐहिक जीवनातलं प्रेम ओसरून गेलं. त्या विरून गेलेल्या प्रेमाच्या स्मरणाचं चांदणं सर्वत्र चमकतं आहे. जे सुरू होतं ते सरतं हा इथला नियम. विरहदु:ख मात्र सरत नाही हा विरोधाभास.
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई
पूर्ण उत्फुल्ल , पण पूर्ण एकटा असा मी तुझ्या आवारात पोचलो तर आहे.भयातून वाट काढत ,मात करत ,गाणी गुणगुणत , प्रीतीच्या परिपूर्तीचे क्षण सांभाळत एकटा इथे येऊन पोचलो.
पण अवेळीच धुकं कसलं दाटलं आहे ? मला इथून परत जावंसं वाटतं का आहे ?
अज्ञाताने पुन: मला शह दिला आहे.. शिशिराची,वठलेल्या तरुंची राई- निर्माल्य झालेल्या अनुभवांचा पाचोळा माझ्या मेंदूतून ओघळतो आहे! पुन्हा जुन्या आयुष्याचा मोह जागला आहे.परतलं पाहिजे त्याच फसव्या जीवनाकडे, भगव्या मायेचा चकवा अद्याप तरी संपलेला नाही.
खरं तर ही भगवी माया हाच या कवितेचा चकवा आहे. विरक्तीचे रंग ल्यायलेल्या आसक्तीचा आसमंत कवितेत प्रकटला आहे , तो कवीला विशुद्ध वैराग्याकडे जाऊ देत नाही , ऐन (अ)वेळी संभ्रमाचं धुकं दाटतं , परम श्रेयाच्या आवारात पोचल्यावरही पाचोळा झालेल्या जुन्या अनुभवांकडेच "परतायाची घाई" होते.. कारण भयाकारी अशा आयुष्याकडेच पुन्हापुन्हा झेपावणारा , मुक्ती नाकारणारा कवी हा शापित यक्षच असतो, संत नाही..
भारती..
आज ग्रेसांच्या पुण्यतिथी
आज ग्रेसांच्या पुण्यतिथी निमित्त हे एक अलिकडचं लेखन मायबोलीवर शेअर करत आहे..
सुंदर आणि समयोचित.... मला खूप
सुंदर आणि समयोचित.... मला खूप आवडले.... बरेच दिवस मी अर्थान्वय करतांना व्यथित होत होतो.....
सुंदर. छान केलेत, तुम्ही
सुंदर. छान केलेत, तुम्ही लिहिलेत ते.
सुंदर आणि समयोचित- +१
ही कविता पहिल्यांदा ऐकली
ही कविता पहिल्यांदा ऐकली 'महाश्वेता'च्या वेळी. खूप आवडली.
तुम्ही अन्वयनही सुरेख केलंयत.
अवांतर: का माहिती नाही, पण अनेक कविता अशा 'भेटल्या' की त्यांचा अर्थ कधीच नाही कळला तरी चालेल असं वाटलं. कधी त्या गाणं होऊन समोर आल्या तर कधी मुक्तछंदात, कधी अशाच नुसत्या लयबद्ध होऊन आल्या. पण त्या जशा समोर आल्या तशाच लगेच भिडल्या. पुढे कधी त्याचं कसलंही विश्लेषण करायची गरजच नाही वाटली. ही पण त्यातलीच एक. गोडी अपूर्णतेची... म्हणतात ती हीच असेल.
कृपया गैर्समज नसावा. अर्थान्वयन खरंच सुंदर आहे!
छानच... unable to write with
छानच... unable to write with this marathi kepad...
it made me speechless...
hats off...
अर्थान्वयन सुन्दर ....मस्त
अर्थान्वयन सुन्दर ....मस्त लिहिलय
माझंपण अवांतर :
>>का माहिती नाही, पण अनेक कविता अशा 'भेटल्या' की त्यांचा अर्थ कधीच नाही कळला तरी चालेल असं वाटलं. कधी त्या गाणं होऊन समोर आल्या तर कधी मुक्तछंदात, कधी अशाच नुसत्या लयबद्ध होऊन आल्या. पण त्या जशा समोर आल्या तशाच लगेच भिडल्या. पुढे कधी त्याचं कसलंही विश्लेषण करायची गरजच नाही वाटली. ही पण त्यातलीच एक. गोडी अपूर्णतेची... म्हणतात ती हीच असेल.>>
प्रज्ञा९, अगदी माझ्या मनातलं बोललात.
कालच "घर थकलेले सन्यासी" हे गाणं ऐकत होते..आत्तापर्यंत हजारो वेळा ऐकलं असेल पण तरी जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा अर्थाचा विचार करत बसते...आणि
मी भिवून अंधाराला अडगळीत लपुनी जाई
ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई
या ओळीपाशी आलं की असं वाटतं, जाउदेतना कशाला शोधायाचाय अर्थ...
परत रीपीट वर गाणं टाकायचं आणि डोळे मिटुन शांत बसायचं...काही कळलं नाही तरी खुप काहीतरी समजलं असं वाटतं
सुरेख लिहीले आहे. आवडले.
सुरेख लिहीले आहे. आवडले.
रेव्यू, रैना, शशान्कजी ,
रेव्यू, रैना, शशान्कजी , प्रज्ञा, स्मिता, कान्दापोहे ,तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला. बराच मोठा खंड घेऊन मायबोलीवर लिहित आहे.
माझ्या दुसर्या कवितासंग्रहाच्या जुळवाजुळवीत व प्रकाशनात गेल्या वर्षी व्यग्र होते. ते काम झालेही. असो.
आता या प्रकारच्या लेखनाला काही प्रतिसाद मिळतील का असं वाटून साशंक होते. ती शंका मिटली.
प्रज्ञा, स्मिता, तुमचे म्हणणेही खरेच आहे.. ग्रेसांच्या कविता म्हणजे प्रतिमांचे पुंज आणि लयीचे खेळ. तेवढेच अनुभवावेत हे राजीव साने यांचे म्हणणे मलाही पटतेच, पण त्याआत जाणवणारं पुसट आशयसूत्र समजून घेतलं तर कवितेत अधिकाधिक खोल जायला मदत होऊ शकते..
हा लेख छान आहे. मला ह्या वर
हा लेख छान आहे. मला ह्या वर वे गळे इं टरप्रिटेशन लिहायचे आहे. धागा काढून लिहीते. वेलकम बॅक भारती ताई.
आता या प्रकारच्या लेखनाला
आता या प्रकारच्या लेखनाला काही प्रतिसाद मिळतील का>>> धागा पाहूनच बरं वाटलं. रोजच्या लाथाळ्या, तेचते राजकारणाचं चर्वितचर्वण बघून नको होतं हल्ली.
लिहित राहा
धन्यवाद अमा, वरदा :), अमा,
धन्यवाद अमा, वरदा :), अमा, अवश्य लिहा , वाट पाहतेय. वरदा, नक्की लिहेन, आता काहीशी फ्री झालेय .
सुंदर विवेचन... मला यातली
सुंदर विवेचन... मला यातली एकेक ओळ सुटी सुटी आवडते.. अर्थ काय ? असा प्रश्नही कधी पडला नव्हता. पण आज तो देखील कळला.
सुरेख लिहिलं आहे भारती! फार
सुरेख लिहिलं आहे भारती! फार विलक्षण वाटतात हे शब्द ! ( प्रज्ञा आणि स्मिता श्रीपाद यांसारखच मला पण वाटतं . ते शब्द मनात थेट रिते होउन काही अनुभव देतात. ) पण तुमचा अर्थान्वयन सुद्धा फार मस्त वाटला वाचताना.
सुरेख लिहिलयं!
सुरेख लिहिलयं!
अमा, तुमच्या लेखाच्या प्रतिक्षेत!
अतिशय सुंदर शब्दांतले
अतिशय सुंदर शब्दांतले अर्थान्वयन . अगदी पुन्हा पून्हा वाचनाचा मोह पडत जावा इतकी छान कवितेची उकल . ..
मला स्वतःला मात्र असं वाटतं की ग्रेसच्या कवितेचे अर्थ लावूच नयेत. ही कविता समोर येते ती पाऊसकाळातील माळावरील ठायी ठायी विखुरल्या चिमण्या तळ्यांसारखीच .त्यातल्या आरशात सहज डोकावलं तर दिसतात हरघडी विविध आकार धारण करणारे ,बदलणारे मेघाकार किंवा स्वतः चाच चेहरा ...आपल्याच अंतस्थ जाणिवांचे जग ,त्यातले स्वरंगगंधाचे आत्मीय उन्मनी विभ्रम कधी काळीजकाठाला स्पर्शून अंतर्नादात प्रतिध्वनीत होणारे अनाम भोळ्या दुःखाचे झंकारतरंग ...
असो या लेखाच्या निमित्ताने ,' मज तुझी आठवण येते ' ...या कळवळून गायलेल्या ओळींचा हंबर ,कितीतरी काळानंतर विनाकारण अस्वस्थ करुन गेला एवढे मात्र खरे .
_____/|_____
_____/|_____
भारती... नितांत सुंदर
भारती... नितांत सुंदर अर्थान्वय. भुईकमळ म्हणतय तसं पुन्हा पुन्हा वाचायची भूल पाडणारं...
गंमत म्हणजे हे वाचताना कविता गाणं म्हणून आठवेना...
आणि गाणं ऐकताना हे आठवेलच असं नाही. बहुधा नाहीच आठवणार.
हे तुझं निर्झरी वेगळं.. तो गाण्याचा खळाळ वेगळा.. असं झालंय बघ
दिनेश, भुईकमळ, दाद,
दिनेश, भुईकमळ, दाद,
रावी, स्वाती, राजेंद्र,
जुन्यानव्या सुहृदांना या इथे पुन: भेटण्यासाठी हे निमित्त. कुणासाठी तरी हे लिहिताना मी या भवभयारण्यात खूप आर्त आनंदाने भटकले .
दाद, गाणं आणि कविता म्हणजे वधूवेष आणि पोटची पोर . बदलून जातं सारं, सुंदर होतं , अधिक स्वीकारार्ह होतं आणि तरीही सोपं होतं ..
मा़झ्या नजरेतून सुटले होते हे
मा़झ्या नजरेतून सुटले होते हे अर्थान्वयन. तुमची शैली सुंदर आहे. प्रतिमा उलगडताना त्यांचे वर्णन सुंदर केलेले आहे.
अजून एक वेगळे चित्र रंगवलेले पहायला मिळाले. अशा प्रकारच्या कविता, कला यांची हीच ताकद ठळक होते....