अमेरिकास्थित (परदेशातील) भारतीय रेस्टॉरंट मधील कामगार व अनुभव

Submitted by हायझेनबर्ग on 21 March, 2017 - 11:58

आज काल जेव्हा कधीही भारतीय रेस्टॉरंट मध्ये जाणं होतं तेव्हा तिथल्या भारतीय वेटर्स/ सर्वर्स ना बघून मला फार विचित्रं वाटतं.
विचित्रं ह्या अर्थाने - साधारणतः कॉलेजात जाण्याच्या वयातली ही मुलं सदा मलूल, दु:खी आणि बिचारी वाटतात. कदाचित ओवरवर्क्ड किंवा अंडरपेड किंवा दोन्ही ? कॉलेज सांभाळून ते हे काम करतात का? पण कुठलंही कॉलेज असं कँपस च्या बाहेर काम अलाऊड करत नाही ना?
देशी आय टी कन्सल्टिंग कंपनी सारखं हॉटेल मॅनेजमेंट किंवा तत्त्सम कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल ट्रेनिंग टाईप काम असते का हे?
पण मग ही मुलं फक्तं भारतीय रेस्टॉरंट मधेच दिसतात.
मागे एका मित्राकडून ऐकलं भारतीय रेस्टॉरंट चे मालक अमेरिकन रेस्टॉरंट सारखी क्रेडिट कार्ड ने पे केलेल्या चेकमधली टीप स्टाफ मध्ये वाटत नाही तेव्हा पासून मी कॅश टीप द्यायला लागलो. तर बर्‍याच वेळा मालक /मॅनेजर च चेक देणे आणि नंतर पेमेंट कलेक्ट करणे कामं करतात. मग कॅश टीप देवूनही ती त्यांना मिळेलच असे नाही.
तसंही भारतीय रेस्टॉरंट्मध्ये फार हसून अगत्याने स्वागत होणे अपेक्षित नसले तरी एकंदर सॅड फिलिंग ही अपेक्षित नसते. अर्थात सगळ्याच भारतीय रेस्टॉरंट मध्ये असेच होते असे नाही पण एक जनरल ऑब्जर्वेशन. भा रे. मधले बहुतांश कस्टमर्सही सर्वर्स च्या प्रति वागणुकीबाबतीत अतिशय निष्काळजी आणि बेपर्वा वाटतात. पुन्हा स्वीपिंग स्टेटमेंट नाही पण एक जनरल ऑब्जर्वेशन.
ह्या मुलांचा टर्न ओवरही बर्‍यापैकी असतो. वर्षभरात नवेचेहरे दिसायला लागतात? पण ते ही तसेच बिचारे दिसतात. मालक्/मॅनेजर्स कडून त्यांना बंधनं घातली जातात म्हणून असेल का? काय होते त्यांचे पुढे कुठे जातात ही मुले? अमेरिकन रेस्टॉरंट मधली मिनिमम वेजवर काम करणारी मंडळी देखील एकदम ऊत्साही/ हसत खेळत असतात पण भा. रे. मध्ये असा अनुभव क्वचितच येतो. मी बरेचदा ह्या मुलांशी संभाषण साधायला बघतो पण ते फार मोकळं बोलत नाहीत, प्रेशर खाली वाटतात.
युके/ ऑस्ट्रेलिया वगैरे मध्ये काय स्थिती आहे कल्पना नाही पण अशीच असावी असे वाटते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुजराथी किंवा पंजाबी रेस्टॉरन्ट्स, ग्रोसरी शॉप्समध्ये अशिक्षित बायकासुद्धा कॉन्फिडन्टली आणि चिअरफुली कस्टमर्स हाताळत असतात. प्रसन्न डेकोर ठेवतात.
म्हणजे सगळीच भारतीय रेस्टॉरंट्स वाईट नाहीत.
आम्ही फक्त चान्द पॅलेस मधे बफे साठी जातो. तेहि क्वचितच. तेथे आम्ही वेटरकडे बघतहि नाही. बाकी भारतीय रेस्टॉरंट्स मधे जाणे केंव्हाच बंद केले आहे. साधारण जिथे कापडी टेबल क्लॉथ, कापडी नॅपकिन असतात, चेन रेस्टॉरंट्स नसतात अश्याच ठिकाणी जातो. तिथेहि तशी वेटरकडे बघायची वेळ येतच नाही, आम्ही आमच्या गप्पांत किंवा नातीकडे बघण्यात गुंग असतो.
तुम्ही एक गाणे ऐकले आहे का?
Sometimes you want to go, where everybody knows your name
And they are glad you came
etc. etc.
तर अश्या काही जागा आहेत, माझ्यासाठी तिथे जातो - रेस्टॉरंट्स मधे जाणे म्हणजे आजकालच्या इकॉनॉमि क्लास ने डोमेस्टिक विमान प्रवास करण्यासारखे झाले आहे.

अवघड विषय आहे Sad वाईट वाटले वाचून. अन रागही आला.
साला देशात शेण खातात, परदेशातही जाऊन तेच? कमि पैशात राबवुन घेणे?

>>>>>> भारतीय रेस्टॉरंटवाले काय नी ग्रोसरी स्टोअर्सवाले काय नी गॅस स्टेशनवाले काय. जिथे जिथे भारतीय छोटे छोटे उद्योग धंदे असतील, तिथे असे पिळवणूकीचेच किस्से ऐकले आहेत. फार कमी उदाहरणं याचा विरूद्ध असतील. <<<<<
म्हणजे, परदेशात भारतीय "मदत वगैरे" करतात ते स्वप्नरंजन फक्त अन फक्त "हिंदी शिनेमातुन" तेव्हडेच दाखवितात तेव्हडेच सत्य आहे तर... ... (कोणता सिनेमा ते आठवत नाही, पण दोनतिन हिंदी सिनेमातुन हॉटेलमालक "उदार" मनाने मदत करताना दाखविला आहे. अगदी त्या अमिताभच्या पुस्तक लिहितो त्या सिनेमातही)

देस परदेस देव आनंदच्या चित्रपटात देखील हे दाखवले आहे विदाउट पेपर इमिग्रंट अगदी घाबरून राहात असतात. एक माणूस आजारी पडतो तर डॉक्टर कडे पण नेत नाहीत तसेच मरवतात कारण पेपर्स नाहीत. बार मध्ये लेबर म्हणून काम करतात. मालक अगदी इविल असतो. तो तर देव आनंदच्या भावाचा मर्डर करतो.

मध्यं तरी मी नेटफ्लिक्स वर एक पिक्चर पाहिला त्यात इंडिअन रेस्टॉ एकदम घाणेरडे दाखवले आहे. अस्वच्च्छ. आणि तो कुक. शेफ
म्हणवत नाही. चक्क पान खाउन एक शेजारी डिस्पोसेबल ग्लास ठेवलेला असतो त्यात थुंकत असतो. शिसारी आली मला तर. मग ओनरचा मुलगा स्वतः सर्व ताब्यात घेतो. व सुधारतो पण ती किळस वाटलेली काही गेली नाही. त्यापेक्षा बंडीवरून ताजा हॉट डॉग एन वाय स्पेशल खाल्ला तर काय वाइट.

ह्या लोकांचे मेन प्रश्न हायजीन, लीगल स्टेट्स, हेल्त इशूज. टोटली अवॉइडेबल.

पॅरिस मध्ये मला मात्र इंडि रेस्टो मस्त भेटले. गूगल करून शोधले. छोटुकली पॅलेसची गॅलरी सिटा उट असावे तसे होते. प्रथम रोझ शरबत.
मग बटर चिकन व बिर्यानी. सुरेख लाइट प्रिपरेशन व वेट स्टाफ स्व्च्च्छ आणि पोलाइट हसरा. वयस्कर ( म्हणजे पन्नाशीचा ) एक सिनीअर होता तो जाताना धन्यवाद म्हटला. मी चांगली कॅश टिप दिली.

लिंबू, दोन्ही उदाहरणे आहेत. मदत करणारे भरपूर आहेत. पण एकदा मालक-नोकर संबंध आला की चित्र वेगळे असते.

लिंबूटिंबू, पु. लं. च्या पूर्वरंग मधे एक अनुभव त्यांनी सांगितला आहे. मला नेमका देश आठवत नाही (थायलंड?), पण तिथे विमान उतरल्यावर कस्टम्स वाल्यांनी भारतीय लोकांना वेगळं काढून तपासणी केल्यामुळे दुखावलं जाऊन पु. लं. नी जेव्हा त्याचं कारण विचारलं तेव्हा तो कस्टम्स वाला म्हणाला की ह्याचं कारण मला विचारण्यापेक्षा तू तुमच्या देशातून आलेल्या व्यापार्यांना विचार. पुढे पु. ल. लिहीतात की व्यापार करणं म्हणजे समोरच्याला लुबाडणं ही भारतीय व्यापार्यांची वृत्ती जाणवते. आज ईतक्या वर्षांनी ह्या परिस्थितीत फार फरक पडला नसावा. स्वच्छता, कस्टमर सर्व्हिस, नीटनेटकेपणा ह्या बाबतीत भारतीय गॅस स्टेशन्स, रेस्टॉरंट्स, मॉटेल्स (हा तर विषय जाऊच दे) ई. उद्योगधंदे कटाक्षानं बाजूला रहातात. अपवाद आहेत, पण गुणोत्तर पाहिलं तर काटा ह्या बाजूला बराच जास्त झुकलेला आहे.

तिथे विमान उतरल्यावर कस्टम्स वाल्यांनी भारतीय लोकांना वेगळं काढून तपासणी केल्यामुळे दुखावलं जाऊन पु. लं. नी जेव्हा त्याचं कारण विचारलं तेव्हा तो कस्टम्स वाला म्हणाला की ह्याचं कारण मला विचारण्यापेक्षा तू तुमच्या देशातून आलेल्या व्यापार्यांना विचार. >>>हेच आमचा डॉनल्ड मुस्लिम देशांतून आलेल्यांना करतो त्याला मात्र रेसिस्ट म्हणतात!!

आमच्या शहरात अशा रेस्टॉ. मध्ये साउथ इंडियन मुले जास्तं आहेत आणि ती शिक्षणासाठी आलेली वाटत नाहीत. ईल्लिगली आणलेली, कमी शिकलेली आहेत. पण खरेच अगदी उदासीन दिसतात. आणि मॅनेजर्स हे हमखास उद्धट आहेत. पंजाबी मालक असेल तर जरा बरे बोलतो पण सा.इ. हे फक्त सा.इंडियन्सशीच नीट बोलतात.

राया +१ मला पण इथली साउथ इंडियन मुलं शिकायला आलेली वाटत नाहीत. पण मी विचारलं नाहीये सो खखो माहित नाही.

मॅनेजमेंट क्वालिटी आणि हायजीन बद्दल पूर्ण खात्री असल्या शिवाय ग्रुपऑन किंवा गुगल रिव्य्यूज (पूर्वी झगट रेटिंग होते) वाचूनच हॉटेल मध्ये गेलेले बरे.
मागे एकदा (पहिले आणि शेवटचे) ग्रुपऑन कुपन वापरून भा. रे. मध्ये डिनरला गेलो (एरियातले चांगल्यापैकी फाईन डाय्निंग रेस्टॉ आहे हे दोघांचे बिल ५०+ वगैरे होईल ईतपत). डेझर्ट ऑर्डर करायचा विचार होता पण त्याने काही न विचारता आधीच चेक आणून दिला. आम्ही म्हणालो डेझर्ट हवं आहे आणि ग्रुपऑन कुपन आहे. मग डेझर्ट आणि रिवाईज्ड चेक बरोबरंच घेवून आला. त्यात ग्रॅच्युईटी अ‍ॅड केली होती ( ४+ माणसांच्या टेबलला ग्रॅच्युईटी लागेल ह्या नोट सहित) आम्ही त्याला दाखवले की आम्ही दोघेच आहोत तर ग्रॅच्युईटी का लावतो आहेस आणि तेही आम्ही ग्रुपऑन कुपन वापरत आहे म्हणून का कारण पहिल्याने तू चेक दिलास त्यात तर ग्रॅच्युईटी नाही लावलीस. तर हो म्हणाला. आम्ही वाद घालण्याच्या मूड मध्ये नव्हतो म्हणून मग ठेवणार होतो ती कॅश टीप कँसल केली.
हे लोक स्वतःचेच प्रमोशन सुद्धा ऑनर करत नाहीत

अफगाण, पाकिस्तानी आणि नेपाळी रेस्टॉरंट्स सुद्धा भारतीय रेस्टाँ च्या मानाने प्रसन्न आणि अगत्यशील वाटले.

मॅनहटन (मिडटाऊन) मध्ये आता चिपोटले च्या धर्तीवर ईंडिया-किच (मिनार नाही) चकचकीत फास्ट फुड ईट-ईन/ टेक ऑऊट्स निघाली आहेत. एक दोन ईंडियन (ईंडो-अमेरिकन) चेहरे (मालकाचे हस्तक बहुधा) सोडून सगळे गोरेच चेहरे असतात काऊंटर वर. मला तरी चांगले वाटले पहिल्या अनुभवातून.

मी काही वेळा (अमेरिकेतल्या) उत्तर पश्चीम भागात (सिअ‍ॅटल वगैरे) कामानिमित्त गेलो आहे. तिथल्या भारतीय रेस्टॉरंटमधे मला अमेरिकेतल्या इतर प्रदेशांपेक्षा कमालीचे चांगले अगत्य आणि हसतमुखाने सेवा असे आढळले आहे. इतरांना कुणाला असा अनुभव आला का ते वाचायला आवडेल.
उत्तर पश्चीम भागात असे काय वेगळे असावे त्यामुळे असे चांगले अनुभव यावेत? मी एखाद्या रेस्टॉरंट मधे आलेल्या अपवादात्मक अनुभवाबद्दल सांगत नसून त्या भागातल्या सर्वसाधारण अनुभवांबद्द्ल लिहितो आहे.

एका अमेरिकन बाईने सुरू केलेल्या ईंडियन रेस्टॉरंट मधे एकदा अचानक गेलो होतो. प्रवासात होतो आणी चहा घ्यायचा होता. स्टारबक्स ऐवजी ईंडियन रेस्टॉरंट मधे गेलो. डेकॉर, स्वच्छता, तत्परता आणी चव (सुद्धा) ह्या सगळ्याच बाबतीत खूप सुखद अनुभव होता. काम करणारे सगळे अमेरिकन तरूण तरूणी होत्या आणी थोडसं फास्ट-फूडीकरण केलं होतं. पण छान वाटलं. आम्हाला तिनं खास मुंबईहून मागवलेल्या कटींग ग्लासेस मधून चहा दिला. बर्यापैकी गर्दी होती, पण थोडा वेळ थांबून गप्पा मारल्या. बरं वाटलं.

पैसा पैसा अ‍ॅटिट्युड, कार्ड न स्वीकारणे इ. अनुभव नॉर्थ इस्ट मध्ये जास्त आले. बे-एरियात कितीही छोटी वस्तू घेतली आणि कार्ड दिलं तर (अपवाद वगळता) पैसे द्या म्हणुन सांगितलेलं नाहीये आठवत. तसचं कॅश द्या हे ही अदबीने, किंवा कॅश आहे का असा प्रश्न म्हणुन विचारलं आहे. मशिनच नाही करुन हात वर केलेत असं इकडे झालेलं नाही.

>हे लोक स्वतःचेच प्रमोशन सुद्धा ऑनर करत नाहीत<<

दोन जणांच्या ग्रुपला ग्रॅच्युइटी लावली हा चावटपणा आहे, रुल ऑफ थंब ६+ माणसांसाठी आहे. ग्रुपानला फिडबॅक ध्या...

>>आणि मॅनेजर्स हे हमखास उद्धट आहेत.<<

इथे सदर्न हास्पिटॅलिटी अनुभवायला या. आमच्या गावातल्या उडपीचा अण्णा डोस्यावर एक्स्ट्रा चटणी/सांबार न सांगता आणुन देतो... Proud

आमच्या सारखे इथे बरीच वर्षे राहिलेले लोक भारतीय रेस्टॉरंट्स मधे सहसा जात नाहीतच. जातात ते फक्त गोरे, नि भारतीय तर काय, गोरे म्हंटले की पाय चाटतील नि भारतीय दिसले की तुसडेपणा. जे लोक गेल्या काही वर्षात शरीराने इथे आले पण मनाने अजून भारतातच तेच लोक जातात. त्यांना भारतीय तर पाहिजे पण सर्व्हिस अमेरिकन पाहिजे.

साला देशात शेण खातात, परदेशातही जाऊन तेच? कमि पैशात राबवुन घेणे?
व्यापार करणं म्हणजे समोरच्याला लुबाडणं ही भारतीय व्यापार्यांची वृत्ती जाणवते.
असे वाचले की मला फार फार वाईट वाटते.
हे फक्त भारतातच होते असे नाही. तेंव्हा याला भारतीय प्रवृत्ति म्हणू नका, ही धंदा करण्याची पद्धत इतरत्रहि असते. त्याला नावे वेगळी वेगळी, कारणे वेगळी वेगळी सांगितल्या जातात, एव्हढेच.

कमी पैशात राबवून घेणे - अमेरिकेत एका अत्यंत श्रीमंत माणसाबद्दल बर्‍याच लोकांना असे अनुभव आले आहेत की काम करून घेतले नि नंतर आवडले नाही या सबबीखाली पैसे दिले नाही, किंवा हॉटेल, कॅसिनो बांधून घेतले नि काँट्रॅक्टर्स चे सगळे पैसे देऊन होण्यापूर्वीच दिवाळे काढले, म्हणजे कुणाचे पैसे द्यायला नको. हे सगळे माहित असूनहि ती व्यक्ती सरकारात एका मोठ्या पदावर निवडून आलेली आहे.
समोरच्याला लुबाडणे - या बाबत बोलायचे तर माझा स्वतःचा अनुभव (एका अतिप्रचंड व्यापारी कंपनी बरोबर काम केल्यावर) असा की वस्तू परदेशातून स्वस्तात आणायची, त्यावरचे सगळे खर्च, अगदी कस्ट्म, वहातूक, गोदामात ठेवायचा खर्च, वितरणाचा खर्च, दुकानाचे भाडे, दुकानाचे इतर खर्च, तिथल्या नोकरांचे पगार इ. सर्व गोष्टी धरून त्या वस्तूची जी किंमत ठरते त्याच्या कमीत कमी तिप्पट किंमत दुकानात लावतात. नंतर पुनः प्रत्येक दुकानात तिथला मॅनेजर त्याहि पेक्षा जास्त किंमत लावायला कमी करत नाही. हे सगळे म्हणजे लुबाडणे की हुषारीचा व्यापार?

तीच गोष्ट भारतातील भ्रष्टाचाराची. कायदे करणारे राजकारणी पैसे खाऊन कायदे करतात त्याला भ्रष्टाचार म्हणायचे म्हणे!

पण अमेरिकेत अगदी तेच करतात, पैसे देऊन राजकारण्यांकडून कायद्यात स्वतःच्या सोयीच्या होतील अश्या पळवाटा काढल्या जातात - त्याला गोंडस नाव आहे - Lobbying!
मी जर लिहायला बसलो तर अमेरिकेतल्या इतक्या गमती जमती लिहू शकेन की त्यापुढे भारत किती चांगला असेच म्हणावे लागेल. निदान फालतूपणा करून इराकवर नि व्हिएटनाम वर किंवा कुणावरहि हल्ले तर केले नाहीत!

मी जर लिहायला बसलो तर अमेरिकेतल्या इतक्या गमती जमती लिहू शकेन की त्यापुढे भारत किती चांगला असेच म्हणावे लागेल.

लिहाच तुम्ही म्हणजे आम्हा देशबान्धवाना समज येइल

मी जर लिहायला बसलो तर अमेरिकेतल्या इतक्या गमती जमती लिहू शकेन की त्यापुढे भारत किती चांगला असेच म्हणावे लागेल. >> oh, the irony !!

ह्या धाग्यावर अमेरिकेत राहणार्‍या एका ज्येष्ठ आयडीच्या काहीच कमेंट्स नाहीयेत ह्याचे फार दु:ख वाटतय.. Happy

ज्येष्ठ आयडीच्या
ज्येष्ठ लोकांना अनुभव खूप असतात, पण अक्कल असेलच असे नाही, त्यामुळे उगाच त्यांच्याकडून भलत्याच अपेक्षा करू नयेत. काहीच्या बाही लिहीत बसतात!

मला प्रथम हाती अनुभव आहे.
एका फिजी स्मोक शॉप कम रेस्तरों कम भारतीय ग्रोसरी स्टोर मधे ३ महिने काम करत होतो.
उच्च शिक्षण घेत असताना विद्यापीठ केटरींगमधे आठवड्यातुन १४, १५ तास नोकरी करत होतो. चांगला पगार आणी बर्यापैकी टिप मिळायची ज्यातुन महिन्याचा खर्च निघायचा. उन्हाळी सुट्टीमधे नोकरी सुटली तेंव्हा एका मित्राचा वशिल्यानी फिजी स्टोर पकडल.
मिनिमम वेजेस पेक्षाही कमी पैसे तासाला मिळायचे. शारीरीक कष्टाचे काम आणी सवय बिलकुल नसल्यामुळे खुप अवघड जायचे. कामाचे ठिकाण खुप लांब होते. २ बस बदलुन सायकल हाणत पोहोचायला १.५ तास लागायचा. मला वाटत नाही माझा चेहरा फार प्रसन्न रहात असेल तिथे दिवसभर Happy असो. पण तेंव्हा त्या काही शे डॉलर्सची खुप गरज होती.

हिम्सकुल, तुला नक्की कोणाच्या कमेंट्स अपेक्षित आहेत? नंद्या43 यांनी तर लिहीलं आहे Happy
इथे पण फार काही वेगळे नाही हे खेदाने नमुद करते.
आत्ता एका डोसा कॉर्नर नावाच्या रेस्टॉरंट मध्ये आलो तर ते renovation साठी बंद असा मोघम मेसेज दारावर दिसला! येण्यापूर्वी फोन केला तर तो काही रिंग्स नंतर voice message वर जात होता पण तिथे रेस्टॉरंट बंद असल्याबद्दल काहीही मेसेज नव्हता!

वत्सला, हजर कस्टमर्सनाही अगत्यशील वागणूक मिळत नाही तिथे अजून कस्टमर्स नसलेल्या लोकांप्रती अनास्था फार आश्च्यर्यकारक नाही.

मागितल्याशिवाय आजिबात विंडो टेबल न देण्याची (किंवा टेबल निवडीचा अधिकार न देण्याची) अजून एक फार वाईट खोड भा रे रेस्टॉ मालकांना आहे. एकदा एका रेस्टॉ. मध्ये वेटर किचनला लागून असलेल्या टेबलवरच बसायचा आग्रह करू लागला का तर म्हणे दोन कस्टमर ऑलरेडी तिथे बसले आहेत मग आम्ही विंडो टेबलजवळ (जे दोन रो सोडून पलिकडे होते) बसलो तर त्याला टेबल वेट करायला जास्तं त्रास पडेल. अनाकलनीय आहे हा अ‍ॅटिट्यूड.
४० मिनिटे होवूनही ऑर्डर येईना आणि जस्ट ५ मिनिटांपूर्वी आलेल्या टेबलवर ऑर्डर सर्व होतांना बघून आम्ही विचारले तर म्हणे त्यांनी आधीच फोनवरून ऑर्डर दिली होती. मान्य पेट्रन्स ना कस्टमर पेक्षा जास्त भाव मिळतो पण हा प्रकार मी ईतर कुठे बघितला नाही.

अजय , नॉर्थ वेस्ट मधल्या रेस्टॉ. मालक्/मॅनेजर चे डेमोग्राफिक्स कसे होते. तरूण आणि ईथे शिकलेले असतील तर नक्कीच जास्तं प्रोफेशनल आणि अगत्यशील असतात असे माझेही निरिक्षण आहे.

नवीन निघालेल्या रेस्टॉरंट्समध्ये बरीच सुधारणा आहे. जे खूप पूर्वी अमेरिकेत आले आहेत त्यांना आणि त्यांच्या कस्टमर्सना काहीही देशी नावाखाली खपवलेले चालत असणार कारण तेव्हा नाविन्य होते, रेअर असायच्या ह्या गोष्टी, स्मरण्रंजन वगैरेच जास्त. दुर्दैवाने ते मालक-चालक अजून त्याच मेन्टॅलिटीत असावे.
नवीन एक दोन रेस्टॉरंट्स माझ्या पाहण्यात आहेत तिथे खूप व्यवस्थित, प्रोफेशनली सर्व्हिस देणे वगैरे आहे. कॅमरिओचे करीलिफ व वुडलँड हिल्सचे अनारबाग. (२-४ वर्षं जुनीच आहे ही माहिती. आम्ही हल्ली जातच नाही बाहेर जेवायला. गेलोच तर आर्टेशियातील राजधानी वगैरे थाळीच्या ठिकाणी जातो.) राजधानी देखील चांगले आहे. मुळात थाळी, १७६० पदार्थ, आग्रह करकरून वाढणे हाच युएसपी असल्याने बरे वाटते.

(थोडा अवांतरच झाला प्रतिसाद. कारण वेटर लोकांबद्दल काही बोलले नाही. कदाचित इथेही असतील शिकून अर्धवेळ काम करणारे विद्यार्थ्ती. पण ते निदान दुर्मुखलेले नसतात.)

अमेरिकेत शिकायला आलेल्या मुलांना फि व्यतिरिक्त बरेच खर्च असतात, माझा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी काही वेळ भारतीय रे. मध्ये काम करून तो खर्च काढला होता, आता ते सगळे कॉलेजमध्येच जॉब करतात वरुन ७-८ मुलांच्या एक वेळच्या खाण्याचा प्रश्न मिटला होता.
मी स्वतः इथे आल्यावर भारतीय दुकानात काम करून एम.एस केलं होतं, पैसे अगदीच चिल्लर मिळत नाहीत. माझा नवरा आणि त्याचा भाऊ आणि त्यांचे सगळे मित्र असंच मॅक-डी, वै मध्ये काम कराय्चे. रादर सगळ्याच स्टुडंट्सना काही ना काही काम करावंच लागतं, फि माफ असली तरीही. हेच सगळं करताना माझा भाऊ १००+ फॅ पेक्षा जास्त उन्हात १ तास सायकल दामटत जायचा, मी स्वत: सव्वा तास बसने जाय्चे. तसंच मुलांना बरिच टेंशन्स असतात, बर्‍याच गोष्टी डोक्यात चालू असतात, कुठला कोर्स, कुठला क्लास, जॉब, वै.

"पण कुठलंही कॉलेज असं कँपस च्या बाहेर काम अलाऊड करत नाही ना" - कॉलेज नाही, इमिग्रेशन च्या कायद्याप्रमाणेच एफ-१ वर असताना फक्त कँपस जॉब (२० तास), असिस्टंटशिप ई. करता येतं असं मला वाटतं. त्यामुळे जर हे काम बेकायदेशीर असेल, तर माझ्यापुरता तरी हे जस्टीफाय होत नाही. कुणीही डोक्यावर बंदूक ठेवून अमेरिकेला जा असं सांगितलं नसतं. तो चॉईस असतो. मग चांगल्या क्वालिटी ऑफ लाईफ च्या अपेक्षेने अमेरिकेत येऊन परत बेकायदेशीर काम करणं हे दुटप्पी वर्तन आहे. माझं हेच मत, ईथे येऊन प्रोफेसर्स च्या विश्वासाला तडा देत परिक्षेत हिंदीत बोलून ई. मार्गाने कॉपी करण्याविषयी सुद्धा आहे. ज्या गोष्टी नको म्हणून तुम्ही स्वतःच देश सोडून येता, त्याच गोष्टी स्वतःबरोबर का कॅरी करता?

Pages